नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Sunday, May 30, 2021

ताम्हणकर बुक डेपो


 ( आधुनीक ) ताम्हणकर बुक डेपो 


हॅलो काका, नवीन वर्षाचे मोबाईल आले का?

कितवीत आहेस बाळ तू ?

नववी

CBSC का स्टेट बोर्ड?

स्टेट बोर्ड

बाळू, नववी सेट  स्टेट बोर्ड तयार झाला का रे?

नाही, दोन दिवसांत मालक

काय राहिलयं, आता?

मालक, भूमितीचे अँप अजून आले नाही डाऊनलोड करायला,

अरे लवकर कर १ जूनला सगळं तयार पाहिजे बघ

बाळ,  तू  आँर्डर दे  .पत्ता सांग २ दिवसात होम डिलेव्हरी

बर मोबाईल कव्हर पाठवायचे का?  लवकर नोंद करा, कमी आहेत. पुढे केंव्हा मिळतील सांगता येत नाही.

काका,  नको कव्हर. आठवीच्या मोबाईलचे चांगले आहे

काका, आठवीच्या मोबाईलवरच सगळ्या विषयांचेव अँप नाही येणार का डाऊनलोड करता?

येतील पण वेळ लागेल,  ते काम लाँकडाऊन संपल्यावरच होईल. माधवनगरला ताम्हनकर सर्विस सेंटर मधून करावे लागेल.

काका चार्जर पण देणार का?

नाही, नवीन पाहिजे असेल तर वेगळा चार्ज

बर आणि काय पाहिजे?  नवीन ब्लू टूथ  , मोबाईल स्टँन्डचे छान डिझाईन आलेत, हेड फोन . काय असेल ते एकदाच मागवा. माल शिल्लक रहायची गॅरेटी नाही

बर काका

काका ते केळकरांचे संस्कृत सराव अँप आलय का?

आठ दिवसात, काकूंचा पुण्याहून फोन आलेला कालच.

आणखी काय?

काका माझ्या लहान भावाला चित्रकले साठी एखादं छान अँप.

सगळं मिळणार जूनच्या आवश्यक खरेदीची गडबड संपू दे मग फोन कर

चल दुसरा फोन येतोय, पत्ता पाठव मला किंवा आमच्या संकेतस्थळावर रजिष्टर कर ,आँर्डर नोंद कर

ठिक आहे काका.


हा, बोला

रमेश,  सातवी CBSE पँक करायला घे, स्पाइडर मँनचा स्टॅन्ड टाक अँडीशनल

हॅलो, हां  बोला, हो हो, ताम्हणकरच बोलतोय


 #ताम्हणकर_बुक_डेपो, सांगली


अमोल 📝

वैशाख कृ. षष्ठी , ३१/५/२१

Friday, May 28, 2021

चला कपाट आवरु या


 चला कपाट आवरु या !


वर्षातील ५२ रविवार पैकी कुठल्याही  एका रविवारी हे वरील वाक्य एखाद्या घरात म्हणले गेले नसेल असे मला तरी वाटत नाही. रविवार अशा साठी की जरा निवांत, सुट्टीचा दिवस म्हणून. कुटुंबातील सदस्यांनी मिळून कपाट आवरणे हा एक छान कौटुंबिक सोहळा आहे असे माझे स्पष्ट म्हणणे.

म्हणजे बघा अश्विनी ते रेवती अशी २७ नक्षत्र आहेत. पूर्वी 'अभिजीत ' नावाचे पण नक्षत्र मोजत पण आता हे नक्षत्र धरत नाहीत. नक्षत्र पुस्तकात प्रत्येक नक्षत्राची माहिती देताना या नक्षत्रावर एखादी गोष्ट हरवली तर ती मिळण्याचे ठोकताळे दिलेले आहेत. अभिजित नक्षत्रावर ही माहिती अर्थातच नाही. पण पूर्वी समजा या नक्षत्राची कुठे माहिती दिली असेल त्यात या नक्षत्रावर करायच्या कामात

 ' कपाट आवरणे ' हे नक्की असावे असे माझे मन सांगतय. 


अश्विनी ते रेवती नक्षत्रावर केंव्हाही तुमची गोष्ट हरवली असेल आणि तेंव्हा अगदी याच कपाटात, इथल्या ड्राँवर मधे , कप्प्यांमधे कितीही वेळेला तुम्ही शोधली असली तरी आजच्या 'चला कपाट आवरु या ' अभिजात मुहूर्तावर मात्र ही मिळण्याची खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच शक्यता असते.


मंडळी, मोकळं केलंत सगळं कपाट,  अवती भोवती मस्त पसारा जमलाय ना?   

