नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, December 29, 2021

मागची खिडकी


 मागची खिडकी


सध्या नवीन आलेल्या सिटी-बस मधून जर तुम्ही प्रवास केला असेल, तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की बसमधील सिटची रचना वेगळ्या स्वरूपात आहे. म्हणजे पूर्वी कसं चालकाच्या मागे एकच आडवी सिट असायची जिथे बसलं  की बसमधील  मागचे सर्व प्रवासी दिसायचे. पण आता अशा उलट सिटा बसमधे मध्यात आणि अगदी शेवटी पण बसवल्यात. शेवटी बसवलेल्या सिटा तर एवढ्या उंच आहेत की तिथे बसलं की बसच्या अगदी शेवटी असणारी मोठी खिडकी (ज्यावर 'संकटकालीन दरवाजा' असे लिहीलेले असते ) अगदी सहज लक्ष वेधून घेते.



सहसा मी या मागच्या सिटवर बसत नाही पण परवा आँफीस मधून येताना दुसरीकडे बसायला जागाच नसल्यामुळे तिथे बसायला लागले. प्रवास सुरु झाल्याक्षणी नजरेत आली ती ही संकटकालीन मदतीस धावणारी ' मागची खिडकी '


दृश्य फारसे वेगळे नाही. ट्रॅफिक जाम ,त्यातही पुढे जायला पाहणारी वाहने, बसने मागे टाकलेली वाहने. जिथे तिथे पराकोटीचा संघर्ष. 


क्षणभर एक वेगळा विचार मनात आला की आपल्या प्रत्येकाच्या मनात एक अशी खिडकी आहे. त्याला फारतर आपण मार्गदर्शक खिडकी म्हणू. त्या खिडकीतून जरा मागे डोकावू. गेलेली अनेक वर्षे, संपणारे हे वर्ष, झालेल्या चूका, मिळालेल्या संधी, आलेल्या अडचणी आणि महत्वाचे म्हणजे आपल्याकडून घडल्या गेलेल्या चांगल्या गोष्टी/ आपण उमटवलेला ठसा,आपले यश


याचे विश्लेषण करुन पुढचा करायचा प्रवास.  

मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात ही अशी एक खिडकी शिकवतात SWOT ANALYSIS म्हणून 


"बस" नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपल्याच मनातील 'संकटकालीन मार्गदर्शक खिडकीतून' एकदा डोकावयाचे आणि परत आपला नियमीत प्रवास सुरु ठेवायचा यासाठी तुम्हाला सगळ्यांना  शुभेच्छा 💐


( प्रवासी)  अमोल 📝

'सफला एकादशी'

३०/१२/२१


www.poetrymazi.blogspot.com

Saturday, December 18, 2021

पेपर मिळू दे मिळू दे


 रविवारची टवाळखोरी 📝*

( * प्रासंगिक मनोरंजन) 


पेपर मिळू दे मिळू दे, भावा पास होऊ दे

आली परीक्षा - परीक्षा, प्रश्ण आम्हा मिळू दे

पेपर मिळू दे मिळू दे, भावा पास होऊ दे


परीक्षार्थी पाखरा, पेपर लिही सारा

आले दलाल अंगणी, त्यांना पैसे देऊ करा

परीक्षार्थी पाखरा...।


मला पेपर दाखवी, दिसे पुढची नोकरी

आता पुस्तकं हुडकून शोधू उत्तरे ही जरा.

पेपर मिळू दे मिळू दे, भावा पास होऊ दे..।


ध्येय करुन मेरिटचा,पेपर लिहितो काॅपीचा

आता म्हाडाच्या खात्यात सेवा रुजू दे जबरा...


परीक्षार्थी पाखरा...।


पेपर मिळू दे मिळू दे, भावा पास होऊ दे

आली परीक्षा - परीक्षा, प्रश्ण आम्हा मिळू दे


( कायमचा अभ्यासू)  📝

मार्गशीर्ष कृ.प्रतिपदा

१९/१२/२१

Wednesday, December 8, 2021

मनीच लग्न


 *प्रासंगिक लग्न-सोहळा

( मनीचं लग्न 🐈‍⬛)


'मनी'sच लगीन झोकांत लागलं 

'बोको'बांवर मिम्स काढलं

'विकी'बाबा नटून मंडपात थांबला

मिडियाचा वृत्तांत इकडे तिकडे चालला


तिथे नाही 'रेंज' म्हणे पुढे येऊन सासरा

आम्ही तुमच्या 'मनी'ला देऊ कसा आसरा

मोबाईलच्या स्क्रिनचा देऊन झाला दाखला

असं म्हणताच पटकन टाॅवर ही लावला


मनी'sच लगीन झोकांत लागलं 

'बोको'बांवर मिम्स काढलं


उंदराचे पदार्थ मेजवानीला ठरले

हळदी अन संगीताचे, कार्यक्रम लांबले

तरा तरा तो-यामधे प्राणी सर्व जमले

मनीच्या लग्नाला  नियम नाही लागले


मनी'sच लगीन झोकांत लागलं 

'बोको'बांवर मिम्स काढलं 


चंपाषष्ठी 📝 ( ९/१२/२१)

Wednesday, December 1, 2021

वद जाऊ कुणाला शरण


 https://youtu.be/sRnz15t-JJc


( मुळ गाणे: वद जाऊ कुणाला शरण

नाटक : संगीत सौभद्र) 


आमचं : संगीत अभद्र 📝


वद जाऊ कुणाला शरण 

करील जो हरण 'ओमिक्राॅनचे'

मी धरीन चरण त्याचे !


अग लस-घे !!


बहु ताप बंधु- बांधवा, प्रार्थिले बघुनी दु:ख जनांचे!

ते विफल न होय त्यांचे !


अग लस-घे !!


मग जिल्हा- बंदी मात्र ती, लावुनी कष्ट इ-पासचे!

न चालेचि काही त्यांचे!


अग लस-घे !! 


जे मास्क लावुनी नाकापुढे, वाचले थवे मानवांचे !

अनुकूल होती साचे!


अग लस-घे !!  💉


📝 २/१२/२१

poetrymazi.blogspot.com

Monday, November 22, 2021

पहाटे पहाटे मला जाग आली



 २ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल...📝


पहाटे पहाटे मला जाग आली

अपुल्या सत्तेची कृती फेल झाली


मला आठवेना.. तुला आठवेना 

कशी रात्र गेली कुणाला कळेना

तरीही काकांना खबर लागली


अपुल्या सत्तेची कृती फेल झाली !


सत्तेचे डोहाळे, निमित्य कशाला?

बाजू ठेऊ या 'हात' नको ' बाणाला' 

मनमिळाऊ तात्या हे राज्यपाली


अपुल्या सत्तेची कृती फेल झाली !


कसा रामपारी सुटे गार वारा

माझ्या खुर्चीला देशील का सहारा

करु सुरवात बोलणे, हालचाली 

अपुल्या सत्तेची कृती फेल झाली !



पहाटे पहाटे मला जाग आली

अपुल्या सत्तेची कृती फेल झाली ! 🌷⏲️


कार्तिक कृ चतुर्थी ( २३/११/२१)

अंगारक योग

निर्विघ्नं कुरु मे देव


 निर्विघ्नं कुरु मे देव !

काकूंचा फोन येऊन आठवडा होऊन गेलेला,निदान या आठवड्यात तरी उत्तर द्यायला पाहिजे होते. खरं म्हणजे  विचारलेला प्रश्ण तसा नियमितच होता. लग्न होईल का?  सगळं व्यवस्थित होईल ना?  

लग्न होण्यासंबंधीचे नियम पडताळून,  महादशा - अंतर्दशा ची संगत लावून साधारण उत्तर ही तयार होते

 पण ...

काकूंनी सांगितलेली पार्श्वभूमी. त्या काही बोलल्या नसत्या तर,  सगळं व्यवस्थित होईल, योग आहेतच ,अमूक वर्षी अमूक दशेत, अमूक ग्रहांच्या विदशेत २,७,११ ही तिन्ही स्थाने मिळतायत , करा सुरवात मुली बघायला ' असं लिहून पाठवायला फारतर एखाद दुसरा दिवस लागला असता.


पण त्या बहिण -भावांची कथा ऐकल्यावर तो हादरला.  वडील नाहीत. आई नुकतीच कोरोनात गेली. लहान बहिण डिप्रेशन मधे, स्वतःला चांगली नोकरी पण लग्न होत नाही आहे.

आणि ही परिस्थिती, काकूंनी  न सांगता आपल्याला पत्रिका बघून का ओळखता आली नाही? याचे वैषम्य त्याला जास्त होते.

 दुसऱ्यांचे प्रारब्ध बघता बघता आपल्यासाठी ही नियतीची योजना असते आणि त्याप्रमाणेच जावे लागते याची जाणीव ही घटना देऊन गेली. 

 ग्रह अनुकूल असूनही हो 'लग्न' होईल हे ठाम पणे कळवणे त्याच्या जीवावर येत होते. तुझ्या मुलीसाठी असं स्थळ आले असते तर तू स्वीकारले असते असतेस का? हा मनातील प्रश्ण ही त्याला अस्वस्थ करत होता.

यासाठीस तो अजून उत्तर द्यायचा थांबला होता. आज सर्व कन्सल्टिंग बंद ठेवायचे त्याने आधीच ठरवले होते.

आज चतुर्थीची आवर्तने करताना दोन आवर्तनं त्या बहिण-भावांसाठी म्हणायची आणि परत एकदा पत्रिकेतील 'निर्णायक घटक' शोधायचे आणि काकूंना या आठवड्यात उत्तर द्यायचेच हे ठरवून त्याने 'वक्रतुंड महाकाय ' म्हणायला सुरवात केली


"निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा!"  हे थोड्या मोठ्या आवाजात म्हणले गेलेलं त्याच्या कानाला जाणवलं


( अमोल)

Wednesday, November 17, 2021

नेटक-यांनो मज्जेसाठी लाऊ पणाला प्राण


 नेटकरी -  ही एक नवीन जात सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. या नेटक-यांना समर्पित


( आदरणीय साने गुरूजींची माफी मागून 🙏)


आता करुनी डेटा आँन,

नको राहू दे कुठले भान

नेटक-यांनो मज्जेसाठी लाऊ पणाला प्राण


मिडीया चॅनेल उठतील

बातम्या सा-या पेरतील

'मेटा-कुटीला' सारे येऊन पेटवूया हे रान 😷


कोण आम्हा अडवील

कोण आम्हा रडवील

अडवणूक करणाऱ्यांची उडवू दाणादाण


नेटक-यांची फौज निघे

'पुढे ढकलणे ' चोहीकडे

विनोदी टोमणे, मिम्स हीच आमची जान


पडून ना राहू आता

मारुया शाब्दिक लाथा

'नेटकरीच' कामकरी, भांडणावर ठाम


आता करुनी डेटा आँन,

नको राहू दे कुठले भान

नेटक-यांनो मज्जेसाठी लाऊ पणाला प्राण


( नेटकरी)  अमोल 📝

कार्तिक शु चतुर्दशी

१८/११/२१

Sunday, November 7, 2021

आँनलाईन सोहळा


 निघालो_घेऊन_भक्तांची_पालखी 🚩🌷

(आधी पोपोबा आता विठोबा *)


विठोबाच्या मार्गी । नमोबा आले ।

तो झाला सोहळा। आँनलाईन II


भरवीला पाया । पंढरीसी थेट

 । उरामधे पताका I वैष्णवांची II 🚩


हरी म्हणे “नम्या। तुझे कर्म थोर;

अवघाचि संसार । सोडूनी दिला।।”


नमोजी  म्हणे । एक ते राहिले; ।

 अच्छे, आश्वासन इलेक्शनचे !!


माऊली म्हणे, “बाबा ते  बरे न केले,

त्याने तडे गेले। संसाराला II


नमो,पुन्हा म्हणे । माझ्या शब्दामुळे

वाट्टेल ते खेळले । भक्तांतीत II


विठू म्हणे गड्या । वृथा शब्दपीट

प्रत्येकाची वाट । लावलीसी II


वेगळिये वाटे । वेगळिये काटे;

परि तसेच वागे । तूझाही पक्ष II


ऐक ऐक वाजे । घंटा ही पोपची।

कॅमेरा बाहेरी । वाट पाहे.” II


दोघे लाँगाऊट I  गेले दोन दिशां

कवतिक भक्तांना आवरेना । 😎✌🏻💐


( विनायकी चतुर्थी, ८/११/२१ 📝)

*काल्पनिक, मनोरंजन हा हेतू

Thursday, October 28, 2021

राशी-रंजन


 राशी रंजन 💫⚡✨


सहज मनात विचार आला 'ज्ञानेश्वर' नावाच्या  नव-याला लाडाने  'दाऊद' असं हाक मारणा-या माऊलीची रास काय असावी, 

माझ्यामते 'वृश्चिक ' 🤩

( अर्थात यावर इतर ज्योतिषींचे वेगळे ही मत असू शकते. )


मनोरंजनासाठी *  आता वेगवेगळ्या राशीच्या बायका "ज्ञानेश्वर"  हेच नाव असलेल्या त्यांच्या लाडोबा नवरोबांना काय म्हणतील याचा एक काल्पनिक विस्तार:-


मेष: 'ज्ञान्या'  चल फिरून येऊन जरा, गाडी काढ 🚗


वृषभ:    ज्ञानू, मेरी जानू, जायचं दिवाळी खरेदीला आज,  प्लीज 😌


मिथुन: ओ ध्यानेश, जरा जळमटं काढा, ते बघा तिकडं आहेत अजून ♾️


कर्क: ज्ञानवंतच रे तू माझा, पोरांसाठी जंताचे औषध सांगितलेले, विसरलास ना?


सिंह:-  माय डिअर डाँन, मला बिग बाॅस बघायचं,  आवर तुझ्या बातम्या लवकर 😡


कन्या : मला पण तुला दाऊदच म्हणावं लागेल का रे ? शकील म्हणलं तर चालेल ना तूला? 🤯


तुळ: ज्ञानेशा, दमलास का रे आज. मग उद्या करु खरेदी दिवाळीची 🥳


धनु - ज्ञाना, चहा टाकतोस का जरा आम्हा मैत्रिणींसाठी 🤠


मकर: मला जास्त ज्ञान द्यायचं नाही काय, ज्ञानानु 😶


कुंभ: ज्ञानेश्वरा, कसा रे तू?  अरे ती अनन्या म्हणजे चंकीची मुलगी. ऐवढं माहित नाही? माझी लायकी घालवतोयस 🤧


मीन: ध्याना, जरा पाय चेपतोस का रे? खुप दमलीय मी आज खरेदी करुन 😿


( * काल्पनिक ) अमोल 📝

poetrymazi.blogspot.com

Tuesday, October 5, 2021

तुझा विसरन व्हावा


 https://youtu.be/tEq8ea3Ux-c


दरम्यानच्या काळात आम्ही केलेल्या या प्रार्थनेचे फळ, तुम्ही बघतच ( वाचत ) आहात


हेंचि दान देगा झुक्या

तुझा सर्व्हर डाऊन न व्हावा

सर्व्हर डाऊन न व्हावा

तुझा विसरन व्हावा


इस्टा, फेसबुक आवडी

हेंचि माझी प्रिय जोडी

माझी प्रिय जोडी, हेंचि माझी प्रिय जोडी


न भेटे शांती आणि संपदा

व्हाटसप चालू ठेवा सदा 

व्हाटसप चालू ठेवा सदा 


टुकार म्हणे,


टुकार म्हणे, झुकोबांसी

सुखे घालावे आम्हासी

सुखे घालावे आम्हासी

सुखे घालावे आम्हासी


हेंचि दान देगा झुक्या

तुझा सर्व्हर डाऊन न व्हावा

सर्व्हर डाऊन न व्हावा

तुझा विसरन व्हावा


( अमोल)  📝

भाद्रपद. कृ चतुर्दशी

०५/१०/२१

Tuesday, September 28, 2021

गुंतता हृदय हे


 गुंतता हृदय हे 💖


कमलदलाच्या पाशी 🌷

हा प्रणयगंध परिमळे, तुझ्या अंगाशी

गुंतता हृदय हे ....


'मत्स्यगंधा'  नाटकातील हे वसंत कानीटकरांनी लिहिलेले 'ह्दय गीत' असू दे किंवा ' सन्यस्त खङग' मधील हे गाणे


'हृदयां'बुजी लीन लोभी  अलि हा

मकरंद ठेवा लुटण्यासाठी आला !

बांधी जिवाला सुखाशा मनी

'मर्मबंधातली' ठेव ही प्रेममय !! 


मंडळी, मर्मबंधाची जागा नक्की कुठे असते?  माझ्यामते आपल्या हृदयात. 


अशा अनेक सुमधूर आठवणींचा खजिना असलेले आपले ' हृदय ' याला वेळोवेळी भेट देणे गरजेचे आहे. आज तर हक्काने. नाही नाही गुलाबी वादळ आहे म्हणून नव्हे तर आजचा दिवस तसा खासच आहे


'दिवसरात्र ओढणी या मनास लागते

तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते

मैत्रिणीस सांगते तुझी 'अमोल' योग्यता

'हृदयी'  प्रीत जागते,  जाणता अजाणता 


आहाहा!  गदिमा- बाबूजी- आशा ताईं या सगळ्यांच्या हृदयातून बाहेर पडलेली ही कलाकृती आजही रसिकांच्या हृदयात ठाण मांडून आहे


'हृदयी' जागा तू अनुरागा

प्रितीला या देशील का? 

