नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Thursday, March 26, 2020

सत्वर धाव ग घरा | भवाने, बाई करोना होईल तूला ||


आमच्या अॅड.संगम सहस्त्रबुद्धे साहेंबानी दोन ओळी देऊन भारुड पूर्ण करायला सांगितले.  मग काय. त्यांचे आभार मानून आणि संत एकनाथ महाराज यांची माफी मागून 🙏🏻
( २०२० मधील एकनाथ महाराजांचे भारुड)

सत्वर धाव ग घरा | भवाने, बाई करोना होईल तूला ||

नवरा तुझा बाहेर जाता | पोलीस मारेल त्याला ||

सासू तुझी देवळात चालली | बातम्या दाखव तिला ||

जाऊ तुझी फडाफडा शिंकते | रुमाल दे ग तिला ||

नणदेच पोर किरकिर करते | गोष्टी सांग ग त्याला ||

दादला फक्कल मारुन बसलाय | मदतीला घे ग त्याला ||

एका जनार्दनी सरकार देतयं | आदेश पाळू  चला ||

*सत्वर धाव ग घरा | भवाने, बाई करोना होईल तूला ||*

#नाथांचे_भारुड 🙏🏻

📝अमोल
२६/०३/२०२०
poetrymazi.blogspot.in

Wednesday, March 25, 2020

वर्क फ्राॅम होम


सांग सांग भोलानाथ

मंडळी नमस्कार 🙏🏻

तुमच्याशी कशाला खोटं बोला. हे 'वर्क फ्राॅम होम' हे आमच्यासाठी नाहीच. एक तर आम्ही मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्रीत.त्यात ही आम्ही एक्स्पोर्ट मधे. यूरोपच आमचं मेन मार्केट. आता तिथली परिस्थिती तुम्ही जाणताच. रोज २-४ इमेल्स पेक्षा जास्त काही नाही त्यातही चौकशीचेच जास्त

 'डिअर अमोल, होप एव्हरिथिंग इस फाइन @ यूवर एन्ड, वी आर अल्सो वर्कींग फ्राॅम होम,  प्लीज टेक केअर इ इ
 नाही म्हणले तरी जरा ( अती) शहाणे जापनीज या परिस्थितीत ही 'कोटेशन' साठी मागे लागत आहेत. पण तिथेही नाॅट एबल टू सेन्ड यू आॅफर , वी शल रिझ्यूम अवर ड्यूटी बाय मिड एप्रिल,  अॅकाॅरडिंगली शल रिवर्ट बॅक टू यू . टेक केअर
असा टिपिकल रिप्लाय दिला की संपले काम

( तुम्ही म्हणाल ही इंग्रजी वाक्य सरळ इंग्रजीत पण लिहिता आली नसती का ? आली असती की,  पण मग इंग्रजी वाक्य देवनागरी लिपीत लिहिल्याने थोडा अधिक वेळ गेला, आणि तुम्हाला वाचायला पण थोडा वेळ लागला ना? वेळ तर घालवायचा आहे 😊)

तर अशी परिस्थिती . सकाळी एक्चेंज रेट ( डाॅलर, यूरो) बघायचा, यूरोप सुरु झाले की म्हणजे आपले मस्त दुपारचे  भोजन होऊन वामकुक्षीच्या आधी परत इमेल चेक करायचे. संध्याकाळचा चहा झाला की साहेबांशी थोडं बोलायचे. की झाले आमचे वर्क फ्राॅम होम.

 माझा यू.के च्या मित्र अगदी बरोबर बोललाय. आमच्या सारख्या इंडस्ट्री वाल्यांसाठी हे 'वर्क फ्राॅम होम ' पेक्षा 'वर्क फाॅर होम ' आहे.

आता राहिलेला वेळ मग असं टुकार लेखन, व्हाटसप विनोद वाचणे, कुणी किती तांदुळ मोजले इ इ घालवावा लागत आहे. अगदी यात ही आजचा लेटेस्ट फाॅर्वर्ड:-

 ' एकदा का या करोनाच टेंशन संपल की मी मस्त ७ दिवस आराम करायला सुट्टी घेणार आहे ' 😅

आज अचानक जगभरातील बहुतांशी जणांना जबरदस्ती सुट्टी मिळाली आहे. लहानपणी ब-याच जणांनी 'सांग सांग भोलानाथ ' हे गाणं ऐकल असेल. त्यातली एक गोष्ट अशा विचित्र पद्धतीने किंवा सात पटीने खरी ठरेल असं वाटलं नव्हतं. आठवा भोलानाथ ला तो छोटा/ छोटी काय म्हणाले होते

भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा,  आठवड्यातून रविवार येतील का रे तीनदा ? ??
भोलानाथ ने ही विश सात पटीने पूर्ण केली तब्बल २१ रविवार देऊन.. 

