नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, July 29, 2019


स्विगी , झोमॅटो वरून आॅर्डर करणा-या
 ' खाद्यप्रेमींना ' समर्पित
🍱🍣🥘🥗🌯🥫🥪🥙🌮

( चाल : देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा उघड दार देवा आता, उघड दार देवा)

स्विगीची भाकरी , झोमॅटोचा मेवा
उघड अॅप भावा आता उघड अॅप भावा

इथे खाणे घरी बसुनी  रीत  माणसाची
'मनी' खात्यामध्ये असता भीती ना कशाची
सरावल्या बोटांना मग कंप का  सुटावा

उघड अॅप भावा आता उघड अॅप भावा

( *मृगजळ* )
झटक्यात दिसते 'सूट' उघडताच अॅप
ज्याचे त्याचे हाती आहे 'कूपनचे' माप
'प्रिय बायकोची' ऐसी, घडे नित्यसेवा ☺

उघड अॅप भावा आता उघड अॅप भावा

( *प्रत्यक्षात* )
'दर' जणू उजवीकडचा भासतो बिलोरी
आपुलीच ' ऑर्डर' होते  आपुलीच वैरी
घरोघरी 'पार्सलाचा ' मेळ जमवावा

उघड अॅप भावा आता उघड अॅप भावा

तुझ्या हाती पांडुरंगा ऑर्डर पडावी .
मुक्तपणे भूक माझी अशी चाळवावी.
मार्ग तुझा ' गुगल'वरचा मला आकळावा.

उघड अॅप भावा आता उघड अॅप भावा

पिझ्झा-बर्गर साठी आता बुजरेपणा गेला .
बंधनात बसुनी वेडा ' जंक ' युक्त झाला
पोटाच्या या घेरीचा करील तोच हेवा

उघड अॅप भावा आता उघड अॅप भावा

 📝: विसंगती सदा मिळो
poetrymazi.blogspot.in

अमोल

Wednesday, July 24, 2019

अंधाराची' खंत तू कशाला करशी रे....


*'अंधाराची'  खंत  तू कशाला करशी  रे*...🌌

मंडळी  नमस्कार 🙏🏻

आज परत एक  वेगळा विषय मांडतोय.  दिवसातल्या २४ तासात सरासरी  किमान १२ तास  तरी या  गोष्टीशी आपला संबंध  येतोच. किंबहुना आपल्या जन्माआधी ९ महिन्यापासूनच याची आपल्याला ओळख व्हायला सुरवात झालेली असते त्यामुळे प्रत्यक्ष भूतलावर जेव्हा आपला अवतार होतो तेव्हा काही अपवाद ( बालपण )  वगळता आपण नकळत याच्याशी जुळवून घ्यायला लागतो. हाच तो
' *अंधार* ' . अगदी जीवनात प्रत्येक टप्प्यावर भेटणारा, नवीन गोष्टी शिकवणारा पण तरीही सहजा सहजी ' हवा हवासा ' न वाटणारा.

दिवस म्हणजे  प्रकाश आणि रात्र म्हणजे अंधार आणि  रात्रीचा / अंधाराचा  रंग काळा म्हणून  अंधाराचे प्रतीक असणा-या 'काळ्या' रंगाला ही नकळत नाकारले जाणे हा मानवी स्वभावच म्हणायला पाहिजे ना ? उदा. मंगल प्रसंगी ( काही अपवाद वगळता ) काळे कपडे न घालणे, शक्यतो काळ्या रंगाची गाडी न घेणे, बुद्धीबळ खेळात काळ्या सोंगटीने खेळणारा
पांढरी सोंगटी घेऊन खेळणा-याच्या नंतरच खेळणार,कॅरम मधे ही काळ्या सोंगटीला कमी गुण ते  अगदी काळे- गोरे  वंशवादा पर्यंत लिहिता येईल. पण तो विषय नको.

