नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Thursday, March 28, 2019

वाहिन्यांचे निकालास्त्र


वाहिन्यांचे निकालास्त्र 🛰

दिनांक : २२ मे ते २३ मे
ठिकाण : बातम्यांच्या गिरण्या

नमस्कार, सुप्रभात मी ' अमुक तमुक ' रणसंग्राम' २०१९, 'विजेता कोण?१९',  'राज्यग्रहण १९',  या कार्यक्रमात आपले स्वागत. या ठिकाणी जे आम्हाला बघत आहेत त्यांना सांगू इ्छितो की आत्ता सकाळचे ७ वाजले आहेत.  लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे हे तुम्ही जाणताच. उद्या मतमोजणी सुरु होईल.
या सर्वांचे " मेगा कव्हरेज " जवळजवळ ४८ तास फक्त फक्त आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.  तेंव्हा कुठेही जाऊ नका. पहात रहा फक्त ' न्यूज माझा'

ब्रेक नंतर परत एकदा तुमचे स्वागत. पुढे ४८ तासात इथे अनेक मान्यवरांना आम्ही पकडून आणू,  जे येणार नाहीत त्यांच्या घरी जाऊ. आज त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ,  उद्या निकाल लागत असताना ' काल मला असे बोलायचेच नव्हते, माझ्या बोलण्याचा विपर्यास केला आहे ' हे ही ऐकू. पहात रहा ' न्यूज पावलोपावली '

परत एकदा आपले स्वागत. इथे जी वरची पट्टी आहे तिथे संपूर्ण भारताचे लोकसभेचे आकडे आम्ही दाखवू. खालच्या बाजूला महाराष्ट्रातील बदलत्या निकालांची नोंद, प्रत्येक क्षणी ( अगदी तिकडे एका मशिनची मोजणी झाली की इकडे अपसेट) तुम्ही पाहू शकाल.
इथे डाव्या बाजूला आमचे अनेक वार्ताहर जे देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलेत त्यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत. राहिलेल्या जागेत तुम्ही इथे स्टुडीओत आम्हाला , इथल्या चर्चा पाहू शकाल.
कुठेही जाऊ नका , बघत रहा 'न्यूजमत' आमचेच

ब्रेक नंतर परत एकदा स्वागत. या ठिकाणी सकाळी सकाळी महाराष्ट्रातील विभागवार नेते, आणि राजकीय विश्लेषक भाऊ, आणि तात्या आले आहेत. ती एक मोकळी जागा ( खुर्ची) दिसते आहे ते मान्यवर सकाळी मुंबईत ट्रॅफिकमधे  अडकल्याचे कळते.

तात्या काय वाटते तुम्हांला याबद्दल? अगदी थोडक्यात सांगा. 

मला वाटते त्यांचे चुकले. त्यांनी ठाण्याहून घाटकोपर पर्यंत जलद रेल्वे, घाटकोपर - अंधेरी मेट्रो आणी नंतर अंधेरी - एल्फिन्स्टन

तात्या , इथे एल्फिन्स्टन चे प्रभादेवी नाव झालयं. तुम्ही तर मराठीचे...

भाऊ, जरा थांबा- थांबा. मी तुमच्याकडे येणार आहे. भाऊ,भाऊ शांत व्हा.  तात्यांना त्यांचे म्हणणे मांडू दे

भाऊ शांत होईस्तवर आपण घेऊ एक ब्रेक. कुठेही जाऊ नका.

तर मंडळी ब्रेकवर जाण्यापूर्वी तात्या आपणास रेल्वेने स्टुडिओ त कसे पोहोचायचे सांगत होते.
 बोला तात्या .
तर अंधेरी हून त्यांनी जलद लोकल पकडून दादर पर्यत यावे आणि दादर हून धीम्या लोकलने प्रभादेवी गाठावी.

अलबत्या, तुम्ही सहमत आहात का तात्यांशी.

अजिबात नाही कारण गेल्या ५ वर्षात ठाण्याहून - प्रभादेवी पर्यत मार्ग सुरु व्हावा अशी अनेकांची मागणी होती.ती पूर्ण झाली असती ते हे मान्यवर वेळेत आले असते.

गलबत्या, तुमचे म्हणणे थोडक्यात सांगा. तुम्हाला १ मिनिटे देतो. आपल्याकडे विषय खुप आहेत. वेळ फक्त ४८ तास आहेत.

