नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Thursday, January 16, 2025

माझी फुसकुंडी


 


Tuesday, January 14, 2025

गोड बोलायाचे आहे पण.



 मकर संक्रांत स्पेशल ( कुसुमाग्रजांची माफी मागून)


'गोड'  बोलायाचे आहे पण बोलणार नाही

समोरच्या ताटातले 'लाडू' मोजणार नाही


माझ्या अंंतरात गंध 'गुळपोळीचा' दाटे

पण जिभेला तुपाची सवय सुटणार नाही


वाटीतल्या 'तीळ-गूळाचे' मला गवसले गुज

परि 'हलव्याचे काटे' मला टोचणार नाही


वडी तिळाची एकटी, दिसे तिथेच कडेला

होणे गायब कोणाला तिचे कळणार नाही


दूर पूर्वेकडे दिसे एक गाव पुणेरी

त्याचा दोष बोलण्याचा,कधी लाभणार नाही 


माझ्या फुसकुंडीने झालो टवाळखोर जनी

त्याच्या गोडव्याचा कधी, रसभंग होणार नाही


'तीळगूळ घ्या गोड बोला'


#माझी_फुसकुंडी

#माझी_टवाळखोरी 

#मकर_संक्रांत

१४/०१/२५ 📝

Saturday, January 11, 2025

माझी फुसकुंडी


 


Sunday, January 5, 2025

नववर्षाची_सुगंधीसंध्या


#नववर्षाची_सुगंधीसंध्या 🎼🎤

( आमची नववर्षातील पहिली फुसकुंडी)



काल पनवेलला वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महेश काळेंच्या या कार्यक्रमाला जायचा योग आला. जुने पनवेल इथे हे नाट्यगृह आहे. या नाट्यगृहात पोहोचल्यावर,विष्णुदास भावे नाट्यगृह आणि सांगली आठवली. जुने पनवेलचे वातावरण, परिसर ,रसिक प्रेक्षक अशा अनेक गोष्टीत साम्य वाटलं.

वर्षातील पहिल्याच विकेंडला शास्त्रीय +उपशास्त्रीय मैफिली साठी भरलेले नाट्यगृह पाहून काळे बुवा ही खुष झाले आणि उपस्थितांचे अभिनंदन करुन 'बंदिश' सुरु केली.

गाणे सादर करता करता बुवा प्रेक्षकांशी संवाद साधत होते. असंच बोलताना ते म्हणाले की हा जो मागे तंबो-यावर मला साथ देत आहे तो तुमच्या पनवेलचा आहे बरं! दहावी पासून सुरु केलाय रियाज आणि आज तो केमिकल इंजिनिअरींगच्या दुस-या वर्षाला आहे. हे ऐकून क्षणभर अंगावर रोमांच आले.

हर्षा भोगले पासून अमोल केळकर पर्यंत वाया गेलेल्या केमिकल इंजिनिअर्स मधे दोन वर्षांनी अजून एकाची भर पडणार असा विचार मनात आला. कदाचित हा विचार बरोबर नसेल माझा पण काळे बुवांना साथ देणारा गायक नंतर लोटे-परशुराम मधील एका केमिकल कंपनीत कन्ट्रोल रुम मधे बसून कुलींग टाॅवरचा व्हाॅल चालू-बंद करतोय, प्रेशर व्हेसल मधील तापमान सेट करतोय वगैरे विचार त्याक्षणी तरी मला एकदम चुकीचे वाटले.

मनातली ही रिअँक्शन इतकी पुढे गेली की बुवांच्या मागे जो मोठ्ठा फलक लावला होता ( वरच्या चित्रात बघू शकाल) त्यातील. 'पांढरे ढग' हे केमिकल कंपनीतून बाहेर पडणारे विषारी वायू वाटू लागले आणि तंबोऱ्याची सावली ही चेंबूरच्या RCF कंपनीतील युरिया टाँवर वाटू लागला ( बघा परत एकदा चित्र)

अर्थात सुदैवाने काळे बुवांमुळे वेळीच ही रिअँक्शन थांबली जेंव्हा त्यांनी तंबो-याला " नादब्रह्म " हा शब्द सांगितला.  ( इतके दिवस नादब्रह्न म्हणजे इडली हेच आम्ही समजत होतो) आणि पुढच्या इतर बंदिशींची, नाट्यसंगीत,सुगम,भावगीतांच्या कँटेलिस्टने आम्ही वेळीच 'नाद'ब्रह्माच्या केमिस्ट्रीत तल्लीन झालो.

