नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Saturday, January 30, 2021

पाहिले न मी तुला


 'सेंचुरी' पर्यत पोहोचलेल्या सर्वांच्या लाडक्या 'पेट्रोल' ला समर्पित 💐

( * मनोरंजन हा हेतू ) 


पाहिले न मी तुला, तरी भरून घेतले

न कळे कधी कसे, "मनी" सर्व संपले


नित्य वाढणारा  'दर' तुझा पाहुनी

'बॅनर' सडलेले,लाजले मनातूनी

चुपचाप हरी - तुषार,  घरातच थांबले


न कळे कधी कसे, "मनी" सर्व संपले


का उगाच काढिशी, कार तू साजणी

सांगतो गुपित गोड, ठेव आज अंगणी

'मन की बात' ऐकीत, देहभान हरपले


न कळे कधी कसे, "मनी" सर्व संपले


मृदूसीट टोचते, स्वप्न भंगे लोचनी

पाहिले ते आकडे, पंपावरी त्या क्षणी

अच्छे दिन हे बघून, नयन हे सुखावले


न कळे कधी कसे, "मनी" सर्व संपले


पाहिले न मी तुला. 🙈


( डिझेल प्रेमी ) अमोल 🚗

३०/०१/२०२१

Thursday, January 28, 2021

येशील, येशील येशील गाडी


 अरे यार, कराना चालू लवकर आमची लोकल 🤷‍♂️

आमच्या लाडक्या लोकलला-


( मुळ गाणे:  -https://youtu.be/XqtERXXMkqU इथे ऐका) 

------------------------------------------------------------------------------

येशील येशील येशील गाडी वेगात लवकर येशील?

तिकीट काढुन, वेगात पळुन खिडकीची जागा तू देशील !! येशील येशील येशील-- 🚆


सकाळची वेळ गर्दी अफाट, फस्ट क्लास मधे जाऊ!

तुला सायडिंगला जरा घालता नको नाराजाने पाहु !

सर्वांना भिडुन, डब्यांना खेचुन मुक्कामी मला तू नेशील !! 


येशील येशील येशील-- 🚆


मेल एक्स्र्पेस, लाल सिग्नल अडथळा ओव्हरहेडचा !अडथळा ओव्हरहेडचा !

गर्दीच्या क्षणाचे टायमिंग साधुन रांगेत असंख्य गाड्या !

कल्याण, सायन, दादरकरीत, व्हि टी ला मला तू नेशील !!


येशील येशील येशील---🚆



वाजता पाऊल घेई चाहुल स्टेशन वरचा टि. सी.

कुणा पकडेल, कुणाला सोडेल, मिळता सावज भारी !

मुक्याने व्यवहार झाकुन टाकता, नवीन सुरवात होईल!!


येशील येशील येशील गाडी वेगात लवकर येशील?

तिकीट काढुन, वेगात पळुन खिडकीची जागा तू देशील !!


( भेटावयास उत्सूक) प्रवासी अमोल 📝

विविध गुणदर्शन


 #विविध गुणदर्शन  


मंडळी नमस्कार 🙏


शाळेत असताना  आमचे काही  सगळ्यात आवडते  दिवस असायचे ते म्हणजे २६ जानेवारी , १५ ऑगष्ट, शेवटची मारुती पूजा आणि  विविध गुणदर्शन / स्नेहसंमेलन ( तसं आम्ही आमचे विविध गुण शाळेत दररोजच  उधळायचो म्हणा ).  आजच्या अनेक यशस्वी ठरलेल्या कलाकारांनी आपली कला सर्वप्रथम कुठे सादर केली असेल तर  माझ्यामते शाळेत.

  ' मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ' हे कितीही  खरे असले  तरी  ती कला सादर करायला  त्यांना पहिला प्लँटफॉर्म शाळेने  दिला हे अनेक जण मान्य करतील


शाळेच्या वार्षिक स्पर्धा मग त्या मैदानी असू देत  किंवा बौद्धिक अनेकजण यात भाग घ्यायचे.  गायन, वक्तृत्व ( अजूनही हा शब्द मला बरोबर लिहिता आला तर शपथ ! ) , निबंध , धावणे , पोहणे,  खो-खो , बुध्दीबळ , रिले-रेस  आणि अनेक स्पर्धा . यात ज्यांनी सातत्य राखले , ज्यांना आवडीच्या गोष्टीत अजून पुढे जायची इच्छा झाली त्यांनी पुढे ती कला जोपासली . मग  कॉलेज , जिल्हा स्तरीय स्पर्धा , गणेशोत्सव वगैरे निमित्ताने अनेकांचा उदयोन्मुख कलाकार ते प्रसिध्द कलाकार किंवा  खेळाडू  असा  प्रवास झाला. अनेकजणांची किर्ती वटवृक्षाएवढी मोठी झाली पण याचे मूळ मात्र नक्कीच शाळेत रुजले गेले असं म्हणणे वावगे ठरणार नाही. अनेकजण ते मान्य ही करतील


वार्षिक स्पर्धांचे वेळापत्रक लागले की  कुठे कुठे आणि केंव्हा केंव्हा कुठल्या कुठल्या स्पर्धेत भाग घेता येईल याची चाचपणी व्हायची .प्रामुख्याने सकाळच्या सत्रात   मैदानी स्पर्था  आणि दुपारी  गाणे/ स्तोत्र पठण/ चित्रकला / निबंध अशा पध्दतीने स्पर्धांचे आयोजन व्हायचे. 'कृष्णा नदीत' पोहण्याची स्पर्धा हे एक आमच्या शाळेचे वैशिष्ट्य असायचे. त्यावेळीही मॅक्झीमम् स्पर्धेत भाग कसा घेता येईल हे बघीतले जायचे.

ब -याचदा नंबर यायचा नाही . पण  यामुळे फार काही कधी दुःखे झालो नाही.  ही प्रोसेस मात्र भरपूर एन्जॉय केली जायची, सगळ्यांकडूनच.  स्पर्धा संपल्या की एक दिवस शाळेत जेवणाचा कार्यक्रम असायचा . सगळ्या मित्रांसमवेत 

'स्नेह भोजन'  याची मजा  काही अनोखी असायची. त्यानंतर पारितोषेक वितरण आणि बहुतेक त्याच दिवशी संध्याकाळी 

 विविध -गुण दर्शनाचा कार्यक्रम असायचा. नाटके , मिमिक्री , डान्स, गाणे  आणि बरेच काही  सादर होऊन  हा 'अनुपम्य सोहळा ' संपायचा आणि  सगळेजण  ( मी सोडून ) वार्षिक परीक्षेच्या तयारीला लागायचे. 


हेच विविध गुण  दर्शन पुढे कॉलेज मध्ये ही  सुरु राहिले. इकडे जरा  तारुण्याची शिंगे फुटली होती . स्तोत्र पठणाच्या जागी  "फिश पॉन्ड" 🎏  आले होते. ' रेकॉर्ड फिश पॉन्ड '  नामक  प्रकार कळला , आणी आमच्या टवाळखोरीला चार चाँद लागले. 


संबंध वर्षात एखाद्या मित्राच्या ( मैत्रीणींच्या च  जास्त ) स्वभाव / गुण / घटना यावर समर्पक ओळी लिहिणे. किंवा तिला/ त्याला उद्देशून गाणं  लावणे या साठी अभ्यास करु लागलो.  यात कॉलेजचे प्रोफेसर/ प्राचार्य मंडळीही सुटायची नाहीत.  नवीन आलेल्या मुलीसाठी - " कुण्या गावाचं आलं पाखरू"   हे गाणं लागलं नाही  तर फाॅल व्हायचा.  "पापा कहते हे बडा नाम करेगा / खुद्द को क्या समजती  है / क्या अदा क्या नखरे तेरे पारो  " वगैरे गाणी  फिक्स असायची , ती कुणाच्या नावे हे फक्त दरवर्षी बदलायचे.