इतर कडवी थोड्या प्रमाणात कधी ना कधीतरी अनुभवली होती जसे..
शाळेभोवती ( आता आॅफीस भोवती)  तळे साचून सुट्टी मिळेल का?  ती तर दर पावसाळ्यात १-२ दा मिळतच होती.
इतर गोष्टी म्हणजे  'भोलानाथ, दुपारी आई झोपेल काय, लाडू हळूच घेताना आवाज होईल काय? हे मोठेपणी
भोलानाथ,  माहेरी बायको जाईल काय?  पार्टी दणक्यात करताना ... 😉

तर असं आहे सगळं. आवरतं घेतो लिखाण पोरांनी पत्ते वाटलेत 'बदाम सात' चे.  आमचं धाकट पण जरा कन्फ्यूज आहे. रात्री रोज झोपताना विचारतोय, उद्या 'मन डे' आहे का? कारण बाबा दिवसभर घरात म्हणजे रविवारच अशी झालेली समजूत त्याला घालवता येत नाही आहे.

ह्या सक्तीच्या सुट्टीची मजा अनुभवताना एक स्मरण त्यांचे ही
जे  अशा परिस्थितीत ही अत्यावश्यक सेवा देत आहेत, अहोरात्र झटत आहेत. 🙏🏻👏🏻

त्यांच्या सेवेचे फळ कधी मिळेल?

सांग सांग भोलानाथ .......

📝अमोल
२६/०३/२०२०

गाव सारा, बंद झाला


पाडगावकरांची क्षमा  मागून
 (आणि महेश केळुस्करांचे अभार मानून ) 

( चाल : शुक्र तारा,  मंद वारा)

गाव सारा, बंद झाला, फटके बांबुतूनी
जंतू आहे, धुंद वाहे, आज या जगातूनी
आज तू डोळ्यांत माझ्या
खूप रे दुरुनी पहा
तू तिथे दूरच रहा....

हो, आता घरात थांबू,  निरोप माझा (हा) तूला
तू तुझ्या घरातून ये रे आॅन लाईन मुला
रस्त्यातल्या मामा पासूनी,
आज तू जपुनी रहा

तू तिथे दूरच रहा....

भाक-या करण्या इथे रे,छंद हा बिलगे जीवा
फोडणीच्या 'गंध'नाने अन् थरारे ही हवा
भरलेल्या या कामांनी,
भारलेला फ्लॅट हा...

तू तिथे दूरच रहा....

राहिलो 'कर्फ्यूत' मी माझ्या घरी जागेपणी
झोपुनी गेलोच मग, होताच मस्त भोजुनी
वाढलो किलोपरी आता
अमुचा जीव हा.

तू तिथे दूरच रहा....

गाव सारा, बंद झाला, फटके बांबुतूनी
जंतू आहे, धुंद वाहे, आज या जगातूनी
आज तू डोळ्यांत माझ्या
खूप रे दुरुनी पहा
तू तिथे दूरच रहा....

📝अमोल
२५/०३/२०२०
गुढीपाडवा
poetrymazi.blogspot.in

Wednesday, March 18, 2020

शट्डाऊन - रिस्टार्ट


शट्डाऊन - रिस्टार्ट

संगणकावर काम करणाऱ्यांना  हे शब्द नवीन नाहीत. यातील पहिला शब्द शट्डाऊन हा जेंव्हा पहिल्यांदा ऐकला / संगणाकवर वापरला तेंव्हा मला एखादे दुकान/ गोडाऊन चे वरुन खाली शटर डाऊन करुन आजच्या दिवसापुरते दुकान बंद करायचा फिल आला.

रिस्टार्ट चे ही तसेच. एखादा ट्रक किंवा बस वाटेत थांबलीय आणि परत नव्या जोमाने पुढील प्रवास सुरु करण्यासाठी ड्रायव्हर स्टार्टर मारतो तोच हा रिस्टार्ट.

संगणकाच्या दुनीयेत शट्डाऊन आणि रिस्टार्ट या दोन गोष्टी एकाच ठिकाणी असल्या तरी त्या दोन वेगळ्या घटना घडवून आणतात. शट्डाऊन हे त्यामानाने सरळ. त्या दिवशी चे काम झाल्यावर संगणक बंद करुन ठेवायची आज्ञा ही प्रणाली देते. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्या सोडवून किंवा नवीन प्रणाली संगणकावर टाकली की आपण संगणक रिस्टार्ट करतो.
कधी कधी वाटत की मानवी मन हे जर संगणक मानले तर आपल्यासाठी ही आपण शट्डाऊन/ रिस्टार्टचा उपयोग अनेक प्रकारे करु शकतो किंवा करत आहोत.

