नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, May 18, 2020

आमचे 'बुद्धी चे बळ'


शालेज जीवनातील 'मे' महिन्याची सुट्टी फार महत्वाची असते. अनेकजण सहमत होतील. पाठ्यपुस्तका बाहेरील शिक्षण / अवांतर शिक्षण घेण्याची, एखादा छंद/ कला, एखादी नवीन गोष्ट शिकण्याची ती नामी संधी असायची.  आमच्या लहानपणी 'व्यक्तीमत्व विकास शिबीरे' काही ठिकाणी सुरु झाली होती. काहीजण स्वतंत्रपणे पोहणे, निवासी शिबीर, अनिवासी शिबीर ( इथे अनेकांना 'स्वामी' सर आठवत असतील ) , गाण्याचा क्लास, क्रिकेट कोचिंग,  तबला/ पेटी क्लास,  मल्लखांब, योगासन वर्ग इत्यादी अनेक गोष्टी करत. यातील ब-यापैकी गोष्टी मी ही केल्यात. साधारण महिन्याभरातील सुट्टीत १५ दिवस पुणे-मुंबई फिरणे आणि १५ दिवस हे सगळे असे अंदाजे गणीत असायचे.
याचसुमारास काही स्पर्धा सांगली परिसरात व्हायच्या. यात लक्षात राहण्यासारखी स्पर्धा होती ती 'नूतन बुध्दीबळ' संस्थे तर्फे घेतली जाणारी स्पर्धा. ३-४ वर्षे या स्पर्धेत अगदी उत्साहाने भाग घेतला ( त्या आधी फक्त शाळेतल्या बुध्दीबळ स्पर्धेतील विजयाचा अनुभव होता .वासरात लंगडी गाय शहाणी असेच जणू).

स्पर्धेचा खरा कस इथे लागला. संपूर्ण देशातून आलेले खेळाडू,  अनेक अनुभवी स्पर्धक , बाजूला घड्याळ ठेवून ,डाव कागदावर लिहिण्याचे कसब, टच टू मूव्ह चा नियम, धांदरटपणाने आपली खेळी करुन झाल्यावर घड्याळाचे बटण न दाबता आधी बटण दाबून मग खेळी केल्यावर पडसलगीकर सरांच्या खालेल्या शिव्या. मजा तेंव्हा यायची जेंव्हा दोन-चार फे-यात अमुक खेळाडू आघाडीवर असं लोकल पेपरात कुठेतरी अगदी लहान नाव यायच तेंव्हा. आज रविवारच्या पुरवणीत मोठाले लेख नावासकट आले तरी त्यावेळी पेपरात नाव आलेल्याचे मोल हे केवळ अमोल होते. ती मजा आता नाही.

पेपरात नाव यायला सुरवात झाली की तिकडे स्पर्धेत हळूहळू आमची घसरगुंडी व्हायला एकच गाठ पडायची कारण चार -पाच फे-या नंतर जे खरोखरच उत्तम खेळाडू होते त्यांच्याशी खेळावे लागायचे आणि तिथे काही डाळ शिजायची नाही.

नूतन बुध्दीबळ स्पर्धेत विजयी कधीच झालो नाही पण काही उत्तम खेळाडूञ बरोबर खेळायला मिळाले. एक दोन लढती प्रतिष्ठित खेळाडूंबरोबर बरोबरीने सोडवल्या. एक लढत तर स्वतः पडसलगीकर सरांनी तिथे थांबून पाहिली आणि बरोबरीत सोडवल्यावर नाराज झाले. कारण ती लढत मी सहज जिंकू शकलो असतो असं त्यांनी नंतर परत डाव मांडून दाखवले.

बुध्दीबळाचे पितामह पडसलगीकर सरांचे हे आयुष्यभरासाठी मिळालेले  आशीर्वाद आहेत असे मी समजतो. कारण त्यांच्याकडे शिकायला वगैरे कधी जात नव्हतो. बुध्दिबळ हा फक्त छंद म्हणून पहायचो तेंव्हा.
पडसलगीकरां सारखेच बुध्दीबळातले एक चाणक्य म्हणजे 'म्हैसकर' सर होते. मला एकदा आठवतय आमच्या शाळेत ते एकदा एकावेळी १५-२० जणांबरोबर खेळले होते. त्यावेळी सगळ्यात शेवटी मी उरलो होतो. आणि त्यांच्याशी खेळलेला डाव बरोबरीत सोडवला होता. बुध्दीबळाचा हा छंद पुढे अगदी काॅलेजला ( ११-१२ वी)  असताना ही विजयी करुन गेला.

आता या लेखाचा शेवट या खेळातील एका छोट्याशा तत्वज्ञानाने. अनेक जणांनी हा खेळ खेळला असेल, खेळत असतील. अनेक सोंगट्या,  त्यांचा मार्ग, चेक, कॅसलीन, डाव सुरु करण्याच्या पध्दतीही अवगत असतील. केवळ पटावरच नव्हे तर प्रत्यक्ष जीवनातही आपण अनेक खेळी  दुस-याला पेचात पकडण्यासाठी करत असतो. समोरुन आलेल्या चालींवर आपली खेळी करतो ( राजकारणी तर यात भलतेच हुषार. पण सध्या तो मुद्दा नको)

अगदी पटाप्रमाणे घमासान युध्द करतो, अनेक मोहरे ( मुद्दे?) धारातीर्थी पडतात. स्वत:च्या राजाला वाचवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मोहरा 'वझीर' ही कामी येतो. कधी दोघांना एकमेकांचे वझीर मारावे लागतात अशावेळी

पटावर उरलेले, जे फक्त सुरवातीलाच  दोन घर ओलाडता येणारे आणि नंतर फक्त एक एक घर पुढे जाणारे  खेळातील सगळ्यात हलके समजले जाणारे 'प्यादं' हे जर प्रतिस्पर्धीच्या बाजूच्या शेवटच्या घरापर्यंत पोहोचले तर परत 'वझीर ' बनू शकते. ही किमया फक्त 'प्यादं ' करु शकते बाकी कुणी नाही

संतांनी ही सांगून ठेवलयं

महापूरे झाडे जाती, तिथं लव्हाळी वाचती 🌿🙏🏻

📝अमोल
१८/०५/२०२०
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...