काही फिश-पाॅन्ड 🐟

 ची  यानिमित्याने फक्त उजळणी 


जिवलग मैत्रीणींसाठी :-


आम्ही दोघी मैत्रिणी जिद्दीच्या,जिद्दीच्या,

हातात वह्या रद्दीच्या,रद्दीच्या  


ज्याचा तास कळत नाही अशा शिक्षकास:-


अजीब दास्तां है ये,

कहां शुरु कहां खतम,

ये लेक्चर है कौनसा,

न वो समझ सके न हम..   


खालील 'फिश- पाॅन्ड' कुणासाठी ते तुम्हीच ठरवा:-😜 

करायला गेली रक्त दान

करायला गेली रक्त दान

डॉक्टर म्हणाले बाटली नाही चमचा आण... 


कोण म्हणत मी खड्ड्यात पडले ,

मी पडले म्हणून खड्डा पडला .



म्हणतो मुलींना चल आपण वडापाव खाऊ.

म्हणतो मुलीना चल आपण वडापाव खाऊ.

.

.

.

कँटीन मधे गेल्यावर मुली म्हणतात

किती माझा चांगला भाऊ.......



उठे सबके कदम

तर रम पम पम

कभी ऐसे मार्क्स लाया करो

कभी झिरो कभी वन

कभी उससे भी कम


कभी तो पास होके आया करो . 😷



जिथे असतील फुकटच्या पार्ट्या

जिथे असतील फुकटच्या पार्ट्या 

तिथे भेटतील ह्या दोन कार्ट्या 


मंडळी,

काय तुम्हाला काही पडलेले का 

"फिश -पॉन्ड "? किंवा तुमच्या खास मित्र- मैत्रिणीना? . लिहा की मग  कमेंट मध्ये खाली


तर मंडळी आजच्या टवाळखोरीचा शेवट आम्हाला ११ वी का १२ वीला आमच्या  "सांगली कॉलेज "मध्ये पडलेल्या ( फारच टुकार ) फिश-पॉन्डने 


"स्वप्नात आली जुही चावला . उठून बघतो तर  ढेकूण चावला"


तेव्हा पासून  खरं म्हणजे आम्ही  कुठलीही गोष्ट चावली की लगेच खाजवायला . . . . . 😎


फिशो आपलं असो


( स्तंभ लेखक ) अमोल केळकर  📝✌🏻

poetrymazi.blogspot.com

( इथे आम्ही उधळलेले विविध  -गुण वाचायला मिळतील)

Friday, January 22, 2021

हाचि सुबोध वैद्यांचा


 श्री गोंदवलेकर महाराजांनी 'हाचि सुबोध गुरुंचा' प्रार्थना दिली. ही प्रार्थना आजच्या परिस्थितीला अनुसरून 😷


'मास्क' सदा घालावे,जावे भावे, जनांसि सांगावे |

हाचि सुबोध वैद्यांचा, 'मास्का' परते न सत्य मानावे!


मास्क घालुनिया व्यवहारी सर्व भोग सेवावे !

हाचि सुबोध वैद्यांचा, 'मास्का'शिवाय कुठे न गुंतावे !


हात सदा धुवावे, खोकला सर्दी शिंक त्यागावे !

 हाचि सुबोध वैद्यांचा, भक्तीने मुखी 'मास्क' लावावे !


अंतर मुख्य असावे,  हस्तालोंदन कधी न वश व्हावे

हाचि सुबोध वैद्यांचा, 'संक्रमणासी नित्य थांबवावे !


माझा 'मास्क ' सखा, मी मास्काचा दास नित्य बोलावे!

हाचि सुबोध वैद्यांचा, 'मास्काला' वेगळे ठेवावे!


यत्न कसून करून मी, 'लस' दे लवकर आता !

हाचि सुबोध वैद्यांचा, मानवा 'मास्क' सर्वथा कर्ता !


आहार संयमाने युक्त असा खाद्यधर्म पाळावा !

हाचि सुबोध वैद्यांचा, खाण्यासाठी झोमॅटो टाळावा!


