Thursday, October 8, 2020

खेळून हरणे अन न खेळता जिंकणे


 IPL सामन्यांना समर्पित 🏏

खेळून हरणे अन न खेळता जिंकणे

मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे


षटकात धावगतीचा का सांग भार व्हावा?

षटकार मारताना, तो झेल ही ठरावा

हे प्रश्ण जीवघेणे हरती इथे 'शहाणे' 💵


'मनी फिक्सिंग' ज्याच्या त्यालाच हे कळावे

टप्प्यात चेंडू येता, आनंदुनीच जावे

तिरपा फटका भोळा, आम्ही इथे दिवाणे


निघता परतुनी तू, उगवे तसाच तारा

चेंडू फळी खेळाचा, उडला बोजवारा 

रात्रीस खेळ बघता, सुचले टुकार गाणे


मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे


📝०९/१०/२०

(अमोल)

#दिसतं_तसं_नसतं

#ओढून_ताणून_टवाळखोरी

Tuesday, October 6, 2020

हाॅटेलिंग ssss पुन्हा, हो ना.


 हाॅटेल चालू झाली. त्यातही अस्सल खवय्या पुणेकरांच्या आनंदाला उधाण आले हे काही बातम्यातून दिसून आले. त्यांनाच ही 

' गंमत जंमत' समर्पित 

( मुळ गाणे : अश्विनी ये ना, येना...)

हाॅटेलिंग ssss पुन्हा, हो ना.

पुणे sssss गिळू कसा तुझ्याविना मी काही गं.

होतीच जिंदगीत आणीबाणी गं

आता खाणे, जिथे तिथे जाणे

मी तर रांगेत उभा वेटींगला

तू लाव जरासा वशिला


डोश्श्या, sssssssss

 उगाच काॅरनटाईन झाले रे

तुला खायचे असे राहून गेले रे

आण चटण्या, तू घाल चटण्या

विसर झाले गेले सख्या रे

सांबार आण आता जरा रे

डोश्श्या, sssssssss


नळ स्टाॅप, कोथ-रुडची हवा

सॅनीटाइझर हाही रोजचा नवा

मास्क हा काढून बाजूस ठेवा

मेनू आज फिश-करी ठsरवा

तुझी माझी बिलं आता देईल का कुणी

खाण्यातूनी पळतील जुनी ती दुखणी

तू ये ना तू येना


हाॅटेलिंग ssss पुन्हा,

पुन्हा 


📝अमोल केळकर

०६/१०/२०

#हाॅटेलिंग@पुणा

#पुणे_तिथे_काय _उणे😋

#🧆🥙🥪🍕🌯🥗🥘

Sunday, September 27, 2020

भेट यांची त्यांची घडते...


 नुकत्याच झालेल्या "ग्रेट भेटीला" समर्पित 


भेट यांची त्यांची घडते, कालच्या दिसाची

वाट ब्रेकिंगला मिळते,न्यूज भूकंपाची

भेट यांची त्यांची घडते...


क्षुद्र 'पाॅलिटि्कसची' खोटी झुगारून नीती

बिहारला सोडून आली अशी तुझी प्रिती

कुणा मुळी जाणीव नव्हती,अशा सामन्याची

वाट ब्रेकिंगला मिळते,न्यूज भूकंपाची


भेट यांची त्यांची घडते..


निवडणूका आधीच्या शपथा, अर्धा अर्धा श्वास

स्वप्नावत 'खुर्ची ' दिसावी, असे सर्व भास

जनतेला तर भोवळ आली,मधूर मिलनाची

वाट ब्रेकिंगला मिळते,न्यूज भूकंपाची..


भेट यांची त्यांची घडते.


प्रश्ण तसे ठरले होते, उत्तरे मिळाली

हयातीत गुप्तपणे बैठक अशी झाली

आपुल्याच माथी वर्णी, त्या मुलाखतीची

वाट ब्रेकिंगला मिळते,न्यूज भूकंपाची..


भेट यांची त्यांची घडते.🏹🌷


📝२७/९/२०२०

poetrymazi.blogspot.in

Thursday, September 17, 2020

खोडी माझी काढाल तर.


