नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Sunday, May 24, 2020

बायपास रोड


बायपास रोड

आजकाल कुठल्याही शहराला एक गोष्ट निर्विवाद पणे चिकटलीय ती म्हणजे त्या शहराच्या बाजूने जाणारा 'बायपास रोड'. ज्यांना या गावात काम नाही,पुढे जायचे आहे, शहरातील वाहतूक चक्रात न अडकता, वेळेशी सांगड घालत, पुढे जायचा एक उत्तम पर्याय. 'ज्या गावी मला जायचं नाही, त्याचा विचार का करायचा? ' या म्हणीला साथ देणारा  कुठलाही 'बायपास किंवा रिंग रोड' आज आपण सगळीकडे बघतो. उपयुक्तता, गरज यात काहीच प्रश्ण नाही
पण खरं सांगू या 'बायपास रोडने' प्रवासाची मजा गेलीय. अस्स्ल  प्रवासी माझ्या या मताशी ठाम असेल. प्रवास ही काय गडबडीत/ भरभर करायची गोष्ट आहे का? स्वतः ची गाडी घेऊन जाणारे समजू शकतो पण आजकाल आमच्या 'लाल प-या' पण बायपास करत जातात. अर्थात त्यांना ही स्पर्धेच्या युगात टिकाव धरायचा असल्याने हे सगळं करण गरजेचे आहे म्हणा.

पण जिथे ११-१२ तास प्रवासास लागायचे तिथे ६ तासात प्रवास संपवायचा?  😕

चला यानिमित्याने  मुंबई-  सांगली ( खाडी पूल मार्गे ) कुठलाही बायपास न घेता आज फिरुन येऊ.
सकाळी ७. ठिकाण: मुंबई सेंट्रल
चला बसले का सगळे, टिंग टिंग

एक , सांगली द्या,  किती पर्यत पोचेल काका. 
सात पर्यत पोहोचेल, तिकीट निट ठेवा. पुण्यात चेक होते बर का!

दादर,सायन,चेंबूर करत वाशी खाडी पूल आला की मुंबईतील
 वा-याची झुळुक ( पहिल्यांदाच) अनुभवून खिडकीला डोके टेकवून जी मस्त झोप लागायची ती 'पनवेल' स्थानकावर ' पाच मिनिटे बस थांबेल' जाऊन यायचं त्यानी जाऊन या, या मास्तरांच्या आवाजानेच जाग यायची. ( कळंबोलीहून जाणारा पनवेल बायपास - एकस्प्रेस वे चुकवला बरं का आपण) 
उतरुन एक- दोन पेपर आणि नंतर वाचायला चित्रलेखा, साप्ताहिक सकाळ यापैकी एक मासिक घेऊन पुढचा प्रवास सुरु.

पनवेल ते खोपोली बस ब-यापैकी भरलेली. साधारण तासात उजव्या बाजूला दिसणाऱ्या  महड च्या बाप्पांना नमस्कार करुन खोपोली.

 १०-१५ मिनिटे नाष्ट्यासाठी खोपोलीत थांबायचे का लोणावळा हा सर्वस्वी चालक-वाहक काकांचा निर्णय असायचा. पण नाष्ट्यासाठी बस कुठेही थांबली तरी गरम- गरम वडा पाव वर आम्ही कधीच अन्याय होऊ दिला नाही 😃

बोर घाट , घाटांचा राजा. खोपोली कडून घाट चढण्याचा थरार काही वेगळाच. या सगळ्याचा आनंद घेत लोणावळा स्थानक. मग पुढे बस पुण्याकडे रवाना.

इथे और एक डुलकी तो मंगता है न बाबा! पुण्याबद्दलचे प्रेम/ आपुलकी का माहित नाही ओण देहू रोड / निगडी आलं की आपोआप जाग यायची ( कात्रज बायपास केंव्हाच बायपास केला आपण) . मग चिंचवड- पिंपरी- खडकी- शिवाजीनगर- डेक्कन- लकडी पूल- टिळक रोड - ते स्वारगेट. तासभर मस्त जायचा.

