नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, June 30, 2020

मौज हीच वाटे भारी


मौज हीच वाटे भारी

खरं आहे. ऋतू बदलला की आमचे शरीर ठेपाळतेच. एक -दोन दिवस आराम केल्याशिवाय शरीराला उभारी येतच नाही

"पडू आजारी, मौज हीच वाटे भारी "  हे गाणं आमच्या सारख्या 'कन्सीस्टंटली' आजारी पडणाऱ्या  आणि आजार एन्जॉय करणाऱ्या रोग्यांना डोळ्यासमोर ठेऊन 'श्री भानूदासांनी'  लिहिले असं मला कायम वाटत राहिलं आहे

पत्रिकेत आमचा लग्नेष ग्रह षष्ठात म्हणजे मुळातच रोग प्रतिकारक शक्ती कमी आमची. भूतलावर अवतरल्या अवतरल्या काही दिवस आमची रवानगी सरळ काचेच्या पेटीत झालेली असं आई सांगते. त्यानंतर दवाखान्यात अॅडमीट व्हायचे प्रसंग म्हणजे शहा डाॅक्टरांच्या दवाखान्यात एकदम ८-१० दुधाचे दात काढले त्यावेळी आणि नंतर डायरेक्ट मोठेपणी नवी मुंबईचे नागरिकत्व मिळण्यासाठी चे प्रमाणपत्र म्हणून एकदा मलेरिया आणि नंतर डेंग्यू झाला त्यावेळी . बाकी गोवर, कांजिण्या वगैरे रोग घरगुती निभावले गेले

पण वरील काही गोष्टी सोडल्या तर आधी उल्लेख केला त्याप्रमाणे  ऋतुबदल झाला की आजारी पडणे आम्ही मजेत घेतले 😉

आता या गाण्यातील कुठले ही कडवे घ्या

नकोच जाणे मग शाळेला
काम कुणी सांगेल न मजला
मउ मउ गादी निजावयाला
चैनच सारी
मौज हीच वाटे भारी

या गाण्याची पुढची तिन्ही कडवी अगदी असेच वर्णन करणारी

आता लेख संपवता संपवता शेवटचे कडवे बघू

असले आजारीपण गोड
असून कण्हती का जन मूढ?
हे मजला उकलेना गूढ

म्हणून मी आज माझ मलाच विचारलं, का एवढं आपण मौज केली?

कारण एकच आजतागायत आम्हाला भेटलेले  प्रेमळ डाॅक्टर मग ते सांगलीचे डाॅ. शिरगावकर असतील, डाॅ. विजयकुमार शहा असतील,  माधवनगरचे आमचे फॅमिली डाॅक्टर कुलकर्णी असतील आणि बेलापूरचे आमचे डाॅ.पडवळ असतील.

प्रत्येक ऋतुतील येणारे  आजार आम्ही मौजेने घेतले कारण हे सगळे प्रत्येक वेळी आमच्या पाठीशी होते जणू 'माऊली' बनून

आज " डाॅक्टर्स डे"  निमित्य त्यांच्याप्रती कृतज्ञता 🙏🏻🙏🏻

इतर सर्व डाॅक्टर मंडळीना शुभेच्छा 💐

अमोल
०१/०७/२०२०

#पडू_आजारी_मौज_हीच_वाटे_भारी

Monday, June 29, 2020

६५ वी कला


आगामी आकर्षण/ लवकरच/ coming soon

पहिल्या भागाला मिळालेल्या उदंड प्रतिसादा नंतर

' नियती प्राॅडक्शन '
    घेऊन येत आहे
तुमच्या आमच्या जिवाळ्याचे 
     '६' अंकी रहस्यमय नाटक

        " उत्तरार्ध २०२० " 📝

शुभारंभ १ जुलै ' आषाढी एकादशीच्या '  शुभमुहूर्तावर
पहायला / अनुभवायला विसरु नका ' उत्तरार्ध २०२०
जवळच्या नाट्यगृहात ? नाहीनाही घरोघरी.

😀 मंडळी कशी वाटली जहिरात.  अरे जहिरातीचं युग आहे. बिचारी नियती तिला कुठे जहिरात करता येते. म्हणलं आपणच करु ' उत्तरार्ध २०२०' ची जहिरात

मंडळी, आत्तापर्यत आपण सगळेच समजायचो की ६४ कला आहेत. तर ही आपली समजूत आता चुकीची आहे बरं का.
नुकताच एक मराठी सिनेमा येऊन गेलाय.  ६६ सदाशिव. बघा मस्त आहे सिनेमा. यात आलेला उल्लेख असा आहे की
६५ वी कला म्हणजे- जहिरात
आणि
६६ वी. - हं याबद्दल परत कधीतरी.  कारण हा लेखनाचा स्वतंत्र विषय आहे. आणि जो आमच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे.

तर लेखनाचा मथळा,  आगामी आकर्षण/ लवकरच/ coming soon

म्हणजेच अगामी गोष्टींची जहिरात. लहानपणी सिनेमाचे पोस्टर किंवा सर्कसीचे पोस्टर आणि त्यावर लवकरच, coming soon वगैरे पाहून छान वाटायचे.

आपण थेटरात सिनेमा बघायला गेल्यावर सुरवातीला किंवा मध्यंतरात एखाद्या नवीन
येणा-या सिनेमाचा ट्रेलर बघायला फार भारी वाटायचे
Coming soon...

आजकाल मात्र नवीन सिनेमा, नवीन मालिका यांच्या पोस्टर पेक्षा त्यांची टीव्हीवरच जहिरात बघायला मिळेल. .

