नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, May 29, 2019

नारद जयंती


नारायण नारायण 🙏🏻🌺

आज देवर्षी नारदमुनी यांचा वाढदिवस. आपल्या परम भक्ताच्या जन्म दिवसा प्रित्यर्थ  विष्णूलोकात आज जंगी कार्यमाचा बेत श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी ठरवला आहे.
वेगवेगळ्या लोकातील देव, ऋषीमुनी,  नवग्रह, गंधर्व,  अप्सरा यांना निमंत्रणे गेली आहेत. कमळाच्या 'कळीचे ' चित्र असलेला केक बनवला जात आहे..
  जे विष्णू लोकात *बाहेरुन* येत आहेत त्यांना 'विष्णू आय टी' सेल प्रमुख चित्रगुप्त " *विष्णू लोक्यं, परम सौख्यं*' या व्हाटस अप ग्रुपवर तातडीने सामील करुन घेत आहेत जेणेकरुन त्यांना कार्यक्रमा संबंधित सर्व अपडेटस देता येतील.

तिकडे कैलासावर मात्र वेगळीच गोष्ट घडलीय. ऐनवेळी महादेवांनी आपण येणार नाही आहोत तू मुलांना घेऊन जा असे 'पार्वती' ला सांगितले आहे. कारण विचारता महादेव सांगत आहेत, तिकडे " *केदारनाथला* माझा एक भक्त तपश्चर्येला कालपासून बसला आहे. मी असं त्याला सोडून वाढदिवसाला येणं बरोबर दिसणार नाही. तेंव्हा तुम्ही जावा आणि माझ्या शुभेच्छा नारदमुनींना द्या.

इकडे बाल गणेश आईला विचारतोय, माते वाढदिवसाला २१ मोदक असतील ना? यावर पार्वती माता गणेशाला रागावून सांगतीय, बास झाली हा तुझी नाटकं.  लक्ष्मी मावशी जे देईल ते गप्पगुमानं खायचं,  तिथे हट्ट चालणार नाही. नाहीतर मी फक्त कार्तिकेय ला घेऊन जाईन.  आणि काय रे तीन दिवसांनीतर संकष्टी आहे ना. यावेळेला थोडे जास्त मोदक करीन हा माझ्या सोन्याला.


बरं ऐक संकष्टी वरून आठवलं.  संकष्टीच्या दुस-यादिवशी हिंदुस्थानातील लोकशाही निवडणूकीची मतमोजणी आहे. एकाच मतदार संघातील उमेदवार तुझ्या दर्शनाला येतील. ते सगळे भक्त तुला अनोळखी आहेत म्हणून मुद्दाम सांगतेय, उगाच सगळ्यांना विजयी भव!  असा आशीर्वाद देऊन  जास्त 'माया', 'ममता' दाखवून त्रिशंकू परिस्थिती होऊ देऊ नकोस.


 बर आज संध्याकाळी  "इंद्र प्रस्थ कल्चरल फोरम " तर्फे काही अप्सरा खास कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमात 'ब्रह्मदेवांना' लाईफ टाईम अॅचिव्हमेंट अॅवार्ड देणार आहेत. तर कार्यक्रमाच्या सुरवातीला 'सूर निरागस हो' हे गाणं तू म्हणणार का? असं ' माता सरस्वतीने'  विचारले आहे. तीच या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पण करणार आहे.

मग काय सांगू ? हो म्हणून सांगू?

' हो '

अं?

हो हो, म्हणून सांग. मी तयार आहे

अहो.

काय हो, हो करताय ? कशाला तयार आहात?

उठा लवकर.  आज रविवार असला तरी. मेलं रविवार काय अन कुठला वार काय,  सकाळी उठून चालू लागायचं,  वार्तांकन काय एक्झिट पोल काय,  रिपोर्ट काय.

पण आज संध्याकाळी जरा लवकर या
*नारद फाॅंडेशनचा 'यशस्वी पत्रकार' पुरस्कार घ्यायला जायचंय आपल्याला. लक्षात राहू दे*.