दोन - अडीच तासाची मैफिल संपली आणि पडदा पडत असताना प्रेक्षकां मधून आवाज आला ' कानडा राजा पंढरीचा '

प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रम संपल्या नंतर परत ७ मिनीटे जे काळे बुवा गायले तिथेच आमचे पैसे वसूल झाले.

काळेंनी मैफिलीत जे एक गाणे ऐकवले तेच जरा वेगळ्या शब्दात


'जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले

गोड गाणे ऐकले, महेशाचे


( संगीत प्रेमी)  अमोल

६/०१/२५


ता.क : ज्यांची आयुष्यात गाणं शिकायची इच्छा अपूर्ण राहिली असेल त्यांनी महेश काळेंच्या कार्यक्रमाला जावे, निम्मा वेळ ते प्रेक्षकांना गाणे शिकवण्यात घालवतात. आयोजकांनाही विनंती की त्यांनीही बुकिंग साईट वर उल्लेख करावा की एवढे जास्त तिकीट हे गाणे ऐकणे+ शिकणे याचे आहे.


म्हणजे आमच्या सारख्या फक्त गाणे ऐकायला इच्छुक असणाऱ्या रसिकांचा भ्रमनिरास होणार नाही 😉

Saturday, December 7, 2024

माझी_फुसकुंडी


 गेले नाही दिवस सोशल मिडीयावर एका चित्रावरून बरीच चर्चा वाचली. अनेकांनी ते चित्र पाहिले असेल, लेख वाचले असतील,  अनेकांनी चॅनेलवर ती बातमी पाहिलीही असेल


तर सचिन आणि विनोद या खास मित्रांची,त्यांच्या आचरेकर सरांच्या स्मृतीस्थळा निमित्य  कार्यक्रमात झालेली भेट हा विषय.


अनेकांच्या दृष्टिकोनातून सचिन त्याच्या करिअर मधे  एकदम यशस्वी 

तर विनोद एकदम दुसरं टोक


त्यावर अनेकांनी सांगितलेले/ लिहिलेले  तत्वज्ञान. तर मंडळी माझ्याकडून त्यात ४ आणे ची भर


तुमच्या आयुष्यात तुमच्या क्षेत्रात/ जीवनात,  विनोद सारखे आयुष्य नको ( शेवटी प्राक्तन)


सचिनसारखे यशस्वी आयुष्य मिळावे या शुभेच्छा ( हे ही सहजा सहजी शक्य नाही, हजारात एखाद्याला सचिन बनता येते, इथेही शेवटी नशीब)


तर मंडळी यातील मधला दुवा बनणे जे जवळ जवळ सगळ्यांना शक्य आहे आणि ती फ्रेम आपण मिस करतोय ( बातम्यात दिसलीय)  ते म्हणजे ना विनोद, ना सचिन

आपण आयुष्यात 'प्रवीण आम्रे ' तर नक्कीच बनू शकतो.😁

म्हणलं तर


यशस्वी, म्हणलं तर नाही . फारशी चर्चा नाही. पण त्या फ्रेम मधे उपस्थिती नक्की


करा विचार तुम्ही कोण?


माझी_फुसकुंडी🔥

०८/१२/२४

Tuesday, November 12, 2024

बॅगा उघडून कळले सारे, बॅगाच्या आत-मधले


 प्रासंगिक * :-


प्रत्येक निवडणुकीत अशी एखादी संधी मिळतच असते 

( मुळ गाणे- शब्दावाचून कळले सारे) 


बॅगा उघडून कळले सारे, बॅगाच्या आत-मधले

प्रथम तुला अडविले आणिक रडू-रडू ते घडले


'अर्थ'  नवा 'नेत्यास' मिळाला

छंद नवा ताल निराळा

त्या दिवशी का प्रथमच माझे 'हेली पॅड' गडगडले 🚁


बॅगा उघडून कळले सारे, बॅगाच्या आत-मधले


आठवते इलेक्शनच्या रात्री 

लक्ष - कोटी मिळतात खात्री

पेटीत तुझिया या सुत्राचे रहस्य ना उलगडले 


बॅगा उघडून कळले सारे, बॅगाच्या आत-मधले


#माझी_टवाळखोरी 📝

१३/११/२४


( * मनोरंजन हा हेतू)

Sunday, October 20, 2024

ताराबाई भवाळकर आणि माझी टवाळखोरी


 

ताराबाई भवाळकर आणि माझी_टवाळखोरी 📝


मी ११- १२ वीत असताना ( १९९२-१९९३ ) आईच्या एका पुस्तकाचे प्रकाशन ( पुस्तकाचे नाव बहुतेक: कृष्णस्पर्श)  नेमिनाथ नगरला झाले होते, ताराबाई भवाळकर अध्यक्ष होत्या. त्यावेळी पहिल्यांदाच त्यांना  पाहिले होते.