 * काल्पनिक, मनोरंजन हा हेतू 


( चाल : खोडी माझी  काढाल तर :- ) 🙅🏼‍♀️


खोडी माझी काढाल तर , अशी देईन फाईट 

घटके मध्ये जिरुन जाईल, "बाॅलीवूडची" ऐट 


खोडी माझी काढाल तर. . . . .🙅🏼‍♀️ 


'घरावरती' याल तर असा मारीन ठोसा 

'हातामध्ये' 'कंगन' घालून रडत बसा 

 

खोडी माझी काढाल तर. . . . .🙅🏼‍♀️ 


'  भक्त सारे ' माझे भाऊ , प्रसंग मोठा बाका 

पार्टीमध्ये कोण कोण होते,  विचारुच नका 


खोडी माझी काढाल तर. . . . .🙅🏼‍♀️ 


"ट्विट" माझे  पहा कसे ढोल बड-विते

"डायलाॅग" मधे ताकत आहे मी कुणाला भिते


खोडी माझी काढाल तर. . . . .🙅🏼‍♀️ 


📝१८/९/२०२०

(अमोल)

Friday, September 11, 2020

जग हे 'नाॅटी' बाळा


 टवाळखोरी 📝

( मुळ गाणे: जग हे बंदिशाला)

जग हे 'नाॅटी' बाळा, जग हे 'नाॅटी' बाळा

कुणी न इथे भला चांगला

जो तो 'शब्द' चुकलेला.


ज्याची त्याला प्यारी झोपडी

चाहते अन सखे सवंगडी

अधिकृत, अनधिकृत बेडी

प्रिय हो ज्याची त्याला


जग हे 'नाॅटी' बाळा, जग हे 'नाॅटी' बाळा


जो तो आपुल्या 'पक्षी' जखडे

नजर न जाई 'सत्ते'पलिकडे

मिडीयातले 'गुप्त' सरडे

लपूनी करिती लिला


जग हे 'नाॅटी' बाळा, जग हे 'नाॅटी' बाळा


कुणा न माहित 'शब्द-छल' ते

कुठून स्फुरले नच स्मरते

'टवाळखोरी'स जन घाबरते

जो वाचे तो खपला.


जग हे 'नाॅटी' बाळा, जग हे 'नाॅटी' बाळा


📝अमोल

( टवाळखोरी)

Thursday, September 10, 2020

राजकारणावर बोलू काही


 संदीप खरेंची माफी मागून 


जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही

चला दोस्त हो 'राजकारणावर' बोलू काही


उगाच दाखले 'अस्मितेचे'  देत रहा तू

फिरेल जेंव्हा 'बुलडोझर' तर बोलू काही

चला दोस्त हो 'राजकारणावर' बोलू काही…


'सामना' पाहून पारावर कुजबुजला पो-या

'वाट लागू दे' त्याची नंतर बोलू काही

चला दोस्त हो 'राजकारणावर' बोलू काही…


हवे हवेसे 'अच्छे दिन' जर हवेच आहे

नको नकोसे ' बुरे टोमणे' टाळू काही

चला दोस्त हो 'राजकारणावर' बोलू काही…


निवडणूकीची किती काळजी बघ पक्षातून

जेंव्हा येईल तेंव्हाच नंतर बोलू काही

चला दोस्त हो 'राजकारणावर' बोलू काही…


'मिडीया' असुदे हातामध्ये काठी म्हणुनी

'न्यूज' आंधळी 'ब्रेकींग' गडबड  बोलू काही

चला दोस्त हो 'राजकारणावर' बोलू काही…


📝अमोल 

१०/०९/२०

******

Saturday, August 29, 2020

असावा सुंदर पत्यांचा बंगला


 छोटे बिल्डर 'प्रणव केळकर' अर्थात आमचे चिरंजीव यांच्या कलाकृतीला  समर्पित ( मुळ गाणे : असावा सुंदर चाॅकलेटचा बंगला)


असावा सुंदर पत्यांचा बंगला

राजवाडा जणू शोभतोय चांगला


पत्याच्या बंगल्याला भिंतीचा आधार

बांधकाम करताना जपावे लागते फार


तिरप्याशा पानांचा बनवला कोन

हॅलो , ओ तिकडून जाऊ नका कोण


आडवी पाने टाकून स्लॅब छानदार

लवकरच बंगला हा आमचा पहाल


 पानाच्या भिंती मधे गुलाम दिसतो

समोरच्या सत्तीशी 'गुलामचोर' खेळतो


उंच उंच पत्यांचा बंगला बनला

ताईने पंखा लगेच लावला


धपकन कोसळला पत्यांचा बंगला

उद्या परत बनवू यापेक्षा चांगला


📝अमोल केळकर

poetrymazi.blogspot.com

२९/०८/२०२०

Sunday, August 16, 2020

माझे रोग बरे झाले


 "गुरुदेव" मला तुम्ही माफ करताच 🙏🏻


माझे रोग बरे झाले

आज मी

'कंपाँन्डर' पाहिले


दवाखान्यात दिसता वल्ली

मुख्य रोगांची बाधा पळाली

सर्व सुखाचे औषध मिळता

धन्य जीवन झाले


आज मी

'कंपाँन्डर' पाहिले 


रोग्यांचा हा वैद्य दयाळू

'भक्तांसाठी' होत कृपाळू

'केस पेपर' काढ सत्वरे

घेऊनी औषध आले 


आज मी

'कंपाँन्डर' पाहिले 


माझे रोग बरे झाले

आज मी

'कंपाँन्डर' पाहिले


( तरीपण डाॅक्टरांकडूनच औषध घेणारा) 

