नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, April 13, 2020

डॅल्गोना' काॅफी आणि बरंच काही


'डॅल्गोना' काॅफी आणि बरंच काही .☕

मंडळी मला कल्पना नाही 'डॅल्गोना'  हा शब्द मी बरोबर लिहिला आहे की नाही पण सध्या याची जबरदस्त क्रेझ सोशल मिडियावर पहायला मिळत आहे.  'डॅल्गोना काॅफी' ते "डॅल्गोना व्हिस्की" पर्यत झेप या प्रकाराने घेतली आहे. त्यामुळे अर्थातच आम्हाला ही याची दखल घेणे भाग पडले आहे.

तुम्ही म्हणाल काय गरज आहे का दखल घ्यायची?  पण मला सांगा छान "फिल्टर काॅफी" फार तर "नेस काॅफी" अगदीच मोठी झेप म्हणजे "कोल्ड काॅफी" असताना काय गरज होती का हे 'डॅल्गोना काॅफी' वगैरे पॅटर्न पाडायची?

माझ्यामते चहा, काॅफी या भावंडांच्यात कोण श्रेष्ठ हा लढा वेगळ्या वळणावर येऊन थांबला आहे. या बहिण भावंडांच्यात काॅफी हे शेंडेफळ. कायमच हीचे जास्त लाड होतात हे साधारण निरीक्षण. मग टीव्ही शोच्या नावात काॅफी आली, तिथे चर्चा करणारे पुढ्यात मोठ्ठा मग्गा घेऊन एकदम स्टाईलीश चर्चा करु लागले. अर्थात त्यामुळे हीचा भाव थोडा चढलेलाच.
हळूहळू हळूहळू 'चहा' ने ही कात टाकली. ब्लॅक,रेड,अद्रक,ग्रीन अशा स्वरूपात मिळू लागला. पुर्वी ठराविक 'अमृततूल्य' , किंवा गाड्यांवर असणारा चहा वेगवेगळ्या व्यावसायिक आऊटलेट रुपाने नावाजला जाऊ लागला. मग काॅफीला कुठल्या तरी नव्या अवतारात येणे आवश्यकच होते.  'शो मस्ट गो आॅन' असंच काहीस असाव

आता या डॅल्गोना चा सरळ गावठी अर्थ जो मी समजलो तो असा की काॅफी जी आपल्यासमोर येते त्यात दोन द्रव्यांचे थर वेगवेगळे दिसणे. हाच तो डॅल्गोना पॅटर्न.थोडक्यात सांगायचे तर

करुन  घ्या द्रव्यांचे ,
 वेगवेगळे लेअर
मग फोटो काढून करा,
डॅल्गोना काॅफी  शेअर 😉

हा डॅल्गोना पॅटर्नचा # ट्रेंड आत्ता आल्यानंतर जरा विचार केला की अरे अनेकवेळा आपण या साच्यातून गेलोय की. अगदी लहानपणी बाबा रोज पहाटे "राम मंदीर "ते "विश्रामबाग " फिरायला घेऊन जायच्याआधी जबरदस्तीने दूध अंड द्यायचे. एका ग्लासात ते  अंड फोडायचे आणि वरुन दूध घातलं की झकास डॅल्गोना पॅटर्न बनायचा. अगदी सहज तीन लेअर म्हणजे खाली पिवळा बल्क, वर द्रव्य ( अंड्याची ग्रेव्ही म्हणूया का?  😊)  आणि तिसरा थर दुधाचा.  ते तिन्ही थर नुसते बघत बसावे असे वाटायचे. ( कारण चव फारसी आवडलेली नसायची 😬)  मग बाबा स्वत: उशीर होईल म्हणून पटापट ते तिन्ही थर एकजीव करुन प्यायला लावायचे. ही या पँटर्न शी झालेली पहिली ओळख.

शाळेतल्या मास्तरांनी तोंडावर उठवलेल्या चार बोटांचा थर इतर चेहऱ्यापेक्षा वेगळा दिसत असताना याला 'डॅल्गोना पॅटर्न' मधे घ्यायचे का हे तुम्हीच सांगा.

शाळेतील बीजगणित+ भूमिती, इतिहास+ नागरिकशास्त्र +भूगोल,  हिंदी +संस्कृत असे वेगवेगळ्या थरातील पण एकमेकांशी संबंधित विषय हे माझ्या दृष्टीने 'डॅल्गोना पॅटर्नच"

आम्ही दहावीत असताना समजा भूगोलाचा पेपर रद्द झाला असता तर आम्ही अशी चारोळी नक्कीच केली असती

इतिहास म्हणाला नागरिकशास्त्राला
'आयसोलेशन' मधे आहे  'जाॅग्रफी'
या दु:खात दोघे मिळून
चल घेऊ "डॅल्गोना काॅफी'😷

आता जास्त वेळ न दडवता तुम्हाला सरळ घेऊन जातो केमिकल इंजिनियरींगच्या रसायनशास्त्र प्रयोग शाळेत. या ठिकाणी चार वर्षात असंख्य टेस्ट ट्यूब फोडल्यात. किती केमिकल्स, किती प्रकारे, किती प्रमाणात छोट्याशा त्या नळकांडीत घालून या डॅल्गोना पॅटर्नद्वारे 🔥घडवलेत याची गणती नाही. त्या चार वर्षात शनी-मंगळ युती कडून ही एवढे धडाम-धूम स्फोट झाले नसतील एवढे आम्ही स्फोट प्रयोगशाळेत केले. बरं हे कळलं, जेंव्हा अंतीम वर्षानंतर काॅलेजमधून परत जाताना मिळणा-या डिपाॅझीटचा आकडा वरील करामतींमुळे सर्रकन खाली आला तेंव्हा.

बाकी तुम्हीही अनेक प्रकारे हा पॅटर्न अनुभवला असणार. काही नशीबवान असतील ज्यांनी खरोखरच अशी काॅफी पिली असेल. काही जणांनी सूर्योदय, सूर्यास्तावेळी आकाशात दिसणाऱ्या "डॅल्गोना छटा" बघितल्या असतील किंवा अगदीच कुणीतरी ओरडून ते बघ असं दाखवलेलं 'इंद्रधनुष्य' 🌈असेल.

आता यातलं कुणी काहीच केलं नसलं तरी तुम्ही नक्कीच नशीबवान आहात की गेली अनेकवर्षे तुम्ही ललित,विडंबन,कविता,चारोळी युक्त 'टुकार डॅल्गोना पॅटर्न  ललित' वाचत आलात, आणि जे आत्ताही केलंतं 😄

📝अमोल
१३/०४/२०२०
poetrymazi.blogspot.in
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...