नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, January 8, 2019

हे ल्मेट मजला लागते


शिरस्त्राण '  हा  सध्या  पुणेकरांचा अत्यंत  जिव्हाळ्याचा विषय. परवा पुण्यात गेलो असताना एका मित्राला दोन चाकी गाडी मागितली,  त्याने दिली आणि   ' शिरस्त्राण '  देण्याची मागणी केली असता म्हणाला 👇🏻

(चाल :  हे  वेड मजला लागले , तुजलाही  ते  लागेल का ? )

हे ल्मेट मजला लागते , तुजलाही ते चालेल का ?
माझ्या डोक्यातील ही ' उवा ' कोणी तुला दावेल का ?

हे ल्मेट मजला लागते. . . . .

मी घालतो  स्वप्नी सुद्धा , मी घालतो जागेपणी
जो मी निषेध करितो, सत्यात तो येईल का ?

हे ल्मेट मजला लागते.  . . .

ही वाट घटकेची जरी , 'घामा'ळ मी पण जाहलो
जे वाचले माझे ' मनी' , पार्टित  ते संपेल का ?

हे ल्मेट मजला लागते.  . . .

माझे "मनोगत" मी तुला केले निवेदन आज, हे
सर्वस्व हे 'हेल्मेट' माझे,डोस्क्यात तुझ्या शिरेल का?

हे ल्मेट मजला लागते. . . . .
🛵  -------------------->  🚲


अमोल केळकर
poetrymazi.blogspot.in
a.kelkar9@gmail.com

 📝 पौष शु ३

Monday, January 7, 2019

क्षणभर उघड नयन देवा


आमच्या 
' अरूणा मावशी ' साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आणि 
' नयनतारा जी '  ✨उद्घाटक
 ( * बहुतेक असाव्यात)  अशा ९२ व्या मराठी साहित्य संमेलनाला  आमच्या  अगावू शुभेच्छा 💐

क्षण भर उघड 'नयन' देवा

करावया ही 'साहित्य ' पूजा
साहित्यनगरी जाऊन आता
' निमंत्रणाचा' हा नजराणा स्वीकारून घ्यावा 😉

क्षण भर उघड 'नयन' देवा

निरोप जातो न येण्याचा
निषेध पसरला बहिष्काराचा
' माफी पत्र' जालावर ठेवीले, प्रभू माझा यावा

क्षण भर उघड 'नयन' देवा

भांडण नाही , नाही शिवी
'यवतमाळ' ना, कुणाच्या गावी
लेखणीतले शब्द ही करिती, अखेरचा धावा.

क्षण भर उघड 'नयन' देवा

साहित्य संमेलनाला शुभेच्छा 💐

📝 टुकार साहित्यिक
८/१/१९
poetrymazi.blogspot.in

#साहित्य संमेलन

Saturday, January 5, 2019

पंडीत संजीव अभ्यंकर


*मर्म बंधातली ठेव ही* :- 🎹🎼🎧🎤

प्रिय संजू,

होय होय तूच "पंडीत संजीव अभ्यंकर" .
संजीव दादा?  अहं! मजा नाही यात,  भले ३-४ वर्षानी मोठा असलास तरी कधी संजू दादा म्हणल्याचं आठवत नाही बुवा.
 आपल्यासाठी तर तू कायम
 ' संजूच'
तर तुला मुंबईत आज ( ६ जानेवारी २०१९ ला) किशोरीताई आमोणकर यांच्या नावाने दिला  जाणारा
" *गानसरस्वती पुरस्कार २०१८" मिळतोय.  याबद्दल सर्वप्रथम*
 *मन: पुर्वक अभिनंदन आणि* *पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा*  💐💐

तू म्हणशील अरे इतके पुरस्कार मिळाले तेंव्हा कुठं गायब होतास आणि आज एकदम शुभेच्छा वगैरे?
त्याच काय आहे संजू म्हणजे आपली ऐकीव माहिती हं की अगदी तरुण वयात गायकाचा ' आवाज फुटतो ' तसंच लेखकाचे शब्द ही असेच केंव्हा तरी अचानक उमटू लागतात. तसे आमचे शब्द आत्ता कुठे चाळीशी ओलांडल्यावर उमटू लागलेत. तेंव्हा उशिराने का होईना लिहू म्हणले.
तुझ्या गाण्या इतके गोड नाही लिहिता यायचे पण हा एक छोटासा प्रयत्न. बर नुसते शुभेच्छा लिहूनही उपयोग नाही थोडंसं सविस्तर नाही लिहिले  नाही तर राणी मावशीचा मुलगा कसा शोभणार? 😀