निरोगी अमोल ☺️📝

१६/०८/२०२०

Friday, August 7, 2020

चला मुलांनो मजा घेऊया


 आॅन लाईन शाळेचा डोलारा सांभाळणाऱ्या सर्वांना समर्पित

( चाल: चला मुलांनो आज पाहूया, शाळा चांदोबा गुरुजींची)


इंटरनेटच्या डेटा मधुनी सहल करुया वर्गाची

चला मुलांनो मजा घेऊया,आता आॅनलाईन शाळेची


आज परिक्षा जमले सारे मोबाईलच्या वर्गात

वर्ग-शिक्षिका दिसती मात्र, कुठल्या मोठ्या चिंतेत

मित्र- मैत्रिणी करिती दंगा, फिरवूनी पट्टी स्क्रिनची


चला मुलांनो मजा घेऊया,आता आॅनलाईन शाळेची


दुस-या तासापासून येती, मुले उशीरा वर्गात

आॅन- आॅफची बटणे दाबून सगळे लपती घरात

कधी मोबाईलची बॅटरी संपते ओढ लागूनी चार्जरची


चला मुलांनो मजा घेऊया,आता आॅनलाईन शाळेची


कुणी आॅडिओ आॅन ठेऊनी, घरामध्ये बोलतसे

कळता नंतर रागावूनी तो, गोरामोरा होत असे

ऐकूनी सारे हसता हसता, चंगळ उडते वर्गाची


चला मुलांनो मजा घेऊया,आता आॅनलाईन शाळेची


कधी वेळेवर केंव्हा उशीरा, हजर राहण्या अशी मजा

राग जरी आला गुरूजींना ,कधी कुणाला देती न सजा 😷

अशी नकोच आता शाळा,करु प्रार्थना देवाची 🙏🏻🙏🏻


चला मुलांनो ....


📝अमोल केळकर

०८/०८/२०२०

Thursday, August 6, 2020

Eपास नका मागू माझ्या गाडीला


टिप: निव्वळ मनोरंजन हा या विडंबनाचा हेतू. सरकारी नियम समजून घेऊन आपापल्या जबाबदारीवर प्रवास करावा


सेंट्रलच्या वाघांनी, अध्यादेश काढुनी

अनलाॅक जिल्हा आमचा करिला

Eपास नका मागू माझ्या गाडीला 🚗


नवी कोरी गाडी लाखमोलाची

खरेदी झाली मार्च महिन्याची

गुंतवूनी पार्कींगला, लाॅकडाऊन जोडीला

Eपास नका मागू आता गाडीला 🚗


जात होती गाडी आज कोकणात

अवचित आला 'मामा' पुढ्यात

तुम्ही माझ्या डोस्क्याचा ताप जरी पाहिला

Eपास नका मागू आता गाडीला 🚗


गाडी नका अडवू आल्यागेल्याची

शरम ठेवा थोडी घेतल्या 'लाचेची'💵

काय म्हणू आता, असल्या तुमच्या खोडीला

Eपास नका मागू आता गाडीला 🚗


सेंट्रलच्या वाघांनी, अध्यादेश काढुनी

अनलाॅक जिल्हा आमचा करिला

Eपास नका मागू माझ्या गाडीला 🚗


📝 ( संपूर्ण लाॅक)  🚗


मोरया 🙏🏻🌺

संकष्टी चतुर्थी

०७/०८/२०२०

Saturday, July 25, 2020

दहा दिवस, दहा विडंबने


रविवारची टुकारगिरी 📝

( फेसबुकवर विविध काव्य साखळीत सहभागी माझ्या तमाम काव्यरसिकांना समर्पित 😀. कृ ह.घे. हे वे.सां न)

आठवणीतील विडंबने

दहा दिवस दहा विडंबने

काव्य रसिकहो या कार्यक्रमात मला  कुणीही  सहभागी करून घेतलेले नाही . मी माझाच सहभागी झालोय.त्याबद्दल मी माझाच आभारी आहे

आज मी  भटांच्या  " xxx या गाण्यावरचे विडंबन ईथे सादर करणार आहे.

मला हे गाणे खूपच भावते .

तसे या गाण्याचे विडंबन ही तुम्हालाही नक्कीच आवडेल अशी खात्री वाटते.

हा उपक्रम पुढे नेण्यासाठी मी  कुणालाही आमंत्रित करणार नाही मी एकटाच समर्थ आहे 😁.  फक्त यासाठी गदिमा, संदिप खरे, शांता शेळके यांच्या गाण्याचा कच्चा माल अणि त्यांचे आशिर्वाद पुरेसे आहेत 😀

चला सुरवात करतो.