आजकाल सोशल मिडियाने 'अगामी आकर्षणाची' भिंत
ब-यापैकी व्यापलीय हे नक्की.

जहिरात हाच अनेक चॅनेलचा श्वास असतो हे तर तुम्हांला माहितच आहे

 मात्र काही काही गोष्टींची coming soon म्हणत नुसती हवा होते . खरं ना ?
नाही कळलं?
पाऊस आहे का तुमच्याकडे 😁

तर मंडळी वरचे सगळे शब्द घेऊन येणारी 'जहिरात' ही नक्कीच एक कला आहे आणि यात अनेक कलाकार आहेत जे आपल्याला 'आनंद' देतात.

न बोलणा-याची 'अमुक किमती' गोष्ट पण विकली जात नाही तर बोलणा-याची 'तमुक कमी किंमतीची ' गोष्टही विकली जाते असे आपण नेहमी म्हणतो
( टिप: ही 'म्हण' मला माहीत आहे, लेखाची लांबी वाढण्यासाठी अस लिहिलय 😌)

तेंव्हा
"कुछ ना कहो, कुछ भी ना कहो"
हे गाणे ६५ व्या कलेसाठी वर्ज्य समजावे.
त्यासाठी
"ढमढम ढोल बाजे, ढोल बाजे ढोल' 🥁 हेच योग्य गाणे

मंडळी, उद्यापासून च्या इंग्रजी कालनिर्णयाचा :उत्तरार्ध २०२० माऊली कृपेने निरोगी जावो या शुभेच्छा 🌺🙏🏻

६५ व्या कलेचा चाहता, ६६ व्या कलेचा उपासक

( कायम ढोल पिटणारा) अमोल
३०/०६/२०२०

Sunday, June 28, 2020

जागतिक वेध अनुभवाचा







अमोल केळकर

Friday, June 26, 2020

सुखाचे हे सुख...


सुखाचे हे सुख .......

एव्हांन दोन्ही पालख्या पुण्यात आलेल्या असतात. आषाढ सरीं पेक्षाही, विठू माऊलीच्या गजरात  अवघी पुण्य नगरी जास्त चिंब होते . सदाशिव पेठ असू दे , कोथरूड असू दे किंवा बिबवेवाडी, काही ठिकाणी अशा चर्चा रंगतात

बाबा , उद्या  शनिवार तुम्हाला मला हडपसरला सोडायचे आहे
का ?
उद्या पालखी  'दिवे घाटातून' जाणार आहे , आणि आम्ही मैत्रिणीनी जायचे ठरवले आहे .

अगं पण तुला जमणार आहे का ?

का , नाही ? आणि नंतर रविवार तर आहे आराम करायला . तुम्ही हडपसरला सोडायचे आणि सासवड च्या जरा आधी फोन करू , मग घ्यायला यायचे

आईला विचारलं ?

हो, ती  ' हो ' म्हणलीय.

मग काय,  चला ...

"ग्यानबा, तुकाराम, ग्यानबा तुकाराम "

काही राहील नाही ना गं? पाण्याच्या बाटल्या , खायचं ?
 छत्री जवळ ठेव , उगाच भिजू नको लगेच सर्दी होते तुला .

होय बाबा , काळजी नका करू

ए हाय ! केंव्हा आलात ?

झाली १० मिनिटे .

अग पण आपली प्रोजेक्ट मॅनेजर कुठाय ' ज्ञानदा ' ?

नेहमी उशीर होतो हिला

 ए ती बघ आली !

ए चला हा आता भरभर , उशीर झालाय आपल्याला.
त्या बघ आजीबाई आपल्या पेक्षा किती भरभर चालतायत ते पण तुळशी कट्टा डोक्यावर घेऊन

 सेल्फी काढायचा त्याच्यांबरोबर ? का सरळ फेसबुक लाईव्ह करू या
?

नाही हा , फेसबुक लाईव्ह घाटात करू . आत्ता एक सेल्फी काढू फारतर.

अक्षता,  त्या आजीबाईंना थांबव ना जरा

' स्माईल प्लिज '  क्लिक

ए ज्ञानदा, उद्या  ग्रुपवर छान लेख टाक हं हा फोटो लावून

चला ग किती गप्पा मारताय , खूप लांब जायचंय अजून

ए आपण अभंगांची अंताक्षरी खेळायची ?

हा चालेल

तुलसी, कर चालू

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
नाचती वैष्णव भाई रे
क्रोध अभिमान गेला पावतनी
एका एका लागतील पायी रे
------------------------------------------------

राम कृष्ण गोविद , नारायण हरी
केशवा मुरारी पांडुरंगा

लक्ष्मीनिवास पाहे दीनबंधु
तुझा लागो छंदू सदा मज
--------------------------------------------

ज्याचा सखा हरी
त्यावरी विश्व् कृपा करी

---------------------------------
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
रविशशिकला लोपलिया

कस्तुरीमळवट चंदनाची उटी
रुळे माळ कंठी वैजयंती
--------------------------------------------
तारू लागले बंदरी
चंद्रभागेचिये तीरी

लुटा लुटा संतजन
अमूप हे रासी धन
-----------------------------------
नामाचा गजर  गर्जे भीमातीर
महिमा सजे थोर तुज एका
------------------------------------------
ए  फेसबुक लाईव्ह कर लवकर
ए काय झालं ?
अग बघ ना ? माऊलींची मूर्ती , किती छान ना ?

 हो , हो आपल्याला इथेच थाबायचं आहे. पालखी पुढे गेली की मस्त हवेतेवढे फोटो, सेल्फी काढू . बाबा इथेच येतो म्हणालाय घ्यायला आपल्याला

- * -

काय झालं देवा असं गालातल्या गालात हसायला , उठा लवकर .