हो हो. आहे लक्षात,  चल आवरतो
----------------------------
*२४ x ७ पत्रकारितेला वाहून घेतलेल्या आणि त्यासंबंधीत क्षेत्रात काम करणा-या तमाम बंधू/ भगिनींना*

तसेच
क्षणात फेसबुक,  व्हाटस अप वर ब्रेगिंग न्यूज पाठवणा-या

तसेच

आपल्याला विचारलं नसताना , त्या विषयाशी आपला संबंध नसताना, गरज नसताना, काहीही  प्रतिक्रिया देऊन मूळ विशष भलतीकडेच वळवणा-या सर्व
  व्हाटस अप ग्रुप मधील *सर्वच बुध्दीमान 'नारद' बंधूंना*
     🌷  *नारद जयंतीच्या* 🌷
               *शुभेच्छा*
                   🙏🏻

नारायण, नारायण 🙏🏻🌺
नमो 'केदार'नाथ 🙏🏻🌺
जय श्रीराम 🙏🏻🌺
मोरया 🙏🏻🌺

📝अमोल
१९/५/१९
poetrymazi.blogspot.in

दूर आर्त सांग कुणी छेडली 'आसावरी'




मंडळी नमस्कार. 🙏🏻

मध्यतंरी ' केदार ' रागावर लिहिलेले अनेकांनी आवडलं असं कळवलं आणि उत्साह वाढला.  याच लेखनमालेत  दुसरा लेख घेऊन येतोय.
यात आपण 'आसावरी '  रागातील काही गाणी पाहू. मागच्या वेळेला काही जणांनी  'फक्त मराठी गाणीच का? असा राग आळवला ( अर्थात ती त्यांची प्रेमाने केलेली तक्रार / सूचना होती )
त्यामुळे या भागात मराठी गाण्यांबरोबरच काही हिंदी गाण्यांचा ही समावेश केला आहे.

 अर्थात मागच्यावेळेप्रमाणेच इथे ही आपल्याला  रागा संबंधीच्या शास्त्रीय गोष्टीत जसे आरोह, अवरोह , वादी , संवादी , कोमल रिषभ , शुध्द् रिषभ  यात पडायचे नाही . आपण फक्त  काही हृदयस्पर्शी गाणी आठवायची आणि त्यानिमित्याने आपल्या हृदयाशीच गुणगुणायची .

बस ! हाच हेतू आहे या लेखन मालेचा

चला पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन सुरु करू

देव दिसे ठाई ठाई
भक्त लीन भक्तापाई
सुखालागी आला या हो
आनंदाचा पूर
अवघे गर्जे पंढरपूर , चालला नामाचा गजर

' गोरा  कुंभार ' नाटकातील अशोकजी परांजपे यांनी लिहिलेले हे गीत  या आसावरी रागातील. गायिका 'मंजुषा पाटील' यांनी गायलेली या गाण्याची एक छान ध्वनीफीत माझ्याकडे आहे. 'माऊलीच्या' असंख्य भक्तीगीता मधील हे एक माझे आवडते गाणे.

याचप्रमाणे  राम फाटक यांनी संगीत दिलेली  'संत नामदेव' यांची रचना
 तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
 देव विठ्ठल , ' देवपूजा ' विठ्ठल

'आसावरी' रागा बद्दल माहिती  बघताना एके ठिकाणी याचा उल्लेख 'हृदयस्पर्शी आसावरी ' असा वाचला . खरच वरची ही विठूमाऊलीची गाणी वाचून/ ऐकून याची प्रचिती येते.

बघूया  या  रागाची आणखी जादू  अर्थातच
"जादू तेरी नजर , तू है मेरी किरण"  - डर  या हिंदी सिनेमातील हे गाणे अजूनही अनेकांच्या हृदयाचा ठाव घेऊन आहे.

भावगीतातील मंगेश पाडगावकर/ यशवंत देव या जोडीचे हे एक गीत

मी मजला विसरावे
बुडुनि सुरातच जावे
बासरी न दूर सखे, ती  माझ्या अंतरी

दूर आर्त सांग कुणी छेडली 'आसावरी'
पारिजातकुसुमे ही उधळिली मनावरी

हृदयस्पर्शी का भावस्पर्शी तुम्हीच ठरवा.

 लता दीदींनी गायलेले 'बडी बहन' या हिंदी सिनेमा मधले
'चले जाना नाही नैना मिलाके'   किंवा दीदींनीच गायलेले ' लो आ गयी उनकी याद '  हे दो बदन या हिंदी सिनेमातील गाणे असेल. एका पेक्षा एक गाणी म्हणता येतील ही.

'आसावरी राग' आपल्याला काही संगीत नाटकातून ही  भेटतो

'संगीत मृच्छकटिक' या नाटकात देवल लिहितात
काय वंदीन मी ती सुमती ! नवयुवती अबला साश्रुलोचना !
धरुनी कुरलकुंतला या हाती !!