असं आहे बघा, लोकल फलाटावरुन निघायला पण १ मिनिटापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही वेळेत सुट द्यावी ही मागणी मी सर्वप्रथम करतो.
तर  हे जे घाटकोपरला उतरून अंधेरी मार्गे येणे हे म्हणजे 'काखेत कळसा, गावाला वळसा'  असं झालं. हे काय ' युती ' 'आघाडी' आहे का? आम्हाला सिट नाही तर आमचा उमेदवार तुमच्या जागेवरून पश्चिम उपनगरातून लढायला?
ठाणे लोकलने सरळ परळ स्थानकात उतरून रेल्वे ब्रीज ओलांडला की प्रभादेवी येते.

रेल्वे ब्रिज,परळ 😠
#@*&%√¢£
*&%₹@##@#©®£€😠
(तात्या,  भाऊ, अलबत्या-गलबत्या  धमासान सुरु )

आपण इथे थांबणार आहोत कारण ज्या 'मान्यवरांसाठी'  हे भांडत आहेत ते कार्यालयात पोहोचले आहेत.
 एका छोट्या विश्रांती नंतर आपण ते मान्यवर ' सलबत्या ' यांच्याशी  बोलणार आहोत.

परत एकदा सगळ्यांचे स्वागत . ज्यांनी आताच टीव्ही लावला आहे त्यांच्यासाठी . इथून पुढे ४८ तास  निकालाचे "महाकव्हरेज" तुम्ही फक्त आणि फक्त इथेच पाहू शकणार आहात.  ब्रेकवर जाण्यापूर्वी मान्यवर ' सलबत्या " हे रहदारीतून वाट काढत इथे पोचले आहेत. त्यावरूनाही चर्चा झाली. आता आपण सरळ त्यांना प्रश्न विचारू ,

सलबत्या सर , तुमचे या महाचर्चेत स्वागत.

नमस्कार. 🙏🏻

नक्की कसा झाला तुमचा प्रवास. हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचे आहे

नाही म्हणजे छान झाला . ठाण्यात मी  प्रायव्हेट टॅक्सी बुक केली  आणि आलो .🤪

मग तुम्ही कळवलेले की  ट्रॅफीेक जाम मध्ये अडकलेले आहात ?

हो ते किंग सर्कल, खोदाद सर्कल कडून पुढे परळला जाताना बहुतेक मेट्रोचे काम असल्याने . . ..

तेच मला म्हणायचे आहे
मुंबईकरांना कशाला पाहिजे मेट्रो . आधी लोकल सेवा सुधारा, रेल्वे ब्रिज डागडुजी करा 😠
( मग सुरु सगळे )
#@#&-+&%₹#@€£😠
#@#&-+&%₹#@€

मंडळी इथे  थोडं थाबू कारण ज्या ' प्रभादेवी ' वरून हे सगळं सुरु झालं तेथूनच एक  ब्रेकींग न्यूज येत आहे . आमचे प्रभादेवीचे प्रतिनिधी ' देव काणे ' तिथे आहेत.

देव , मला तुम्हाला विचारायचे आहे . काय बातमी आहे तुमच्याकडे ?
देव , माझा आवाज तुमच्यापर्यत पोचतोय का ? देव ? देव ?

होय  ' अमुक  - तमुक ' मला तुमचं बोलणं ऐकू येतंय.

बातमी काय आहे .?

' नैऋत्य - ईशान्य मुंबई  मतदार संघातील ' अपक्ष ' उमेदवार   प्रभादेवीच्या ' सिद्धिविनायक मंदिरात  दर्शनासाठी पोचले आहेत .

यावेळची सगळ्यात मोठी बातमी तुम्ही टीव्ही स्क्रीनवर पहात आहात.
अपक्ष उमेदवार   मंदिरात दर्शनाला  .
सगळ्यात मोठी बातमी. सर्व प्रथम आम्ही दाखवत आहोत
"अपक्ष उमेदवार   मंदिरात दर्शनाला "

देव, तुझे काही  त्यांच्याशी बोलणे झाले का ? काही माहिती ? ते का गेलेले ? विजयासाठी मागणी त्यांनी  सिध्दिविनायका कडे केली का ?

होय , अमुक - तमुक ,  हे अपक्ष  इथेच आहेत. 
नमस्कार ? तुम्ही देवाकडे काय मागितले ? विजय ?
तुमचे देवळात यायचे प्रयोजन काय ?

