Monday, January 11, 2021

आनंदी आनंद गडे


 आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे


माझ्या प्रिय बंधू भगिनींनो ,🙏


असा उल्लेख करुन तमाम जगाला विश्वधर्मपरिषदेत भारताची एक विलक्षण संस्कृती जगासमोर आणणाऱ्या महान तपस्वी स्वामी विवेकानंद यांचा आज जन्मदिन. या थोर महंत्यास सुरवातीलाच नमन करुन आजचा हा लेख.


विविधतेतून एकता ही भारताची संस्कृती आणि या भारत वर्षातील अनेक शहरे आपली स्वत:ची अनेक वैशिष्ट्य जपून आहेत. एखाद शहर म्हणलं की त्या शहराची, तेथील लोकांच्या स्वभावाची छबी नकळत तयार होते. लहानपणी शाळेत असताना परीक्षेत निबंध लिहायला लागायचे. यात अनेकदा 'माझा आवडता स्वातंत्र्य सेनानी, आवडता पक्षी, प्राणी असे ठराविक विषय असायचे पण एका विषयावर मात्र माझी निबंध लिहिण्याची इच्छा होती तो विषय कधीच परीक्षेत निबंधाला विचारला गेला नाही तो म्हणजे

 ' माझे आवडते गाव'. 

तर या स्तंभ लेखनाच्या निमित्ताने ही इच्छा आज पूर्ण करतोय. खरं म्हणजे

हे लिहिण्यास आणखी एक कारण नुकतेच घडले आहे ते असे


"इंडीयन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट २०२०" अंतर्गत देशातील ३४ सगळ्यात आनंदी शहरांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे आणि या यादीत आमचे "आवडते शहर - पुणे"  १२ व्या स्थानावर आहे. या सारखी दुसरी आनंदाची बातमी नाहीच. ज्या कुठल्या संस्थेने हे निष्कर्ष, कुठल्या नियमाद्वारे सादर केलेत माहीत नाहीत पण आमच्यासाठी १ ते ११ नंबर एक Formality म्हणून आहेत. काय असेल ते असेल "पुणे" हे आमच्यासाठी एक आनंदी शहर अगदी लहानपासून होतं, आहे आणि राहीलही यात शंकाच नाही.


तसं आमची जन्मभूमी 'सांगली' आणी आता कर्मभूमी 'मुंबई' असली तरी आमच्यासाठी यामधे वसलेली नगरी कायमच 'आपुलकीची ' ठरली आहे.   पुणे हे आमचे अजोळ, अजोळच्या माणसांबद्दलचा मायेचा ओलावा त्या गावालाही नकळत लागू पडतो. लहानपणी शाळेला सुट्टी लागली की आजोळी पुण्याला जाणे ठरलेले असायचे. कात्रजचा बोगदा ( जूना) ओलांडला की दिसणारी "पुण्य नगरी" आमच्या मनात अजूनही घर करुन आहे. सांगलीत असताना संस्थानचे 'गणपती मंदीर' किंवा 'बागेतला गणपती' किंवा आता मुंबईतील 'सिध्दिविनायक' किंवा 'सिबिडीचा राजा' सारखेच पुण्यातील 'सारसबागेतील ( तळ्यातला) गणपती', 'दगडूशेठ बाप्पा' आमचे कायमच श्रध्दास्थान ठरले. पुण्यात पोहोचलो की दुस-या दिवसा पासून पेशवे पार्क, सारसबाग, पर्वती, तुळशीबाग, शनिवारवाडा याठिकाणी फक्त प्रत्येक सुट्टीत जायचा क्रम बदलला जायचा इतकचं. पाषाण, कोथरूडला नातेवाईकांकडे जायचे म्हणजे गावाच्या बाहेर कुठेतरी जातोय असे वाटायचे.  इतक्या वर्षात बाकरवडी अंबा बर्फी या गोष्टी पुण्यातच घ्याव्यात या मताशी ठाम राहिलो असतानाच लहानपणी पुण्यातच  घेतला जाणारा 'काजूकंद' हा खाऊ प्रचंड आवडायचा. बालगंधर्व, टिळक स्मारक, भरत नाट्य मंदिरात   सुट्टीत  बालनाट्याचे प्रयोग, वेळोवेळी उपस्थित रहायला मिळालेले सांस्कृतिक कार्यक्रम यांनी रसिकता वाढायला मदत झाली हे नक्की.