उदा. परीक्षेच्या आधी आता रात्री अभ्यास पुरे झाला. उद्या पहाटे फ्रेश अभ्यास करु, असं म्हणून शट्डाऊन व्हायचे

काही सुचत नाही आहे,  उद्या बघू काही तरी मार्ग सापडेल,  करा शट्डाऊन

किंवा ब्रेन स्ट्राॅमींग करुन एखाद्या निर्णयाप्रत येऊन परत एकदा कामाला रिस्टार्ट करणे

अगदी अलिकडच्या मिशन मंगळ सिनेमात त्या महिला शास्त्रज्ञाने अचानक सर्व उपकरण स्विच आॅफ करुन आॅन केल्यावर परत यान संपर्कात येणे हे रिस्टार्टच

एखाद्या परीक्षेतील अपयश पचवून नव्या जोमाने अभ्यास करुन परत रिस्टार्ट करणे.

 आयुष्यातील सेकंड इंनिग  ही पण एक प्रकारे अनेकांसाठी प्रभावी रिस्टार्ट ठरली आहे

लांब कशाला तुम्ही हे लेखन ज्यावर वाचत आहात तो मोबाईल? कधीकधी हँग होतो ना?
मग काय करतो आपण कळ दाबून स्विच आॅफ करतो, रिबूट करतो किंवा सिमकार्ड काढून परत घालतो आणि रिस्टार्ट करतो ( आजारी माणसाला बरं होण्यासाठी लावलेल सलाईन आणि मोबाईलचे चार्जींग यात मला कमालीचे साम्य वाटते.उद्देश हाच की दोघांना परत उभारी देणे)

आता ब-याचदा सगळं व्यवस्थित राहण्यासाठी आणि चुकुन संगणकात काही व्हायरस आला तर तो घालवण्यासाठी, अॅन्टी व्हायरस साॅफ्टवेअर घालून सरळ shutdown करणे आवश्यक ठरते.

मानवासाठी ही ही वेळ आलीय. आलेल्या व्हायरस घालवण्यासाठी जाणीवपूर्वक शट्डाऊन होऊन नव्या जोमाने परत रिस्टार्ट होण्याची.

आधुनिक सुविधांनी जगाला एवढं जवळ केलयं की हा शट्डाऊन ही सर्वत्र एकाच वेळी घ्यावा लागेल अशी कल्पना ही आली नव्हती. पण ती वेळ आली आहे.

याच वेळेने जुन्या गोष्टी/ परंपरा यांचे अनुकरण करणे ( रिस्टार्ट करणे)  भाग पाडले आहे.

ट्वेन्टी- ट्वेन्टी च्या या जमान्यात निदान १४ दिवसाचा विलगीकरणातून मानवाला प्रभू रामचंद्राने १४ वर्षाच्या कठोर अशा वनवासाची आठवण करुन देणे ही योजना तर नियतीच्या मनात नसेल?

 काहीही असो.  सध्या काही दिवस आपण सगळ्यांनीच शट्डाऊन मोड मधे राहणे हा शहाणपणाचा निर्णय ठरु शकतो. 

क्षणभर विश्रांती घेऊन गुढी पाडव्या पर्यत सगळेच जण परत रिस्टार्ट मोड मधे येऊन त्या

अरुणोदयाची वाट बघू..

📝 अमोल
१९/०३/२०२०
poetrymazi.blogspot.in

#वर्क फ्राॅम होम

Tuesday, March 17, 2020

देऊळ बंद


देऊळ बंद



प्रातिनिधीक स्वरुपाचं हे वरील सांगलीचे गणपती मंदिर आहे. पण महाराष्ट्रातील तमाम सुप्रसिद्ध मंदीरं सध्या बंद ठेवण्यात आली आहेत. जी बंद नसतील ती काही दिवसात बंद होतील.
अनेक भाविकांचे श्रध्दास्थान ही देवळे असल्याने आणि तिथे होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे सध्या पसरलेला संसर्गजन्य रोग आणखी वाढू नये ही यामागची अत्यंत चांगली भावना या नियोजना मागे आहे.

याचा कुठला ही वेगळा अर्थ कुणी काढायची आवश्यकता नाही. या संकटाच्या समयी जरी सगळी देवळे काही कालावधी साठी बंद ठेवली गेली असली, तरी तमाम सारे देव आपापले देवस्थान बंद ठेऊन तमाम भक्तांच्या पाठीशी आहेत यात शंका नाही.

तसंही
काही ठिकाणी  देवळं दुपारी बंदच असतात.

उत्तराखंडातली चार धामची देवळं तर फक्त चार पाच महिने उघडी असतात ... बाकी बंद असतात.

 [[ ग्रहण काळात सुद्धा सगळी देवळं बंद असतात.