असो. तर लहानपणी  दिवाळीत,  मे महिन्याच्या सुट्टीत पुण्याला आलो की बाजीराव रोड वर भाऊ अजोबांकडे आणि नंतर
ब-याचदा मुक्कामाला शनिपाराजवळ प्रतिभा मावशीकडे जायचे हे बहुतांशी वेळेला ठरलेले असायचे.  त्यावेळेला डेक्कन जिमखाना हे लांब वाटत असल्याने शोभा मावशीकडे म्हणजेच  तुमच्याकडे येणे फारसे व्हायचे नाही. तरी पण अधून मधून तुमच्याकडे येऊन केलेला दंगा,  नातेवाईकांच्या लग्न कार्य इतर समारंभा निमित्य  झालेल्या भेटी , तसेच दादरला हिंदू काॅलनीत दिलीप मामा कडे तू आणि सुनंदने युती करुन मला एकटे पाडणे वगैरे  काही आठवणी मनात जपून ठेवल्या आहेतच.👍🏻

संजू गाणं शिकतोय , संजू जसराज जी यांच्या कडे शिकायला जातोय, संजूचा इकडे कार्यक्रम झाला,  पंडीत जसराज जींचा दूरदर्शन वर कार्यक्रम आहे मागे साथीला संजू आहे, संजूवर आज एका पेपरात / मासिकात / दिवाळी अंकात लेख लिहून आलाय , संजूला अमुक पुरस्कार जाहीर झाला आहे, संजूचा नवीन अल्बम आला आहे, संजूची ही सिडी १ नंबर आहे,  संजूचे परदेशात कार्यक्रम आहेत,  आज अकाशवाणी संगीत मोहोत्सवात संजू आहे , ते  अगदी काही दिवसांपुर्वी यंदाच्या दिवाळी पहाट IBN लोकमतवर संजूचे दिसणे हा प्रवास *निव्वळ थक्क करणारा*.
आतापर्यंत तुला किती पुरस्कार मिळाले आहेत हे तुलाही कदाचित सांगता येणार नाही पण आम्ही सगळेच वाट बघतोय ती  भारत सरकार तर्फे देण्यात येणा-या  *पद्म पुरस्काराची* 🥇🌷
अर्थात सरकार देईल न देईल पण तुझ्या चाहत्यांनी तो तुला केंव्हाच दिलाय 💐

या शुभेच्छा लेखाच्या खाली एक तुझ्याच संग्रहित चित्रांचा तुझ्याच एका गाण्यासह एक व्हिडिओ पाठवलाय. तो पाहून वाटतं की किती मोठ्या प्रसिद्ध व्यक्तींना संजू भेटलाय. मग महाराष्ट्राचे लाडके *पु.ल* असू  देत किंवा *लता दिदी*, *भीमसेन जोशी*, *नौशाद किंवा हिराबाई बडोदेकर*.  पण हे यश काही सहजासहजी नक्कीच मिळालेले नाही. संगीताचे " *ध्यान करु पाहता, भान हरपले*" ही भावना असल्याशिवाय केवळ हे अशक्य. यात तुझा जसराज जी यांचा बरोबरचा फोटो द्रोणाचार्य - अर्जुन यांची आठवण करुन देणारा. आणखी एका फोटोत शोभा मावशी तुला तंबो-यावर साथ देत आहे. क्या बात है!  हा अल्बम म्हणजे जणू मर्मबंधातली ठेवच तुझ्यासाठी.  तशीच एक *मर्मबंधातली ठेव* माझ्याकडे ही आहे.

त्यासाठी आपल्याला १९८३ पर्यत मागे जावे लागेल.