*तर अधून मधून असं कपाट आवरणं हे  जरी शास्त्र असले तरी*


*मागच्या वर्षी कपाट आवरताना नाही हे राहू दे, टाकू या नको  म्हणून ठेवलेल्या गोष्टी या वर्षी कपाट आवरताना कच-याच्या ढिगात टाकणे ही एक मोठी कला आहे*


कपाट आवरताना हातात आलेले मित्राने दिलेले वाढदिवसाचे ग्रिटींग बघून, छान स्माईल करुन परत त्याच जागी ठेवणे हा " मैत्री धर्म "  आहे.


लहानपणीची 'फोटो गँलरी' आपलं 

' फोटो अल्बम' हातात आल्यावर चहाचा कप बाजूला ठेऊन शेवट पर्यतचे फोटो बघणे आणि कपाट आवरण्याच्या कार्यक्रमाला थोडा ब्रेक घेणे  ही "नैतिक जबाबदारी" आहे. 


गधडे/ गधड्या  आँन लाईन क्लासला  मिळत नव्हती ना  ही वही  ? कपाटात नीट बघ म्हणलेलं , शोधली नीट?  नाही,  आत्ता कशी मग आली?  नीट बघायचंच नाही ,  हे माय लेकींचे / माय लेकांचे ( बर का मित्रों, आपण अशावेळी परत एकदा फोटो अल्बम बघायला काढायचा) संवाद हे "आवश्यक कर्तव्य " आहे. 


ती वही  उघडताच आत मधे  मिळालेली १०० रुपयाची नोट घेऊन आईला देऊन संध्याकाळी भेळ/ पाणीपुरी/  शेव पुरी  ( छे असल्या गोष्टी संकष्टीलाच आठवतात नेमक्या)  रुपी 'अर्थपूर्ण सेटलमेंट' आहे.


मागच्या वर्षी आवश्यक वाटणारी गोष्ट पण  यावर्षी अचानक   अनावश्यक कच-यात  टाकून कपाट मस्त आवरलयं आता.  एकदिवस संगणक, मोबाईल रुपी कपाटातील पण कचरा साफ करायचा आहे असाच. विनाकारण सेव्ह केलेल्या फाईल, फोटो,  अँप सगळं साफ करायचं आहे


बघू सवड मिळाली तर याच पद्धतीने मनातील कपाटातील ही काही  अनावश्यक कप्पे,  विनाकारण सेव्ह केलेले विचार, पूर्वग्रह वेगैरे साफ करता आले तर!


प्रयत्न करायला काय हरकत आहे


( प्रयत्नवादी ) अमोल 📝

वैशाख. कृष्ण ३

२९/५/२१

Wednesday, May 26, 2021

आता कोठे लागे मन


 https://youtu.be/UrKNquFYWMw


तर मंडळी, फेसबुक बंद होणार म्हणून आम्ही दोन दिवसापूर्वी 'अखेरचा हा तुला दंडवत ' असे म्हणले


पण हे काय? अजूनही चालूच आहे की फेसबुक. मग  कुठे  जीवात जीव आला परत


( मुळ गाणे: आता कोठे धावें मन)


आता कोठे लागे मन

( वाॅल) भिंत परत देखुनिया !


लाईक आला, शीण गेला

अवघा झाला आनंद ! 


प्रेमरसे टँगल्या पोस्टी

आवडी काॅपी नित्यशी !


'टुकार' म्हणे आम्हा जगी

' झुक्या' घोगें  खरे माप!


( फेसबुक प्रेमी)  अमोल 📝

२७/०५/२१

Tuesday, May 25, 2021

अखेरचा हा तुला दंडवत


 उद्यापासून आमचे लाडके फेसबुक बंद होणार असे ऐकतोय. हे जर खरं असेल तर


अखेरचा हा तुला दंडवत, सोडून देऊ वाॅल

एकच लाइक, देऊन भावा, फेसबुक सोडून धाव


अखेरचा हा तुला दंडवत


तुझे प्रोफाइल पाहिले वाचले, सारे बर्थ-डे सोपे झाले

आता हे परि सारे सरले, उरलं माग नाव

अखेरचा हा तुला दंडवत


का तू  सोडूनी जातो झुक्या, कुठे शोधू मी मेमरी आता

कुणी न उरला वाली आता ,काँपी पेस्ट न ठाव


अखेरचा हा तुला दंडवत, सोडून देऊ वाॅल

एकच लाइक, देऊन भावा, फेसबुक सोडून धाव



( फेस-बुक कवी) अमोल 📝

२५/०५/२१

Friday, May 21, 2021

खरेदी पूर्वीची ते आँन लाईन


 


 आठवडी बाजार आणि जत्रा या  प्रत्येक गावाच्या वैशिष्ट्यपुर्ण गो़ष्टी. शनिवार म्हणले की  आम्हाला आठवतो आमच्या गावचा म्हणजे सांगलीचा आठवडी बाजार. मारुती रोड पासून हरभट रोड ते कापड पेठ, गणपती पेठे पर्यत पसरलेला. आजच्या आँनलाईन खरेदी आणि लाँकडाऊन च्या प्रार्श्वभूमीवर याबाबतच्या आठवणी