अग रुख्मिणी , छान स्वप्न पडलेलं , काय मस्त अंताक्षरी खेळत होत्या या मुली वारीत

पांडुरंगा , पांडुरंगा,   किती समजवायचं रे तुला , रोज आपली पालखीची स्वप्ने. यंदा लाॅकडाऊन मुळे वारी नाही . चला आवरा भरभर आज आपल्याला ' दिवे घाट'  पार करून जायचं आहे .

यंदा परंपरा पाळायला भक्त समर्थ नाही तर भक्तांची परंपरा आपण चालू ठेवायची
*ठरलय  ना आपलं ?*🚩🚩

भेटी लागी  जीवा .......

अमोल केळकर  📝
२६/०६/२०२०

Friday, June 19, 2020

ग्रह (अ)न - आपण


🌞 ग्रह(अ)न - आपण 🪐🌝✨

सृष्टीत ज्या दैनंदिन गोष्टी नित्य नेमाने सुरु आहेत त्यात उद्या घडणारी एक गोष्ट म्हणजे
"सूर्य ग्रहण" . ग्रहणात ही सूर्य आणि चंद्र यांना इतर ग्रहांच्या मानाने जास्त वलय प्राप्त झाले आहे. मंगळ , बुध , गुरु आणि इतर ग्रह ही आपल्या नियमित भ्रमण मार्गात 
' ग्रहणांकित '🪐 होत असतातच पण अनेक गाण्यातून कवितेतून वगैरे चंद्राला जरा जास्त वलयांकित केलेले असते, अभिशाप वगैरे तो भोगतो असा उल्लेख केलेला आढळतो. कदाचित ही दोन ग्रहणे आपण सहजासहजी पाहू शकत असल्याने याचीच चर्चा जास्त होत असावी . म्हणूनच की काय पूर्वीपासूनच सूर्य , चंद्र  ग्रहणांना इतर ग्रहणापेक्षा धार्मिक दृष्टीकोनातूनही जास्त महत्व दिले गेले आहे.

ग्रहण म्हणजे ? वैज्ञानिक दृष्टीकोनातून अनेक शास्त्रीय लेख तुम्हाला इतरत्र वाचायला मिळतील. पण ' टुकार ' दृष्टीकोनातून फक्त इथेच वाचू शकाल

एखादी गोष्ट व्यवस्थित आहे आणि अचानक त्यात अडचणी यायला लागल्या की  त्या गोष्टीला "ग्रहण" लागले असे आपण म्हणतो. सन २०१९ च्या ३१ डिसेंबरला नवीन २०२० चे स्वागत करताना हा विचार ही आपल्या मनात आला नसेल की सगळं व्यवस्थित चालू असणा-या आपल्या नियमित गोष्टींना/ रुटीन कामाला सन २०२० मध्ये मोठे ग्रहण लागणार आहे. आज या २०२० च्या मध्यात आपण आहोत आणि संपूर्ण हे वर्ष आता असेच जाणार हे सांगायला कुणा वैज्ञानिक, शास्त्रज्ञ , डॉक्टर , जोतिषाची गरज नाही.

 या शब्दाचा आता दुसरा अर्थ बघू
'ग्रहण - ग्रहण करणे - स्वीकारणे ?????????

सूर्य , चंद्र ( आणि इतर ग्रह ) यांच्या ग्रहणात  सूर्य , चंद्र  हे राहू-केतू  बरोबर युतीत येतात . राहू केतू हे प्रत्यक्षात ग्रह नाहीत  तर छेद बिंदू ( nodes ) आहेत. आता आपल्या १२ राशीतून भ्रमण करत असताना  राहू , केतू ( पापग्रह ) ज्या राशीत आहेत  तिथे सूर्य चंद्र त्यांच्याबरोबर आले की ग्रहण स्थितीत येतात.

काय शिकवतात हे ?  जीवनात अधेमधे वाईट गोष्टी/ परिस्थिती  तुमच्या वाट्याला येईल ही  , पण  थोड्या कालावधीसाठी. त्या कालावधीचा स्वीकार करायचा ( ग्रहण), तेवढ्यापुरते 'सबुरी' ने घ्यायचे आणि पुढे जात रहायचे जे सध्या पण सगळेच करत आहोत.

मोठ मोठ्या ग्रहांना हे अनिश्चिततेचे ग्रहण सुटलेले नाही मग आपण कोण एवढे मोठे लागून गेलो आहोत ?  चंद्रा सारख्या असंख्य अमावस्यां - पोर्णीमा अनुभवून पुढे जात रहायचे.

चला टुकार लेखनाचा शेवट वसंत बापट यांच्या एका "स्फूर्ती गीताने"

सदा तुझ्यापुढे उभी असे निशा
सदैव काजळी दिसायच्या दिशा
मधून मेघ हे नभास ग्रासती
 मधेच या विजा भयाण हासती
दहा दिशातुनि तुफान व्हायचे
सदैव सैनिका  पुढेच जायचं

सदैव सैनिका पुढेच जायचे
न मागुती तुवा कधी फिरायचे

उद्याच्या योगदिन आणि ग्रहणदिनाच्या शुभेच्छा
🌞🧎🏻

" *योग दिनं ग्रहणाम्यहं* "

( ग्रहांकीत) अमोल ✨💫
poetrymazi.blogspot.com
२०/०६/२०२०

Wednesday, June 17, 2020

जिंकू या, हरु या पण


आमच्या चेतना वैद्य मॅडमनी हा निरोप पाठवला 👆🏻, त्यांनी खरं म्हणजे 'आव्हान' ( चॅलेंज)  न देता 'आवाहन' केलेलं. निरोप बघितल्या बघितल्या त्यांना कळवलं हे व्हिडिओ वगैरे बनवणं काय जमणार नाही मला.

