नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Thursday, April 23, 2020

शब्दांचा कक्ष


"शब्दांना" ही ठेवा कधीतरी
विलगिकरण कक्षात
 'आपत्ती' निवारण्याचा हाही
मार्ग असू दे  लक्षात

भांड्याला भांडे लागते
शब्दाने शब्द वाढतो
भांडणाचा 'संसर्ग' रोखण्याचा
हाच 'राज'मार्ग वाटतो.

📝२४/०४/२०२०

#सुधरा_लवकर_सगळे

पुस्तक दिन


संग्रहित

*पुस्तक दिन विशेष*
📖📚

*आठवणीतील पुस्तके* 📝

बालभारती , किशोर ,
चांदोबा, चंपक
आजकालच्या  मुलांना
वाटतंय हे भंपक

संध्याकाळी दिवे लागणीला
 'मनाचे श्लोक' रामरक्षा'
लहान पणी ही  पुस्तके 
वाटायची मोठी शिक्षा

शाळेतल्या  वर्गासाठी होती
 पुस्त्तकांची  पेटी
यातून तर व्हायच्या
मोठ-मोठ्या लेखकांच्या भेटी

आवाज गृहशोभिका मेनका
 प्रपंच आणि  जत्रा
सुट्टीत यायचे एकापाठोपाठ
दिवाळी अंक सतरा .

व पु नी लिहिलेले  वपुर्झा,
 पु लं ची अपूर्वाई
एकदा हाती येताच व्हायची
 संपवण्याची घाई

आईच्या पुस्तकातून मिळाले
 बाळकडू  वाचण्याचे
आवडत गेले मग एक एक  प्रकार
 अनुवादित साहित्याचे

श्रीमान योगी ,  पानिपत
 ऐतिहासिक  शिवचरित्र
सावरकर , टिळकांचे  लेखन वाचून
 वाटायचे एकदम पवित्र

तारुण्याच्या उंबरठ्यावर
  गोखल्यांचा चारोळ्या
' मी माझा' करत आम्ही
 ठोकल्या टुकार आरोळ्या

संसारात सावरत होते
' गजानन विजय'  'स्वामी लिलामृत'
गोदवलेकरांचे नित्य पारायण
जणू जीवनरुपी अमृत

आता छंद  म्हणत हाती घेतलीय
 ग्रह , ता-यांची पुस्तके
पुस्तक दिनी ही पुस्तक लिला
 सादर करतो  अती कौतुके

अमोल 📝
२३/४/ १८

📖📚📖📚📖📚

Wednesday, April 22, 2020

कव्हर स्टोरी


'कव्हर स्टोरी
( जागतिक पुस्तक दिना निमित्य)

आज २३ एप्रिल 'जागतिक पुस्तक दिन '. सर्व वाचनप्रेमींना शुभेच्छा 💐. 'वाचाल तर वाचाल' अशी संतवाणी होऊन गेली असली तरी याचे बाळकडू अगदी लहानपणी आपल्या पालकांकडून, "निट वाच ( अभ्यास कर) नाहीतर पुढे ढकलला "असा शेरा मिळेल बघ हं!  अशा रुपात  वेळोवेळी मिळत गेले.
 पुस्तकांची पहिली ओळख लहानपणी आपल्याला मुख्यत्वे पाठ्यपुस्तकांच्या रुपानेच झाली.

जून महिन्यात शाळा सुरु व्हायच्या आधी नविन वर्षाची पुस्तके 'ताम्हनकर, तानवडे बुक डेपोतून आणली जायची. अगदी आपल्या पुढच्या इयत्तेत
असणा-या आमचा चुलत भाऊ 'चेंड्या' कडून त्याच्या वह्या पुस्तकाचे गाठोडे आणून, आमचे गाठोडे आमच्या मागे असणाऱ्या दुस-या चूलत भावाकडे 'ढेंप्या' कडे पोहोचते केले असले तरी आई- बाबांच्या मागे लागून पुस्तकांचा नवीन संच या दुकानातून आणणे हे एकाही वर्षी चुकले नाही.
ही पुस्तके घेताना एक गोष्ट आवर्जून घेतली जायची ती म्हणजे तपकिरी रंगाचे कागद ज्याला आपण 'कव्हर्स ' म्हणतो.

शाळा सुरु व्हायच्या आधी या पुस्तकांना 'कव्हर्स ' घालणे हा जंगी कार्यक्रम घरोघरी व्हायचा. पुस्तक वर्षभर चांगले रहावे हा या मागचा मूळ उद्देश असला आणि तो कितीही चांगला असला तरी मुळात मला हा प्रकार फारसा आवडला नाही.शाळा सुरु होऊन १-२ महिन्यात असे माझे एकही पुस्तक नव्हते ज्याचे घातलेले कव्हर टिकले आहे.

मंडळी, पुस्तकांची खरी मजा कव्हर नसलेल्या म्हणजेच पुस्तकाचे मुखपृष्ठ दिसत असतानाच आहे हे माझे स्पष्ट मत. पुस्तक ही मस्त मोकळा श्वास घेतात, आपल्याशी मुखपृष्ठातून ती बोलतात, यात काय आहे हे सारांश रुपाने सांगतात, वाचनाची उत्सुकता वाढवतात. बहुतेक बालभारती पुस्तकाचे मुखपृष्ठ दरवर्षी सारखे असायचे पण इतर विषयांचे मुखपृष्ठ दरवर्षी वेगवेगळे असायचे(??)

हळूहळू पाठ्यपुस्तकांबरोबरच आपल्या हातात चंपक, चांदोबा, छावा, आनंद, किशोर ही बालमासिके , नंतर लोकप्रभा, चित्रलेखा, साप्ताहिक सकाळ अशी साप्ताहिके मग प्रपंच, रोहिणी, धनंजय, किर्लोस्कर अशी मासिके ते दिवाळी अंक हा हवाहवासा वाटणारा प्रवास आणि  हवेहवेसे, पहावेसे वाटणारे प्रत्येक अंकाचे मुखपृष्ठ. तारुण्यात 'आवाज' सारख्या दिवाळी अंकाच्या मल्टीपल मुखपृष्ठांची मजा न घेतलेला हास्य रसिक मिळणे अवघडच 😊

त्यानंतर वाचनात आलेली अनेक ऐतिहासिक पुस्तके, आत्मचरित्रे, कादंबरी, या सगळ्यात मुखपृष्ठ हे अगदी मुख्य भूमिका निभावते.

( सध्या आपल्याला फारसे दिसत नाही पण सिनेमाचे गावागावातील भिंतीवर लागलेले पोस्टर हे एकप्रकारे त्या सिनेमाचे मुखपृष्ठच नाही का? )

तर अशी ही मनाला कुठलेही कव्हर न घालता लिहिलेली 'कव्हर स्टोरी', एखाद्या कसलेल्या फलंदाजाने मारलेल्या 'कव्हर ड्राईव्ह ' ची मजा नसेल ही आली पण पुस्तक दिना निमित्ताने ही पुस्तकांबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता समजा.