त्याचे काय आहे , उद्या निवडणुकीचा निकाल लागेल. मी विजयी होईन की नाही त्या परमेश्वरालाच माहीत. पण  तुम्हाला माहीत आहे आज २२ मे. आज ' संकष्टी चतुर्थी '🌷 लोकसभेचा अपक्ष उमेदवार म्हणून  मला डायरेक्ट
 गाभा-यात प्रवेश मिळाला.
उद्या हरलो तर पुढच्या संकष्टीला लाईन लावावी लागेल . म्हणून म्हणलं आजच दर्शन घेऊ.

धन्यावाद आपण आम्हाला  प्रतिक्रिया दिलीत. कॅमेरामन 'क्लिक क्लिक' सह मी 'ढिशॅंव' 'एकच माझा'.

धन्यवाद देव , तुम्ही तिथेच थांबा आणि कोणकोण उमेदवार येतात याचे अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवा.

 भाऊ,  मला  तुम्हाला एक महत्वाचा प्रश्ण विचारायचा आहे, यात तुम्हाला श्रद्धा, अंधश्रध्दा, जोतिष , भविष्य वगैरे जाणवतं?  काय सांगावस वाटतं ?

भाऊं च्या आधी मी बोलतो. पुरोगामी महाराष्ट्रात हे सगळं  😠👆🏻

तात्या प्रश्न मला विचारलाय , मध्ये बोलू नका 😠

अलबत्या तुम्ही थांबा , मी शेवटी तुमच्याकडे येणार आहे

गलबत्या  तुम्हालाही मी वेळ देणार आहे
सलबत्या, एक मिनिट , एक मिनिट

बाबा, हा "व्हाटसप" वर मेसेज बघितलात ? सरकारने सर्व न्यूज चॅनेलवर दोन दिवसासाठी बंदी आणली आहे .
 निवडणूक निकाल फक्त सरकारी वाहिनीवर  रात्री ९ वाचता पाहता येतील.

काय सांगतोस ? अरे  असे पण "  अच्छे दिन आले " तर  ???? 😊


📝अमोल केळकर
a.kelkar9@gmail.com
poetrymazi.blogspot.in
विसंगती सदा मिळो.....

Sunday, March 24, 2019

जाऊनी पक्षात सा-या


आज रंगपंचमी यानिमित्याने सर्वाना शुभेच्छा . 'रंग'  म्हणले की सुरेश भटांचे  एक गाणं सर्वाना आठवते  " रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा "

रंगपंचमी आणि इलेक्शनच्या पार्शवभूमीवर ' भटांचे'  हे गाणे नव्या व्हर्जन मध्ये

 ' *वाईट नका वाटून घेऊ  रंगपंचमी आहे*' 🌈

चाल : " *रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा* "
जाऊनी पक्षात सा-या पक्ष माझा वेगळा
गुंतुनी हप्त्यात सा-या 'हात' माझा मोकळा

राहती माझ्यासवे हे कार्यकर्ते मित्रापरी
हे  पैशाचे सुख ज्याला, लागला माझा लळा

आज सकाळी का कळेना मी 'पळाया' लागलो
अन जिथे  आयुष्य गेले, कापला माझा गळा

दावंती 'आदर्श' तेथे, पाळती  खोट्या दिशा
सोडणारा' गद्दार' अन राहणारा 'आंधळा'

इलेक्शनच्या मध्यभागी हिंडणारा नेता मी
माझीयासाठी हा माझा जगण्याचा सोहळा

 📝 अमोल केळकर
विसंगती सदा मिळो ....
poetrymazi.blogspot.in

२५/३/१९
रंगपंचमी

Thursday, March 21, 2019

न्यूज पाहून, सुचले सारे


धुळवड स्पेशल 🥶🌈💥

हरघडी ' ब्रेकींग न्यूज ' पाहून तात्काळ 'टुकार' विडंबनाच्या जिलब्या पाडणा-या सर्व 'सुमार' 'कविंना' समर्पित 😉🤭

🔥🗣 *बूरा न मानो*....💥
--------------------------------------------
( मूळ गाणे: शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलिकडले)

'न्यूज'पाहून सुचले सारे, 'टुकार'च्या पलिकडले
प्रथम कडवे रचले आणिक लिहू नये ते लिहिले