या हृदयाच्या लाॅकर मधे सगळ्यात जास्त जागा प्रितीने व्यापली असल्यास नवल नाही ( बाकी रक्त, वाहिन्या या सगळ्या अंधश्रध्दाच 😬)


मंगेश पाडगावकरांची ही रचना :- म्हणजे हृदयाची दुखरी बाजूच नाही का?

नि:शब्द आसवांनी समजाविले मनाला

की शाप वेदनेचा प्रीतीस लाभलेला

माझ्याच मी मनाशी हे गीत गाईले


मी बोलले न काही नुसतेच पाहिले

'हृदयात' दाटलेले 'हृदयात' राहिले


इथे मात्र मला या हृदयात कुठेतरी एकाकी मन सापडते

एकदा का त्याला समजावले की त्याची अवस्था काहीशी अशीही होते


आज माझिया किरणकरांनी

ओंजळीमधे धरली अवनी

अरुणाचे मी गंध लावले


आज 'हृदय' मम विशाल झाले

त्यास पाहुनी गगन लाभले


तर मंडळी, ही काही माझ्या हृदयात स्थानापन्न असलेली आठवणीतील 'हृदय' गाणी. तुम्ही ही आजच्या  ' ह्दय दिनाच्या' निमित्याने उजळणी करा..


" हृदय सलामत तो ..❣️" 


( सुहृद)  अमोल 📝

२९/०९/२१

#जागतीक_ह्दय_दिन

Friday, September 17, 2021

आजी मी माजी पाहिले


 https://youtu.be/ID9mtiyQILg

 


( आजी - माजी - भावी  , चर्चेला समर्पित , मुळ गाण्यात थोडाच बदल करुन

 मुळ गाणे: अजि मी ब्रह्म पाहिले )


आजी मी माजी पाहिले

आजी  मी भावी पाहिले


अगणीत भक्तजन वर्णिती ज्यासी

कटिकर नटसम चरण सत्तेवरी, बाजू राहिले


आजी मी माजी पाहिले


एकनाथाच्या भक्तिसाठी, धावत आला तो जगजेठी

खांदी कावड आवड मोठी, पाणी वाहिले


आजी मी माजी पाहिले


चोख्यासंगे ढोरे ओढिता, शिणला नाही तो तत्त्वतां

जनीसंगे दळिता कांडिता, गाणे गाईले


अजि मी माजी पाहिले


दामाजीची रसिद पटवली, कान्होपात्रा ती उद्धरिली

अमृतराय ह्मणे ऐसी माउली, संकटा टाकिले


आजी मी माजी पाहिले

आजी  मी भावी पाहिले


( अमोल) 

//

भाद्रपद शु  त्रयोदशी 📝

शनी प्रदोष 🌷

१८/०९/२१

Sunday, September 12, 2021

बुध्दीबळ शास्त्र आणि ज्योतिष शास्त्र


 बुध्दीबळ शास्त्र आणि ज्योतिष शास्त्र ⚜️


मंडळी नमस्कार, 🙏


बुद्धीच्या देवतेचा सध्या उत्सव सुरु आहे. कुठलाही कलाकार मग तो गायक, अभिनेता, नर्तक, वादक, चित्रकार ,लेखक,कवी असू  दे 

वर्षातील एकदा तरी आपली कला कलेची देवता श्री गजानना चरणी सादर करावी हे सर्वच कलाकारांना मनोमन सांगणे.  गणेशोत्सव ही या सगळ्यांसाठी विशेष पर्वणी.



याच उद्देशाने माझ्या बुध्दीच्या कुवती नुसार लिहिलेला  हा लेख बाप्पाला अर्पण  📝


तर मंडळी, लहानपणा पासून असलेली  बुध्दीबळाची आवड आणि वयाच्या एका टप्प्यावर लागलेली ज्योतिष विषयाची गोडी आणि आज या दोन्ही क्षेत्रातले बेसिक नाॅलेज यावरून या दोन्ही गोष्टींची तुलना, काही समान धागे जोडण्याचा केलेला हा प्रयत्न


पटावरील ६४ घरांमधे रंगणारे दोघांमधील युध्द आणि पत्रिकेतील १२ भावांमधे असणा-या जन्मकालीन ग्रहांशी गोचरीने होणारे ग्रहयोग ( नियतीने टाकलेले डाव ) हे माझ्यासाठी  कायमच उत्सुकतेचे विषय राहतील

पटांवरील प्रत्येक सोंगटी आणि पत्रिकेतील प्रमुख ग्रह यांची मी अशी बरोबरी केली आहे


रवी - राजा 🌞👑

आत्म्याचा कारक ग्रह - रवी

पटावर ज्याच्या साठी खेळ रंगतो  तो राजा

दोघांनाही चेक बसला, सोडवता नाही आला तर खेळ खल्लास


मंगळ / वझीर 💥

मंगळाला सेनापती म्हणले आहे, वझीर हा पटावरचा खरा सेनापती


शनी / घोडा 🐴

अडीच + अडीच + अडीच = शनीची साडेसाती आणि घोड्याची पटावरील अडीच घरांची चाल. 

कधी कुणाला ... 🦄 ( असो)

सळो की पळो करुन सोडेल,  गर्व हरण करेल सांगता यायचे नाही


हत्ती / गुरु 🐘 🌕

पटावर  राजा पासून सगळ्यात लांब असणारा,  अगदी सरळ मार्गी असणारा,   पण वेळोवेळी राजाला मार्गदर्शन करणारा हत्ती , आणि पत्रिकेतील गुरु सारखेच


कॅसलीन रूपाने  राजाची हत्तीशी  होणारी सल्लामसलत, मार्गदर्शन आणि वेळप्रसंगी गरज लागलीच तर मैदानात उतरणारा हत्ती म्हणजे पटाला लाभलेले गुरुबळच.


दोन उंट - बुध/ शुक्र 🐪💫🌟

हे दोन्ही ग्रह अशुभ ग्रहात येत नाहीत पण अनेक वेळा यांची पत्रिकेतील स्थिती जपून अभ्यासावी लागते. वक्री, स्तंभी, उच्च-निच्च ग्रह केंव्हा तिरपी चाल चालवून धोक्याची घंटा वाजवतील हे सांगणे अवघड


प्यादी / चंद्र 🌙♟️

संख्येने जास्त असणारी प्यादी,  आणि  पत्रिकेत विविध कला दाखवणारा चंद्र यात कमालीचे साम्य आहे. राशी, नक्षत्र,  दशा, प्रश्णकुंडलीतील चंद्राचा भाग, इतर ग्रहांशी जमणारी केमिस्ट्री याबरोबरच मनाचा कारक ग्रह चंद्र


मूर्ती लहान पण कीर्ती महान. याच मनाच्या खंबीरतेवर प्रतिस्पर्ध्याच्या पहिल्या घरात पोचून प्यादाचा वजीर बनू शकतो जे इतर कुणालाही शक्य नाही. 

इतर सोंगट्यांना सगळ्यात जास्त सपोर्ट हे प्यादे देते. धारातीर्थी ही पहिल्यांदा तेच पडते तर वजीर बनून पोर्णीमा ही अनुभवते


मंडळी , कशी वाटली तुलना?  आयुष्यात बुध्दीबळाचे अनेक डाव तुम्ही खेळता कधी जिंकता कधी हरता. पण पत्रिकेत ग्रहांचा जन्मत: सुरु झालेला डाव तुमच्या अंतापर्यंत सुरु राहतो. त्यात काही लढाया नियती तुम्हाला जिंकवते  काही  डावपेचात हरवते. इथे नियतीच फक्त  खेळत असते, आपल्यासाठी..


लेखनाचा शेवट भाऊसाहेब पाटणकरांची एक गझल थोडीशी बदलून


क्षणाक्षणाला रचती डाव

खेळ असे हे रंगलेले

शौर्य-बुध्दीचे प्रारब्ध त्यांच्या

पट-पत्रिकेवर दिसलेले

कधी असते खेळलेले

कधी असते ठरलेले


मोरया 🙏🌺


( अमोल) 

१२/०९/२१

भाद्रपद. शु षष्ठी

Wednesday, September 1, 2021

बाबू समजो इशारे


 बाबू समजो इशारे ,हाँर्न पुकारे पं पं पं 📢


नितीन गडकरी यांनी गाड्यांचे हाॅर्न कर्णकर्कश्य नकोत , पारंपारिक वाद्य - संगीत वगैरे असे सुचवल्यावर काही खास गाड्या साठी काही हाँर्न/ धून/ गाणी सुचवत आहे 📝


शोरुम मधून नवीन गाडी घेताना- डिफाॅल्ट धून-🚘

बाबूजी धीरे चलाना, खड्डे मे जरा संभालना

हां, बडे मोटे है, बडे मोटे है स्पिड - ब्रेकर, इस रस्तेमें.

बाबूजी ...


सायकलवाली/ वाला: 

बाय-सिकल तुरुतुरु ,वेग वाढवी हळूहळू  डाव्या बाजूने वाट काढली 

आता कुठल्याही रस्त्यावर,कुठल्याही बाजूने सायकल सळसळली.


स्कुटीवाली: 

बाबू समझों इशारे, पैर दिखाये, ब्रेक ब्रेक ब्रेक..


बाईकवाला: 

शिरस्त्राण विसरताच ,शिट्टी तिथे वाजली, 

अरे पुन्हा पाकिटाचा भार करा खाली


रिक्षावाला: - 

वाट पाहूनी जीव शिणला, पॅसेंजर गडी कुठं हा गेला

चला चला शेअर करा.. रिक्षा थांबली 


लाल परी: 

एक थांबा सुखाचा, शंभर थांबे भरलेले,

चल लवकर तिकीट काढ रे ,पुढच्या प्रवासाचे


मध्य रेल्वे लोकल : 

कामावर जायला उशीर झायला 

वाट पाहतोय फलाटवाला माझी वाट पाहतोय फलाटवाला.


पश्चिम रेल्वे लोकल : - 

मेनलाईन वरती स्टेशनवरचा

सिग्नल हिरवा हवा

चला जाऊ चर्चगेटला भरा भरा.


हार्बर रेल्वे लोकल :-

कशी नशिबाने थट्टा आज मांडली,

 ती मोडकी लोकल या लाईनवर आज टाकली.


दख्खनची राणी:-

परी हूँ मै, बरी हू मै 🚂


शिवनेरी - 

मी कात टाकली, मी कात टाकली

मी बुडत्या महा- मंडळाची बाई लाज राखली. 

ठाणे-स्वारगेट, ठाणे-स्वारगेट ,

पुणे-दादर-बोरिवली

सिटा भरुन सगळ्या आरामात नेती

मी कात टाकली..


ट्रकवाला : ओ शेठ, तुम्ही नादच केलाय थेट


कंटेनरवाला:- 

यहाँ के हम सिकंदर, 

चाहे तो ठोक-दे सबको अपनी रेंज के अंदर

हमसे बदला मत लेना मेरे यार


( वाजवण्यात पटाईत ) अमोल 📝

श्रावण कृष्ण दशमी

०१/०९/२१

Monday, August 9, 2021

गुरु ठाकूर vs सुरु टुकार ( भाग ३- सन २०२१ )


 गुरु ठाकूर vs  सुरु टुकार ( भाग ३- सन २०२१ )


१) गुरु ठाकूर :-


सुख वेचिन म्हणण्या आधी

घन दुःखाचा गहिवरतो

अन् दुःख सावरू जाता

कवडसा सुखाचा येतो..

या ऊन्ह सावली संगे

रमण्यात ही मौज म्हणूनी

मी हसून हल्ली माझ्या

जगण्याला श्रावण म्हणतो


२) सुरु टूकार 📝 :-


लोकल म्हणण्याआधी

डोस दुसरा आठवतो

अन दंड सावरु जाता

फलाट स्टेशनचा दिसतो

या कठोर निर्बंधा संगे

जगण्यात मौज म्हणूनी

मी ठरवून हल्ली आता

"वर्क फ्राॅम आँफीस" करतो 😉


poetrymazi.blogspot.com


श्रावण ( शु) प्रतिपदा

०९/०८/२०२१

Saturday, July 31, 2021

(ही) बिर्याणी साजूक तुपातली


 *पुणेरी  बिर्याणी*

( प्रासंगिक विडंबन, मनोरंजन : हा हेतू *)


पहिल्या 'टोपाला' भूकेनं साला

काळीज केलंय बाद 🍲

(ही) बिर्याणी साजूक तुपातली

आम्हा 'खाण्याचा' लागलाय नाद 😷


व्हेज का नाॅनव्हेज नको इशारा

मिळू दे आता 'फुकटात' सारा

इथं बि वसुली तिथं बी वसुली

स्टेशनात नको ह्यो वाद


(ही) बिर्याणी साजूक तुपातली

आम्हा 'खाण्याचा' लागलाय नाद ☺️


चुकून जरी हा 'चेकमेट' झाला

खबर लागली 'महाराष्ट्राला'

लागलाय आता तोल सुटाया

'नल्ली निहारिची' ही लाट....


(ही) बिर्याणी साजूक तुपातली

आम्हा 'खाण्याचा' लागलाय नाद ☺️


( मन्थ एन्ड, विडंबन टार्गेट पूर्ण *)  अमोल 📝

३१/०७/२१


#साजुकतूपातील_बिर्याणी

Wednesday, July 28, 2021

पाऊस नक्षत्र आणि आधुनिक म्हणी


 "पाऊस नक्षत्र" या संदर्भात प्रचलित म्हणींची माहिती देणारा एक लेख बराच व्हायरल झालाय. छान माहिती त्यात मांडलीय पण कालानरुप त्यात बदल व्हायला पाहिजे असे वाटते.


आधी आपण मुळ म्हणी एकत्रीत वाचू


रविचा मृग प्रवेश ( ७ जून)  ते रवीचा स्वाती प्रवेश ( २५ आँक्टो) हा साधारण प्रचलित पावसाचा हंगाम. त्यानुसार क्रमाने या प्रचलित म्हणी


पडल्या मिरगा तर टिरीकडे बघा

पडतील आद्रा तर उडतील गडदरा

पडतील पुक ( पुष्य) तर चाकरीच्या गड्याला सुख

आश्लेषा- मी येते सळासळा, मामाजी तुम्ही पुढिं पळा

पडतील मघा तर चुलीपुढे हगा

पडता हस्ती कोसळतील भिंती

पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा

पडतील स्वाती तर मिळतील माणिक मोती


इथे मला पुनर्वसू, पूर्वा फाल्गुनी,उत्तरा फाल्गुनी याबद्दल काही म्हणी त्या लेखात आढळल्या नाहीत. प्रत्यक्षात असतीलही ( अर्थात आपण ती कमी भरून काढूच)


तर मंडळी मृग नक्षत्र लागण्या आधी रोहिणीत येणारा पाऊस हा 'वळवाचा' किंवा त्याला आजकाल मान्सुनपूर्व पाऊस म्हणतात.


रवीचा रोहिणी नक्षत्र कालखंड

( २५ मे ते ६ जून)

आधुनिक म्हण:

" *रोहिणीत काढू छत्री, भोकंबिकं नाहीत ना करु खात्री* " - वळवाच्या/मान्सूनपूर्व पावसाने आगामी पावसाळ्याची चाहूल लागते. छत्र्या, रेनकोट, पावसाळी बूट आठवतात आणि त्यांची वेळेवर डागडुजी, नवीन खरेदी केली जाते


रवीचा मृग नक्षत्र कालखंड ( ७ जून ते २२ जून)

आधुनिक म्हण:

" *मृगाचा कमी दाब, मुंबईकरांना लाभ* " - मान्सून केरळात, प्रवास संथगतीने,  अमुक दिवशी कोकणात/ मुंबई येणार या  बातम्यां बरोबरच बंगालच्या किंवा अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा हमखास तयार होऊन मुंबईकरांची दाणादाण उडवून टाकतो.


रवीचा  आद्रा नक्षत्र कालखंड ( २३ जून ते ५ जुलै)

आधुनिक म्हण: 

*मिठी आदराची, डुबकी कुरल्याची* :- मिठी नदी पात्राची मिठी सैल करुन बाहेर पडते आणी सायन,  कुर्ला भाग डुंबायला लागतो. या काळात म्हैस,  बेडूक, हत्ती वाहन असेल ( दरवर्षी प्रत्येक नक्षत्रात पावसाळी वाहन वेगळे असते)  तर ही मिठी पंचक्रोशीला कवेत घेते.


रवीचा पुनर्वसू नक्षत्र कालखंड ( ६ जूलै ते २० जुलै)

आधुनिक म्हण: 

*"राज्यात दुष्काळ, पुनर्वसनासाठी केंद्राला घाट*"

*राजाचा मजकूर प्रधान सेवकाला पाठ*

मुंबईत पाणी पाणी होत असताना, राज्यभर मात्र दुष्काळाची छाया पसरते, आषाढीला पांडुरंगाला साकडे आणि केंद्राकडे याचना हे सगळं ठरलेलेच.


रवीचा पुष्य नक्षत्र कालखंड (  २१ जुलै ते २ आँगस्ट) 

आधुनिक म्हण:

*"घोडा लागला ( वाहन) पुष्यात, पाऊस आला गुश्श्यात"*

आता माझी सटकली म्हणत पाऊस सगळीकडे उधळतो.


रवीचा आश्लेषा नक्षत्र कालखंड ( ३ आँगस्ट ते १७ आँगस्ट ) 

आधुनिक म्हण:

*"आश्लेषाचा भार धरणाला, नदीकाठचे वाळवंटाच्या वळणाला*"

हीच ती वेळ. धरणे भरून लागतात, पाणी सोडले जाते आणी नदीकाठच्या लोकांना आपला भाग सोडून पाणी नसलेल्या ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागते.