या कार्यक्रमात शेवटी होणारे आभार प्रदर्शनाचे काम मी केले होते.


त्यानंतर..

२०१७ साली आईच्या 'मृगजळाकाठी' या  कविता संग्रहाचे प्रकाशन सांगलीला ताराबाई भवाळकर यांच्या हस्ते मथुराबाई गरवारे महाविद्यालयात झाले.

या कार्यक्रमात ही आभार प्रदर्शन मी केले होते.


पहिल्या आणि दुस-या कार्यक्रमात फरक इतकाच होता की दुस-या कार्यक्रमावेळी माझी सांगली स्टेशनला हुबळी-दादर रेल्वे चुकू नये म्हणून 'आभार प्रदर्शन' सगळ्यात आधी केले गेले आणि मग मुख्य कार्यक्रम झाला होता 


माझी_टवाळखोरी पुस्तक प्रत्यक्ष भवाळकर बाईंना त्यांच्या घरी जाऊन देण्याच्या काही वर्ष आधीच त्यांना टवाळखोरीची चुणूक मी दाखवली होती. 🤪


अर्थात यापुढे लिखाण होईल न होईल पण ताराबाई भवाळकरांचे आशीर्वाद मिळाले हे मी माझं भाग्यच समजतो


#माझी_टवाळखोरी 📝

संकष्टी चतुर्थी

२०/१०/२४

Tuesday, October 15, 2024

कोजागिरी


 ' मी परत येईन, मी परत येईन '

म्हणायची, 

चंद्रावर नको येऊ दे वेळ...!


परतीच्या पावसाच्या ढगांचा 

आज तरी लवकर संपू दे खेळ...!


#माझी_टवाळखोरी 📝 अनुदिनी कडून आजच्या कोजागिरी पोर्णीमेच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐


१६/१०/२४

टोल माफी


 अत्यंत आनंदाने आज हलके वाहन घेऊन आँफीस ला निघालोय


  अर्ध्या वाटेवर आल्यावर लक्षात आले, अरे आपल्या मार्गात तर 'टोल नाकाच' नाही 😁



#ठाणे_बेलापूर रोड 

#माझी_टवाळखोरी 📝

१५/१०/२४

Wednesday, October 2, 2024

उत्सव


 प्रत्येक गावाची उत्सव साजरी करण्याची एक पध्दत तयार होत असते आणि ती त्या गावालाच शोभून दिसते.


इतर शहरं काॅपी  करतात, आणि जमलं नाही की मग  x$%#&  देत बसतात


 

#डाॅल्बी

#ढोल_ताशा

#लेझीम

#प्रभात_फेरी

#जत्रा

#भंडारा

#दुर्गा_माता_दौड


#नव_रंग


०३/१०/२४ 📝

poetrymazi.blogspot.com

Tuesday, September 24, 2024

नवसाचा_लेख


 नवसाचा_लेख 


न.मा.न २ बद्दल थोडंसं. तर मंडळी न.मा.न १ हा तुमचा आवडता सिनेमा होता म्हणून जर तुम्ही सिनेमाला जाणार असाल तर जरा

द.मा.न च घ्या


न.मा.न १ ची जशी प्रत्येक फ्रेम खिळवून ठेवते तसं  २ मधे वाटत नाही.

१ बघताना  मुंबई -गणपतीपुळे एशीयाडचे आपण प्रवासी आहोत इतकं वास्तव चित्रण होतं, तसा भास होण्यास २ थोडा अपयशी ठरतो.

दादर हून रत्नागिरी कडे जाणारी कोणती रेल्वे इतकी मोकळी असते ओ 🤷‍♂️, डब्यात आत सहज फिरता येतं? 

एरवी प्रवाश्यांपेक्षा दुप्पट संख्येने फेरीवाले असतात, इकडे फक्त चहा-कॉफी सूपवाला? 

