नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, April 6, 2020

घाटातली वाट


घाटातील वाट

घाटातली वाट,
काय तिचा थाट !
मुरकते, गिरकते,
लवते पाठोपाठ ।।

निळी-निळी परडी,
कोणी केली पालथी ?
पानं फुलं सांडली,
वर आणि खालती ।।

खाली खोल दरी,
वर उंच कडा,
भला मोठा नाग, जणू
उभा काढून फडा ।।

भिऊ नका कोणी,
पाखरांची गाणी,
सोबतीला गात गात,
खळाळतं पाणी ।।

घाटातली वाट,
काय तिचा थाट !
गाणी म्हणू, टाळ्या पिटू,
जाऊ रुबाबात ।।


आठवतीय ही बालभारती मधील कविता? घाटाचं वर्णन इतक छान केलय की कुठल्याही घाटातून जाताना ही लहानपणीची  कविता आठवतेच. तुमचा आहे एखादा आवडीचा घाट?  अंबोली, राधानगरी, गगनबावडा,  अंबा, कुंभार्ली, पसरणी, पोलादपूर, परशूराम, कशेळी, खंबाटगी?  असेलच ना एखादा?

माझाही एक आहे. वर जे चित्र बघताय ना तोच घाट. . रस्ता आणि रेल्वे कुठल्याही मार्गाने गेलात तरी हा घाट मुंबई - पुणे- मुंबई प्रवासात लागतोच. म्हणूनच मी याला   'घाटांचा राजा' म्हणतो.
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांग तूला दिसतो कसा,  खंडाळ्याचो घाट अशा वर्णनाचं गाणंही चित्रित केले आहे. हे गाणे जरी 'झुकझुक गाडी' साठी असलं तरी वरचे चित्र पाहून हे वर्णन रस्त्यासाठी ही किती समर्पक आहे याची जाणीव होते.

 चित्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा घाट ज्या पुणे-मुंबई मार्गावर आहे त्या मार्गाची अनभिषिक्त राणी म्हणजे 'शिवनेरी' चित्रात आहे आणि संपूर्ण मार्गाचे जे 'हृदय' आहे ते ठिकाण म्हणजे 'अमृतांजन पूल ' तिथला हा फोटो.

'अमृतांजन पूलाच्या' साधारण १०-१२ किमी च्या परिसराला मी मानवी ह्रदयाची उपमा देईन.  ह्रदय धडधडीत तर शरीर ठिक त्याप्रमाणे या ठिकाणच्या रहदारीचा दाब म्हणजे जणू संपूर्ण पुणे- मुंबई रस्त्याचा "रक्त दाब" . दर शुक्र/ शनि , लागून आलेल्या सुट्टया यावेळेला पुण्याकडे जाताना हा दाब वाढतो तर कुठल्याही रविवारी मुंबई कडे जाताना. मंडळी अतीशय गुंतागुंतीची रचना इथे पण आहे बर का !  जसा 'हार्ट' स्पेशालिस्ट गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करु शकतो तसाच या रस्त्याची इथ्यंभूत माहिती असणारा तज्ञ चालकच ( प्रती श्रीकृष्ण ) अगदी कुशलतेने यातून मार्ग काढू शकतो. यातील कुठले मार्ग बायपास करायचे, कुठला मार्ग पकडला तर कुठे ट्रॅफिक लागणार नाही, लोणावळ्याला जाऊन मलई चिक्की तर घ्यायची आहे पण एक्सप्रेस हायवे पण सोडायचा नाही, खोपोली मार्गे जून्या पुणे- मुंबई मार्गावरुन जायचं आहे, खोपोली गावात टाटा पाॅवर कडून जायच आहे. लोणावळ्यात नारायण धाम मंदिर, वॅक्स म्युझियम बघायचं आहे पण लोणावळा बायपास करायच आहे. दोन चाकी/ तीन चाकी साठी मुंबई कडे जाताना एक्सप्रेस वे कुठे सोडायचा?  तर पुण्याकडे जाताना कुठे सोडायचा? घाटात कुठल्या ठिकाणी अचुकतेने योग्य मार्गिकेवर गेल्याने जाम मधे अडकणार नाही.

मंडळी, आहे ना गुंतागुंत. म्हणूनच हे 'हृदय' आणि हाच 'घाटांचा राजा'.

पुण्यात गाडीत ( कुठल्याही)  बसल्यावर, कळंबोली आली की जागे होणाऱ्यांच्या गावीही नसेल ही गुंतागुंत.  अगदी पुणे-मुंबई नियमीत प्रवास करणाऱ्यां बहुतांशी जणांना हे वरचे चित्र कुठे घेतले आहे हे सांगता येणार नाही ( हे मी अगदी खात्रीने सांगू शकतो 😉)

 तर मंडळी  एवढं सगळं आठवायच कारण की
काल संध्याकाळी अचानक आमच्याच हृदयात कळ आली जेंव्हा एकाच वेळी अनेक ग्रुपवर ' १९० वर्षापूर्वी चा अमृतांजन पूल ' पाडल्याची बातमी एका व्हिडिओ सह आली.  कस शक्य आहे?  असा मनात पहिला प्रश्ण आला. अजूनही कुणी पक्क असं सांगू शकलेलं नाही. पण काही सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की लाॅकडाऊन मधे आपण सगळ्यांनी घरात साफसफाई केली, कपाट आवरले, खोल्या साफ केल्या. अगदी तसं या  पूलाचा अनावश्यक कचरा साफ केला गेला
*थोडक्यात 'पुणे-मुंबई रस्त्याच्या हृदयाची बायपास झाली आहे* पेशंट व्यवस्थित आहे. लवकरच पूर्ववत काम करु लागेल.

असेच होऊ दे रे मारुतीराया. परत पुण्याकडे जाताना अमृतांजन पूलाच्या अलीकडे मुंबई साईडला तू  आहेस तिथे मुद्दाम थांबून हार- नारळ अर्पण करुनच जाईन रे बाबा

 अमृतांजन पाॅईंट अनेक ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार. या पूलावर मुंबई हून पुण्याकडे जाणारी रेल्वे यायची , थांबवली जायची  मग इंजीन परत मागे लावून पुण्याकडे जायचे. तसेच आज रस्त्या रस्त्यावर गावागावातून मोठमोठाले बॅनर, होर्डींग जे आपण बघतो त्याची पहिली मुहूर्तमेढ घातली होती
'अमृतांजन कंपनीने ' या पूलावर पहिले बॅनर/ जहिरात लावून

तेंव्हापासून हा झाला 'अमृतांजन पाँईंट '.  आज मुंबई - पुणे मार्गावर प्रवासातील सगळ्यात डोकेदुखी ठरणारे ठिकाण हे अमृतांजन पाँईट असले तरी, डोकेदुखी  बायपास करुन का होईना तूझी उपस्थित आम्हाला पाहिजे आहे कारण तुझ्याशिवाय आमचे दिल धक धक कोण करणार?  ❤

भेटू लवकरच परत 🚗

#मुंबई_पुणे_मुंबई_व्हाया_अमृतांजन_पूल

📝अमोल
०६/०४/२०२०
poetrymazi.blogspot.in
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...