रवीचा: मघा नक्षत्र कालखंड ( १८ आँगस्ट ते २९ आँगस्ट ) 

आधुनिक म्हण:

*श्रावणात पडेल मघा, लोणावळा- खंडाळा सौंदर्य बघा*

पावसाळी सहली ख-या अर्थाने एन्जाँय करण्याची वेळ


रवीचा: पु.फाल्गुनी ते उत्तरा  फाल्गुनी कालखंड ( ३० आँगस्ट ते २६ सप्टेंबर  ) 

आधुनिक म्हण:

*पडेल फाल्गुनी, राजांचे दर्शन होई घरुनी*

:- गणेशोत्सवाचा कालखंड,  या कालावधीतला पाऊस भक्तांच्या उत्साहावर विरजण घालतो 


रवीचा: हस्त नक्षत्र  कालखंड ( २७ सप्टेंबर ते ९ आँक्टोंबर  )

आधुनिक म्हण:

*पडू दे किंवा नको पडू दे हस्त, खड्ड्यांनी केंव्हाच रस्ता केलाय फस्त*:

:- आपल्या हातात फक्त मलिष्काची गाणी ऐकणे 


रवीचा: चित्रा नक्षत्र  कालखंड ( १० आँक्टोंबर ते  २४ आँक्टोंबर )

आधुनिक म्हण: 

" *माळेत जर अडकली चित्रा, कसा खेळशील गरबा मित्रा* "

घटस्थापनेला पाऊस असेल तर माळेत अडकतो आणि अडचणी वाढवतो.


रवीचा: स्वाती नक्षत्र  कालखंड( २५ आँक्टोंबर ते ६ नोव्हेंबर )

आधुनिक म्हण: 

*पडू नको स्वाती नाहीतर दिवाळीची होईल माती*

:- आजकाल पाऊस पण दिवाळीचे उटणे लावूनच जातो.


साधारण पावसाचे चक्र असेच दिसून येते.

मंडळी, या आधुनिक म्हणी आवडल्या असतील तर. खालील इमेल वर  प्रतिक्रिया नक्की द्या.  


अमोल केळकर 📝

a.Kelkar9@gmail.com

आषाढ कृ. षष्ठी

२९/०७/२१


#पाऊस_नक्षत्र

#आधुनिक_मनोरंजन

पूर ते महापूर


 पूर ते महापूर


आमच्या चुलत काकांचे सांगलीला नदीकाठी ( विष्णू घाट)घर आहे.


कृष्णेला पूर आला की  काका आणि इतर भावंडांबरोबर मागे डबा ( डालडाचा सिल केलेला) लावून माई घाट ते विष्णू घाट पोहत येण्याचे एक 'शास्त्र' केले जायचे ( सांगलीच्या प्रसिध्द आयर्विन पूलाच्या एक बाजूला माई घाट तर दुस-या बाजूला सरकारी घाट मग पुढे विष्णू घाट). पात्रातले भोवरे, पुलावरून उड्या मारणारे, अट्टल पोहणारे हे सगळं बघत पोहायला मजा यायची. 



पोहायचे बरेसचे अंतर हे नदी पात्रातील पाण्याच्या वेगाने आपोआप भरून निघायचे  ( हात पाय मारून आपण पट्टीचे पोहणारे असा उगाच हावभाव दाखवणा-यांच्यात मी पण असायचो 😛)


मग एखाद्या दिवशी काका मार्ग बदलायचे म्हणजे Across नदीला छेदून विष्णू घाट ते समोरचा सांगलवाडीचा घाट आणि परत. इथे मात्र ब-यापैकी....  कस लागायचा


मात्र मागे डबा आणि सोबत काका त्यामुळे फारसं काळजी करायचं काम नसायचं. ( तरीपण ' काका मला वाचवा' असं एकदा केंव्हातरी गटांगळ्या खाताना ओरडलेलं अंधुक स्मरतय 🙈)


तसं पोहण्याचा 'करेक्ट कार्यक्रम ' आम्ही शिकलो ते माधवनगर या खेडे गावात. सांगली पासून अगदी जवळ, आता ओळख सांगायची झाली तर क्रिकेटर स्मृती मानधनाचे गाव. तिथं  उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही विहिरीत पोहायला आमच्या भावाकडून शिकलो. दर उन्हाळ्यात हा कार्यक्रम फिक्स असायचा. चेंज म्हणून फारतर विहिर बदलली जायची.


अरुंद , गावाकडच्या खडबडीत रस्त्यावरून गाडी चालवणारा अचानक एकदिवस एकस्प्रेस हायवेला आला तर त्याची जी अवस्था होईल तशी अवस्था आमची कृष्णेत उतरल्यावर व्हायची


आणखी एक आठवण म्हणजे या काकांची स्वत: ची लहान ' नाव / बोट' होती. त्यातून ही अनेकदा फेरी मारायचो.  मोठा भाऊ हरिपूर पर्यत ( कृष्णा - वारणा संगम)   जाऊन नदीतून वाहत येणारे नारळ वगैरे आणायचा. एकंदर त्याकाळी कृष्णेचा 'पूर' ही पर्वणी असायची


पूराचा - 'महा' पूर काय झाला

शास्त्र/ गणित सगळंच बिघडलं


जवळजवळ १०- ११ महिने ' संथ वाहणारी कृष्णा-माई ' एखाद्या महिन्यात रुद्र रुप धारण करते ते काठावरची तिची मुले सुधारावीत म्हणून ? का दुसरा कुठला राग काढते तेच कळेना झालंय ? 


( कृष्णेचे पाणी पचवलेला)  अमोल 📝

२८.०७.२१


( चित्र: विष्णू घाट, सांगली )

Tuesday, July 20, 2021

' मॅपवाल्या बाई '




शाळेत असताना भूगोल विषयात मॅप / नकाशा काढायचा  एखादा प्रश्न असायचा. ब-यापैकी सोडवला जायचा. पूर्वेकडे मद्रास आणि कोलकत्ता यात जागेची अदलाबदल तसेच चंदीगड / दिल्ली नक्की कोण वर कोण खाली अशा किरकोळ चुका व्हायच्या, एखादं दुसरा मार्क गेला तरी फारसं काही वाटायचं नाही.


अभ्यासक्रमात शिकवल्या जाणा-या विषयांचा प्रत्यक्ष जीवनात फारसा उपयोग नसतो हे माझे मत आता हळूहळू बदलू लागलं आहे जेंव्हापासून मी ' गुगल मॅप' वापरू लागलो. पुढे कुठे आपल्याला नकाशा वापरायला लागणार आहे या विचाराला मस्त तडा गेला,  त्यातील गणिताचे  महत्व ही तेंव्हाच कळले जेंव्हा डावीकडे  २० मिटरवर गल्लीत वळायला बाईंनी सांगितले आणि आम्ही पुढे ३० मिटरवरच्या गल्लीत वळतो. अशावेळी जर तुम्ही बायकोच्या नातेवाईकांकडे जात असाल तर मग .....


तर मंडळी, आजकाल अनेक संस्था,  इन्स्टिट्यूट, सेवा देणा-या कंपन्या स्वतः मधे अधिक चांगला बदल घडवून आणण्यासाठी फिडबँक घेतात, लोकांचे/ ग्राहकांचे मत विचारतात. इलेक्टाॅनिक गँझेटस ही अपग्रेड करत  असतात. आमच्या शाळेतल्या सरांनी मात्र असा फिडबँक कधी घेतल्याचे स्मरत नाही. घेतला नाही तेच बरं झालं कारण आमच्या फिड- बॅक नंतर परत  शाळेत आमचे कम- बॅक झाले असते असे वाटत नाही. असो 


तर या  जीवन प्रवासात  जेंव्हा गरज पडते तेंव्हा प्रत्यक्ष  रस्त्यावर मार्ग दाखवणा-या "गुगलमॅपवाल्या बाईंना" 'गुरुपोर्णीमेच्या' निमित्याने  काही गोष्टी सुचवाव्यात असे यानिमित्याने वाटले म्हणून लिहिले,

 

गुगल बाई, सादर प्रणाम


अनोळखी ठिकाणी जाताना, ध्येयसिध्दी होईपर्यंत तुम्ही आम्हाला अचूक मार्गदर्शन करता. एकवेळी आम्ही कंटाळतो पण तुम्ही न कंटाळता your destination on right side असं सांगूनच थांबता, याबद्दल तुमचे अनेक आभार 🙏


पण बाई, या सोबतच्या प्रवासात शक्य झाले तर

१) आम्हाला मराठीत मार्गदर्शन करा, 

२) नुसतं डाव/ उजव/ सरळ पेक्षा पुढच्या चौकात एक पानपट्टी दिसेल तिथे उजवी कडे वळा, किंवा २० मीटर वर छेडा जनरल स्टोअर्स च्या बाजूच्या गल्लीत वळा हे जास्त चांगलं समजेल, नाहीतर पुढे जाऊन ५० मिटरवरच्या जोशी गल्लीतच आम्ही वळणार हे नक्की. अशा काही खुणा आम्हाला पुण्य नगरीत सदाशीव  पेठ, प्रभात रोड या ठिकाणी दिल्यास खूप उपयोगी होतील

३) दरवर्षी आषाढी एकादशी नंतर कृपया रस्त्यावर विशेषतः नुकत्याच तयार झालेल्या उड्डाणपूलावर 'खड्डे' नक्की कुठे आहेत हे आवर्जून सांगा

उदा. बेलापूर हून ठाण्याकडे जाताना उरण उड्डाणपूलावर शक्यतो उजव्या बाजूने जाणे, कमी खड्यातून जाल.

नेरुळ उड्डाणपूलावरुन न जाता खालूनच जाणे, थोडावेळ सिग्नलला थांबायला लागले तरी चालेल त्यात फायदा आहे. 

तुर्भे स्टेशनसमोर स्पिड ब्रेकरलाच गेलेला उंच सखल छेद नक्की कशाप्रकारे गेल्यावर गाडीच्या मडगाडला लागणार नाही यावर तर एक यूट्यूब व्हिडिओच बनवा.

 पुढे घणसोलीच्या सगळ्यात मोठ्या उड्डाणपूलावर किती मीटरवर डाव- उजव करायचं आणि कुठल्यावेळी अगदी मधोमध गाडी चालवायची हे ही जमलं तर सांगा


अर्थात जसे जसे  खड्डे update होत राहतील तसे तसे तुम्ही ही जास्त योग्य मार्ग सांगालच यात शंका नाही.


या कालावधीत माणसांच्या शरीरातील रक्त वाहिन्या प्रमाणे लाल भडक मार्ग दिसून तिथे अडकलो तर थोडेसे मनोरंजन म्हणून आपोआप बाजूला छोट्या चौकटीत  'मलिष्का ताईंची' खड्यांवर केलेली गाणी चालू होतील असं काही करता आलं तर बघा.


तूर्त इतकचं, आठवेल तसं लिहिनच


मला खात्री आहे बाई, तुम्ही आमच्या 'भरवश्याला' तडा नाय जाऊ देणार ☺️


गुगल ने दिला मँपरुपी वसा,⤵️

आम्ही वापरू हा, हवा तो तसा 🛣️


📝 अमोल केळकर

आषाढ शु. द्वादशी

२१/०७/२१

Saturday, July 17, 2021

दैवजात सुखे भरता, लोभ हा कुणाचा'


 

श्री श्रीधरजी,


सर्वप्रथम अत्यंत आभारी की मला आपणाशी फोनवर बोलण्याची संधी आपण दिलीत 🙏. ग्रंथयात्रेच्या ३७ व्या भागात अर्चना ताईंनी 'गीतरामायण ' बद्दल माहिती सांगितली. त्यांना हा भाग आवडल्याचे मी कळवले, त्यांनी ती प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवली. रात्री अर्चना ताईंनी मला तुमचा नंबर पाठवून तुमच्याशी बोलायला सांगितले आणि काल आपले बोलणे झाले. एकदम भारी वाटलं. 


 प्रत्यक्षात खूप काही बोलायचे ठरवले होते पण ऐनवेळी जास्त काही सुचले नाही म्हणून मनातले आता लिहून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे.


सर्वप्रथम ग्रंथयात्रेत तुम्ही जी माहिती सांगितलीत त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलची आठवण विशेष भावली. 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' हे गाणे ऐकताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ह्या गाण्यातील


'अयोध्येस हो तू राजा, रंक मी वनीचा'


 ह्या वाक्याचा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रत्यक्ष जीवनाशी कसा संबंध लागतो हे क्रांतीकारी रसग्रहण मला फार आवडले.


सुदैवाने माझ्याकडे  बा.भ. बोरकरांचे प्रस्तावना असलेले गीतरामायणाचे छापील  पुस्तक आहे, किंमत २ रु. यावरून एका मराठी मालिकेतील एक वाक्य आठवते,

 "दोन रूपये भी बहुत बडी चिज होती है बाबू " खरंच हा एक अत्यंत अमोल ठेवा आहे असे मी म्हणेन


"गीतरामायण" हे जे चिरंतन काव्य निर्माण झाले त्याचे श्रेय गदिमा आणि बाबूजींचेंच तरीही या दोघांनीही वेळोवेळी असे म्हटले आहे की, हे कार्य त्यांच्याकडून नियतीने/ एका विशेष शक्तीने करवून घेतले याचा उल्लेख आपण ही केलात. 

याबाबत थोडेसे


प्रभू श्रीरामांची कर्क रास, पुष्य नक्षत्र. चंद्र-गुरु कर्केत तर शनी महाराज तुळ या उच्च राशीत . 

ग्रंथयात्रेच्या कार्यक्रमात तुम्ही सांगितले की १ एप्रिल १९५५ ला रामनवमीच्या दिवशी हे गीतरामायण पहिल्यांदा प्रसारित झाले. त्या दिवशीचा ग्रहयोग पाहिला असता त्यादिवशी कर्क रास- पुष्य नक्षत्र आणि तुळेचा शनी असा समांतर ग्रहयोग माझ्या पहाण्यात आला. नक्षत्रात पुष्य नक्षत्र हे सगळ्यात शुभ नक्षत्र मानले जाते. ज्योतिष अभ्यासक म्हणून माझे नेहमीच असे म्हणणे आहे की एखादी कलाकृती मग तो लेख असेल, काव्य असेल, पुस्तक असेल ते ही विशेष योग/ प्रारब्ध घेऊन येतात याला वरील ग्रहयोग पाहता पुष्टी मिळते.


 आणखी एक विशेष गोष्ट मी अभ्यासली ती म्हणजे बाबूजी आणि गदिमा या दोघांच्याही पत्रिकेत गुरु कर्क राशीत( उच्च राशीत)  आढळले.


हे सगळं आपणाशी फोनवर बोलता आलं नाही, तुम्ही माझ्यासाठी जी २ मिनीटे दिलीत ती मी कधीच विसरणार नाही. 

' फुलले रे क्षण माझे ' असंच म्हणता येईल.

 तुम्ही संगीत दिलेली , सांज ये गोकुळी, गगना गंध आला, फिटे अंधाराचे जाळे ही मला विशेष आवडणारी गाणी. 


  तुमच्याशी बोलून, तुमचा आवाज ऐकून  जे वाटलं ते एका वाक्यात सांगायचं झालं तर


'स्वराधीन आहे जगती, पुत्र बाबूजींचा'


धन्यवाद 🙏


📝अमोल केळकर

आषाढ शु. नवमी

१८/०७/२१


इतरांसाठी टिप: सोशल मिडियावर चांगले वाचले, ऐकले की ते पुढे ढकलण्या बरोबरच ज्याने लिहिले आहे त्यांना कलाकृती आवडल्याचे  आवर्जून कळवा.


 काय सांगावे मला मिळाली तशी संधी तुम्हालाही मिळेल ☺️

Thursday, July 15, 2021

समांतर


 "समांतर" ह्या मराठी वेब सिरीजला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे ( अत्यंत चांगले कथाबीज असताना व्हल्गर/ शिवराळ भाषा आणि बोल्ड सिन्सची एवढी जास्त गरज नव्हती हे प्रामाणिक मत.  असो) 


या मालिकेत  दोन व्यक्तींचे आयुष्य समांतर आहे असे दाखवले आहे म्हणजे  दोन व्यक्तींच्या पत्रिका सारख्या आहेत/ असतात असा उल्लेख झाल्याचे स्मरते. त्यातील एकाचा भूतकाळ आत्ता एकाचा वर्तमान म्हणून घडतोय अशी काहीशी कथा.


खरंच दोन व्यक्तीच्या पत्रिका सारख्या असू शकतात का?  तर जास्त खोलात ( म्हणजे ग्रहांवरून अंश, नवमांश. वगैरे) न शिरता असे म्हणता येईल की साधारण २ ते सव्वा दोन दिवस चंद्र एकाच राशीत असताना आणि इतर कुठल्याही ग्रहांचे राशी बदल होत नसताना, त्या दोन एक दिवसात एकाच वेळेवर. ( किंवा एकाच लग्न राशीवर )जन्म घेणाऱ्यांच्या पत्रिका दिसायला अगदी सारख्या दिसतात.

म्हणजे लग्न रास , प्रत्येक भावातील रास,  प्रत्येक भावातील ग्रह एकदी एकसारखे.  


