....इथे लिहिण्यात आलेल्या या लेखाद्वारे कुठल्याही व्यक्ती, पक्ष, नेते , जात , धर्म, पंथ , राष्ट्र , संस्था , आदरस्थान यांची कुचेष्टा करण्याचे किंवा कुणाच्याही भावना दुखवण्याचे कुठलेही प्रयोजन नाही. हा लेख विरंगुळा या सदरात मोडतो आणि केवळ मनोरंजन व थोडीशी खुशखुशीत टीका - टिप्पणी हा उद्देश आहे. रसिकांना हे आवडेल अशी आशा व्यक्त करतो.-- अमोल केळकर
--------------------------------------------------------------------------------------------------
" तुम्ही यायलाच पाहिजे, मला तुमची हजेरी घ्यायची आहे "
पहाटे, पहाटे ' काकस्पर्श संघटना ९१ ' च्या कार्यकर्त्यांना इमेल बोक्स मध्ये वरील निरोप मिळाला आणि सगळ्यानी एकच ' काव काव ' करायला सुरवात केली . लोकसभेतील पराभव आणि आगामी होणा-या निवडणुकीसाठी चिंतन बैठक हा विषय कार्यक्रम पत्रिकेवर मुख्यत्वे करून असणार हे सांगायला कुण्या जोतीषाची गरज नव्हती . ज्यांची हजेरी होणार होती त्यांनी ताबडतोब या झाडावरून त्या झाडावर जात जून्या जेष्ठ काकांकडे धाव घेऊन ,
' काका मला वाचवा ' अशी आरोळी ठोकली
संघटनेचे अध्यक्ष श्री डोम कावळे पुण्याहून आपले स्वीय सल्लागार श्री घुबडशास्त्री यांना घेऊन फास्टर मधून एकदम फास्ट निघाले आहेत असा मेसेज मिळताच स्थानिक कार्यकर्ते तातडीने पिंपळाच्या पारावर जमले. बैठक कुठे घ्यायची यावर कुणाचेच एकमत होईना. कुणी म्हणत होते आपण आपल्या जून्या ऑफिसच्या प्रांगणात म्हणजे अमरधाम स्मशान भूमीत जमू तर कुणी विष्णू घाटाचा घाट घालत होते , याचवेळी एकाने सांगितले की विष्णू घाट मेनेंजमेंटने घाटावरील वडाचे झाड यापुढे कुठल्याही संघटनेला मिळणार नाही असा ठराव नुकताच पास करून घेतला आहे आणि हा त्यांचा अंतिम निर्णय आहे. शेवटी एका सदस्याने सुचवले की, कृष्णा नदीच्या मोकळ्या काठावर एका चिंचेचे मोठे झाड आहे , बागेतल्या गणपती देवळा मागे बरोबर पाचवे झाड तिथे जमू . जरा लवकरच बैठक ठेवू . म्हणजे रात्रीच्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमाच्या पुरण पोळीवर ताव मारता येईल .
ठरल्या प्रमाणे बैठक सुरु झाली . विभागावर विश्लेषण केले असता दिसून आले की सरासरी १० पिंडांमागे फक्त २ पिंडावर या संघटनेच्या कावळ्यांनॆ चोची ची मोहोर उठवली होती. हे प्रमाण खूपच कमी होते. हे प्रमाण वाढण्यासाठी खालील काही उपाय सुचवलेले गेले
१) जात - पात न मानता सर्व जातीच्या पिंडाना यापुढे चोच मारायची ( शिवायची ) परमिशन द्यावी
२) सर्व तालुक्याचे गटप्रमुख विभागवार १० व्या ची यादी तयार करतील आणि दोन दिवस आधी ती प्रकाशित केली जाईल
३) शेवटची चोच कुणी मारायची याचा निर्णय हाय कमांड घेईल
४) विरोधकांना काबूत ठेवण्यासाठी , घुबड शास्त्री एक अॅप तयार करतील जे लवकरच गुगल प्लेवर डाऊन्लोड करण्यासाठी उप्लब्धद असेल
५) संघटनेच्या सिट्स वाढण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनाही पिंडाला शिवण्यास परवानगी द्यावी अशी एक मागणी पुढे आलॆ. अर्थात अंतीम निर्णय दिल्लीहून सुषमा कावळे घेतील असे ठरले
यापुढे एकत्र काम करत १० पिंडामागे ५ तरी मोहोर ' काकास्पर्ष संघटनेच्या असतील असा ठाम विश्वास व्यक्त करत सभा पार पडली
( संक्ल्पना : अमोल (काव) कर )