नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Sunday, January 26, 2020

पुरस्कार शास्त्र


पुरस्कार शास्त्र. 🌷
( *काल्पनिक राजकीय लेख* : निव्वळ मनोरंजन हा हेतू , कुणाच्या ही श्रद्धास्थानांना ठेच पोहोचवण्याचा हेतू नाही. टोचला गेल्यास मंडळ जबाबदार नाही 📝 )

विरोधकांचे डोके ठिकाणावर आहे का ?

का हो काय झालं ?

काय झालं म्हणून मलाच विचारता ? अरे ज्या कुणाला पुरस्कार मिळाला आहे त्यांचे कार्य तरी बघा.

प्रश्नच नाही , कौतुक करावं तेवढं थोडं आहे सगळ्याचं . पण त्या एका ...

गप्प बसा. तो एक मास्टर स्ट्रोक आहे. तुमच्यासारख्या गल्लीतल्या कार्यकर्त्यांना  नाही कळणार ते

होय काय , मग तुम्ही सांगा

हो हो सांगतो की थांबा की जरा

का हो , भाऊंची वाट बघाताय का ? त्यांनी अजून लेख नाही केला प्रकाशित.   .

भाऊंची कशाला वाट बघायची , काही काही पुरस्कार  "ऑड मॅन  आउट " म्हणून द्यायचे असतात . गनिमी कावा असतो तो. असा उघड  करायचा नसतो .

नाही पण त्यांच्या वडिलांनी ६५ च्या युद्धात आपल्यावर बॉम्ब टाकले .

हेच म्हणतो मी तुम्हाला कळत नाही आहे. म्हणूनच आम्ही त्यांना पुरस्कार देऊन शत्रू राष्ट्रावर दबाब वाढवत आहोत. आता हे शत्रू राष्ट्रातील सगळे पायलट एका वेळी राजीनामा देतील आणि आपल्या मुलांना इकडच्या देशात पाठवतील. मग लढणार कोण आपल्याशी ?

पण त्याने बेकायदा वास्तव्य केले

पण आता तो भारताचा नागरिक आहे ना , गेली कित्येक वर्षे अनेक बेकायदा नागरिक इथे आहेत, तेव्हा कुणी त्यांना नागरिकत्व देऊन पद्मश्री दिलीय ? ही सुरवात आहे .

पण त्यांचे महान  कार्य ???

घ्या , आता हे ही आम्हीच तुम्हाला सांगायचे ? पाहिलं गाणं आलं तेव्हा केवढाsढा  होता तो , आता बघा बिचारा केवढांसा झालाय. सध्याच्या महागाईच्या काळात अचूक डायट कसे करावे याचा वस्तुनिष्ठ पाठ या महाशयांनी दिलाय आणि शाळेच्या अभ्यासक्रमात
"पद्मश्रींचा पँटर्न " म्हणून आम्ही लवकरच समाविष्ट करू .मध्यतंरी त्यांचा नवीन अलब्म आलेला
 " मेरा चेहरा क्यू नजर ना आये " आमच्या साहेबाच्या हस्तेच तो प्रकाशित झाला होता. तेव्हाच जवळजवळ ठरले होते 'कोअर कमिटीत 'आमच्या की या महान  व्यक्तीला पुरस्कार द्यायचाच

आणखी काही विशेष ?

त्यांचा जन्म दिवस माहीत आहे ? १५ ऑगष्ट , ते पण लंडन मध्ये . ज्या इंग्रजानी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्यांचा  गावात आपल्या स्वातंत्र्य दिना दिवशी जन्म घायाचा आणि मग शत्रू राष्ट्राची गुपिते काढून आपल्या देशात स्थायिक व्हायचे. येरा गबाळ्याचे काम नाही हो

हो हो खरं म्हणताय तुम्ही , पण त्या तालुक्याने अनेक जणांचे अभिनंदनाचे फलक लावले , यांचे दिसले नाहीत कुठे ?