स्थळ : माधवनगर, सांगली
जून महिन्यातील पहिला आठवडा. १३५ गुरुवार पेठ, माधवनगर येथे चिरंजीव अमोल उर्फ केदार केळकर याच्या व्रतबंधनाची जोरदार तयारी सुरु होती. सर्व परिचित, नातेवाईक यांना पत्रिका पोहोचल्या होत्या. माधवनगर परिसरातील, काॅटन मिल मधील, परिचितांसाठी , नातेवाईकांसाठीवेग वेगळ्या दिवशी जेवण ठरले होते.
बुधवार पेठेतील ' जाखोटीया मंगल कार्यालय ' दोन - तीन दिवसासाठी बुक झाले होते. ५ जून १९८३ ला मुंज. बटु अमोलने आपल्या आईला विचारले कोण कोण येणार आहेत मुंजीला? आईने सांगितले अरे सगळे येणार आहेत. सगळ्या आत्या, रघू मामा, रजनी मावशी, शोभा, प्रतिभा मावशी,  आनंद,  संजू इ.इ
आदल्या दिवसा पासून कार्यालय घेतल्याने आणि लग्नासारखे काही धार्मिक कार्यक्रम आदल्या दिवशी नसल्याने ४ जून १९८३ ला संध्याकाळी त्यावेळी शाळेत शिकणा-या 'पंडीत संजीव अभ्यंकरला' गाणे गायची फर्माइश झाली. तबला-पेटीच्या  साथीला माधवनगरचे स्थानिक कलाकार मिळाले आणि एक अत्यंत सुरेल मैफल संपन्न झाली.
' *नारायणा रमा रमणा मधू सुदना मनमोहना, अबीर गुलाल उधळीत रंग* ' ही काही गाणी माझ्या मनात इतक्या वर्षानंतरही अजून घर करुन आहेत.

संजू, कदाचित ही गोष्ट तुला आठवतही नसेल पण माझ्या आयुष्यातील ही एक अतीशय दुर्मिळ आठवण म्हणूनच माझी मर्मबंधातली ठेव. 😊

खुप लिहिले,  एव्हान तू ही हे वाचून बोअर झाला असशील. आता हे तुला वाचायला मिळालं असेल असं गृहीत धरतो कारण प्रतिभा मावशी म्हणालीय हा लेख तुला पाठवेल म्हणून.

तर संजू , २०१९ मधे शक्य झाल्यास पुण्यात एकदा भेटू.
यावर्षी मी पुण्यात येताना एक डायरी नेहमी बरोबर ठेवेन.जेंव्हा आपण भेटू त्या तारखेच्या पानावर एक मस्त तुझी सही घ्यायची आणि *कलियुगातील प्रथेप्रमाणे एक सेल्फी घेऊन तो सगळ्यांना दाखवत सुटायचे*😁 असा मानस आहे. आणि बर का माझ्या शाळेतील काही मित्र अनिल महाजन,  नियमीत सवाई महोत्सवास भेट देणारा एक मित्र प्रशांत कुलकर्णी हे हीे सगळे तुझे चाहते आहेत. जेंव्हा केंव्हा तुझा विषय निघायचा तेंव्हा मी अभिमानाने  सांगायचो संजू माझा भाऊ आहे म्हणून. तेंव्हा जमल्यास त्यांना ही घेऊन येईन भेटायला कधीतरी

पण जेंव्हा केंव्हा भेटू तेंव्हा फक्त एकच गोष्ट जाणवेल जे तुझ्या एका फोटोत वाचायला मिळाली 👇🏻
*Only his "looks"have changed* 👍🏻

*आज या पत्रलेखनाच्या निमित्ताने का होईना परत संपर्क झाला. परत एकदा तुला खुप खुप शुभेच्छा* 💐💐💐💐
आणखी एक, एक फक्त एकच सांगणे. ...🙏🏻
सध्या  गाण्याच्या शो मधे  सन्माननीय अपवाद वगळता जे परीक्षक म्हणून येतात त्यांचे नखरे पाहवत नाहीत रे. लवकरच तुझ्यासारखा मनस्वी कलाकार परीक्षक म्हणून मिळण्याचे भाग्य तमाम महाराष्ट्रातील तरुण पिढीला मिळो हीच एक इच्छा.

अमोल केळकर, नवी मुंबई,  बेलापूर
a.kelkar9@gmail.com


Wednesday, January 2, 2019

भाई


भाई , चला आवरलंय माझं. उशीर होईल  नाहीतर खेळाला पोचायला.

आग सुनिता , थांब एवढ  शेवटचं पान लिहितोय , पण कुठला खेळ ?

काय हे भाई , "भाई" सिनेमाचा पहिला शो.

सुनीता अग या हिंदुस्थानात भाईचा सिनेमा फक्त ईदला येतो. मार्गशिर्ष कृष्ण १४ ला अमावस्येच्या पूर्वसंध्येला  येणारा हा कुठला ' भाई ' ?

भाई , बास झालं हा माझी फिरकी घेणे.  ज्याने आयुष्यात अनेक अमावस्यां सोसून  मराठी सारस्वताच्या दुनियेत ' पोर्णीमा ' खुलवली त्या भाईचा म्हणजे तू अर्थात " पुरुषोत्तम  लक्ष्मण   देशपांडे " यांच्या वरचा ' भाई  ' सिनेमा.