' संगीत मानापमान ' मध्ये खाडिलकरानीं  रचलेले पद :-
प्रेमभाव जीव जगी या नटला ! एकचि रस प्याला !!

तर ' संगीत शारदा' मध्ये  बालगंधर्व गातात :-
हासु  काय सुटले मी म्हणुनी
का रडूं हे मस्तक पिटूनि
लग्न होय कीकुंवार अजुनी
हरहर देवा काय विडंबन !!
( चला शेवटी विडंबन हा शब्द आसावरी रागातील एका नाट्यपदांत मिळाला तर 🙂)

मंडळी छान वाटलं ही काही जुनी गाणी आठवून ?
लेख आवरता घेण्यापूर्वी एक अवांतर :  जसं ' केदार ' नावाबद्दल काही ऋणानुबंध होते तसेच ' आसावरी' या नावाशी  ही आमचे ऋणानुबंध आहेत.
 ' आसावरी वाईकर '  ( माहेरची केळकर ) सध्या चेन्नई स्थित ही आमची मैत्रीण . मैत्रीण म्हणण्यापेक्षा छोटी बहीणच म्हणू. आता तिची अधिक ओळख ' अभिजात शास्त्रीय संगीत गायिका'/ शिक्षीका म्हणून करून देऊ की एक मराठी साहित्य  क्षेत्रातील 'उदयोन्मुख लेखिका' अशी करून देऊ हा जरा प्रश्नच पडलाय मला. सध्या तरी या दोन्ही क्षेत्रात तिने अतुलनीय यश मिळवले आहे. तिच्या पुढील वाटचालीस  शुभेच्छा. 
शाळेतल्या कुठल्याही कार्यक्रमाला
 'स्वागत गीत' म्हणणारी आसावरी ( सोबत नीलांबरी, संजीवनी )  आणि हर्मोनियम वाजवायला अस्मादिक ही जुनी आठवण. त्यावेळी आमच्या टुकार पेटीवादनाला सहन करून सांभाळून घेणारी आसावरी  ते  अगदी  काल आईला फोन करून अमोल 'चांगला लिहितो'  हे आवर्जून सांगणारी आसावरी. असे कौतुकाचे शब्द मिळाले की 'टूकारपणा ' करायला जास्त हुरूप चढतो. असो .😊

तर  या लेखनाचा शेवट
 ( ' आसावरी रागांतीलच ' ) एका छान गाण्याने

कुठे कुणाच्या घडल्या भेटी,
गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयाची गाथा,
सूर अजूनही गाती

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
दोन दिसाची रंगत संगत , दोन दिसाची नाती

भेटू परत कधीतरी , कुठला तरी राग घेऊन

 📝अमोल केळकर
poetrymazi.blogspot.in
२९/०५/१९

Saturday, May 11, 2019

मेगा ब्लाॅक


# मेगा ब्लाॅक

नमस्कार मंडळी 🌺🙏🏻

खरं म्हणजे 'मेगा ब्लाॅक' हा मुंबईकरांसाठी तरी काही नवीन शब्द नाही. मी चुकत नसेन तर गेली साधारण २० ते २२ वर्षे  काही अपवाद वगळता प्रत्येक रविवारी मुंबईच्या मध्य, पश्चिम,  हार्बर रेल्वे मार्गावर दरवेळेला वेगवेगळ्या ठिकाणी या मार्गाच्या तंदुरुस्ती साठी जे काम हाती घेतले जाते त्याला मेगा ब्लाॅग म्हणतात
सोमवारी पहाटे ४ वाजल्यापासून शनिवारी रात्री १२ वाजेपर्यत अखंडपणे मुंबईची ही जीवनवाहिनी व्यवस्थित रहावी यासाठी हे सगळे प्रयोजन.
मला आठवतंय अगदी सुरवाती- सुरवातीला एखाद्या भागात काही तांत्रिक अडचण येऊन रेल्वे सेवा विस्कळीत झाली, ओव्हरहेड वायर तुटून गाड्या बंद पडल्या, सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला म्हणून त्रास झाल्यावर तातडीने येणा-या रविवारी  त्या भागात 'मेगा ब्लाॅक ' घेऊन काम करण्यास सुरवात झाली.

हे सगळे अडचणीवर मार्ग म्हणून सुरु झाले. पण कालांतराने कुठल्याही प्रकारची अडचणच उद्भवू  नये म्हणून ( इन अॅन्टीसिपेशन)  सर्व विभागांचे व्यवस्थित नियोजन करुन 'मेगा ब्ला‌ॅक' घेण्यास सुरवात झाली आणि आज तो तमाम मुंबई करांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झालाय.