आता एक महत्वाची गोष्ट जुळ्या मुलांच्या कुंडल्या सुध्दा सारख्या दिसत असल्या तरी त्यांचे प्रारब्ध वेगळे घडते,  त्यामुळे पत्रिका दिसताना सारख्या असल्या तरी भविष्य सारखे नसतेच


आता समांतर मालिकेत दाखवलेल्या प्रमाणे एखाद्यावेळची वर्तमानातील ग्रहस्थिती  भूतकाळात तशीच्या तशी असू शकेल का, ? ( तशी असली तरच दोन व्यक्तींचे प्रारब्ध/ घडणाऱ्या घटना एकसारख्या असू शकतील असे म्हणता येईल)


यासाठी मी माझी स्वतःची पत्रिका घेतली. पत्रिकेतील सगळ्यात हळू भ्रमण करणारे शनी महाराज कर्क राशीत , गुरु मिनेत, रवि - मकरेत , केतू मेषेत तर राहू तुळेत. 


आता यापूर्वी  शनी कर्केत,  रवि मकरेत अशी combinations , तीस तीस वर्षे मागे जाऊन पाहिली. 

शनी, रवि, चंद्र सोडून इतर कुठलेही ग्रह पाहिजे त्या राशीत सापडले नाही.


मग पुढे जाऊन पाहिले तर २०३५ ला शनि, रवि, गुरु, चंद्र  पाहिजेत त्या राशीत ( फेब्रुवारी ७६ सारखे) सापडले

पण आयडेंटिकल पत्रिका , सर्व ग्रह फेब्रु ७६ ग्रहस्थिती प्रमाणे  मिळाले नाहीत


तात्पर्य हेच की प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. मागील जन्माच्या कर्मानुसार या जन्मात त्या व्यक्तीच्या वाट्याला प्रारब्ध्द भोगावे लागत असेल. कदाचित मागील जन्म,  त्या जन्मातील काही घटना आठवतही असतील  पण अगदी जशाच्या तशा घटना घडणे हे फक्त वेब सिरीज मध्येच काल्पनिक गोष्ट म्हणून ठिक आहे. 


ज्योतिष अभ्यासकांच्या पहाण्यात अशा काही समांतर कुंडल्या ( ६०-७० वर्षाच्या फरकाने)  आल्या असल्यास अवश्य शेअर कराव्यात तसेच प्रत्यक्षात 'समांतर' कथानक शक्य आहे का ? यावर ही मत द्यावे


📝 अ. अ. केळकर

१३/०७/२१

Wednesday, July 14, 2021

ठो_ठूस्स_ठुई


 ठो, ठूस्स, ठुई 📝


पुरुषांना जसे वय्यक्तिक स्वातंत्र्य असते त्याप्रमाणे समस्त महिला वर्गालाही असावे याबाबत अजिबात दुमत नाही.


 पण तरीही मुळात "शालीनता" ही जी आपल्या संस्कृतीची अभिमानास्पद ओळख आहे ती तमाम बंधू- भगिनींनी आचरणात आणायला काय हरकत आहे? विशेषतः सार्वजनीक ठिकाणी/ सार्वजनीक  मंचावर वावरताना 


 तुमच्या घरात तुम्ही काय वाट्टेल ते करा पण तोच घरातील एखादा व्हिडिओ सावर्जनीक सोशल मिडियावर टाकताना काळजी घेणे आवश्यक नाही वाटत? 


( इथे पुरुषांनीही एखाद्या बीचवर कसे पळावे हा त्यांचा वय्यक्तिक मुद्दा असला तरी संस्कृती जपणूक/ सभ्यता  ही केवळ स्त्रीयांची  मक्तेदारी नाही याची नोंद घेण्यास हरकत नाही)


या सगळ्याचा संबंध फिल्म इंडस्ट्री,मनोरंजन इंडस्ट्रीशी असेल आणि त्यातून प्रसिद्धी मिळवायची असेल तर गोष्ट वेगळी. त्यासाठी इतर ही अनेक मार्ग आहेत. मालिका/ सिनेमांचे ट्रेलर,जहिराती इ इ आणि वेळोवेळी तो अवलंबला जातो. त्यावेळी 'शालीनता" हा मुद्दा आणला जात नाही कारण  प्रेक्षकांपासून, कलाकार, दिग्दर्शक , निर्माता यांच्यापर्यंत  भूमिकेची गरज/ स्क्रिफ्ट ची गरज या नावाने सगळं चालून जातं. 


तेंव्हा  तुमचे वय्यक्तिक, घरगुती स्वातंत्र्य सोशली किती, कशा पध्दतीने आणायचं हे कळणे महत्वाचे. अर्थात चर्चा होणे हेच प्रयोजन असेल तर काही हरकत नाही.


 आमच्या संस्कृती / परंपरा लयाला जात आहेत असे म्हणत  नंतर गळे काढून उपयोग नाही. आपणच याला जबाबदार ठरु


📝 अमोल केळकर

१५/०७/२१


#ठो_ठूस्स_ठुई


टिप: सुजीत भोगले यांचा समाजाला 'आरसा' दाखवणारा मुद्देसूद लेख मिळाल्यास अवश्य वाचा.

Sunday, July 11, 2021

हा हायवे म्हणजे वेगाचा राजा, थांबला तो संपला.


 मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे -  🛣️ एक प्रवास


( 📝मुळ संकल्पना :- शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेले आणि सुनील गावसकर यांनी गायलेले 'हे जीवन म्हणजे क्रिकेटराजा हुकला तो  संपला' हे गाणे)


या एक्सप्रेस-वे वर थांबायाला वेळ कोणाला?

हा हायवे म्हणजे वेगाचा राजा, थांबला तो संपला


अफाट अशा हायवे वरती येशी वेळो वेळी

मार्ग मोकळा दिसू लागता, ५ वा गिअर खेळी.

वेग घेई मग मोटरगाडी, फलक मागे फेकी

भवताली तुला मागे धाडाया, जो तो फासे टाकी

मार्गे टपला "टोल-भक्षक" तुझा उधळण्या डाव

फास्ट-टँग बसवशील तर, मिळेल तुजला भाव


चतुर आणि सावध जो जो तोच इथे रमला

हा हायवे म्हणजे वेगाचा राजा, थांबला तो संपला.


( कळंबोली सुटल्यावर सभोवार पहावे तर दिसतात माथेरान, कर्नाळा ची डोंगररांग. मागे पडत जाणारे ट्रक, बस, ट्रेलर,कंटेनर्स . 

ओव्हरटेक करुन पुढे जाणारी करकरीत नवीन अँटोमॅटीक गाडी वेगाच्या उन्मादात,धावणारी , पळणारी. 

शेजार शेजारच्या दोन अवजड वाहनाच्या टप्प्यात त्यांचा, वेग गळून जातो. स्पिड लिमीट ओलांडल्याच्या  जयघोषाच्या जल्लोषातील हवाच सारी निघून जाते.इकडून तिकडे लेन कटिंग करणा-यांना क्षणात आपल्या रांगेत कुणी जागा देत नाहीत....)


असा इथल्या दरबारातील न्याय सदा आगळा

हा हायवे म्हणजे वेगाचा राजा, थांबला तो संपला.


तू चालवत असता लाईट-हाॅर्नचे नारे

या हायवेवरचे नकोच विसरू वारे

फटकार अचूक टर्न, "अमृतां-जनाचा"

वाहतूक असे रे जणू डोंगर थांबायचा


निरंतर राहील तुझी आठवण इथल्या खड्याखड्याला

हा हायवे म्हणजे वेगाचा राजा, थांबला तो संपला.


(चालक 🚗) अ.अ.केळकर 

१२/०७/२१

Thursday, July 8, 2021

आषाढस्य प्रथमदिवसे


 

आषाढस्य प्रथमदिवसे 🌧️

योग जुळला विकेंडचा

कुटुंबासह लोणावळा-खंडाळा 

बेत ठरला मेघांचा...


बायको घरीच असल्याने

कालिदासाने दिली परवानगी

बोर- घाटातूनच वेगवेगळ्या दिशेला

ढगांची झाली रवानगी


कुणी पोहोचले टायगर- पॉईंट

कुणी धबधब्यात मारला सूर

नेहमीपेक्षा जास्त वाहतूक कोंडीने

त्यांच्याही गाड्यातून निघाला धूर


खंडाळा ते नारायणी धाम

भूशी डॅमलाही ढग जमले

 लोणावळ्याचे नेहमीचे वारकरी

लॉकडाऊन मुळे  घरीच बसले


निसर्ग गेला आनंदून

माणसांचा नव्हता त्रास

आषाढस्य प्रथमदिवसे

मेघदूतांची झाली पिकनिक खास


अ.अ.केळकर 📝

🌧️ ०९/०७/२०२१ 

 ज्येष्ठ अमावस्या


#पाऊले_चालती_लोणावळ्याची_वाट

नाही नेत्यांची मोजणी


 https://youtu.be/FfmsEr9ehVE


बा भ बोरकरांच्या स्मृतिनिमित्त.....


( त्यांची माफी मागून 🙏)


नाही नेत्यांची मोजणी

नाही खात्यांची टोचणी

दिली शपथेवर वाणी


कुणाला हा लाभ-भाग

 दिल्लीसाठी पाठलाग

आम्ही हो मंत्र्यांचे  चिराग


आम्हा मिळे नाव-रूप

आम्ही विकास स्वरूप

असा नारा होई खूप


को(क)णातल्या  पानाफुला 🌷

पाही सर्वांग सोहळा

धनुष्य- बाणाचीच कळा 🏹


नाही नेत्यांची मोजणी

नाही खात्यांची टोचणी

दिली शपथेवर वाणी


- अ. अ. केळकर 

📝०८/०७/२१

Monday, June 28, 2021

लिटिल चँम्पचे परिक्षण, किती किती छान


 https://youtu.be/AnIzmourMaA


' लिटिल चॅम्प' परीक्षक बनले आणि  उलट्या सुलट्या प्रतिक्रिया / मिम्स/ निबंध वाचायला मिळाले.


आपण तर वाहत्या गंगेत नेहमीच हात धुऊन घेतो 😷😉

* मनोरंजन हेतू


मुळ गाणे: लिंक मधे


छान छान छान लिटिल चँम्पचे परिक्षण किती किती छान *


इवलिशी जिवणी अन इवलेसे दात

चुटुचुटु बोलती, करुन प्रतिक्रिया पाठ

भावी लिटिल चँम्प देती, याना आता मान


छान छान छान लिटिल चँम्पचे परिक्षण, किती किती छान 👌🏻


इवल्याश्या गाण्यामधे, मोठे मोठे बोलू

सोशल प्रतिक्रिया अन मिम्स आम्ही झेलू

लिटिल लिटिल स्पर्धेक झाले  जवान


छान छान छान लिटिल चँम्पचे परिक्षण, किती किती छान 📝


झाली झाली वेळ चँनेल आता लावू

गाण्यांची मज्जा सारी घरातूनी घेऊ

एकरूप झाले सारे विसरुनी भान


छान छान छान लिटिल चँम्पचे परिक्षण, किती किती छान ☺️


( त्यातही मुग्धाचा चाहता) अमोल

जेष्ठ. कृ. पंचमी

२९ जून २१

Friday, June 25, 2021

वाटेवर वाझे


 ( * राजकीय विडंबन, ज्यांना राजकारणाची `अँलर्जी आहे त्यांनी दुर्लक्ष करावे, मनोरंजन हा हेतू असला तरी 😝)


मुळ गाणे : कवी अनिल, संगीतकार यशवंत देव https://youtu.be/JTryvwRnLMc)


* वाटेवर वाझे, मोजीत चाललो

वाटले जसे चिखलात आत रुतलो


विसरुनी शपथ  कधी, एक हात सोडूनी मधी

आपुलीच साथ कधी करित चाललो.


आधिचा प्रसाद घेत, पुढची ऐकीत साद

नादातच शीळ वाजवीत चाललो


चुकली सत्येची चाल, लागला जीवास बोल

ढळलेला तोल सावरीत चाललो


खांद्यावर बाळगिले ओझे पहाटेचे

फेकून देऊन अता परत चाललो


( मी परत लिहिन, परत लिहीन)  अमोल ✌🏻 📝

२५/०६/२१

Wednesday, June 23, 2021

वटपोर्णीमा


 वटपोर्णीमा



अविनाशची आज थोडी गडबड होणार होती म्हणून तो लवकरच उठला.  

गुरुवार असल्याने आज 'स्वामी समर्थांचा तारक मंत्र'  लँपटाँप वर लावून तो आवरायला लागला. इकडे मुलं आँन लाईन शाळेला आपापल्या खोलीत गेलेली. त्यांना दूध, बिस्किटे वगैरे देऊन त्याने तिच्या खोलीची चाहूल घेतली. आतून रेडिओचा वगैरे आवाज येत नसल्याने अजूनही ती झोपली आहे असे समजून पुढील कामाला लागला. 

उपवासाचे पदार्थ बनवण्यात अजून तो एक्स्पर्ट झालेला नाही याची त्याला कल्पना होती. तरी मागच्या एकादशी पेक्षा आज खिचडी चांगलीच बनवायची असा निश्चयच त्याने केला होता.  एकीकडे कुकर लावून दुसरीकडे त्याने खिचडी बनवायला घेतली.  आज जास्त काही नको नुसती बटाट्याची भाजी पुरे असे ठरवून फ्रीज मधे ठेवलेली कणीक पोळ्या करायला काढली.  तिकडे 'अशक्य ही शक्य करतील स्वामी ' ऐकताना, आता काही दिवस तर उरलेत ' होम क्वारंटाईनचे ' हीचे असा सुखद विचार त्याच्या मनात येऊन गेला. खिचडी परतताना हे आपण कसं काय सगळं निभावून नेले  याच त्याला  राहून राहून आश्चर्य वाटत राहिले.

पूजा-पाठ करुन झाल्यावर सकाळी दाराशी ठेवलेला चहाचा थर्मास आत गेलाय हे पाहून अवी ला बरं वाटलं. 


 मुलांना सूचनांचा Whatsapp करुन सगळ्यांचे डबे भरून, सावित्रीशी फोनवर बोलून तुझी आज आवडती बटाट्याच्या कापाची भाजी केलीय गं, अस सांगून आधुनिक सत्यवान  उपवासाचा डबा घेऊन आँफीस कडे निघाला.


*सात जन्म सोबत रहायची टाळी एका हाताने थोडीच वाजते ? काय अवी,  बरोबर ना?*  असे स्वगत बोलून त्याने गाडी सुरु केली होती.


वेळप्रसंगी आपल्या सावित्री साठी जीवाचे रान करणाऱ्या आधुनिक सत्यवानांना ही 

वटपोर्णीमेच्या शुभेच्छा 🙏💐


साठा उत्तराची  वटपोर्णीमा कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण


अमोल 📝

वटपोर्णीमा, २४/०६/२१


टीप : आपल्या अवीची अशी अवस्था होऊ नये म्हणून तमाम वहिनींना विनंती

Stay home, stay safe 🙏


#तब्येत सलामत तो वटपोर्णीमा पचास

Thursday, June 17, 2021

अधीकमाज आरती


 फेसबुकने आज 'अधिक मासाची' आरती  आमच्या भिंतीवर मेमरी म्हणून दाखवली मग आमच्या बुध्दीच्या कुवती नुसार आम्ही


' अधिक माजाची ' आरती मनसोक्त तयार केली 😝

( * मनोरंजन हा हेतू. ज्यांच्या भावना दुखावतील त्यांनी आधी अधिकमासाची आरती तोंडपाठ म्हणून दाखवावी) 


अधिकमाज आरती !


ओवाळू आरती !  आता अँडमीन प्रभूला !

नियम व्रते लावितो ! पावतो स्व  भक्ताला  !! धृ  !!


भरवशाच्या प्रतिक्रियेचा ! मळ संग्रही केला !

पाॅली- टिकली ! कुंकू हळद ! कपाळी बसविला  !!

अमंगलकार्ये ! वर्ज्य त्यामधी ! पुण्यकर्म करती !

समुहाला ! विष्णूकृपेने ! अच्छेदिन आणिती !!

अंधाराचा नाश कराया ! मेंबर काढिला !

नियम व्रते लावितो ! पावतो स्व भक्ताला  !! १  !!


हास्य सुंदरिला ! ठमिला फक्त चंद्रकलाराणीला !

अधिकनियमव्रत ! पुण्याईने ! प्रसन्न पशू झाला !

स्नान, दान , जप ! मौन भोजने कुबुद्धी सारावी !

दुर्व्यसनांचा ! त्याग करावा ! चैन सर्व सोडावी !

निर्मळ गुरुजी पुण्यप्रद हा ! मार्ग दावी सकला !

नियम व्रते पाळितो! पावतो स्व भक्ताला  !! २  !!


