नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, April 22, 2020

कव्हर स्टोरी


'कव्हर स्टोरी
( जागतिक पुस्तक दिना निमित्य)

आज २३ एप्रिल 'जागतिक पुस्तक दिन '. सर्व वाचनप्रेमींना शुभेच्छा 💐. 'वाचाल तर वाचाल' अशी संतवाणी होऊन गेली असली तरी याचे बाळकडू अगदी लहानपणी आपल्या पालकांकडून, "निट वाच ( अभ्यास कर) नाहीतर पुढे ढकलला "असा शेरा मिळेल बघ हं!  अशा रुपात  वेळोवेळी मिळत गेले.
 पुस्तकांची पहिली ओळख लहानपणी आपल्याला मुख्यत्वे पाठ्यपुस्तकांच्या रुपानेच झाली.

जून महिन्यात शाळा सुरु व्हायच्या आधी नविन वर्षाची पुस्तके 'ताम्हनकर, तानवडे बुक डेपोतून आणली जायची. अगदी आपल्या पुढच्या इयत्तेत
असणा-या आमचा चुलत भाऊ 'चेंड्या' कडून त्याच्या वह्या पुस्तकाचे गाठोडे आणून, आमचे गाठोडे आमच्या मागे असणाऱ्या दुस-या चूलत भावाकडे 'ढेंप्या' कडे पोहोचते केले असले तरी आई- बाबांच्या मागे लागून पुस्तकांचा नवीन संच या दुकानातून आणणे हे एकाही वर्षी चुकले नाही.
ही पुस्तके घेताना एक गोष्ट आवर्जून घेतली जायची ती म्हणजे तपकिरी रंगाचे कागद ज्याला आपण 'कव्हर्स ' म्हणतो.

शाळा सुरु व्हायच्या आधी या पुस्तकांना 'कव्हर्स ' घालणे हा जंगी कार्यक्रम घरोघरी व्हायचा. पुस्तक वर्षभर चांगले रहावे हा या मागचा मूळ उद्देश असला आणि तो कितीही चांगला असला तरी मुळात मला हा प्रकार फारसा आवडला नाही.शाळा सुरु होऊन १-२ महिन्यात असे माझे एकही पुस्तक नव्हते ज्याचे घातलेले कव्हर टिकले आहे.

मंडळी, पुस्तकांची खरी मजा कव्हर नसलेल्या म्हणजेच पुस्तकाचे मुखपृष्ठ दिसत असतानाच आहे हे माझे स्पष्ट मत. पुस्तक ही मस्त मोकळा श्वास घेतात, आपल्याशी मुखपृष्ठातून ती बोलतात, यात काय आहे हे सारांश रुपाने सांगतात, वाचनाची उत्सुकता वाढवतात. बहुतेक बालभारती पुस्तकाचे मुखपृष्ठ दरवर्षी सारखे असायचे पण इतर विषयांचे मुखपृष्ठ दरवर्षी वेगवेगळे असायचे(??)

हळूहळू पाठ्यपुस्तकांबरोबरच आपल्या हातात चंपक, चांदोबा, छावा, आनंद, किशोर ही बालमासिके , नंतर लोकप्रभा, चित्रलेखा, साप्ताहिक सकाळ अशी साप्ताहिके मग प्रपंच, रोहिणी, धनंजय, किर्लोस्कर अशी मासिके ते दिवाळी अंक हा हवाहवासा वाटणारा प्रवास आणि  हवेहवेसे, पहावेसे वाटणारे प्रत्येक अंकाचे मुखपृष्ठ. तारुण्यात 'आवाज' सारख्या दिवाळी अंकाच्या मल्टीपल मुखपृष्ठांची मजा न घेतलेला हास्य रसिक मिळणे अवघडच 😊

त्यानंतर वाचनात आलेली अनेक ऐतिहासिक पुस्तके, आत्मचरित्रे, कादंबरी, या सगळ्यात मुखपृष्ठ हे अगदी मुख्य भूमिका निभावते.

( सध्या आपल्याला फारसे दिसत नाही पण सिनेमाचे गावागावातील भिंतीवर लागलेले पोस्टर हे एकप्रकारे त्या सिनेमाचे मुखपृष्ठच नाही का? )

तर अशी ही मनाला कुठलेही कव्हर न घालता लिहिलेली 'कव्हर स्टोरी', एखाद्या कसलेल्या फलंदाजाने मारलेल्या 'कव्हर ड्राईव्ह ' ची मजा नसेल ही आली पण पुस्तक दिना निमित्ताने ही पुस्तकांबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता समजा.

लेखनाचा शेवट काही ओळींनी

अजि पुस्तिकाचा दिनु
व्रत वाचनाचा जाणू

हर्ष जाहिला रे , हर्ष जाहिला रे
कथा कादंबरी, वाचावी ज्ञानेश्वरी ||

दृढ 'विडंबन' मुळी
विराजीत वनमाळी
हर्ष जाहिला रे , हर्ष जाहिला रे |

अजि पुस्तिकाचा दिनु
व्रत वाचनाचा जाणू 📖🙏🏻

📝२३/०४/२०२०
#पुस्तक_दिन
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...