लेखनाचा शेवट काही ओळींनी

अजि पुस्तिकाचा दिनु
व्रत वाचनाचा जाणू

हर्ष जाहिला रे , हर्ष जाहिला रे
कथा कादंबरी, वाचावी ज्ञानेश्वरी ||

दृढ 'विडंबन' मुळी
विराजीत वनमाळी
हर्ष जाहिला रे , हर्ष जाहिला रे |

अजि पुस्तिकाचा दिनु
व्रत वाचनाचा जाणू 📖🙏🏻

📝२३/०४/२०२०
#पुस्तक_दिन

बम्बई से आया मेरा दोस्त


फक्त 'आप के खातीर' 📝

बम्बई से आया मेरा दोस्त, पुलीस को इन्फार्म करो
रस्तेमे जाओ पकडो, क्वारंटाईन जल्दी करो

सब मिलके भागो जाओ, गल्लीसे बाहर न आओ
अरे अरे सब मिलके भागो जाओ, गल्लीसे बाहर न आओ
वाह वाह वाह वाह वाह वाह

बम्बई से आया मेरा दोस्त, पुलीस को इन्फार्म करो

गये राजा महाराजा, अब 'करोना' बोले आजा
अरे अरे उसका बजाओ बाजा
हात धूओ, तंद्रुस्त बनो, बिमारी दूर करो
रात को आराम करो, दिनभर भी आराम करो

अरे
बम्बई से आया मेरा दोस्त, पुलीस को इन्फार्म करो
रस्तेमे जाओ पकडो, क्वारंटाईन जल्दी करो

📝टुकारपणा करा_पण_घरातच करा
२२/४/२०२०
अमावस्या

#अर्थ_डे 🌎

आज कळतोय खरा
प्रत्येक दिनाचा 'अर्थ '
काळजी घेतली नाही
तर सारा होईल 'अनर्थ'

📝 अमोल
२२ एप्रिल / अर्थ डे 💐

Friday, April 17, 2020

गांधारी


गांधारी 😵

सध्या दूरदर्शनवर वर रामायण/ महाभारत/ चाणक्य यासारख्या काही पौराणीक मालिका परत दाखवत आहेत. पौराणिक काळातील अनेक व्यक्तीरेखा या विशेष आहेत यात शंका नाही.

यातील 'गांधारी' या व्यक्तीरेखे बद्दल थोडंसं लिहितोय. काही माहिती ऐकीव, काही आंतरजालावरुन मिळालेली आणि त्यावरुन सुचलेले काही विचार 📝

महाभारतातील या पात्राबद्दल आपल्याला फारच जुजबी माहिती आहे . किंबहुना एखाद्या गोष्टीकडे जाणून बुजून ( वाईट गोष्ट आहे हे कळत असताना ही) आपण दुर्लक्ष केले की आपण साधारणतः गांधारीची उपमा देतो.

 राजकारण विषयी चर्चेत एका समुहात
*ज्यांची गांधारी पेक्षा जास्त वाईट अवस्था आहे* असे वाक्य वाचले.  अशा व्यक्ती कोण असतील असा विचार केला मग लक्षात आले
राजकारणी कार्यकर्ते ( *अगदी सर्वपक्षीय*)  यांचा मुख्यत्वे यात
 समावेश करता येईल.

आपला नेता चुकतोय हे कळत असूनही केवळ नेत्यांचे आदेश म्हणून त्याच्या सांगण्याप्रमाणे कृती करणारे सगळेच 'गांधारी' चे प्रतिनिधित्व करणारे म्हणायला पाहिजेत. चुकीला चूक आणि बरोबर ला बरोबर न म्हणू शकणारे सगळेच या वर्गीकरणात सहज बसतात.

गांधारीला आपण केवळ वाईट अर्थाने घेतो की आपल्या
नव-याच्या वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष /डोळेझाक करणारी स्त्री, त्याच्या चूकांनवर पांघरुण घालणारी इ इ.
आजच्या जमान्यात आपला तो बाब्या, दुस-याचे ते कार्टे असे वागणारे अनेक जण हे गांधारी विचारण सरणीचेच म्हणावे लागतील.
इतकं बदनाम झालेली ही गांधारी प्रत्यक्षात कशी होती हे पाहू ( *खालील बरीच माहिती विविध संकेतस्थळांवरुन साभार*)

गंधार ( कंदहार, अफगाणिस्तान ) देशाच्या राज्याची राजकन्या. १०० कौरवांची ( आणि त्यांची एक बहिण)  आई इतपत माहिती सगळ्यांना आहे. आता माहित नसलेली माहिती

लहानपणीच गांधारीने रुद्राची आराधना करुन शंभर पुत्र होण्याचे वरदान प्राप्त केले होते
हिच्या वरप्राप्तीची ही हकीगत ऐकूनच भीष्मदिकांनी हस्तिनापुरचा राजा धृतराष्ट्र याच्यासाठी हिला मागणी घातली. कुरुवंशातील संततिहीनता हिच्या आगमनाने नाहीशी होईल असा या मागणीमागे मुख्य हेतू होता

गांधारीला आंधळ्या धृतराष्ट्रासाठी मागणी घालून भीष्मांनी गांधारचा अपमान केला असे *शकुनीला*( तिच्या भावाला) आयुष्यभर वाटत राहिले. परंतु गांधारीने हा विवाहप्रस्ताव स्वखुशीने मंजूर केला.

आता १०० कौरवांच्या जन्माबद्दल
हिला विवाहानंतर लौकरच गर्भधारणा झाली. कुंतीला युधिष्ठिर नामक पुत्र झाल्याची वार्ता समजताच असूयेने हिने आपला अपुर्‍या दिवसांचा गर्भ बाहेर काढला . त्यामुळे लोळागोळा झालेला मृतप्राय गर्भपिंड पुत्र म्हणून हिला प्राप्त झाले, आणि ही शोकातिरेकाने रडू लागली. हिची ही अवस्था पाहून व्यासांना दया आली आणि त्यांनी त्या गर्भाचे शंभर तुकडे करुन ते एका घृतकुंभामध्ये स्थापन करण्यास सांगितले. काही काळाने हिचा मृतगर्भ पुन्हा जीवित होऊन, घृतकुंभाद्वारे हिला दुर्योधनादि शंभर पुत्र झाले

महत्वाचे थोडे
गांधारी ही भगवान शंकराची परमभक्त होती. कौरवांची वागणूक खलनायकाप्रमाणे असली तरी महाभारतात गांधारीची वर्तणूक अतिशय सालस व धार्मिक होती. ती नेहेमी धृतराष्ट्र व आपले पुत्र यांना राजधर्म व चांगल्या वागणुकीसाठी बोलत असे. पांडवांचे कौरवांशी कितीही टोकाचे वैर असले तरी त्यांना गांधारीच्या बाबतीत परम आदर होता.

युद्धसमाप्तीनंतर गांधारी आणि धृतराष्ट्र पांडवांसमवेत हस्तिनापुरी राहू लागले. सुस्वभावी युधिष्ठिर गांधारीची सर्वतोपरी काळजी घेत असे. परंतु भीम मात्र तिला एकसारखे उणेदुणे बोलून तिच्या पूर्वदुःखाच्या स्मृती ताज्या करीत असे. भीमाच्या या अशिष्ट वर्तनाने तिला वैराग्य उत्पन्न झाले आणि ती, धृतराष्ट्र, कुंती आणि विदुर यांच्यासमवेत वनात गेली. तेथे व्यासाने तिला, कुंतीला आणि धृतराष्ट्राला मृत पुत्रांचे दर्शन घडविले. तदनंतर गंगाद्वारानजीकच्या वनामध्ये लागलेल्या दावानलात गांधारी, धृतराष्ट्र आणि कुंती एकत्र जळून भस्म झाले.