अरे,  कुठे पळताय?  थांबा , ऐका तर

( अमोल)  📝

धुंदीत करोना, बंदी सर्वांना


( मुळ गाणे: धुंदी कळ्यांना)

धुंदी(त) करोना,बंदी सर्वांना
लाॅकडाऊन आले, गावा गाsवांना

तुझ्या सेक्टरी, बांबूनी वाट अडली
क्वारंटाईन ही ,होण्याची वेळ आली
बसे आज उरी, जगाचा पाहुणा
लाॅकडाऊन आले, गावा गाsवांना

तुझ्या मुखासी, मास्क हा कापडाचा
कुणा स्पर्श सी, फेस घे साबणाचा
वाफ घेण्यासाठी,  नको तो बहाणा
लाॅकडाऊन आले, गावा गाsवांना

पराभूत कधी, कथा विषाणूंची ?
संख्या वाढते, रोज या रुगणांची
लसींचे मिळावे,अमृत क्षणांना

लाॅकडाऊन आले, गावा गाsवांना

अमोल 📝
२५/०७/२०२०

Friday, July 24, 2020

नागपंचमी आणि सुधीर फडके जन्मदिवस


नागपंचमी  🐍आणि सुधीर फडके यांचा जन्मदिन याचे औचित्य साधून त्यांनी संगीतबध्द केलेली काही  गाणी आठवली

सावळा ग रंग तुझा
चंदनाच्या बनापरी
आणि नजरेत तुझ्या
नाग खेळती विखारी 🐍
--------
नाग म्हणले की आठवते विष म्हणजेच हलाहल ,याचा उल्लेख या गाण्यात मिळतो

यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते
हलाsहलाs ! त्रिनेत्र तो 🐍
मी तुम्हासी तैसाची,गिळुनि जिरवितो !!

अनादि मी अनंत मी, आवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा,कवण जन्मला !!
---------------------
नागपंचमी म्हणले की महिलांची गाणी आलीच. 'जिवाचा सखा' सिनेमातले हे गीत असेच

बारा घरच्या बाराजणी, बाराजणी,बाराजणी
रुपवंती कुंवारिणी,कुंवारिणी,कुंवारिणी
नागोबाची पुजू फणी,कुंकवाचा मागू धनी
राजपद मागू त्याला, मागू त्याला,नागोबाला 🐍

चल गं सखे, वारुळाला, वारुळाला, वारुळाला
--------------------
सुधीर फडके आणि गीतरामायण यांचे नाते अलौकीक म्हणावे लागेल. लेखनाचा शेवट यातील एका गिताने

त्यात ही आज शनिवार,  बोला बजरंग बली की जय 🙏🏻

तरुन जो जाईल सिंधू महान
असा हा एकची हनुमान

'भुजंग' धरुनी दोन्ही चरणी 🐍
झेपेसरशी समुद्र लंघुनि
गरुड उभारी पखां गगनी
गरुडाहुन बलवान

असा हा एकची हनुमान 🌺🙏🏻

📝 #नागपंचमी
       #सुधीर_फडके_जन्मदिन
२५/०७/२०२०
poetrymazi.blogspot.com

Wednesday, July 22, 2020

६६ वी कला


६६ वी कला  🗣️

मंडळी नमस्कार 🙏🏻

मध्यतंरी एका लेख ६५ व्या कलेवर म्हणजेच 'जहिरात' कलेवर लिहिला होता. त्यात ६६ व्या कलेबद्दल ओझरता उल्लेख केलेला. तर आज या लेखात या ६६ व्या कलेबद्दल विचार....

मंडळी, एखादा अभिनेता एखादी विशिष्ठ भूमिका करत असताना त्या भूमिकेचा खूप अभ्यास करतो असे आपण ब-याचदा ऐकतो. म्हणजे बघा एखादा अभिनेता/ अभिनेत्री  अंध व्यक्तीची भूमिका करतीय तर आपली भूमिका अधिक कसदार होण्यासाठी तो नट ( नटी) अंध व्यक्तीला / त्या संबधीत संस्थेला वेळोवेळी भेट देतो. जेणेकरून त्याचा अभिनय वास्तव होईल . तर हा लेख लिहिण्यासाठी आम्हीही अशी विशेष  तयारी गेले काही महिने ( का वर्ष ???? )  करत होतो. अरे, लेखकाला ही  जर वाटले आपण अधूनमधून भूमिकेत शिरून बघू , बिघडले कुठे ?

 तर ज्या ६६ व्या कलेची गेले काही महिने आम्ही उपासना केली , वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा प्रयोग करून बघितला त्या कलेचे नाव आहे
" भांडण कला " 🗣️🗣️🗣️

तर,अरे हा असा का वागतोय ?  का मागच्या घटना मुद्दाम उरकून काढतोय ? का शब्दाला शब्द वाढवतोय ? का अशा प्रतिक्रिया देतोय ? अरे यांच्याशी पण वाद घालतोय , त्याच्याशी / तिच्याशी वाद घालतोय ? काय झालय काय याला ?

