नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, July 24, 2019

अंधाराची' खंत तू कशाला करशी रे....


*'अंधाराची'  खंत  तू कशाला करशी  रे*...🌌

मंडळी  नमस्कार 🙏🏻

आज परत एक  वेगळा विषय मांडतोय.  दिवसातल्या २४ तासात सरासरी  किमान १२ तास  तरी या  गोष्टीशी आपला संबंध  येतोच. किंबहुना आपल्या जन्माआधी ९ महिन्यापासूनच याची आपल्याला ओळख व्हायला सुरवात झालेली असते त्यामुळे प्रत्यक्ष भूतलावर जेव्हा आपला अवतार होतो तेव्हा काही अपवाद ( बालपण )  वगळता आपण नकळत याच्याशी जुळवून घ्यायला लागतो. हाच तो
' *अंधार* ' . अगदी जीवनात प्रत्येक टप्प्यावर भेटणारा, नवीन गोष्टी शिकवणारा पण तरीही सहजा सहजी ' हवा हवासा ' न वाटणारा.

दिवस म्हणजे  प्रकाश आणि रात्र म्हणजे अंधार आणि  रात्रीचा / अंधाराचा  रंग काळा म्हणून  अंधाराचे प्रतीक असणा-या 'काळ्या' रंगाला ही नकळत नाकारले जाणे हा मानवी स्वभावच म्हणायला पाहिजे ना ? उदा. मंगल प्रसंगी ( काही अपवाद वगळता ) काळे कपडे न घालणे, शक्यतो काळ्या रंगाची गाडी न घेणे, बुद्धीबळ खेळात काळ्या सोंगटीने खेळणारा
पांढरी सोंगटी घेऊन खेळणा-याच्या नंतरच खेळणार,कॅरम मधे ही काळ्या सोंगटीला कमी गुण ते  अगदी काळे- गोरे  वंशवादा पर्यंत लिहिता येईल. पण तो विषय नको.

कुठल्याही घरात जास्त दंगा केल्यावर  तो बघ हं तिथे अंधारात ' बागुलबुवा ' आहे अशी भीती घातला गेलेला  चिंटू, बंडू , मोनू  नसेल असे शक्य वाटत  नाही. वयाने मोठे झाल्यावर 'जा रे  त्या खोलीतून अमुक गोष्ट घेऊन ये 'असे सांगितल्यावर  कुठल्याही घरात , ' नाही बाबा मला भीती वाटतीय, अंधार आहे , कुणी तरी लाईट लावून द्या '  असे बोल ऐकायला मिळाले नसतील असेही  वाटत नाही.

 ' *अरे जा काही होत नाही आम्ही आहोत इथे* ' हे पाठींब्याचे बोल आणि संध्याकाळी अंधार पडला की
  ' *शत्रूबुध्दी विनाशाय , दीपज्योती नमोस्तुते  ही प्रार्थना* ' या गोष्टींनी  मात्र लहानपणी
' अंधाराशी ' दोन हात करायाला बळ दिले  हे खरं.

आणि मग अंधाराशी हळूहळू  मैत्री व्हायला सुरुवात झाली . नाट्यगृहात/ सिनेमात खेळ चालू होण्यापूर्वीचा अंधार, अचानक रात्री जेवताना किंवा दूरदर्शनवर कार्यक्रम बघताना दिवे जाऊन झालेला अंधार ,  रातराणी बस मधे तिकीट काढून झाल्यावर डबल बेल वाजवून वाहकाने चालकाला दिवे बंद करण्याची सूचना दिल्यानंतर काही वेळात झालेला अंधार, आषाढात भर दुपारी  आकाश भरून झाल्यानंतर चा अंधार ते खास बायकोसाठी ( इथे आवश्यकतेनुसार मैत्रीण ही घ्यायला हरकत नाही ) कँडल नाईट डिनर साठी मुद्दाम जुळवून आणलेला अंधार ? किती विविध रूपे ना अंधाराची?

 मंडळी ,यात शाळेतीळ निकालाची प्रत आई - बाबा / नातेवाईकांच्या हाती लागल्यानंतर दिवसाही चमकलेले 'अंधारातील तारे'  फक्त विचारात घेतलेले नाहीत 🤩

पण खरं सांगू मला  या सगळ्या अंधारात एक अंधार खूप आवडायच्या जो मी अजूनही  एन्जॉय करतो तो म्हणजे
 ' बोगद्यात ' गेल्यावर होणारा अंधार. अगदी आजही मुंबई - पुणे  मेगा हायवेवर कामशेत असू दे, भागतन असू दे किंवा खंडाळ्याचा बोगदा असू दे  अगदी स्वतः गाडी चालवत असलो तरी  वाटत मस्त लहानपणी  जेव्हा  ' पेशवे पार्कात 'फुलराणीत' बसून गाडी बोगद्यात गेल्यावर  किंवा शाळेच्या सहलीतून  सज्जनगडला जाताना 'अजिंक्य तारा ' किल्याच्या  बोगद्यातून सगळ्या मित्रांसकट  जोरजोरात ओरडायचो तसे ओरडावे.  घेतलीय तुम्ही  अशी मजा ओरडण्याची.????

