नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Friday, December 28, 2018

शाळेतल्या मित्रांनी


३१ डिसेंबर निमित्य  ' विडंबनाची एक तरी  जिलबी पाडायचीच ' ही परंपरा यावर्षी ही मोडू  ईच्छीत नसल्याने  हे लिहावे लागले 😌

मूळ गाणे :
रेशमाच्या रेघांनी , लाल काळ्या धाग्यानी
कर्नाटकी  कशिदा मी काढीला, हात नगा लावू  माझ्या साडीला

मूळ  गाणे वरती ऐकू शकता 👆🏻
-------------------------------------------
शाळेतल्या मित्रांनी , चर्चा सर्व  करुनी
पारटीचा हुकूम जरी काढीला ,
बर्फ नको त्रास मला घशाला

नवी कोरी व्हिस्की लाख मोलाची
वाट पाहती मित्र मी येण्याची , मी येण्याची
म्हणती सारे थोर, वन्स मोर कवीला
बर्फ  नको त्रास मला घशाला

जात होतो वाटेनं मी पुण्यात , मी पुण्यात
अवचित आला पोलीस  पुढ्यात  जी पुढ्यात
त्याने माझ्या लेखणीला धरूनिया ओढीला
बर्फ  नको त्रास मला घशाला

भीड नाही आम्हा आमच्या कर्माची
मागितली माफी मी त्या हरीची
नका नावे ठेवू  आमच्या या खोडीला
बर्फ  नको त्रास मला घशाला

शाळेतल्या मित्रांनी , चर्चा सर्व  करुनी
पारटीचा हुकूम जरी काढीला ,
बर्फ नको त्रास मला घशाला

📝विसंगती सदा मिळो , टुकार विडंबन कानी पडो

Wednesday, December 26, 2018

पट पट पट पट मित्र गळती


सध्या अनेक ग्रुपची अवस्था पाहून  आम्हाला  हे बालगीत आठवले .  वय वर्ष ४० च्या  आसपासच्या  सर्व ग्रुपमधील बालगोपाळांना समर्पित

महत्वाची सूचना : - *मनोरंजन हाच हेतू , असा ग्रुप  कुठेही सापडणे शक्य नाही* (  ~म्हणूनच सापडला तर योगायोग समजावा या वाक्याला अर्थ नाही~)

(  चाल : टप टप टप टप थेंब वाजती , गाणे गातो वारा )
 -----------------------------------------
पट पट पट पट  मित्र गळती , स्तब्ध ग्रुप सारा
विसरा आता पर्व अनोखे , उगाच वाढला पारा 
लोच्या झाला हो लोच्या झाला.

नमो रागावर ना-ताळ्यावर झाली धुसफूस वाणी
कुरकुरती मागे बोलून  सगळी इथली शहाणी
अवती भवती मिटून  नाती, द्वेष भरला सारा

विसरा आता पर्व अनोखे , उगाच वाढला पारा 
लोच्या झाला हो लोच्या झाला.

मुद्देसूद तत्वांना झाली कोसळण्याची घाई
तिखट एवढे बोल वाचुनी ग्रुप सोडतात ताई
आनंदे लिहीतच जाई  टुकार विसरून मारा

विसरा आता पर्व अनोखे , उगाच वाढला  पारा 
लोच्या झाला हो लोच्या झाला.

 📝२७/१२/१८
विसंगती सदा मिळो, टुकार विडंबन कानी पडो . . ..
poetrymazi.blogspot.in

मुळ गाणे:-

 टप टप टप थेंब वाजती, गाणे गातो वारा
विसरा आता पाटी-पुस्तक, मजेत झेला धारा
पाऊस आला, रे पाऊस आला

घरा-घरावर, कौलारावर, आले झिमझिम पाणी
गुणगुणती झाडांची पाने हिरवी-हिरवी गाणी
अवती-भवती भिजून माती, सुगंध भरला सारा

काळ्याभोर ढगांना झाली कोसळण्याची घाई
इवले इवले पंख फुलवुनी गाते ही चिऊताई
आनंदे हंबरती गाई समोर विसरून चारा

Tuesday, December 25, 2018

आणि सावज सापडलं ( सत्य घटना)


📝आणि सावज सापडलं
( एक सत्य घटना)

रात्री चंद्रोदय झाला,  आरती झाली आणि उंदीर मामा बाप्पाला म्हणाले
बाप्पा,बाप्पा मी केक खाऊ?

