नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Friday, April 29, 2022

गुणमिलन ( अलक )



" ऐ , तुझ्या ज्योतिषावर त्या मंगळ, शनी वर माझा अजिबात विश्वास नाही.मीच काय माझ्या कुटुंबातील एकाची ही पत्रिका मी काढणार नाही".

         

गोखल्यांच्या  मुलाच्या पत्रिकेबरोबर गुणमिलनासाठी,  त्याला आलेल्या स्थळाच्या मुलीच्या पत्रिकेतील वडिलांचे नाव वाचताना,


गुरुजींना काही वर्षांपूर्वीचे याच मित्राचे बोल आठवत होते....


अमोल 📝

poetrymazi.blogspot.com

२९/०४/२२

Friday, April 22, 2022

मुंबई दे धमाल


 https://youtu.be/fZ_2z71XD_g


आज हेच गाणं आठवतयं सकाळ पासून


हे हे कशासाठी पोटासाठी

इलेक्शनच्या तयारीसाठी

आटा पिटा कशासाठी 

महापालिका घेण्यासाठी 


अरे,  बजरंगाची कमाल


मुंबईत  दे धमाल

मुंबईत  दे धमाल


लाईनीवर आली इंजिन गाडी🚂

अरे, लाईनीवर आली इंजिन गाडी🚂

भोंग्याची वाट लावा,म्हणा बजरंग बली

अरे, चला चला पटा पटा झेंडे सारे उचला 🚩

डोईवर 'सामन्याचा' हुकुम बरसला

तैयार दंग्याला, करा हुकुम मिडियाला


 हाणा उडी मारा धक्का

निर्धार आमचा आहे पक्का


लावा जोर सोडू नका

कामाचाच मिळे पैका


बोला,  बजरंगाची कमाल

मुंबईत, दे धमाल


अमोल 📝

poetrymazi.blogspot.com

२३/०४/२२

Tuesday, April 19, 2022

आठवणीतील भोंगे


 आठवणीतले भोंगे 📣


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वरुन अमुक वाजून तमुक मिनिटाला जाण्यासाठी   लोकल (  किंवा मेल/ एक्सप्रेस) तयार असते. इंडिकेटरने ती वेळ  दर्शवली  की गार्ड शिट्टी मारून मोटरमनला संकेत देतो  ( अंतर्गत प्रणाली द्वारे)  अन् क्षणात एक मोठा भोंगा देऊन गाडी सुटते ( भले ती गाडी मुक्कामाच्या ठिकाणी किती ही लेट पोहोचू दे निघण्याची वेळ मात्र अगदी परफेक्ट) 


लोकलचा हा भोंगाच. हाँर्न वगैरे उल्लेख करणे हे माझ्यामते कमीपणाचे ठरेल.  जत्रेत मिळणाऱ्या  भोंग्या पेक्षा आकाराने थोडा मोठा असणारा भोंगा लोकलच्या प्रथमदर्शनी भागात लावलेला दिसतो.


संध्याकाळी १७:५० ला असाच एक मोठ्ठा  भोंगा देऊन कोल्हापूर कडे निघालेली सह्याद्री एक्सप्रेस,पहाटे ४ च्या सुमारास शेरी नाला ओलांडला जाताना, त्याचवेळी वाजणा-या साखर-कारखान्याच्या भोंग्याशी स्पर्धा करत सांगलीत पोहोचते.

त्यानंतर साधारण १ तासाने म्हणजे ५ च्या सुमारास शांतीनिकेतन वसतीगृहात लाउडस्पीकर वरुन लागणाऱ्या भूपाळ्या/ अभंग/ आरत्या पहाटेच वातावरण भक्तिमय करुन जात असत.

माधवनगर काँटनमिलच्या वेगवेगळ्या कामाच्या वेळेतील भोंगे आणि सांगलीतील रात्री ( ८:३० वाजता)  नित्य वाजणारा भोंगा,  वेळेची जाणीव करुन ठरणारा असायचा.