घेता 'मास्क' सुखाचा, मानवा  मान तू प्रभूसेवा!

हाचि सुबोध वैद्यांचा, जपुनी सर्वदा मास्क ठेवा !


लापर्वाई शत्रु मोठा सर्वाना जाचतो सुखाशेने!

हाचि सुबोध वैद्यांचा, मारावा तो समूळ मास्काने !


लाॅकडाऊन येवो किंवा जावो समस्त धन मान!

हाचि सुबोध वैद्यांचा, रहावे आपुले 'मास्क'ध्यान !


मास्कात श्वास रमतो, मास्काला मोल ना जगामाजी !

हाचि सुबोध वैद्यांचा, वैद्याला काळजी जनांची !


🙏🌺


अमोल केळकर 📝

( महाराजांचा भक्त )

२३/०१/२०२१

Tuesday, January 19, 2021

सांगा 'विजय' कुणी हा पाहिला


 https://youtu.be/l16JVtJ5mX0


सांगा 'विजय' कुणी हा पाहिला 🏏✌🏻💐

( मुळ गाणे: सांगा मुकुंद कुणी हा पाहिला)


सांगा 'विजय' कुणी हा पाहिला ,सांगा विजय कुणी हा पाहिला


चेंडूफळी खेळीता 'कांगारु'वनी हो

सखे होतो आम्ही 'अजिंक्य'विचारी

सोडूनी गेला तो 'विराट'घरी

'पंत' टिच्चून बाई हा 'राहिला'


सांगा 'विजय' कुणी हा पाहिला ✌🏻


चेंडू टाकविती, 'सुंदर -राज' हे

विकेट लागोलाग आम्ही सारे पाहे

'शुभ'बळे शार्दुल, पोरांच्या हो

हरवुनी, स्मिथप्रती चिटरांच्या


म्हणे 'टुकार' हा, खेळ हा पाहिला

सांगा 'विजय' कुणी हा पाहिला ✌🏻


📝अमोल केळकर

१९/०१/२०२१

Saturday, January 16, 2021

लस'श्वी भव


 'लस'श्वी भव | 💉


एक लाजरा न साजरा मुखडा, चंद्रावाणी फुलला ग

राजा मदन हसतोय असा की'मास्क' आता सुटला ग

या लसीकरणाचा तुला इशारा कळला ग 😌

'लस ' आडवी येते मला की जीव माझा दुखला ग 😏


नको राणी नको लाजू, दंडावर आता घेऊ

इथं तिथं नको जाऊ ,सेंटरला सरळ जाऊ

का?

टोचत्यात 💉😩


वाफेचा विळखा घेऊन सजणा नको तो घसा धरु

खसाखसा हात धुवून भोळं फसलंय फुलपाखरु

आता मिळावा पुन्हा 'लसीचा' मोका दुसरा ग


राजा मदन हसतोय असा की'मास्क' आता सुटला ग 🤡


डोळं चोळून, पाणी पिऊन,झुकू नका हो फुडं

पटकन पटकन, आवरून सगळं जाऊ या तिकडं

*लई दिसान सखे आज या,"ओळी" जमल्या ग*📝


राजा मदन हसतोय असा की'मास्क' आता सुटला ग 🤡


( पुण्याहून कॅमेरामन  📹 टूच सह मी 'टुकार पूनावाला' , टवाळखोरी माझी 😝)


अमोल केळकर

१७/०१/२०२१

Thursday, January 14, 2021

हे डिलीट लपवू सांग कसे


 घाई - गडबडीत नको ते मेसेज पाठवून नंतर 'डिलीट' ची नामुष्की ओढवून घेणाऱ्या Whatsapp वीरांना समर्पित 📝


( मुळ गाणे: "you may know" it)


मी विनोद चुकता होई हसे

हे 'डिलीट' लपवू सांग कसे


चूक कळता नेहमीची ती

बावरल्यापरी मी एकांती

धुंद जिवाला डोळ्यांपुढती

'हिरो'गिरीचे स्वप्न फसे 😎


हे 'डिलीट' लपवू सांग कसे 


नियमीत ढळता, लाज सावरी

येता जाता वाटे मानसी

सदा सर्वदा ग्रुप पाहुनी

वेड म्हणू 'गे वे -गळे' नसे.