कुठल्याही घरात जास्त दंगा केल्यावर  तो बघ हं तिथे अंधारात ' बागुलबुवा ' आहे अशी भीती घातला गेलेला  चिंटू, बंडू , मोनू  नसेल असे शक्य वाटत  नाही. वयाने मोठे झाल्यावर 'जा रे  त्या खोलीतून अमुक गोष्ट घेऊन ये 'असे सांगितल्यावर  कुठल्याही घरात , ' नाही बाबा मला भीती वाटतीय, अंधार आहे , कुणी तरी लाईट लावून द्या '  असे बोल ऐकायला मिळाले नसतील असेही  वाटत नाही.

 ' *अरे जा काही होत नाही आम्ही आहोत इथे* ' हे पाठींब्याचे बोल आणि संध्याकाळी अंधार पडला की
  ' *शत्रूबुध्दी विनाशाय , दीपज्योती नमोस्तुते  ही प्रार्थना* ' या गोष्टींनी  मात्र लहानपणी
' अंधाराशी ' दोन हात करायाला बळ दिले  हे खरं.

आणि मग अंधाराशी हळूहळू  मैत्री व्हायला सुरुवात झाली . नाट्यगृहात/ सिनेमात खेळ चालू होण्यापूर्वीचा अंधार, अचानक रात्री जेवताना किंवा दूरदर्शनवर कार्यक्रम बघताना दिवे जाऊन झालेला अंधार ,  रातराणी बस मधे तिकीट काढून झाल्यावर डबल बेल वाजवून वाहकाने चालकाला दिवे बंद करण्याची सूचना दिल्यानंतर काही वेळात झालेला अंधार, आषाढात भर दुपारी  आकाश भरून झाल्यानंतर चा अंधार ते खास बायकोसाठी ( इथे आवश्यकतेनुसार मैत्रीण ही घ्यायला हरकत नाही ) कँडल नाईट डिनर साठी मुद्दाम जुळवून आणलेला अंधार ? किती विविध रूपे ना अंधाराची?

 मंडळी ,यात शाळेतीळ निकालाची प्रत आई - बाबा / नातेवाईकांच्या हाती लागल्यानंतर दिवसाही चमकलेले 'अंधारातील तारे'  फक्त विचारात घेतलेले नाहीत 🤩

पण खरं सांगू मला  या सगळ्या अंधारात एक अंधार खूप आवडायच्या जो मी अजूनही  एन्जॉय करतो तो म्हणजे
 ' बोगद्यात ' गेल्यावर होणारा अंधार. अगदी आजही मुंबई - पुणे  मेगा हायवेवर कामशेत असू दे, भागतन असू दे किंवा खंडाळ्याचा बोगदा असू दे  अगदी स्वतः गाडी चालवत असलो तरी  वाटत मस्त लहानपणी  जेव्हा  ' पेशवे पार्कात 'फुलराणीत' बसून गाडी बोगद्यात गेल्यावर  किंवा शाळेच्या सहलीतून  सज्जनगडला जाताना 'अजिंक्य तारा ' किल्याच्या  बोगद्यातून सगळ्या मित्रांसकट  जोरजोरात ओरडायचो तसे ओरडावे.  घेतलीय तुम्ही  अशी मजा ओरडण्याची.????

लहानपणी सांगलीत राजवाड्याच्या तटबंदीतून जाताना लागाणारा बुरुज/ प्रवेशद्वार म्हणजे एक लहान बोगदाच वाटायचा , पुण्याला लहानपणी मामा कडे जाताना लागणारा कात्रजचा बोगदा, पुढे  लोणावळा- खंडाळा  रेल्वे रस्ता मार्गावरचे , कोकण रेल्वे वरचा रत्नागिरी जवळचा  सगळ्यात लांब बोगदा आणि इतर बोगदे , कल्याण ठाणे मधील पारसिक हिल बोगदा , अगदी बेलापूर मधील हार्बर लाईनवर असलेला बोगदा , माथेरानला टाॅय ट्रेन मधून लागणारा बोगदा ,कामानिमित्य कसारा- नाशिक , जबलपूर पर्यत लागलेले बोगदे  ते अगदी आजकाल तयार झालेला कर्जत - पनवेल नवीन मार्गावरचा बोगदा  ते ईस्टर्न फ्री वे वरचा चेंबूरचा बोगदा

 यासगळ्यांनी एकच शिकवलं   आयुष्यात अनेक टप्प्यावर  , वेगवेगळ्या वेळी , वेगवेगळ्या कालावधीचे बोगदे (प्रती) अंधार  येईल पण  त्यानंतर असेल फक्त प्रकाश ...