याबरोबरीनेच दर महिन्याला रात्री एक जास्तीचा भोंगा सांगलीत वाजायचा, जो आजही वाजेल ९:४५ ला


म्हणजेच संकष्टीला ,चंद्रोदय झाल्यावर


असे  काही भोंगे जीवनाचा एक अगदी  सहज भाग बनून गेले होते,राहतील


#आठवणीतील_भोंगे 📝

अंगारकी संकष्टी

१९/०४/२२

Thursday, April 14, 2022

वाढिले रे अजुन दर किती


 श्री सुरेश भट यांचा आज जन्मदिन ( १५/४ ) 

"राहिले रे अजून श्वास किती" ही त्यांची रचना वेगळ्या शब्दांत 

( माफी तर त्यांची कायमस्वरूपी आहे)


"वाढिले रे अजून दर किती"

इंधना, ही तुझी मिजास किती?


आजची रात्र लोड-शेडींगची ⚡

कालचा कोळसा संपला किती?


मी कसे शब्द थोपवू माझे

दिसती विसं-गती आसपास किती?


हे कसे दिन ? ही काय आशा ?

पिळलेले एक लिंबू, जपावे किती? 🍋


सोबतीला जरी मीठ राया

मी घेऊ 'टकीला शाँट' किती 🍸


अमोल 📝

१५/४/२२

poetrymazi.blogspot.com

Monday, April 11, 2022

बुट पाॅलिश


 दोन वर्षाच्या खंडानंतर नुकताच मी परत एकदा 'लोकल' प्रवास सुरू केला.  ट्रान्स-हार्बर  ( ठाणे-वाशी-पनवेल)  हा माझा नियमीत प्रवास मार्ग .


 या मार्गावर काही गोष्टी अगदी अजूनही  आहे तशा आहेत, काहीही बदल नाही उदा. मुंबई क्षेत्रातील सगळ्यात घाणेरड्या लोकल्स, पनवेल लोकल्सची अनियमीतता, संध्याकाळच्या परतीच्या प्रवासात नेरूळहून बेलापूरला जाण्यासाठी आजही पनवेल लोकल मधे चढता न येणे, होणारा तेवढाच उशीर, नेहमीचीच गर्दी,  सर्वच स्टेशन्सची गेलेली रया इ.इ.


सुखावह वाटलेला एक बदल म्हणजे तिकीट रांगेसाठी न थांबता उपलब्ध मशीन वरुन, इच्छित मार्गाचा कोड scan करुन 'गुगल पे' करुन लगेच मिळणारे तिकीट, UTS अँप वरुन बुक करता येणारे पेपरविरहीत तिकीट तसेच सीझन पास आणि अद्यावत झालेले m- indicator अँप. हे अँप खरोखरच लोकल प्रवाशांसाठी वरदान आहे. अमुक स्टेशनवर येणाऱ्या गाड्यांचे रनिंग स्टेटस, चार ही लाईन्सच्या प्रवाशांसाठी चँटींग रुम, इतरही सार्वजनिक वाहतुकीचे ( मोनो,मेट्रो,रिक्षा,टॅक्सी,बस)  अपडेट्स अद्यावत आहेत


परत एकदा पूर्वीचे दिवस आलेत. प्रत्येक शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या काही विशेष गोष्टी असतात. मुंबई आणि परिसराचीही एक अशीच संस्कृती आहे. सेवा देणारे 'डबेवाले' जसे या संस्कृतीचा घटक आहेत तसाच आणखी एक घटक म्हणजे 'बुट-पाॅलिश' वाले


सेंट्रल, वेस्टर्न वर अगदी फलाटावर बसणारे किंवा ट्रान्स हार्बरवर स्टेशनच्या बाहेर असणारे हे सेवाकरी या सिस्टिमचा अविभाज्य घटक ठरलेत. 


ब-याचदा ग्राहक आणि हे पाॅलीश वाले यांच्यात शाब्दिक संवाद होतच नाही. आपण तिथे असलेल्या रांगेतून जायचे. आपला नंबर आला की उजवा/ डावा पाय तेथील उंचवट्यावर ठेवायचा. मग फक्त त्या बूट-पाॅलिशवाल्यांकडून हातातला पाॅलिशचा ब्रश आपटून ' टक/ठक' वाजले की पाय बदलायचा. हे असे दोन - तीन वेळा झाले की शेवटी एकत्रीत दोनदा ' टक/ठक'चा ध्वनी ऐकला की पैसे द्यायचे आणि चालू लागायचे.  तीन ते चार मिनिटाची ही प्रक्रिया. कुठल्याही शाब्दिक संवादात्मक शिवाय