१८/०६/२१ 📝

( बुध्दीची कुवत नसलेला)

Tuesday, June 8, 2021

घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा


 https://youtu.be/j_ndKWrY3cw


शास्त्र असतं हे गाणं ऐकणं पहिल्या पावसाच्या धारेत ☔

( गदिमांची क्षमा मागून 🙏)


घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा

केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा


भरतीच्या लाटे वरती

तशीच चालवे गाडी श्रीहरी

मग अचानक ट्रँफीक होतो ओल्या अंधारा


वर्षाकालिन सायंकाळी

मुंबई स्पिरीटचे गोडवे  गोकुळी

उगाच त्यांच्या पाठिस लागे न्यूज चँनेल सारा


मध्य हार्बर पश्चिम गवळण

तिला अडविते तिचेच अंगण

अंगणी अवघ्या तळे साचले, भिजले ते दादरा


घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा

केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा 


( पहिल्या धारेचा)  ☔📝

०८/०६/२१

www.poetrymazi.blogspot.in

Friday, June 4, 2021

अनलाँक' दान


 'अनलाँक' दान


( माऊलींची तत्वत : माफी मागून 🙏)



आतां विश्वा मधे जाणे। येणें कारणे मानावें । तत्वत: मज द्यावें । 'अनलाँक'दान हें ॥ १ ॥


नी यमांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं वेळ वाढो । आतां परस्परें मिळो। मैत्र जीवांचें ॥ २ ॥


दुरिताचें तिमिर जावो । जिल्हा स्वधर्म हद्द नाहो । जो जें वांच्छील तो तें लाभो । प्राणी ई-पास ॥ ३ ॥


'वर्षा' निवासी मंगळीं । महा- निष्ठांची मंत्रियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥


चलां कल्पतरूंचे पतंग । चेतना सेंट्रलमणीचे नाव । बोलते जे अर्णव । चॅनेलांचे ॥ ५ ॥


सामना चे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । कारणे होतु ॥ ६ ॥


" *किंबहुना*"सर्वसुखीं । सदा येऊनी फेसबुकीं । भजिति आदित्य पुरुषी । अखंडित ॥ ७ ॥


आणि मेट्रोपजीविये । विशेषीं आरे इयें । दृष्टादृष्ट विजयें । झाडावें जी ॥ ८ ॥


येथ म्हणे श्रीकोरोनेश्वरावो । हा होईल दानपसावो । येणें वरें लस देवो ।


 'मुक्ती'या झाला ॥ ९ ॥


( तत्वत: विडंबनकार)  📝

४/०६/२१

वैशाख कृ. दशमी

Wednesday, June 2, 2021

द्वितीय तुज पाहता


 https://youtu.be/feH8MKkuojg


प्रती, कोविशिल्ड 💉


द्वितीय तुज पाहता, जीव वेडावला

उचलुनी घेतले बाहू टोची ले तुला


द्वितीय तुज पाहता..। 💉


स्पर्श होता तुझा ,विसरलो त्रास मी

कुंद स्पिरीटाचा , प्राशिला गंध मी

'ओटीपी' हा संग्रही, जपुनी मी ठेवला


द्वितीय तुज पाहता..। 💉


" *जाग स्वप्नातुनी* मजसी ये जेधवा

कळवळुनी तुजसी मी, इच्छिले तेधवा

धावता रथ पथी, आँफीसात थांबला 🚗

 

द्वितीय तुज पाहता ..। 💉


( अजूनही प्रतीक्षेत)  अमोल 📝

०२/०६/२१

वैशाख कृ. अष्टमी

Sunday, May 30, 2021

ताम्हणकर बुक डेपो


 ( आधुनीक ) ताम्हणकर बुक डेपो 


हॅलो काका, नवीन वर्षाचे मोबाईल आले का?

कितवीत आहेस बाळ तू ?

नववी

CBSC का स्टेट बोर्ड?

स्टेट बोर्ड

बाळू, नववी सेट  स्टेट बोर्ड तयार झाला का रे?

नाही, दोन दिवसांत मालक

काय राहिलयं, आता?

मालक, भूमितीचे अँप अजून आले नाही डाऊनलोड करायला,

अरे लवकर कर १ जूनला सगळं तयार पाहिजे बघ

बाळ,  तू  आँर्डर दे  .पत्ता सांग २ दिवसात होम डिलेव्हरी

बर मोबाईल कव्हर पाठवायचे का?  लवकर नोंद करा, कमी आहेत. पुढे केंव्हा मिळतील सांगता येत नाही.

काका,  नको कव्हर. आठवीच्या मोबाईलचे चांगले आहे

काका, आठवीच्या मोबाईलवरच सगळ्या विषयांचेव अँप नाही येणार का डाऊनलोड करता?

येतील पण वेळ लागेल,  ते काम लाँकडाऊन संपल्यावरच होईल. माधवनगरला ताम्हनकर सर्विस सेंटर मधून करावे लागेल.

काका चार्जर पण देणार का?

नाही, नवीन पाहिजे असेल तर वेगळा चार्ज

बर आणि काय पाहिजे?  नवीन ब्लू टूथ  , मोबाईल स्टँन्डचे छान डिझाईन आलेत, हेड फोन . काय असेल ते एकदाच मागवा. माल शिल्लक रहायची गॅरेटी नाही

बर काका

काका ते केळकरांचे संस्कृत सराव अँप आलय का?

आठ दिवसात, काकूंचा पुण्याहून फोन आलेला कालच.

आणखी काय?

काका माझ्या लहान भावाला चित्रकले साठी एखादं छान अँप.

सगळं मिळणार जूनच्या आवश्यक खरेदीची गडबड संपू दे मग फोन कर

चल दुसरा फोन येतोय, पत्ता पाठव मला किंवा आमच्या संकेतस्थळावर रजिष्टर कर ,आँर्डर नोंद कर

ठिक आहे काका.


हा, बोला

रमेश,  सातवी CBSE पँक करायला घे, स्पाइडर मँनचा स्टॅन्ड टाक अँडीशनल

हॅलो, हां  बोला, हो हो, ताम्हणकरच बोलतोय


 #ताम्हणकर_बुक_डेपो, सांगली


अमोल 📝

वैशाख कृ. षष्ठी , ३१/५/२१

Friday, May 28, 2021

चला कपाट आवरु या


 चला कपाट आवरु या !


वर्षातील ५२ रविवार पैकी कुठल्याही  एका रविवारी हे वरील वाक्य एखाद्या घरात म्हणले गेले नसेल असे मला तरी वाटत नाही. रविवार अशा साठी की जरा निवांत, सुट्टीचा दिवस म्हणून. कुटुंबातील सदस्यांनी मिळून कपाट आवरणे हा एक छान कौटुंबिक सोहळा आहे असे माझे स्पष्ट म्हणणे.

म्हणजे बघा अश्विनी ते रेवती अशी २७ नक्षत्र आहेत. पूर्वी 'अभिजीत ' नावाचे पण नक्षत्र मोजत पण आता हे नक्षत्र धरत नाहीत. नक्षत्र पुस्तकात प्रत्येक नक्षत्राची माहिती देताना या नक्षत्रावर एखादी गोष्ट हरवली तर ती मिळण्याचे ठोकताळे दिलेले आहेत. अभिजित नक्षत्रावर ही माहिती अर्थातच नाही. पण पूर्वी समजा या नक्षत्राची कुठे माहिती दिली असेल त्यात या नक्षत्रावर करायच्या कामात

 ' कपाट आवरणे ' हे नक्की असावे असे माझे मन सांगतय. 


अश्विनी ते रेवती नक्षत्रावर केंव्हाही तुमची गोष्ट हरवली असेल आणि तेंव्हा अगदी याच कपाटात, इथल्या ड्राँवर मधे , कप्प्यांमधे कितीही वेळेला तुम्ही शोधली असली तरी आजच्या 'चला कपाट आवरु या ' अभिजात मुहूर्तावर मात्र ही मिळण्याची खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच शक्यता असते.


मंडळी, मोकळं केलंत सगळं कपाट,  अवती भोवती मस्त पसारा जमलाय ना?   

*तर अधून मधून असं कपाट आवरणं हे  जरी शास्त्र असले तरी*


*मागच्या वर्षी कपाट आवरताना नाही हे राहू दे, टाकू या नको  म्हणून ठेवलेल्या गोष्टी या वर्षी कपाट आवरताना कच-याच्या ढिगात टाकणे ही एक मोठी कला आहे*


कपाट आवरताना हातात आलेले मित्राने दिलेले वाढदिवसाचे ग्रिटींग बघून, छान स्माईल करुन परत त्याच जागी ठेवणे हा " मैत्री धर्म "  आहे.


लहानपणीची 'फोटो गँलरी' आपलं 

' फोटो अल्बम' हातात आल्यावर चहाचा कप बाजूला ठेऊन शेवट पर्यतचे फोटो बघणे आणि कपाट आवरण्याच्या कार्यक्रमाला थोडा ब्रेक घेणे  ही "नैतिक जबाबदारी" आहे. 


गधडे/ गधड्या  आँन लाईन क्लासला  मिळत नव्हती ना  ही वही  ? कपाटात नीट बघ म्हणलेलं , शोधली नीट?  नाही,  आत्ता कशी मग आली?  नीट बघायचंच नाही ,  हे माय लेकींचे / माय लेकांचे ( बर का मित्रों, आपण अशावेळी परत एकदा फोटो अल्बम बघायला काढायचा) संवाद हे "आवश्यक कर्तव्य " आहे. 


ती वही  उघडताच आत मधे  मिळालेली १०० रुपयाची नोट घेऊन आईला देऊन संध्याकाळी भेळ/ पाणीपुरी/  शेव पुरी  ( छे असल्या गोष्टी संकष्टीलाच आठवतात नेमक्या)  रुपी 'अर्थपूर्ण सेटलमेंट' आहे.


मागच्या वर्षी आवश्यक वाटणारी गोष्ट पण  यावर्षी अचानक   अनावश्यक कच-यात  टाकून कपाट मस्त आवरलयं आता.  एकदिवस संगणक, मोबाईल रुपी कपाटातील पण कचरा साफ करायचा आहे असाच. विनाकारण सेव्ह केलेल्या फाईल, फोटो,  अँप सगळं साफ करायचं आहे


बघू सवड मिळाली तर याच पद्धतीने मनातील कपाटातील ही काही  अनावश्यक कप्पे,  विनाकारण सेव्ह केलेले विचार, पूर्वग्रह वेगैरे साफ करता आले तर!


प्रयत्न करायला काय हरकत आहे


( प्रयत्नवादी ) अमोल 📝

वैशाख. कृष्ण ३

२९/५/२१

Wednesday, May 26, 2021

आता कोठे लागे मन


 https://youtu.be/UrKNquFYWMw


तर मंडळी, फेसबुक बंद होणार म्हणून आम्ही दोन दिवसापूर्वी 'अखेरचा हा तुला दंडवत ' असे म्हणले


पण हे काय? अजूनही चालूच आहे की फेसबुक. मग  कुठे  जीवात जीव आला परत


( मुळ गाणे: आता कोठे धावें मन)


आता कोठे लागे मन

( वाॅल) भिंत परत देखुनिया !


लाईक आला, शीण गेला

अवघा झाला आनंद ! 


प्रेमरसे टँगल्या पोस्टी

आवडी काॅपी नित्यशी !


'टुकार' म्हणे आम्हा जगी

' झुक्या' घोगें  खरे माप!


( फेसबुक प्रेमी)  अमोल 📝

२७/०५/२१

Tuesday, May 25, 2021

अखेरचा हा तुला दंडवत


 उद्यापासून आमचे लाडके फेसबुक बंद होणार असे ऐकतोय. हे जर खरं असेल तर


अखेरचा हा तुला दंडवत, सोडून देऊ वाॅल

एकच लाइक, देऊन भावा, फेसबुक सोडून धाव


अखेरचा हा तुला दंडवत


तुझे प्रोफाइल पाहिले वाचले, सारे बर्थ-डे सोपे झाले

आता हे परि सारे सरले, उरलं माग नाव

अखेरचा हा तुला दंडवत


का तू  सोडूनी जातो झुक्या, कुठे शोधू मी मेमरी आता

कुणी न उरला वाली आता ,काँपी पेस्ट न ठाव


अखेरचा हा तुला दंडवत, सोडून देऊ वाॅल

एकच लाइक, देऊन भावा, फेसबुक सोडून धाव



( फेस-बुक कवी) अमोल 📝

२५/०५/२१

Friday, May 21, 2021

खरेदी पूर्वीची ते आँन लाईन


 


 आठवडी बाजार आणि जत्रा या  प्रत्येक गावाच्या वैशिष्ट्यपुर्ण गो़ष्टी. शनिवार म्हणले की  आम्हाला आठवतो आमच्या गावचा म्हणजे सांगलीचा आठवडी बाजार. मारुती रोड पासून हरभट रोड ते कापड पेठ, गणपती पेठे पर्यत पसरलेला. आजच्या आँनलाईन खरेदी आणि लाँकडाऊन च्या प्रार्श्वभूमीवर याबाबतच्या आठवणी


तसं पहायला गेलं तर प्रत्येक व्यक्तीची खरेदीची सुरवात अगदी लहानपणापासून सुरु झालेली असते. पूर्वी आपल्या घरी नातेवाईक / ओळखीचे/ शेजारचे कुणीही कधीही अगदी अचानक येऊ शकत. फोनवर विचारून येणे, आधी Appointment घेणे मग येणे वेगैरे मँनर्स सांभाळण्याचा तो काळ नव्हताच मुळी. आणि घरी आलेल्याला चला सगळे मिळून हाँटेलात जाऊ आम्ही पण अजून या हाँटेलात गेलो नाही असे म्हणायचे ही ते दिवस नसायचे. अश्यावेळी आलेल्या पाहुण्यांसाठी चक्क घरात पोहे/ उपमा/ शिरा / चहा / सरबत असं काहीस बनवले जायचे.


कधीकधी अचानक आलेल्या स्नेंहीमुळे आईची गडबड व्हायची, चहा घेणार का?  असे विचारताच चक्क 'हो'  म्हणायचा तो काळ असायचा आणि थांबा आधण ठेवते असे म्हणायला आणि चहा पुड संपलीय हे लक्षात यायला एकच गाठ पडायची.


अशावेळी जा ग / जा रे कोप-यावरच्या दुकानातून चहा पुड/ आले/ बिस्किटं घेऊन ये अशी आँर्डर दिली जायची. पैसे नंतर देते असं सांग काकांना आणि काका चक्क तयार व्हायचे.  घेतलेल्या सामाना बरोबर हातावर श्रीखंडाची गोळी ठेवायला विसरायचे नाहीत

साधारण लहानपणी पहिल्यांदा अशा प्रकारचा बाजारहाट केलेला सगळ्यांनाच आठवत असेल. 


वाड्यात मित्र-मैत्रिणींबरोबर खेळ ऐन रंगात आला असताना आईचे बोलवणे आणि काहीतरी आणायला सांगणे हे जीवावर आल्यासारखे वाटायचे. मलाच का आई दरवेळेला बोलवते, माझ्या बहिणीला / भावाला पण कधी बोलवत नाही याचे दु:ख ही वाटायचे मात्र अभ्यास करत असताना असे बाहेर जाणे मात्र आवडायचं


जसं जसं मोठे होत गेलो तसे खरेदीचा आवाका वाढला आणि मग आम्हाला  आठवडा बाजारासाठी कामाला लावण्यात आले. आठवडा  बाजारासाठी यादी करणे, घरातल्यां  बरोबर  खरेदीला जाणे, दुकान ( यादी ) वाटून घेणे, खरेदी झाल्यावर मारुती मंदिरात समोरील रसवंती गृहात बसून लिटरच्या मापात उसाचा रस पिणे, ऐनवेळच्या यादी व्यतिरिक्त जास्ती खरेदीची मजा घेणे, बाजारहाट करताना बरोबरचीचे मित्र - मैत्रिणी भेटणॆ, त्यांचे पालक भेटणे,  मग आपल्या पालकांची ओळख करुन देणे, मग चर्चा अभ्यासावर येणे यात नेमके समोर शाळेतल्या बाई येऊन सामील होणे मग हळूच आई मी तिकडे ते घेऊन तिथे थांबतोय/ थांबतीय  ग म्हणून सटकणे, दरावरुन घासाघासी करणे, दर पटला नाही म्हणून पुढे जाणे ( आणि परत पहिल्या वाल्याकडूनच त्याच दरात वस्तू घेणे ), बाजूच्या मंदीरातील देवाला रस्त्यावरुनच चप्पल काढून हात जोडणे, सगळी ओझी सांभाळत चालत घरी येणे,  माल खराब निघाला तर दुस-यादिवशी बदलून घेणे त्यासाठी भांडण करणे , येताना आणि चार नवीन गोष्टी आणणे

हु:श दमलो / दमले  म्हणत परत घरात आईला मदत करणे


मस्त बाजारहाट असायचा तो. त्याची मजा माँल मधील अलिप्त वाटणा-या खरेदीला नाही, आँनलाईन खरेदीला तर नाहीच नाही. आँन लाईन खरेदी मधून "हाती आले ते पवित्र झाले " या न्यायाने जी काही वस्तू आली ती स्विकारायची. काही कारणाने बदलायची झाल्यास " भिक नको पण कुत्र आवर " अशी परिस्थितीत.  त्या सगळ्या प्रोसीजर पेक्षा परत बाजारात जाऊन प्रत्यक्ष परत नवीन वस्तू आणलेली एकवेळ परवडेल. पण अर्थात श्रम / त्रास यातून थोडी मुक्तता मिळते हे नक्की


पण पारंपारिक बाजारहाट ची मजा काही वेगळीच होती हे नक्की आणि आपल्या पिढीने मस्त एन्जाॅय केला बाजारहाट, बरोबर ना?


( बाजार उठवणारा)  अमोल 📝

२२/०५/२१

Thursday, May 20, 2021

खादाडगिरी राशींची"


 " खादाडगिरी राशींची" 


🥘🫕🍤🍱🍜🍝🌮🥙


खादाडी हा अनेकांचा कौतुकाचा विषय असतो.  खाण्याच्या शौकीनांची जात (?), धर्म ( ?) , पंथ (?), लिंग एवढंच काय ' रास ' पण बघू नये. कारण अशा व्यक्ती तुम्हाला सर्व ही १२ राशीत भेटतातच. 