आत्ता पर्यत माझ्या बाबतीत ज्यांना हे सगळे प्रश्न पडले होते त्यांना माझे हेच उत्तर की जरा
 ' भूमिकेत '  जाऊन प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा होता 🙈

मंडळी मस्त अनुभव आला . म्हणजे एवढा की त्या '६६ सदाशिव पेठ '  सिनेमात मोहन जोशी जसे भाडणं करायचे क्लास घेतात तसे आता अगदी त्यांचा एवढा प्रोफेशनल नाही पण नक्कीच अगदी झूम , मीट  वगैरे  वर क्लास घेऊ शकतो 😁 .

 भांडणाचे पण थर आहेत बर का , मोबाईल गेम मध्ये जसे लेव्हल असतात तसे. तुमच्यातील चार्जिंग नुसार एकेक लेव्हल पुढे जात राहायचे

भाडणं ही एक नैसर्गीक प्रक्रिया आहे. लग्नी मंगळ पत्रिकेत असेल ( हो ६५ वी कला, मी पत्रिका बघतो 😷 )  आणि त्यात ही मेष , सिंह राशीत असेल तर त्या व्यक्ती भांडणात नमते घेत नाहीत  असा साधारण अनुभव . या भांडणा बाबत एके ठिकाणी खूप छान वाचलंय  ' दोन व्यक्ती जेव्हा जेव्हा भांडतात , तेव्हा तेव्हा मोठ्याने बोलतात  कारण ते दोघे एकमेकांपासून मनाने ( हृदयाने ) दूर गेलेले असतात आणि दूर गेलेल्या व्यक्ती पर्यत पोहोचण्यासाठी  मोठ्याने बोलावे लागते '.

घरगुती भाडणं, लहान मुलांची भाडणं , सोसायटी मिटींग मधील भाडणं , बस/ ट्रेन मध्ये सीट / धक्का लागण्यावरून  होणारी भाडणं ,  कामगार/मॅनेजमेंट भांडणं,  गाव - देश - राज्य पातळीवरील भाडणं , सीमावाद , पाणीवाद , जातीय वाद , जागतिक पातळीवरील भाडणं  असे अनेक प्रकार आपण पहातो.  आता ही भाडणं सोशल मीडियावरून अगदी आपल्या हातात आली आहेत ती म्हणजे राजकीय भाडणं.

कुठला तो पक्ष / राजकीय नेता, तुम्ही त्याच्या खिजणीत  ही नसताना , तावातावाने त्याच्यासाठी भांडणारी  जमात ' भांडणाला ' वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते हे नक्की 😀

एक गोष्ट मात्र नक्की मंडळी , वैचारिक मतभेद असावेत, ते व्यक्त ही करावेत  पण त्या भांडणाचे पर्यावसन कुणा  व्यक्तीचा कायमचा द्वेष करणे  / सूड भावने पर्यत न जाऊ देणे हे महत्वाचे. हे ज्याला जमले तो या ६६ व्या कलेचा खरा उपासक  म्हणता येईल 😊

म्हणून आज ही अगदी व्हाट्सअप ग्रुप वर तावातावाने एकाद्या मुद्यावर भांडून  अगदी दुस-या मिनिटाला त्याच मित्राशी / व्यक्तीशी  व्ययक्तिक फोन करून सहज चौकशी किंवा इतर महत्वाच्या कामाबद्दल बोलण्यात आम्हाला काहीही कमीपणा वाटत नाही . आणि या लेवल  ला जो पोचला  तो खरा
  ' भाडणं ' योगी ☺️

चला ( जरासच ) भांडू या  🤗

( लग्नी मंगळ नसला तरी६६ व्या कलेचा भोक्ता ) अंमोल📝

( विशेष टीप :  लाॅकडाऊन मध्ये जर आपणा कडे भांडी घासायचे काम असेल तर हा लेख वाचून भांड्यावर राग काढू नये. मनाला पोचा आला तर आम्ही जबाबदार, भांड्याला आला तर आम्ही जबाबदार नाही 😉 )

लाॅकडाऊन मधला श्रावण


नेहमीचा श्रावण:-

सुख वेचिन म्हणण्या आधी
घन दुःखाचा गहिवरतो
अन दुःख सावरु जाता
कवडसा सुखाचा येतो
या ऊन सावली संगे
रमण्यात ही मौज म्हणुनी
मी हसून हल्ली माझ्या
जगण्याला श्रावण म्हणतो....
                            गुरू ठाकूर

सध्याचा श्रावण:-

बाहेर जाईन म्हणण्याआधी
'मास्क' नेहमीचा आठवतो
अन मास्क घालून जाता
भरवसा मनाला येतो
या 'लाॅकडाऊन' संगे
'रम'ण्यात ही मौज म्हणूनी
मी बसून हल्ली माझ्या
जगण्याला 'डरो-ना' म्हणतो
                      📝 सुरु टाकूर

२२/०७/२०२०
poetrymazi.blogspot.com

Saturday, July 18, 2020

भोलानाथ, भोलानाथ


' आॅन लाईन ' शाळेला कंटाळलेल्या आमच्या 'चिंटू' ने भोलानाथाला घातलेली साद

सांग सांग भोलानाथ,कोरोना जाईल काय?
घरामधली सक्ती संपून, शाळा दिसेल काय?