पण मनात हा विषय सुरु झाला. लाॅकडाऊन मधे काय केल आपण ? आणि इतरांना काय सांगशील ? तर त्यांना रोज किमान ' बदाम सात चे' २-४ डाव न चुकता रात्री खेळायला सांगेन

तर मंडळी दिवसभर work from home वगैरे झाल्यावर रात्री आम्ही ५ जण न चुकता थोडावेळ 'बदाम ७' खेळायचो. मी, आई, बायको आणि मुलं

हा खेळ जिवनातील अडचणींशी कसा सामना करायचा हे फार छान सांगतो. ( डिप्रेशन वगैरे कमी होईल का वगैरे फार टेक्निकली मला सांगता येणार नाही)

बघायच कस? खाली आमचे मुलांबरोबरचे संवाद पण लिहिलेत

चला वाटा पत्ते. ५ जण म्हणजे पिसणा-याच्या पुढील दोघांना १-१ पत्ता जास्त.

 जीवनात अडचणी  सगळ्यांना सारख्या नसतात.कुणाला जास्त कुणाला कमी - १ ली गोष्ट शिकलो.

अरे उचला पानं, वाटलीत बघा. कुणाकडे आलीय बदाम सत्ती ? -

संधी  कुणाला आधी मिळते कुणाला नंतर.

चलं खेळ, ताईने सत्ती टाकलीय,  तू खेळ. अरे आता मोठ्ठा झालायस, पानं निट लाव बर इस्पिक एकत्र, चौकट एकत्र त्यातही राजा ते एक्का क्रम.
खेळ आधी मग पान लावत बस

- वेगवेगळ्या आव्हानांच वर्गीकरण,  त्याक्षणी जे खेळू शकतो ते खेळणे, परिस्थिती चा स्विकार करणे.

बापरे, नुसती चित्रच आलीत माझ्याकडे मी नक्कीच हरणार
- अरे हा डाव हरशील पुढचा जिंकशील त्यात काय? कुठला राजा आहे तुझ्याकडे 'किल्वर' बघ त्याचीच सत्ती पण आहे . दुस-याची अडवणूक करताना तुझेही पान अडकणार, ती आधी खेळून मग इतर पत्ते खेळ

-  योग्य नियोजन?

आई- राणी टाक ना माझा राजा सुटेल. अरे हो मला दुसरं खेळायला पानच नाही आहे.
येsssस,  सुटला माझा राजा

- जवळच्या माणसांशी चर्चा

माझे टू पेज शुअर मी खेळलो  आता वन पेज शुअर, अरे यार तुम्ही सुटलात?  काय हे , फक्त एक्का राहिला,  माझे १ गुण

- डावाच्या सुरवातीला राजांमुळे ( मोठ्या अडचणी)  हरु शकतो असं  वाटत असताना त्या किरकोळ एक्क्या मुळे ही हरु शकतो.  किरकोळ गोष्टी ही महत्वाच्या असतात
किंवा अगदी लहान सहान गोष्टीत हरलो तर एवढं दु:ख नाही वाटून घ्यायचे. कधीकधी नशीब
दुस-याला आपल्यापेक्षा जास्त देते. बस

 चला आता  पुढचा डाव कोण वाटणार? - आशावाद?

मंडळी, गेले दोन - अडीच महिने हे नित्य आमच्येकडे. बघा खेळून. तुम्ही पण आज 😊

थोडं विषयांतर. आमच्या टुकार लेखनाचे कायम कौतुक करणारी आमची प्रतिभा मावशी. हिने परवा संजय आवटे यांचा 'जगू या,  जिंकू या ' हा लेख पाठवला आणि या विषयावर लिही म्हणाली.
म्हणलं मावशी, मी विडंबनकार. सिरिअस विषय, आणि एवढ छान मला नाही जमणार. तर मावशी ह्या लेखाशीवाय जास्त काही नाही लिहू शकणार.

लेखनाचा मथळा फक्त असा लिहू शकतो 😁

'जगू या, खेळू या
जिंकू या, हरु या पण !

हरण्यात ही कधीकधी मजा  असते.

माझ्या लेखनावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास ठेवल्याबद्दल या दोघींचे आभार 🙏🏻🙏🏻😊

( खेळाडू)  अमोल 📝
१७/०६/२०२०
poetrymazi.blogspot.in

Sunday, June 14, 2020

पाठव रे ती लिंक


#पाठव_रे_ती_लिंक 👍🏻

कुणी मत देणार का मत 🙏🏻

नाही नाही वेळ आहे हो निवडणुकीला अजून.तिकडचा तर प्रश्णच नाही अजून ५ वर्षे चिंता नाही. इकडं पडलं तर बाकीचे तुटून पडतीलच.

 मग?  महानगरपालिका ?

हा ती आहे निवडणूक,  पण तुम्हाला परिस्थितीची काही जाणीव? अहो एवढं संकट आहे गावागावातून, तुम्हाला इलेक्शन पाहिजे?

काय ही 'टुकारगिरी' तुमची ?
'मत देता का मत म्हणे'? 🤨

अहो,  अहो काय हे?  आं?
कुठं नेऊन ठेवलं "आव्हान" आमचं?
निवडणूकीसाठी 'मत' नव्हे.

मग कशासाठी ?