हे 'डिलीट' लपवू सांग कसे


काही सुचेना काय करावे 

माफी मागू?  शक्य न व्हावे

नाव काढिता ग्रुप आठवे

हळूच लपूनी पाहतसे 🙈


हे 'डिलीट' लपवू सांग कसे 


📝१५/०१/२०२१

poetrymazi.blogspot.com


#किंक्रांत

#This_message_was_deleted

Monday, January 11, 2021

आनंदी आनंद गडे


 आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे


माझ्या प्रिय बंधू भगिनींनो ,🙏


असा उल्लेख करुन तमाम जगाला विश्वधर्मपरिषदेत भारताची एक विलक्षण संस्कृती जगासमोर आणणाऱ्या महान तपस्वी स्वामी विवेकानंद यांचा आज जन्मदिन. या थोर महंत्यास सुरवातीलाच नमन करुन आजचा हा लेख.


विविधतेतून एकता ही भारताची संस्कृती आणि या भारत वर्षातील अनेक शहरे आपली स्वत:ची अनेक वैशिष्ट्य जपून आहेत. एखाद शहर म्हणलं की त्या शहराची, तेथील लोकांच्या स्वभावाची छबी नकळत तयार होते. लहानपणी शाळेत असताना परीक्षेत निबंध लिहायला लागायचे. यात अनेकदा 'माझा आवडता स्वातंत्र्य सेनानी, आवडता पक्षी, प्राणी असे ठराविक विषय असायचे पण एका विषयावर मात्र माझी निबंध लिहिण्याची इच्छा होती तो विषय कधीच परीक्षेत निबंधाला विचारला गेला नाही तो म्हणजे

 ' माझे आवडते गाव'. 

तर या स्तंभ लेखनाच्या निमित्ताने ही इच्छा आज पूर्ण करतोय. खरं म्हणजे

हे लिहिण्यास आणखी एक कारण नुकतेच घडले आहे ते असे


"इंडीयन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट २०२०" अंतर्गत देशातील ३४ सगळ्यात आनंदी शहरांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे आणि या यादीत आमचे "आवडते शहर - पुणे"  १२ व्या स्थानावर आहे. या सारखी दुसरी आनंदाची बातमी नाहीच. ज्या कुठल्या संस्थेने हे निष्कर्ष, कुठल्या नियमाद्वारे सादर केलेत माहीत नाहीत पण आमच्यासाठी १ ते ११ नंबर एक Formality म्हणून आहेत. काय असेल ते असेल "पुणे" हे आमच्यासाठी एक आनंदी शहर अगदी लहानपासून होतं, आहे आणि राहीलही यात शंकाच नाही.


तसं आमची जन्मभूमी 'सांगली' आणी आता कर्मभूमी 'मुंबई' असली तरी आमच्यासाठी यामधे वसलेली नगरी कायमच 'आपुलकीची ' ठरली आहे.   पुणे हे आमचे अजोळ, अजोळच्या माणसांबद्दलचा मायेचा ओलावा त्या गावालाही नकळत लागू पडतो. लहानपणी शाळेला सुट्टी लागली की आजोळी पुण्याला जाणे ठरलेले असायचे. कात्रजचा बोगदा ( जूना) ओलांडला की दिसणारी "पुण्य नगरी" आमच्या मनात अजूनही घर करुन आहे. सांगलीत असताना संस्थानचे 'गणपती मंदीर' किंवा 'बागेतला गणपती' किंवा आता मुंबईतील 'सिध्दिविनायक' किंवा 'सिबिडीचा राजा' सारखेच पुण्यातील 'सारसबागेतील ( तळ्यातला) गणपती', 'दगडूशेठ बाप्पा' आमचे कायमच श्रध्दास्थान ठरले. पुण्यात पोहोचलो की दुस-या दिवसा पासून पेशवे पार्क, सारसबाग, पर्वती, तुळशीबाग, शनिवारवाडा याठिकाणी फक्त प्रत्येक सुट्टीत जायचा क्रम बदलला जायचा इतकचं. पाषाण, कोथरूडला नातेवाईकांकडे जायचे म्हणजे गावाच्या बाहेर कुठेतरी जातोय असे वाटायचे.  इतक्या वर्षात बाकरवडी अंबा बर्फी या गोष्टी पुण्यातच घ्याव्यात या मताशी ठाम राहिलो असतानाच लहानपणी पुण्यातच  घेतला जाणारा 'काजूकंद' हा खाऊ प्रचंड आवडायचा. बालगंधर्व, टिळक स्मारक, भरत नाट्य मंदिरात   सुट्टीत  बालनाट्याचे प्रयोग, वेळोवेळी उपस्थित रहायला मिळालेले सांस्कृतिक कार्यक्रम यांनी रसिकता वाढायला मदत झाली हे नक्की.