तेव्हा
 ' *अंधाराची'  खंत  तू कशाला करशी  रे ....... गा प्रकाश गीत*

आता गाण्याचा विषय निघालाच आहे तर ' अंधारावरची काही गाणी/ कविता पाहू

तिन्ही सांजा झाल्यावर  जेव्हा अंधाराची चाहूल लागते तेव्हा
 " चिमणी आई" ही आपल्या पिल्लाना साद घालताना म्हणते

" दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर
अशा अ वेळी असू नका रे आईपासून दूर
चूक चूक करिते पाल उगाच चिंता मज लागल्या
या चिमण्यांनो  परत परत फिरा रे घरा कडे आपुल्या ,
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या.

देऊळ सिनेमा त ही एक असंच गाणं आहे.  जीवनात एका टप्प्यावर  खूप निराश झालेला एक भक्त स्वामी समर्थांची याचना करता ना म्हणतोय ,

" अंधार  दाटला  दाही  दिशाना , सांगावे कसे मी सा-या जगाला..... रे स्वामी राया  "

मनाची एकदा समजूत झाली  की "भिऊ नकोस , स्वामी तुझ्या पाठीशी आहे" की
मग हे " अंधाराचे जाळे फिटून , वाटतं ( आता)  झाले मोकळे आकाश "

एकंदर उत्साह  वाटायला  लागतो  अशावेळी  ही प्रकाशाची पणती जपून ठेवायची.

थोडा उजेड ठेवा , अंधार फार झाला
पणती जपून ठेवा, अंधार फार झाला

आले चहू दिशांनी तुफान विस्मृतींचे
 नाती जपून ठेवा, अंधार फार झाला

मराठी विज्ञान परिषद ( मुंबई ) यांनी एक 'विज्ञान गीत'  त्यांच्या संकेतस्थळावर दिलय. त्याचे धृपद किती छान आहे बघा

संपला अंधार आता , सूर्य ज्ञानाचा उदेला
लागल्या वाटा दिसायला, शक्ती लाभे चालण्याला !!

मंडळी लेख आवरता घ्यायची वेळ आली. तुम्हाला खोटं वाटेल पण काल आषाढ  कृष्ण पक्षाच्या सप्तमीला ' *अंधेरीच्या* ' लोखंडवाला गेटच्या बाहेर बसून हा लेख मला सुचला आहे.😬
 तुम्हाला नक्की आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो

प्रकाशाच्या  एका किरणाने
" श्रावण "  फुलू दे जीवनात
माफ करा मंडळी  जर
काही चुकलं असेल लिहिण्यात.

📝 अमोल केळकर

Sunday, July 21, 2019

सुंदर ते यान


चंद्रयान २ ला - काव्यमय शुभेच्छा
( चाल : सुदर ते ध्यान , उभे विटेवरी ) 🚀🌝

सुंदर ते यान, उभे जाण्यावरी
जीएसएलव्हीएमके लावुनिया !! १ !!

वायरी सर्व जोडा, दिसते  झुंबर
चालले निरंतर चंद्र यान !! २ !!

'उत्तरा भाद्रपदा ' तळपती गगनी
राशी 'मींन' शशी  विराजित !! ३ !!

' इस्रो ' म्हणे माझें  हेचि सर्व सुख
दावीन चंद्रपृष्ठ  आवडीने !! ४ !!