तसं पहायला गेलं तर प्रत्येक व्यक्तीची खरेदीची सुरवात अगदी लहानपणापासून सुरु झालेली असते. पूर्वी आपल्या घरी नातेवाईक / ओळखीचे/ शेजारचे कुणीही कधीही अगदी अचानक येऊ शकत. फोनवर विचारून येणे, आधी Appointment घेणे मग येणे वेगैरे मँनर्स सांभाळण्याचा तो काळ नव्हताच मुळी. आणि घरी आलेल्याला चला सगळे मिळून हाँटेलात जाऊ आम्ही पण अजून या हाँटेलात गेलो नाही असे म्हणायचे ही ते दिवस नसायचे. अश्यावेळी आलेल्या पाहुण्यांसाठी चक्क घरात पोहे/ उपमा/ शिरा / चहा / सरबत असं काहीस बनवले जायचे.


कधीकधी अचानक आलेल्या स्नेंहीमुळे आईची गडबड व्हायची, चहा घेणार का?  असे विचारताच चक्क 'हो'  म्हणायचा तो काळ असायचा आणि थांबा आधण ठेवते असे म्हणायला आणि चहा पुड संपलीय हे लक्षात यायला एकच गाठ पडायची.


अशावेळी जा ग / जा रे कोप-यावरच्या दुकानातून चहा पुड/ आले/ बिस्किटं घेऊन ये अशी आँर्डर दिली जायची. पैसे नंतर देते असं सांग काकांना आणि काका चक्क तयार व्हायचे.  घेतलेल्या सामाना बरोबर हातावर श्रीखंडाची गोळी ठेवायला विसरायचे नाहीत

साधारण लहानपणी पहिल्यांदा अशा प्रकारचा बाजारहाट केलेला सगळ्यांनाच आठवत असेल. 


वाड्यात मित्र-मैत्रिणींबरोबर खेळ ऐन रंगात आला असताना आईचे बोलवणे आणि काहीतरी आणायला सांगणे हे जीवावर आल्यासारखे वाटायचे. मलाच का आई दरवेळेला बोलवते, माझ्या बहिणीला / भावाला पण कधी बोलवत नाही याचे दु:ख ही वाटायचे मात्र अभ्यास करत असताना असे बाहेर जाणे मात्र आवडायचं


जसं जसं मोठे होत गेलो तसे खरेदीचा आवाका वाढला आणि मग आम्हाला  आठवडा बाजारासाठी कामाला लावण्यात आले. आठवडा  बाजारासाठी यादी करणे, घरातल्यां  बरोबर  खरेदीला जाणे, दुकान ( यादी ) वाटून घेणे, खरेदी झाल्यावर मारुती मंदिरात समोरील रसवंती गृहात बसून लिटरच्या मापात उसाचा रस पिणे, ऐनवेळच्या यादी व्यतिरिक्त जास्ती खरेदीची मजा घेणे, बाजारहाट करताना बरोबरचीचे मित्र - मैत्रिणी भेटणॆ, त्यांचे पालक भेटणे,  मग आपल्या पालकांची ओळख करुन देणे, मग चर्चा अभ्यासावर येणे यात नेमके समोर शाळेतल्या बाई येऊन सामील होणे मग हळूच आई मी तिकडे ते घेऊन तिथे थांबतोय/ थांबतीय  ग म्हणून सटकणे, दरावरुन घासाघासी करणे, दर पटला नाही म्हणून पुढे जाणे ( आणि परत पहिल्या वाल्याकडूनच त्याच दरात वस्तू घेणे ), बाजूच्या मंदीरातील देवाला रस्त्यावरुनच चप्पल काढून हात जोडणे, सगळी ओझी सांभाळत चालत घरी येणे,  माल खराब निघाला तर दुस-यादिवशी बदलून घेणे त्यासाठी भांडण करणे , येताना आणि चार नवीन गोष्टी आणणे

हु:श दमलो / दमले  म्हणत परत घरात आईला मदत करणे


मस्त बाजारहाट असायचा तो. त्याची मजा माँल मधील अलिप्त वाटणा-या खरेदीला नाही, आँनलाईन खरेदीला तर नाहीच नाही. आँन लाईन खरेदी मधून "हाती आले ते पवित्र झाले " या न्यायाने जी काही वस्तू आली ती स्विकारायची. काही कारणाने बदलायची झाल्यास " भिक नको पण कुत्र आवर " अशी परिस्थितीत.  त्या सगळ्या प्रोसीजर पेक्षा परत बाजारात जाऊन प्रत्यक्ष परत नवीन वस्तू आणलेली एकवेळ परवडेल. पण अर्थात श्रम / त्रास यातून थोडी मुक्तता मिळते हे नक्की


पण पारंपारिक बाजारहाट ची मजा काही वेगळीच होती हे नक्की आणि आपल्या पिढीने मस्त एन्जाॅय केला बाजारहाट, बरोबर ना?