असं का म्हणता ? आमच्या पक्षाच्या कार्यालयात लावलाय की अभिनंदनाचा फलक . आणि ते ज्या शहरात सध्या राहतायत ना  तिथे सध्या विरोधी पक्षाचे सरकार आहे ना ? आम्ही परत आलो की लावू अभिनंदनाचे फलक

बर ते " भारत रत्न ?"

म्हणूनच म्हणतो  " विरोधकांचे डोके ठिकाणावर आहे का ?" उगाच काही तरी?
 विषय वेगळा आहे, मधेच
' भारत रत्न '  कुठे आले ? आणि आमच्या आधीच्या सरकारने ७० वर्षात काहीही केलेलं नाही , आम्ही निदान ७ वर्षात तरी करून दाखवूच .
२६ फेब्रुवारी आधी बघाच तुम्हाला चांगली बातमी मिळेल

ते ठीक व साहेब पण असं खाली मान घालून मिळमिळीत का बोलताय.

" कभी तो नजर मिलाओ "

 📝२७/१/२०२०

जिलबी


नक्की केंव्हा सुरुवात झाली माहित नाही पण गेले अनेक वर्षांपासून २६ जानेवारी  ( आणि १५ आॅगस्ट) निमित्य केल्या जाणाऱ्या  गोड पदार्थात   'जिलबी'  ने अगदी मानाचे स्थान पटकावले आहे यात शंका नाही.
जात, पात, धर्म , गरिबी, श्रीमंती याचे कुठलेच बंधन न ठेवणारी ही जिलबी.

  आमच्या इकडे बेलापूरला तिला आणताना तिचा मोठ्ठा भाऊ पंजाबच्या सामोसाला ही घरी आणायची पध्दत आहे. पण जिलबी खायची खरी मजा आम्ही घेतली ती सांगली मधील ( त्यातही मिरजेतील) अनेक मंगल कार्यालयात. अगदी
 गो-यांपासून, ख-यांपर्यत कुठल्याही कार्यालयात  पंगतीत वाढली जाणारी गरमागरम , स्वर्गीय चविची जिलबी आणि सोबतीला तिचा थंडगार पण जरा मठ्ठ मित्र म्हणजेच मठ्ठा. ( इथे मठ्ठ्याला ताक म्हणणे म्हणजे भयंकर अघटीत गोष्ट समजावी) ह्या जोडी शिवाय अनेक वर्षे सांगली/ मिरज ( आणि इतर शहरातलीही) येथील अनेक मंगल कार्य झालीच नाहीत. एकंदर लग्नाची व्यवस्था, जेवण आणि स्पेशली या जोडी साठी मुलगा/ मुलगी दुस-या गावचे पण लग्न सांगली/मिरजेत झालेली उदाहरणे प्रत्यक्ष पाहिली आहेत.

जेवायला जेंव्हा आम्हाला वेगळं बसवायला लागले ( आई/ बाबा, काका/ काकू, मोठा भाऊ/ बहिण यांच्या पाना शिवाय )तेंव्हा आम्ही ख-या अर्थाने ' खायच्या वयात ' आलो. हळूहळू पंगत कशी अंगीकारायची हे ही जमू लागले
एखाद्या मंगल कार्यात जेवायला बसल्यावर सवयीने सुरवातीचा पांढरा भात, नंतरचा मसाला भात किती घायचा हे  समजायला लागले. मग मसाला भाताच्या मागून जिलबीचे ताट घेऊन येणारे काका/ दादा दिसले की पटकन मसाला भाताचा राहिलेला घास कसाबसा गिळून , बाजूच्या कोशिंबीरीचा ओघळ बाजूस करुन ,येणाऱ्या जिलबीला खास जागा जरुन देणे हा जेवणाच्या कार्यक्रमातील एक महत्वाचा घटक असायचा. आपल्या ताटात १-२ जिलब्या वाढून पुढे गेलेल्या काकांना, ओ अजून एक वाढा न असं सांगून १-२ अधिक जिलब्या ताटात पाडून घेतल्यावर एखादं युध्द जिंकल्याच फिलींग यायचे.