आमच्या चार ओळींपासून, चार पानी व्याख्यानांपर्यत आम्ही जी कला सादर केली त्याला

मत, देणार का मत?

अरे देवा! असं हाय तर..... 🤦🏼‍♂️
ते दर ५ वर्षांनी उगवणारी बुजगावणी  बरी म्हणायची की तुमच्या पेक्षा. एकदा निवडून दिलं की परत तोंड दाखवत नाहीत
अन तुम्ही?  आताशा रोजच यायलाय की हो.🤷🏼‍♂

नाही नाही. ते काल ती काव्यशृंखला होती. त्याआधी  'अभिवाचन' होते आणि आता ही 'कोरोना हटाव चारोळी स्पर्धा'

द्यालना मत? ☺️

नाही, म्हणजे  समजा आमचे एक मत तुम्हाला कमी पडले तर चालणार नाही का? का तुमचा कलेचा 'विकास' होणार नाही.

तसं नाही हो. ऐका तर एकदा ट्यूब वर. तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्ही द्यालच. नाही तुमची तशी तयारी होईलच.

ओ, थांबा!  हे फेसबुक लाईव्ह नाही.
मला एक सांगा, तुम्ही शाळेत कधी कुठल्याही स्पर्धेत भाग घेतलेला?

हो,  ना! बघा ५ वीत मला वक्तृत्व स्पर्धेत...

बास, बास समजलं. त्यावेळी स्पर्धेच परिक्षण कोण करायचे?

काही प्रसिद्ध लेखक, मान्यवर.  तुम्हाला सांगू मी पण गणेशोत्सवात एकेठिकाणी परिक्षक म्हणून.

कळलं. मग आत्ताच्या आयोजकाना काय धाड भरलीय स्वतः निकाल लावायला.

अहो असं कसं म्हणता?  त्यांच्या काही योजना असतील,  एवढ्या व्यक्तीनी त्या संकेतस्थळाला भेट द्यावी, जहिराती बघाव्यात, अनेक गोष्टी असतात. आणि काय हो त्या टीव्ही वरचा वेगवेगळ्या स्पर्धत SMS करत होता ना? पैसे जायचे त्याचे, हे फुकट आहे, फुकट
तुम्हाला द्यायचे 'मत ' तर द्या मी परत येणार नाही तुमच्याकडे 😠

अहो, असं रागावू नका. आत्तापर्यंत तुमच्या सगळ्या कलाकृतीना मी 'मत' दिलय हो.
आता तुम्ही ऐकाल १ मिनीट?

हं , बोला 😏

हे जे वर लिहिलेले संभाषण आहे ना आपल्यातील,  ते एका कथाकथन स्पर्धेत मी सादर केलंय

ही त्याची लिंक 😊
www.poetrymazi.blogspot.in

द्याल ना नक्की मत मला 😷

#पाठव_रे_ती_लिंक

( स्पर्धेला कंटाळलेला )अमोल केळकर📝
१४/०६/२०२०

तळटीप :
१)नेहमी प्रमाणे सर्व स्पर्धक खेळीमेळीने घेतीलच. 😬
२) खरंच स्पर्धे योग्य जमलीय का कथा, तुम्हाला जास्त अनुभव आहे 😉

Saturday, June 13, 2020

इकडचे - तिकडचे " ज्ञानविस्तार "


इकडचे - तिकडचे " ज्ञानविस्तार "

'जगी सर्व ज्ञानी असा कोण आहे
विचारे इकडे, तिकडे शोधुनी पाहे'

खरं म्हणजे  मंडळी हा विषय तसा काही नवीन नाही . पण जरा वेगळ्या पध्द्तीने मांडतोय एवढंच.

आता तुम्हाला हे माहीतच आहे की पारंपारिक शिक्षण आपले हे  शिशु ( सुसु )वर्गापासून सुरु होऊन पुढे  लौकिकार्थाने पदवीपर्यंत पूर्ण होते. ज्याला आपण पाठयपुस्तकी शिक्षण म्हणू. जे आपण बाल मंदिर, शाळा , महाविद्यालये इथून पूर्ण करतो. या सगळ्या संस्थेचे ध्येय एकच असते

चिरा चिरा हा घडवावा , कळस कीर्तीचा चढवावा
अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही तर सागर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे

वेगवेगळ्या टप्प्यात आपण हे शिक्षण घेत असताना आपले मार्गही बदलतात जसे मराठी मिडीयम , इंग्रजी मिडीयम  हिंदी -संस्कृत  किंवा पुढे कला -विज्ञान- वाणिज्य , मग त्याहीपुढे इंजिनिअरींग, वैद्यकीय, व्यवस्थापन  किंवा अशा अनेक वाटा .

एक मार्ग स्वीकारल्यावर शेवटचे ठरलेले स्टेशन आले की  प्रवास संपला पाहिजे पण असे होत नाही . बघा ना , रेल्वे बजेट मध्ये गेली काही वर्ष  अमुक गाडयांचा मार्ग विस्तारीत केला आहे असे आपण वाचतो. म्हणजे एखादी गाडी मिरजेपर्यतच जाते  पण आता ती बेळगाव पर्यत जाईल  हा झाला  त्या गाडीचा विस्तार . ज्ञान घेण्याबाबतीत तसा  विस्तार आपण ही करतो मग तो आपल्या आपल्या नोकरी /  व्यवसायास  / प्रोफेशनला पूरक म्हणून असेल   किंवा निव्वळ  आवड छंद म्हणून असेल

