नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Saturday, March 7, 2020

आमची काही पाळणा घरे " ( महिला दिन विशेष )


" आमची  काही पाळणा  घरे " (  महिला दिन विशेष )

मंडळी  आयुष्याच्या निम्म्या टप्प्यावर आलो असताना वय जरी पुढे जात राहिले तरी माणसाने आपला प्रवास मनाने का होईना  वक्री ग्रहासारखा वक्र गतीने परत उलटा करावा  आणि बालपणा कडे जावे. परत बालपणीचा काळ सुखाचा अनुभवण्याचा  प्रयत्न करावा कारण आयुष्यातला हाच कालावधी आनंदी होता  हे एव्हानं सगळ्यांना समजलेले असते. कुणाला हे भूतकाळात रमणे  म्हणजे मूर्खपणाचे वाटू शकते पण मला  'भविष्याचा अंतरंगात' डोकावताना भूतकाळाच्या स्मृतीत ही रमायला आवडते . किंबहुना अनेकजण न कळत असा  प्रवास करतच असतात. ( म्हणूनच वयाने आलेले म्हातारपण हे मनाने  दुसरे बालपणच अशी म्हण तयार झाली असावी )

असंच भूतकाळात रमताना, आज 'महिला दिना निमित्याने' काही खास महिलांची आठवण आली म्हणून हे लेखन.😌

लहानपणी  ज्याच्या घरी आमचे विशेष
 ' पालन ' झाले. त्या  नरवणे बाई ( इंन्नी ),  दिवाण काकू ( आमचा मित्र दिपक दिवाणची  आई ) आणि कुलकर्णी आजी ( या आजी मात्र आमचं पालन करायला आमच्या घरी यायच्या )

तर अगदी लहानपणी ( आता वय विचारू नका,आठवतंय त्या वयाचा असताना ) आम्ही माधवनगरला  ( सांगली ) 'शनिवार पेठेत' रहायचो. आई बहुतेक त्यावेळेला नोकरी ला नव्हती पण शिकायला सांगलीला जायची किंवा नोकरी ही करत असेल नक्की लक्षात नाही.  आमचा मुक्काम ब-याच वेळेला असायचा  तिथेच राहणा-या ' नरवणे कुटूंबीयांकडे '. सर्वजण या नरवणे काकू यांना इंन्नी या नावाने संबोधायचे . त्या केवळ आम्हाला घरातच सांभाळायच्या नाहीत तर कामाला बाहेर पडल्या की  बरोबर घेऊन जायच्या . माधवनगरातील  विठोबाच्या देवळातील जत्रा असू दे, एखादा उत्सव , कीर्तन , जयंत्या  ते अगदी सिनेमा बघण्या पर्यतच 'बाळकडू'  या इंन्नीने आम्हाला दिले. शब्दश बारसे ते माणसाच्या आयुष्यातील शेवटचा प्रसंग या सगळ्या ठिकाणी इंन्नी आम्हाला घेऊन गेली.

इथे आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छितो की  जरी आम्ही शनिवार पेठेत रहात असलो तरी आमचे  मुख्य घर 'गुरुवार पेठेत' होते .  आमची आजी  आणि काकू तिथे असायच्या . इथेही आमचा  मुक्काम असायचा.

इंन्नी बरोबर आम्ही माधवनगर फिरलो पण आमचा काकू बरोबर आम्ही  माधवनगर च्या बाहेरचे जग पाहिले.

आता वाटतंय की ' समाज '  या शब्दाची ओळख आम्हाला आमची काकू /  इंन्नी मुळे झाली (अर्थात ते वय समाज वगैरे समजण्या पलीकडचे होते  पण आता तसे वाटत आहे )

