नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Saturday, July 15, 2017

रविवारची टुकारगिरी


रविवारची टुकारगिरी📝

मंडळी नमस्कार 🙏🏼🌺
तुम्ही मुंबईत कधी बेस्ट ने प्रवास केला असेल तर त्या बसवर दारापाशी मोठा Q काढून  तिथे  लिहिलेले  पाहिले असेल  ' *रांगेचा फायदा सर्वाना* ' . आज रांग  हा विषय घेऊन रविवारची ही टूकारगिरी .
लहानपणापासून चा आपला प्रवास हा अनेक रांगेतून गेलेला आहे (  बाल्यावस्थेत अगदी रांगूनच  प्रत्येक जण सुरुवात करतो 😃)  पण जस जस   आपण मोठे होत जातो तस तस  ' रांगेची  चिडचिड  सर्वाना '   असं होऊन जात
आता आठवा बर तुम्ही रांगेत उभे आहात आणि तुमची चिडचिडीत केव्हा झालीय 
१)  लोकल तिकीटाची  रांग  - आपण ज्या रांगेत उभे तीच हळू जाणार
२) टोल  नाका  - इथे ही तसेच  ( additionally  बायको ने सांगितलेल्या रांगेत गाडी घेतली नसेल , एखादा  वाहनचालक मध्येय घुसत असताना आपण त्याला जागा करून देणे - हाय चिडचिड 😁  )
३) मुंबई - पुणे  रोडवरील - अमृतांजन पुलाजवळील जागा (  जिथे आपण ती रांग हळू )
४) शनिवारी रात्री ( मुख्यतः: पुण्य नगरीत ) हॉटेल मध्ये जाण्यासाठी करावे लागणारे वेटींग
५) मॉल मधे  बिल करताना  आपण ज्या रांगेत उभे आहोत ती रांग हळू  ( आता यावर काढलेला उपाय - मी बायको, मुलगी  तीन वेगवेगळ्या रांगेत उभे असतो , जो  बिल देयकापाशी लवकर पोचेल तिथे आपली ट्रॉली घेऊन जायची कसरत करायची , दुस-या रांगेतील मागच्यांना समजवायचे हो ही आमची मुलगी रांगेत उभी आहे  आमचाच नंबर आला आहे  इ इ .)

रांगेत आहोत, पुढे जात आहोत पण रांग थांबावी असं कधी वाटलंय? -
मुबंईत बोरीबंदर स्टेशनाच्या बाहेर जो बसस्टाँप आहेत तिथे सकाळी आपापल्या ठिकाणी कामावर जाणारे एका रांगेतच बस मध्ये चढतात . एक बस गेली की लगेच दुसरी बस तयार असते . अशा वेळी काही वेळा रांग थांबावी असं चक्क वाटत कारण जी बस उभी आहे त्यात ऑलरेडी खूप गर्दी झाली आहे , आता आपण गेलो तर उभारावे लागेल आणि या बसच्या मागे एक मस्त डबलडेकर उभी आहे. तेव्हा जाणारी रांग  थाबू दे  असे वाटण्याचा  विरुध्द्व अनुभव इथे घेता येतो

बाकी लहानपणी शाळेच्या मैदानात जाण्यासाठी, शाळेच्या सहलींमध्ये , ध्वजसंचलन करताना  , पहिला पगार काढण्यासाठी , मुलाच्या शाळेतील प्रवेशासाठी लावलेल्या रांगेने  चिडचिड झाली असे कुणालाच वाटणार नाही  . 
शेवटी कुठल्याही रांगेत उभारताना येणा-या रागाला एका अनुस्वारी टींबाने काबूत ठेवायचा प्रयत्न करायचा  मग ती  रांग  प्रत्येक वेळेला वेगळी रागदारी सादर करेल आणि मग 

थाबूंनी रांगेत सा-या, राग माझा संपला

टूकारगिरी आवडली का ते   नक्की कळवा इथे किंवा a.kelkar9@gmail.com या ईमेल आयडीवर
📝

Wednesday, July 12, 2017

अंदाज पावसाचा , वाटे खरा असावा


कवी- इलाही जमादार याची माफी मागून :-
( मूळ गझल :अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा, बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा )

अंदाज पावसाचा , वाटे  खरा असावा 
प्रत्येक दिवसाचा , तो वेगळा ठरावा 

आषाढ सरी  सुगंधी, भेटती  काळजाला
केलेत वेध  ज्याने, तो  शाळेत असावा

शेतावरी उतरली, स्वप्ने तहानलेली
ढगात  वेदनेचा, अग्नी - बाण शिरावा 

का आळ पावसावर, घेता तुम्ही चुकीचा?
की वाटले तुम्हाला, कमी दाब तो  असावा!

