नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, July 15, 2019

चंद्रयान चंद्रग्रहण आणि व्हाट्सप




मंडळी तांत्रिक अडचण वगैरे  आली हे एका दृष्टीने बरंच झालं म्हणा. तसही ' मूळ' नक्षत्रावर यान सोडले जाणे  हे उचित झालेच नसते. ' मूळपदावर ' येणे हाच ' मूळ नक्षत्राचा मूलमंत्र असतो. काय योगायोग बघा ना ५६ मिनिटे बाकी असतानाच  हे लक्षात आले. आता गेल्या काही वर्षात  ५६ या अंकाला  भारत भूमीत आलेले  महत्व पाहता   ही विष्णू कृपाच  नव्हे काय ? .

काय उपयोग मग त्या  अध्यक्षांचा जे  कुठल्याही मोठ्या कार्यक्रमा आधी तिरुपतीला जाऊन बालाजीचा आशीर्वाद घेतात, नारळ फोडतात . एक साधी गोष्ट लक्षात येऊ नये की  ' 'चंद्र ग्रहण' लागतंय. बिचारा चंद्र त्या धनु राशीतुन ' केतू ' पासून कसं  वाचायचं या विचारात असताना , आडाखे बांधत असताना  अगदी  त्याचवेळेला ते यान  सोडायचे का?  चाललं असत की जरा मागे  पुढे. ' दे दान सुटे गि-हाण ' असा जयघोष झाल्यानंतर होता की बक्कळ वेळ.

तरी नशीब ते  लंडन वाले 'साहेब' तरी  थोडक्यात बचावले आणि कप हाती लागला त्यांच्या. अहो चंद्राची कृपा होती त्याच्यांवर म्हणून वाचले.  असं कसं म्हणून काय विचारता ?  मारलेले
 " चौकार " मोजून त्यांना विजयी घोषित केलं गेलं ना ? मग ?
४ या अंकावर चंद्राचाच प्रभाव आहे, राशी चक्रातील 'कर्क रास' ( ४ नंबरची ) ही चंद्राची  त्यामुळेच  काळ पुरुषाच्या कुंडलीतील चतुर्थ स्थान ही  चंद्राचे मग  ' चौकारावर ' चंद्राचा प्रभाव नाही का मंडळी ? काही चुकत असले तर सांगा बर लगेच.

नाही म्हणले तरी या गुरु पौर्णिमेला आलेल्या ग्रहणाने
' गुरु ' महाराज ही तसे नाराजच आहेत म्हणा. जेव्हा कळलं त्यांना तेव्हापासून  ते वक्री होऊन
 ' मंगळाच्या वृश्चिक राशीत ' बसलेत. तेव्हा  आता एखादे मस्त ऊर्ध्वगामी नक्षत्र पाहून, गुरु मार्गी झाल्यानंतर  द्या पेटवून  चंद्रयान

मंडळी या  ग्रहण  काळात
 ' सांगेन मी गोष्टी युक्तीच्या चार '

ग्रहण पर्व हा आपला ' नियमित मंत्र ' सिध्द करण्यासाठीचा उत्तम कालावधी  आणि काहीही झाले तर सध्याचा आपला मंत्र एकच
' जाऊ आहारी,व्हाटसप वाटे भारी'

काही उपयुक्त गोष्टी सांगत आहे. नियम म्हणा हवं तर.  खाली दिलेले हे नियम   युवक , आजारी, वृध्द्व , गर्भवती , नोकरदार , व्यावसायिक सगळ्यां साठी समान आहेत.
ग्रहणाचा स्पर्श , मध्य , मोक्ष
 " वेळ"  अनेक ग्रुपवरून  तुमच्या पर्यत आली असेलच

हे ग्रहण रात्रीच्या तीस-या प्रहरात असल्याने  ३ प्रहर आधी म्हणजे दुपारी ४ वाजता आपला भ्रमणध्वनी , ऊर्जादेयक यंत्रे  इत्यादी काही मिनिटासाठी बंद करून सर्व उपकरणे स्वच्छ करावीत. ग्रहण स्पर्श होईपर्यत ती उपकरणे तशीच ठेवावीत व इतर कामे आपण करू शकतो का याचा अंदाज घ्यावा. हाताच्या बोटांना जरा त्रास होईल पण त्याकडे दुर्लक्ष करावे.

ग्रहण स्पर्श  सुरु होताच भ्रमणध्वनी हातात घेऊन डोक्याला दोन -तीनदा लावून चालू करावा  गरज असल्यास ऊर्जा देण्याची व्यवस्था करावी.

 चंद्र हा मनाचा कारक ग्रह असल्याने  सर्वच समूहातील
' मनाला लागलेले संभाषण ' हुडकण्यास सुरवात करावी . या प्रसंगी तारांकित केलेले संभाषण ही शोधावे आणि ग्रहण मध्य असतानाच ते सर्व जपून ठेवलेले संभाषण  उडवावे. त्यानंतर जास्त श्रम झाले असतील तर परत भ्रमणध्वनी बंद करून ठेवावा.

आता शेवटाचा टप्पा. मोक्ष काल. ग्रहण संपायचा काळ .

आधीचे  भ्रमणध्वनीतील संभाषण जे आपण उडवले ते मनात मात्र अजूनही असण्याची शक्यता असेल  तेव्हा या कालावधीत तुम्हाला हे संभाषण आपल्या मनातूनच कायम उडवायचे आहे. हे सर्व झाले की  तुम्ही निद्रा- देवीच्या अधीन व्हायला हरकत नाही

वि सु : - मेष , मिथुन , सिह , वृश्चिक यांना या ग्रहणाचे
' मिश्र फळ '  असल्याने यांनी शक्यतो खास समूहातील  सगळेच मेसेज ' डिलीट ऑल ' करावेत

वृषभ, कन्या, धनु , मकर  राशीच्या लोकांना ग्रहणाचे
' अनिष्ट फळ '  असल्याने त्यांनी शक्यतो सध्याचे पहिले  व्हाटसप घालवून  परत नवीन व्हाटसप उतरवून घ्यावे

पहाटे जेव्हा
 ' दे दान - सुटे गी-हाण  ' चा गजर होईल तेव्हा  तुमचा भ्रमणध्वनी आणि तुमचे स्वच्छ मन  परत तयार होतील सगळीकडे आनंदाचे गुच्छ पाठवायला  🌺💐🙂

📝अमोल केळकर
poetrymazi.blogspot.in
१५/७/१९
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...