कदाचित त्यावेळच्या परिस्थितीने तिला गप्प रहावे लागले असेल तरिही *वेळोवेळी धुतराष्ट्र, दुर्योधन  यांना ती धोक्याची सूचना ( चुकीचे वागत आहात असे सांगणे) देतच होती*

*थोडक्यात अांधळेपणाने आपापल्या नेत्यांचे आदेश / निर्णय/ मान्य करणा-या  सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्यापेक्षा 'गांधारी' थोडी उजवी होती असे म्हणता येईल का?*
 ✨⚡✨

📝अमोल
१८/०४/२०२०
poetrymazi.blogspot.in

Thursday, April 16, 2020

स्वप्नात 'आँफीस' येईल का?


#लाॅकडाऊन_विडंबन_पुढे_चालू

( मुळ गाणे:- स्वप्नात साजणा येशील का)

स्वप्नात 'आँफीस' येईल का?
दु:खात रंग हे भरतील का?

मी घरचे काम करावे, तू स्वप्नात तरी दिसावे
दोघांनी ठरवून यावे, ही किमया नकळत करशील का? करशील का?

तो धूंद करितो वेग, लोकलला येते जाग
घामाघूम व्हावे अंग, स्टेशनात रिक्षा धरशील का ?

'झूम'वर लाॅगीन होता, जणू स्वर्गच येई हाता
'काॅन्फरन्स' संपता संपता, घरातून आठवणीत राहशील का?

स्वप्नात 'आॅफीस' येईल का?
दु:खात रंग हे भरतील का?

📝अमोल
१७/०४/२०२०
poetrymazi.blogspot.in

झुकझुक झुकझुक अगीन गाडी


झुकझुक झुकझुक अगीन गाडी 🚂

पळती झाडे पहात पहात मामाच्या गावाला जायची मजा आम्ही ब-याचदा बसनेच पुण्याला जाऊन घेतली असली तरी
'रेल्वे ' प्रवास हाच आमचा जन्मापासून आत्तापर्यंतचा सगळ्यात आवडता प्रवास आहे यात तिळमात्र शंका नाही.

आज १६ एप्रिल. भारतीय इतिहासात सगळ्यात पहिल्यांदा रेल्वे जी मुंबइईहून ( कुलाबा??) ठाण्यापर्यंत धावली ती आजच्याच दिवशी.

तर या आजच्या दिवसाच्या निमित्ताने आमची काॅलेज जीवनातील रेल्वे संबंधातील  एक 'कटू' आठवण असं म्हणतात की वाईटातून चांगल घडतं तेंव्हा गोष्टीचा शेवट अर्थातच सुखद आहे.

तर केमिकल इंजिनियरींगच्या दुस-या किंवा तिस-या वर्षानंतर च्या सुट्टीतील घटना. माझा वारणानगरच्या काॅलेज चा मित्र माधव, कराड इंजिनियरींगला असणारा सांगलीचाच मित्र 'उपेंद्र' असा आमचा छोटा तिघांचाच ग्रुप होता. कराडला उपेंद्र बरोबर असणारा त्याचा मुंबईचा मित्र सांगलीला आलेला. आता सांगली जवळ बघण्यासारखी मोजकीच ठिकाणे. तर आम्ही ठरवलं की "औदुंबर" दाखवू त्याला.
ठरल्याप्रमाणे बसने औदुंबरला गेलो, दर्शन घेतले आणि परत सांगलीला निघताना एकदम लक्षात आले की आपण भिलवडी स्टेशनला जाऊन पुणे- मिरज ( का कोल्हापूर)  पॅसेंजर पकडू शकतो. याचा फायदा असा होईल की या गाडीने आपण सरळ विश्रामबाग पर्यंत जाऊ शकू. त्यावेळी अर्थातच विश्रामबाग हाच आमचाही इतर सांगलीकर युवकांसारखा अड्डा होता हे वेगळे सांगणे नको आणी उपेंद्र चे घर तिथेच होते.

माझ्या सुचनेला अर्थातच इतर तिघांनी मंजुरी दिली. आम्ही गाडीच्या १०-१५ आधी स्टेशनवर आलो. गाडीची वाट बघू लागलो.

आता ब-याच जणांना हे माहित असेल की भिलवडी स्टेशनला मुख्य एकच प्लॅटफाॅर्म आहे. थांबणा-या सगळ्या गाड्यांना मेन लाईन सोडून प्लॅटफॉर्मच्या बाजूच्या साईड लूप वर यावे लागते आणि अर्थातच या सगळ्या प्रोसेस मधे गाडीचा वेग अतीशय मंदावतो

पुर्वी दक्षीण मध्य रेल्वे विभागात जिथे इलेक्ट्रिक सिग्नल नव्हते.प्रत्येक स्टेशनला येणारी गाडी आधीच्या स्टेशनहून सुटली की एकदा आणि या स्टेशनवर यायच्या थोडं आधी ( म्हणजे इंजीन दिसू लागल की)  रेल्वे कर्मचारी घंटा वाजवायचे. त्याप्रमाणे भिलवडी स्टेशनवर पुण्याहून येणारी पॅसेंजर दिसायला लागताच घंटानाद झाला.
काय कुणास ठाऊक पण मी तिकडून गाडी दिसत असताना भिलवडी स्टेशनचा फलाट ओलांडून रुळा पलीकडे गेलो. इंजीनाने एव्हान मस्त मेन रुळ सोडून प्लॅटफॉर्मच्या दिशेचे सर्विस रुळ पकडले होते. इंजीनाचा कर्व्ह, मागचे डबे सगळं मस्त दिसत होते. इकडं मित्र मला बोलावतायत अमोल ये पटकन ये पटकन तरीही मी तिथेच उभा. आणि इंजीन फलाटावर येण्याच्या जरा आधी मी रुळ ओलांडून फलाटावर चढलो.

मी निवांत होतो कारण मी  गाडी माझ्या उभारलेल्या ठिकाणी यायच्या खूप आधी रुळ ओलांडले होते आणि माझ्यामते मी कुठलीही मोठी रिस्क घेतली नव्हती, कारण समोरुन येणाऱ्या गाडीचा वेग मला कळत होता.

मात्र माझे हे सगळे विचार धुळीस मिळाले कारण तिथे उभ्या असणाऱ्या रेल्वेच्या एका आॅफीसरने माझ्या दंडाला पकडून एकदम मला धरले. मला अजूनही त्याचे आडनाव लक्षात आहे  .' राव' आडनाव .म्हैसूर / धारवाड सेक्शनचा मोठा अधिकारी होता तो हे नंतर त्याच्याशी बोलताना कळले. पण त्या क्षणी तो आमच्या चौघांसाठी राव'ण' बनूनच आला होता

मला काहीच कळले नाही. पॅसेंजर एखादा मिनीटच स्टेशनवर थांबत असल्याने त्याने मला आणि तिघा मित्रांना लेडीज डब्यात चढवले. तिकीट विचारले, दाखवले
 निदान आम्ही भूरटे नाही आहोत हे तरी त्याला समजले. पण नंतर तूम चारो अच्छे घर के दिखते हो असे म्हणत  बापरे नंतर त्याने एवढं ऐकवल की बस बस बस.