येडा झाला काय रे उंदरा तू, बाप्पा म्हणाले

खाऊ दे नं
मी तुझ्या सगळ्या संकष्ट्या केल्या , ही पण केली
आणि चंद्रोदय पण झालाय.
बाप्पा बाप्पा प्लीज आज मोदक तूच खा.
 मला केक खाऊदे नवं

उंदराचा बालहट्ट पाहून बाप्पाला गहिवरून आलं. त्याची पण काय चूक म्हणा.  दिवसभर व्हाटसप वर पडून 'साबुदाण्याचा केक', 'केकचा मोदक ' असे चमचमीत पदार्थ पाहून त्याला मोह झाला तर नवल ते काय?
 पण अगदी रात्री ८:५० पर्यत पठ्ठ्याने हू का चू  केले नाही म्हणून कौतुक ही वाटले.
फक्त रात्रीच्या आरतीच्या वेळेला पुण्यातील थंडी सहन न झाल्याने ती 'लाल टोपी ' का काय घालून मामा आले. किती गोड दिसतंय ना उंदरु माझं असं वाटून बाप्पाला ही मग आरती झाल्यावर त्याच्याबरोबर ती 'सेल्फी ' का काय म्हणत्यात ते घ्यायचा मोह आवरला नाही.

इकडे उंदीर मामांचा बाप्पाकडे तगादा चालूच होता
बाप्पा मला केक खायचाय,  खाऊ दे नवं.
तिकडं माॅडर्न बेकरीत ठेवलेत
जाऊ दे नवं

तरी पण बाप्पा म्हणाले अरे आपल्या धर्माचा तरी विचार करशील की नाही.
उंदीर मामाच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणला अगदी वाढदिवस घ्या, साखरपुडा घ्या, लग्न घ्या, रिसेप्शन घ्या, फार तर अगदी शाळेचे गेट टु गेदर घ्या, सगळीकडे केक कापण्यासाठी सगळेचजण केकावतात. आता मात्र उंदीरमामा हिरमुसले.
बाप्पांनाही त्याची दया आली म्हणले जा पण एक लक्षात ठेव रात्री १२ च्या आत ये.

इकडे पंचरत्न सोसायटीत तळमजल्यावर राहणाऱ्या एका गणेश भक्ताने आज संपूर्ण दिवस अगदी कडक उपवास केला होता. रात्र चंद्रोदय झाल्यावर आवर्तन करुन यथासांग आरती,  उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवून मनोभावे पूजा करुन ,घरात धुमाकूळ घालणाऱ्या उंदराचा बंदोबस्त करण्याची विनंती बाप्पांना केली आणि रात्री पिंजऱ्यात नेहमीच्या 'भजीच्या' ऐवज ' केक ' ठेवला.

भूर भूर भूर
दूर दूर दूर म्हणत

माॅडर्न बेकरीच्या केकवर ताव मारून मामा घरी परत आले. घरातल्या ब्लॅक फाॅरेस्ट केकच्या वासाने परत त्यांची भूक चाळवली. आणि मग  हावरटपणाने एक सावज अलगद पिंजऱ्यात सापडले.


ची ची ची चू चू चू आवाजाने जाग आलेल्या गणेशभक्ताने गणपती अंगारकीला पावला म्हणून आनंद व्यक्त केला. वाॅचमनला हाक मारून पिंजरा ताब्यात दिला.

 गणेशभक्त चिरंजीव चिंटू ने मात्र मी सांता अजोबांकडे घरातील 'माऊस कॅच ' व्हावा म्हणून
' विश '  केले होते ते पूर्ण झाले म्हणत 'हँपी' वाटून घेतले.

इति " नाताळ अंगारकिची" कहाणी टुकार  लेखी सफळ संपूर्ण

शिकवणूक:-
 १ . उंदिरमामा प्रमाणे हावरटपणाने फेसबुकवर लाईक मिळाले म्हणून लगेच व्हाटसप वर पोस्ट करु नये. तो एक सापळा असतो.
२. सदर कहाणी २-४ ग्रुपमधे पाठवल्यास ग्रुपमधे आपोआप पेस्ट कंट्रोल होऊन पुढच्या संकष्टी पर्यत एखादी खुशखबर मिळण्याची शक्यता

मोरया🙏🏻 नाताळ बाबा की जय 🌺

📝२६/१२/१८
poetrymazi.blogspot.in

Sunday, December 23, 2018

अंगारकी नाताळ


# "अंकारकी नाताळ "

चुकून लावाल बाप्पांनपुढे
एक मोठी मेणबत्ती
अन नाताळ बाबांना ओवाळाल
तूप निरांजनाची आरती

