नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, April 1, 2020

गीतरामायण


पारायणापूर्वी------- 🙏🏻🌺

१ एप्रिल बद्दल कुणाला माहित नाही अशी व्यक्ती सापडणे जरा अवघडच. कारण 'फूल' होण्याचा 'आनंद' अगदी सगळ्यांनीच केंव्हा ना केंव्हा तरी घेतला असणार आहे. मग तो आनंद producer साईड ने असेल, Developer साईडने असेल किंवा client साईड ने असेल ( किंवा आजकाल forwarder साईडने असेल 😉).

तुम्ही कुठल्याही भूमिकेत असलात तरी 'चंमतग' तितकीच आली असणार. या एप्रील फूल चा इतिहास एव्हान इकडून तिकडून तुमच्या वाचनात आला असेल.

पण असाच एक इतिहास ६५ वर्षापूर्वी १ एप्रिल ला ( १९५५) आकाशवाणी पुणे केंद्राने घडवून आणला. या १ एप्रिल ला 'फूल'लेल्या गीतरामायण रुपी फूलांचा  गंध मराठी सृजनांच्या मनात आजही दरवळतोय.

निमित्य गदिमा आणि बाबूजींच्या "गीतरामायणाचे" प्रसारण

 योगायोगाने आज घरी पुस्तकरुपी गीतरामायण मिळाले ज्यात गीतरामायणातील सर्व गाणी, गाण्याच्या आधीच्या निवेदनासह आहेत. ३ आॅक्टोबर १९५७ ( विजयादशमी ,शके १८७९) प्रकाशीत झालेले हे पुस्तक याक्षणी माझ्या हातात आहे.  मूल्य २ रुपये.
( हे पाहिल्यावर तर '२ रुपये भी बहोत बडी चीज होती है बाबू' हा मराठी मालिकेतील एक संवाद किती सार्थ होता हे आता वाटते)

या पुस्तकाचे एक वैशिष्ठ्य म्हणजे या पुस्तकाला बा.भ.बोरकरांनी दिलेली प्रस्तावना. पारायणापूर्वी ....आणि गीतरामायण ..॥ अशा दोन मथळ्यात आहे

यातील काही निवडक मोती.

कविश्रेष्ठ रवींद्रनाथांनी म्हटल्याप्रमाणे रामायण ही खरोखरच भारताच्या मौलिक भावभावनांची भागिरथी आहे, आणि तिच्याच पुण्यसलिलाने त्याच्या मनोभूमीची मशागत शतकानुशतके अखंड होत राहिली आहे.
आपल्या मराठी मनाला तर रामरसायनचा ध्यासच आहे. या मराठीयेच्या क्षोणींत भोळ्या भाभड्या कुणबाऊ बाईपासून संतपंतांतील प्राज्ञविज्ञापर्यंत सा-यांनी ही एकच कथा नाना परींनी गायिली आहे, आणि त्याचमुळे उभ्या मराठी जीवनांत राम काठोकाठ भरुन राहिला आहे. रामाची मूर्ती आणि रामाची कीर्ती हाच मराठी चित्ताचा आणि प्रतिभेचा ध्यास आहे.

गीत रामायण

धार्मिकतेला पाठमो-या झालेल्या आजच्या ह्या गलक्याच्या काळांत देखील मराठी लोकमानसाचा हा युगानुयुगांचा ध्यास
 यत् किंचीतही कमी झालेला नाही याची जिवंत साक्ष या "गीत रामायणा" ने घवघवीतपणे देऊन चिकित्सक तर्कपंडीतांनाही चकित केले आहे.  आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन या 'गीतरामायणाचे' पहिले गीत सुरु झाल्यापासून आजतागायत याची लोकप्रियता कलेकलेने सारखी वाढतच राहिली.
या गीतरामायणाचा जेंव्हा मी मागोवा घेतो तेंव्हा मला म्हणावेसे वाटते की, या भाग्यशाली देशात ईश्वरच वारंवार अवतार घेतो असे नाही,तर त्यांचे चरित्र देखील युगधर्माला अनुकूल असा अवतार घेत असते.

कविश्री माडगूळकर आणि पुणे केंद्राचे उत्साही कार्यकर्ते श्री सीताकांत लाड सहज एका संध्याकाळी भेटतात काय,बोलता बोलता सहज 'गीतरामायणाची' कल्पना निघते काय, त्यातले स्वरसौंदर्य उलगडून दाखवायला श्री सुधीर फडक्यांसारख्या पट्टीच्या संगीत- नियोजकाची जोड मिळते काय, कामे करणारी आतली बाहेरची सारी माणसे एक दिलाने आणि नेमाने सारे यथासांग पार पाडतात काय आणि सगळा लहान मोठा मराठी लोकसमुदाय त्याचे असे गोड कौतुक करतो काय

सारेच विलक्षण ||
🙏🏻🌺

असे म्हणतात की काही प्रमुख धार्मिक ग्रंथ जसे रामायण, महाभारत,  ज्ञानेश्वरी इ इ आपल्याकडे असावेत आणि त्यांचे पारायण जरी केले नाही तरी त्यांच्या नुसत्या अस्तित्वाने पुण्य लाभते.

मला वाटते या वरच्या यादीत 'गीतरामायणाची' भर घालून उद्याच्या रामनवमीच्या पार्श्वभूमीवर थोडा पुण्यसंचय जोडावा म्हणतो.

 उद्याच्या गुरुपुष्यामृत योगावर ( रात्री ७ नंतर) आलेल्या रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा

श्रीराम 🙏🏻🌺

📝अमोल
०१/०४/२०२०
"देवा तुझ्या द्वारी आलो"
www.kelkaramol.blogspot.in
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...