नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Sunday, November 16, 2014

९० मिनीटाचा उपवास …


ए , " एलिझाबेथ म्हणजे काय रे ?"
ते एका राणीचे नाव आहे !
हो, पण अर्थ काय ?
एलिझाबेथ म्हणजे, टिकाऊ !
टिकाऊ ?
हो , ती खूप वर्ष टिकली ना !!
" दगड ! दगड ! दगड ! दगड ! "





एलिझाबेथ एकादशी या सिनेमातील हा संवाद. अशा अनेक संवादाने, लहान मुलांसहित सर्वांच्या उत्तम अभिनयाने नटलेला, सरळ,सोपा कौटुंबिक सिनेमा " एलिझाबेथ एकादशी" !
एकादशी म्हणले की आठवतात ते वर्षातल्या दोन महत्वाच्या एकादशा . अर्थात पंढरपुरचा विठूराया आणि एकादशीचे अतूट नाते. वर्षातील दोन महत्वाच्या एकादशीपैकी कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाचे कथानक गुंफले आहे







सिनिमाच्या सुरवातीची काही मिनिटे " श्रीहरीच्या " सकाळच्या पूजेच्या दृश्याने होते . यावेळेचे पंढरीच्या राजाचे जे दर्शन चित्रीत केले आहे ते केवळ अप्रतीम. अभ्यंग स्नान ते आरती फारतर २-४ मिनिटे पण त्या विठूरायाचे जे दर्शन मिळते ते खरोखरच सुरेख. संपुर्ण सिनेमाचे चित्रीकरण, विषय पंढरपूरशी संबंधीत असूनही हा देवळातील विठोबा सिनेमात दिसतो तो फक्त सुरवातीला. त्यानंतर अगदी शेवटी नेहमीप्रमाणे सिनेमाचा शेवट गोड होतो(चमत्कार होऊन)तो होण्यासाठी दिग्दर्शक परत या विठोबाकडे येत नाही ही मोठी जमेची बाजू . नाहीतर विठूरायाला साकडे घालून, मोठे मोठे संवाद म्हणून चित्रपटाची लांबी १० - १५ मिनिटाने तरी लांबवता येणे सहज शक्य होते . असो
एका गरीब कुटुंबातील आई, आजी, छोटा मुलगा ( ज्ञाना ) त्याची बहिण ( झेंडू उर्फ मुक्ता ) यांचे हे कथानक . घरातल्या घरात मशीनवर कपडे विणून चरितार्थ चालवणारी आई , तिचे हे मशीन कर्जाची परतफेड न केल्याने जप्त होते. पैसे भरण्याची अंतीम तारिख दिल्यानंतर , आणि किती पैसे भरल्यावर हे मशीन परत मिळेल हे सांगितल्यावर संपुर्ण कुटूंब कसा प्रयत्न करते याचे हे कथानक ..









ज्ञाना, झेंडू , गण्या आणी इतर मित्र यांचा सहजसुंदर अभिनय, प्रासंगिक विनोद , उत्तम संवादलेखन हा या सिनेमाचा आत्मा
हा सिनेमा मला एका दृष्टीने वेगळा वाटला ते म्हणजे श्रध्दा आणि शास्त्र यांचा घातलेला योग्य मेळ. पांडूरंगा बरोबरच संत न्यूटन यांचे विचार ही इथे दिले गेले आहेत. सिनेमात अवास्तावी धार्मिकता , अंधश्रध्दा दाखवणे सहज शक्य होते पण ते टाळण्यात यश आले आहे आणि ही मोठी जमेची बाजू . प्रामाणिक प्रयत्न,विश्वास आणि कृती तुम्हाला अपेक्षित यश देते हे इथे मुलाना समजून देण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे









" एलिझाबेथ एकादशी " च्या संपूर्ण टीम चे त्यासाठी अभिनंदन
मराठी सिनेमाला संजीवनी देण्यासाठी हा सिनेमा पहिला ' श्वास ' ठरो या शुभेच्छा 
आजकाल सिनेमा संपल्यानंतर एक ( प्रसिध्द ) गाणे दाखवणे ही हिंदी सिनेमाची पध्दत याही सिनेमात आहे . तेंव्हा पिक्चर संपला रे संपला की लगेच जाऊ नका. ज्ञाना , गण्या आणि झेंडु ने या गाण्यातही धमाल केली आहे ती बघूनच जावा ।







हा ९० मिनीटाचा एकादशीचा उपवास तुम्हाला नक्कीच २१ एकादशीचे पुण्य देईल ही आशा
आता परीक्षण म्हणले की १० पैकी या सिनेमाला किती गुण द्याल ? असा प्रश्ण आला
मी तरी १० पैकी ८ गुण देईन
२ मार्क का काटले? माहित नाही पण मराठीत पैकीच्या पैकी गुण मिळत नाहीत ना भौ …।
परीक्षक ) अमोल केळकर
सी ५, ३३, ०:२, सेक्टर ५
सीबीडी बेलापूर , नवी मुंबई
९८१९८३०७७०
a.kelkar9@gmail.com

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...