नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Sunday, March 17, 2019

सोशल मिडीयावर व्यक्त होताना


सोशल मीडियावर व्यक्त होताना :- 📝
( तुषार पुरवणी- १७/३/१९)

मला आठवतंय  शाळेत असताना मराठीच्या परीक्षेला  हमखास एक निबंध यायचा 
 ' मृत्यू  शाप की वरदान '   किंवा  ' विज्ञान शाप कि वरदान'. आता सध्या  कुठल्या प्रकारचे  निबंध  येतात माहीत नाही पण  सध्याची परिस्थिती पाहता
 ' सोशल मिडीया -  शाप की वरदान '  असा निबंध  एक दिवस मराठीच्या पेपरात आला तर आश्चर्य वाटायला नको.  

साधारण ९० च्या दशकात  म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो  तेव्हा  मीडिया म्हणजे  वृत्तपत्रे , दुरदर्शनवर ठराविक वेळे पुरते लागणारी एकच वाहिनी  ते सध्याचे २४ x ७  अखंड पणे  ' ब्रेकींग न्यूज '  बातमीचा रतीब  घालणा-या असंख्य वाहिन्या  होण्याइतपत  "मीडियाचे सोशल होणे " हा काळाचा महिमाच म्हणावा नाही का ? . 

सगळ्यात पहिला बातमी कोण देतो याची चढाओढ , सर्वात आधी, जणू काळाच्या ही पुढे आम्ही आहोत असे स्वत:ला समजणा-या   वाहिन्या  हे माझ्या मते  समाज माध्यमात तेढी पसरवण्यास कारणीभूत ठरणारे पहिले विषाणू.  कारण बातमीतील  
सत्यता - असत्यता न पाहता सर्वात आधी बातमी ( मग ती  खरी खोटी कशी का असेना  ) देण्यातच ते धन्यता मानत .अर्थात  याला अपवाद होते/ आहेत पण मर्यादित स्वरूपात. 
तरी  पण काही वर्षांपर्यत  परिस्थिती  जरा बरी होती असे म्हणावे लागेल कारण बातम्या बघण्यासाठी का होईना घरात  इडियट बॉक्स समोर बसावे लागायचे. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाने जेव्हा या सगळ्या बातम्या भ्रमणध्वनीवरून  
(मोबाईलवरुन )  क्षणात अंगा खाद्यावर  खेळायला लागल्या  तेव्हा परिस्थिती  बदलायला लागली. वेगवेगळे अॅप्लिकेशन मुख्यता ' फेसबुक '   एकेकाळी संगणकावर वापरावे लागायचे किंवा संदेश पाठवण्यासाठी  मुख्यतः ईमेल  याचा वापर व्हायचा.  आता आधुनिक भ्रमणध्वनी द्वारे २४ x ७  सर्व गोष्टी ( माणसे, बातम्या आणि अफवा ) खूपच जवळ आल्या आणि एक अपडेटेड सोशल विषाणू  हळूहळू तयार झाला . 

फेसबुकच्या मदतीला ट्विटर, व्हाट्सअप, इंस्टाग्राम  ही बहीण भावंडे आली .
 दुरावलेले मित्र , लांब राहणारे नातेवाईक  याची भेट घालून द्यायला यांनी मोठा पुढाकार घेतला. नवी नवीन  सोई -सुविधा त्यात येऊ लागल्या . बालपणीच्या शिशु विकास मंदिर पासून उच्च शिक्षणाचे ग्रुप , नातेवाईक, सम वयस्क , सम विचारी असे असंख्य ग्रुप तयार होऊ लागले. सुरवातीचे ' सुप्रभात  - शुभ रात्री - वाढदिवसाचे मेसेज'   याचे नाविन्य कमी होत गेले आणि मग सोशल मिडीयाचा हा विषाणू आपले रंग दाखवू लागला. याचा खुबीने उपयोग करून घेतला  समाजविघातक घटकांनी. दुर्दैवाने बरेचजण याला बळी पडले. बघता बघता रौद्र रूप धारण केलेल्या या राक्षसाने  मग मागे वळूनच पाहिले नाही. 

आपल्याला हवी ती  बातमी  ' ब्रेकींग न्यूज'  च्या नावे  एका ग्रुप वर टाकून क्षणार्धात तिला साता समुद्रापार पोचवायचे कार्य या राक्षसाने इमाने इतबारे  पार पाडले.   

अनेक ठिकाणी निखळ मैत्रीची जी  जागा होती ती द्वेषाने घेतली,शब्दाला शब्द वाढले, धर्म-जात -प्रांत- भाषा - देश - पक्ष यानुसार आवडी निवडी ठरू लागल्या , प्रेमळ शब्दाच्या जागी विषारी डंख पसरू लागले आणि शेवटी  याच सोशल मीडियाला  
 'आनंद पसरवा , अफवा नको'  अशी जहिरात करावी लागली . 

त्यामुळे आज   प्रत्येकाने सोशल मीडियावर व्यक्त करताना काही आचारसंहिता  अमलात आणणे आवश्यक वाटते 

१) आपण एखादा मेसेज पुढे ढकलताना त्यात काही आक्षेपार्ह गोष्टी नाहीत ना, काही वाद - विवादाचे मुद्दे नाहीत नाही याचा विचार अवश्य करावा.  
२) ' ब्रेकींग न्यूज ' च्या नावाखाली सरसकट बातम्या पुढे ढकलू नयेत. त्याची सत्यता तपासावी . सत्यता नाही समजली तर गप्प बसेल तो सोशल माणूस कसला? या अशा प्रकारानेच अनेकजणांनी वेळेच्या आधीच 'हे राम' म्हणले.
३) एखाद्याने एखादा मांडलेला मुद्दा चुकीचा वाटला तर सभ्य पणे  निर्दशनास आणून द्यावे, आपले मत थोडक्यात मांडावे , मीच खरे असे म्हणू नये
कालांतराने ते मुद्दे कालबाह्य होतात पण आपण या मुद्यापायी एखाद्याशी कायमचे वैर पत्करून बसतो.
४) सारासार विचार , चांगल्या गोष्टीचे कौतुक , मैत्रीपूर्ण संवाद , वेळ प्रसंगी माघार या कृतीमधूनच यामाध्यमाद्वारे जी  एकमेकांच्यात जवळीक निर्माण झालेली आहे  ती कायम राहाण्यास मदत होईल 
५) आपण जरी चांगले असलो तरी  प्रत्येक व्यक्तीचा ( अपरिचित )  हेतू समजू शकत नसल्याने वयक्तिक  फोटो , टीका टिप्पणी , प्रत्येक गोष्टीची बारीक सारीक माहिती सोशल मिडीयावर देणे टाळावे किंवा आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंट वर काही विशिष्ठ सेटींग करून ठेवावे जेणेकरून कुणी आपल्या माहितीचा दुरुपयोग करणार नाही आणि ती माहिती फक्त ठराविक, विश्वासू व्यक्तीनाच कळू शकेल. 

मर्यादेत स्वरूपात सोशल मीडियावर व्यक्त होणे , काही चागल्या गोष्टींचा स्वीकार करणे यासारख्या लसी वेळीच टोचल्या नाहीत  तर हा विषाणू समाजमनाचा नाश केल्याशिवाय रहाणार नाही आणि याला आपण  सर्वचजण जबाबदार राहू 
हे कळकळीचे सांगणे.🙏🏻

📝अमोल केळकर


Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...