मग हा शिरस्ता तेव्हा मान्य आहे, देवळं तेव्हा काही तास, काही आठवडे बंद असलेली मान्य आहेत ... तर तशीच आता अनेक दिवस सलग बंद राहिलीत तर काय फरक पडणार?

आणि मुख्य मुद्दा हा की देऊळ बंद जनतेकरता आहे ... देवाची पुजा नाही. ती सुरूच राहणार या काळात .. (unlike first and third instance mentioned above.  )

त्यामुळे भाविकांनी आणि या वर ताशेरे ओढणाऱ्यांनी देखील चिंता करू नये. आमच्या देवांना अशी break घ्यायची सवय आहे म्हणावं.  ]]

ॐ गं गणपतये नम:
श्रध्दा आणि सबुरी
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
गण गण गणात बोते
महाराज माझे जवळी असावे
जय जय रघुवीर समर्थ
ॐ राम कृष्ण हरी
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

प्रत्येक भक्ताचा बोलवण्याचा आणि त्यांच्या देवतेचा विविध प्रकारे धाऊन जायचा मार्ग फक्त वेगळा आहे.

मनुष्यरुपी शरिराची गाडी अखंडित चालू रहाण्यासाठी हे इंधनरूपातील पेट्रोलपंप परत नेहमीसारखे नक्कीच चालू होतील आणि सगळे परत एकदा म्हणतील

देवा तुझ्या द्वारी आलो 🙏🏻🌺
www.kelkaramol.blogspot.in

Monday, March 16, 2020

एक साथ नमस्ते


मंडळी नमस्कार 🙏🏻🙏🏻

चिन देश दु:खे भरता, दोष ना जगाचा !
'करा'धीन आहे जगती,
पुत्र मानवाचा !!
🙏🏻🙏🏻
अंत उन्नतीचा पतनी होई या जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत
वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा

करा'धीन आहे जगती,
पुत्र मानवाचा !!
🙏🏻🙏🏻

📝१७/०३/२०२०
#एक 'साथ' नमस्ते
आता जगाला समस्ते
🙏🏻🙏🏻
poetrymazi.blogspot.in

Sunday, March 15, 2020

रोगट मी झालो असा की.


सुरेश भटांची माफी मागून 🙏🏻

रोगट मी झालो असा की, मी पुन्हा तंदुरूस्त नाही
एकदा खोकलो असा की, मग पुन्हा खोकलोच नाही!

जन्मभर केमिस्टने माझ्या, दाखविले नाना बहाणे;
नोंद पण फसव्या बिलाची, शेवटी पाहिलीच नाही

कैकदा रात्रीत तेंव्हा औषधांचे घोट प्यालो;
पण उजाडता तरिही,हाय मी उठलोच नाही

सारखे माझ्या मित्रांचे टोमणे सांभाळले मी;
एकदा प्रतिसादलो असा, मग पुन्हा बोललोच नाही

स्मरतही नाहीत मजला 'शब्द' ते माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, नस माझी दिसलीच नाही!

वाटले मज गुणगुणावे, 'मास्क' पण झाले
ति-हाइत,
लावले रोज मुखवटे, ते मला शोभलेच नाही!

संपल्यावर खेळ माझ्या वाकड्या विडंबनाचा...
लोक धावून आले अचानक; मी कुठे दिसलोच नाही

📝१५/०३/२०२०
अमोल
poetrymazi.blogspot.in

मुळ गझल:-

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!

संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा....
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!

(रंग माझा वेगळा ह्या काव्यसंग्रहातून)

सुरेश भटांची कविता

Tuesday, March 10, 2020

धुळवड विशेष - करुणा


# धुळवड - स्पेशल

आज आमच्या महा-श्रेष्ठ कवींचे निवेदन ऐकले 'करुणा- परत जाईल, करुणा- परत जाईल, करुणा- परत जाईल

आणि करुणा बद्दलच सहानुभूती वाटू लागली.

( चाल: तरुण आहे रात्र अजूनी)

करोना आहे,  आज अजुनही
हात तू, धुतलास का रे
एवढ्यातच त्या विषाणूवर, तू असा जळलास का रे.

अजुनही दिसल्या न नगरी व्हायरसच्या दीपमाळा
अजूनी मी खोकले कुठे रे? पण तू खोकलास का रे?

सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू?
शोधते रुमाल माझे, आणी तू 'मास्का' त का रे, ?

बघ त्याला पोसतोच आहे, पश्चिमेचा गार वारा
डबीतल्या कापराचा, वास तू घेतलास का रे?

मिळवती जगात यांना पसरण्याच्या खूप वाटा.
तू शहाण्यासारखा पण, मोकळा उरलास ना रे?