📝अमोल केळकर २२/७/१९


Monday, July 15, 2019

माॅर्गन खुलला, माॅर्गन खुलला


काल एवढा रोहमर्षक सामना झाला. मग कुणीही विजेता कप्तान  खुलणारच ना 🏆🏏💂🏻

( चाल: मोगरा फुलला, मोगरा फुलला)

माॅर्गन खुलला, माॅर्गन खुलला
झेल टाकीता खेळाडू ,कप यांचा झाला 🏆

दुसरी ती धाव , धाऊनिया भारी
तोच चेंडू गेला,  बाँन्डरीवरी

माॅर्गन खुलला, माॅर्गन खुलला

नियमांचीये गुंती, घोळघातला गेला
दोन चौकारापरी 'साहेबा' अर्पिला

माॅर्गन खुलला, माॅर्गन खुलला
झेल टाकीता खेळाडू ,कप यांचा झाला 🏆

📝१५/७/१९
poetrymazi.blogspot.in

मुळ गाणे :-

मोगरा फुलला मोगरा
फुलला.
फुलें वेंचितां बहरू
कळियांसी आला ..

इवलेंसे रोप लावियलें
द्वारी.
त्याचा वेलु
गगनावेरी ...

मनाचिये गुंती
गुंफियेला शेला.
बाप रखुमादेविवरी
विठ्ठलें अर्पिला

चंद्रयान चंद्रग्रहण आणि व्हाट्सप




मंडळी तांत्रिक अडचण वगैरे  आली हे एका दृष्टीने बरंच झालं म्हणा. तसही ' मूळ' नक्षत्रावर यान सोडले जाणे  हे उचित झालेच नसते. ' मूळपदावर ' येणे हाच ' मूळ नक्षत्राचा मूलमंत्र असतो. काय योगायोग बघा ना ५६ मिनिटे बाकी असतानाच  हे लक्षात आले. आता गेल्या काही वर्षात  ५६ या अंकाला  भारत भूमीत आलेले  महत्व पाहता   ही विष्णू कृपाच  नव्हे काय ? .

काय उपयोग मग त्या  अध्यक्षांचा जे  कुठल्याही मोठ्या कार्यक्रमा आधी तिरुपतीला जाऊन बालाजीचा आशीर्वाद घेतात, नारळ फोडतात . एक साधी गोष्ट लक्षात येऊ नये की  ' 'चंद्र ग्रहण' लागतंय. बिचारा चंद्र त्या धनु राशीतुन ' केतू ' पासून कसं  वाचायचं या विचारात असताना , आडाखे बांधत असताना  अगदी  त्याचवेळेला ते यान  सोडायचे का?  चाललं असत की जरा मागे  पुढे. ' दे दान सुटे गि-हाण ' असा जयघोष झाल्यानंतर होता की बक्कळ वेळ.

तरी नशीब ते  लंडन वाले 'साहेब' तरी  थोडक्यात बचावले आणि कप हाती लागला त्यांच्या. अहो चंद्राची कृपा होती त्याच्यांवर म्हणून वाचले.  असं कसं म्हणून काय विचारता ?  मारलेले
 " चौकार " मोजून त्यांना विजयी घोषित केलं गेलं ना ? मग ?
४ या अंकावर चंद्राचाच प्रभाव आहे, राशी चक्रातील 'कर्क रास' ( ४ नंबरची ) ही चंद्राची  त्यामुळेच  काळ पुरुषाच्या कुंडलीतील चतुर्थ स्थान ही  चंद्राचे मग  ' चौकारावर ' चंद्राचा प्रभाव नाही का मंडळी ? काही चुकत असले तर सांगा बर लगेच.

नाही म्हणले तरी या गुरु पौर्णिमेला आलेल्या ग्रहणाने
' गुरु ' महाराज ही तसे नाराजच आहेत म्हणा. जेव्हा कळलं त्यांना तेव्हापासून  ते वक्री होऊन
 ' मंगळाच्या वृश्चिक राशीत ' बसलेत. तेव्हा  आता एखादे मस्त ऊर्ध्वगामी नक्षत्र पाहून, गुरु मार्गी झाल्यानंतर  द्या पेटवून  चंद्रयान

मंडळी या  ग्रहण  काळात
 ' सांगेन मी गोष्टी युक्तीच्या चार '

ग्रहण पर्व हा आपला ' नियमित मंत्र ' सिध्द करण्यासाठीचा उत्तम कालावधी  आणि काहीही झाले तर सध्याचा आपला मंत्र एकच
' जाऊ आहारी,व्हाटसप वाटे भारी'