नाही म्हणले तरी सुरवातीला थोडा त्रास झाला. एखाद्या विभागातील 'जलद' किंवा धीमा मार्ग दुरुस्ती/ तंदुरुस्ती साठी बंद केल्यावर दुस-या चालू मार्गावर गर्दी होऊ लागली. काही स्थानकात  जलद लोकलला फलाट नसल्यामुळे तिथे उतरणाऱ्यांना पुढे उतरून मग रिक्षा/ बस असे पर्याय बघावे लागले. तिकडेही ओघाने गर्दी वाढली. तासाभराच्या प्रवासास दोन दोन तास जाऊ लागले.
खरं म्हणजे रविवारी सर्व कुटुंब एकत्र कुठेतरी प्रवासास जायचा दिवस. पण हे जाणे अत्यंत कठिण काम होऊन बसले. हा त्रास मुंबईकर सहन करत गेले आणि कालांतराने  त्याचे फायदे दिसायला लागले.

सोमवार ते शनिवार रेल्वे प्रवासातल्या तांत्रिक अडचणी कमी होऊ लागल्या. लोकल वेळेवर धावायचे  प्रमाण वाढले आणि आजकाल " आज या मार्गावर 'मेगा ब्लाॅक' नाही " ही बातमी ठरु लागली.

मंडळी तुम्ही म्हणाल हे काय टुकार लेखन? 👆🏻बरोबर आहे असे वाटणे. पण आता हीच मेगा ब्लाॅकची कल्पना आपण आपल्या व्यक्तीगत आयुष्यात अगदी दर रविवारी नाही निदान महिन्यातील / दोन महिन्यातील एखाद्या रविवारी वापरली तर?

आता व्यकतीगत आयुष्यात कशाचा 'ब्लाॅक' घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्ण. कुणी स्वत:च्या अंतर्मन तंदुरूस्त राहण्यासाठी ब्लाॅक घेईल, कुणी एखादी घरातील खोली आवरायला काढेल , कुणी गाडीची देखभाल करेल तर कुणी 'आठवणींचा' मेगा ब्लाॅक घेईल.

तर करताय ना सुरवात एखाद्या रविवारी ' आवश्यक ब्लाॅक ' घेऊन पुढचा मार्ग निश्चिंत करायला?

आणि हो हे ज्यावर तुम्ही वाचत आहात ( आणि मी लिहित आहे) त्या मोबाईलच्या ही 'मेगा डेटा'ची साफसफाई करुन त्याचाही अधूनमधून 'ब्लाॅक' घ्यायचा लक्षात राहू दे 😬

📝१२/५/१९
माझा ब्लाॅग
poetrymazi.blogspot.in

Saturday, May 4, 2019

दाखव रे ती मार्कलिस्ट


रविवारची टुकारगिरी 📝

सुप्रभात मंडळी 🙏🏻

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार
ख-या अर्थाने रंगला तो "दाखव रे तो व्हिडिओ" या प्रकाराने. आपल्याला याच्या खोलात किंवा पुढच्या "राज"कारणावर चर्चा करायची नाही आहे. मात्र या घटनेने मला शाळेतल्या दरवर्षीच्या निकालाची आठवण आली.
साधारण एप्रिलच्या शेवटी प्रत्येक वर्षीचा निकाल लागायचा. त्यानंतरचे साधारण आठवडाभर आम्हाला घरी जणू युद्धाचा प्रसंग असायचा. घरगुती 'सर्जिकल स्ट्राईकच' असायचा तो आमच्यावर. कारण निकालानंतर घरी येणाऱ्यांकडून मग ते नातेवाईक असोत परिचित असोत , त्यांच्याकडून विचारणा व्हायची काय लागला का रिझल्ट?
' हो '
किती मार्क पडले? 
 x x %
( वाचकांसाठी,  आम्हाला मार्क हे नेहमी महाराष्ट्रात निवडणुकीत होणा-या सरासरी मतदानाइतकेच मार्क असायचे,  त्यामुळे xx असं लिहिले आहे. तुमच्या माहितीत जी सरासरी आहे तेवढे आमचे मार्क धरायला हरकत नाही 😁 )

तर मार्क कळल्यानंतर हा विषय संपायला नको का?
पण आमचे नशीब कुठे इतके साधे?