बरं  बरं . त्या उबेराला  विचार राफेल तयार आहे का ?

काय?  भाई कालच्या संसदेतील चर्चा  फारच मनावर घेतलीयस तू  ? त्या रंभेला सांगून  २०१९  लोकसभा होई पर्यत केबल बंद करायला सांगते .
त्या कुबेराला पुष्पक विमान तयार आहे का असं म्हणायचंय का तूला ?

हो . हो  तसेच

भाई, त्यांनी आधीच सांगितले आहे  पुष्पक तयार आहे  तुम्हाला मुंबईकर , नागपूरकर का पुणेकर म्हणून जायचंय ?

बघ सुनीता , त्या नागपूर मधील  उणे तापमानातील थंडी काही आपल्याला सहन व्हायची नाही ,  १२ अंश तापमानाला गिरगावकर, पार्लेकर, डोबिवलीकराना जणू इकडे काश्मीर, महाबळेश्वर अवतरलं असे वाटत असलं तरी तिकडे मराठी सिनेमा कुठे लागला आहे हे हुडकण्यात आपला वेळ जाईल
*तेव्हा आपले पुणेच बरे*

माझ्या मनातलं बोललात भाई

अग  सुनीता तो बघितलास का अंतू बर्वा , ' बटाट्याच्या चाळीत '  कुठली स्कीम घेऊन गेलाय. ' असामी असामी '  व ' अपूर्वाई' पुस्तक घेतल्यास  ' भाई'  सिनेमाचे एक तिकीट  मोफत असं ओरडत सुटलाय

अमॅझीग  ना भाई ?

नाही सुनीता कलियुगात त्याला 'अमेझॉन' का काय म्हणतात ?

घ्या आता  हेच बघायचे राहिले होते मी म्हणतच होतो ' सखाराम गटनेने ' अजून 'व्हाट्सअप वर ' चारोळी कशी पाठवली नाही ते . बघ काय म्हणतोय तो :-

हेल्मेट सक्तीने पुण्यात
सगळ्यांना आली '  फिट '
अन ' भाई'  ऐन हिवाळ्यात 🔥
एकदम होणार '  हिट '

आपलाच  - सखाराम गटणे

चितळे मास्तरांनी तर आज शाळेच्या मुलांना सहलीला नेतो म्हणून ' भाई ' दाखवायचं ठरवलं आहे, बरं का सुनीता

भाई  किती प्रेम आहे तुझे तुझ्या या पात्रांवर आणि त्यांचे तुझ्यावर . आता फक्त एवढे सांगू नकोस की ती  रत्नागिरी  - मुबंई बसच्या वाटेत हातखंब्याला आडवी आलेली
 " म्हैस "  कोथरूडला सिटीप्राईडचा प्रागंणात रवंथ करत लाडक्या ' भाईची ' वाट बघतेय आणि  तिने दिलेल्या शेणाच्या  गोण्यांची शेकोटी करून ' नाथा कामत ' , नंदा प्रधान , अण्णा वडगावकर, नामू परीट , गजा खोत, रावसाहेब तिकीटाच्या रांगेत उभे आहेत . 😁

अगदी बरोबर सुनीता , आणि तो नारायण  तिकीटाच्या रांगेत स्वतःच्या नावाचा दगड ठेऊन , सगळ्यासाठी पॉपकॉर्न रूपी लाह्या फुटाणे आणायला पळालाय. 
किती चेष्टा करशील  सुनीता तू माझी , हे काय वय आहे का? आपण स्वर्गात आलोय आपण आता पुण्यात नाही आहोत. काल रात्री झोपेत काय गाणं बडबडत होतीस माहीत आहे ?