काही उपयुक्त गोष्टी सांगत आहे. नियम म्हणा हवं तर.  खाली दिलेले हे नियम   युवक , आजारी, वृध्द्व , गर्भवती , नोकरदार , व्यावसायिक सगळ्यां साठी समान आहेत.
ग्रहणाचा स्पर्श , मध्य , मोक्ष
 " वेळ"  अनेक ग्रुपवरून  तुमच्या पर्यत आली असेलच

हे ग्रहण रात्रीच्या तीस-या प्रहरात असल्याने  ३ प्रहर आधी म्हणजे दुपारी ४ वाजता आपला भ्रमणध्वनी , ऊर्जादेयक यंत्रे  इत्यादी काही मिनिटासाठी बंद करून सर्व उपकरणे स्वच्छ करावीत. ग्रहण स्पर्श होईपर्यत ती उपकरणे तशीच ठेवावीत व इतर कामे आपण करू शकतो का याचा अंदाज घ्यावा. हाताच्या बोटांना जरा त्रास होईल पण त्याकडे दुर्लक्ष करावे.

ग्रहण स्पर्श  सुरु होताच भ्रमणध्वनी हातात घेऊन डोक्याला दोन -तीनदा लावून चालू करावा  गरज असल्यास ऊर्जा देण्याची व्यवस्था करावी.

 चंद्र हा मनाचा कारक ग्रह असल्याने  सर्वच समूहातील
' मनाला लागलेले संभाषण ' हुडकण्यास सुरवात करावी . या प्रसंगी तारांकित केलेले संभाषण ही शोधावे आणि ग्रहण मध्य असतानाच ते सर्व जपून ठेवलेले संभाषण  उडवावे. त्यानंतर जास्त श्रम झाले असतील तर परत भ्रमणध्वनी बंद करून ठेवावा.

आता शेवटाचा टप्पा. मोक्ष काल. ग्रहण संपायचा काळ .

आधीचे  भ्रमणध्वनीतील संभाषण जे आपण उडवले ते मनात मात्र अजूनही असण्याची शक्यता असेल  तेव्हा या कालावधीत तुम्हाला हे संभाषण आपल्या मनातूनच कायम उडवायचे आहे. हे सर्व झाले की  तुम्ही निद्रा- देवीच्या अधीन व्हायला हरकत नाही

वि सु : - मेष , मिथुन , सिह , वृश्चिक यांना या ग्रहणाचे
' मिश्र फळ '  असल्याने यांनी शक्यतो खास समूहातील  सगळेच मेसेज ' डिलीट ऑल ' करावेत

वृषभ, कन्या, धनु , मकर  राशीच्या लोकांना ग्रहणाचे
' अनिष्ट फळ '  असल्याने त्यांनी शक्यतो सध्याचे पहिले  व्हाटसप घालवून  परत नवीन व्हाटसप उतरवून घ्यावे

पहाटे जेव्हा
 ' दे दान - सुटे गी-हाण  ' चा गजर होईल तेव्हा  तुमचा भ्रमणध्वनी आणि तुमचे स्वच्छ मन  परत तयार होतील सगळीकडे आनंदाचे गुच्छ पाठवायला  🌺💐🙂

📝अमोल केळकर
poetrymazi.blogspot.in
१५/७/१९

Thursday, July 11, 2019


*सेल्फीशी होऊ दंग. . .    सेल्फीत्सोव*

( सेल्फीची गोडी, करी जास वेडी, तोचि पुण्य जोडी पंढरीचे )

देहू आळंदी हून पंढरपूरकडे  पालख्या निघाल्या की  याच सुमारास  पुण्य नगरीत  एक अनोखा  उत्सव भरताना दिसतो.  अर्थात पुणेकर हे मुळातच उत्सव प्रिय . सवाई महोत्सव असू दे ,   गणेशोत्सव असू दे  , दिवाळी पहाट किंवा अगदी कार्तिक पोर्णीमा  असू दे या सगळ्यात पुणेकरांचा उत्साह अगदी  ओसंडून वहात असतो.