अर्थ नवा काव्यास मिळाला
'बूट' जूना पण गाल सुजला
त्या दिवशी का प्रथमच माझे 'विडंबन' अडखळले

जुळवितो 'यमकांना' रात्री
लक्ष विचार सुचतील खात्री
'विसंगतीत' या विश्वाच्या, रहस्य मज उलगडले

न्यूज'पाहून सुचले सारे, 'टुकार'च्या पलिकडले
प्रथम कडवे रचले आणिक लिहू नये ते लहिले
-------------------------------------------
मुळ गाणे:-

शब्दावाचुन कळले सारे,, शब्दांच्या पलिकडले
प्रथम तुला पाहियले आणिक
घडू नये ते घडले

अर्थ नवा गीतास मिळाला
छंद नवा अन् ताल निराळा
त्या दिवशी का प्रथमच माझे
सूर सांग अवघडले

शब्दावाचुन कळले सारे,, शब्दांच्या पलिकडले-

आठवते पुनवेच्या रात्री
लक्ष दीप विरघळले गात्री
मिठीत तुझिया  या विश्वाचे
रहस्य मज उलगडले

शब्दावाचुन कळले सारे,, शब्दांच्या पलिकडले
-------------------------------------------
"विसंगती सदा मिळो,  टुकार विडंबन कानी पडो"
www.poetrymazi.blogspot.in

📝२१/०३/१९
अमोल केळकर

Wednesday, March 20, 2019

चला मुलांनो आज शिकून या.


धुळवड स्पेशल 📝
(२१/३/१९)

प्रिय काॅग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील वडीलधारी मंडळींनो, मुलांना शिस्त/ संस्कार लावायचे असतील तर सरळ 'भाजपात' न पाठवता 'संघात' पाठवा.🙏🏻🤷🏼‍♂

आमच्या निष्ठावान आपटे,गोखले,गोगटे, कलकर्णी ,जोशी, खाडीलकर, लेले,  यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या का? ?🤨🙊
----------------------------------------------------
(चाल: चला मुलांनो, आज पाहू या शाळा चांदोबा गुरूजींची)

या वा-याच्या बसुनी 'ईमानी',सहल करुन या पक्षाची
जावा मुलांनो, जरा शिकून या पध्दत भाजपा पार्टीची 🌷

आली इलेक्शन जमले नेते,निवडणुकीच्या रिंगणात
महा(जन) गुरुजी तर दिसती कसल्या मोठ्या चिंतेत
बघुनी पोरे ती करिती चळवळ आपुल्या इवल्या हातांची✋🏻
जावा मुलांनो, जरा शिकून या पध्दत भाजपा पार्टीची🌷

द्वितियेपासून रोजच येती सुपुत्र यांचे पार्टीत
मुले चांगली रमती आणिक सगळे आपुल्या मस्तीत
कधी स्टेशनातून सुटते 'रेल्वे' ओढ लागूनी 'घडीची' ⏰🚂
जावा मुलांनो, जरा शिकून या पध्दत भाजपा पार्टीची 🌷

कुणी बेताचे ओठ हालवूनी, भाषणास वेडावित असे
रागाने मग 'मावळ' प्रांत गोरामोरा होत असे
बघुनी सारे हसता हसता बनते कविता 'टुकारची' 😉
जावा मुलांनो, जरा शिकून या पध्दत भाजपा पार्टीची 🌷

🌷✋🏻⏰🚂🏹

रंगूनी रंगात सा-या रंग माझा वेगळा 🌈🥶

अमोल केळकर

Sunday, March 17, 2019

सोशल मिडीयावर व्यक्त होताना


सोशल मीडियावर व्यक्त होताना :- 📝
( तुषार पुरवणी- १७/३/१९)

मला आठवतंय  शाळेत असताना मराठीच्या परीक्षेला  हमखास एक निबंध यायचा 
 ' मृत्यू  शाप की वरदान '   किंवा  ' विज्ञान शाप कि वरदान'. आता सध्या  कुठल्या प्रकारचे  निबंध  येतात माहीत नाही पण  सध्याची परिस्थिती पाहता
 ' सोशल मिडीया -  शाप की वरदान '  असा निबंध  एक दिवस मराठीच्या पेपरात आला तर आश्चर्य वाटायला नको.  