करोना आहे,  आज अजुनही
हात तू, धुतलास का रे

📝अमोल
१०/०३/२०२०
poetrymazi.blogspot.in

#धुळवड_विशेष

Monday, March 9, 2020

खेळताना रंग बाई होळीचा


#होळी_स्पेशल_विडंबन 🔥
-------------------------------------------
खेळताना रंग बाई होळीचा, होळीचा
विषाणू क-रोना नको चाय्नाचा

जरा घशात खवखवलं आणि काळीज धडधडलं
काय सांगु मी पुढलं ,क्षणातच सारं घडलं
दर झाला वाढीव  'मास्कचा', 'मास्कचा'
विषाणू क-रोना नको चाय्नाचा

मला काहि समजंना, मला काही उमजंना
त्याला कोणी सांगंना, कुणाला तो ऐकंना
डाव साधला ऐन वेळीचा, वेळीचा
विषाणू क-रोना नको चाय्नाचा

खेळताना रंग बाई होळीचा, होळीचा
विषाणू क-रोना आला चाय्नाचा

📝अमोल
०९/०३/२०२०
poetrymazi.blogspot.in

#होळी_स्पेशल🔥

Saturday, March 7, 2020

आमची काही पाळणा घरे " ( महिला दिन विशेष )


" आमची  काही पाळणा  घरे " (  महिला दिन विशेष )

मंडळी  आयुष्याच्या निम्म्या टप्प्यावर आलो असताना वय जरी पुढे जात राहिले तरी माणसाने आपला प्रवास मनाने का होईना  वक्री ग्रहासारखा वक्र गतीने परत उलटा करावा  आणि बालपणा कडे जावे. परत बालपणीचा काळ सुखाचा अनुभवण्याचा  प्रयत्न करावा कारण आयुष्यातला हाच कालावधी आनंदी होता  हे एव्हानं सगळ्यांना समजलेले असते. कुणाला हे भूतकाळात रमणे  म्हणजे मूर्खपणाचे वाटू शकते पण मला  'भविष्याचा अंतरंगात' डोकावताना भूतकाळाच्या स्मृतीत ही रमायला आवडते . किंबहुना अनेकजण न कळत असा  प्रवास करतच असतात. ( म्हणूनच वयाने आलेले म्हातारपण हे मनाने  दुसरे बालपणच अशी म्हण तयार झाली असावी )

असंच भूतकाळात रमताना, आज 'महिला दिना निमित्याने' काही खास महिलांची आठवण आली म्हणून हे लेखन.😌

लहानपणी  ज्याच्या घरी आमचे विशेष
 ' पालन ' झाले. त्या  नरवणे बाई ( इंन्नी ),  दिवाण काकू ( आमचा मित्र दिपक दिवाणची  आई ) आणि कुलकर्णी आजी ( या आजी मात्र आमचं पालन करायला आमच्या घरी यायच्या )

तर अगदी लहानपणी ( आता वय विचारू नका,आठवतंय त्या वयाचा असताना ) आम्ही माधवनगरला  ( सांगली ) 'शनिवार पेठेत' रहायचो. आई बहुतेक त्यावेळेला नोकरी ला नव्हती पण शिकायला सांगलीला जायची किंवा नोकरी ही करत असेल नक्की लक्षात नाही.  आमचा मुक्काम ब-याच वेळेला असायचा  तिथेच राहणा-या ' नरवणे कुटूंबीयांकडे '. सर्वजण या नरवणे काकू यांना इंन्नी या नावाने संबोधायचे . त्या केवळ आम्हाला घरातच सांभाळायच्या नाहीत तर कामाला बाहेर पडल्या की  बरोबर घेऊन जायच्या . माधवनगरातील  विठोबाच्या देवळातील जत्रा असू दे, एखादा उत्सव , कीर्तन , जयंत्या  ते अगदी सिनेमा बघण्या पर्यतच 'बाळकडू'  या इंन्नीने आम्हाला दिले. शब्दश बारसे ते माणसाच्या आयुष्यातील शेवटचा प्रसंग या सगळ्या ठिकाणी इंन्नी आम्हाला घेऊन गेली.

इथे आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छितो की  जरी आम्ही शनिवार पेठेत रहात असलो तरी आमचे  मुख्य घर 'गुरुवार पेठेत' होते .  आमची आजी  आणि काकू तिथे असायच्या . इथेही आमचा  मुक्काम असायचा.

इंन्नी बरोबर आम्ही माधवनगर फिरलो पण आमचा काकू बरोबर आम्ही  माधवनगर च्या बाहेरचे जग पाहिले.