यंदा 'मैफिल' या दिवाळी अंकात ग्रहांकीत शहरे हा लेख लिहिला होता. काही प्रमुख शहरे आणि ग्रह यांच्यातील ऋणानुबंध उलगडण्याचा प्रयत्न त्यात केला आहे. याच लेखात पुण्याबद्दल मी लिहिले होते

//

आता ग्रह मालेतील पुणेकर कोण ते पाहू. अर्थात गुरु ग्रहा शिवाय कोण असेल? थोडा आरामात, निवांत भ्रमण करणारा, ज्ञानी (त्यामुळे अभिमानी),  शिक्षक, असलेला गुरु विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणेशी जवळीक साधतो यात नवल ते काय?

जगात असे एकमेव शहर असेल की ज्या शहरातील व्यक्तीच्या स्वभावावर सगळ्यात जास्त  विनोद होतात. पुणेरी पाट्या हा ही एक इतरांसाठीचा कौतुकाचा विषय असतो. म्हणूनच पुणेकर म्हणजे सगळ्यांचे ' गुरु' . कुठल्याही प्रश्नांचे   यांच्याकडे उत्तर नाही असे होणार नाही  

 इथे या नगरीतील जास्तीजास्त व्यक्ती  ' धनु' ( द्विस्वभाव तसेच गुरुची रास  ), कुंभ ( ज्ञानी )  या राशीच्या असल्यास नवल काहीच नाही पण माझ्यामते  ' कन्या ( संशयी ) राशीची  ही खूप  व्यक्तिमत्व पुण्यनगरीत सापडतील. 

//


 पु.लं ही आपल्या 'मी नागपूरकर, मुंबईकर की पुणेकर ' यात पुणेकर सादर करताना जास्त खुललेत असं मला तरी वाटतं. असो.


तर मंडळी हे आमचे 'पुणे पुराण'.  आजही आम्हाला रोजच्या जीवनात/ रुटीन मधे कंटाळा आला की सरळ पुण्याला जातो आणि  "चित्त -वृत्ती" आनंदित  करूनच येतो.


लहानपणापासून आजपर्यत मुळा-मुठा वर अनेक नवीन ब्रीज झाले, पुणे वाढलं , बदललं असं काहीही झालं असलं तरी  'आनंदात जगा' हा मंत्र इथल्या चराचरात आहे हे नक्की.आणि म्हणूनच आनंदित शहरात पुण्याचे नाव अले नसते तर नवलच वाटले असते.


"पुणे तिथे काय उणे" ही प्रचलित म्हण पण आमच्यासाठी "पुणे तिथे काय दुखणे" हे फार आधीपासूनच मनात फिक्स आहे. 

म्हणूनच, "मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?"