पण तरीही विशिष्ट नोंदी करुन केलेले हे वर्णन निव्वळ मनोरंजन म्हणून 👇🏻


तर मंडळी,  खादाडी  म्हणलं की मला बुधाच्या अंमलाखाली येणा-या 'मिथून,कन्या' राशी आठवतात. म्हणजे या व्यक्तींची कशाला ना नसते.खाणे मनापासून एन्जाँय करतात. भरपूर हादडतील. मिथून वाल्यात निदान खाल्लेले पचवायची ताकत तरी असते, कन्या वाल्यांना दुस-या दिवशी भले पोट दुखू दे, आज मागे हटणार नाहीत. एखाद्या 'साग्रसंगीत मैफलीत' मिथुन, कन्या वाले असले की ती बैठक 'रम'णीय होतेच होते.😉 


हलका डोस घेतल्यानंतर, कन्या वाल्याने वेटरला एक प्लेट 'बाँइल्ड एग' आण अशी फर्माइश केली. वेटरने अर्धी ४ उकडलेली अंडी मस्त सजावट करुन आणली. कन्या वाला ते बघून खवळला, "हमने एक बोला था तूम दो कैसा लाया?". शुध्दीतल्या कुंभ वाल्याला मग कन्या वाल्याची समजूत घालावी लागली की आपण *एक प्लेट* मागितली त्यात by default दोन अंडी असतात. हे समजल्यावर कन्या वाल्याने लगेच दुस-या लसीची , आपलं डोसाची आँर्डर दिली. 😝


मेष वाले मुळातच तिखट प्रिय.  आलेल्या मसाला पापडावर आणखी थोडं तिखट घालून घेतील. मंगळासारखे लालबुंद ,  घामाघुम होतील पण मटण बिर्याणी अजून मागून घेतील. वृश्चिक वाल्यांचा मात्र जोर ग्रेव्हीवर जास्त,  स्टार्टर पण यांना ड्राय पेक्षा ग्रेवी वाले जास्त प्रिय. मेष वाल्यां सारखा  'रेड ग्रेव्हीच'  पाहिजे असा हट्ट बिक्कुल नसतो.


सिंह वाल्यांची बात औरच. आँर्डरच एकदम हटके उदा. राँयल अफगाण पहाडी कबाब, किंवा एखादं मेक्सिकन काँम्बो . प्यायच्या आँर्डर मधे पण असे काँकटेल मागवतील की आपला 'बियर' चा ग्लास पण थरथर कापायला लागेल. सगळ झाल्यावर चल रे एक ' टकिला ' मारु म्हणण्याची हिंमत सिंहेतच


कर्क, तुळ, वृषभ त्यामानाने परंपरा पाळणा-या. कर्क वाल्याची सुरवातच बसल्या बसल्या पिण्याच्या पाण्यापासून सुरु होऊन ते शेवटी थांब हा जरा जाऊन आलो आणि आल्यावर वितळलेले आईस्क्रीम खाण्यापर्यंत. भाताचा कुठल्याही प्रकारावर डाळ/ कढी पाहिजेच पाहिजे. वृषभ, तुळ वाले टिपिकल थाळी किंवा तत्सम जेवण प्रकारास जास्त पसंती देतात. त्यातही मागे जेंव्हा केंव्हा हाँटेलात गेले असतील तर साधारण तोच आँर्डर पँटर्न राबवतात. फार तर मलई कोफ्त्या ऐवजी,काजू करी मागवतील आणि फाँर अ चेंज म्हणून  व्हँनीला एवजी स्ट्राँबेरी आईस्क्रीम  मागवतील इतकच. 


मीन वाल्यांच्या राशी चिन्हावर जाऊन मीन म्हणजे नुसते मासेच खाणारे असे  समजू नका. ते काहीही खाऊ/ पिऊ शकतात भले सात्विक गुरु त्यांच्या राशीस्वामी असला म्हणून काय झालं 😬. हेच धनू बाबतही म्हणता येईल. यांचा ही कार्यक्रम तसा करेक्टच असतो. फक्त सोम,मंगळ, गुरु वगैरे दिवसाची बंधनं लावून घेतात. अनेकदा तर 'प्यूअर नाँन्व्हेज'  कँटँगिरी केली तर या राशीचे जास्त आढळतील. त्यातूनच कुणी बंडखोर आढळला तर चकणा मात्र फस्त केल्याशिवाय रहात नाही तेंव्हा मैफिलीत अशा बंडखोरांचा व्यवस्थित बंदोबस्त करावा


मकर आणि कुंभ हे शनिच्या प्रभावाची व्यक्तीमत्व. फारसे त्यांचे लाड नसतात. "मुखी आले पवित्र झाले "असा पवित्रा.  एखादी डिश मेनू कार्डवरची मागितली आणि वेटरने नाही आहे असे सांगितले तर मेष वाला लगेच वकिली खाक्या दाखवेल, कुंभ वाला ठिक आहे जे काय असेल ते आण म्हणेल. मकर वाला ' तुम्हारे पास सबसे अच्छा डिश कौनसा है? ' हे विचारेल. वेटरने वर्णन करुन झाल्यावर मात्र ती सोडून दुसरी कुठलीही डिश मागवेल. शेवटी आलेले बिल चेक करण्यासाठी घेईल, बिसलरीच्या बाटलीतले तळात राहिलेले पाणी ग्लासात ओतून बिल चेक करताना एकदम वेटरला ओरडेल,  अरे बिस्लरी का बिल लगाया? हमने किधर मंगवाया था?  बुलाव मँनेजर को. शेवटी कुंभ वाला सेटलमेंट करेल. 😊


पण एक गोष्ट या १२ च्या १२ राशींच्या व्यक्तींकडून झाली असेल ती म्हणजे टेबल सोडण्या पूर्वी फुकटात मिळणा-या बडिशॊप/ सुपारीचा अधिक हिस्सा घेऊन. 'अन्न दाता सुखी भव ' अशी प्रार्थना करणे


एव्हानं इतर राशी वाल्यांकडून बाहेर जाऊन पानपट्टीवर मसाला पानाच्या आँर्डर दिल्या जातात. पान बने पर्यत कन्यावाला सेल्फीचा कार्यक्रम करेल.  अरे थांबा मकर, कुंभ वाले येऊ देत की असे तुळेची कन्या बोलेल, ते आल्यावर परत काढू की फोटो म्हणून सिंहेचा वाघ गुरगुरेल. ए मला सोडशील ना वाटेत म्हणून कर्क मेषेच्या मागे लागेल, तेवढ्यात एक मिथूनवाला नळी फुंकायला जरा आणखी पुढे गेलेला असेल. मीन वाल्याने कुणालाही न सांगता ओला/ उबेर बुक केलेली असेल जी आल्यावर पान न खाताच तो पळाला असेल. 


आणि अशी ही १२ राशींची प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी  'खाद्य मैफल'  संपेल.  


आवडली ही खाद्य भ्रमंती ? नक्की कळवा


( संतुलीत आहारवाला)  अमोल 📝

९८१९८३०७७०

Monday, May 17, 2021

वादळा नंतरचा गारवा


 " वादळा नंतरचा गारवा " 



आज सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जायला निघालो. सवयीने सुरवातीला गाडीच्या खिडक्या उघडल्या आणि वा-याची एक छानसी झुळूक आली. १८ मे ला,  सकाळी ८ वाजताही घामाच्या धारा येऊन केंव्हा एकदा गाडीतला A/c लावून आँफीसच्या

 A/c मधे जातोय असे वाटणारा हा कालावधी.  पण आलेल्या गारव्याने खूप छान वाटले. मग संपूर्ण प्रवास खिडकी उघडा ठेऊनच केला. अगदी नैसर्गिक गारव्याचा आनंद घेत.


मान्य या गारव्याला कालचं झालेलं 'वादळ' कारणीभूत आहे. पण वादळ तर येऊन गेलंय आता. कदाचित वादळापूर्वीच्या शांततेतून (  मनातील अस्वस्थतेतून ) गेलो असू, प्रत्यक्ष वादळाचा सामना धीराने केला असू पण नंतरचा गारवा किती जण अनुभवतात?  नसेल तर घ्या अनुभव


मग ते वादळ निसर्गात घडणारे असो, कौटुंबिक असो, आँफीस मधले असो, मैत्रीतले असो किंवा अगदी स्वत: शी झालेले असो.


गारवा अनुभवायचा असेल तर नियम एकच, मनातल्या द्वेषाला आधी बाहेर काढायचे, मग गुणगुणायचे मस्त


गारवा, वा-यावर भिरभिरत पारवा, नवा नवा


गारवा


( गारेगार ) अमोल 📝

१८/५/२१

चेक मेट


 

*कसोटी -  ते २०/२०* 'चेक मेट'


प्रणवने नुकताच बुध्दीबळाचा आँन लाईन क्लास लावलाय. त्याला ही आपल्या सारखी आवड आहे हे पाहून खुप बरे वाटले. एक दोन वेळा आँन - लाईन क्लास ऐकण्याचा ही योग आला. मँडम तर छान समजवून सांगत होत्या पण विचारलेल्या प्रश्णांची उत्तरे प्रणवला देता येत होती, काही चुकत होती पण या ६४ घरांची गोडी प्रणवला लागलीय हे पाहून समाधान वाटले.  हे कारण एक पुरेसं होतं मला भूतकाळात डोकावयाला.


साधारण मे महिन्यातच सांगलीत 'नूतन ' बुध्दीबळ स्पर्धा असायची. या स्पर्धेमुळे या खेळाची गोडी लागली.  शाळेतल्या बुध्दिबळ स्पर्धेत ही भाग घेऊ लागलो. यातली शाळेतील ८ वी किंवा ९ वी ची स्पर्धा चांगलीच लक्षात राहिली आहे. ( सन १९८९ किंवा ९० असेल ) मी,  एक मुलगी आणि एक मुलगा फायनल ला होतो. प्रत्येकाने प्रत्येकाशी खेळायचे. मी त्या मुलीला हरवायचो, ती मुलगी त्या दुस-या मुलाला हरवायची आणि तो मुलगा मला हरवायचा. असं दोनदा झाल्यावर शेवटी चिठ्ठ्या टाकून नंबर काढला आणि अपेक्षेप्रमाणे माझा २ रा का तिसरा नंबर आला. पहिला नंबर अर्थातच त्या मुलीचा. नंतर परत ११ वीत काॅलेजमधे स्पर्धेत नंबर येऊन या खेळाचा संबध संपला ते आता प्रणवच्या क्लासच्या निमित्ताने परत आला.

एक दिवस प्रणव म्हणाला क्लासमधील मुलांच्या पालकांसाठी मँडमनी "आँन लाईन रँपीड चेस काँम्पीटीशन ठेवली आहे " तुम्ही भाग घ्यायचाच,  जिंकायचेच वगैरे वगैरे ठरले.. म्हणलं खेळू की त्यात काय मोठ्ठं. मी शाळेत असं तसं खेळलोय वगैरे वगैरे हा ( over)  काँन्फीडन्स होताच.

ठरलेल्या दिवशी मँडमनी लिंक पाठवली. लाॅग - इन वगैरे झाले आणि २०-२० क्रिकेट सामना सुरु होताना जसे व्हायचे तसेच ८,७,६,५ वगैरे countdown सुरु होऊन एका पालकांबरोबर पहिला सामना सुरु झाला. 

१० मिनिटाचा सामना ( रँपीड चेस)  हा प्रकारच नवीन होता. बाबा किती विचार करताय, भरभर खेळा, तुमची वेळ संपतीय, ते बघा किती फास्ट खेळतायत. पटकन पटकन, प्रणवच्या या काँमेंट्री वर अभासी पटावरचा एक एक मोहरा धारातीर्थी पडत होता. काहीही समजतच नव्हते. आँन लाईन , मोबाईलच्या स्क्रिन वर स्पर्धा खेळतोय, समोर पट नाही, हे जुळवून घेता घेता नाकी नौ आले.  पहिल्याच सामन्यात १० मिनिटाच्या आधी पटावर माझा फक्त राजा राहिला पण राहूल द्रविड सारखी  चिकाटी सोडली नाही आणि हा ऐतिहासिक पहिला रँपीड चेस चा सामना 'स्टेल मेट ' करुन बरोबरीत सुटला/ सोडवला.


हु:श , 'ये अपने बस की बात नही' याची जाणिव झाली.आणि कसोटी क्रिकेट मधला राहूल द्रविड २०-२० मधे त्याच ताकतीने तितकाच यशस्वी होईल याची शाश्वती नाही हे पटले. ती स्पर्धा एखादाच विजय मिळवून आणि सर्व पालकांच्यात खालून दुसरा, तिसरा नंबर येऊन संपली.


आज अशीच परत पालकांच्यात रँपीड चेस स्पर्धा झाली. आज मात्र मागील अनुभवाने असेल पण जरा चांगली मजल मारली.


या अनोख्या स्पर्धेत समाविष्ट करुन घेतल्याबद्दल आणि पाल्या बरोबर पालकांनाही परत या खेळाची गोडी लावल्याबद्दल त्या मुलीचे , जी शाळेत चिठ्ठ्या टाकून पहिली आली होती आणि मी २ रा का तिसरा आलो होतो तिचे म्हणजेच आत्ताच्या क्लास घेणा-या मॅडम माधवी जोगळेकर ( शाळेतल्या माधवी खाडिलकर चे)  यांचे अनेक आभार. 🙏🙏😃


बाबा,  तुमची मैत्रिण आम्हाला शिकवते, तिला तुम्ही हरवलेत तेंव्हा रँपीड चेस स्पर्धा तुम्हीच जिंकणार हा प्रणवचा ही भ्रमनिरास झाल्याबद्दल खरंच धन्यवाद 


कारण सातत्य, अभ्यास,  सराव, चिकाटी  शिवाय विजय अशक्यच हे त्याला समजले 😊 


अर्थात आज समुहात प्रणवचे ( प्रती त्याच्या बाबांचे म्हणजेच माझे ) विषेश कौतुक केल्याबद्दल ही कृतज्ञता. 


या बुध्दीबळा मधील सर्वांची वाटचाल 'प्यादे ते वझीर' अशी यशस्वी ठरो यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा 

💐💐


(बुध्दीबळातला ♟️)अमोल केळकर

Saturday, May 15, 2021

सिssरमच्या वैद्यांनी


 https://youtu.be/cEHJSDv5Gm4



१८- ४४ वयोगटातील तरूणीचे मनोगत 🙋‍♀️

( मुळ गाणे: रेशमाच्या रेघांनी)


हाताला लावा तेवढी


सिssरमच्या वैद्यांनी, संशोधन करूनी, कोविशिल्डचा डोस बघा शोधिला

(लस)कधी मिळणार माझ्या बाँडीला


पहिलीच लस अती मोलाची

पाहिली मी नक्षी मास्क वरची

गुंफियले कानी दोर, सॅनीटाइझर जोडीला

( लस) कधी मिळणार माझ्या बाँडीला. 


जात होते वाटेनं मी तो-यात

मागील वर्षी टपकला तो चायनात

तुम्ही माझ्या वयाचा नियम का हो लावीला

( लस) कधी मिळणार माझ्या बाँडीला .


भिड काही ठेवा साध्या नियमांची

व्हॅलिडीटी किमान दहा दिवसाची

काय म्हणू बाई, बाई तुमच्या नोंदीला


( लस) कधी मिळणार माझ्या बाँडीला


सिssरमच्या वैद्यांनी, संशोधन करूनी, कोविशिल्डचा डोस बघा शोधिला

(लस)कधी मिळणार माझ्या बाँडीला


अमोल 📝

(आमच्याकडे विडंबनाचे हवे तेवढे डोस मिळतील)

१६/०५/२१

Wednesday, May 12, 2021

लळा जिव्हाळा शब्दच खोटे..


 https://youtu.be/a3DQxf7GPUc


बिल गेट्सचा ही घटस्फोट झाला असे ऐकले आणि म्हणावेसे वाटले


*माय्क्रो, साॅफ्टही* शब्दच खोटे

*हार्ड डिस्क* ही जाई


कधी कुणाचे शट् डाऊन , काही कळणे नाही

लळा जिव्हाळा शब्दच खोटे..


पिसी जमवुनी 'कोड' रचिती IT कामगार धट्टे

डालर डालर आणून जगवी बिल गेट हे छोटे

कमावता मँड(म) घरातूनी, उल्लू बनवून जाई


कधी कुणाचे शट् डाऊन , काही कळणे नाही

लळा जिव्हाळा शब्दच खोटे..


वक्तही इथे सुड साधतो, जरी असली माया 💰

कोण कुणाची बहिण भाऊ पती पुत्र वा जाया

टांगायाची नाती सगळी जो तो आपुले पाही


कधी कुणाचे शट् डाऊन , काही कळणे नाही

लळा जिव्हाळा शब्दच खोटे..


अमोल 📝

१३/५/२१

Tuesday, May 11, 2021

अरे संसार संसार


 https://youtu.be/xxvpmBi4zrQ


बहिणाबाई,  बघा आमच्यावर काय वेळ आलीय ही 🤦🏻‍♂️


अरे संसार संसार, घ्यावी लस दंडावर

फक्त OTP मिळते, होत नाही रजिस्टर


अरे संसार संसार, ना उमेद आता होऊ नये

गावोगावच्या पिन कोडला, नको कधी म्हणू नये


अरे संसार संसार , नाही कोशिल्ड

 कोवॅक्सिनं

येड्या, लसीकरणाला, म्हणू नको रे लोढनं


अरे संसार संसार, दोन डोसांचा विचार

आपला तो सेतू- अँप, कधी देईल होकार


( कायम वेटींगवर)  अमोल 📝

११/०५/२१

Sunday, May 2, 2021

हसा, हसताय ना ?


 जागतिक हास्य दिन ( २ मे)


सर्वप्रथम सोशल मिडियावरील 

😝🤣🤪😅😂🤩😜😛😀😃😄


या सगळ्यांचे अनेक आभार की आम्ही हसलोय, हसतोय, हे आँन लाईन सांगण्यासाठी आम्हाला हे खूप मदत करतात.