 देहू ,आळंदीहून पुणे मार्गे पंढरपूरला जाणा-या पालख्या हा ही पुणेकरांसाठी असाच  कौतुकाचा विषय.  पाऊस, हेल्मेट सक्ती, रस्त्यांची कामे , मेट्रोची कामे  आणि त्यात वारीमुळे होणारी वाहतूक कोंडी  याची चिंता न करता अस्सल पुणेकर या पालख्या  "एन्जॉय"  करतो. इथे अस्सल पुणेकर हा शब्द  अशासाठी वापरलाय की  या सगळ्यामुळे त्रास होतो असे मानणारा वर्ग ही पुण्यात आहे पण तो मुळचा पुणेकर नसून बाहेरून पुण्यात स्थायिक झालेला पुणेकर आहे.

या पालख्या जर पुणे मुक्कामी विकेंड ला येत असतील तर या उत्साहाला अधिक उधाण येते.  आपापला व्याप सांभाळून पुणेकर वारीचा आनंद लुटतात , वारी बरोबर एक दिवस चालत जातात , ताल मृदूंग , अभंग , जयघोष , पताका , तुळशी- वृंदावन , कपाळावर गंध, पालखी  सोबत जाणे  इ अनेक प्रकार करुन आपला सहभाग नोंदवतात.

साधारण उत्सव असो , यात्रा/ जत्रा असो साधारण आपण तीन प्रकारची जनता यात सामील होते असे म्हणतो  हौसे, गवसे, नौसे .
सोशल मीडियाचा,  सेल्फी या प्रकारचा उदय झाल्यानंतर आजकाल  ' हौसे, गवसे, नौसे बरोबरच आता "सेल्फे"  ही नवी जमात बघता बघता फोपावली आहे असा आमचा अभ्यास सांगतो.  प्रोफेशनल कॅमेरामन , चित्रकार , आर्टिस्ट यांच एक ठीक असतं. पूर्वीपासून ही लोकही वारीचे चित्रीकरण,काही खास फोटो  काढण्यात मग्न असतात . मात्र यांचा त्रास फारसा कुणाला होत नाही. एकतर हे लांब कुठं तरी  बसून  आपले काम करत असतात . ना ते कुणाच्या अध्यात ना मध्यात .  हरिनामाचा जयघोष करत चाललेल्या  या माऊलीच्या भक्तांच्या तर हे गावीही नसते  की दूर  कुठूनतरी  कुणीतरी आपली छबी , आपले भाव (  आजच्या शब्दात  नॅचरल एक्सप्रेशन्स )  टिपत आहेत.  यात कुठेही देखावा नसतो , कृत्रिमता नसते  त्यामुळे ते चित्र ही अगदी सहज जमून जाते.

आता या वारीतल्या सेल्फी टेक्नॉलॉजीचा ( इथे पारंपारिक तंत्रज्ञानाचा विचार आहे , यातही आता अनेक आधुनिक तंत्रज्ञान आले आहे )  विचार करू.
एकंदर यांचे वर्णन अभंगातून व्यक्त करायचे झाल्यास असे 👇🏻 करता येईल.

*पुण्यनगरी गाऊ आम्ही  पुण्यनगरी नाचू*
*मोबाईलच्या कँमेराने  सेल्फी फोटो काढू*
*विठ्ठलचे नाम घेऊ  लावूनी ' टायमर '*

 तर  या  लोकांना आपण वारीत जाऊन आलो ( फोटो काढण्यापुरते का होईना )  हे अख्या जगाला ( ठणकावून) सांगायचे असते. हेच प्रयोजन ठेऊन ते घरातून निघतात . यात काही जण स्वतःच्या कुटूंबासह (  हे कमीच ) , ऑफीस ग्रुप,  सोसायटी ग्रुप  किंवा शाळा - कॉलेजच्या मित्र - मैत्रिणींचा ग्रुप ( हे जास्त )निघतात. थोडक्यात घोळक्याने जातात .  यात एखाद्या शहाण्याला यापूर्वीच्या
' *सेल्फी-वारीचा* ' अनुभव असतो. पालखीचा मुक्काम  कुठे आहे , मार्ग काय आहे  याची माहिती ही करून घेतलेली असते. मग ठरलेल्या ठिकाणी मंडळी पोचतात. मग कुणा माऊलीच्या डोक्यावरचे तुळशी वृंदावन स्वतःच्या डोक्यावर घेऊन  फोटो काढायला लावणे ( इथे बहुतेक सेल्फी घेता येणे शक्य नसते ) , उगाच ताल , मृदूंग अडकवून