 तुम ऐसा कैसा किया?
 ड्राइव्हर ब्रेक मारता तो?
  कितनी जान जाती मालूम है?  ठैरो तुम सबको  अंदर डालता हूँ
 ( बिचारे माझ्याबरोबरचे तिघे 😉) अस म्हणतातच मात्र आमची भितीने....

सर साॅरी, परत ऐसा नही होगा, सर प्लीज प्लीज करत नांद्रे स्टेशन येईपर्यंत त्याला पटवण्याचा प्रयत्न केला आणि अक्षरशः सांगतो खिशातील एकूण एक पैसे त्याला देऊन शेवटी मांडवली केली.

मंडळी याचा पुढचा उत्तरार्ध जास्त महत्वाचा ठरला. थोडी बोलणी सुरु झाली.बाय द वे या मांडवलीने आमची रवानगी नांद्रे स्टेशनहून पुढे जनरल डब्यात झाली होती. लेडीज डबा तरी सुटला होता.😁  त्यांनी नाव विचारले, काय करता, सगळे इंजिनियरींगला आहेत हे ऐकून हे भूरटे इंजिनियरींगला? असा भाव त्याच्या चेह-यावर अगदी दिसून येत होता. आम्ही त्यांना नाव वगैरे विचारले  आणि काय मला हुक्की आली कुणास ठाऊक मी त्यांना म्हणलं सर एकबार इंजीन देखना है!. हे बोलणे होत असताना गाडी जस्ट माधवनगर स्टेशन ला शिरत होती.

मंडळी वाईटातून चांगले होते ते हे. पुढच्या काही क्षणात ते राव स्वतः आम्हाला चौघांना इंजीनात घेऊन आले. ड्राइव्हर वयस्कर होते. एक असिस्टंट ड्रायव्हर आणि रांवांना धरुन आम्ही ५ जण दाटीवाटीने उभे.

माधवनगर स्टेशन - ते सांगली स्टेशन
फारतर ७ एक मिनीटाचा प्रवास.  इंजीन ड्राइव्हर काहीतरी माहिती देत होते पण मी स्वतः कुठल्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. सांगली स्टेशन आले,  आम्ही उतरलो,  रावांचे आभार मानले, मागच्या डब्यात चढलो कारण पुढच्या विश्रामबाग स्टेशनला उतरायचे होते,  उतरलो पण नंतर कित्येक दिवस हा प्रवास कायम आमच्या स्मरणात राहिला

बरं का मंडळी,  बेळगावहून मिरजे कडे येताना पु.लं नी इंजीनातून प्रवास केला होता,  त्यांच्या नशिबाने त्यांना गाडीचा भोंगा वाजवण्याची संधीही मिळाली होती.

तशी हाॅर्न वाजवायची संधी मिळाली नसली तरी पु. लं प्रमाणे एका टुकार लेखकाने इंजिनातून प्रवास केला आहे हे ही नसे थोडे 😊

त्यानंतर आजतागायत कधीही रेल्वे रुळ ओलांडला नाही 🙏🏻👍🏻

'गाडी बुला रही है ' 🚂

📝अमोल केळकर
१६/०४/२०२०

Wednesday, April 15, 2020

चायनाच्या लोकांनी ( रेशमाच्या रेघांनी)


#लाॅकडाऊन_विडंबन
नंबर : असं मोजायच अस्तय ह्वय पाहुणं, हुन जाऊ द्या

( मुळ गाणे- रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी, कर्नाटकी कशिदा मी काढीला, हात नगा लाऊ माझ्या साडीला )

© अमोल केळकर 📝

( खरं हे ☝🏼© द्यायची पण आवश्यकताच नाही, कारण एवढा टुकारपणा आमच्या शिवाय.. कोण करणार 😷)

चायनाच्या लोकांनी, वटवाघूळ खाऊनी
करोनाचा विषाणू हा काढीला
कर्फ्यू आता सुटणार ३ मेला

नवी तारिख ही लाॅकडाऊनची
घेतली भाजी वांगी दोडक्याची
लावियलं काल'झूम',फेसबुक जोडीला
कर्फ्यू आता सुटणार ३ मेला

जात होते फाॅरेन ला मी तो-यात
अवचित आला जंतू देशात
तुम्ही तुमच्या तोंडाचा 'मास्क' का हो काढीला
कर्फ्यू आता सुटणार ३ मेला

लिस्ट आता ठेवा आल्यागेल्यांची
काळजी ही घ्या दहा बोटांची
काय म्हणू बाई,  तुमच्या सोशल डिस्टन्सला
कर्फ्यू आता सुटणार ३ मेला

चायनाच्या लोकांनी, वटवाघूळ खाऊनी
करोनाचा विषाणू हा काढीला
कर्फ्यू आता सुटणार ३ मेला

📝माझे टुकार ई-चार 😬
poetrymazi.blogspot.in
१५/०४/२०२०

Tuesday, April 14, 2020

इथे करोनाचे जाळे


(मुळ चाल: फिटे अंधाराचे जाळे)

 इथे करोनाचे जाळे, सारे बंदी झाले देश
गल्ली बोळातून जारे, जरा आज सावकाश

लाॅकडाऊन झाले सारे, विमानसेवा बंद झाल्या
कुर्ला कळवा डोंगरी ,संग सिमा सिल झाल्या
आले दु:खाचे सावट जग भकास भकास

दव पिऊन नवेली झाली वुहानची पाती
धंदा जुनाच नव्याने हीच चायनाची निती
क्षणापूर्वीचे न्यूयॉर्क झाले उदास उदास

लागे इथे रामायण साथ चाणक्यची मेख
रिती आणि रिवाजाचा घरोघरी अभिषेक
सारे पुर्वीचे तरीही, वाटे आज  खूप खास

इथे करोनाचे जाळे, सारे बंदी झाले देश

📝अमोल
poetrymazi.blogspot.in

Monday, April 13, 2020

डॅल्गोना' काॅफी आणि बरंच काही


'डॅल्गोना' काॅफी आणि बरंच काही .☕

मंडळी मला कल्पना नाही 'डॅल्गोना'  हा शब्द मी बरोबर लिहिला आहे की नाही पण सध्या याची जबरदस्त क्रेझ सोशल मिडियावर पहायला मिळत आहे.  'डॅल्गोना काॅफी' ते "डॅल्गोना व्हिस्की" पर्यत झेप या प्रकाराने घेतली आहे. त्यामुळे अर्थातच आम्हाला ही याची दखल घेणे भाग पडले आहे.

तुम्ही म्हणाल काय गरज आहे का दखल घ्यायची?  पण मला सांगा छान "फिल्टर काॅफी" फार तर "नेस काॅफी" अगदीच मोठी झेप म्हणजे "कोल्ड काॅफी" असताना काय गरज होती का हे 'डॅल्गोना काॅफी' वगैरे पॅटर्न पाडायची?