साधारण ९० च्या दशकात  म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो  तेव्हा  मीडिया म्हणजे  वृत्तपत्रे , दुरदर्शनवर ठराविक वेळे पुरते लागणारी एकच वाहिनी  ते सध्याचे २४ x ७  अखंड पणे  ' ब्रेकींग न्यूज '  बातमीचा रतीब  घालणा-या असंख्य वाहिन्या  होण्याइतपत  "मीडियाचे सोशल होणे " हा काळाचा महिमाच म्हणावा नाही का ? . 

सगळ्यात पहिला बातमी कोण देतो याची चढाओढ , सर्वात आधी, जणू काळाच्या ही पुढे आम्ही आहोत असे स्वत:ला समजणा-या   वाहिन्या  हे माझ्या मते  समाज माध्यमात तेढी पसरवण्यास कारणीभूत ठरणारे पहिले विषाणू.  कारण बातमीतील  
सत्यता - असत्यता न पाहता सर्वात आधी बातमी ( मग ती  खरी खोटी कशी का असेना  ) देण्यातच ते धन्यता मानत .अर्थात  याला अपवाद होते/ आहेत पण मर्यादित स्वरूपात. 
तरी  पण काही वर्षांपर्यत  परिस्थिती  जरा बरी होती असे म्हणावे लागेल कारण बातम्या बघण्यासाठी का होईना घरात  इडियट बॉक्स समोर बसावे लागायचे. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाने जेव्हा या सगळ्या बातम्या भ्रमणध्वनीवरून  
(मोबाईलवरुन )  क्षणात अंगा खाद्यावर  खेळायला लागल्या  तेव्हा परिस्थिती  बदलायला लागली. वेगवेगळे अॅप्लिकेशन मुख्यता ' फेसबुक '   एकेकाळी संगणकावर वापरावे लागायचे किंवा संदेश पाठवण्यासाठी  मुख्यतः ईमेल  याचा वापर व्हायचा.  आता आधुनिक भ्रमणध्वनी द्वारे २४ x ७  सर्व गोष्टी ( माणसे, बातम्या आणि अफवा ) खूपच जवळ आल्या आणि एक अपडेटेड सोशल विषाणू  हळूहळू तयार झाला . 

फेसबुकच्या मदतीला ट्विटर, व्हाट्सअप, इंस्टाग्राम  ही बहीण भावंडे आली .
 दुरावलेले मित्र , लांब राहणारे नातेवाईक  याची भेट घालून द्यायला यांनी मोठा पुढाकार घेतला. नवी नवीन  सोई -सुविधा त्यात येऊ लागल्या . बालपणीच्या शिशु विकास मंदिर पासून उच्च शिक्षणाचे ग्रुप , नातेवाईक, सम वयस्क , सम विचारी असे असंख्य ग्रुप तयार होऊ लागले. सुरवातीचे ' सुप्रभात  - शुभ रात्री - वाढदिवसाचे मेसेज'   याचे नाविन्य कमी होत गेले आणि मग सोशल मिडीयाचा हा विषाणू आपले रंग दाखवू लागला. याचा खुबीने उपयोग करून घेतला  समाजविघातक घटकांनी. दुर्दैवाने बरेचजण याला बळी पडले. बघता बघता रौद्र रूप धारण केलेल्या या राक्षसाने  मग मागे वळूनच पाहिले नाही. 

आपल्याला हवी ती  बातमी  ' ब्रेकींग न्यूज'  च्या नावे  एका ग्रुप वर टाकून क्षणार्धात तिला साता समुद्रापार पोचवायचे कार्य या राक्षसाने इमाने इतबारे  पार पाडले.   

अनेक ठिकाणी निखळ मैत्रीची जी  जागा होती ती द्वेषाने घेतली,शब्दाला शब्द वाढले, धर्म-जात -प्रांत- भाषा - देश - पक्ष यानुसार आवडी निवडी ठरू लागल्या , प्रेमळ शब्दाच्या जागी विषारी डंख पसरू लागले आणि शेवटी  याच सोशल मीडियाला  
 'आनंद पसरवा , अफवा नको'  अशी जहिरात करावी लागली . 