अर्थात पंगतीत एकावेळी १-२ ताटं जिलब्यांचा लिलया पडशा पाडणा-या जून्या सांगलीकर/ मिरजकरांशी मात्र बरोबरी करणे कधीच शक्य नव्हते

काळ बदलला. मंगल कार्यालयात जिलबीला अनेक पर्यायी गोड पदार्थ आलेत. आता तर अशी वेळ आली आहे की ' जिलबी ' पक्वान्न ठेवणे म्हणजे काहीतरी वेगळी ( स्पेशल) गोष्ट केलीय. पंगत जाऊन स्वत: स्वतःसाठी वाढून घेणे आणि त्यापेक्षाही भयंकर म्हणजे ते शूगर फ्री जिलबी, डायट जिलबी इत्यादी इत्यादी

तरीपण या जिलबी बद्दलचा लळा, जिव्हाळा कायम राहिलच 😋

📝(जिलबी प्रेमी) अमोल
poetrymazi.blogspot.in
२६/०१/२०२०

Thursday, January 23, 2020

जागतिक हस्ताक्षर दिवस


*सुंदर अक्षर हाच खरा दागिना आहे*.

मंडळी, नु. म.वि पुणे शाळेतले काही मित्र महिन्यातील एका रविवारी एकत्र भेटतात आणि शाळेतील आपल्या जून्या आठवणींना उजाळा देतात असा एक व्हिडिओ ( मित्रांच्या गेट टू गेदर बद्दल) काल पहाण्यात आला. त्यात सुरवातीलाच विजय कदम फळ्यावर लिहिलेला *~सुंदर~* हा शब्द खोडून *अक्षर हाच खरा दागिना आहे* असे करुन आपल्या वाईट अक्षराबद्दलचे अनुभव सांगतात. मग कुणाचे अक्षर चांगले होते आणि इतर आठवणी,  चर्चा रंगतात.

 शाळेच्या अनेक समुहात एकदा तरी कुणाचे अक्षर चांगले होते वगैरे आठवणी काढल्या जातातच. त्यावरुन कुणाला कसे एखादा, अर्धा मार्क जास्त मिळाला ही आठवण ही येते ( आमचा शाळेचा समुह ही याला अपवाद नाही)

मंडळी, हे आठवायचे कारण म्हणजे आज काय '
*जागतिक हस्ताक्षर दिन वगैरे आहे* .

काही काही जणांची अक्षरे दृष्ट लागण्यासारखी चांगली असतात यात शंका नाही. पण कितीही प्रयत्न केला तरी चांगले अक्षर लिहिणे मला स्वत:ला कधीच जमले नाही. अगदी लहानपणी आईने अक्षरांना वळण लागावे म्हणून एक प्लॅस्टीक ची पाटी आणून दिली होती ज्यावर संपूर्ण बाराखडी,  इंग्रजीतील अल्फाबेट्स होते, जे पेन्सिल घेऊन गिरवायचे आणि आपल्या अक्षरांना वळण लावायचे असा उद्देश होता. मात्र माझ्याबाबतीत तो अजीबात सफल झाला नाही.

शाळेतील सर्व विषयांच्या वह्या ते अगदी २०२० ची डायरीतील फक्त पहिल्या पानावरील 'श्री ' आणि काही ओळी सोडल्या तर छान अक्षर काढायला जमलेले नाही.

जे या क्षेत्रात म्हणजे 'सुंदर अक्षर लिहिण्याच्या' क्षेत्रात अजून ही आहेत त्यांचे अभिनंदन आणि पुढील सुंदर लेखनास शुभेच्छा 💐

सध्याचे संगणक,  मोबाईल आणि विविध अॅप यांचे ,यानिमित्ताने विशेष आभार की प्रत्यक्षात आमचे हस्ताक्षर कसे आहे याचा थांग पत्ता ते लागू देत नाहीत, पत्र लेखन तर आता इतिहासजमाच आहे.

