नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, June 20, 2017

कायम चुळबुळ कायप्पासन


तर आजच्या तीस-या आंतरराष्ट्रीय  योग दिनाच्या शुभ मुहूर्तावर  मी आज आपणास एका वेगळ्या योगासनाची माहिती देणार आहे.  गेल्या काही वर्षांपासून हे आसन  लोकप्रिय होत गेलं आहे.  दिवसाच्या कुठल्याही प्रहरी करता येण्यासारखे हे अतिशय सोपे आसन आहे. या आसनात शरीरातील बोटांचा  आपणास खुबीने वापर करावयाचा असतो  ( इथे डोक्याचे काहीही काम नसले तरी या आसनातील  काही अस्त्राने  हृद्यायचे ठोके अनियंत्रित होऊ शकतात , तेव्हा काळजी घ्यावी )
तर या आसना चे नाव आहे   " कायम चुळबुळ कायप्पासन "

या आसनासाठी तुम्हाला खालील गोष्टी पाहिजेत 
१) काय अप्पा युक्त भ्रमणध्वनी २)  ऊर्जा देयक यंत्र  ३) हाताची बोटे  ४ )  दिवसाचे किमान १६ तास 

तर या आसनाची तयारी तुम्हाला रात्रीच  करून ठेवायची आहे.  निद्रा अवस्थेत जाण्यापूर्वी  आपला भ्रमणध्वनी  उजव्या बाजूला ( शक्यतो उशी खाली )  ठेवावा. सकाळच्या कुठल्याही प्रहरी डोळे उघडले की सर्वप्रथम आपला उजवा हात थोडा वर करून कुणाला कळायच्या आधी भ्रमणध्वनी हातात घेऊन त्याची विशिष्ठ कळ  मधल्या बोटाने दाबावी . सभोवती प्रकाश दिसताच  खुबीने आपला  भ्रमणध्वनी जगाशी माहिती जोडणीद्वारे जोडावा आणि काय अप्पा सुरु करावे. धडाधड येणार-या निरोपां कडे दुर्लक्ष करून सर्वप्रथम संग्रहित फुलांचे गालिचे वेगवेगळ्या संघटनेत अंथरावे. त्यावर मग दिवसाचा कुठलाही प्रहर  असला तरी  दोन्ही  हातानी नमस्कार करून  कायम चुळबुळ कायप्पासनास सुरवात करावी 
आता याठिकाणी आपण निजलेल्या ठिकाणची जागा सोडली तरी  चालेल. आवश्यक नित्य कर्म आवरून ' आसन ' पुढे चालू करावे . सर्वप्रथम   एखादा सुविचार ( शक्यतो इंग्रजीतून )  वाढदिवस , लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,  काही दिनविशेष  यावरचे  मिळालेले  निरोप / माहिती पुढे पाठवण्यासाठी आता आपल्याला अंगठ्याचा वापर करायचा आहे  . सवयीने हे आपोआप जमून जाईल 
त्या दिवशी काही विशेष दिन नसेल तर एखादा देवाचा फोटो किंवा राष्ट्रगीताला मिळालेले पारितोषिक  किंवा राजकारणातील विषय ( याला कधीच तोटा नसतो )  याचा वापर करावा. यासाठी डाव्या  - उजव्या हाताची कुठलीही बोटे वापरली तरी  चालेल . पावसाळी  छत्री प्रमाने उगवणारी टुकार कविता, ग्रहबदल संबधीत लेख, पाककृती  किंवा  अगदीच काही नाही मिळाला तर गुरुजी - गण्याच्या  विनोदाची अदलाबदल करत हे आसन सतत चालू राहील याची दक्षता घ्यावी 
कामाच्या ठिकाणी पोचल्यावर सर्वप्रथम भ्रमणध्वनी चे तापमान नियंत्रणात आहे ना हे बघावे आणि नसेल तर  भ्रमणध्वनीला ऊर्जा देयक यंत्र लावावे . थोडा वेळ आपल्या बोटांनाही विश्राती द्यावी . आणि परत  हे आसन कंटाळा येई पर्यत चालू ठेवावे . 

टीप : " कायम चुळबुळ कायप्पासन  किती ही केले तरी    कामाच्या ठिकाणी कामे  करण्यास,  कुटूंबातील सदस्यांना वेळ देण्यात , मित्राना प्रत्यक्ष जाऊन भेटणे/ शुभेच्छा देणे/ , पुस्तक वाचासन, आणि शेवटी शांत  निद्रासन  - हे सर्व  करण्यास विसरू नये  

योग दिनाच्या  शुभेच्छा



 

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...