क्रिएटिवीटी रोज एक , भले असो टुकार अन फेक ; a.kelkar9@gmail.com, ९८१९८३०७७० (अपराध माझे कोट्यानुकोटी , तरीही करितो अजून एक कोटी ) ...संकल्पना : अमोल केळकर
नक्की ऐका
मी विडंबनकार कसा झालो
नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा आज दि. १६ सायं. ७ वा. l भाग २८९ l कथावाचन l लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Saturday, January 25, 2025
Wednesday, January 22, 2025
माझी_फुसकुंडी
कलियुगातील कुंभमेळ्यात
भक्तांना गावली मोनालिसा
सेल्फी काढून घेण्यासाठी
खाली करतायत स्वतःचा खिसा 😁
#माझी_फुसकुंडी📝
२३/०१/२५
Thursday, January 16, 2025
Tuesday, January 14, 2025
गोड बोलायाचे आहे पण.
मकर संक्रांत स्पेशल ( कुसुमाग्रजांची माफी मागून)
'गोड' बोलायाचे आहे पण बोलणार नाही
समोरच्या ताटातले 'लाडू' मोजणार नाही
माझ्या अंंतरात गंध 'गुळपोळीचा' दाटे
पण जिभेला तुपाची सवय सुटणार नाही
वाटीतल्या 'तीळ-गूळाचे' मला गवसले गुज
परि 'हलव्याचे काटे' मला टोचणार नाही
वडी तिळाची एकटी, दिसे तिथेच कडेला
होणे गायब कोणाला तिचे कळणार नाही
दूर पूर्वेकडे दिसे एक गाव पुणेरी
त्याचा दोष बोलण्याचा,कधी लाभणार नाही
माझ्या फुसकुंडीने झालो टवाळखोर जनी
त्याच्या गोडव्याचा कधी, रसभंग होणार नाही
'तीळगूळ घ्या गोड बोला'
#माझी_फुसकुंडी
#माझी_टवाळखोरी
#मकर_संक्रांत
१४/०१/२५ 📝
Saturday, January 11, 2025
Sunday, January 5, 2025
नववर्षाची_सुगंधीसंध्या
#नववर्षाची_सुगंधीसंध्या 🎼🎤
( आमची नववर्षातील पहिली फुसकुंडी)
काल पनवेलला वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महेश काळेंच्या या कार्यक्रमाला जायचा योग आला. जुने पनवेल इथे हे नाट्यगृह आहे. या नाट्यगृहात पोहोचल्यावर,विष्णुदास भावे नाट्यगृह आणि सांगली आठवली. जुने पनवेलचे वातावरण, परिसर ,रसिक प्रेक्षक अशा अनेक गोष्टीत साम्य वाटलं.
वर्षातील पहिल्याच विकेंडला शास्त्रीय +उपशास्त्रीय मैफिली साठी भरलेले नाट्यगृह पाहून काळे बुवा ही खुष झाले आणि उपस्थितांचे अभिनंदन करुन 'बंदिश' सुरु केली.
गाणे सादर करता करता बुवा प्रेक्षकांशी संवाद साधत होते. असंच बोलताना ते म्हणाले की हा जो मागे तंबो-यावर मला साथ देत आहे तो तुमच्या पनवेलचा आहे बरं! दहावी पासून सुरु केलाय रियाज आणि आज तो केमिकल इंजिनिअरींगच्या दुस-या वर्षाला आहे. हे ऐकून क्षणभर अंगावर रोमांच आले.
हर्षा भोगले पासून अमोल केळकर पर्यंत वाया गेलेल्या केमिकल इंजिनिअर्स मधे दोन वर्षांनी अजून एकाची भर पडणार असा विचार मनात आला. कदाचित हा विचार बरोबर नसेल माझा पण काळे बुवांना साथ देणारा गायक नंतर लोटे-परशुराम मधील एका केमिकल कंपनीत कन्ट्रोल रुम मधे बसून कुलींग टाॅवरचा व्हाॅल चालू-बंद करतोय, प्रेशर व्हेसल मधील तापमान सेट करतोय वगैरे विचार त्याक्षणी तरी मला एकदम चुकीचे वाटले.
मनातली ही रिअँक्शन इतकी पुढे गेली की बुवांच्या मागे जो मोठ्ठा फलक लावला होता ( वरच्या चित्रात बघू शकाल) त्यातील. 'पांढरे ढग' हे केमिकल कंपनीतून बाहेर पडणारे विषारी वायू वाटू लागले आणि तंबोऱ्याची सावली ही चेंबूरच्या RCF कंपनीतील युरिया टाँवर वाटू लागला ( बघा परत एकदा चित्र)
अर्थात सुदैवाने काळे बुवांमुळे वेळीच ही रिअँक्शन थांबली जेंव्हा त्यांनी तंबो-याला " नादब्रह्म " हा शब्द सांगितला. ( इतके दिवस नादब्रह्न म्हणजे इडली हेच आम्ही समजत होतो) आणि पुढच्या इतर बंदिशींची, नाट्यसंगीत,सुगम,भावगीतांच्या कँटेलिस्टने आम्ही वेळीच 'नाद'ब्रह्माच्या केमिस्ट्रीत तल्लीन झालो.
दोन - अडीच तासाची मैफिल संपली आणि पडदा पडत असताना प्रेक्षकां मधून आवाज आला ' कानडा राजा पंढरीचा '
प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रम संपल्या नंतर परत ७ मिनीटे जे काळे बुवा गायले तिथेच आमचे पैसे वसूल झाले.
काळेंनी मैफिलीत जे एक गाणे ऐकवले तेच जरा वेगळ्या शब्दात
'जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले
गोड गाणे ऐकले, महेशाचे
( संगीत प्रेमी) अमोल
६/०१/२५
ता.क : ज्यांची आयुष्यात गाणं शिकायची इच्छा अपूर्ण राहिली असेल त्यांनी महेश काळेंच्या कार्यक्रमाला जावे, निम्मा वेळ ते प्रेक्षकांना गाणे शिकवण्यात घालवतात. आयोजकांनाही विनंती की त्यांनीही बुकिंग साईट वर उल्लेख करावा की एवढे जास्त तिकीट हे गाणे ऐकणे+ शिकणे याचे आहे.
म्हणजे आमच्या सारख्या फक्त गाणे ऐकायला इच्छुक असणाऱ्या रसिकांचा भ्रमनिरास होणार नाही 😉