यंदा 'मैफिल' या दिवाळी अंकात ग्रहांकीत शहरे हा लेख लिहिला होता. काही प्रमुख शहरे आणि ग्रह यांच्यातील ऋणानुबंध उलगडण्याचा प्रयत्न त्यात केला आहे. याच लेखात पुण्याबद्दल मी लिहिले होते

//

आता ग्रह मालेतील पुणेकर कोण ते पाहू. अर्थात गुरु ग्रहा शिवाय कोण असेल? थोडा आरामात, निवांत भ्रमण करणारा, ज्ञानी (त्यामुळे अभिमानी),  शिक्षक, असलेला गुरु विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणेशी जवळीक साधतो यात नवल ते काय?

जगात असे एकमेव शहर असेल की ज्या शहरातील व्यक्तीच्या स्वभावावर सगळ्यात जास्त  विनोद होतात. पुणेरी पाट्या हा ही एक इतरांसाठीचा कौतुकाचा विषय असतो. म्हणूनच पुणेकर म्हणजे सगळ्यांचे ' गुरु' . कुठल्याही प्रश्नांचे   यांच्याकडे उत्तर नाही असे होणार नाही  

 इथे या नगरीतील जास्तीजास्त व्यक्ती  ' धनु' ( द्विस्वभाव तसेच गुरुची रास  ), कुंभ ( ज्ञानी )  या राशीच्या असल्यास नवल काहीच नाही पण माझ्यामते  ' कन्या ( संशयी ) राशीची  ही खूप  व्यक्तिमत्व पुण्यनगरीत सापडतील. 

//


 पु.लं ही आपल्या 'मी नागपूरकर, मुंबईकर की पुणेकर ' यात पुणेकर सादर करताना जास्त खुललेत असं मला तरी वाटतं. असो.


तर मंडळी हे आमचे 'पुणे पुराण'.  आजही आम्हाला रोजच्या जीवनात/ रुटीन मधे कंटाळा आला की सरळ पुण्याला जातो आणि  "चित्त -वृत्ती" आनंदित  करूनच येतो.


लहानपणापासून आजपर्यत मुळा-मुठा वर अनेक नवीन ब्रीज झाले, पुणे वाढलं , बदललं असं काहीही झालं असलं तरी  'आनंदात जगा' हा मंत्र इथल्या चराचरात आहे हे नक्की.आणि म्हणूनच आनंदित शहरात पुण्याचे नाव अले नसते तर नवलच वाटले असते.


"पुणे तिथे काय उणे" ही प्रचलित म्हण पण आमच्यासाठी "पुणे तिथे काय दुखणे" हे फार आधीपासूनच मनात फिक्स आहे. 

म्हणूनच, "मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?"

 असं विचारलं तर एका वाक्यात सांगेन " सुख म्हणजे MH १२ असतं "


आशा भोसले यांनी गायलेल्या गाण्याची एक ओळ सध्याच्या काळाला अनुसरून अशी बदलतो आणि आजची "टवाळखोरी" संपवतो


"दख्खनची राणी नेशील का मला, *आनंदी* पुणे  ( सतत) पहायचे मला "


( कायमचा पुणे- प्रेमी)  अमोल केळकर 📝

१२/०१/२०२१


मंगळवारची_टवाळखोरी:- shopizen.in वरुन साभार

Please Share it! :)

No comments:

Follow by Email

Related Posts Plugin for WordPress, Blogger...