नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, May 29, 2019

दूर आर्त सांग कुणी छेडली 'आसावरी'




मंडळी नमस्कार. 🙏🏻

मध्यतंरी ' केदार ' रागावर लिहिलेले अनेकांनी आवडलं असं कळवलं आणि उत्साह वाढला.  याच लेखनमालेत  दुसरा लेख घेऊन येतोय.
यात आपण 'आसावरी '  रागातील काही गाणी पाहू. मागच्या वेळेला काही जणांनी  'फक्त मराठी गाणीच का? असा राग आळवला ( अर्थात ती त्यांची प्रेमाने केलेली तक्रार / सूचना होती )
त्यामुळे या भागात मराठी गाण्यांबरोबरच काही हिंदी गाण्यांचा ही समावेश केला आहे.

 अर्थात मागच्यावेळेप्रमाणेच इथे ही आपल्याला  रागा संबंधीच्या शास्त्रीय गोष्टीत जसे आरोह, अवरोह , वादी , संवादी , कोमल रिषभ , शुध्द् रिषभ  यात पडायचे नाही . आपण फक्त  काही हृदयस्पर्शी गाणी आठवायची आणि त्यानिमित्याने आपल्या हृदयाशीच गुणगुणायची .

बस ! हाच हेतू आहे या लेखन मालेचा

चला पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन सुरु करू

देव दिसे ठाई ठाई
भक्त लीन भक्तापाई
सुखालागी आला या हो
आनंदाचा पूर
अवघे गर्जे पंढरपूर , चालला नामाचा गजर

' गोरा  कुंभार ' नाटकातील अशोकजी परांजपे यांनी लिहिलेले हे गीत  या आसावरी रागातील. गायिका 'मंजुषा पाटील' यांनी गायलेली या गाण्याची एक छान ध्वनीफीत माझ्याकडे आहे. 'माऊलीच्या' असंख्य भक्तीगीता मधील हे एक माझे आवडते गाणे.

याचप्रमाणे  राम फाटक यांनी संगीत दिलेली  'संत नामदेव' यांची रचना
 तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
 देव विठ्ठल , ' देवपूजा ' विठ्ठल

'आसावरी' रागा बद्दल माहिती  बघताना एके ठिकाणी याचा उल्लेख 'हृदयस्पर्शी आसावरी ' असा वाचला . खरच वरची ही विठूमाऊलीची गाणी वाचून/ ऐकून याची प्रचिती येते.

बघूया  या  रागाची आणखी जादू  अर्थातच
"जादू तेरी नजर , तू है मेरी किरण"  - डर  या हिंदी सिनेमातील हे गाणे अजूनही अनेकांच्या हृदयाचा ठाव घेऊन आहे.

भावगीतातील मंगेश पाडगावकर/ यशवंत देव या जोडीचे हे एक गीत

मी मजला विसरावे
बुडुनि सुरातच जावे
बासरी न दूर सखे, ती  माझ्या अंतरी

दूर आर्त सांग कुणी छेडली 'आसावरी'
पारिजातकुसुमे ही उधळिली मनावरी

हृदयस्पर्शी का भावस्पर्शी तुम्हीच ठरवा.

 लता दीदींनी गायलेले 'बडी बहन' या हिंदी सिनेमा मधले
'चले जाना नाही नैना मिलाके'   किंवा दीदींनीच गायलेले ' लो आ गयी उनकी याद '  हे दो बदन या हिंदी सिनेमातील गाणे असेल. एका पेक्षा एक गाणी म्हणता येतील ही.

'आसावरी राग' आपल्याला काही संगीत नाटकातून ही  भेटतो

'संगीत मृच्छकटिक' या नाटकात देवल लिहितात
काय वंदीन मी ती सुमती ! नवयुवती अबला साश्रुलोचना !
धरुनी कुरलकुंतला या हाती !!

' संगीत मानापमान ' मध्ये खाडिलकरानीं  रचलेले पद :-
प्रेमभाव जीव जगी या नटला ! एकचि रस प्याला !!

तर ' संगीत शारदा' मध्ये  बालगंधर्व गातात :-
हासु  काय सुटले मी म्हणुनी
का रडूं हे मस्तक पिटूनि
लग्न होय कीकुंवार अजुनी
हरहर देवा काय विडंबन !!
( चला शेवटी विडंबन हा शब्द आसावरी रागातील एका नाट्यपदांत मिळाला तर 🙂)

मंडळी छान वाटलं ही काही जुनी गाणी आठवून ?
लेख आवरता घेण्यापूर्वी एक अवांतर :  जसं ' केदार ' नावाबद्दल काही ऋणानुबंध होते तसेच ' आसावरी' या नावाशी  ही आमचे ऋणानुबंध आहेत.
 ' आसावरी वाईकर '  ( माहेरची केळकर ) सध्या चेन्नई स्थित ही आमची मैत्रीण . मैत्रीण म्हणण्यापेक्षा छोटी बहीणच म्हणू. आता तिची अधिक ओळख ' अभिजात शास्त्रीय संगीत गायिका'/ शिक्षीका म्हणून करून देऊ की एक मराठी साहित्य  क्षेत्रातील 'उदयोन्मुख लेखिका' अशी करून देऊ हा जरा प्रश्नच पडलाय मला. सध्या तरी या दोन्ही क्षेत्रात तिने अतुलनीय यश मिळवले आहे. तिच्या पुढील वाटचालीस  शुभेच्छा. 
शाळेतल्या कुठल्याही कार्यक्रमाला
 'स्वागत गीत' म्हणणारी आसावरी ( सोबत नीलांबरी, संजीवनी )  आणि हर्मोनियम वाजवायला अस्मादिक ही जुनी आठवण. त्यावेळी आमच्या टुकार पेटीवादनाला सहन करून सांभाळून घेणारी आसावरी  ते  अगदी  काल आईला फोन करून अमोल 'चांगला लिहितो'  हे आवर्जून सांगणारी आसावरी. असे कौतुकाचे शब्द मिळाले की 'टूकारपणा ' करायला जास्त हुरूप चढतो. असो .😊

तर  या लेखनाचा शेवट
 ( ' आसावरी रागांतीलच ' ) एका छान गाण्याने

कुठे कुणाच्या घडल्या भेटी,
गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयाची गाथा,
सूर अजूनही गाती

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
दोन दिसाची रंगत संगत , दोन दिसाची नाती

भेटू परत कधीतरी , कुठला तरी राग घेऊन

 📝अमोल केळकर
poetrymazi.blogspot.in
२९/०५/१९
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...