 असं विचारलं तर एका वाक्यात सांगेन " सुख म्हणजे MH १२ असतं "


आशा भोसले यांनी गायलेल्या गाण्याची एक ओळ सध्याच्या काळाला अनुसरून अशी बदलतो आणि आजची "टवाळखोरी" संपवतो


"दख्खनची राणी नेशील का मला, *आनंदी* पुणे  ( सतत) पहायचे मला "


( कायमचा पुणे- प्रेमी)  अमोल केळकर 📝

१२/०१/२०२१


मंगळवारची_टवाळखोरी:- shopizen.in वरुन साभार

Saturday, January 9, 2021

सिग्नल' दे रे, दे रे भगवंता


 Whatsapp, Facebook सारख्या सोशल अँपना लागलेली ' साडे-साती ' आणि इतर काही अ‍ँपचा होणारा फायदा पाहता, भगवंताकडे हेच मागणे 🙏

( मूळ गाणे: दर्शन दे रे, दे रे भगवंता)


'सिग्नल' दे रे, दे रे भगवंता

किती 'अँप' आता दाविशी अनंता


"हाॅट -मेल' ची सेवा, होती पूर्वजांची

भक्ती पाहिली तू ' याहू - चॅटींगची

नंतर येणे झाले, तुझे 'गुगल'वंता


'सिग्नल' दे रे, दे रे भगवंता 


पाहताच 'भिंत' संत 'फेसबुकाची

त्यातून उमटली मुर्ती 'काय-अप्पांची'

किती दान देशी तुझ्या प्रिय भक्तां (😎)


'सिग्नल' दे रे, दे रे भगवंता 


तूच डेव्हलपर,तूच 'डेटा-राखा'

मन शांत होते ('नेट') बंद -चालू करता

हेच 'टेली-ग्राम' पुरवी तू आता


"सिग्नल" दे रे, दे रे भगवंता 


( फारच सोशल)  अमोल📝

१०/०१/२०२१

Wednesday, January 6, 2021

पुणे_तिथे_काय_दुखणे


 #पुणे_तिथे_काय_दुखणे  ?


आनंदी शहरात 'पुणे' नगरीला १२ वे स्थान मि़ळाले म्हणल्यावर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे 


(प्रशांत दामलेंची माफी मागून)


मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?

माय 'पुण्यात' गेलं की ते घरबसल्या मिळतं 


ज्ञान घेतानाही खोपडी असावी रिकामी

निघता निघता थोडी पुन्हा वाढलेली

आपण फक्त 'टोमणे खाताना' लाजायच नसतं 😉


पुणेरी पाटी दाखवूनच तो देतो

एक ते चार वेळेत प्रश्णच नसतो

दोन्ही हात जोडून आपण नमस्ते करायचं फकस्तं


मला सांगा ,सुख म्हणजे MH १२ असतं

माय 'पुणे' असलं की ते घरबसल्या मिळतं 


( पुणे प्रेमी)  अमोल 📝

०६/०१/२१

पत्रकार तो..


 https://youtu.be/hc2zkOYG5k4


आज पत्रकार दिन. समस्त पत्रकार बंधू/भगिनींना समर्पित 📝

*मनोरंजन हा हेतू


( मुळ गाणे: मानसीचा चित्रकार तो,तुझे निरंतर चित्र काढतो, )


बातमीचा, पत्रकार तो

इथे निरंतन न्यूज लावतो

पत्रकार तो .....


थेट जाऊनी घटना घडता

'ब्रेकिंग न्यूजची' पट्टी फिरता

"काही पाऊले पुढेच पडता"

"डोळे उघडून सत्य" असेच,दावतो


पत्रकार तो..।


तव प्रश्णाने तो गोंधळता

वळते बोबडी कुणा न कळता

मुलाखतीतील तुझी चतुरता

आठवणींची अनेक सदरे, करतो


पत्रकार तो..।


तुझ्याजवळी कॅमेरा असता

संयम ठेऊन मागे फिरता 📹

सकाळ,संध्या,रजनी होता

बातम्यांचा मेळा जमुनी,उरतो


पत्रकार तो....🙏


📝०६/०१/२०२१

poetrymazi.blogspot.com


#नारायण_नारायण

Monday, January 4, 2021

बकेट लिस्ट


 "दिल है छोटासा , छोटीशी आशा"