 ' अपारंपारिक शिक्षण किंवा ' ज्ञान - विस्ताराची ' सुरुवात तशी लहानपणापासून नकळत झालेलीच  असते. आई - बाबा हे आपले पहिले गुरु . नियमित अभ्यासक्रमात नसलेल्या अनेक गोष्टी ( संस्कार / आचरण इ इ ) शिकवायला त्यांनी सुरवात केलेली असते . नंतर येतात ते आपले शाळेतील , आजूबाजूचे सवंगडी
मग हळूहळू आपली ओळख होते  पेपर , रेडिओ , दूरदर्शन ( टीव्ही ) या माध्यमांची . ज्ञान विस्ताराच्या या मार्गात  वयाच्या एका टप्प्यावर आपला संबंध वाचनालयाशी येतो .  इथेही अनेक गोष्टी कळतात, आपल्या ज्ञानाचे क्षेत्र विस्तारते. पुढे संगणक शिक्षण झाल्यावर वेगवेगळी संकेतस्थळे   आपले ज्ञान विस्ताराचे मार्ग बनतात आणि आज काल तर सोशल - मीडिया ( त्यातही फेसबुक , व्हाटसप )  हा तर ज्ञान विस्ताराचा जणू एक्स्प्रेस हायवेच झालाय. आता यात येणा-या किती गोष्टी ख-या असतात , अफवा असतात  किंवा दिलेले संदर्भ किती बरोबर - चूक असतात  हे ओळखणे ही एक ' कलाच ' आहे.  यात उतरलेल्यांना कले, कले ने ते समजत जातेही पण  सध्यातरी ज्ञान - विस्ताराचा हा ' राज ' मार्ग ठरला आहे यात शंका नाही

यात ही दोन प्रकार आहेत बरं  का. जस शाळेत आपण मुलांचे वर्गीकरण मिळणा-या गुणांनुसार  प्रामुख्याने दोन प्रकारे करतो १) हुशार २ ) मध्यम ( इथे ' ढ ' वगैरे प्रकार मला मान्य नाही )  तर  व्हायचं काय की  मुख्यतः दहावी बोर्डाच्या परीक्षेत वगैरे   एका ' मध्यम' मुलाकडे  एखाद्या विषयाचे  दुसरे पुस्तक असायचे , किंवा काही तरी त्याला पुण्या-मुंबई कडच्या नातेवाईकांकडून  काही नोट्स वगैरे मिळायचे. ही बातमी  हळूहळू सगळीकडे जायची. ज्याच्याकडे त्या नोट्स किंवा काही वेगळे पुस्तक असायचे त्याबद्दल त्याला काही फार वाटायचे नाही . पण जी हुशार मुले असायची त्यांची मात्र  प्रचंड घालमेल व्हायची. अरे आपल्याकडे कसं नाही, काय असेल त्यात ? कसेही करून ते आपल्याला पाहिजे  इ इ मग ते पुस्तक / नोट्स त्या 'मध्यम' मुलाकडून मिळवल्या जायच्या. तो ही सहज द्यायचा , त्याला काही वाटायचे नाही. त्याच्यासाठी सामान्य अभ्यासक्रमच खूप असल्याने हे अतिरिक्त पुस्तक वाचले काय नाही वाचले काय फारसा फरक पडायचा नाही. तो आपलं सगळ्यांना देत रहायचा

आज हीच ' मध्यम '  मुले सोशल मीडियावर आपल्याकडे आलेले ज्ञान पुढे ढकलतात आणि हुश्शार मुले त्यावर अभ्यासाचा ' किस ' पाडतात 😉

माफ करा थोडं विषयांतर झालं . पण मंडळी लहाणपणापासून  सुरु असलेली  ' ज्ञान - विस्ताराची  '  माणसाची उर्मी कायम राहील यात शंका नाही. पण यातही   पारंपारिक शिक्षणाबरोबरच अपारंपारिक शिक्षण असलेले
' व्यवहार ज्ञान'  घेणे हे ही महत्वाचे नाही का ?

एखादवेळी गणितात थोडे कच्चे असले तरी चालेल पण माणसाने शब्दाला पक्के पाहिजे. हे
 ' व्यवहार ज्ञान' एकदा आत्मसात झाले की भले अक्षांश - रेखांशांच्या परिणामात गडबड झाली तरी  तुमचा जगण्याचा आलेख ( ग्राफ ) हा वर जाणाराच असेल यात शंका नाही  📈
 
चला मंडळी आवरत घेतो.

इधर चला में , उधर चला , जाने कहाॅ में किधर चला

वेळ झाली आहे आता जरा दुसरी कडे जाऊन तिथे आलेले
 ' ज्ञानरूपी मोती'   ओजळीत गोळा करून इतरत्र देण्याची.

मज पामरासी काय थोरपण
पायींची वाहणं पायी बरी |
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव
म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसें ||
🙏🏻🌺

( अ-ज्ञानी ) अमोल 📝
१३/०६/२०२०
poetrymazi.blogspot.in

Tuesday, June 9, 2020

तुझी कला पाहण्यासाठी


गेले काही दिवस आमच्या असंख्य 'कलाकार' मित्र -मंडळीं कडून त्यांची कला पाहून यू-ट्यूब वर लाईक करण्याच्या प्रेमळ विनंत्या येत होत्या. अर्थात आम्ही कुणालाच निराश केले नाही.