क्राॅसिंग हा या प्रवासाचा अविभाज्य घटक असताना ही अशी कोणती गाडी होती जी सुसाट धावते? कोकणी माणसाला हे पचणे शक्यच नाही.

कोकण रेल्वेच्या डब्यात 'तिकीट चेकर' असतो? 

बसण्याच्या सिट्स सोडून तिथेच खाली बसलेले ,दरवाजात बसलेले प्रवासीच नाहीत? 

दादर- पनवेल-खेड- रत्नागिरी या स्थानकावर गाडी थांबली असताना एक ही वडा-पाव विक्रेता नाही?


 कसं शक्य आहे हे?


नाही म्हणलं तरी 'पनवेल' स्टेशन वर डब्याचे दार उघडले जात नसल्याने वैतागलेला प्रवासी,  शौचालयातून दोन वेळा एकदम ३-३ प्रवासी एकत्र बाहेर येणे हे चित्रण त्यातल्या त्यात 'कोकण रेल्वे' प्रवासास धरून आहे असं म्हणता येईल.


 बस मधून प्रवास करताना कोकणाचा जो निसर्ग अनुभवता येतो त्याच्यापेक्षा किती तरी पटीने जास्त चांगले निसर्ग सौंदर्य हे प्रत्यक्ष कोकण रेल्वे रुट वर आहे असं मला वाटतं. पण फक्त अधून मधून ड्रोन मधून काही सेकंद  धावणारी रेल्वे दाखवून 'उकडीच्या मोदकाची' भूक, तळलेल्या मोदकावर भागवली आहे असे म्हणता येईल. समांतर धावणारा मुंबई - गोवा महामार्ग हा ही या प्रवासाचा एक घटक असतोच असतो. ती फ्रेम ही मिस झालीय.

( ५० खोक्यांचा ओझरता उल्लेख आला,  आता आणखी गोवा हायवेची खपली कशाला काढायची असा सूज्ञ विचार झाला असण्याची शक्यता 😊)

तर मंडळी महागुरु सचिन आणि मराठी सिनेसृष्टीचा 'अनिल कपूर' म्हणजेच 'स्वप्नील जोशी ' ही प्रत्यक्षात भावा-भावांची वाटणारी जोडी , सासरेबुवा - जावई म्हणून कशी वाटते हे मात्र आम्हाला बिलकुल सांगता येणार नाही, त्यामानाने आई-मुलगी-सासू त्रिकूट फ्रेश वाटलं


अशोक मामा मात्र सुपर डुपर हिट ✌🏻

( यांच्या फॅन्सनी सिनेमा चुकवू नये)


नवसाचं ही एक क्राॅस कनेक्शन दाखवलयं म्हणजे पुळ्याच्या गणपतीचा  नवस फेडला जावा म्हणून इकडे सिध्दिविनायकाला साकडे घातले जाते आणि त्याचाही  कौल मिळतो. हा प्रकार जाम आवडला

'आणि म्हणून'  याच धर्तीवर. 'मंथ एन्ड' ची गडबड संपल्यावर आम्ही 'इच्छापूर्ती वरदविनायका' कडे जाऊन नवस बोलणार आहोत की

आम्हाला ही आयुष्यात एकदा तरी आमच्या कुलदैवताला दर्शनाला कोकण रेल्वेने जाताना ' न.मा.न.२' मधे दाखविल्याप्रमाणे निवांत रेल्वे प्रवास होऊ दे. मग महड ला येऊन

 ' गणेश यज्ञ'  करु


अवांतर: ज्यांचा विश्वास आहे त्यांनी अवश्य नवस करावेत, इच्छा पूर्ण झाल्यावर फेडावेत. पण नवस फेडण्याची प्रक्रिया  पूर्ण कपडे घालून ही करता येते हे एक ज्योतिष अभ्यासक म्हणून आवर्जून सांगेन.


चला ना, चला ना,  चला ( आला) वेन्सडे....