( बाजार उठवणारा)  अमोल 📝

२२/०५/२१

Thursday, May 20, 2021

खादाडगिरी राशींची"


 " खादाडगिरी राशींची" 


🥘🫕🍤🍱🍜🍝🌮🥙


खादाडी हा अनेकांचा कौतुकाचा विषय असतो.  खाण्याच्या शौकीनांची जात (?), धर्म ( ?) , पंथ (?), लिंग एवढंच काय ' रास ' पण बघू नये. कारण अशा व्यक्ती तुम्हाला सर्व ही १२ राशीत भेटतातच. 


पण तरीही विशिष्ट नोंदी करुन केलेले हे वर्णन निव्वळ मनोरंजन म्हणून 👇🏻


तर मंडळी,  खादाडी  म्हणलं की मला बुधाच्या अंमलाखाली येणा-या 'मिथून,कन्या' राशी आठवतात. म्हणजे या व्यक्तींची कशाला ना नसते.खाणे मनापासून एन्जाँय करतात. भरपूर हादडतील. मिथून वाल्यात निदान खाल्लेले पचवायची ताकत तरी असते, कन्या वाल्यांना दुस-या दिवशी भले पोट दुखू दे, आज मागे हटणार नाहीत. एखाद्या 'साग्रसंगीत मैफलीत' मिथुन, कन्या वाले असले की ती बैठक 'रम'णीय होतेच होते.😉 


हलका डोस घेतल्यानंतर, कन्या वाल्याने वेटरला एक प्लेट 'बाँइल्ड एग' आण अशी फर्माइश केली. वेटरने अर्धी ४ उकडलेली अंडी मस्त सजावट करुन आणली. कन्या वाला ते बघून खवळला, "हमने एक बोला था तूम दो कैसा लाया?". शुध्दीतल्या कुंभ वाल्याला मग कन्या वाल्याची समजूत घालावी लागली की आपण *एक प्लेट* मागितली त्यात by default दोन अंडी असतात. हे समजल्यावर कन्या वाल्याने लगेच दुस-या लसीची , आपलं डोसाची आँर्डर दिली. 😝


मेष वाले मुळातच तिखट प्रिय.  आलेल्या मसाला पापडावर आणखी थोडं तिखट घालून घेतील. मंगळासारखे लालबुंद ,  घामाघुम होतील पण मटण बिर्याणी अजून मागून घेतील. वृश्चिक वाल्यांचा मात्र जोर ग्रेव्हीवर जास्त,  स्टार्टर पण यांना ड्राय पेक्षा ग्रेवी वाले जास्त प्रिय. मेष वाल्यां सारखा  'रेड ग्रेव्हीच'  पाहिजे असा हट्ट बिक्कुल नसतो.


सिंह वाल्यांची बात औरच. आँर्डरच एकदम हटके उदा. राँयल अफगाण पहाडी कबाब, किंवा एखादं मेक्सिकन काँम्बो . प्यायच्या आँर्डर मधे पण असे काँकटेल मागवतील की आपला 'बियर' चा ग्लास पण थरथर कापायला लागेल. सगळ झाल्यावर चल रे एक ' टकिला ' मारु म्हणण्याची हिंमत सिंहेतच


कर्क, तुळ, वृषभ त्यामानाने परंपरा पाळणा-या. कर्क वाल्याची सुरवातच बसल्या बसल्या पिण्याच्या पाण्यापासून सुरु होऊन ते शेवटी थांब हा जरा जाऊन आलो आणि आल्यावर वितळलेले आईस्क्रीम खाण्यापर्यंत. भाताचा कुठल्याही प्रकारावर डाळ/ कढी पाहिजेच पाहिजे. वृषभ, तुळ वाले टिपिकल थाळी किंवा तत्सम जेवण प्रकारास जास्त पसंती देतात. त्यातही मागे जेंव्हा केंव्हा हाँटेलात गेले असतील तर साधारण तोच आँर्डर पँटर्न राबवतात. फार तर मलई कोफ्त्या ऐवजी,काजू करी मागवतील आणि फाँर अ चेंज म्हणून  व्हँनीला एवजी स्ट्राँबेरी आईस्क्रीम  मागवतील इतकच. 