लहानपणी सांगलीत राजवाड्याच्या तटबंदीतून जाताना लागाणारा बुरुज/ प्रवेशद्वार म्हणजे एक लहान बोगदाच वाटायचा , पुण्याला लहानपणी मामा कडे जाताना लागणारा कात्रजचा बोगदा, पुढे  लोणावळा- खंडाळा  रेल्वे रस्ता मार्गावरचे , कोकण रेल्वे वरचा रत्नागिरी जवळचा  सगळ्यात लांब बोगदा आणि इतर बोगदे , कल्याण ठाणे मधील पारसिक हिल बोगदा , अगदी बेलापूर मधील हार्बर लाईनवर असलेला बोगदा , माथेरानला टाॅय ट्रेन मधून लागणारा बोगदा ,कामानिमित्य कसारा- नाशिक , जबलपूर पर्यत लागलेले बोगदे  ते अगदी आजकाल तयार झालेला कर्जत - पनवेल नवीन मार्गावरचा बोगदा  ते ईस्टर्न फ्री वे वरचा चेंबूरचा बोगदा

 यासगळ्यांनी एकच शिकवलं   आयुष्यात अनेक टप्प्यावर  , वेगवेगळ्या वेळी , वेगवेगळ्या कालावधीचे बोगदे (प्रती) अंधार  येईल पण  त्यानंतर असेल फक्त प्रकाश ...

तेव्हा
 ' *अंधाराची'  खंत  तू कशाला करशी  रे ....... गा प्रकाश गीत*

आता गाण्याचा विषय निघालाच आहे तर ' अंधारावरची काही गाणी/ कविता पाहू

तिन्ही सांजा झाल्यावर  जेव्हा अंधाराची चाहूल लागते तेव्हा
 " चिमणी आई" ही आपल्या पिल्लाना साद घालताना म्हणते

" दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर
अशा अ वेळी असू नका रे आईपासून दूर
चूक चूक करिते पाल उगाच चिंता मज लागल्या
या चिमण्यांनो  परत परत फिरा रे घरा कडे आपुल्या ,
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या.

देऊळ सिनेमा त ही एक असंच गाणं आहे.  जीवनात एका टप्प्यावर  खूप निराश झालेला एक भक्त स्वामी समर्थांची याचना करता ना म्हणतोय ,

" अंधार  दाटला  दाही  दिशाना , सांगावे कसे मी सा-या जगाला..... रे स्वामी राया  "

मनाची एकदा समजूत झाली  की "भिऊ नकोस , स्वामी तुझ्या पाठीशी आहे" की
मग हे " अंधाराचे जाळे फिटून , वाटतं ( आता)  झाले मोकळे आकाश "

एकंदर उत्साह  वाटायला  लागतो  अशावेळी  ही प्रकाशाची पणती जपून ठेवायची.

थोडा उजेड ठेवा , अंधार फार झाला
पणती जपून ठेवा, अंधार फार झाला

आले चहू दिशांनी तुफान विस्मृतींचे
 नाती जपून ठेवा, अंधार फार झाला

मराठी विज्ञान परिषद ( मुंबई ) यांनी एक 'विज्ञान गीत'  त्यांच्या संकेतस्थळावर दिलय. त्याचे धृपद किती छान आहे बघा

संपला अंधार आता , सूर्य ज्ञानाचा उदेला
लागल्या वाटा दिसायला, शक्ती लाभे चालण्याला !!

मंडळी लेख आवरता घ्यायची वेळ आली. तुम्हाला खोटं वाटेल पण काल आषाढ  कृष्ण पक्षाच्या सप्तमीला ' *अंधेरीच्या* ' लोखंडवाला गेटच्या बाहेर बसून हा लेख मला सुचला आहे.😬
 तुम्हाला नक्की आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो

प्रकाशाच्या  एका किरणाने
" श्रावण "  फुलू दे जीवनात
माफ करा मंडळी  जर
काही चुकलं असेल लिहिण्यात.

📝 अमोल केळकर
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...