#नवसाचा_लेख_टवाळखोरीही_नवसाची 📝

२५/०९/२४

Monday, September 23, 2024

कलियुग


 घोर कलियुगात आहोत आपण


२ -या स्त्री नंतर


आता


( नवसाचा ) नवरा पण २ रा


 🙆‍♂️


२४/०९/२४ 📝

#माझी_टवाळखोरी

Saturday, September 7, 2024

खड्डा रस्त्यात माझ्या मायेन


 गुरुवारचे आमचे आवडते गाणे

'दत्त दर्शनाला जायाचं जायाचं, आनंद पोटात माझ्या मायेना'


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जरा बदलून

 ( आणि गणेश-दत्तात्रयांची माफी मागून 🙏🙏)


होळी गणपतीला कोकणात

जायाचं जायाचं

( आता लगीचं काय?  लगीच लगीच)

होळी गणपतीला कोकणात जायाचं

( काय आच-याला? )

*खड्डा रस्त्यात माझ्या*

( वैभववाडी?  )

*खड्डा रस्त्यात माझ्या*

( सावंतवाडी राहिलीये )

*खड्डा रस्त्यात माझ्या*

( अरे पनवेल ते सिंधुदूर्ग सगळीकडेच जायचयं)


होळी गणपतीला कोकणात

जायाचं जायाचं

(पण)

*खड्डा रस्त्यात माझ्या मायेना मायेना*


गेलो पोलिस स्टेशन थेट घेतली इन्स्पेक्टरची भेट

या या गाडीला , या या गाडीला

टोल नको लावूना

खड्डा रस्त्यात माझ्या मायेना


'कोकण' सावळं सुंदर गोजिरवाणं मनोहर

गावा-गावातील ट्रॅफिक काही हटेना

खड्डा रस्त्यात माझ्या मायेना


नजरबंदीचा हा खेळ खेळे पुढारी प्रेमळ

खेळ खेळीता 'हाय-वे' पुरा होईना

खड्डा रस्त्यात माझ्या मायेना


भक्तीवान चाकरमानी, घरी जाण्या दंग

त्याची उत्सवाची हौस पुरी होईना

खड्डा रस्त्यात माझ्या मायेना


सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. मुंबई - गोवा महामार्ग लवकरात लवकर चांगला बनो ही सुबुध्दी राजकारण्यांना मिळो हीच गणपती चरणी प्रार्थना 💐


#माझी_टवाळखोरी 📝

भाद्रपद शु द्वितीया 

गुरुवार, ५/०९/२४

Friday, August 30, 2024

माफी


 कशाचीच नसती गॅरंटी

चुकलं तर मागायची माफी

' अब की बार ', मेरे मित्रों,

यही ' मंत्र' है  काफी 


३१/०८/२४ 📝

Tuesday, August 27, 2024

गोविंदा




 दही-हंडीच्या उत्सवात

गौतमी -अन् राधा...

कसा होणार सांगा

कार्यक्रम अगदी साधा...


थरावर थर लावत

'आला आला गोविंदा'

सब घोडे- बारा टक्के

कधीच लिहून गेलेत विं.दा.


#माझी_टवाळखोरी 📝

२७/०८/२४

Poetrymazi.blogspot.com

Monday, August 26, 2024

दही-हंडी


 बालकवी आणि इतर सर्व संबंधित घटकांची क्षमा मागून



मुंबई-वासी हर्ष मानसी

हंडी दिसे चोहीकडे

क्षणात येते मंडळ इकडे

क्षणात सलामी दुसरीकडे


वरती बघता मोठ्या क्रेनने हंडी उंचवून ठेवी असे

मंगळ-वारी सिने तारका नृत्यकरुनी बघा हसे


'भावी' आता 'आमदारांच्या' ,अनंत 'दही-हंडी' पहा

सर्व चौकांमधे दिसले त्यांचे,बक्षिसांचे 'फलक-महा"


तडफड करूनी डोलारे आपुले,बघा गोविंदा सावरती

धावुनी वाहिन्या बातमी घेऊनी, निज-बाळांना दाखवती


'संकल्प' करुनी 'सार्थकतेचा 'जय जवान' सरसावला 

'संस्कृती' जपूनी उत्सवाची,  हर्ष मनीचा वाढविला


#माझी_टवाळखोरी तर्फे दहीहंडी ते महाराष्ट्र नवीन मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यापर्यंतच्या सर्व उत्सवास शुभेच्छा 💐📝


#गोकुळाष्टमी

२६/०८/२०२४

Wednesday, August 7, 2024

माझी_टवाळखोरी


 


Friday, August 2, 2024

हार कर भी जीत ने वाले को बाजीगर कहते है'


 

सोशल मिडियावरच कुठं तरी वाचलेलं की नंबर १ पटकावलेला लक्षात राहतो, नंबर २ वर कोण आहे हे कोणी लक्षात ठेवत नाही.