या सर्व मित्र -मंडळींना हे विडंबन समर्पित,  सगळेच जण हलके घेतील यात शंका नाही ☺️

( मूळ गाणे: तुझे गीत गाण्यासाठी,  सूर लागू दे रे)

तुझी कला पाहण्यासाठी,  खूळ लागू दे रे
तुझी कला पाहण्यासाठी,  खूळ लागू दे रे

'ग्रुप वरी' दिसुन आल्या, यू ट्यूबच्या वाटा
नोंदणी ही करण्यासाठी घातलाच घाटा
त्या एका 'लाईक' साठी 👌🏻
मला जाऊ दे  रे

तुझी कला पाहण्यासाठी,  खूळ लागू दे रे

एक एक कलेचा तो, नाद पाहताना 🎤🎧
आणि किती मिनिटे राहिली, हे जाणताना ⏱️
कौतुकाची 'थाप' मला तुला वाहू दे रे 😷

तुझी कला पाहण्यासाठी,  खूळ लागू दे रे

( कला प्रेमी)  अमोल 😬
poetrymazi.blogspot.in
०९/०६/२०२०

Sunday, June 7, 2020

आइस बकेट चॅलेंज


( ALS) *आइस बकेट चॅलेंज* 🥶

गेले दोन महिने पेक्षा जास्त काळ सुरु असलेल्या लाॅकडाऊन मधे सोशल मिडीयावर खूप जणांनी सक्रिय सहभाग नोंदवला. अनेकांनी आपल्या कलाकृती सादर केल्या मग ते गाणे म्हणणे असेल, एखादं वाद्य वाजवणे असेल, स्वयंपाक करणे असेल, चित्रकला, हस्तव्यवसाय अशा काही गोष्टी असतील. किंवा लेखन, काव्य, गप्पा गोष्टी अशा अनेक गोष्टी सोशल मिडीयावर पहायला मिळाल्या. अबालवृध्दांनी सर्वच स्तरावर यात सहभाग नोंदवला. 

*अनेक जणांनी तर या अडचणीच्या काळात  प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून गरजूंना  समाजसेवा/ मदत करुन वेगळ्या प्रकारे आपल्यातील कला सादर केली*  कामाच्या गडबडीत इतर वेळेला न जमणाऱ्या अशा काही समाज उपयोगी गोष्टी अनेकांनी केल्या.

आज सोशल मीडीया मुळे ही सगळी माहिती सहज समजू शकते. आपण इतरांच कौतुक करुन त्यातुन स्फूर्ती घेऊ शकतो

सोशल मिडीयावर एक थोडा वेगळा प्रकार ही दिसून आला तो म्हणजे आपली कला सादर करुन त्याप्रकाराची कला ( गाणे, कविता, डान्स, पोशाख वगैरे वगैरे)  सादर करण्यासाठी दुसरा/ दुसरी किंवा एका पेक्षा अधीक व्यक्तींना आव्हान / चॅलेंज/ नाॅमीनेट करणे. या प्रकारात ही अनेकजण खुप उत्साहात सामील झाले.

थोडंस साखळी विक्री ( चेन मार्केटिंग)  सारखा हा प्रकार पण प्रत्यक्षात आर्थिक उलाढाल नाही. तसा 'चेन मार्केटिंग हा लेखनाचा स्वतंत्र विषय आहे, पण तो परत कधीतरी.

मुळ मुद्याकडे परत येऊ. वरील चेन मार्केटिंग मधे काही प्रमाणात आर्थिक गोष्टी आणून आणि सोशल मिडीयाचे 'आव्हान' या गोष्टी एकत्र करुन अमेरिकेत पहिल्यांदा 

" आईस बकेट चॅलेच " सुरु झाले

 साधारण २०१४ ( किंवा २०१५ असेल ) जुलै / आॅगस्टचा कालावधी असेल

संकल्पना अगदी सरळ होती. एका कर्करोगा संबंधित संस्थेत मदत करायची यादृष्टीने हे कँपेन होते. त्याचे कदाचित नंतर अनेक वेगवेगळ्या समाजोपयोगी गोष्टीत रूपांतर झाले ही असेल

तर एका व्यक्तीने बर्फाच्या तुकड्यांनी भरलेली बादली एका झटक्यात आपल्या डोक्यावर ओतायची ( डोकं शांत ठेवायचा तो अमेरिकी प्रकार असावा)  आणि त्या संस्थेला $ १०/- इतकी मदत करायची. हे आव्हान तो स्विकारु शकला नाही तर त्या संस्थेला त्याने $१००/- इतके द्यायचे. त्यानंतर त्याने इतर काही जणांना 'आव्हान ' द्यायचे आणि ही चेन / साखळी पुढे चालू

मस्त कल्पना ना?

म्हणजे खेळ/ थरार/ मजा हे सगळं करता करता 'सामाजिक मदत' हे व्यापक स्वरुप याला दिले गेले. काही कालावधीतच हा प्रकार खूप लोकप्रिय झाला.

आज हे सोशल मिडीयावरील 'आव्हाने' बघून  हे सहज आठवले.

बाकी आपल्याकडे लगेच असे करावे असं मला यातून अजिबात सुचवायचे नाहीकारण एकंदर भारतीयांना सामाजिक जाणीव असतेच आणि वेळोवेळी तो तशी आर्थिक मदत करतच असतो.

