नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, May 17, 2021

चेक मेट


 

*कसोटी -  ते २०/२०* 'चेक मेट'


प्रणवने नुकताच बुध्दीबळाचा आँन लाईन क्लास लावलाय. त्याला ही आपल्या सारखी आवड आहे हे पाहून खुप बरे वाटले. एक दोन वेळा आँन - लाईन क्लास ऐकण्याचा ही योग आला. मँडम तर छान समजवून सांगत होत्या पण विचारलेल्या प्रश्णांची उत्तरे प्रणवला देता येत होती, काही चुकत होती पण या ६४ घरांची गोडी प्रणवला लागलीय हे पाहून समाधान वाटले.  हे कारण एक पुरेसं होतं मला भूतकाळात डोकावयाला.


साधारण मे महिन्यातच सांगलीत 'नूतन ' बुध्दीबळ स्पर्धा असायची. या स्पर्धेमुळे या खेळाची गोडी लागली.  शाळेतल्या बुध्दिबळ स्पर्धेत ही भाग घेऊ लागलो. यातली शाळेतील ८ वी किंवा ९ वी ची स्पर्धा चांगलीच लक्षात राहिली आहे. ( सन १९८९ किंवा ९० असेल ) मी,  एक मुलगी आणि एक मुलगा फायनल ला होतो. प्रत्येकाने प्रत्येकाशी खेळायचे. मी त्या मुलीला हरवायचो, ती मुलगी त्या दुस-या मुलाला हरवायची आणि तो मुलगा मला हरवायचा. असं दोनदा झाल्यावर शेवटी चिठ्ठ्या टाकून नंबर काढला आणि अपेक्षेप्रमाणे माझा २ रा का तिसरा नंबर आला. पहिला नंबर अर्थातच त्या मुलीचा. नंतर परत ११ वीत काॅलेजमधे स्पर्धेत नंबर येऊन या खेळाचा संबध संपला ते आता प्रणवच्या क्लासच्या निमित्ताने परत आला.

एक दिवस प्रणव म्हणाला क्लासमधील मुलांच्या पालकांसाठी मँडमनी "आँन लाईन रँपीड चेस काँम्पीटीशन ठेवली आहे " तुम्ही भाग घ्यायचाच,  जिंकायचेच वगैरे वगैरे ठरले.. म्हणलं खेळू की त्यात काय मोठ्ठं. मी शाळेत असं तसं खेळलोय वगैरे वगैरे हा ( over)  काँन्फीडन्स होताच.

ठरलेल्या दिवशी मँडमनी लिंक पाठवली. लाॅग - इन वगैरे झाले आणि २०-२० क्रिकेट सामना सुरु होताना जसे व्हायचे तसेच ८,७,६,५ वगैरे countdown सुरु होऊन एका पालकांबरोबर पहिला सामना सुरु झाला. 

१० मिनिटाचा सामना ( रँपीड चेस)  हा प्रकारच नवीन होता. बाबा किती विचार करताय, भरभर खेळा, तुमची वेळ संपतीय, ते बघा किती फास्ट खेळतायत. पटकन पटकन, प्रणवच्या या काँमेंट्री वर अभासी पटावरचा एक एक मोहरा धारातीर्थी पडत होता. काहीही समजतच नव्हते. आँन लाईन , मोबाईलच्या स्क्रिन वर स्पर्धा खेळतोय, समोर पट नाही, हे जुळवून घेता घेता नाकी नौ आले.  पहिल्याच सामन्यात १० मिनिटाच्या आधी पटावर माझा फक्त राजा राहिला पण राहूल द्रविड सारखी  चिकाटी सोडली नाही आणि हा ऐतिहासिक पहिला रँपीड चेस चा सामना 'स्टेल मेट ' करुन बरोबरीत सुटला/ सोडवला.


हु:श , 'ये अपने बस की बात नही' याची जाणिव झाली.आणि कसोटी क्रिकेट मधला राहूल द्रविड २०-२० मधे त्याच ताकतीने तितकाच यशस्वी होईल याची शाश्वती नाही हे पटले. ती स्पर्धा एखादाच विजय मिळवून आणि सर्व पालकांच्यात खालून दुसरा, तिसरा नंबर येऊन संपली.


आज अशीच परत पालकांच्यात रँपीड चेस स्पर्धा झाली. आज मात्र मागील अनुभवाने असेल पण जरा चांगली मजल मारली.


या अनोख्या स्पर्धेत समाविष्ट करुन घेतल्याबद्दल आणि पाल्या बरोबर पालकांनाही परत या खेळाची गोडी लावल्याबद्दल त्या मुलीचे , जी शाळेत चिठ्ठ्या टाकून पहिली आली होती आणि मी २ रा का तिसरा आलो होतो तिचे म्हणजेच आत्ताच्या क्लास घेणा-या मॅडम माधवी जोगळेकर ( शाळेतल्या माधवी खाडिलकर चे)  यांचे अनेक आभार. 🙏🙏😃


बाबा,  तुमची मैत्रिण आम्हाला शिकवते, तिला तुम्ही हरवलेत तेंव्हा रँपीड चेस स्पर्धा तुम्हीच जिंकणार हा प्रणवचा ही भ्रमनिरास झाल्याबद्दल खरंच धन्यवाद 


कारण सातत्य, अभ्यास,  सराव, चिकाटी  शिवाय विजय अशक्यच हे त्याला समजले 😊 


अर्थात आज समुहात प्रणवचे ( प्रती त्याच्या बाबांचे म्हणजेच माझे ) विषेश कौतुक केल्याबद्दल ही कृतज्ञता. 


या बुध्दीबळा मधील सर्वांची वाटचाल 'प्यादे ते वझीर' अशी यशस्वी ठरो यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा 

💐💐


(बुध्दीबळातला ♟️)अमोल केळकर

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...