तरी यदाकदाचित आमचे हस्ताक्षर पहाण्याचा कुणाला योग आलाच तर मंडळी एक गोष्ट आधीच सांगतो

मोठ्या लोकांचे हस्ताक्षर हे वाईटच असते बरं ! 🤗

📝२३/०१/२०२०
अमोल
poetrymazi.blogspot.in

Saturday, January 11, 2020


दत्ता डावजेकर यांनी संगीत दिलेले आणि जयवंत कुलकर्णी यांनी स्वरबध्द केलेले एक गाणे आज उगाचच आठवत आहे

मुळ गाणे: वाट संपता संपेना, कुणी वाटेत भेटेना, इथे आलो असा कसा, कुणी काहीच सांगेना

आम्हाला ऐकू आलेले गाणे 🙉

'खातं' मिळता मिळेना
कुणी 'खायला' देईना
इथे आलो तरी कसा
महा- विकास होईना.

खातं' मिळता मिळेना...

लांब आता पाच वर्षे
वाट वाकडीतोकडी
दूर दूर बांद-यात
एक दिसते 'मातोश्री'
तिघे येती जुळवती
कुणी 'पद' ही देईना

खातं' मिळता मिळेना...

दिसे प्रकाश अंधुक
मंत्रा लयाचा कंदिल
अंतर काही मैलाचे
आता गाठीन मंझील
जवळचा 'बंगला' नसे
काय करावे कळेना

खातं' मिळता मिळेना
कुणी 'खायला' देईना
इथे आलो तरी कसा
महा- विकास होईना.

📝अमोल
०४/०१/२०२०
poetrymazi.blogspot.in

Wednesday, January 8, 2020

पाऊले चालती


देशातील काही मूर्ख अप्सरांसाठी

पाऊले चालती JNU ची वाट
'देश एकतेची' तोडूनिया गाठ

पाहूनिया भारी, नाट्य अप्सरेचे
राहिली रिकामी थेटरची सिट
पाऊले चालती.  ..

आप्त इष्ट सारे,  बाॅलीवूड तारे
पाहुनिया सारे जाती पाठोपाठ
पाऊले चालती.  ..

येता शिणेमा मूर्ख अप्सरांचा
"छपाक" विचारांचा व्हावा नायनाट

पाऊले चालती JNU ची वाट

📝९/१/२०२०
अमोल
poetrymazi.blogspot.in

Sunday, January 5, 2020

खेळ मांडला


📝 खेळ मांडला
🏇🏻🤺🤾‍♀/ 🎲♟🐍

मंडळी नमस्कार 🙏🏻

नवीन २०२० वर्षातला हा पहिला रविवार. तर आजच्या या पहिल्या रविवारी मुलांबरोबर सकाळी सकाळी जाऊन लहान मुलांचाच एक सिनेमा पाहिला

  ' जुमानजी द नेक्स्ट लेवल '

सिनेमा हिंदीत होता पण मुळ कल्पना (सिनेमा )अर्थातच बाहेरची( परदेशातली)

काय म्हणजे कुठल्या लेवल पर्यत हे कल्पना करु  शकतात हे पाहून अचंबीत व्हायला झाले. नाही म्हणजे लहान मुलांचा सिनेमा म्हणजे आपल्याकडे एक तर पौराणिक काळातील राम - कृष्ण- गणेश फार तर ज्ञानेश्वर- तुकाराम ,  इतिहासातील बाल शिवाजी, संभाजी किंवा फारच कल्पना  करायची झाल्यास  राजा-राणी,  जादुगार, राक्षस/ चेटकीण.  या पलिकडे आपण ( म्हणजे आपली सध्याची वय वर्षे  ४० आणि त्या पुढची पिढी) तरी कधी गेलो नाही.

पण सध्याचा जमानाच वेगळा आहे. लहान पणा पासूनच मुलांच्या हातात संगणक/ मोबाईल आलेत. आजकाल मुलांचा 'घरचा अभ्यास ' ही पालकांच्या मोबाईलवर येतो, वर्गातील मुलांच्या पालकांचे व्हाटसप ग्रुप आहेत. मोबाईल/ संगणकातील खेळ ( गेम)  हे ही अगदी सवयीचे झाले आहे. किंबहुना तो जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत. त्याच्या  अती आहारी जाणे, अनेक खेळातील लेवल्स पार करता करता  अपघात होणे, आत्महत्त्या करण्यापर्यत मजल गेल्याच्या बातम्या आपण ऐकल्या आहेत वाचल्या आहेत.