सांग सांग भोलानाथ

भोलानाथ दुपारी,व्हॅन येईल काय?
दंगा ,भांडण केल्यावर काका रागवेल काय?

भोलानाथ,  भोलानाथ

भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
रोज शाळेत जायला, मिळेल का रे यंदा?

भोलानाथ,  भोलानाथ

भोलानाथ उद्या आहे, झूम वरती लेक्चर
'पाटी पुस्तक डबा' घेऊन, मिळेल केंव्हा दप्तर ??

भोलानाथ, भोलानाथ

सांग सांग भोलानाथ,कोरोना जाईल काय?
घरामधली सक्ती संपून, शाळा दिसेल काय?

( चिंटू सह वैतागलेला त्याचा बाबा 😬)

©️ अमोल केळकर
poetrymazi.blogspot.com

सेलिब्रेटींचा ( सोशल ) डिस्टन्स पँटर्न


सेलिब्रेटींचा  ( सोशल ) डिस्टन्स पँटर्न

मंडळी नमस्कार 🙏🏻

थोडा नाजूक विषय मांडतोय  पण खूप दिवसापासून हे मनात होत. सेलिब्रेटी अर्थातच प्रसिद्ध व्यक्तींचा सोशल मीडियावर वावर  हे आता फारसे नाविन्यपूर्ण नाही . अनेकांची ट्विटर / फेसबुक खाती आहेत , अनेक सामान्य चाहते या सेलिब्रिटींचे फॉलॉवर आहेत . मुद्दा हा नाही  तर मुद्दा असा आहे की या सेलिब्रीटींना कधी त्यांच्या चाहत्यांशी गप्पा मारताना , त्यांच्याशी बोललेले किंवा त्यांच्या फ्रेंड लिस्ट मध्ये असलेल्या एखाद्याच्या पोस्टला लाईक केले आहे असे कधी तुम्ही बघितले आहे का हो ?  हा त्यांच्या स्वतःच्या वर्तुळातील बरोबरीच्या कलाकारां बरोबर / किंवा त्यांच्या इतक्याच प्रसिद्ध व्यक्तींना ते रिप्लाय देत ही असतील पण एखादा त्यांचा सर्वसामान्य चाहता आहे  त्याने समजा काही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, अभिनंदन केले , एखाद्या भूमिकेचे कौतुक केले तर  त्याला प्रतिक्रिया दिली तर एक चाहता म्हणून त्या सामान्य व्यक्तीला किती बरे वाटेल ना ?

आम्ही लहान असताना प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे नट , नट्या , मोजके खेळाडू , काही गायक यापलीकडे  फारशी कुणाची गणना प्रसिद्ध व्यक्तींच्यात ( सेलिब्रेटी) व्हायची नाही. त्यांचे प्रत्यक्ष दर्शन होणे हे तर त्याहून दुर्मिळ असायचे . मला आठवतंय ते सांगलीत झालेल्या नाट्य संमेलनात  काही कलाकारांच्या सह्यांसाठी आम्ही मित्रांनी  झुंबड उडवलेली.  एखाद्या दुकानाच्या आजच्या भाषेत शो रूम च्या  उद्घाटनाला , शाळेत  विविध गुणदर्शन कार्यक्रम किंवा बक्षीस समारंभाला उपस्थिती  किंवा कदाचित शुटींगसाठी आपल्या गावात आलेल्या नट -नट्या यांना केवळ बघायला मिळणे इतपतच  सेलिब्रिटी लोकांशी प्रत्यक्ष संबंध यायचा . आपल्या भोवती जमणारी  ' भीड ' या लोकांना ही हवीहवीशी वाटायची.