माझ्यामते चहा, काॅफी या भावंडांच्यात कोण श्रेष्ठ हा लढा वेगळ्या वळणावर येऊन थांबला आहे. या बहिण भावंडांच्यात काॅफी हे शेंडेफळ. कायमच हीचे जास्त लाड होतात हे साधारण निरीक्षण. मग टीव्ही शोच्या नावात काॅफी आली, तिथे चर्चा करणारे पुढ्यात मोठ्ठा मग्गा घेऊन एकदम स्टाईलीश चर्चा करु लागले. अर्थात त्यामुळे हीचा भाव थोडा चढलेलाच.
हळूहळू हळूहळू 'चहा' ने ही कात टाकली. ब्लॅक,रेड,अद्रक,ग्रीन अशा स्वरूपात मिळू लागला. पुर्वी ठराविक 'अमृततूल्य' , किंवा गाड्यांवर असणारा चहा वेगवेगळ्या व्यावसायिक आऊटलेट रुपाने नावाजला जाऊ लागला. मग काॅफीला कुठल्या तरी नव्या अवतारात येणे आवश्यकच होते.  'शो मस्ट गो आॅन' असंच काहीस असाव

आता या डॅल्गोना चा सरळ गावठी अर्थ जो मी समजलो तो असा की काॅफी जी आपल्यासमोर येते त्यात दोन द्रव्यांचे थर वेगवेगळे दिसणे. हाच तो डॅल्गोना पॅटर्न.थोडक्यात सांगायचे तर

करुन  घ्या द्रव्यांचे ,
 वेगवेगळे लेअर
मग फोटो काढून करा,
डॅल्गोना काॅफी  शेअर 😉

हा डॅल्गोना पॅटर्नचा # ट्रेंड आत्ता आल्यानंतर जरा विचार केला की अरे अनेकवेळा आपण या साच्यातून गेलोय की. अगदी लहानपणी बाबा रोज पहाटे "राम मंदीर "ते "विश्रामबाग " फिरायला घेऊन जायच्याआधी जबरदस्तीने दूध अंड द्यायचे. एका ग्लासात ते  अंड फोडायचे आणि वरुन दूध घातलं की झकास डॅल्गोना पॅटर्न बनायचा. अगदी सहज तीन लेअर म्हणजे खाली पिवळा बल्क, वर द्रव्य ( अंड्याची ग्रेव्ही म्हणूया का?  😊)  आणि तिसरा थर दुधाचा.  ते तिन्ही थर नुसते बघत बसावे असे वाटायचे. ( कारण चव फारसी आवडलेली नसायची 😬)  मग बाबा स्वत: उशीर होईल म्हणून पटापट ते तिन्ही थर एकजीव करुन प्यायला लावायचे. ही या पँटर्न शी झालेली पहिली ओळख.

शाळेतल्या मास्तरांनी तोंडावर उठवलेल्या चार बोटांचा थर इतर चेहऱ्यापेक्षा वेगळा दिसत असताना याला 'डॅल्गोना पॅटर्न' मधे घ्यायचे का हे तुम्हीच सांगा.

शाळेतील बीजगणित+ भूमिती, इतिहास+ नागरिकशास्त्र +भूगोल,  हिंदी +संस्कृत असे वेगवेगळ्या थरातील पण एकमेकांशी संबंधित विषय हे माझ्या दृष्टीने 'डॅल्गोना पॅटर्नच"

आम्ही दहावीत असताना समजा भूगोलाचा पेपर रद्द झाला असता तर आम्ही अशी चारोळी नक्कीच केली असती

इतिहास म्हणाला नागरिकशास्त्राला
'आयसोलेशन' मधे आहे  'जाॅग्रफी'
या दु:खात दोघे मिळून
चल घेऊ "डॅल्गोना काॅफी'😷

आता जास्त वेळ न दडवता तुम्हाला सरळ घेऊन जातो केमिकल इंजिनियरींगच्या रसायनशास्त्र प्रयोग शाळेत. या ठिकाणी चार वर्षात असंख्य टेस्ट ट्यूब फोडल्यात. किती केमिकल्स, किती प्रकारे, किती प्रमाणात छोट्याशा त्या नळकांडीत घालून या डॅल्गोना पॅटर्नद्वारे 🔥घडवलेत याची गणती नाही. त्या चार वर्षात शनी-मंगळ युती कडून ही एवढे धडाम-धूम स्फोट झाले नसतील एवढे आम्ही स्फोट प्रयोगशाळेत केले. बरं हे कळलं, जेंव्हा अंतीम वर्षानंतर काॅलेजमधून परत जाताना मिळणा-या डिपाॅझीटचा आकडा वरील करामतींमुळे सर्रकन खाली आला तेंव्हा.

बाकी तुम्हीही अनेक प्रकारे हा पॅटर्न अनुभवला असणार. काही नशीबवान असतील ज्यांनी खरोखरच अशी काॅफी पिली असेल. काही जणांनी सूर्योदय, सूर्यास्तावेळी आकाशात दिसणाऱ्या "डॅल्गोना छटा" बघितल्या असतील किंवा अगदीच कुणीतरी ओरडून ते बघ असं दाखवलेलं 'इंद्रधनुष्य' 🌈असेल.

आता यातलं कुणी काहीच केलं नसलं तरी तुम्ही नक्कीच नशीबवान आहात की गेली अनेकवर्षे तुम्ही ललित,विडंबन,कविता,चारोळी युक्त 'टुकार डॅल्गोना पॅटर्न  ललित' वाचत आलात, आणि जे आत्ताही केलंतं 😄

📝अमोल
१३/०४/२०२०
poetrymazi.blogspot.in

Friday, April 10, 2020

झूम लगा रे ...


'झूम लगा ले, झूम लगा ले, झूम '

खरंच ह्या लाॅकडाऊन च्या दिवसात आतापर्यत काय काय दिव्य पार पाडली आणि अजून काय काय बघायला लागणार आहे देव जाणे. 'वर्क फ्राॅम होम' म्हणजे लॅपटाॅप, संगणकावर काही कामे, २-४ फोन,  फार तर व्हाटसप मेसेज इ पर्यत ठीक होतं पण हे 'झूम ( अॅप) लगाले'  असा आदेश आला आणि घर नको पण आॅफीस बरं अस वाटायला लागलं.

स्वत: पुरते  म्हणजे आॅफीस काम तरीपण समजू शकतो पण आता
' स्कूल फ्राॅम होम ' पण सुरु झाले आहे. या नवीन तंत्रज्ञानाने घेतलेली  झेप पाहून खरच थक्क व्हायला झाले. नाही याची कल्पना आहे की सध्याच्या आलेल्या संकटावर मात करण्यासाठी ही शाळेने केलेली तात्पुरती उपाययोजना आहे आणि थोड्याकालावधी नंतर परत सर्व पुर्ववत होणार आहे.