त्या पाहुण्यांसमोर कधी पूजा करत असलेले बाबा किंवा चहा करत असलेली आई फर्मान सोडायची
" दाखव रे ती मार्कलिस्ट " 📝😐

यानंतर आमची मार्कलिस्ट त्या घरी आलेल्याच्या हातात जायची. तो ही आपण केळकरांकडे कुठल्या कामाला आलोय हे विसरून मस्त पैकी अॅनॅलिसिस/ विश्लेषण करायला लागायचा.
( आज निवडणूक झाल्यावर वेगवेगळ्या वाहिनींवर विश्लेषण करणारे पाहिले की मला वाटते यातल्या  काहीजणांनी नक्कीच माझी मार्कलिस्ट पाहिली असणार 😉)

तर त्यांचे विश्लेषण सुरु
मराठीत फक्त एवढेच? अरे लेखिकेचा मुलगा ना तू? पेपर मोकळा लिहून मार्क नाही मिळत.

हे काय ? सगळेजण तुझ्या काकूकडे संस्कृत शिकायला जातात आणि तूला ९० पण नाहीत?

हं त्या गणितातील मार्काने जरा लाज राखली म्हण की.

इ इ इ इ

तर मंडळी,  "दाखव रे ती मार्कलिस्ट " हा प्रकार पुढे साधारण १०-१२ दिवस तरी चालायचा. अगदी घरी कामाला येणा-या मावशी, आईच्या काॅलेजचा शिपायी, बाबांकडे कुणी कामानिमित्याने आलेले या सगळ्यांच्या ( त्यांना त्यातले कळो वा न कळो ) एकदा तरी त्यांच्या हातात आमची मार्क-लिस्ट गेलीच गेली.  पण चुकूनही त्या ८-१० दिवसात आमच्या घरी येणाऱ्यांना  " दाखव रे ती मार्कलिस्ट" असं सांगायला आई-बाबा विसरले नाहीत.

८-१० दिवसानंतर मात्र हे कमी होत जायचे. कारण घरी येणाऱ्या व्यक्तींच्या पाल्याचे ही निकाल लागलेले असायचे. मग x x हे आमचे %  ऐकल्यानंतर जर त्यांच्या मुला/ मुली पेक्षा मार्क कमी असतील तरच मार्कलिस्ट बघितली जायची. नाहीतर आई-बाबांना कडून आलेल्या "दाखव रे ..." ला राहू दे राहू दे. जरा गडबडीत आहे. नंतर बघतो वगैरे उत्तर मिळायचे 🤭.

या सगळ्यातून सुटका होण्यासाठी  निकाल लागला की पुण्या-मुंबईला केंव्हा पळतोय  इकडेच आमचं लक्ष लागून रहायचं 🤪

लहानपणीचा  " दाखवरे ती मार्कलिस्ट" ते " आजकालचा "दाखव रे तुझा छापून आलेला लेख " इथपर्यंत हा प्रवास येऊन थांबला आहे.

जो आता सुखावह वाटतोय 😊

📝अमोल
poetrymazi.blogspot.in
५/५/१९

Friday, May 3, 2019

उत्प्रेरक


🔅🔆 उत्प्रेरक -(अर्थातच कॅटॅलिस्ट) 🔆🔅

मंडळी 🙏🏻
मला वाटत आपण ८ वी  ते  १० वी मध्ये कुठल्यातरी वर्षी रसायन शास्त्र या विषयात हा विषय शिकलोय . 'उत्पेरकाची' शास्त्रीय दृष्ट्या व्याख्या :-
"ज्या पदार्थाच्या उपस्थितीमुळे एखाद्या रासायनिक विक्रियेचा/प्रक्रियेचा वेग बदलतो अशा पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात व या क्रियेला उत्प्रेरण म्हणतात".
ब-याचदा हा  उत्प्रेरक प्रत्यक्ष भाग घेत नाही पण त्याच्या उपस्थितीमुळे  मात्र इतर सुप्त घटक अचानक जागे होऊन  रासायनिक क्रिया घडते ( घटना घडते )

मंडळी , प्रत्यक्ष आपल्या जीवनातही असे अनेक उत्प्रेरक कळत-नकळत  येतात जे आपल्याला मदत करून जातात ,आपल्या जीवनाला कलाटणी देतात, या घटनेनंतर  मी बदललो, माझ्यात बदल झाला  असे आपणास वाटायला लागते .
अशा सर्व घटना, संबधीत व्यक्ती, परिस्थिती  हे आपल्यासाठी उत्प्रेरकच . प्रत्येकाने हे उत्प्रेरक आपापले शोधायचे .

