नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, May 19, 2020

स्वप्ने


( गोड)  स्वप्ने

मंडळी सवयीने आपण 'गुड नाईट' अॅन्ड 'स्वीट ड्रीम्स' असे अनेकदा म्हणून त्यादिवसापुरता सोशल विराम घेतो. काल अचानक एका मित्राने याला पर्यायी शब्द   ' गोड स्वप्नात तुमची रात्र शुभ जावो ' असे म्हणावयास सुचवले.  खरंच किती छान पर्यायी मराठी शब्द ना हा? नक्कीच वापरण्यासारखा

खरं म्हणजे आजकाल स्वप्न ही रेड,आॅरेज, ग्रीन झोन ची पडत आहेत. अचानक मला मुंबईहून सांगलीला जायला परवानगी मिळालीय आणि मी सहकुटुंब पुण्यात बावधनला मित्राकडे जेवणासाठी थांबा घेऊन परत सांगली कडे मार्गस्थ झालो आहे, कुठेही वाटेत अडवणूक नाही, सांगलीत ही बायपास रोडने सरळ कारखान्यावर सुखरुप पोहोचलो असे ( गोड/ ग्रीन)  स्वप्न मला आजकाल वारंवार पडत आहे. अरे, का घाबरत अाहेस? तुझ्या गाडीचा नंबर ही MH 10 ने  सुरवात होणारा आहे, उठ, नीघ, आणि वेळेवर पोच, कुणी नाही अडवणार तूला असा दृष्टांत होऊन भल्या पहाटे जाग येत आहे . पहाटे पडलेली स्वप्ने खरी होतात या आशेवर सध्या आहे.

तसा ज्योतिष मार्गदर्शन करत असल्याने ब-याच वेळा आम्हाला काल अमुक एक स्वप्न पडलेले, ते चांगले का वाईट?  अशी विचारणा वारंवार होते. परवा कोल्हापूरातून एकाचा फोन आला.  ती व्यक्ती म्हणाली काल स्वप्नात भयंकर वीज चमकलेली ⚡बघीतली. घाबरलो मी. यंदा पण परत पूर येणार का? स्वप्नाचा काय अर्थ लावायचा? असे त्यांनी विचारले.

म्हणलं काका सध्या कुठला महिना चालू आहे?  मे महिना ना?  कोल्हापूरात मे महिन्यात गडगडाट / कडकडाटासह वळवाचा पाऊस पडतो ना. उघड्यावर असलेला शेतमाल सुरक्षित ठेवा. हेच तुमच्याही मनात आह जे तुम्हाला स्वप्नात दिसले. या स्पष्टीकरणावर त्यांचे समाधान झाले. 

ही एक गोष्ट जी या स्वप्नांबाबत म्हणली जाते की " मनी वसे ते स्वप्नी दिसे " ते पटते.
 ब-याचजणांना असा अनुभव ही आहे. शात्रीय माहीती सध्या विचारात घ्यायला नको कारण लेखनाचे हे प्रयोजन नाही ( ता.क: स्वप्न पडत असतील आणि त्याचा अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी लेखनाच्या शेवटी दिलेल्या इमेलवर संपर्क करु शकता)

तर विषय भलताच दुसरी कडे गेला. मुळ विषय 'गोड स्वप्नांकडे ' परत येऊ. आणखी थोडा बदल करतोय गोड स्वप्नां एवजी 'स्वप्नांचा गोडवा' काय असतो आणि मराठी गाण्यात / कवितेत ही स्वप्ने मी कुठे पाहिली हे शोधण्याचा हा एक प्रयत्न

"स्वप्न" या विषयावर गाणे सांगा असे म्हणल्यावर अनेकजणांना गाणे आठवेल ते म्हणजे

गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा
*स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा*
या गाण्याचे शेवटचे कडवे मला जास्त आवडते

नैराश्य कृष्णमेघी आशा कधी बुडावी
विरहात चिंब भिजूनी, प्रीती फुलोनी यावी
काट्याविना न हाती केंव्हा गुलाब यावा
*स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा*
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा

चला स्वप्नाच्या वाटेवर थोडा अजून फेरफटका मारु या
'स्वप्न' कशी असावीत याचे छान वर्णन या गाण्यात आहे बघा

कट्यार चिमणी कटिला साजे, जिरेटोप तो सान विराजे
लुटुलुटु येता हे *शिवराजे*, शिवनेरी वर वत्सलतेचे
निशाण भगवे फडफडते!  🚩

चित्तोडगडचा शूर इमानी, प्रताप राणा बाल होऊनी
मिठी मारता दोन्ही करांनी,अभिमानाचे पंख लावुनी
काळीज माझे नभी उडते!
*स्वप्न उद्याचे आज पडते*
*चित्र चिमणे* *गोजीरवाणे,नयनापुढती दुडदुडते*

एका आईने स्वप्नात आपल्या बाळाला असे पाहिले ☝🏼

पुढचचे गाणे हे स्वप्नातल्या राजकुमारासाठी असले तरी तो राजकुमार प्रत्यक्ष श्रावण महिना असावा असं मला राहून राहून वाटत, बघा

सुंदर आता झाली धरती, सुंदर नभ हे वरती
वैराणावर उधळीत आला,श्रावण सुंदर मोती
मनात माझ्या मोरपीसांचा फुलला रंग पिसारा
*स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या,राजस राजकुमारा*

हे ही एक छान गाणे  स्वप्नावरच

स्वप्नात पाहिले जे ते रुप हेच होते
हे स्वप्न मी म्हणावे की स्वप्न तेच होते

तो रंग केवड्याचा,ते ओठ अमृताचे
त्या यौवनात होते प्रतिबिंब चांदण्याचे
तारे नभात होते,नयनात दीप होते
*स्वप्नात पाहिले जे ते रुप हेच होते*

खरंच एकदा निद्रादेवीच्या अधीन झाल्यावर ही स्वप्ने तुम्हाला कधी भेटायला येतील हे सांगता येत नाही. पण काहीजणांना स्वप्ने बघायचा ही छंद लागतो मग त्यांची अवस्था या गाण्यासारखी होते:-

'स्वप्नात रंगले मी,चित्रात दंगले मी
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी'

मंडळी कंटाळलात ना वाचून? हं
काही इतर गाण्याचा फक्त उल्लेख करतो
१)
स्वप्ने मनातली का वा-यावरी विरावी
का प्रितीच्याच दैवी ताटातुटी असावी
२) स्वप्नावरी स्वप्न पडे
३) स्वप्नांजरी ते भेटून गेले

जगदीश खेबुडकरांच्या या गाण्याने 'स्वप्न पुराण' आवरते घेतो.

मी जीवन गाणे गावे, तू स्वरात चींब भिजावे
दोघांनी हरवून जावे, ही किमया नकळत करशील का? ....

पुढच्या ओळी. ...🤔

बघा आज रात्री  स्वप्नात येतात का त्या?  आल्या तर या लेखाचे सार्थक झाले असे म्हणेन 😊

आणि हो आज रात्री सगळ्यांना

' गोड स्वप्नात तुमची रात्र शुभ जावो '  अशा शुभेच्छा द्यायला विसरू नका ☺


📝अमोल केळकर
a.kelkar9@gmail.com
१९/०५/२०२०
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...