पण क्षणभर विचार केला आपण शाळेत असताना 'झूम ' लगाले असतं तर?  काय एकएक धमाल आली असतीना ? सगळ्यात मोठी गोची मास्तरांची झाली असती. प्रत्यक्ष शिकायला समोर मुले नाहीत. शांत बसा रे ! नाहीतर वर्गाबाहेर कोंबडा करायला लावेन ( इथ झूमवर म्यूट करुन घाला चिक्कार दंगा कुणाला कळतयं?  पण एकटा घरी  मी , सोबत कुणी नाही, दंगा तरी कुणाबरोबर करणार?  ), किंवा लक्ष नसलेल्याला खडू मारुन भानावर आणणे, गणीत चुकल किंवा उत्तर आले नाही की पाठित बसणारा रट्टा? हे ठरलेल असताना,  आता आमचे ' नाना '  सगळ्यांना उद्देशून , "उटिव त्याला, उटीव झोपलाय बघ झूमवर " असे म्हणताना बघवेल का सांगा की 😊

सकाळी ११:१५ च्या शाळेसाठी माधवनगर ते जयसिंगपूर ही १०:३०, १०:४० ची बस कारखान्यावर पकडून बसमधे माधवनगरहून आलेल्या मित्राजवळ जाऊन त्याला दप्तर धरायला देणे, तरुण भारत/मंडईच्या  स्टाॅपला न उतरता  बापटबाल जवळील स्पिडब्रेकरवर नेहमीच्या कंडक्टर कडून सिंगल बेलचा वशीला मारुन कसेबसे ११:१५ पर्यत कुपवाडकर सरांच्या काठीचा मार चुकवून वर्गात जाणे, जयस्तूsते -राष्ट्रगीत -प्रार्थना - हजेरी - ३५ मिनीटाचे ८ वेगवेगळे तास- १० मिनिटे आणि ४० मिनीटाच्या दोन सुट्या - एखाद्या आॅफ तासाला परत करायला मिळालेली अमरधाम वारी आणि - संध्याकाळी ५:१५ ला
 'वंदे मातरम' होऊन घरी जाण्यासाठी शिवाजी मंडईच्या स्टाॅपकडे ठोकलेली 'धूम' ची मजा या 'झूम' मधे नक्कीच मिळणार नाही.

म्हणूनच 'नमस्कार माझा ज्ञानमंदिरा' किंवा प्रत्यक्ष ज्ञानमंदिराची पायरी चढल्यावरच कळते
 'ही आवडते मज मनापासून ही शाळा,  लाविते लळा ही जसा माऊली बाळा'

कल्पना आहे मला हे "झूम" काही दिवसांसाठी आहे आणि लवकरच हे सगळे शाळकरी परत धाळेत जाण्यासाठी 'धूम' ठोकतील कारण

धूम नशा है
धूम जुनून है
धूम है हलचल
धूम सुकून है

*मात्र*

आज तू सब कुछ भुला के "झूम"

झूम लगाले… *
झूम लगाले…
झूम

* टिप: झूम अॅप शाळेने दिलेल्या मार्गदर्शनानुसार आणि आपापल्या जबाबदारीवर उतरवून घ्यावे. काही मिसयूझ / नुकसानीस लेखक जबाबदार नाही

📝अमोल
१०/०४/२०२०
poetrymazi.blogspot.in

#झूम_लगाले_धूम_मचाले

Monday, April 6, 2020

ख्वाजा बदनाम हुवां


आमचा मित्र अंबरीश ने नुकतच पाठवलेले एक विडंबन

ख्वाजा बदनाम हुवां
मरकझ तेरे लिये,

ले झंडू बाम हुंवा
मरकझ तेरे लिये..

ख्वाजा के बोल गुलाबी,
सोच नवाबी,
ताल जिहादी रे..

ख्वाजा बदनाम हुवां
मरकझ तेरे लिये !
....


घाटातली वाट


घाटातील वाट

घाटातली वाट,
काय तिचा थाट !
मुरकते, गिरकते,
लवते पाठोपाठ ।।

निळी-निळी परडी,
कोणी केली पालथी ?
पानं फुलं सांडली,
वर आणि खालती ।।

खाली खोल दरी,
वर उंच कडा,
भला मोठा नाग, जणू
उभा काढून फडा ।।

भिऊ नका कोणी,
पाखरांची गाणी,
सोबतीला गात गात,
खळाळतं पाणी ।।

घाटातली वाट,
काय तिचा थाट !
गाणी म्हणू, टाळ्या पिटू,
जाऊ रुबाबात ।।


आठवतीय ही बालभारती मधील कविता? घाटाचं वर्णन इतक छान केलय की कुठल्याही घाटातून जाताना ही लहानपणीची  कविता आठवतेच. तुमचा आहे एखादा आवडीचा घाट?  अंबोली, राधानगरी, गगनबावडा,  अंबा, कुंभार्ली, पसरणी, पोलादपूर, परशूराम, कशेळी, खंबाटगी?  असेलच ना एखादा?

माझाही एक आहे. वर जे चित्र बघताय ना तोच घाट. . रस्ता आणि रेल्वे कुठल्याही मार्गाने गेलात तरी हा घाट मुंबई - पुणे- मुंबई प्रवासात लागतोच. म्हणूनच मी याला   'घाटांचा राजा' म्हणतो.
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांग तूला दिसतो कसा,  खंडाळ्याचो घाट अशा वर्णनाचं गाणंही चित्रित केले आहे. हे गाणे जरी 'झुकझुक गाडी' साठी असलं तरी वरचे चित्र पाहून हे वर्णन रस्त्यासाठी ही किती समर्पक आहे याची जाणीव होते.

 चित्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा घाट ज्या पुणे-मुंबई मार्गावर आहे त्या मार्गाची अनभिषिक्त राणी म्हणजे 'शिवनेरी' चित्रात आहे आणि संपूर्ण मार्गाचे जे 'हृदय' आहे ते ठिकाण म्हणजे 'अमृतांजन पूल ' तिथला हा फोटो.

'अमृतांजन पूलाच्या' साधारण १०-१२ किमी च्या परिसराला मी मानवी ह्रदयाची उपमा देईन.  ह्रदय धडधडीत तर शरीर ठिक त्याप्रमाणे या ठिकाणच्या रहदारीचा दाब म्हणजे जणू संपूर्ण पुणे- मुंबई रस्त्याचा "रक्त दाब" . दर शुक्र/ शनि , लागून आलेल्या सुट्टया यावेळेला पुण्याकडे जाताना हा दाब वाढतो तर कुठल्याही रविवारी मुंबई कडे जाताना. मंडळी अतीशय गुंतागुंतीची रचना इथे पण आहे बर का !  जसा 'हार्ट' स्पेशालिस्ट गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करु शकतो तसाच या रस्त्याची इथ्यंभूत माहिती असणारा तज्ञ चालकच ( प्रती श्रीकृष्ण ) अगदी कुशलतेने यातून मार्ग काढू शकतो. यातील कुठले मार्ग बायपास करायचे, कुठला मार्ग पकडला तर कुठे ट्रॅफिक लागणार नाही, लोणावळ्याला जाऊन मलई चिक्की तर घ्यायची आहे पण एक्सप्रेस हायवे पण सोडायचा नाही, खोपोली मार्गे जून्या पुणे- मुंबई मार्गावरुन जायचं आहे, खोपोली गावात टाटा पाॅवर कडून जायच आहे. लोणावळ्यात नारायण धाम मंदिर, वॅक्स म्युझियम बघायचं आहे पण लोणावळा बायपास करायच आहे. दोन चाकी/ तीन चाकी साठी मुंबई कडे जाताना एक्सप्रेस वे कुठे सोडायचा?  तर पुण्याकडे जाताना कुठे सोडायचा? घाटात कुठल्या ठिकाणी अचुकतेने योग्य मार्गिकेवर गेल्याने जाम मधे अडकणार नाही.

मंडळी, आहे ना गुंतागुंत. म्हणूनच हे 'हृदय' आणि हाच 'घाटांचा राजा'.