भेटून पावसाला, इतुके विचार आता
काबूत एवढाही, का, अंदाज नसावा

माथ्यावरी नभाचे, ओझे सदा "भलेही'
दाही दिशा सरींनी , तो , गुंतला  असावा

नाही अखेर कळले , नौका कशी बुडाली 
भयभीत फोटो सांगे  , तो सेल्फीश असावा 

संकल्पना : अमोल 

Monday, July 10, 2017

माझी टूकारगिरी




नमस्कार मंडळी ,

चला  दोस्तहो ब्रेकींग न्यूज वर बोलू काही 

ब्रेकींग न्यूज  हा प्रकार नक्की केव्हा पासून सुरु झाला हे आता आठवत नाही . पण सुरवातीला खरोखरच ब्रेकींग न्यूज ( विशेष घडलेली घटना )  असायच्या. आजकाल  प्रत्येक सेकंदाला प्रत्येक न्यूज चॅनेलवर  डावी कडून उजवीकडे किंवा व्हाईस व्हर्सा  सतत  वेगवेगळ्या बातम्या घेऊन धावणारी पट्टी अशीच ब्रेकींग न्यूजची व्याख्या करता येईल . वेगळ्या भाषेत सांगायचे तर  मी मी तुम्हाला पहिल्यादा सांगतोय  मी मी.  अशी  मी पणाची भावना यात असते . मग अशा परिस्थित्तीत  काहीना  सोशल मीडियावर ( फेसबुक, व्हाट्सअप )  अवेळी ' हे राम ' म्हणावे लागते हा या गोष्टीचा  झालेला दुष्परिणाम . शाळेत असताना  आपणास पूर्वी काही निबंध लिहायला लागायचे  विषय साधारण १) मृत्यू  शाप की वरदान  २)  बस स्थानकावर घालवलेला १ तास  इ इ .  आता  पुढील युगात असेही निबंधाचे बिषय असतील  १)  ब्रेकींग न्यूज शाप की  वरदान  २) सोशल  मिडीयावरचे माझे कालचे १२ तास  इ इ 
तर  थोडक्यात काय  सकाळचे  सात वाजून पाच मिनिटे झाली आहे ' सुधा  नरवणे ' प्रादेशिक बातम्या देत आहे किंवा आजच्या  ठळक बातम्या  हे आकाशवाणी आणि  दुरदर्शनाच्या  गोष्टी या ब्रेकींग न्यूजच्या  जमान्यात  इतिहासजमा झाल्यात असेच म्हणावे लागेल 
एखादी ब्रेकींग न्यूज आली की  त्या बातमी संबधीत माणसे, यंत्रणा  कामाला लागते  मात्र तसा या बातमीशी  काहीही संबंध नसताना दोन जमाती आवर्जून  कामाला लागतात एक व्यगंचित्रकार आणि दुसरा विडंबनकार ( टुकार नव्हे )  . एक शब्दातून व्यक्त होणारा  तर एक  चित्रातून  दोघांचा उद्देश एकच . हसवणूक
विसंगती सदा घडो , विनोदी चित्र दृष्टीस पडो  

आई लेखिका असल्याने पूर्वी दर  दिवाळीला ८-१० तरं दिवाळी एक घरी यायचे . यात पहिल्यादा  मी  शेवटी लिहिले जाणारे  राशी भविष्य आणि  त्या अंकातील व्यगंचित्र  कुढला ही आवाज  न करता  आधी वाचायचो (  राशीचक्र  आणि विडंबन काव्यातील  आमचा हात  असा लहाणपणापासून  होता  तर )  मग इतर  लेखनाकडे वळायचो 