बस!  असं मन ही वेळोवेळी पाँलीश करता यायला पाहिजे 🤗


ठहर ज़रा ओ जानेवाले

 बबु मिस्टर गोरे काले 

कब से बैठे आस लगाए

हम मतवाले पालिशवाले 


अमोल 📝

चैत्र. शु एकादशी

१२/०४/२२

Monday, April 4, 2022

रेकी



काल सांताक्रुझला शाळेची एक बस काही तासांसाठी हरवली. ती सापडल्यावर एक उल्लेख केला गेला की गाडी चालक नवीन होता आणि त्याने मार्गाची 'रेकी' केली नव्हती म्हणून तो गोंधळला आणि नियोजित ठिकाणांवर पोचायला बराच उशीर झाला


इतके दिवस केवळ गुन्हेगाराने / अतिरेक्यांनी अमुक तमुक ठिकाणांची , इतक्यांदा-तितक्यांदा 'रेकी' केली असे ऐकायला मिळायचे. त्यामुळे तुमच्या आमच्या सारख्या एका सामान्य वाहन चालकाबद्दल वापरलेला हा शब्दप्रयोग एक वेगळाच संदर्भ  देऊन गेला.


मग लक्षात आले की हा प्रकार नकळत ( म्हणजे याला रेकी बिकी असं काही म्हणतात हे माहिती नसताना) आपण अनेक वेळा आचरणात आणलाय. अगदी लहानपणी आपल्याला शाळेत घातल्यानंतर पालकांकडून त्या मार्गाची रेकी केली जाणे ( म्हणजेच घरापासून लागणारा वेळ, बसच्या वेळा,सायकल/ चालत जात असेल तर रहदारी,वस्ती, जवळचा मार्ग इ इ ) ते आपण नवीन ठिकाणी कामावर रूजू होण्यापूर्वी केलेली तिथली रेकी. अशी प्रत्येकाची विविध उदाहरणे असतील. मला आठवतयं लहानपणी नाटकात काम करताना नाटकाच्या तालमी इतरत्र कुठेही होत असल्या तरी मुळ प्रयोग जिथे व्हायचा तिथेच काही दिवस आधी 'फायनल रिहर्सल' व्हायची. एकप्रकारे ही सादर होणाऱ्या प्रयोगाची 'रेकीच' म्हणता येईल.


भारताचा परदेशात सामने खेळायला गेलेला संघ किंवा भारतात आलेले संघ ( क्रिकेट का इतरही? ) मुख्य मालिके आधी काही सराव सामने खेळायचा. हा ही एक 'रेकी' चा प्रकार असावा का?


दहावी/बारावी बोर्ड परीक्षा आधी आमचे हुsष्षार मित्र सराव पेपरांची 'रेकी' करायचे. या भानगडीत आम्ही मात्र फारसे पडलो नाही ☺️

रेकी ची ही मला आठवलेली काही उदाहरणे.


माझ्या मते या सगळ्याचा प्रमुख उद्देश प्रत्यक्ष तशी परिस्थिती येईल तेंव्हा आपल्याला त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा   विश्वास ( काँन्फीडन्स) यावा, फिल गूड वाटावे,  आणि सहजतेने अतिरिक्त ताण वगैरे न घेता परिस्थिती स्वीकारणे वगैरे वगैरे असावा


अशी प्रत्यक्ष जागेवरून जाऊन 'रेकी' करण्यात ज्यांची इतिहासाने नोंद करून ठेवली असे उदाहरण म्हणजे छत्रपतींचे विश्वासू 'बहिर्जी नाईक'

त्यांचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊ शकत नाही.


प्रत्यक्ष उपस्थिती ( physical ) बरोबरच आपल्या कडे  'मन' या अत्यंत उपयुक्त  आयुधाचा  रेकी करण्यासाठी कसा विविध प्रकारे ( Meditation, Dream,Motivation, visualization इ इ प्रकारे)  उपयोग होऊ शकतो याबद्दल विस्तृत माहिती अनेकांना आहेच. 

तुर्त इतकेच


अमोल 📝

विनायकी चतुर्थी ( अंकातील योग)

५/४/२२


( अवांतर : आपल्या समुहात लिहिलेले लेखन हे माझ्या 'लेखी' आपलं माझ्यासाठी 'रेकी' चाच प्रकार म्हणा ना !.. 😷)

Related Posts Plugin for WordPress, Blogger...