स्वारगेट ला मात्र 'लाल परी ' बराच वेळ थांबायची. याचे कारण चालक- वाहक इथे बदलायचे, बस सांगली फलाटावर लावण्यापूर्वी स्वारगेट आगारातून डिझेल भरुन यायची. सकाळी कंटक्टरने जे सांगीतलेले असायचे की तिकीट जपून ठेवा, पुण्यात चेक होईल हे इतके डोक्यात असायचे की नवीन कंडक्टर येऊन नवीन पॅसेंजरचे तिकीट काढून परत त्यांच्या ठिकाणी बसले तरी लक्ष सारे खिशातील तिकीटाकडे आणि कंडक्टर आपल्याला तिकीट दाखवा असे केंव्हा विचारतात याचकडे लागलेले असायचे.

दुपारी १:३० च्या सुमारास बस स्वारगेट हून सांगलीकडे निघते.
( काय हे एवढ्या वेळात बेलापूर हून निघून बायपास घेतले असते तर एव्हान सांगलीला पोचला असता की राव 😐)

सारसबागेतील गणपतीला उजवीकडे बघून एक नमस्कार आणि शंकर महाराजांच्या मठाकडे डावीकडे बघून नमस्कार करुन बस कात्रज घाटाकडे निघते. कात्रज बोगद्याच्या आधीच्या वळणावर दिसणा-या पुण्य नगरीचे शेवटचे दर्शन घेऊन बस कात्रजच्या बोगद्यात शिरते. 

पनवेलला घेतलेला पेपर शेजारचा प्रवासी वाचायला मागतो तेंव्हा लक्षात येते अरे आपण प्रवासात वाचायला पण घेतलयं मग शिरवळ स्थानकात उसाचा रस पिऊन हातातले मासिक वाचत, खंबाटगी घाटातील रुक्ष डोंगर बघत चहा प्यायला सातारा स्थानकात उतरायचं ( अरे, सातारा बायपास सोडला का आपण?  )

संपूर्ण मुंबई - सांगली प्रवासात कुठल्या टप्पात बसमधे जास्त गर्दी असेल तर ती सातारा- कराड. एकदम फूल्ल बस, उभा रहायला जागा नाही. कराड जवळ कोयनेचा पूल ओलांडला की मग सांगली जवळ आली असं वाटायचं.  मग पहिल्यांदाच हायवे पासून बस कराडला स्थानकात जाते आणि परत त्याचमार्गे परत येते हे आणि अर्धातास त्यात वाया जातो हे नको वाटायच. कारण एकच सांगलीची ओढ. 

पुढे मुख्य हायवे सोडून पेठ नाक्याला बस वळली की तोपर्यंत मन मात्र ४० किमी पुढे पोहोचलेले असायचे. इस्लामपूर, आष्टा हे थांबे मात्र घरी जाण्यापूर्वी वाटेत शेजा-यांकडे आधी डोकावल्यासारखे वाटायचे. त्यात एखादे अजोबा बस मधून उतरले असतील आणि त्यांच्या परत येण्यासाठी अख्खी बस खोळंबली असली तरी काही वाटायचे नाही.

१०- ११ तास प्रवास झाल्यावर शेवटच्या तासातला प्रवास मात्र संपता संपायचा नाही. मात्र तो क्षण हुरहुर लावायचा जेंव्हा पश्चिमेच्या मावळत्या सुर्याच्या साक्षीने  आयर्विन पुलावरुन, कृष्णा माईला वंदन करुन, डावीकडे श्री गणपतीचे दर्शन , तर उजवीकडचा विष्णू घाट डोळ्यात साठवून हरभट रोड, नगरपालिका, तरुण भारत करत लालपरी बरोबर सातच्या सुमारास सांगली स्थानकात स्थानापन्न व्हायची. मग न्यायला आलेल्या बाबांबरोबर पुढचा घरापर्यतचा प्रवास 🤗

मंडळी, आवडला का हा बायपास न घेता केलेला प्रवास

पण खरं सांगू, जीवनाच्या प्रवासात काही काही गोष्टी 'बायपास' केलेल्याच चांगल्या ना?

( प्रवासी)  अमोल 📝
२५/०५/२०२०
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...