या मोबाईल / संगणकातील गेम्सच्या वेडापाई काही मित्र मैत्रिणी त्या गेम मध्येच त्यातील एक कॅरेक्टर बनून जातात, वेगवेगळ्या लेवल्स, प्रत्येकाला मिळालेल्या ३ लाईफ लाईन्स , या प्रकारात घरातील एक अजोबा व त्यांचे मित्र ही या मुलांबरोबर गेम मधे एक कॅरॅक्टर बनून ओढले जाणे, यात मदतीला येणारे  हेल्पर्स , ड्रामा, कोडी सोडवणे ( सुता वरुन स्वर्ग गाठणे)  वृध्द मित्रांची पुर्वीची भांडणे , गेम खेळताना एकमेकांना मदत करताना  त्यांना होणारा पश्चात्ताप, आणि परत गेम जिंकून सगळ्यांचे मुळ रुपात परत येणे असा फूल टाईम पास सिनेमा आहे.

आपल्या ही सिनेमाची थीमच भन्नाट वाटली.

म्हणजे असं की तुम्हाला रोड रॅश खेळ खेळायचा आहे तर तो संगणकावर किंवा मोबाईल वर न खेळता आपण स्वत: त्या दुनियेत जायचे, मॅप निवडायचा, बाईक, इंजीन, हेल्मेट सगळं आपण ठरवायच आणि प्रत्यक्षात रेसला उतरायचे,  हिरवा दिवा लागला की
 धू ssम ..🏍
(आता "रोड रॅश" च का तर या गेमच्या पुढे आम्ही कधी पोहचलोच नाही😬)

भारीच ना?  आता तुम्हाला कुणाचा गेम आपलं कुठला गेम खेळायला आवडेल हे तुम्हीच ठरवा. 🙂

 पण एक विचार मनात आला
आज आपल्या पालकांना जर विचारले ही थीम घेऊन तुम्हाला कुठला खेळ स्वत: खेळायला आवडेल तर ते म्हणतील एक तर ते मोबाईल संगणकावर  कधी खेळले नाहीत. विरंगुळा म्हणून त्यांनी सह कुटुंब साप-शिडी वगैरे मर्यादित  खेळ खेळले असण्याचीच शक्यता जास्त. आता त्यांना सांगितलं जर त्यातली एका रंगाची सोंगटी बनून तुम्ही स्वत : तिथे जायचे,  जसे फासे पडतील तसं शिडी चढत जायचं,  सापाने गिळलं तर परत खाली यायचं तर त्यांनी जरा आवाज चढवूनच  सांगितलं असतं की मग इतकेदिवस या आयुष्याच्या पटावर काय करत आलोय? सापशिडी, व्यापार डाव,  बुध्दीबळ, अगदी बदाम सात यातल्या युक्त्या आयुष्याचा खेळ खेळताना मदतीला आल्याच की. मग कशाला हे अभासी जगात रमून स्वतःचे समाधान करणे?

मंडळी, किती वास्तवादी होते ते खेळ आजच्या व्हर्चयूअल खेळां पेक्षा.मोबाईल वरचा एखादा खेळ खेळतोय आपण अशी कल्पना करुन आपण सिनेमा काढू शकतो फार तर तास- दोन तासाचा
पण इथं आपल्या मागच्या पिढीचं आयुष्य गेलं हे सगळे खेळ प्रत्यक्ष खेळून ' आपला खेळ रंगवण्यात '

#खेळ मांडला ♟🎲🐍🏍🤺🤾‍♀🏇🏻

📝५/१/२०२०
poetrymazi.blogspot.in📝 खेळ मांडला
🏇🏻🤺🤾‍♀/ 🎲♟🐍


Related Posts Plugin for WordPress, Blogger...