' भाई भाई , व्यक्ती वल्लीचा , कसा सिनेमा घडला , बाई बाई '

नशीब 'आचार्य अत्रे' बाजूला ढाराढुर झोपले होते नाहीतर  आज काळी  पूर्ण गाण्यांसह
 'झेंडूच्या फुलांचा ' हार गळ्यात पडला असता आपल्या

भाई , ते जाऊ दे . चला ना जरा लवकर निघून मस्त  पर्वतीवर जाऊन सारसबागेतील गणपतीचं दर्शन घेऊ.
मी तर म्हणतो सुनीता  एक दिवसाची रजा टाकू स्वर्गात. तू म्हणतीस तसे पर्वतीवर जाऊ , सारसबागेत जाऊन स्वेटर घातलेल्या बाप्पाचे दर्शन घेऊ , सिनेमा बघू ,आणि हो  तुझ्या मनातले 
तुळशीबागेत संध्याकाळी जाऊ , सर्व देव -गणांसाठी  चितळ्यांची अंबा बर्फी आणि बाकरवडी घेऊ  आणि *सगळ्यात महत्वाचे* रात्री मुक्कामाला डेक्कनला  "मालती - माधव" मधै जाऊन  त्या चोराने पुस्तकाचा घातलेला पसारा आवरु  अन सकाळच्या
आपल्या लाडक्या  ' दक्खनच्या राणीने ' मुंबई पर्यत जाऊ.

परतीचे  पुष्पक विमान  मुंबई हुन  सोडण्याची विनंती करायला भाई  चित्रगुप्तां कडे गेले . पाठमो-या भाईंकडे पाहताना सुनीताताईंना त्यांचे गुणगुणे  ऐकू आले

हृदयांबुजी लीन लोभी अली हा !
मकरंद ठेवा लुटण्यासी आला  !
बाधी जीवाला सुखाशा मनी !!
*मर्म बंधातली ठेव ही* !!!

*भाई , खूप खूप शुभेच्छा*

©
 📝अमोल केळकर
३/१/१९
poetrymazi.blogspot.in

Tuesday, January 1, 2019

शब्द शब्द जपून ठेव


*शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी*
( 📝 १ जानेवारी २०१९)

२०१८ मधील साहित्य सेवा जी घडली त्यातील सगळ्यात आनंददायी गोष्ट काल घडली. काल संध्याकाळी साक्षात "पंडीत संजीव अभ्यंकर " यांनी मी त्यांच्यावर लिहिलेल्या ( घरगुती)लेखाबद्दल प्रशंसा करण्यासाठी फोन केला होता.
बोलता बोलता त्यांनी पुण्यात आलास की आधी कळवून भेटायला ये असे सांगीतले. आधी कळवलंस म्हणजे मला माझ्या ' आवाजाचं ' नियोजन करायला बरं म्हणाला.
म्हणजे एक गायक ज्याच्यासाठी ' आवाज' हा जणू प्राण तो आपल्या या आवाजाचे बजेटींग करतो ही गोष्ट थोडी वेगळी होती.
एखादा गायक आहे फार तर आइस्क्रीम खात नसेल, ज्यूस. पित नसेल,  घसा ठिक रहावा म्हणून चमचमीत पदार्थ खात नसेल इतपत कुणालाही समजेल पण ' आवाज' / व्हाॅल्यूम व्यवस्थित राहण्यासाठी त्याचेही प्लँनींग? वा उस्ताद वा .
दिव्यत्वाची इथे प्रचीती 🙏🏻

बर मग तुमचे काय?  काल बोललास ना संजूशी संध्याकाळी.  पहाटे पहाटे श्रीहरीने मला जागे केले. अरे तू स्वत:ला लेखक वगैरे समजतोस मग यातून काय शिकलास?
गायका साठी- आवाज महत्वाचा असेल तर,  *लेखकासाठी शब्द ( बुद्धी)  महत्वाचे नाहीत का?* मग का अशी वाया घालवतोतस बुध्दी टुकारगिरीत?  गोविंदाच्या बोलण्यात तळमळ जाणवत होती.
जणू त्याला सांगायचे होते

*शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी* 🌼

मंडळी असे श्रीहरी  केवळ स्वप्नात येत नाहीत तर वास्तवतेत पण भेटतात फक्त आपली समजून घ्यायची पात्रता  पाहिजे.😊

कलाकार कुठल्याही क्षेत्रातला असो, सर्वप्रथम त्याला ' रसिक ' बनता आलं पाहिजे आणि २०१९ मधे हाच प्रयत्न करायचाय. नविन वर्षाचा आपला संकल्प

बघू कितपत जमतय. सोबत ग्रह- तारे आहेतच मार्ग दाखवायला.

 *शेवटी* :- गेल्या वर्षात मला “धडा” देणारे... यांना आभार!!!!
 चुकून माकून माझ्याकडून “धडा” घेणारे... यांची *मनापासून माफी मागतो!!*
😉
 २०१९ चं स्वागत उत्साहाने करू....

📝टुकार रसिक
Related Posts Plugin for WordPress, Blogger...