मंडळी नमस्कार 🙏


नवीन वर्षाची बघता बघता ५ तारीख आली. काय म्हणतंय नवीन वर्ष ? , कल्पना आहे मला नवीन ठरवलेले नियम सेट व्हायला थोडा वेळ लागेल  पण प्रयत्न थोडीचं सोडणार आहात तुम्ही ?  पहाटेचा व्यायाम, सायकलींग,  डायरी लिहिणे, डाएट  , जमा खर्च हिशोब ठेवणे  किंवा इतर कुठलेही तुम्ही ठरवलेले  संकल्प कायमस्वरूपी  दिनक्रमात येवोत या शुभेच्छा. 


मंडळी  हे संकल्प कायम स्वरूपी  म्हणजे रोजच्या दिनक्रमातील असोत किंवा  अगदी "वन टाईम" असोत. वन-टाइम म्हणजेच एखादी इच्छा  जी  गेली अनेक वर्ष पूर्ण करणे जमले नाही ती एकदा तरी आयुष्यात व्हावी अशी काहीशी इच्छा . तर असे काही ' डिझायर्स'  या वर्षी पूर्ण  करायचा अवश्य प्रयत्न करा.


पण  या वर्षीही पूर्ण करता नाही आल्या या इच्छा तर ?  अहो  सरळ बाजारात जावा  एक ' बकेट '  आणा आणि सरळ  त्या बादलीत तुमची

 ' विश ' टाका आणि  अशा सगळ्या पेंडिंग  राहिलेल्या इच्छांची एक लिस्ट  बनवा ' झाली ना तुमची ' बकेट लिस्ट'. मग सवडीने काही वर्षांपूर्वी येऊन गेलेला माधुरी दीक्षित यांचा  पहिला मराठी सिनेमा  ' बकेट लिस्ट '  बघा  (  हा सिनेमा बघणे हे ही तुमच्या लिस्ट मध्ये   सगळ्यात वर लिहा )  आणि  कामाला लागा.


मंडळी, जोक्स अपार्ट  पण  ' बकेट लिस्ट ' ही संकल्पना पाश्चिमात्य जरी असली तरी  मला फार आवडली. जीवनाच्या ज्या टप्प्यावर तुम्ही सध्या आहात, त्या टप्प्यावर तुम्ही येईपर्यत  करिअर-कौटूंबिक जबाबदा-या  या कारणाने कदाचित तुमच्या काही इच्छा / स्वप्न यांना तुम्हाला मुरड घालावी लागली असणार. अशा काही तुमच्या दृष्टीने हटके गोष्टी/ इच्छा, रोजच्या जीवनातील  जबाबदा-या  कमी होऊ लागल्या की एक एक करत पूर्ण करत जायच्या. ही ती  'बकेट लिस्ट' मागची भूमिका.  चला तर मग  करा सुरवात  बनवायला तुमची लिस्ट. 

ही लिस्ट अगदी तुमची वयक्तिक बाब . कितीही शुल्लक गोष्ट असू दे  तुम्हाला ती करावीशी वाटली ना की झाले . मित्र काय म्हणतील, घरचे काय म्हणतील असा अजिबात विचार करायचा नाही. याबाबतीत अगदी सेल्फीश व्हायचे आणि ते काम झाल्यावर अगदी आनंदाने 'सेल्फी' घ्यायची. अशा असंख्य तुमच्या 'सेल्फ्या' पुढील काळात तुमच्याकडून बघावयास मिळू देत या ही नवीन वर्षात शुभेच्छा 


मंडळी लेखनाचा शेवट करता करता  एक गोष्ट . आपली  'बकेट लिस्ट'  संपवता संपवता  इतरांच्या  'बकेट लिस्ट' मधील एखादी गोष्ट  पूर्ण करायला आपला हातभार लागला तर ? अगदी छानच ना?


बघू केंव्हा संधी मिळतीय ते


( आशावादी ) अमोल 📝

५/०१/२०२१

#मंगळवारची_टवाळखोरी

Related Posts Plugin for WordPress, Blogger...