नक्की भिजवा साबुदाणा
आणा केकसाठी अंडी
बरोबर ओळखलंत मुंबईत
कमी झालीय थंडी

उकडीचा केक का चाँकलेटचा मोदक
प्रश्ण नको पडायला
काळजी घ्या रे भक्तांनो
उलट सुलट न घडायला

📝२४/१२/१८

Saturday, December 22, 2018

आमचा एक्झिट पोल


तुषार २३/१२/१८

Friday, December 21, 2018

कोटीच्या कोटी उड्डाणे




 भारत  वंशात  सर्वसाधारपणे ३३ कोटी देव आहेत असा समज आहे. यातील एखाद्या दिवशी  दिनविशेषा प्रमाणे  काही देव एकदम प्रकाशझोतात  येतात.

उदा. दत्त जयंती , श्री गुरुदेव दत्ताचा दिवस .

सारसबागेतील गणपती चर्चेत येतो जेव्हा पुण्यात थंडी पडली की त्याला स्वेटर घातला जातो.

भारत वंशात निवडणूक आली की  - प्रभू श्री रामचंद्र आणि त्यांचे मंदिर इ इ इ

 बाकी इतर बारा महिने पोर्णीमा ,  प्रकट दिन, जत्रा , उत्सव   हे त्या त्या संदर्भातले देव / देवता आठवण्याचे कारण पुरेसे ठरते.

केल्या काही महिन्यापासून मात्र अचानक पणे  ' *महाबली हनुमानाचे'* नाव ब-याच  राजकीय नेत्यांच्या मुखी येऊ लागले आहे.

 इतके दिवस केवळ तीन राशींची जनता ज्यांना साडेसाती आहे,ते दर शनिवारी  साडेसातीवर उपाय म्हणून हमखास मारुतीच्या देवळात दिसायची. पण आता  राजकीय नेते , योगी, मुनी - मौलवी ही हनुमानाच्या मागे लागलेत असे वाटते .प्रत्येक जण हा आपल्या धर्माचा , आपल्या जातीचा , आपल्या प्रांताचा आहे असे सांगू लागले आहे. त्यासाठी उदाहरणेही देऊ लागले  आहेत.

 कुणी म्हणतो आमच्याकडे रहेमान, सुलेमान  हा  हनुमान  म्हणून तो आमचा.

कुणी म्हणतो मारुती स्तोत्रात सुरवातीलाच
'भीम ' रुपी  म्हणले आहे तो आमचा.

जितेंद्रियं बुध्दीमतां वरिष्ठं- आमचाच तो , एका धर्माचे म्हणणे.

 कोण सांगतो तो ' वनारी' अंजनी सुता आहे - म्हणून आमचा .

आता  याचप्रमाणे  अजून काही गोष्टी बाहेर येतात का हे बघायचे  जसे '
पुण्यवंता - केवळ पुण्याचा ,

'ब्रम्हांडे माउली नेणो' - ठाण्यातील ब्रह्मांड़ मधील

'धूर्त वैष्णव' - वैष्णवांचा  इ इ

अर्थात  सर्वाना तो आपला वाटत असेल तर चागंलेच आहे. राजकीय गोष्टींना बाजूला ठेऊन सर्वधर्म - जात - समभाव असलेले हे उदाहरण भारत खंडासाठी नक्कीच  आशादायी ठरो.

पुढे जाऊन तर असं म्हणावेसे वाटते की  या सीमा भारत भूमी पुरत्या संकुचित न ठेवता  हनुमानाचे सर्व- धर्म - सम - भाव  तत्व ' कोटीच्या कोटी उड्डाण करून  झेपावे उत्तरे कडे '  आणि भारत देशाची  ' *कीर्ती* '   *चीन* , भूतान, म्यानमार ' पदक्रांत करुन  *वाढता वाढता वाढून अखिल  मंडलाला  भेदून जावी* 🙏🏻🌷

श्री गुरुदेव दत्त
श्रीराम दूतं शरणं प्रपद्दे

📝poetrymazi.blogspot.in

Thursday, December 20, 2018

अंजनीच्या सुता तुला नेत्याचे वरदान


उद्या शनिवार,  'बजरंग बली' उर्फ 'मारुती कांबळे' उर्फ 'मनोज जैन' उर्फ 'वाब्दुल हनुमान' यांचे स्तुती गीत सर्व योगी- मुनी- महंत- मौलवी यांच्या कृपा आशीर्वादाने  'दादांच्या ' शब्दात 📝

अंजनीच्या सुता तुला नेत्याचे वरदान
जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान

दिव्य त्यांची पक्ष भक्ती,  दिव्य त्यांची माया
इलेक्शन ला गेले सारे मत मागावया
आठवली मग देणी, पोकळ आश्वासन
अन् जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान

कमळीला 🌷आली मूर्च्छा लागुनिया बाण🏹
राममंदिरासाठी मग उठविले रान
तळहाताने 🤚🏻 घेतला तिनेक राज्यात प्राण

अन् जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान

निवडणूक विजयाची मनामधे शंका
तिथे तुझ्यानामाचा रे पेटवीला डंका
स्वयं आले सेवक, देती आता दूषण

अन् जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान

आले किती गेले किती संपले भरारा
धर्म- जाती - पंथांचा परि अजूनी दरारा
सावध कर लवकरी, संपव सैतान

अन् जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान

धन्य तुझे रामराज्य, धन्य तुझी सेवा
तुझे भक्त बरळतात  असे  का रे देवा?
घे बोलावूनी आता, कंठाशी आले प्राण

अन् जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान

📝२१/१२/१८
poetrymazi.blogspot.in

Saturday, December 15, 2018

शांती भेटली


तुषार पुरवणी १६/१२/१८

Wednesday, December 12, 2018

इति-हासिक निर्णय


उर्जितावस्था येण्यासाठी
इति-हासिक आदेश .
तलवार, भाले सरसावून
आरबीआयचा नवा आवेश

इतिहास विषय म्हणून
घेऊनका हसण्यावरी
मोहोर प्रत्येक नोटांवर
आता यांचीच असणार खरी


📝१३/१२/१८
#इतिहासतज्ञ गवर्नहर

Tuesday, December 11, 2018

निकालांचा खेळ रंगेल, राज्यांमधे भारी


( मुळ गाणे :- देवाजीचं नाव घ्याव सकाळच्या पारी,पांडुरंग हरी, वासुदेव हरी
🌺)
सर्व संबंधीतांची क्षमा मागून 🙏🏻
-------------------------------
रामाच्या ग मुद्दया मंदी
जीव भरतो नेता
भुलभुलैय्या जातींचा गल्लोगल्ली

निकालांचा खेळ रंगे, राज्यांमधे भारी
शिवराज हारी(?), वसुंधरा हारी

एक रात्र आली जाग योगी महा मुनींना
हंबरुन बोलावले जनता जनार्दनाला
पक्ष बदलू नेत्यांनाच उमेदवारी जारी

निकालांचा खेळ रंगे, राज्यांमधे भारी

फुलला भक्तीचा पारिजात
थांबली मतांची ती बरसात
मारुती गणला दलितात
' दिन अच्छे' दिसेना माझ्या दारी


शिवराज हारी(?), वसुंधरा हारी

निकालांचा खेळ रंगे, राज्यांमधे भारी

📝१२/१२/१८
poetrymazi.blogspot.in

https://youtu.be/eRO_wi3DlaQ

Thursday, December 6, 2018

मुद्दल, व्याज


मुद्दल देतो , व्याज विसरा
फार तर घ्या एक दिन - दर्शीका

येडा बनून पेढा खायला
किंग फिशर कडून जरा शिका..

📝७/१२/१८
poetrymazi.blogspot.in

Wednesday, December 5, 2018

धक धक होने लगा- लोकसभा निवडणूक २०१९


लोकसभा २०१९ - धकधक होने लगा

काल जेंव्हा ती बातमी ऐकली तेंव्हा पासून मी माझ्या गुरु-गणेश नगरला राहणाऱ्या मित्राच्या मागे लागलोय. काही तरी कर पण माझे नाव पुणे मतदार संघात येऊ दे. अगदी कोथरूड,  सिंहगड रोड फार फार तर बिबेवाडी मधून पण चालेल. हे ऐकायचं आहे एकदा प्रचारासाठी घरी आलेल्या नेने बाईंकडून 👇🏻

मी  माधुरी दिक्षीत - नेने, पुणे मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहे. मलाच विजयी कराल ना?

डाॅ नेनेंनी ना तुमच्यासाठी खास फाँर्म्यूला बनवलाय तुमच्या विकासासाठी. डाॅ दिक्षीत, दिवेकरांपेक्षा वेगळा आहे. माझ्या विजयी रॅलीत त्याची झलक मी दाखवेनच

आता या नेने बाईं उमेदवार म्हणल्यावर प्रचाराला मराठी कलाकार पाहिजेतच ना. ते ही सोबत घरी येणार.
आलेल्या कलाकारांच्या  प्रचाराची  अदा काहीशी अशी '-

सुमित : हिचा पहिला मराठी सिनेमा माझ्याचबरोबर . काय बरं नाव? आठवत नाही आहे. पण तिला जे हृदय बसवलं ते पुण्याचेच. तीच पुण्याचा विकास करेल.