पुण्यात गाडीत ( कुठल्याही)  बसल्यावर, कळंबोली आली की जागे होणाऱ्यांच्या गावीही नसेल ही गुंतागुंत.  अगदी पुणे-मुंबई नियमीत प्रवास करणाऱ्यां बहुतांशी जणांना हे वरचे चित्र कुठे घेतले आहे हे सांगता येणार नाही ( हे मी अगदी खात्रीने सांगू शकतो 😉)

 तर मंडळी  एवढं सगळं आठवायच कारण की
काल संध्याकाळी अचानक आमच्याच हृदयात कळ आली जेंव्हा एकाच वेळी अनेक ग्रुपवर ' १९० वर्षापूर्वी चा अमृतांजन पूल ' पाडल्याची बातमी एका व्हिडिओ सह आली.  कस शक्य आहे?  असा मनात पहिला प्रश्ण आला. अजूनही कुणी पक्क असं सांगू शकलेलं नाही. पण काही सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की लाॅकडाऊन मधे आपण सगळ्यांनी घरात साफसफाई केली, कपाट आवरले, खोल्या साफ केल्या. अगदी तसं या  पूलाचा अनावश्यक कचरा साफ केला गेला
*थोडक्यात 'पुणे-मुंबई रस्त्याच्या हृदयाची बायपास झाली आहे* पेशंट व्यवस्थित आहे. लवकरच पूर्ववत काम करु लागेल.

असेच होऊ दे रे मारुतीराया. परत पुण्याकडे जाताना अमृतांजन पूलाच्या अलीकडे मुंबई साईडला तू  आहेस तिथे मुद्दाम थांबून हार- नारळ अर्पण करुनच जाईन रे बाबा

 अमृतांजन पाॅईंट अनेक ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार. या पूलावर मुंबई हून पुण्याकडे जाणारी रेल्वे यायची , थांबवली जायची  मग इंजीन परत मागे लावून पुण्याकडे जायचे. तसेच आज रस्त्या रस्त्यावर गावागावातून मोठमोठाले बॅनर, होर्डींग जे आपण बघतो त्याची पहिली मुहूर्तमेढ घातली होती
'अमृतांजन कंपनीने ' या पूलावर पहिले बॅनर/ जहिरात लावून

तेंव्हापासून हा झाला 'अमृतांजन पाँईंट '.  आज मुंबई - पुणे मार्गावर प्रवासातील सगळ्यात डोकेदुखी ठरणारे ठिकाण हे अमृतांजन पाँईट असले तरी, डोकेदुखी  बायपास करुन का होईना तूझी उपस्थित आम्हाला पाहिजे आहे कारण तुझ्याशिवाय आमचे दिल धक धक कोण करणार?  ❤

भेटू लवकरच परत 🚗

#मुंबई_पुणे_मुंबई_व्हाया_अमृतांजन_पूल

📝अमोल
०६/०४/२०२०
poetrymazi.blogspot.in

Saturday, April 4, 2020

दिवे लागले रे


मंडळी नमस्कार 🙏🏻

गेले काही दिवस  सगळेजण  अनेक प्रकारचे  "दिवे " लावत आहेत. कुणी म्हणतंय
' मालवूनटाक दीप 'तर कुणी  म्हणतंय

' दिवे लागले रे , दिवे लागले रे '
तमाच्या तळाशी दिवे लागले
दिठींच्या दिशा  तेजाळताना
कुणी जागले रे कुणी जागले

थोडक्यात कुठे 'दिया जले' कुठे 'ना जले '  पण प्रासंगिक लेखन करणारे लेखक असोत , विनोंद / व्यंगचित्र बनवणारे/ विडंबनकार/ मिम्स / चुटकुले करणारे असोत, ख-या कलाकारांच्या डोक्यात विषयाला अनुसरून
' ट्यूब पेटतेच '. बाकीचे मग ते पुढे ढकलून मजा बघतात.

अर्थात आम्हाला ही दोन उदाहरणे आठवली:-

शनी महाराजांच्या साडेसातीत  हात - पाय तोडला गेलेला राजा 'विक्रमादित्य' घाणा ओढत असताना  एकदा संध्याकाळच्या वेळेला 'दीप' राग आळवत असतो. त्या रागाने अचानक सगळीकडे नगरीत दिवे प्रकाशतात . हे पाहून राजकन्या हा राग म्हणणा-याला घेऊन या असा आदेश देते . सेवक राजा विक्रमादित्याला ( जो त्या क्षणी चोर म्हणून शिक्षा भोगत असतो ) घेऊन येतात . त्याचवेळी साडेसाती संपल्याने शनी प्रकट होतात आणि राजाला मूळ रूप प्रदान करतात.  संपूर्ण कथा पाहिजे असल्यास इच्छूकांनी शनी महात्म्य वाचावे.

दुसरे उदाहरण  तानसेन चे

आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर तानसेन ने अकबराच्या दरबारात नवरत्नांच्यात स्थान मिळवलेले असते. ही गोष्ट इतरांना रुचत नाही. तानसेनचा काटा काढण्यासाठी  मग इतर रत्ने एक कटकारस्थान रचतात.

ते सर्व अकबराच्या मनात भरवतात  की  'राग दीप ' तानसेन शिवाय कुणी चांगला गाऊ शकत नाही .

या  रागाचा परिणाम काय होईल हे सांगितल्याशिवाय तानसेन
 ' दीपक ' राग सादर करण्यास नकार देतो .
मात्र राजा हुकूम देतो आणि तानसेनचा पण नाईलाज होतो.

तानसेन जसा ' दीप ' राग म्हणावयास सुरवात करतो तशी गर्मी वाढायला लागते. संपूर्ण वायूमंडल अग्नीमय होते , ऐकणारे स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळतात , तानसेनच्या शरीराला अग्नी घेरतो.

 अशा प्रसंगी तानसेनच्या मुली
 ' मेघ मल्हार ' गाऊन त्यावेळी परिस्थिती निभाऊन नेतात . मात्र या घटनेनंतर काही महिन्यांनी परत ज्वर होऊन तानसेन यांचे निधन होते.

अशा या दोन गोष्टी आज आठवल्या.म्हणून सांगितल्या

प्रथेप्रमाणे लेखनाचा शेवट काही ' टुकार'  ओळींनी

'अंधेर नगरी चौपट राजा'
'रात्रीस खेळ चाले'
'समांतर', 'गाणारा मुलुख' पाहून
 सारे ' असंभव ' झाले

एक आठवण : संध्याकाळी प्रदोष व्रत करून दिवे लावायला  विसरू नका
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

📝अमोल
०५/०४/२०२०
poetrymazi.blogspot.in

ग्रीड धरी, ग्रीड धरी जागृत वीजधारी


रात्रीचे ९ आणि ग्रीड  ⚡वर येणारा लोड हे सगळं वाचून संगीत 'मेघमल्हार' मधील विद्याधर गोखले यांचे

'धीर धरी, धीर धरी, जागृत गिरीधारी |
हे गाणे आठवले.