आपल्याकडे ही म्हणतात

'जो जिता वही सिकंदर ' वगैरे वगैरे.


मंडळी, चित्रातील या टर्किश अर्जुनाने आपल्या 'अँटिट्यूड' ने ( मराठी शब्द रोखठोक वागणूक? ? )  वरती जे लिहिले आहे ते अगदी खोटं पाडलं आहे. पॅरिस आँलिम्पिक मधे त्याने पदक जिंकलेल्या प्रकारात नंबर १ वर कोण आहे या पेक्षा सध्या सोशल मिडीयावर नंबर २ वर आलेल्या याचीच जास्त चर्चा आहे. 

साला ,भाव खावा तर असा !


मला वाटतं तो हिंदी सिनेमांचा भक्त असावा आणि मिथूनदा, रजनीकांत यांचे सिनेमे पाहूनच त्याने एवढी 'सहजता' मिळवली असणार आहे अशा पध्दतीने गोळ्या मारण्यात


एखाद्या समुहाची मैफिल जमलीयं, गाणं म्हणणा-या मित्र - मैत्रिणीला गाण्याची फर्माइश झाल्यावर कुठल्याही वाद्यांची साथ, माईक , नोटेशन वगैरे नसताना 'प्रोफेशनल सिंगरला' लाजवेल असं गाणं त्याच्या/ तिच्याकडून सादर होणं अगदी असंच हे घडलयं


अशीच काहीजण व्हाट्सप ग्रुप / फेसबुकवर वर असतात,  कधीतरी एकदाच येऊन अखादीच गोळी योग्य ठिकाणी  मारून जातात आणि लाईक, कमेंटचा ढिग पडतो. 


" एरवी उगाच रोजचं AK47 घेऊन ठो,ठो,ठो ठो करणा-यांकडे  कुणाचं लक्षही नसतं फारसं " 


असो,  थोडक्यात सांगायचे झाले तर

'हार कर भी  जीत ने वाले को बाजीगर कहते है' हा संवाद ' जो जिता वही सिकंदर'  पेक्षा सध्या तरी भारी ठरलाय 🎯


#माझी_टवाळखोरी 📝

०३/०८/२४

आषाढ कृ. चतुर्दशी

poetrymazi.blogspot.com

Tuesday, July 23, 2024

नोकरदार भुलला


 ज्ञानेश्वर माऊलींची माफी मागून, निर्मलादेवी चरणी अर्पण 

🙏🌸


नोकरदार भुलला

नोकरदार भुलला

टँक्स मोजिता करु,खुळीयासी झाला


नोकरदार भुलला

नोकरदार भुलला


इतुकेसे स्लँब, फेकियले स्वारी

तयाचा भरणा, गेला गगनावरी


नोकरदार भुलला

नोकरदार भुलला


पगाराची पुंजी,गुंतविला झोला

माय 'निर्मलादेवीवरी' इन्क्कम अर्पिला


नोकरदार भुलला

नोकरदार भुलला


आषाढी संकष्टी चतुर्थी

२४/०७/२४

#माझी_टवाळखोरी 📝

Friday, July 19, 2024

क्लाऊड' चुकीचा ठरतो


 

मुळ कविता ; पाऊस कधीचा पडतो


विडंबन :- अर्थात #माझी_टवाळखोरी  📝 

( कवी ग्रेस यांना स्मरून 🙏)


'क्लाऊड' चुकीचा ठरतो

'मायक्रोची' फेल बटणे 

बोंबाबोब 'हार्ड' झाली

'विंडोजच्या' निळ्या धुराने


डोळ्यात उतरले पाणी

'सर्व्हरचे' डोके फिरती

'आय-टी' चा चढला पारा

आज आपुल्या  धरणीवरती


'रिस्टार्ट' कसे होईना?

'सिस्टीम' वर पडला घाला

सा-यांचा जमिनीवरती

प्रवास असा अडखडला


संदिग्ध 'प्रोग्रँम'च्या ओळी

'बायनेरी' कोड सारा

अशाच घटनांवरती

शनीचा वक्री पहारा


शनिवार

आषाढ शु.चतुर्दशी

२०/७/२४


#माझी_टवाळखोरी 📝

Related Posts Plugin for WordPress, Blogger...