मीन वाल्यांच्या राशी चिन्हावर जाऊन मीन म्हणजे नुसते मासेच खाणारे असे  समजू नका. ते काहीही खाऊ/ पिऊ शकतात भले सात्विक गुरु त्यांच्या राशीस्वामी असला म्हणून काय झालं 😬. हेच धनू बाबतही म्हणता येईल. यांचा ही कार्यक्रम तसा करेक्टच असतो. फक्त सोम,मंगळ, गुरु वगैरे दिवसाची बंधनं लावून घेतात. अनेकदा तर 'प्यूअर नाँन्व्हेज'  कँटँगिरी केली तर या राशीचे जास्त आढळतील. त्यातूनच कुणी बंडखोर आढळला तर चकणा मात्र फस्त केल्याशिवाय रहात नाही तेंव्हा मैफिलीत अशा बंडखोरांचा व्यवस्थित बंदोबस्त करावा


मकर आणि कुंभ हे शनिच्या प्रभावाची व्यक्तीमत्व. फारसे त्यांचे लाड नसतात. "मुखी आले पवित्र झाले "असा पवित्रा.  एखादी डिश मेनू कार्डवरची मागितली आणि वेटरने नाही आहे असे सांगितले तर मेष वाला लगेच वकिली खाक्या दाखवेल, कुंभ वाला ठिक आहे जे काय असेल ते आण म्हणेल. मकर वाला ' तुम्हारे पास सबसे अच्छा डिश कौनसा है? ' हे विचारेल. वेटरने वर्णन करुन झाल्यावर मात्र ती सोडून दुसरी कुठलीही डिश मागवेल. शेवटी आलेले बिल चेक करण्यासाठी घेईल, बिसलरीच्या बाटलीतले तळात राहिलेले पाणी ग्लासात ओतून बिल चेक करताना एकदम वेटरला ओरडेल,  अरे बिस्लरी का बिल लगाया? हमने किधर मंगवाया था?  बुलाव मँनेजर को. शेवटी कुंभ वाला सेटलमेंट करेल. 😊


पण एक गोष्ट या १२ च्या १२ राशींच्या व्यक्तींकडून झाली असेल ती म्हणजे टेबल सोडण्या पूर्वी फुकटात मिळणा-या बडिशॊप/ सुपारीचा अधिक हिस्सा घेऊन. 'अन्न दाता सुखी भव ' अशी प्रार्थना करणे


एव्हानं इतर राशी वाल्यांकडून बाहेर जाऊन पानपट्टीवर मसाला पानाच्या आँर्डर दिल्या जातात. पान बने पर्यत कन्यावाला सेल्फीचा कार्यक्रम करेल.  अरे थांबा मकर, कुंभ वाले येऊ देत की असे तुळेची कन्या बोलेल, ते आल्यावर परत काढू की फोटो म्हणून सिंहेचा वाघ गुरगुरेल. ए मला सोडशील ना वाटेत म्हणून कर्क मेषेच्या मागे लागेल, तेवढ्यात एक मिथूनवाला नळी फुंकायला जरा आणखी पुढे गेलेला असेल. मीन वाल्याने कुणालाही न सांगता ओला/ उबेर बुक केलेली असेल जी आल्यावर पान न खाताच तो पळाला असेल. 


आणि अशी ही १२ राशींची प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी  'खाद्य मैफल'  संपेल.  


आवडली ही खाद्य भ्रमंती ? नक्की कळवा


( संतुलीत आहारवाला)  अमोल 📝

९८१९८३०७७०

Monday, May 17, 2021

वादळा नंतरचा गारवा


 " वादळा नंतरचा गारवा " 



आज सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जायला निघालो. सवयीने सुरवातीला गाडीच्या खिडक्या उघडल्या आणि वा-याची एक छानसी झुळूक आली. १८ मे ला,  सकाळी ८ वाजताही घामाच्या धारा येऊन केंव्हा एकदा गाडीतला A/c लावून आँफीसच्या

 A/c मधे जातोय असे वाटणारा हा कालावधी.  पण आलेल्या गारव्याने खूप छान वाटले. मग संपूर्ण प्रवास खिडकी उघडा ठेऊनच केला. अगदी नैसर्गिक गारव्याचा आनंद घेत.


मान्य या गारव्याला कालचं झालेलं 'वादळ' कारणीभूत आहे. पण वादळ तर येऊन गेलंय आता. कदाचित वादळापूर्वीच्या शांततेतून (  मनातील अस्वस्थतेतून ) गेलो असू, प्रत्यक्ष वादळाचा सामना धीराने केला असू पण नंतरचा गारवा किती जण अनुभवतात?  नसेल तर घ्या अनुभव


मग ते वादळ निसर्गात घडणारे असो, कौटुंबिक असो, आँफीस मधले असो, मैत्रीतले असो किंवा अगदी स्वत: शी झालेले असो.