सध्या एखादी प्रासंगिक घटना घडली, किंवा त्याची चाहूल जरी लागली तरी त्याचे मिम्स बनवून , सोशल मिडीयावर तात्काळ पाठवणा-या आणि त्याचा तात्काळ प्रसार करणाऱ्या सर्व ढकलजीवींचे ही यानिमित्याने आभार 😊


फक्त अडचण अशी की मी एका अमूक पक्षाचा तर मी फक्त तमुक पक्षांवरच हसणार अस कितीही केलंत तरी एखादा विनोद वाचल्यावर खुदकन मनात हसू येत असेल तर तुम्ही अजूनही 'काॅमन मॅन ' आहात 


लाजून हासणे अन हासुन हे पहाणे

मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे 😉 


सोशल मिडीया हा आत्ताचा हो. आम्ही शाळेत असताना आम्हीच सोशल. मित्र- मंडळीभेटल्यावर 'माझी टवाळखोरी '( ही माझ्या पुस्तकाची जहिरात आहे,  जाता जाता करु म्हणलं ☺️) जरा जास्तच रंगायची. अर्थात प्रत्येकाने हे सोनेरी दिवस अनुभवले असणार. आजही अगदी रोज नाही पण अधून मधून मित्र मंडळ भेटले 😝 , हास्य- गप्पा झाल्या की  जी उर्जा मिळते त्याला तोड नाही.

मध्यंतरी काही टीव्ही वरील लाफ्टर शो   ने मजा आणलेली.  जसे अगदी पहिल्यांदा शेखर सुमनचा ' मुव्हर्स अँन्ड शेखर',  नंतर रंगलेली ' लाफ्टर चँलेंज स्पर्धा ' मग मराठी वाहिनीवरच्या हवा येऊ द्या सारख्या मालिकांनी मजा आणली.  

मात्र लक्ष्या- अशोक मामा - विजय चव्हाण या मंडळींनी सिनेमा/ नाटकातून आमच्या पिढीला अगदी मनमुराद हसवले. 

अगदी  आमचा "मोग्यांबो खूष" व्हायचा 😬 हे शिनेमे पाहून


(पाचकळ/ पांचटपणा वगैरे  वाटणारे बहुतेक..  राहू  दे.. त्यांच ज्ञान त्यांच्यापाशी)


मात्र आमच्या तरुणपणीचे राजकारणी मात्र आजच्या राजकारण्यांपेक्षा जरा कमीच पडले 😷 हास्य विनोदी स्टेटमेंट मारण्यात


दिसलीस तू, फुलले ऋतू

उजळीत आशा, हसलीस तू 


या भानगडीत काही आम्ही पडलो नाही आणि बळेबळे असं काही म्हणावे लागलं नाही 😍


आठवणीतील अनेक गाण्यात ही हास्य डोकावलेले आढळते. काही उदाहरणे


मूक जिथे स्वरगीत होतसे

हास्य मधुर तव तिथे स्फुरतसे

जीवन नाचत गात येतसे

स्मित - चाळ त्यास बांधून पहा


सखी शेजारणी  तू हसत रहा


( टिप: वरील गाणे आपापल्या जबाबदारी वर गाणे 🤠)


एका गोष्टीत सगळेजण माझ्याशी सहमत होतील ते म्हणजे लहान मुलांचे निरागस हास्य


असेच एक मुलांसाठी चे गाणे:-


प्रकाशातले तारे तुम्ही, अंधारावर रुसा

हसा मुलांनो हसा


तुम्हा बोलवी ती फुलराणी

खेळ खेळती वारा पाणी

आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा


रडणे  हा ना धर्म आपुला

हसण्यासाठी जन्म घेतला

भारतभूच्या आदर्शाचा मनी उमटू दे ठसा


तेंव्हा मंडळी तुम्ही ही लक्षात ठेवा


हसते हसते कट जाते रस्ते, जिंदगी यूँ ही चलती रहे

खुशी मिले या गम, बदलेंगे ना हम

दुनिया चाहे बदलती रहे


हसताय ना ? हसायलाच पाहिजे 😁


( खास आमच्या मित्रांसाठी🤫

भरपूर वेळ बसा, भरपूर हसा

भले होऊ दे,  मोकळा खिसा )


अमोल केळकर 📝

०२/०५/२१

#जागतीक_हास्य_दिन

Wednesday, April 28, 2021

नाच रे येड्या नाच


 https://youtu.be/Zz_UK0pfvWQ


जागतिक नृत्य दिनाच्या निमित्ताने ( २९ एप्रिल, ) आपापल्या नेत्यांच्या हुकमावर ठुमका धरणाऱ्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना समर्पित 😎


नाच रे येड्या नेत्याच्या बोलण्यावर

नाच रे येड्या नाच 🕺🏻


नेत्याचा आदेश सुटला रे

ट्विटर वर मेसेज दिसला रे

आता तुझी पाळी

दे एक टाळी

उघड पिटारा नाच 


नाच रे येड्या नेत्याच्या बोलण्यावर

नाच रे येड्या नाच..


भरभर बातमी कळली रे

त्याचीच इमोजी बनली रे 🤓

मिडियात जाऊ

काहीतरी गाऊ

करुन  सेटींग नाच


नाच रे येड्या नेत्याच्या बोलण्यावर

नाच रे येड्या नाच..


एक एक लाइक मिळती रे 👍

पटपट कमेंट जमती रे 🗣️

बातमीच्या ओघात भाव खाऊ पक्षात

अरे सोंगड्या नाच 🥳


नाच रे येड्या नेत्याच्या बोलण्यावर

नाच रे येड्या नाच..


ब्रेकींग न्यूज ही लागली रे

तुझी माझी भक्ती  जमली रे

स्वप्नरंजन छान छान

सत्तेसाठी कमान

कमाईसाठी तू नाच


नाच रे येड्या नेत्याच्या बोलण्यावर

नाच रे येड्या नाच..


📝 अमोल

जागतीक नृत्य दिन

२९/४/२१

Tuesday, April 27, 2021

भावपूर्ण श्रध्दांजली


 भावपूर्ण श्रध्दांजली


आज  थोडा वेगळा विषय,  मांडतोय. हे लिहायचे खूप दिवसापासून मनात होते.


 श्रध्दांजली, भावपूर्ण श्रध्दांजली, RIP,  आत्म्यास शांती लाभू दे  इ वाक्ये सध्या सोशल मिडियावर म्हणजेच व्हाटसप ग्रुप असेल फेसबुक असेल इथे वारंवार वाचायला मिळत आहेत, लिहावी लागत आहेत. परिस्थितीच तशी झाली आहे आणि वारंवार या शब्दांचा वापर करायला लागणे ही सर्वांसाठी दुख:दायक गोष्ट आहे यात शंका नाही.


पण आजकाल ब-याचदा ही गोष्ट केवळ एक उपचार म्हणून आपण करतो का असे वाटण्यासारखी स्थिती बघायला मिळतीय. 


पूर्वी जेंव्हा  अगदी लांबची/ नातेवाईक नसलेली पण ओळख असलेली, दुरच्या कुणा नातेवाईकांकडची परिचित, एखाद्या समारंभापुरती भेटलेली व्यक्ती ही जेंव्हा काही कारणाने अनंताच्या प्रवासास निघून गेल्याचे कळायचे  तेंव्हा वाईट तर वाटायचेच पण एक अस्वस्थता मनात रहायची,  कामात लक्ष लागायचे नाही. रक्ताचे नाते असायचे आपले असे नाही, पण आपल्यात माणुसकी असायची


अर्थात भा.रा तांबे नी लिहून ठेवलय


" जन पळ भर म्हणतील हाय,  हाय "

अर्थ वेगळा सांगायची गरज नाही, सर्वांना माहितच आहे


आज सोशल आपण जास्त झालोय आणि  त्यांचे हे वाक्य आज शब्दश: लागू पडतय. जन "पळ "भरच. म्हणजे अक्षरशः काही सेकंद/ मिनिटे शोक व्यक्त करुन पुढे जात आहेत


त्या शोक व्यक्त करण्यात/ श्रध्दांजली वाहण्यात उपचार / फाॅर्मेलिटी झालीय का?

एखादी प्रसिद्ध व्यक्ती गेली, असे कळले की भराभर आपण तो मेसेज फाॅर्वर्ड करतो. बातमी म्हणून मेसेज फाॅर्वर्ड करणे ठिक पण ' श्रध्दांजली लिहिलेले पण फाँर्वर्ड? हे वाक्य ही आपण लिहू शकत नाही?  काय अर्थ आहे त्या 'भाव' पूर्ण ला?

बर अगदी ठिक आहे बातमी म्हणून ते ही वाक्य फाॅर्वर्ड केले. निदान नंतर ती व्यक्ती / कलाकार / परिचीत यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त एखाद्या शब्दात?  ते ही नाही.

असं काही नाही की सगळ्यांना लिहिता येईल. पण जेंव्हा एखाद्या घडलेल्या घटनेने/ व्यक्तीच्या जाण्याने जेंव्हा वाईट वाटते तेंव्हा जी मनाची चलबिचल अवस्था व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही कारण अगदी लगेचच पुढच्या क्षणी आपण अगदी सहज पणे राजकीय मेसेज,  विनोद, शुभेच्छा देण्यात मग्न होतो.


अगदी क्षणभर समजू एका समुहात आपण त्या समुहासंबंधीत कुणाचे निधन झाले म्हणून श्रध्दांजली देतो, दुस-या समुहात जिथे या गोष्टीचा संबंध नाही तिथे हास्य विनोदात रमतो.  एवढी लवचिक मानसिक अवस्था झालीय आपली?  एवढ्या भावना बोथट झाल्यात की एकीकडे दु:ख एकीकडे आनंद,  हास्य विनोद करावा?

सह - वेदना, संवेदना कुठे गेल्यात? 


काही कारणाने जेंव्हा सरकार राष्ट्रीय दुखवटा वगैरे जाहीर करते तेंव्हा करमणूकीचे कार्यक्रम सरकारी वाहिन्या/ आकाशवाणी इ माध्यमावर दाखवत नाहीत.  पण  आम्ही ? त्याप्रमाणे वागतो का?  हा तर मोठा विषय आहे तुर्त इतकेच


लिहिलेले पटले तर एकदा नक्की विचार करुन आवश्यक तो बदल करता येतोय का ते पाहू या


ॐ शांती , शांती 🙏🙏


अमोल केळकर

Friday, April 16, 2021

ह्या नाकाला सुगंध मास्कचा


 https://youtu.be/Olefwur1ots


परिस्थितीच अशी की या मालिकेचे गीत आत्ता असं ऐकलं


कोरोना आला उन्हात संगतीला

लाॅक करुनी ठेवले गावाला

टुकार काव्य हे येई वाट्याला

नवा मास्क घे जुन्या दराला


खाजवू तरी स्पर्श हा नाकाला

लाभेल का


ह्या नाकाला सुगंध मास्कचा

ह्या नाकाला सुगंध मास्कचा

ह्या नाकाला सुगंध मास्कचा

ह्या नाकाला सुगंध मास्कचा


(मराठी मालिका आवडीने पाहणारा)😷📝

१६/०४/२१

www.poetrymazi.blogspot.com

Wednesday, April 14, 2021

कोण जाणे कोण हे जवळून गेले


 आज कविवर्य श्री सुरेश भट यांचा जन्म दिवस !! विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻


"पुनश्च लाँकडाऊन"  चा आज पहिला दिवस आणि योगायोगाने आज आमचा WFH 


तर सुरेश भटांची  एक गझल आजच्या परिस्थितीत थोडीशी बदलून अशी:-

//


कोण जाणे कोण हे जवळून गेले?

विषाणू अंगात घुसवून गेले


शिंकला होता जरी तो काळ तेंव्हा 🤧

दान जे पडले, मला उधळून गेले


भेटण्यासाठी कुणी आलेच नाही...

लोक आलेले मला टाळूनच गेले!


हे खरे की, मी जरा चुकलोच तेव्हा,

लोकही वाटेल ते बरळून गेले!


लागली चाहूल एकांत राहण्याची?

कोण माझ्या लोचनी तरळून गेले?


काय माझ्या 'रिपोर्टचे' अर्थ होते?

शब्द +ve भाबडे घाबरुन गेले!


या अशावेळी  कुणाला हाक मारु?

ओळखीचे चेहरे वितळून गेले!


अनेक कैदी इथे कैदेत आहे?

रंग भिंतींचे कसे उखडून गेले!


कावरा बावरा जरी झालो,तरीही

काव्य सुचले जे मला समजून गेले!


//


( भटांचा चाहता)  अमोल 📝

१५/४/२१

Saturday, April 10, 2021

लसीकरण म्हणजे लसीकरण असतं


 'टिका महोत्सवा' निमित्य पाडगावकरी लस 💉


लसीकरण म्हणजे लसीकरण असतं

तुमचं आमचं कदाचित सेम नसतं


४५ वर्षे सरली की

दंडात लसी टोचू लागतात 

दुस-या हाताने सेल्फीचे

फोटू निघू लागतात 😝

आठवत ना?

तुमची आमची वेळ जेंव्हा

आली होती

हाँस्पीटल सगळी रुग्णाने भरली होती

दंडावर टोचून घेऊन

बेभान झालो होतो

कोरोनात बुडता बुडता

वाचलो होतो


बुडलो असतो तर अजिबात चाललं नसतं

कारण कुणीच मग वर काढलं नसतं


तुम्हाला ते कळलं होतं

मलासुद्धा कळलं होतं


म्हणूनच 

लसीकरण म्हणजे लसीकरण असतं

तुमचं आमचं कदाचित सेम नसतं


कोरोना वगैरे झुट असतं

म्हणणारे 'मान्यवर' भेटतात

कोरोना म्हणजे स्तोम नुसतं

मानणारे शिक्षक भेटतात


असाच एकजण चक्क मला म्हणाला,

आम्ही कधी आजपर्यंत

क्वारंटाईन झालो नाही

लाॅकडाऊन लागले तरी

'मास्क' अजिबात घातला नाही 😷


आमचं काही नडलं का?

कोरोना शिवाय अडलं का?


त्याला वाटलं मला पटलं

तेंव्हा मी इतकचं म्हणलं

'यम' म्हणजे यम म्हणजे 'यम' असतो

नि'यमाने' यायचा त्याचा शिरस्ता नसतो


भर दुपारी उन्हात कधी

'बेडसाठी' तासनतास् फिरला असाल

अँब्यूलन्सच्या आवाजाने जर

थरथरला असाल


' निगेटीव' असा शब्द वाचणे बास असतं

तेंव्हा कुठे घट्ट मिठी मारायला मिळणे खास असतं

हेच तर

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमचं आमचं सगळ्यांच सेम असतं



////////////////////////////////////


सर्वांना लवकरात लवकर लस मिळू दे ही इच्छा 🙏


अमोल 📝

१०/४/२१

Wednesday, April 7, 2021

लसीत' टूच्चता मोठी


 https://youtu.be/CKHuPscOLo4


पंडीत कुमार गंधर्व यांचा आज जन्मदिन ( ८/४ ). या शुभमुहूर्तावर आज आम्ही 'टोचून' घ्यायला गेलो. १५ वा नंबर. मग काय इतरांना टोचू म्हणलं  तोपर्यंत 😷



ऋणानुबंधाच्या

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी

'लसीत' टूच्चता मोठी


लसीत' टूच्चता मोठी 💉


त्या 'फोरनून'  वेळा थरथरती कधी अधरी

त्या विलगी रहाण्याच्या आठवणी त्या प्रहरी

कितीदा झालो, गेलो ,वाचलो

घेण्यावाचुनी लसिकरणाच्या कधी न घडल्या गोष्टी 


लसीत' टूच्चता मोठी


लस तिने भरुनच घेणे

टोचल्यावर उगीचच हसणे

नंतर ते मनोमन बसणे

टोचणे- बसणे , बसणे-टोचणे

दंडावरी राहण्यासाठी जन्मजन्मीच्या गाठी


लसीत' टूच्चता मोठी


कधी घरात दु:खाने बसलो

दु:खात सुखाला हसलो

कधी गहिवरलो कधी धुसफुसलो

लाँकडाऊनच्या आठवणीनी हृदयात मारल्या रेघा

जन्मासाठी जन्म जन्मलो, करोना शी करु या कट्टी


लसीत' टूच्चता मोठी

//


💉 💪🏻

इथे विसावली लस -  पुर्वार्ध  ✌🏻


( लसीभूत ) ☺️ अमोल

०८/०४/२१

Saturday, April 3, 2021

गायत्री हवन


 'सर्व व्याधी निवारणार्थाय "गायत्री हवन " करिष्ये 🙏🌷🔥

@खारघर



आज रविवारी कृष्ण अष्टमीला ( ४/४ )  सकाळी ७:३० ला मेष लग्न उदीत असताना , भाग्य स्थानात म्हणजेच धनू राशीत, पूर्वा.षाढा नक्षत्री चंद्र असताना  खारघरला महालक्ष्मी मंदिरात " गायत्री हवन " संपन्न झाले. छान अनुभव

Thursday, April 1, 2021

रंगपंचमी


 आठवणीतील गाण्यांसह रंगपंचमीचे इंद्रधनुष्य 🌈


🔥

शतकाच्या यज्ञांतुन, उठली एक *केशरी* ज्वाला

दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला.


🔴  

ही *गुलाबी* हवा, वेड लावी जीवा

हाय श्वासातही, ऐकू ये मारवा


का कुणी रंग हे उधळले अंबरी

भान हरपून मी कावरीबावरी

का कळेना तरी बोलतो पारवा

ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा..