कालांतराने सेलिब्रेटी कन्सेप्ट थोडा बदलला . केवळ नट-नट्या या प्रसिद्ध व्यक्ती  न राहता लेखक- लेखिका / कवी / कवयित्री , दिग्दर्शक,  राजकारणी , पत्रकार ,किंवा  एखाद्या विशिष्ठ क्षेत्रात कर्तृत्वाने पुढे आलेले दिग्गज, टीव्ही कलाकार  हे ही सेलिब्रेटी होऊ लागले. सोशल मीडियावर यांचा ही वावर होऊ लागला.  अरे यार तुला माहीत आहे का  अमुक - तमुक प्रसिद्ध व्यक्ती माझ्या फ्रेंड लिस्ट मध्ये आहेत. मी त्यांना रिक्वेस्ट पाठवलेली  त्यांनी अॅक्सेप्ट केली . मी त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात अशी चर्चा रंगू लागली.  पण नंतर  असं लक्षात यायला लागलं की हा सगळा संवाद  एकाच बाजूने झालाय . दुसरीकडून काहीही प्रतिसाद नाही . आणि मग या तमामा मोठ्या मोठ्यांच्या या सोशल - डिस्टंसींगचे आश्चर्य वाटू लागले .

अगदी मान्य की  सगळ्यांनाच रिप्लाय देणे आणि प्रत्येक वेळी देणे शक्य होईलच असे नाही , यात काही  अपप्रवृती , गैरफायदा घेणारे ही असू शकतात अगदी मान्य . आमच्यासारका उठसुठ प्रत्येक  पोस्ट ला लाईक / प्रासाद द्या असे म्हणणे अजिबात नाही 😬 मात्र  थोडासा संवाद तुमच्याकडून ही अपेक्षित. तुम्ही आम्हाला आवडता म्हणूनच आम्ही तुमच्या पेज ला लाईक केलय , तुम्हाला ऍड केलय आमच्या लिस्ट मध्ये .

पूर्वी एखाद्या कलाकाराचा अभिनय आवडला  की त्याचे अभिनंदन , कौतुक कुठे करायचे हा प्रश्न पडायचा? कदाचित त्याचे चाहते पत्र वगैरे पाठवत असतील .  आज तशी परिस्थिती नाही ईमेल / ब्लॉग / फेसबुक पेज / ट्विटर कुठेही तुम्ही अभिप्राय देऊ शकता इतके हे सेलिब्रिटी आपल्या जवळ ( हातात ) आलेत. पण या सगळ्यांनी  सोशली  - डिस्टन्स  ठेवण्यातच धन्यता मानली असेल तर आपण तरी  जास्त सोस  का करावा ? 😐

लेख संपवता संपवता एक नमूद करू इच्छितो . आमचा एक सांगलीचा मित्र आहे ' आनंद कुलकर्णी '. आजकाल सोशल मीडियावर
येणा-या उत्तम कलाकृती मग ते लेख असतील , संभाषण असेल किंवा काहीही त्या कलाकाराला  केवळ सोशल मीडियात प्रतिसाद न देता  ( कारण दिलेला प्रतिसाद एखाद्या व्हाटसप ग्रुप वरच राहतो ) शक्य असेल  त्या व्यक्तीशी फोन वर बोलून कौतुक करतो.  आज त्याचा  हा कित्ता आम्ही पण जाणीवपूर्वक अनेकवेळा गिरवत आहोत. तुमचा तो  लेख, कथा, चित्र, सामाजिक कार्य आवडले किंवा तुम्ही छान गाणे म्हणले हे सांगीतल्यावर त्या कलाकारांच्या/ व्यक्तीच्या बोलण्यातून त्याला झालेला ' आनंद ' आपल्याला  सहज जाणवतो.

तेव्हा माझा तमाम सेलिब्रीटी मंडळीनो तयार रहा. तुमच्या चाहत्यांपासून जास्त डिस्टन्स ठेऊ नका ( सध्या चालेल   ) .
आज  उद्या तुम्हाला आनंद किंवा अमोलचा ( किंवा हा लेख वाचून इतर अनेकांचा ) अभिनंदनाचा फोन केव्हाही येऊ शकतो बर का

एक मिनीट. लेख आवरता घेतोय मंडळी,  एक फोन येतोय 😉

( कला/ कलाकार प्रेमी)  अमोल
१८/०७/२०२०
poetrymazi.blogspot.com

Friday, July 10, 2020

हे जीवन म्हणजे 'कोरोना' आता, झुकला तो संपला


सुनील गावसकर यांची माफी मागून ( 🙏🏻)  त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा 😬💐

या दुनियेमध्ये लाॅकडाऊन व्हायला वेळ कोणाला
*हे जीवन म्हणजे 'कोरोना' आता, झुकला तो संपला*

गर्दीच्या या रस्त्यावरती, येशी वेळोवेळी
बस तुझी येताच चढशी जपुन अपुली झोळी
काळ करी बघ गोलंदाजी, विषाणू चेंडू फेकी
भवताली तूला अॅडमीट कराया जो तो फासे टाकी
मागे टपला कोणीभक्षक तुझा उधळण्या डाव
या सा-यांना चकवशील तर मिळेल तुजला पाव
चतुर आणि सावध जो जो तोच इथे जगला

*हे जीवन म्हणजे 'कोरोना' आता, झुकला तो संपला*

( रस्त्यावरुन जाताना सभोवार पहावे तो दिसतात कंटॅन्मेंट झोनचे अजब बंगले, उभे आडवे, लोखंडी, वाकडे सरळ लावलेले रस्तोरस्ती बांबू
यशाच्या झुंबराखाली डोलणारी, नाचणारी, कोविड१९ च्या एका फटक्यात त्यांचे गर्व 'होम काॅरंटाईन' होतात
अभिमान, उन्मादातली हवाच सारी निघून जाते
सदान कदा पाठिंबा देणारे, क्षणात आपल्या गावाकडे थोडी जागाही देत नाहीत...)