स्वप्निल - माझा अनुभव मुंबई - पुणे- मुंबई इतकाच. पण माधुरी ताईंना पुणे- न्यूयॉर्क - पुणे इतका प्रचंड अनुभव आहे.

सुबोध - बास झाल मला पाहून, आता जरा ' तिला पहा ' . तीला इशाला,  साँरी माधुरीला , तीला मतदान करा.

नाना : कुणी मत देणार का मत?
आपल्या या मराठी मुलीला जी इतकी वर्ष अमेरिकेत राहिली पण विकास दिसलाच नाही म्हणून इथं विकास करायला आलीय.
तीला मत देणार ना मत?
अरे राम मंदिर नंतर झालं तरी चालेल पण विकासापोटी उपाशी राहिलेल्या एक मराठी मुलीला मत देणार ना मत?

मुक्ता : ही ही ही . मी पहिल्यांदा पुण्याला आले तेंव्हा मला १ ते ४ वेळेचा फाॅर्म्यूला कळतच नव्हता.  पण तिच्यासाठी तरी तुम्ही दुपारी १ ते ४ जागे रहा. नाहीतर आम्हाला सगळ्यांना मत मागायला हाॅटेलच्या लाईनीत यावं लागायचं अन तिथेही आम्ही वेटींग वरच
ही ही ही

देव करो अन ही बातमी खरी ठरो.
नुसत्या अफवेनेच लोकसभा २०१९ चा '  दिल धकधक होने लगा है '

📝६/१२/१८
अमोल केळकर
poetrymazi.blogspot.in

Sunday, December 2, 2018

अन्नदाता सुखी भव


अन्नदाता सुखी भव. 🙏🏻🙏🏻

अचानक एक दिवस जेवणाच्या ताटातील कांदा, लसूण, मसाल्याचा पदार्थानी मागणी केली की प्रत्येक जेवणात आम्हाला डाव्या बाजूला ८ % आणि उजव्या बाजूला ८% आरक्षण मिळालेच पाहिजे

आपली मागणी त्यांनी मोदकाकडे लावून धरली. निवेदन दिले.

पुरणपोळी, बासुंदी , श्रीखंड यांनी गप्प बसून तमाशा बघणे पसंत केले.

लोणच्याचा तेलाचा तवंग,  मिठाशी गुफ्तगु करायला पळाला आणि आपण पण आरक्षणाची मागणी करु असे  त्यांनी ठरवले.

मोदकांनी तातडीने अन्नपुर्णा समिती नेमून अहवाल सादर करायचे फर्मान सोडले.👉🏼

डाळ तडक्याला बरोबर घेऊन अन्नपुर्णा समितीतील पापडाने मुलाखती घ्यायला सुरवात केली.

आरक्षण द्या पण नाॅन - व्हेज कोट्याला हात लावलात तर खबरदार. तांबड्या / पांढ-या रस्याने सुनावले.😡

सॅलेड ने आमचा पाठिंबा सगळ्यांना पण व्हेज, नाॅनव्हेज मधे आम्हाला समान वागणूक असावी अशी विनंती केली.

मठ्ठा अजूनही निर्णय घेऊ शकत नाहीये तर बरोबरच्या जिलबीचा तोंडाचा पट्टा थांबता थांबत नाही आहे.

गुलाबजाम जाम रुसलाय आणि काही अघटित घडलं तर लिंबू ला हाताशी धरून खेळी करायचा विचारात आहे.

शहाणे दाणे , फिशला बरोबर घेऊन विदेशातून मोर्चा लावण्याच्या तयारीत आहेत.

 मोदक राजा , अध्यक्ष महोदयांना विनंती करत आहेत. थोडा वेळ द्या अभ्यासाला पुढच्या अधिवेशनात अहवाल सादर करतो सगळ्यांची टेस्ट बघून

अहो, आलं का ग पार्सल हाॅटलातून, रविवारी उशीरच करतात.
  टुकार लेखन बास झालं फोन करा परत हाॅटेलवाल्याला.

हो हो. झालं, आवरतं घेतोय लेखन. 🙋🏻‍♂

📝अन्नदाता सुखी भव 🙏🏻
poetrymazi.blogspot.in
Related Posts Plugin for WordPress, Blogger...