आता वाटतंय की ' समाज '  या शब्दाची ओळख आम्हाला आमची काकू /  इंन्नी मुळे झाली (अर्थात ते वय समाज वगैरे समजण्या पलीकडचे होते  पण आता तसे वाटत आहे )

थोडं मोठं झाल्यावर आम्ही सांगली या शहरात रहायला आलो.  शिशू मंदिर मध्ये  ज्याला बहुतेक आपण आता ज्यूनिअर / सिनिअर केजी का काय म्हणतो तिथे दिवाण काकू  शिकवायला होत्या . त्यांच्या सासूबाई आणि माझी आई कॉलेजला एकत्र शिकवायला होत्या त्यामुळे त्यांची विशेष ओळख होती. आमची शाळा सकाळची, आईची दुपारची . मग दिवसभर कुठे रहायचे ?  हा प्रश्न दिवाण काकूंनीच सोडवला. आमची शाळा सुटली की त्या मला त्यांच्याबरोबर घरी घेऊन जायला लागल्या. मग संध्याकाळी आई आली की आम्ही घरी जायला लागलो. यांचे घर तसे लांब होते. सिटी पोस्ट पासून जिल्हा परिषदेपर्यत सिटी बसने जायला मिळायचे हे ही अप्रूप होते. त्यांच्या घराजवळ  'त्रिकोणी बाग' असायची तिथे खेळायला जायचो. थोडक्यात यांच्याकडे कधी अभ्यास वगैरे केल्याचं आठवलं नाही ( ते वयही नव्हतं म्हणा अभ्यासाचे पण आजकाल नर्सरीतील मुलांचा अभ्यास पाहिला की वाटते आम्ही काहीच करायचो नाही). त्यांच्या घराच्या  इथेच रहाणारा 'शाळेतील मित्र ' दिसला  की मात्र जरा शाळेची आठवण यायची बस ! ☺
 पण या पालन ' घरात ' आम्ही जेवढी मजा केली ती आमच्या घरी पण केलेली नसेल. मुख्य म्हणजे काकूंना मी कधी रागावलेले पाहिलंच नाही. कदाचित त्यांचा मुलगा आमचा मित्र दीपक शांत असल्याने बहुतेक त्या माझा दंगा खपवून घेत असतील

पुढे आणखी  जरा मोठा झाल्यावर  एक 'कुलकर्णी आजी'  मला सांभाळायला आमच्या 'राम मंदिर' इथल्या घरी यायच्या. काय  कुणास ठाऊक पण यांच्याशी सूत जमायला मला जरा कठीणच गेले . एकतर पूर्वीची  'पालन - घरे ' ही घराच्या बाहेर होती. बाहेर फिरायाला मिळणे हे आवडीचे काम यात होत असल्याने कंटाळण्याचा प्रश्न नव्हता . पण इथे मात्र स्वतःच्याच घरी बंद झाल्यासारखे वाटले  असेल म्हणून या आजींशी  म्हणावी तेवढी जवळीक झाली नाही. बर त्या काही  ओरडायच्या , मारायच्या, अभ्यास कर म्हणायच्या असं ही नाही . पण आजकालची  मुले पहिल्यांदा जेंव्हा पाळणाघरात गेल्यावर जो रडून गोंधळ घालतात ( पहिल्यादा )  तसा गोंधळ आम्ही आमच्याच घरात नित्य घालत असायचो

हायस्कुलला गेल्यावर पूर्ण वेळ सकाळी ११ ते ५ वगैरे  शाळा आणि आईच्या ही काॅलेजची वेळ  सारखी असल्याने "पालन - घराचा" प्रश्न सुटला होता पण बहुतेक सातवी / आठवी असेन, शाळेच्या बांधकामानिमित्य १-२ वर्ष आमची शाळा सकाळी ठेवली गेली . मग परत दुपारी कुठे रहायचचे हा प्रश्न होताच . तो प्रश्न माझ्या चुलत बहिणीने सोडवला . शाळा सुटल्यावर आम्ही आमच्या माधुरी ताईकडे  टिंबर एरियात जायला लागलो.
त्यावेळेला ती क्लासेस ही घ्यायची .  हा अभ्यासाच्या दृष्टीने उमेदीचा काळ ठरला. जो काही थोडाबहुत अभ्यास केला किंबहुना अभ्यासाची गोडी लागली ती इथेच. तिच्याकडे ही आमच्या शाळेतील एक दुसरा मित्र क्लासला यायचा .  शाळेतील मित्राचा सहवास हा मात्र प्रत्येकवेळी  कुठेना कुठे मिळतच गेला / अजूनही मिळत आहे

अशारितीने त्यावेळला जेव्हा आमचे पालन - व्हावे  अशी गरज आमच्या पालकांना झाली होती त्या त्या प्रत्येक वेळी वरील उल्लेख केलेल्या व्यक्तींची मदत झाली.
काकू आणि बहिण या तर घरच्याच होत्या पण बाकीच्यांशी रक्ताचे नाते नव्हते.  आता माझ्या मते त्या कुलकर्णी आजी सांभाळायला म्हणून यायच्या त्यांना त्याच कामासाठी घेतलेले असल्यामुळे  त्यांना कदाचित  मोबदला दिला जात असेल पण बाकिच्यांनी केवळ कुठलीही अपेक्षा न ठेवता आमचे लाड केले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही

म्हणूनच आज महिला दिना निमित्याने आमच्या आयुष्यात आलेल्या , मदत झालेल्या या खास  स्त्रियांचे स्मरण

*ओ पालन हारे , निर्गुण  और न्यारे, तुम्हरे  बिन हमरा कौन नही* 🙏🏻

📝 अमोल
०८/०३/२०२०
#आंतरराष्ट्रीय_महिला_दिन

Thursday, March 5, 2020

नको खेळूस 'शेठजी' होळी रे


#बुरा_न_ मानो_पर_होली_मत_ खेलो

खास बातमी सांगतो, आम्ही  शेठजींना  असा गुप्त संदेश पाठवला आणि त्यांनी निर्णय घेतला होळी न खेळण्याचा

मूळ गाणे / चाल:  नको वाजवू श्रीहरी मुरली रे

नको खेळूस 'शेठजी' होळी रे
नको खेळूस 'शेठजी' होळी रे
यंदा ' करोना ' ने वाट लावली रे

खुंटला 'वायूचा वेग , वर्षती 'मेसेज'
मंदी स्थिरावली.

नको खेळूस 'शेठजी' होळी रे

रुमाल बांधून बाहेरची जाता
जनता बाजूला सरकली
एका 'ड्रँगर्दनी' अव कृपेने
'वसुधा' सारी घाबरली .

नको खेळूस 'शेठजी' होळी रे
-----------------------------------
मूळ गवळण :-

नको वाजवू श्री हरी मुरली
नको वाजवू श्री हरी मुरली
तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे ||धृ||.

खुंटला वायूचा वेग , वर्षती मेघ
जल स्थिरावली

नको वाजवू श्री हरी मुरली

घागर घेवूनी पानियाशी जाता
 दोही वर घागर पाजरली .
 एका जनार्दनी पूर्ण कृपेने
राधा गवळण घाबरली ...

नको वाजवू श्री हरी मुरली

📝अमोल
५/०३/२०२०
माझे टुकार ई -चार
poetrymazi.blogspot.in

Wednesday, March 4, 2020

हत्ती आणि ससा


हत्ती आणि ससा ( आधुनिक पंचतंत्र कथा ) 🐘🐇

मूळ कथा : - एका दाट जंगलात हत्तींचा कळप राहत असे. हत्ती एका तलावाजवळ एका ठराविक ठिकाणी राहत असत आणि त्यांना बाहेर जाण्याची गरज नव्हती. काही काळसाठी पाऊस नसल्यामुळे तलाव कोरडा होऊ लागला.
काही हत्तीं हत्तीराजाला भेटले आणि म्हणाले, महाराज, आमच्याकडे पुरेसे पाणी नाही. आमची लहान मुलं मृत्यूच्या मार्गावर आहेत.आपल्याला आणखी एक जागा शोधायला पाहिजे जिथे मुबलक पाणी असेल तेथे . ”

थोड्या वेळाने विचार केल्यावर हत्ती राजा म्हणाला, “मला माहित आहे एक जागा जेथे खूप मोठ सरोवर आहे, ती जागा अजूनही पाण्याने भरलेली आहे.” चला तिथे जाऊ ”.

सगळे तिथे पोहोचले . सरोवराच्या सभोवतालच्या जागेवर असंख्य छिद्र होते, ज्यात सशांचा समूह जिवंत होता. जेव्हा हत्तींनी तलावामध्ये इतके पाणी पाहिले तेव्हा ते आनंदी झाले आणि जगाची पर्वा न करता पाण्यात उडी मारण्यास सुरवात केली.

अचानक, सर्व हत्तींनी उडया मारल्यामुळे बर्‍याच छिद्रांचा नाश झाला, अनेक ससे हत्तीखाली पायदळी तुडवले गेले, तर अनेकांचा मृत्यू झाला, तर बरेच जण गंभीर जखमी झाले.  संध्याकाळी हत्ती निघून गेले तेव्हा पळून गेलेले ससे परत आले. ते दुःखाने एकत्र जमले आणि एकमेकांशी बोलू लागले, “प्रिय! सर्वत्र पाण्याअभावी येथे हत्ती रोज येतील. आपण काहीतरी विचार केला पाहिजे, अन्यथा उद्या आपल्यातील बरेच जण चिरडले जातील. आपण शक्तिशाली हत्तींविरुद्ध काय करू शकतो? जगण्यासाठी आपण हे ठिकाण सोडले पाहिजे. ”