*निघालो घेऊन कॅमेरा हा हाती , आम्ही भाग्यवान*

अशा अॅटीट्युड ( ऐटीत - IT मधील असेही म्हणा हवंतर ) मधे हे सेल्फीकरी विठ्ठलाला लावतात तसा गंध कपाळावर ' गुगल ' तानाचा फोटो /  घोडे , पालखी  बरोबरचा सेल्फी  आणि पुढे काय काय प्रकारे सेल्फी निघू शकतात इतपत कल्पना करण्यात तुम्ही समर्थ आहात . आजकाल ते
'फेसबुक  लाईव्ह ' प्रकार पण दाखवायचे असते.

यानं  काय होत की एकंदर या वारीचा वेग पुण्याच्या आजूबाजूला कमी होतो. जो तो  सेल्फी ( स्व चित्र) घेण्यासाठी इतरांना थांबवतो. ते वारकरीही मग थांबतात  , त्यांचा नामात व्यत्यय येतो.
या सर्व प्रकाराने  आपण भक्तीचे अनोखे प्रदर्शन नुसते करत आहोत  असे काही वेळा वाटते.

अर्थात याला अपवाद आहेत हे नक्कीच . काही खरोखरच सेवाभावाने कुठलीही अपेक्षा  न करता मदत करतात, अन्नदानाचे आयोजन होते , कचरा व्यवस्थापनाचे , सांडपाणी व्यवस्थापनाचे नव नवीन आदर्श  पुढे येतात.अशा काही समाधानाच्या गोष्टीही दिसून येतात

*पंढरपूरची वारी  ही  ख-या अर्थाने  महाराष्ट्राचा सांस्कृतिक / वैचारिक  आणि / भक्तीमय  ठेवा  आहे. त्या सोहळ्याला आपण सगळे मिळून असेच ठेवू या* 🚩🚩

दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्त  *फोटोत  रंगला* ,

असं  फक्त व्हायला नको हीच पांडूरंगा चरणी  प्रार्थना 🙏🏻🌺

देवा तुझ्या द्वारी आलो
www.kelkaramol.blogspot.in

Monday, July 1, 2019

बिग बाॅस - मराठी


मराठी  ( किंवा अगदी कुठल्याही भाषेतील )  ' बिग बॉस  '  कार्यक्रमाची  एखादी झलक जरी पाहिली तरी  मला  मराठी गझलकार  भाऊसाहेब पाटणकरांचे  हे काव्य आठवते  👇🏻

क्षणाक्षणाचे पडती फासे
जीव पहा हे रमलेले
पुर्वजन्मीचे संचित त्यांच्या
भाळावरती सजलेले

जीवनातल्या या खेळात
कुणी असते जिंकलेले
सगळं असत ठरलेले,
 सगळं असतं ठरलेले

:- भाऊसाहेब पाटणकर

( आता  हे आमच्या शब्दात:- 📝 )

क्षणाक्षणाला भांड़ती सारे
'सेलिब्रेटी' हे जमलेले
'टीआरपी' चे गणित त्यांच्या 
'स्क्रिफ्ट' वरती लिहिलेले
'बिगबॉस'च्या या खेळात
कुणी असते जिकंलेले

सगळं असतं ठरलेले,
सगळं असतं ठरलेले

या टुकार कार्यक्रमापेक्षा माझे लेखन वाचा , ते जरा तरी सुकार  आहे 😬

poetrymazi.blogspot.in
Related Posts Plugin for WordPress, Blogger...