आणि म्हणूनच गदिमांनी लिहून ठेवलयं

होते तितुके देइ याहुन हट्ट नसे गा माझा,
सौख्य देइ वा दुःख ईश्वरा रंक करि वा राजा
अपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाचि पाळि

*देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी*. ||

( सोशल)  अमोल 📝
०७/०६/२०२०

Saturday, June 6, 2020

जीवनगाणे गातच रहावे


*जीवनगाणे गातच रहावे*

आज ६ जून,  कवयित्री शांताबाई शेळके यांची पुण्यतिथी.  यानिमित्ताने त्यांच्या काही गाण्यांच्या आठवणी 📝

साधारण जून महिन्याच्या  याच सुमारास मृग नक्षत्र लागते आणि नवनिर्मितीची चाहूल चराचराला होते.  एकंदर पुढचा वर्षा ऋतू चा कार्यकाल हा
" *अजब सोहळा!  अजब सोहळा*"
असा असतो मग अचानक केंव्हाही हा पाऊस येतो, तो मातीचा हवाहवासा वाटणारा गंध घेऊनच

 " *आला पाऊस मातीच्या वासात ग*
*मोती गुंफीत मोकळ्या केसात ग* "

मग दरवर्षी सारखे ते WA वर अत्तरांचे भाव कमी होतात पण या गंधाची अनुभूती घेतलेला नकळतपणे गुणगुणतो

*गगना गंध आला*
*मधुमास धुंद झाला*
*फुलते पलाश राणी*
*जळत्या ज्वाला*

सभोवतालचा परिसर हिरवागार होऊ लागतो. मनुष्यप्राणी तर आनंदतोच पण रानपाखरं ही गाणी गावू लागतात.

*सोनसकाळी सर्जा सजला,हसलं हिरवं रान*
*राघुमैना रानपाखरं गाउ लागली गान!*

याचबरोबर

*किलबिल किलबिल पक्षी* *बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती* !
*पानोपानी फुले बहरती*, *फुलपाखरे वर भिरभिरती !*


आषाढ सरींचा जोर संपून श्रावणाची चाहूल लागते श्रावणसरींची, उन-पावसाच्या लपंडावाची

'कशी मनातुन मने गुंतती, भाव दाटती उरी
*उन्हात न्हाऊन सुंदर होऊन येती श्रावणसरी* '

'जलथेंबानी कशी चमकते सृष्टी ही साजरी
*कधी हास-या, कधी लाज-या, आल्या श्रावणसरी'*

निसर्गाचे मग एक लोभस रुप सगळीकडे बघायला मिळते मग

'नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा

*ऋतु हिरवा, ऋतु बरवा ||'*

नारळी पोर्णीमा झाली की मग परत समुद्रात जाणाऱ्यांना मायेने सांगितले जाते

आज पुनवा सुटलय दमानं
दरियाच्या पान्याला आयलंय उदान
पिऊन तुफानवारा
*माझ्या सारंगा, राजा सारंगा*

तरीही वेळप्रसंगी
सजनान होडीला पान्यात लोटलं
.. अन्

वादळंवार सुटलं गो
वा-यानं तुफान उठलं गो
भिरभिर वा-यात
पावसाच्या मा-यात
सजनान होडीला पान्यात लोटलं
*वादळंवार सुटलं गो !*

निसर्ग आणि मनुष्यप्राणी यांच्यातील रेशीम बंध असेच राहू देत

हे बंध रेशमाचे, ठेवी जपून जीवा
धागा अतूट हाच, प्राणात गुंतवावा
बळ हेच दुर्बलांना , देतील पराक्रमाचे
*तुटतील ना कधी ही,  हे बंध रेशमाचे*

शांताबाईंनी असंख्य गाणी लिहिली आहेत, कुणीही यावे आणी ओंजळीभरुन घेऊन जावीत आणि आपापल्या पध्दतीने

*"जीवनगाणे गातच रहावे "*

यानिमित्ताने शांताबाईंचे स्मरण 🙏🏻

मंडळी, लेख आवरता घेण्यापुर्वी.

६ जून म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन ( तिथी जेष्ठ शुक्ल त्रयोदशी)  🚩

शांताबाईंच्या या गाण्याने या लेखाची सांगता करतोय

शुभघडीला  शुभमुहुर्ती
सनई सांगे शकुनवंती
जय भवानी जय भवानी
दशदिशांना घुमत वाणी

जयजयकारे दुमदुमवू हे
सह्याद्रीचे कडे  !!

स्वराज्यतोरण चढे गर्जती
तोफांचे चौघडे
*मराठी पाऊल पडते पुढे!* 🚩

स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे सिध्द होई
तदा संकटी देव धाऊन येई

🚩 *जय जय रघुवीर समर्थ*🚩🙏🏻

अमोल केळकर 📝

Monday, June 1, 2020

एस टी बसचा वाढदिवस


कुठे ही जायचे म्हणले की
आम्हाला वाटते बरी
अहो तीच सगळ्यांची
लाडकी  ' *लाल परी* '

गणपतीपुळ्याचा गणपती
सभोवती निसर्गाचा ठेवा
खुप आवडायची आम्हाला
मिरज- पुळे ' *प्रतिष्ठित सेवा*

मामाच्या गावाला जाताना
गप्पा - गोष्टी - गाणी
आईच्या ममतेने न्यायची
सांगली- पुणे " *हिरकणी*

खिडकीची जागा मिळाली
म्हणजे वाटायचे मिळाले घबाड
मग दिवस-रात्र असो वा उन-पाऊस
आरामशीर प्रवास म्हणजे *एशीयाड*

थंडा थंडा कूल कुल
तासा तासाला खेपा जारी
पुणे - मुंबई - पुणे प्रवासात
' *शिवनेरीची* मजाच न्यारी

हायवे वरचे विमान जणू
अचूक वेग अन वेध
खरचं नशिबवान तुम्हीजर
मिळाला तुम्हाला ' *अश्वमेध*

वेगवेळ्या रुपातील या सा-यांना  १ जूनच्या एसटी च्या वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा 
💐💐

अमोल 📝
०१/०६/२०२०
Related Posts Plugin for WordPress, Blogger...