त्यातील एक ससा सहमत नव्हता, तो म्हणाला- “मित्रहो! हे आमचे वडिलोपार्जित घर आहे, जर आपण हत्तींना घाबरवू  शकलो तर, ते परत येणार नाहीत. मी त्यांना घाबरविण्याच्या एका मार्गाचा विचार करू शकतो. ठरल्याप्रमाणे एक योजना बनवली, एक ससा हत्तींच्या वाटेवर असलेल्या डोंगरावर बसला. थोड्या वेळाने हत्तींचा राजा आपला संपूर्ण कळप घेऊन आला. ससा ओरडला, “ए दुष्ट हत्ती! मी तुला तलावात प्रवेश करण्यापासून रोखत आहे. हा तलाव चंद्र-देवाचा आहे.

हत्तीच्या राजा स्तब्ध झाला पण तो कुठल्याही देवावर राग करण्याचे धाडस करु शकला नाही. हत्तीराजाने त्या सशाला विचारले की त्याच्यासाठी काय संदेश आहे?

ससा म्हणाला, “मी चंद्राचा देवदूत आहे. त्याने तुम्हाला त्याच्या तलावामध्ये जाण्यापासून प्रतिबंधित करीत आहे हे सांगण्यासाठी मला पाठविले आहे. काल, तुमच्या उडया मारण्याच्या प्रकारामुळे बरेच ससे मरण पावले , देव, तुमच्यावर खूप रागावले आहेत. जर आपल्याला जगण्याची इच्छा असेल तर आपण तलावामध्ये पुन्हा प्रवेश करू नये. ”

हत्ती राजा काही काळ गप्प राहिला, आणि मग म्हणाला, हे जर खरं असेल तर, तुझा चंद्र कुठे आहे ते सांग, मी माझ्या कळपाला घेऊन दूर जाईन  आणि आम्ही माफी मागू.

चतुर ससा हत्तीराजाला सरोवराच्या काठावर घेऊन गेला, जेथून चंद्राचे प्रतिबिंब पाण्यात दिसू शकत होते. तो म्हणाला, “आज तो खूप अस्वस्थ आहे, कृपया शांतपणे आपले डोके खाली घ्या आणि निघून जा. तुम्ही त्यांचे लक्ष विचलित करू नका अन्यथा ते रागावतील.. हत्ती राजा पाण्यात चंद्र पाहून आश्चर्यचकित झाला. त्याने सशावर विश्वास केला आणि ते तेथून निघून गेले.

आधुनिक फ्युजन कथा -

  आजच्या जमान्यातही  " ससा - हत्तीचे " कळप मनुष्यरूपात   'वसाहत वादासाठी ' झगडत आहेत.  यासाठी अनेक युध्द् झाली, अनेक संस्थानं आपापसात लढली , राज्य खालसा झाली. लढाया/ प्रती-लढाया , जागतिक युध्द, झाली पण लढा संपलेला नाही चालूच राहील .

शक्तिमान हत्ती बळजबरी करेल , शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ  असा विचार करणारे ससे दरवेळी  चंद्राची प्रतीकात्मक रूपे म्हणजे कायदे मग ते सरकारने बनवलेले असतील किंवा विशिष्ठ गटाने , एका प्रदेशाने दुस-या प्रदेशातील लोकांसाठी बनवलेली व्यवस्था जी ' व्हिसा ' यास्वरुपात उपलब्ध आहे  किंवा  शाकाहार - मांसाहार , भाषा ,धर्म , रूपात असतील  सोयीस्कर वापरतील

*पण जगाच्या अंतापर्यत  ससा - आणि हत्ती  यांच्यातील  वाद  नव्या नव्या रूपात पुनः पुनः  अस्तित्वात राहील*


📝अमोल
माझे टुकार ई - चार

Monday, March 2, 2020

नका सोडून जाऊ


शेठजी, *

तुम्हावर केली आम्ही 'मर्जी ' बहाल
नका सोडून जाऊ 'सोशल महाल '

फेसबुकची तोरणं लावून ट्विटरवरती
हे 'लाईक्स' दाखवते काळजातली प्रिती
'मित्रो' म्हणावंमे, भले नसावे 'अच्छे  दिन खुशाल'

नका सोडून जाऊ 'सोशल महाल '

व्यसन म्हणू की, ओढ म्हणू ही गोड
या सोशल-मंचकी सुटेल अवघड कोडं
विरह तुमचा होता, 'भक्त' ही  आवरे 'अमृतजाल'

नका सोडून जाऊ 'सोशल महाल '

निर्णय परत घ्या, परत घ्या, परत घ्या 🙏🏻

📝०३/०३/२०२०
( * निख्खळ मनोरंजन हाच हेतू )
Related Posts Plugin for WordPress, Blogger...