थोडं मोठं झाल्यावर आम्ही सांगली या शहरात रहायला आलो.  शिशू मंदिर मध्ये  ज्याला बहुतेक आपण आता ज्यूनिअर / सिनिअर केजी का काय म्हणतो तिथे दिवाण काकू  शिकवायला होत्या . त्यांच्या सासूबाई आणि माझी आई कॉलेजला एकत्र शिकवायला होत्या त्यामुळे त्यांची विशेष ओळख होती. आमची शाळा सकाळची, आईची दुपारची . मग दिवसभर कुठे रहायचे ?  हा प्रश्न दिवाण काकूंनीच सोडवला. आमची शाळा सुटली की त्या मला त्यांच्याबरोबर घरी घेऊन जायला लागल्या. मग संध्याकाळी आई आली की आम्ही घरी जायला लागलो. यांचे घर तसे लांब होते. सिटी पोस्ट पासून जिल्हा परिषदेपर्यत सिटी बसने जायला मिळायचे हे ही अप्रूप होते. त्यांच्या घराजवळ  'त्रिकोणी बाग' असायची तिथे खेळायला जायचो. थोडक्यात यांच्याकडे कधी अभ्यास वगैरे केल्याचं आठवलं नाही ( ते वयही नव्हतं म्हणा अभ्यासाचे पण आजकाल नर्सरीतील मुलांचा अभ्यास पाहिला की वाटते आम्ही काहीच करायचो नाही). त्यांच्या घराच्या  इथेच रहाणारा 'शाळेतील मित्र ' दिसला  की मात्र जरा शाळेची आठवण यायची बस ! ☺
 पण या पालन ' घरात ' आम्ही जेवढी मजा केली ती आमच्या घरी पण केलेली नसेल. मुख्य म्हणजे काकूंना मी कधी रागावलेले पाहिलंच नाही. कदाचित त्यांचा मुलगा आमचा मित्र दीपक शांत असल्याने बहुतेक त्या माझा दंगा खपवून घेत असतील

पुढे आणखी  जरा मोठा झाल्यावर  एक 'कुलकर्णी आजी'  मला सांभाळायला आमच्या 'राम मंदिर' इथल्या घरी यायच्या. काय  कुणास ठाऊक पण यांच्याशी सूत जमायला मला जरा कठीणच गेले . एकतर पूर्वीची  'पालन - घरे ' ही घराच्या बाहेर होती. बाहेर फिरायाला मिळणे हे आवडीचे काम यात होत असल्याने कंटाळण्याचा प्रश्न नव्हता . पण इथे मात्र स्वतःच्याच घरी बंद झाल्यासारखे वाटले  असेल म्हणून या आजींशी  म्हणावी तेवढी जवळीक झाली नाही. बर त्या काही  ओरडायच्या , मारायच्या, अभ्यास कर म्हणायच्या असं ही नाही . पण आजकालची  मुले पहिल्यांदा जेंव्हा पाळणाघरात गेल्यावर जो रडून गोंधळ घालतात ( पहिल्यादा )  तसा गोंधळ आम्ही आमच्याच घरात नित्य घालत असायचो

हायस्कुलला गेल्यावर पूर्ण वेळ सकाळी ११ ते ५ वगैरे  शाळा आणि आईच्या ही काॅलेजची वेळ  सारखी असल्याने "पालन - घराचा" प्रश्न सुटला होता पण बहुतेक सातवी / आठवी असेन, शाळेच्या बांधकामानिमित्य १-२ वर्ष आमची शाळा सकाळी ठेवली गेली . मग परत दुपारी कुठे रहायचचे हा प्रश्न होताच . तो प्रश्न माझ्या चुलत बहिणीने सोडवला . शाळा सुटल्यावर आम्ही आमच्या माधुरी ताईकडे  टिंबर एरियात जायला लागलो.
त्यावेळेला ती क्लासेस ही घ्यायची .  हा अभ्यासाच्या दृष्टीने उमेदीचा काळ ठरला. जो काही थोडाबहुत अभ्यास केला किंबहुना अभ्यासाची गोडी लागली ती इथेच. तिच्याकडे ही आमच्या शाळेतील एक दुसरा मित्र क्लासला यायचा .  शाळेतील मित्राचा सहवास हा मात्र प्रत्येकवेळी  कुठेना कुठे मिळतच गेला / अजूनही मिळत आहे

अशारितीने त्यावेळला जेव्हा आमचे पालन - व्हावे  अशी गरज आमच्या पालकांना झाली होती त्या त्या प्रत्येक वेळी वरील उल्लेख केलेल्या व्यक्तींची मदत झाली.
काकू आणि बहिण या तर घरच्याच होत्या पण बाकीच्यांशी रक्ताचे नाते नव्हते.  आता माझ्या मते त्या कुलकर्णी आजी सांभाळायला म्हणून यायच्या त्यांना त्याच कामासाठी घेतलेले असल्यामुळे  त्यांना कदाचित  मोबदला दिला जात असेल पण बाकिच्यांनी केवळ कुठलीही अपेक्षा न ठेवता आमचे लाड केले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही

म्हणूनच आज महिला दिना निमित्याने आमच्या आयुष्यात आलेल्या , मदत झालेल्या या खास  स्त्रियांचे स्मरण

*ओ पालन हारे , निर्गुण  और न्यारे, तुम्हरे  बिन हमरा कौन नही* 🙏🏻

📝 अमोल
०८/०३/२०२०
#आंतरराष्ट्रीय_महिला_दिन
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...