🟡

अजून तुझे हळदीचे, अंग अंग *पिवळे* ग

अजून तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे ग

मेंदीच्या पानावर, मन अजून झुलते ग


*काळ्या* मातीत मातीत, तिफण चालते

वीज थयथय नाचते, ढग ढोल वाजवितो


💜

गडद *जांभळ*

भरलं आभाळ

मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ

खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ


❇️

*हिरवा* निसर्ग हा भवतीने

जीवन सफर करा मस्तीने

मन सरगम छेडा रे

जीवनाचे गीत गा रे

गीत गा रे,  धुंद व्हा रे


🟧

अजून थांब, लागली जगास झोप आंधळी

दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी

तुलामला विचारुनी फुटेल आज *तांबडे*

उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे


💙

पंढरपूरीचा *निळा*

लावण्याचा पुतळा!

विठा देखियेला डोळां, बाईये वो !!


🤍

आनंदून रंगून विसरुन देहभान

मोहरली सारी काया,हरपली मोहमाया

कुडी चिडून पाजळून, प्राणज्योती मेळवून

एक होऊ या, हा हा !


लखलख *चंदेरी* तेजाची, न्यारी दुनिया 🌈🌈

========================


नमस्कार मंडळी,


काल तुमच्याकडे अनेक फुले ( हसरी 🌼 ) जमा झाली असतील. ही सगळी  फुलं एकत्र करा,  मनाच्या कोप-यात एक खड्डा खणून त्यात ते निर्माल्य खत म्हणून घाला,   त्यात तुम्हाला आवडत्या  *रंगाच्या* फुलाचे बी पेरा

 ( 🌺🌸🌹🌷🌻) , त्यावर निरागसतेची माती घाला, आणी रोज दिवसभरात एकदा त्या कप्प्याला भेट द्या आणी बघा वर्षभरात ते झाडं आणि तुमचं मन तुमच्या अवडत्या *रंगात* कसं फुलत ते



 रंग-पंचमीच्या शुभेच्छा 🙏🏼


📝  अमोल

०२/०४/२१

#रंगूनी_रंगात_सा-या_रंग_माझा_वेगळा

Wednesday, March 31, 2021

रुतता शीप हे..


 https://youtu.be/QJKMTjVOddk


मागच्या आठवडाभर जी भयंकर जागतिक  वाहतूक कोंडी झाली आणि आमच्या मनाची जी 'कालवाकालव झाली, ती अशी

( मुळ गाणे: गुंतता ह्दय हे .. लिंक मधे) 


रुतता शीप हे, सुएझ कालव्याच्या पाशी 

हा जलयमार्ग अडखळे,त्या जहाजाशी

रुतता शीप हे..... 🚢


या इथे साचला ढीग टन कच-याचा

प्राक्तनी आपुल्या योग इंधन वाढीचा

कंटेनर आमुचे सडले या वाटेशी


रुतता शीप हे..... 🚢


डाॅलर आपण दुरावलो या वेळी

शिपमेंट न पोचता, विसरा ऋण तेही

'कष्ट - मर ' करी इमेल, आँर्डर कँन्सलशी


हा जलयमार्ग अडखळे,त्या जहाजाशी


रुतता शीप हे..... 🚢


( एक्स्पर्ट/ एक्सपोर्ट मॅनेंजर)  अमोल 🤪

३१/०३/२१

Monday, March 29, 2021

मोटा भाईंना भेटायच भेटायच


 https://youtu.be/XT8exj2BEw4


*धुडवड संपता संपता सामान्यांच्या डोळ्यात उडालेली 'धुळ*' 😑


ही वेडेवाकुडे शब्द माझे मान्य करूनि शेठजी  घेतील काय

आणि *गुरु दक्षिणा* म्हणुनी *कमळ* मस्तकी धरतील काय 🌷



हे तुझे भजन कसे करावे अरे ठाऊक मजला नाही

आणि तुझे भजन तूच करून घे अरे *'कळी'* वान मी नाही 🌷

कोणी माना कोणी मानू नका यात अमुचे काय

आणि *राजकारणात* सर्व लेकुरे एक पिता एक माय


//          //



मोटा भाईंना भेटायचं  भेटायचं अन भेटायचं

आता लगेच काय?

लगेच लगेच


मोटा भाईंना भेटायचं  भेटायचं अन भेटायचं

आम्ही येणार

अरे पित्त पोटात माझ्या

कुठे दिल्ली ला?

अरे पित्त पोटात माझ्या

अहमदाबाद राहिलयं , हा तिकडच जाऊ या


अरे पित्त पोटात माझ्या मायेना, मायेना


मोटा भाईंना भेटायचं  भेटायचं अन भेटायचं

अरे पित्त पोटात माझ्या मायेना,


गेलो अहमदापुरी थेट घेतली भाईंची भेट

या या सत्तेची भूक काही थांबेना, थांबेना

पित्त पोटात माझ्या मायेना, मायेना


पद सावरु सुंदर गृहमंत्री मनो हर

नजरेस आणि काही येईना, येईना


पित्त पोटात माझ्या मायेना, मायेना



कावेबाज अधिकारी शे शे कोटीतच दंग

पहाटेच्या शपथविधीची  हौस पुरी होईना होईना 🌷⏰

पित्त पोटात माझ्या मायेना, मायेना


मोटा भाईंना भेटायचं  भेटायचं अन भेटायचं

अरे पित्त पोटात माझ्या मायेना,


📝 अमोल केळकर

२९/०३/२१

नुसती धुळवड

Sunday, March 28, 2021

आज 'भांग' आणाया दोस्त


 https://youtu.be/aEM1xZZ_WB0


धुळवड- स्पेशल 🧉


आज 'भांग' आणाया दोस्त

पिटाळतोय जरी

तरी अजून बाळगायला, हवी सावधगिरी ....


अवचित असा कुठूनसा

सुगावा लागतो

आल्या आल्या संयम तुमची

परिक्षा ठेवतो

साठवून ठेवलेला चकणा काढतो

लाइव्ह गोष्ट नको, आता फेसबुकवरी

तरी अजून बाळगायला, हवी सावधगिरी.🥂


धुळवडीला सांग आज काय जाहले

'भांग' घेतल्याविना कुणा न सोडले

ज्यास त्यास व्हाटसपवर निरोप गेले

एकटाच घेतलीस काय तू जरी

तरी अजून बाळगायला, हवी सावधगिरी.🥂


 त्या तिथे अनंतनगरी खेळ रंगला

लाॅकडाऊनच्या भितीने स्टाॅक आणला

तो पहा

तो पहा जो तो तिथे रांगेत थांबला

हाय वाजली फिरून तीच 'थाळ'री


तरी अजून बाळगायला, हवी सावधगिरी.🥂


📝 अमोल केळकर 🔥

बेलापूर

Friday, March 26, 2021

खेळताना रंग बाई होळीचा


 https://youtu.be/piSYNyOs4Mw


#होळी_स्पेशल_विडंबन 🔫

-------------------------------------------

खेळताना रंग बाई होळीचा, होळीचा

वाटण्या करा लवकर, 'शे -कोटीच्या'


घेतली खंडणी जरी

स्काँर्पिओ घराबाहेरी

लागली नजर सारी

पकडल्या सा-या कारी 🚗

घात झाला हा अशानं  टोळीचा,टोळीचा


वाटण्या करा लवकर, 'शे -कोटीच्या


जरा गाडीत आयुध ठेवलं आणि काळीज धडधडलं

काय सांगु मी पुढलं ,क्षणातच सारं घडलं

दर आला बाहीर  'लुटीचा', 'लुटीचा'


वाटण्या करा लवकर, 'शे -कोटीच्या


मला काहि समजंना, मला काही उमजंना

त्याला कस कळलं, कुणाला तो ऐकंना

डेटा ठेवला त्याने सहा जीबीचा, जीबीचा 


वाटण्या करा लवकर, 'शे -कोटीच्या



खेळताना रंग बाई होळीचा, होळीचा

वाटण्या करा लवकर, 'शे -कोटीच्या


🔥💶🔥💷🔥💰🔥💸🔥💵



📝अमोल केळकर ©️


#poetrymazi.blogspot.com

#होळी_स्पेशल

Wednesday, March 24, 2021

माझे माहेर मुंबई


संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेत (दिल्लीत ) काल मैथीली या गायिकेला पत्रकारांनी गाणे म्हण असे सांगितल्यावर तिने

 ' माझे माहेर पंढरी ' हे गाणे म्हणले, ते मला तरी असे ऐकू आले


माझे माहेर मुंबई

आहे समुद्राच्या तीरीं


बाप आणि आई

माझी 'मातोश्री' रखुमाई 

माझी 'मातोश्री' रखुमाई .।


माझे माहेर मुंबई

आहे समुद्राच्या तीरीं....


'सिल्व्हर ओक' आहे बंधू

त्याची 'ख्याती' काय सांगू ?

त्याची खाती काय सांगू...s s s


माझे माहेर मुंबई...


माझी बहिण 'मँडंमा'

करवितसे आम्हा जुम्मा

करवितसे आम्हा जुम्मा s s s


माझे माहेर मुंबई..


एका 'दणक्या'निशी शरण 🌷

झाली चुकीची आठवण

झाली चुकीची आठवण...🎼


माझे माहेर मुंबई

आहे समुद्राच्या तीरीं.....


📝अमोल

२५/०३/२१

मन - कर्णीका


 मनकर्णीकेतील कंगनाला पुरस्कार - भक्त खुश

छिछोरे - संपुर्ण सिनेमास राष्ट्रीय पुरस्कार - चमचे खुश 


#मास्टर_स्ट्रोक 😜


मन-कर्णिका सेटिंगने

मिळवून घे ई , पुरस्कारा

छिछोरीपणा, संवादे, ट्विटट्विट करताना 

मन-कर्णिका सेटिंगने

मिळवून घे ई , पुरस्कारा


कमळीच्या पाठिंब्याने सहज साध्य ते करे कुणी

कमळीच्या पाठिंब्याने सहज साध्य ते करे कुणी 🌹

परंप्रकाशी तू तारा, चिवचिवाट सारा

भर पक्षातून स्वप्न उद्याचे

झेप घे ग कर्णीका


मिळवून घे ई , पुरस्कारा


मन-कर्णिका

मन-कर्णिका

मन-कर्णिका


नी नी नी सासासा नी नी नी सासासा

नीनी सासा रेरेसासा नी धप

🎼🎼

ममप ममप ममप ममप मपनीधप मगरेमगरेसानीसा 🎼

नी़नी़सारेरे मपनीधप

नी़नी़सारेरे सा 🎼

🐴🐴


📝 अमोल

२४/०३/२०२१

Tuesday, March 23, 2021

डिवसू नको


 " ताई - भाई यांची वादावादी वाचली आणि हे गाणं सुचलं,  मुळ गाणे लिंक मधे " 


( * मनोरंजन हा हेतू)


डिवसू नको, भावड्या मला

मी माझ्या बँकेला, जीव वाहिला

भावा


किती खाती झाली, बँक अँक्सीस ती

परत नव्याने माझी ख्याती झाली

तेच टार्गेट झाले, घेऊनी, धावले

चूप भाई बसा 🤫

आता sss


डिवसू नको, भावड्या मला


कुणी नाही भोळा, सरळ मार्गी मी

तुझा 'हात' काळा, बँकेची सेविका मी

युगायुगांचे नाते ,आमुचे, बढती

मिळे रे मला

भाssवा

डिवसू नको, भावड्या मला


📝 अमोल *

२३/०३/२१

Sunday, March 21, 2021

मृदुल करांनी


 https://youtu.be/47W1fhqJa2U


मृदुल करांनी वसुली करा

मरतो हिरेन कमजोर तारा


पोलिस दलातुनी दिसल्या अंतरी

काम मन- सुख पाहता श्री हरी

हर्षभराने शत-कोटीवर पडती अमृतधारा

मृदुल करांनी वसुली करा


विकासाच्या तीघाड्या जरी

हृदयी दिसे नोट हसरी

उन्मादाच्या धुंदवनी तीरी, टार्गेट लक्ष करा

मृदुल करांनी वसुली करा


सालस भोळी, थोर मनाची

खाकी वर्दी पक्ष चरणाशी

दिसल्या नयनी मर्सिडीज अन स्काँर्पिओ सह स्कोडा


मृदुल करांनी वसुली करा

मरतो हिरेन कमजोर तारा


📝 अमोल

२२/०३/२१

Saturday, March 20, 2021

ग्रंथयात्रा भाग २२ - झेंडूची फुले




 कवितेमधल्या शा‍ब्दिक दोषांचे, कवितेसाठी निवडलेल्या विषयांचे आणि काव्यात प्रकट झालेल्या कवींच्या स्वभावांचे केशवकुमार उर्फ प्र के अत्रे यांनी आपल्या झेंडूची फुले या काव्यसंग्रहातील कवितातून विडंबन केले. आणि त्या ओघात काही स्वयंस्फूर्त विनोदी कविताही लिहिल्या. 

केशव कुमारांच्या या नर्म विनोदी कविता ऐकूया या व्हिडिओमध्ये. विडंबन या काव्य प्रकाराविषयी अधिक माहिती ऐकूया डॉ नीलिमा गुंडी यांच्याकडून.

आंतराष्ट्रीय ज्योतिष दिन


 आंतराष्ट्रीय ज्योतिष दिवस ( २० मार्च) 


१२ ग्रह, १२ राशी आणि पत्रिकेतील १२ स्थाने यांच्यातील विविध संयोगा


ने, अनेक प्रकारच्या वारंवारीता, पर्म्यूटेशन -काॅम्बीनेशन चे रसायन = व्यक्तीचे प्रारब्ध


व्यक्ती तितक्या प्रकृती किंवा व्यक्ती तितकी रसायने ( पत्रिका). प्रत्येक रसायन युनिक म्हणूनच प्रत्येकाचं भाग्य/ प्रारब्ध वेगवेगळे. म्हणूनच की काय जुळ्या, तिळ्यांची वरवर दिसणारी पत्रिका जरी सारखी असली तरी अंतरंगात वेगळे रसायन त्यांचे असते.


दैवयोगाने , मला या  "भविष्याच्या अंतरंगात"  डोकावण्याची संधी प्राप्त झाली/ आवड निर्माण झाली हे माझे भाग्य. हे रसायन जमून येण्यासाठी काही व्यक्ती कँटेलिस्ट म्हणून आयुष्यात आल्या. यात प्रमुख उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे माझे गुरुजी ठाण्याचे श्री वरदविनायक खांबेटे,  ज्यांच्या अनुदिनीमुळे ( धोंडोपंत उवाच ) या विषयाची गोडी लागली ते  दादरचे  श्री धोंडोपंत आपटे, आणि वेळोवेळी मी ज्यांच्याकडून हक्काने मार्गदर्शन घेतले ते  संभाजीनगरचे श्री दिपक पिंपळे. . तसेच माझी आत्ये बहिण आणि तिचे यजमान बोरिवलीचे श्री विनायक आणि सुनिता दामले  यांनी एकेदिवशी त्यांच्याकडची अनेक ज्योतिष पुस्तके मी अभ्यास करतो म्हणून आणून दिली. आजच्या ज्योतिष दिनानिमित्य या सर्वांचा मी ऋणी आहे🙏🙏


आजपर्यत अनेकांना यानिमित्ताने मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली, अनेकांशी यानिमित्ताने ऋणानुबंध जुळले. हक्काने अनेकांनी अडचणी सांगितल्या, त्यांना शक्य होईल तसे मार्गदर्शन केले. भकिते बरोबर आली तशी चुकलीही. झालेल्या चुकीतून शिकण्याचा प्रयत्न केला, काही जणांनी  परिक्षा घेण्याहेतू प्रश्ण विचारले,  काहीजणांनी निव्वळ टिंगलटवाळी केली तर काहींनी अगदी मनापासून कसे फोकस व्हावे, डेटा अँनॅलिसिस,  आणि मनाची पवित्रता राहण्यासाठी ( जी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे) काय करणे आवश्यक आहे याचा प्रँक्टिकल अँप्रोच दाखवला  ☺️

या सर्वांचे अगदी मनापासून आभार. 


"भविष्याच्या अंतरंगात" पत्रिकेच्या माध्यमातून डोकावण्याचा हा प्रवास अखंडीत चालू राहिल हे मात्र नक्की

 

मंडळी, वयाच्या जवळजवळ ३० वर्षापर्यंत माझा पत्रिका/ ज्योतिष याच्याशी संबंध आला नाही. लहानपणी कधीतरी आई-बाबांनी पत्रिका काढलेली होती. पण समजा त्यावेळी कुणा गुरुजींनी तू या विषयाचा अभ्यास करशील किंवा लेखन वगैरे करशील असे सांगितले असते  तर मी  यावर अजिबात विश्वास ठेवला नसता हे ही तितकेच खरे


  मराठी गझलकार  भाऊसाहेब पाटणकरांच्या या ओळी मला पटतात. या  ओळींनीच हा लेख आवरता घेतो. धन्यवाद 🙏🏻


क्षणाक्षणाचे पडती फासे 🎲

जीव पहा हे रमलेले 

पुर्वजन्मीचे संचित त्यांच्या 📝

भाळावरती सजलेले 


जीवनातल्या या खेळात ♟

कुणी असते जिंकलेले 🏆

सगळं असत ठरलेले,

सगळं असतं ठरलेले 🎯


(ज्योतिषी अभ्यासक)अमोल केळकर

a.kelkar9@gmail.com


#आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिन 📝

२०/०३/२१

Related Posts Plugin for WordPress, Blogger...