असा येथल्या जगामधील न्याय आता बनला
*हे जीवन म्हणजे 'कोरोना' आता, झुकला तो संपला*

तू ऐकत असता रुग्णसंख्येचे नारे
या सगळ्या बातम्यांना नकोच तू पहा रे
फटकार अचूक तू चेंडू विषाणूचा
आयुष्य असे रे डोंगर जणू श्वासांचा

निरंतर राहील तुझी, आठवण इथल्या कणाकणाला
*हे जीवन म्हणजे 'कोरोना' आता, झुकला तो संपला*

अमोल केळकर 📝
१०/०७/२०२०

Wednesday, July 8, 2020

पुनश्च हरी ॐ
आई येतो गं

निट जा रे, बाळा. घेतलंस ना सगळं बरोबर

हो आई

आई, खरं सांगू.  यंदा खूप दिवसांनी असं वाटतय की यंदा खरा गणेशोत्सव बघायला मिळणार आहे.

धांगड धुडगूस घालत केलेली मिरवणूक नाही, काही ठिकाणी मंडळ ही नाहीत, मोठमोठी उंची नाही, कर्णकर्कश गाणी नाहीत,  भक्तीचा बाजार नाही, नवसाची रांग नाही. वेळेत प्राणप्रतिष्ठापना, उरका उरकी नाही, आणि हो आई यंदा पहिल्यांदाच मी अनंत चतुर्दशीला अगदी संध्याकाळ पर्यत गणेशलोकी येईन बर का?

हं, उत्तम

आई, यंदा काही गणेशोत्सव मंडळ १० दिवस 'आरोग्य महोत्सव'  साजरा करणार आहेत. समाजाल एकत्र आणून समाजोपयोगी काम करण्यासाठी टिळकांची गणेशोत्सव संकल्पना, अलीकडच्या काळात ब-याच दिवसांनी मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात बघायला मिळणार आहे

पण यासाठी तुझ्या 'नियती' मावशीला मोठ्ठ संकट धाडाव लागलं
आता इथून पुढे सगळे 'भक्त' यातून बोध घेतील, निसर्गाशी प्रामाणिक राहतील अशी 'सुबुध्दी' देऊन ये सगळ्यांना येताना

हो  आई

आणि गेल्या गेल्या तुझ्या मित्राला 🐀जिथे जिथे पोहोचाल तिथे तिथे ११ दिवस सक्तीचे विलगीकरण म्हणून बजाव हां
फार फिरत असतो इकडे तिकडे

हो गं आई, चल बाय

#पुनश्च_हरी_ॐ

📝०९/०७/२०२०
poetrymazi.blogspot.in

आषाढात घन-काळा बरसला


आषाढ काहीसा उदास होऊनच माझ्याकडे आला. श्रावणावर किती गाणी/ कविता. माझे फक्त 'आषाढस्य प्रथम दिवसे' इतकच कौतुक.
म्हणलं बस जरा, हा घे गरम चहा. श्रावणावर कुठलं गाणं ऐकलसं?
म्हणाला,
"श्रावणात घन निळा बरसला"

चहा संपेपर्यत त्याच्या हातात गाणे, गडी खुश एकदम 😉

आषाढात घन-काळा बरसला,जोरदार पाऊस धारा
दिसूलागला रस्त्यातून अवचित, खड्ड्यांचा गोल पसारा

आषाढात घन-काळा बरसला

थांबून ज्याने वाट अडविली, ते दुख आले दारी
जिथे तिथे रस्त्याला, भेटे खड्डा उरारी
माझ्याही अंगात आला,नवा पांढरा सदरा

आषाढात घन-काळा बरसला

टेंडरच्या कामात गवसले हे स्वप्नांचे पक्षी
नव्या उड्डाण पुलावरती, खड्ड्यांची नाजुक नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत,आला चिखल सारा

आषाढात घन-काळा बरसला,जोरदार पाऊस धारा
दिसूलागला रस्त्यातून अवचित, खड्ड्यांचा गोल पसारा

📝अमोल
८/०७/२०२०

Follow by Email

Related Posts Plugin for WordPress, Blogger...