त्यामुळे आज   प्रत्येकाने सोशल मीडियावर व्यक्त करताना काही आचारसंहिता  अमलात आणणे आवश्यक वाटते 

१) आपण एखादा मेसेज पुढे ढकलताना त्यात काही आक्षेपार्ह गोष्टी नाहीत ना, काही वाद - विवादाचे मुद्दे नाहीत नाही याचा विचार अवश्य करावा.  
२) ' ब्रेकींग न्यूज ' च्या नावाखाली सरसकट बातम्या पुढे ढकलू नयेत. त्याची सत्यता तपासावी . सत्यता नाही समजली तर गप्प बसेल तो सोशल माणूस कसला? या अशा प्रकारानेच अनेकजणांनी वेळेच्या आधीच 'हे राम' म्हणले.
३) एखाद्याने एखादा मांडलेला मुद्दा चुकीचा वाटला तर सभ्य पणे  निर्दशनास आणून द्यावे, आपले मत थोडक्यात मांडावे , मीच खरे असे म्हणू नये
कालांतराने ते मुद्दे कालबाह्य होतात पण आपण या मुद्यापायी एखाद्याशी कायमचे वैर पत्करून बसतो.
४) सारासार विचार , चांगल्या गोष्टीचे कौतुक , मैत्रीपूर्ण संवाद , वेळ प्रसंगी माघार या कृतीमधूनच यामाध्यमाद्वारे जी  एकमेकांच्यात जवळीक निर्माण झालेली आहे  ती कायम राहाण्यास मदत होईल 
५) आपण जरी चांगले असलो तरी  प्रत्येक व्यक्तीचा ( अपरिचित )  हेतू समजू शकत नसल्याने वयक्तिक  फोटो , टीका टिप्पणी , प्रत्येक गोष्टीची बारीक सारीक माहिती सोशल मिडीयावर देणे टाळावे किंवा आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंट वर काही विशिष्ठ सेटींग करून ठेवावे जेणेकरून कुणी आपल्या माहितीचा दुरुपयोग करणार नाही आणि ती माहिती फक्त ठराविक, विश्वासू व्यक्तीनाच कळू शकेल. 

मर्यादेत स्वरूपात सोशल मीडियावर व्यक्त होणे , काही चागल्या गोष्टींचा स्वीकार करणे यासारख्या लसी वेळीच टोचल्या नाहीत  तर हा विषाणू समाजमनाचा नाश केल्याशिवाय रहाणार नाही आणि याला आपण  सर्वचजण जबाबदार राहू 
हे कळकळीचे सांगणे.🙏🏻

📝अमोल केळकर


Tuesday, March 12, 2019

जा मुला जा..


गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का?
जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा.

म्हणणा-या वडिलांना आता असंही म्हणावे लागतयं 😅

राष्ट्र- वादी हा नगरात उभा या
जा मुला जा दिल्या पक्षी तू सुखी रहा 🌷

कडकडूनी तू वाद घालता बाळा
कार्यकर्ते आले, झाले करवीत चाळा
'आठवले'  सारे, सारे गहिवरले त्या मळा
'माढा' 'मावळूनी' तुला सांगती जा

जा मुला जा 🌷

दारात उभी राहिली युतीची जोडी
बघ मंत्रीपद ठाकले आरक्षून गाडी
लागू दे तुज ला कमलपुष्पची गोडी
विरोधी नेतेपद मला ठेऊनी जा

जा मुला जा दिल्या पक्षी तू सुखी रहा 🌷

📝अमोल

१२/३/१९

Friday, March 1, 2019

अभिनंदन करूनी बोला..


शुभ शनिवार 🙏🏻

🚀🚀🚀🚀🚀🚀

भारताच्या सूता,  तूला नमोंच वरदान
अभिनंदन करूनी बोला, बोला जय जय वर्थमान

दिव्य तुझी देश भक्ती, भव्य तुझी काया
लागलीच गेलास तू,  शत्रूला धराया 🚀
हादरली ही पाकडी, थरथरला इम्रानखान
अभिनंदन करूनी बोला, बोला जय जय वर्थमान

शत्रूला धरण्यासाठी घेतलास धोका
तिथे देशभक्तीचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे, परि आनंदी हिंदुस्थान
अभिनंदन करूनी बोला, बोला जय जय वर्थमान

आले किती ,गेले किती, संपले भरारा
हिंदुस्थान नावाचा रे अजूनी दरारा 🚩
सुखरूप आलास घरी, आतंकवादी हैराण

अभिनंदन करूनी बोला, बोला जय जय वर्थमान

📝२/३/१९ 🚀🙏🏻
poetrymazi.blogspot.in
Related Posts Plugin for WordPress, Blogger...