गारवा अनुभवायचा असेल तर नियम एकच, मनातल्या द्वेषाला आधी बाहेर काढायचे, मग गुणगुणायचे मस्त


गारवा, वा-यावर भिरभिरत पारवा, नवा नवा


गारवा


( गारेगार ) अमोल 📝

१८/५/२१

चेक मेट


 

*कसोटी -  ते २०/२०* 'चेक मेट'


प्रणवने नुकताच बुध्दीबळाचा आँन लाईन क्लास लावलाय. त्याला ही आपल्या सारखी आवड आहे हे पाहून खुप बरे वाटले. एक दोन वेळा आँन - लाईन क्लास ऐकण्याचा ही योग आला. मँडम तर छान समजवून सांगत होत्या पण विचारलेल्या प्रश्णांची उत्तरे प्रणवला देता येत होती, काही चुकत होती पण या ६४ घरांची गोडी प्रणवला लागलीय हे पाहून समाधान वाटले.  हे कारण एक पुरेसं होतं मला भूतकाळात डोकावयाला.


साधारण मे महिन्यातच सांगलीत 'नूतन ' बुध्दीबळ स्पर्धा असायची. या स्पर्धेमुळे या खेळाची गोडी लागली.  शाळेतल्या बुध्दिबळ स्पर्धेत ही भाग घेऊ लागलो. यातली शाळेतील ८ वी किंवा ९ वी ची स्पर्धा चांगलीच लक्षात राहिली आहे. ( सन १९८९ किंवा ९० असेल ) मी,  एक मुलगी आणि एक मुलगा फायनल ला होतो. प्रत्येकाने प्रत्येकाशी खेळायचे. मी त्या मुलीला हरवायचो, ती मुलगी त्या दुस-या मुलाला हरवायची आणि तो मुलगा मला हरवायचा. असं दोनदा झाल्यावर शेवटी चिठ्ठ्या टाकून नंबर काढला आणि अपेक्षेप्रमाणे माझा २ रा का तिसरा नंबर आला. पहिला नंबर अर्थातच त्या मुलीचा. नंतर परत ११ वीत काॅलेजमधे स्पर्धेत नंबर येऊन या खेळाचा संबध संपला ते आता प्रणवच्या क्लासच्या निमित्ताने परत आला.

एक दिवस प्रणव म्हणाला क्लासमधील मुलांच्या पालकांसाठी मँडमनी "आँन लाईन रँपीड चेस काँम्पीटीशन ठेवली आहे " तुम्ही भाग घ्यायचाच,  जिंकायचेच वगैरे वगैरे ठरले.. म्हणलं खेळू की त्यात काय मोठ्ठं. मी शाळेत असं तसं खेळलोय वगैरे वगैरे हा ( over)  काँन्फीडन्स होताच.

ठरलेल्या दिवशी मँडमनी लिंक पाठवली. लाॅग - इन वगैरे झाले आणि २०-२० क्रिकेट सामना सुरु होताना जसे व्हायचे तसेच ८,७,६,५ वगैरे countdown सुरु होऊन एका पालकांबरोबर पहिला सामना सुरु झाला. 

१० मिनिटाचा सामना ( रँपीड चेस)  हा प्रकारच नवीन होता. बाबा किती विचार करताय, भरभर खेळा, तुमची वेळ संपतीय, ते बघा किती फास्ट खेळतायत. पटकन पटकन, प्रणवच्या या काँमेंट्री वर अभासी पटावरचा एक एक मोहरा धारातीर्थी पडत होता. काहीही समजतच नव्हते. आँन लाईन , मोबाईलच्या स्क्रिन वर स्पर्धा खेळतोय, समोर पट नाही, हे जुळवून घेता घेता नाकी नौ आले.  पहिल्याच सामन्यात १० मिनिटाच्या आधी पटावर माझा फक्त राजा राहिला पण राहूल द्रविड सारखी  चिकाटी सोडली नाही आणि हा ऐतिहासिक पहिला रँपीड चेस चा सामना 'स्टेल मेट ' करुन बरोबरीत सुटला/ सोडवला.


हु:श , 'ये अपने बस की बात नही' याची जाणिव झाली.आणि कसोटी क्रिकेट मधला राहूल द्रविड २०-२० मधे त्याच ताकतीने तितकाच यशस्वी होईल याची शाश्वती नाही हे पटले. ती स्पर्धा एखादाच विजय मिळवून आणि सर्व पालकांच्यात खालून दुसरा, तिसरा नंबर येऊन संपली.


आज अशीच परत पालकांच्यात रँपीड चेस स्पर्धा झाली. आज मात्र मागील अनुभवाने असेल पण जरा चांगली मजल मारली.