काही उत्प्रेरकांचा सरळ सहभाग असतो.  उदा. आपले पालक - नातेवाईक , मित्र , शिक्षक इ, जे आपल्याला वेळोवेळी  भानावर आणतात , रागवतात , टोचून बोलतात  पण हे ते सगळं करतात ते आपल्या भल्यासाठी. आपल्यातील सुप्त गुण ( चांगले )  वाढीस लागून एका विशिष्ट दिशेने  ( फोकस)  आपला प्रवास व्हावा असा त्यांचा  उद्दात्त  हेतू असतो. कधी कधी मला असे वाटते 'निंदकाचे घर असावे शेजारी ' असे म्हणले जाते ते याच आपल्या फायद्यासाठी.

काही  उत्प्रेरक  आपण लांबून बघतो, टीव्हीवर बघतो , काही आपले आदर्श असतात पण त्यांचा  प्रत्यक्ष  आपल्याशी कधी संबंध आलेला नसतो. ते  आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात, आपल्याला वेगळा विचार करायला भाग पाडतात. आपल्या यश -अपयशाचा त्यांच्यावर  काहीही परिणाम  होणार नसतो, ते आपल्याला ओळखतही नसतात  पण त्यांच्या  बाबतची एखादी गोष्ट , घटना आपल्याला मात्र एखादे  ध्येय ठेऊन वाटचाल करायला प्रवृत्त करते.   
अरे काय काढली मॅच त्याने ! वाटलं नव्हतं जिकेलं, अशी घटना आपल्याला स्फूर्ती देऊन जाते ( अशक्य वाटणारी  गोष्ट प्रत्यक्षात घडणे).
 एखाद्या  वक्त्याचे व्याख्यान, एखादे प्रवचन,  एखादे  ऐतिहासिक पुस्तक , सिनेमा  , लहान वयात यशाच्या शिखरावर गेलेल्या व्यक्ती , एखादं मस्त गाणे ,  मित्रांबरोबरची / समवयस्क व्यक्तींबरोबरची  सहल, सूर्योदय / किंवा सूर्यास्ता वेळचे विलोभनीय दृश्य  इ इ इ

 अशा उत्प्रेरकांना शोध आपण आपल्या पद्धतीने घ्यायचा.  कधी कधी  आपण स्वतः :इतरांसाठी असा उत्प्रेरक बनायचं. 

खाली लिहिलेली काही वाक्य -ve म्हणून वापरलेली आपण नेहमीच बघतो/ ऐकतो,  पण ही वाक्य आपण एक चॅलेंज म्हणून घेतली तर यांच्यासारखा उत्पेरक नाही. आता जेंव्हा केंव्हा अशी वाक्ये 👇🏻ऐकाल तेंव्हा हे लिखाण आठवा आणि दुप्पट जोमाने कामाला लागा 😉

🗣तुला आयुष्यात काहीही जमणार नाही
🗣एक गोष्ट व्यवस्थित केलीस तर शप्पथ
🗣हे ! शक्यच नाही तूला जमणे.
🗣तुझे  काय कर्तृत्व ? सगळं आयत मिळालय  तुला ?🤭
🗣काय टुकार / सुमार/ घाणेरडं  लिहितोस.
 इ इ इ इ. 😛

'कौतुकाचे दोन शब्द' जसे जरुरी आहेत तसेच ही 'उत्प्रेरके' ही 'मोलाची' आहेत हे नक्की

मंडळी, कधी कधी  गावाबाहेरच्या  देवळात  जाऊन ( गर्दी नसलेल्या ठिकाणच्या )
गाभा-यातील मूर्तीला  मनापासून केलेला नमस्कार आणि त्यातून मिळालेली आंतरिक शांती , समाधान हे पण एक वेगळे उत्प्रेरकच नाही का?
घेतलाय तुम्ही हा स्वर्गीय अनुभव ????

या लेखनाची समाप्ती श्री रामदास स्वामींच्या या काही ओळीने  🌷

हवाया नळे बाण भांडी अनंते !
बळे सोडितां जाति आकाशपंथे !
बती लागता वेळ नाही उठाया !
तयाचे परी स्फूर्ती दे देवराया !!

सर्वांचे कल्याण होऊ दे हीच इच्छा 🙏🏻

📝अमोल केळकर
a.kelkar9@gmail.com
poetrymazi.blogspot.in
Related Posts Plugin for WordPress, Blogger...