नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Saturday, May 4, 2019

दाखव रे ती मार्कलिस्ट


रविवारची टुकारगिरी 📝

सुप्रभात मंडळी 🙏🏻

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार
ख-या अर्थाने रंगला तो "दाखव रे तो व्हिडिओ" या प्रकाराने. आपल्याला याच्या खोलात किंवा पुढच्या "राज"कारणावर चर्चा करायची नाही आहे. मात्र या घटनेने मला शाळेतल्या दरवर्षीच्या निकालाची आठवण आली.
साधारण एप्रिलच्या शेवटी प्रत्येक वर्षीचा निकाल लागायचा. त्यानंतरचे साधारण आठवडाभर आम्हाला घरी जणू युद्धाचा प्रसंग असायचा. घरगुती 'सर्जिकल स्ट्राईकच' असायचा तो आमच्यावर. कारण निकालानंतर घरी येणाऱ्यांकडून मग ते नातेवाईक असोत परिचित असोत , त्यांच्याकडून विचारणा व्हायची काय लागला का रिझल्ट?
' हो '
किती मार्क पडले? 
 x x %
( वाचकांसाठी,  आम्हाला मार्क हे नेहमी महाराष्ट्रात निवडणुकीत होणा-या सरासरी मतदानाइतकेच मार्क असायचे,  त्यामुळे xx असं लिहिले आहे. तुमच्या माहितीत जी सरासरी आहे तेवढे आमचे मार्क धरायला हरकत नाही 😁 )

तर मार्क कळल्यानंतर हा विषय संपायला नको का?
पण आमचे नशीब कुठे इतके साधे?

त्या पाहुण्यांसमोर कधी पूजा करत असलेले बाबा किंवा चहा करत असलेली आई फर्मान सोडायची
" दाखव रे ती मार्कलिस्ट " 📝😐

यानंतर आमची मार्कलिस्ट त्या घरी आलेल्याच्या हातात जायची. तो ही आपण केळकरांकडे कुठल्या कामाला आलोय हे विसरून मस्त पैकी अॅनॅलिसिस/ विश्लेषण करायला लागायचा.
( आज निवडणूक झाल्यावर वेगवेगळ्या वाहिनींवर विश्लेषण करणारे पाहिले की मला वाटते यातल्या  काहीजणांनी नक्कीच माझी मार्कलिस्ट पाहिली असणार 😉)

तर त्यांचे विश्लेषण सुरु
मराठीत फक्त एवढेच? अरे लेखिकेचा मुलगा ना तू? पेपर मोकळा लिहून मार्क नाही मिळत.

हे काय ? सगळेजण तुझ्या काकूकडे संस्कृत शिकायला जातात आणि तूला ९० पण नाहीत?

हं त्या गणितातील मार्काने जरा लाज राखली म्हण की.

इ इ इ इ

तर मंडळी,  "दाखव रे ती मार्कलिस्ट " हा प्रकार पुढे साधारण १०-१२ दिवस तरी चालायचा. अगदी घरी कामाला येणा-या मावशी, आईच्या काॅलेजचा शिपायी, बाबांकडे कुणी कामानिमित्याने आलेले या सगळ्यांच्या ( त्यांना त्यातले कळो वा न कळो ) एकदा तरी त्यांच्या हातात आमची मार्क-लिस्ट गेलीच गेली.  पण चुकूनही त्या ८-१० दिवसात आमच्या घरी येणाऱ्यांना  " दाखव रे ती मार्कलिस्ट" असं सांगायला आई-बाबा विसरले नाहीत.

८-१० दिवसानंतर मात्र हे कमी होत जायचे. कारण घरी येणाऱ्या व्यक्तींच्या पाल्याचे ही निकाल लागलेले असायचे. मग x x हे आमचे %  ऐकल्यानंतर जर त्यांच्या मुला/ मुली पेक्षा मार्क कमी असतील तरच मार्कलिस्ट बघितली जायची. नाहीतर आई-बाबांना कडून आलेल्या "दाखव रे ..." ला राहू दे राहू दे. जरा गडबडीत आहे. नंतर बघतो वगैरे उत्तर मिळायचे 🤭.

या सगळ्यातून सुटका होण्यासाठी  निकाल लागला की पुण्या-मुंबईला केंव्हा पळतोय  इकडेच आमचं लक्ष लागून रहायचं 🤪

लहानपणीचा  " दाखवरे ती मार्कलिस्ट" ते " आजकालचा "दाखव रे तुझा छापून आलेला लेख " इथपर्यंत हा प्रवास येऊन थांबला आहे.

जो आता सुखावह वाटतोय 😊

📝अमोल
poetrymazi.blogspot.in
५/५/१९
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...