नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, October 7, 2019

अशी विडंबन येती, आणिक मजा देऊनी जाती


*अशी विडंबन येती, आणिक मजा देऊनी जाती*

मंडळी नमस्कार 🙏🏻

एखादा विषय घेऊन त्यावर गप्पा गोष्टी करायच्या या मालिकेतील पुढचा विषय 'विडंबन साहित्य '

खरं म्हणजे विजयादशमी / दस-याच्या आधी कशाला हा विषय? त्यापेक्षा धुळवडीला चालला असता हा विषय. आपट्याची पाने देऊन सोनं घ्या सोन्यासारखे रहा असं म्हणायचे हे दिवस. नंतर नाही का लिहिता येणार?

नाही, म्हणणं  बरोबरच आहे तुमचं.

होळी/धुळवड म्हणजे त्या दिवशी हास्य कवी संमेलने/ विडंबन काव्य हक्काने सादर करण्याचा दिवस. मात्र इतर वेळेला या साहित्य प्रकाराला फारसे जवळ केले जात नाही. त्यात ही दसरा/ पाडवा/ दिवाळी पहाट हे तर अगदी खास दिवस. यादिवशी असे साहित्य मुळीच नको. अशा विचाराने की काय हा साहित्य प्रकार फारसा लोकप्रिय होताना दिसत नाही.

चला थोडं बालपणीत जाऊ..

अगदी साहित्य कशाशी खातात हे माहीत नसताना म्हणजेच आपण अगदी लहान असताना आपल्या सगळ्यांनी  एक वाक्य हमखास आपल्या मित्राला नक्की म्हणायला लावले असणार.

आपण मित्रास: पाडवा म्हण पाडवा
मित्र : पाडवा
आपण : नीट बोल गाढवा 🤣

आणि मग सगळे हास्यकल्लोळात सामिल. मग तो मित्र इतरांची फिरकी घ्यायला पुढे
( आजच्या Whatsapp फाॅर्वर्ड च मूळ,  माझ्यामते तिथे आहे 😉)

तर विडंबनाचे बीज अशा पद्धतीने प्रत्येकाच्यातच लहानपणी असते पण पुढे पुढे जास्त कळायला लागेपर्यत एक तर नकळत ते उखडले गेलेले असते किंवा त्याचे बोन्साय झालेले असते. मग लहानपणीची निख्खळ मजा घेणारे आपण  मोठं झाल्यावर मात्र मजा घेऊ शकत नाही. काय बरं असावीत याची कारणे?

माझ्यामते विडंबन साहित्य हे मुख्यत्वेकरून
१) प्रासंगिक असते.  तो घडलेला प्रसंग लक्षात नाही आला तर विडंबनाची मजा घेता येत नाही.
२) काही वेळेला विडंबन ज्या मूळ गाण्यावर/ कवितेवर/ गझलेवर असतं ते मूळ काव्य माहित नसते.
३) 'विसंगती पकडणे' हा विडंबनाचा मुख्य गाभा असतो आणि राजकारणी सगळ्यात जास्त विसंगती करण्यात माहिर असतात. त्यामुळे विडंबनासाठी हा हक्काचा कच्चा माल असल्याने यावर सगळेच विडंबनकार तुटून पडतात. पण सृजन साहित्य प्रेमी राजकारण विषय नको या भूमिकेत असल्याने हे विडंबन साहित्य फारसे रुचिने वाचले जात नाही किंवा कळत नाही.
४) सगळ्यात महत्वाचे म्हणजे राजकारणात विषयातही ही तुम्ही त्यांचेच विडंबन करता विरोधी/ इतर पक्षाचे करत नाही असा आरोप होतो.

अहो जो कामच करत नाही त्यांचे कसले विडंबन?  😁

जे काम करतात, त्यांचीच विसंगती दिसून येते मग त्यांच्यावरच विडंबन येणार ना? 🙂

हे मुद्दे काही वेळा दुर्लक्षित होतात आणि हा साहित्य प्रकार फारसा आवडला जात नाही.
५) मनोरंजन या हेतूने न बघता काहीजण विडंबन वय्यक्तिक घेतात आणि मग विडंबनकाराना टिकेला सामोरे जावे लागते
( अगदी आचार्य अत्रें पासून केळकरां पर्यत कुणीही यातून सुटलेले नाही 😬 )

तर अशी ही विडंबनाची गाथा.  प्रसंग लक्षात आला तर मात्र नक्की करमणूक होते.✔✔

 अगदी घरात या भिंतीवरुन त्या भिंतीवर जाणारी ' पाल ' - *ही पाल तुरूतुरू चढती भिंतीवरती हळू* ( मुळ गाणे: ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु) अशा विडंबन काव्यातून पळायला लागते. 🦎

बायको माहेरी गेली की मग *तव्यावर केली मी बुर्जी बहाल, कसा आलाय रंग लाल जहाल* असं म्हणावं लागतं

अशा प्रासंगीक गोष्टीतून. विडंबनाचे  ' हे वेड मजला लागले' ( *हेल्मेट आज मी घातले'*)   ते इतकं की अगदी *वडा-पाव खाता खाता*( उष:काल होता होता) ही सहज विषय सुचू लागले. रस्त्यात रहदारीत अडकून ही मग  *'मी ओळखून आहे सारी तुझी वहाने*( मी ओळखून आहे,  सारे तुझे बहाने)

असा हा विडंबनाचा खेळ व्हाटसप वर रंगत गेला ' *खेळ मांडियेला व्हाटसप वरती बाई*( खेळ मांडियेला वाळवंटी बाई)  . हा खेळ आता इतका रंगात आलाय की *काय टाकिले व्हाटसपवरती*( काय वाढिले पानावरती)  याची उत्सुकता अनेकांना राहू लागली आणि मग *'रचिले अॅडमिनमुनींनी त्यांचे ग्रुप अनंत* ( रचील्या ऋषीमुनींनी त्यांच्या ऋचा अनंत)

हे सर्व शक्य झाले ते केवळ प्रासंगिक *'न्यूज पाहून सुचले सारे, टुकारच्या पलिकडले*( शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले)

चला खुप झालं वाचून,भूक लागली असेल तर *लाह्या लाह्या अखंड खाऊ या*( धागा धागा अखंड विणू या)  आणी म्हणू या *हाॅटेलचा हा तूला दंडवत* ( अखेरचा हा तूला दंडवत)  🙏🏻

📝🖊✏✒🖌
खंडे नवमी 🌷🙏🏻
७/१०/१९
poetrymazi.blogspot.in
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...