या अनोख्या स्पर्धेत समाविष्ट करुन घेतल्याबद्दल आणि पाल्या बरोबर पालकांनाही परत या खेळाची गोडी लावल्याबद्दल त्या मुलीचे , जी शाळेत चिठ्ठ्या टाकून पहिली आली होती आणि मी २ रा का तिसरा आलो होतो तिचे म्हणजेच आत्ताच्या क्लास घेणा-या मॅडम माधवी जोगळेकर ( शाळेतल्या माधवी खाडिलकर चे)  यांचे अनेक आभार. 🙏🙏😃


बाबा,  तुमची मैत्रिण आम्हाला शिकवते, तिला तुम्ही हरवलेत तेंव्हा रँपीड चेस स्पर्धा तुम्हीच जिंकणार हा प्रणवचा ही भ्रमनिरास झाल्याबद्दल खरंच धन्यवाद 


कारण सातत्य, अभ्यास,  सराव, चिकाटी  शिवाय विजय अशक्यच हे त्याला समजले 😊 


अर्थात आज समुहात प्रणवचे ( प्रती त्याच्या बाबांचे म्हणजेच माझे ) विषेश कौतुक केल्याबद्दल ही कृतज्ञता. 


या बुध्दीबळा मधील सर्वांची वाटचाल 'प्यादे ते वझीर' अशी यशस्वी ठरो यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा 

💐💐


(बुध्दीबळातला ♟️)अमोल केळकर

Saturday, May 15, 2021

सिssरमच्या वैद्यांनी


 https://youtu.be/cEHJSDv5Gm4



१८- ४४ वयोगटातील तरूणीचे मनोगत 🙋‍♀️

( मुळ गाणे: रेशमाच्या रेघांनी)


हाताला लावा तेवढी


सिssरमच्या वैद्यांनी, संशोधन करूनी, कोविशिल्डचा डोस बघा शोधिला

(लस)कधी मिळणार माझ्या बाँडीला


पहिलीच लस अती मोलाची

पाहिली मी नक्षी मास्क वरची

गुंफियले कानी दोर, सॅनीटाइझर जोडीला

( लस) कधी मिळणार माझ्या बाँडीला. 


जात होते वाटेनं मी तो-यात

मागील वर्षी टपकला तो चायनात

तुम्ही माझ्या वयाचा नियम का हो लावीला

( लस) कधी मिळणार माझ्या बाँडीला .


भिड काही ठेवा साध्या नियमांची

व्हॅलिडीटी किमान दहा दिवसाची

काय म्हणू बाई, बाई तुमच्या नोंदीला


( लस) कधी मिळणार माझ्या बाँडीला


सिssरमच्या वैद्यांनी, संशोधन करूनी, कोविशिल्डचा डोस बघा शोधिला

(लस)कधी मिळणार माझ्या बाँडीला


अमोल 📝

(आमच्याकडे विडंबनाचे हवे तेवढे डोस मिळतील)

१६/०५/२१

Wednesday, May 12, 2021

लळा जिव्हाळा शब्दच खोटे..


 https://youtu.be/a3DQxf7GPUc


बिल गेट्सचा ही घटस्फोट झाला असे ऐकले आणि म्हणावेसे वाटले


*माय्क्रो, साॅफ्टही* शब्दच खोटे

*हार्ड डिस्क* ही जाई


कधी कुणाचे शट् डाऊन , काही कळणे नाही

लळा जिव्हाळा शब्दच खोटे..


पिसी जमवुनी 'कोड' रचिती IT कामगार धट्टे

डालर डालर आणून जगवी बिल गेट हे छोटे

कमावता मँड(म) घरातूनी, उल्लू बनवून जाई


कधी कुणाचे शट् डाऊन , काही कळणे नाही

लळा जिव्हाळा शब्दच खोटे..


वक्तही इथे सुड साधतो, जरी असली माया 💰

कोण कुणाची बहिण भाऊ पती पुत्र वा जाया

टांगायाची नाती सगळी जो तो आपुले पाही


कधी कुणाचे शट् डाऊन , काही कळणे नाही

लळा जिव्हाळा शब्दच खोटे..


अमोल 📝

१३/५/२१

Tuesday, May 11, 2021

अरे संसार संसार


 https://youtu.be/xxvpmBi4zrQ


बहिणाबाई,  बघा आमच्यावर काय वेळ आलीय ही 🤦🏻‍♂️


अरे संसार संसार, घ्यावी लस दंडावर

फक्त OTP मिळते, होत नाही रजिस्टर


अरे संसार संसार, ना उमेद आता होऊ नये

गावोगावच्या पिन कोडला, नको कधी म्हणू नये


अरे संसार संसार , नाही कोशिल्ड

 कोवॅक्सिनं

येड्या, लसीकरणाला, म्हणू नको रे लोढनं


अरे संसार संसार, दोन डोसांचा विचार

आपला तो सेतू- अँप, कधी देईल होकार


( कायम वेटींगवर)  अमोल 📝

११/०५/२१

Sunday, May 2, 2021

हसा, हसताय ना ?