हेच गाणे जरा वेगळ्या शब्दात
( *मनोरंजन हा हेतू*)

ग्रीड धरी, ग्रीड धरी जागृत वीजधारी ⚡
चकवितसे 'भक्त-कांस' तोच शाॅकधारी |

ग्रीड धरी, ग्रीड धरी ||

बाल्कनीत, गॅलरीत लावले दिव्याला🪔
क्षणार्धात उर्जाही दिली मेणबत्तीला🕯
दिसले फ्लॅशदिवे सकल गोकुळाला🔦
ऐसा 'योगी' मारी झोत या सा-या शहरी |

ग्रीड धरी, ग्रीड धरी जागृत वीजधारी ⚡

होसी का भयकंपीत,चालू दे पंखा
गाजतसे वाजतसे 'नवाचाच(९)' डंका
बंद साईट, बंद लाईट , बटणे बंदसारी |

ग्रीड धरी, ग्रीड धरी जागृत वीजधारी ⚡

📝अमोल
०४/०४/२०२०
poetrymazi.blogspot.in

Friday, April 3, 2020

करोनाचा जंतू


कवी नारायण सुर्वे यांची माफी मागून
' *भाकरीचा चंद्र* ' थोड्या वेगळ्या शब्दात

( *आमचाही लाॅकडाऊन मधे मनोरंजन करणे हा हेतू, दुसरा कुठलाही नाही*)

दोन दिवस 'थाळी' बडवण्यात गेले, दोन 'दिव्यात' गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो काही 'व्हिडिओ' पाहिले, 'मन की बात' आली
' *करोनाचा जंतू*' शोधण्यात जिंदगी बरबाद झाली

हे हात माझे सर्वदा, सॅनीटायझर कडे गहाण राहिले
कधी मास्क घालतेवेळी, कधी कलम झालेले पाहिले

घरघडी म्हणून 'कपडे' वाळवले ,पण असेही क्षण आले
जेव्हा 'भांडी' मित्र होऊन सहाय्यास धाऊन आले.

दुनियेचा विसर हरघडी केला अन बंदीमय झालो
रोज झोपावे कसे, पुन्हा झोपावे कसे याच काळात शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस 'थाळी' बडवण्यात गेले, दोन 'दिव्यात' गेले

📝अमोल
#माझे_लाॅकडाऊन_मधील_प्रयोग
poetrymazi.blogspot.in

Wednesday, April 1, 2020

गीतरामायण


पारायणापूर्वी------- 🙏🏻🌺

१ एप्रिल बद्दल कुणाला माहित नाही अशी व्यक्ती सापडणे जरा अवघडच. कारण 'फूल' होण्याचा 'आनंद' अगदी सगळ्यांनीच केंव्हा ना केंव्हा तरी घेतला असणार आहे. मग तो आनंद producer साईड ने असेल, Developer साईडने असेल किंवा client साईड ने असेल ( किंवा आजकाल forwarder साईडने असेल 😉).

तुम्ही कुठल्याही भूमिकेत असलात तरी 'चंमतग' तितकीच आली असणार. या एप्रील फूल चा इतिहास एव्हान इकडून तिकडून तुमच्या वाचनात आला असेल.

पण असाच एक इतिहास ६५ वर्षापूर्वी १ एप्रिल ला ( १९५५) आकाशवाणी पुणे केंद्राने घडवून आणला. या १ एप्रिल ला 'फूल'लेल्या गीतरामायण रुपी फूलांचा  गंध मराठी सृजनांच्या मनात आजही दरवळतोय.

निमित्य गदिमा आणि बाबूजींच्या "गीतरामायणाचे" प्रसारण

 योगायोगाने आज घरी पुस्तकरुपी गीतरामायण मिळाले ज्यात गीतरामायणातील सर्व गाणी, गाण्याच्या आधीच्या निवेदनासह आहेत. ३ आॅक्टोबर १९५७ ( विजयादशमी ,शके १८७९) प्रकाशीत झालेले हे पुस्तक याक्षणी माझ्या हातात आहे.  मूल्य २ रुपये.
( हे पाहिल्यावर तर '२ रुपये भी बहोत बडी चीज होती है बाबू' हा मराठी मालिकेतील एक संवाद किती सार्थ होता हे आता वाटते)

या पुस्तकाचे एक वैशिष्ठ्य म्हणजे या पुस्तकाला बा.भ.बोरकरांनी दिलेली प्रस्तावना. पारायणापूर्वी ....आणि गीतरामायण ..॥ अशा दोन मथळ्यात आहे

यातील काही निवडक मोती.

कविश्रेष्ठ रवींद्रनाथांनी म्हटल्याप्रमाणे रामायण ही खरोखरच भारताच्या मौलिक भावभावनांची भागिरथी आहे, आणि तिच्याच पुण्यसलिलाने त्याच्या मनोभूमीची मशागत शतकानुशतके अखंड होत राहिली आहे.
आपल्या मराठी मनाला तर रामरसायनचा ध्यासच आहे. या मराठीयेच्या क्षोणींत भोळ्या भाभड्या कुणबाऊ बाईपासून संतपंतांतील प्राज्ञविज्ञापर्यंत सा-यांनी ही एकच कथा नाना परींनी गायिली आहे, आणि त्याचमुळे उभ्या मराठी जीवनांत राम काठोकाठ भरुन राहिला आहे. रामाची मूर्ती आणि रामाची कीर्ती हाच मराठी चित्ताचा आणि प्रतिभेचा ध्यास आहे.

गीत रामायण

धार्मिकतेला पाठमो-या झालेल्या आजच्या ह्या गलक्याच्या काळांत देखील मराठी लोकमानसाचा हा युगानुयुगांचा ध्यास
 यत् किंचीतही कमी झालेला नाही याची जिवंत साक्ष या "गीत रामायणा" ने घवघवीतपणे देऊन चिकित्सक तर्कपंडीतांनाही चकित केले आहे.  आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन या 'गीतरामायणाचे' पहिले गीत सुरु झाल्यापासून आजतागायत याची लोकप्रियता कलेकलेने सारखी वाढतच राहिली.
या गीतरामायणाचा जेंव्हा मी मागोवा घेतो तेंव्हा मला म्हणावेसे वाटते की, या भाग्यशाली देशात ईश्वरच वारंवार अवतार घेतो असे नाही,तर त्यांचे चरित्र देखील युगधर्माला अनुकूल असा अवतार घेत असते.

कविश्री माडगूळकर आणि पुणे केंद्राचे उत्साही कार्यकर्ते श्री सीताकांत लाड सहज एका संध्याकाळी भेटतात काय,बोलता बोलता सहज 'गीतरामायणाची' कल्पना निघते काय, त्यातले स्वरसौंदर्य उलगडून दाखवायला श्री सुधीर फडक्यांसारख्या पट्टीच्या संगीत- नियोजकाची जोड मिळते काय, कामे करणारी आतली बाहेरची सारी माणसे एक दिलाने आणि नेमाने सारे यथासांग पार पाडतात काय आणि सगळा लहान मोठा मराठी लोकसमुदाय त्याचे असे गोड कौतुक करतो काय

सारेच विलक्षण ||
🙏🏻🌺

असे म्हणतात की काही प्रमुख धार्मिक ग्रंथ जसे रामायण, महाभारत,  ज्ञानेश्वरी इ इ आपल्याकडे असावेत आणि त्यांचे पारायण जरी केले नाही तरी त्यांच्या नुसत्या अस्तित्वाने पुण्य लाभते.

मला वाटते या वरच्या यादीत 'गीतरामायणाची' भर घालून उद्याच्या रामनवमीच्या पार्श्वभूमीवर थोडा पुण्यसंचय जोडावा म्हणतो.

 उद्याच्या गुरुपुष्यामृत योगावर ( रात्री ७ नंतर) आलेल्या रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा

श्रीराम 🙏🏻🌺

📝अमोल
०१/०४/२०२०
"देवा तुझ्या द्वारी आलो"
www.kelkaramol.blogspot.in
Related Posts Plugin for WordPress, Blogger...