 जागतिक हास्य दिन ( २ मे)


सर्वप्रथम सोशल मिडियावरील 

😝🤣🤪😅😂🤩😜😛😀😃😄


या सगळ्यांचे अनेक आभार की आम्ही हसलोय, हसतोय, हे आँन लाईन सांगण्यासाठी आम्हाला हे खूप मदत करतात.


सध्या एखादी प्रासंगिक घटना घडली, किंवा त्याची चाहूल जरी लागली तरी त्याचे मिम्स बनवून , सोशल मिडीयावर तात्काळ पाठवणा-या आणि त्याचा तात्काळ प्रसार करणाऱ्या सर्व ढकलजीवींचे ही यानिमित्याने आभार 😊


फक्त अडचण अशी की मी एका अमूक पक्षाचा तर मी फक्त तमुक पक्षांवरच हसणार अस कितीही केलंत तरी एखादा विनोद वाचल्यावर खुदकन मनात हसू येत असेल तर तुम्ही अजूनही 'काॅमन मॅन ' आहात 


लाजून हासणे अन हासुन हे पहाणे

मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे 😉 


सोशल मिडीया हा आत्ताचा हो. आम्ही शाळेत असताना आम्हीच सोशल. मित्र- मंडळीभेटल्यावर 'माझी टवाळखोरी '( ही माझ्या पुस्तकाची जहिरात आहे,  जाता जाता करु म्हणलं ☺️) जरा जास्तच रंगायची. अर्थात प्रत्येकाने हे सोनेरी दिवस अनुभवले असणार. आजही अगदी रोज नाही पण अधून मधून मित्र मंडळ भेटले 😝 , हास्य- गप्पा झाल्या की  जी उर्जा मिळते त्याला तोड नाही.

मध्यंतरी काही टीव्ही वरील लाफ्टर शो   ने मजा आणलेली.  जसे अगदी पहिल्यांदा शेखर सुमनचा ' मुव्हर्स अँन्ड शेखर',  नंतर रंगलेली ' लाफ्टर चँलेंज स्पर्धा ' मग मराठी वाहिनीवरच्या हवा येऊ द्या सारख्या मालिकांनी मजा आणली.  

मात्र लक्ष्या- अशोक मामा - विजय चव्हाण या मंडळींनी सिनेमा/ नाटकातून आमच्या पिढीला अगदी मनमुराद हसवले. 

अगदी  आमचा "मोग्यांबो खूष" व्हायचा 😬 हे शिनेमे पाहून


(पाचकळ/ पांचटपणा वगैरे  वाटणारे बहुतेक..  राहू  दे.. त्यांच ज्ञान त्यांच्यापाशी)


मात्र आमच्या तरुणपणीचे राजकारणी मात्र आजच्या राजकारण्यांपेक्षा जरा कमीच पडले 😷 हास्य विनोदी स्टेटमेंट मारण्यात


दिसलीस तू, फुलले ऋतू

उजळीत आशा, हसलीस तू 


या भानगडीत काही आम्ही पडलो नाही आणि बळेबळे असं काही म्हणावे लागलं नाही 😍


आठवणीतील अनेक गाण्यात ही हास्य डोकावलेले आढळते. काही उदाहरणे


मूक जिथे स्वरगीत होतसे

हास्य मधुर तव तिथे स्फुरतसे

जीवन नाचत गात येतसे

स्मित - चाळ त्यास बांधून पहा


सखी शेजारणी  तू हसत रहा


( टिप: वरील गाणे आपापल्या जबाबदारी वर गाणे 🤠)


एका गोष्टीत सगळेजण माझ्याशी सहमत होतील ते म्हणजे लहान मुलांचे निरागस हास्य


असेच एक मुलांसाठी चे गाणे:-


प्रकाशातले तारे तुम्ही, अंधारावर रुसा

हसा मुलांनो हसा


तुम्हा बोलवी ती फुलराणी

खेळ खेळती वारा पाणी

आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा


रडणे  हा ना धर्म आपुला

हसण्यासाठी जन्म घेतला

भारतभूच्या आदर्शाचा मनी उमटू दे ठसा


तेंव्हा मंडळी तुम्ही ही लक्षात ठेवा


हसते हसते कट जाते रस्ते, जिंदगी यूँ ही चलती रहे

खुशी मिले या गम, बदलेंगे ना हम

दुनिया चाहे बदलती रहे


हसताय ना ? हसायलाच पाहिजे 😁


( खास आमच्या मित्रांसाठी🤫

भरपूर वेळ बसा, भरपूर हसा

भले होऊ दे,  मोकळा खिसा )


अमोल केळकर 📝

०२/०५/२१

#जागतीक_हास्य_दिन

Related Posts Plugin for WordPress, Blogger...