हे सर्व आठवायचे कारण  की  ख्यातमान  व्यगंचित्रकार  मंगेश तेंडुलकर  याचे आज दु:खद निधन झाले .  असा एक ही दिवाळी एक नसेल  की  त्यात मंगेश तेंडुलकरांचे व्यगंचित्र नाही .  प्रासंगिक विसंगती  एका चित्रात मांडणे  हे व्यगंचित्रकाराचे मोठे कसब आणि  मंगेशजींनी  हे शिवधनुष्य अगदी लीलया पेलले. सोशल  मिडीयाच्या युगात त्याची व्यगंचित्रे  फेसबुक , व्हाट्सअप वर  अगदी घटना घडल्या पासून १-२ दिवसातच दिसायची . त्याच्या स्वतः:च्या संकेतस्थळावरही अशी खूप व्यगंचित्रे  पहायला मिळतात . सध्या हाताला  वाईट दिवस आले असताताना  ( राजकीय चिन्ह नव्हे , प्रत्यक्ष लेखनाची कला  )  त्याच हाताच्या मदतीने आशयपूर्ण  चित्र काढणे  ही या कलाकारची तपश्चर्याच म्हणावी लागेल . एक ब्रेकींग न्यूज वाचायला / ऐकायला / समजायला लाग्ना-या वेळेपेक्षा  त्या बातमीचे चित्ररूप वर्णन  काही सेकंदात समजावणे ही खरी  व्यगंचित्रकारी आणि म्हणूनच बहुतेक देवलोकी त्याच त्याच ब्रेकींग न्यूजला कंटाळून  विरंगुळा म्हणून   मंगेशजींना घेऊन यायची आज्ञा  सर्व देवांनी  यमाला केली असेल 
असो . मंगेशजी देवलोकीचा आपला प्रवास सुखाचा होवो या एका टुकार विडंबनकाराकडून  एका श्रेष्ठ  जेष्ठ  व्यगंचित्रकाराला शुभेच्छा  


विसंगती सदा घडो , विनोदी चित्र दृष्टीस पडो  .. 

अमोल केळकर 
a.kelkar9@gmail.com
poetrymazi.blogspot.in 

भावपूर्ण श्रध्दांजली


आयुष्यभर तुम्ही आम्हाला हसवलेत  मंगेशजी ,
 भावपूर्ण श्रध्दांजली  असे म्हणताना ही  दु:खी चेहरा तुम्हाला आवडणार नाही 

म्हणून  हसत हसत पुढच्या प्रवासास  शुभेच्छा देतो 




प्रामाणिकपणाचे फळ: आधुनिक महाभारत


प्रामाणिकपणाचे फळ: आधुनिक महाभारत

 धनुर्विद्या डॉट कॉम  संकेतस्थळ  विक्रमावर विक्रम रचत होते.   शास्त्रीय पध्दतीने तिरंदाजीची माहिती देणारे  एकमेव संकेतस्थळ असा त्याचा  नावलौकीक वाढत होता. संकेत स्थळाचे निर्माते गुरुवर्य द्रोणाचार्य वेळोवेळी  संकेतस्थळावर  तिरंदाजी बद्दलची माहिती / प्रकार/ नियम  अपडेट करत असत.  केवळ हस्तिनापूरातूनच नव्हे तर देशो देशीचे राजे , महाराजे , युवराज  येथील माहितीचा उपयोग करुन धनुर्वीद्येत पारंगत व्हायचा प्रयत्न करत होते.
    असेच एकदा गुगल सर्च  करता करता  ' एकलव्यास ' सदर संकेतस्थळ  सापडले आणि त्याच्या आनंद गगनात मावेनासा झाला. रोज सकाळी न चुकता  सराव सुरु करण्याआधी तो संकेत स्थळाला भेट देत असे आणि नंतर सरावास जात असे. परंतु  सुरवातीपासून त्याला काही तरी उणीव भासत  होती. खुप विचार करता त्याच्या लक्षात आले की या संकेतस्थळावर आपण जरा उशीराच इथे आलो आहोत. गुरुजींनी सुरवातीला दिलेले  नियम आपल्याला माहितच नाहीत .  सुरवातीची माहिती कशी मिळवायची असा विचार करत असतानाच त्याच्या डोक्यात एक कल्पना आली.  या संकेतस्थळाचा पहिल्यापासून  वाचक असणारा विद्यार्थी  ' अर्जून ' याच्याशी संपर्क करायचे असे त्याने ठरवले.  तातडीने एकलव्याने निरोपाचा खलीता ( इमेल ) अर्जूनास धाडला .  त्यात लिहिलेला मजकूर बघून अर्जूनाने  एकलव्यास उलट निरोप धाडला आणि त्यात लिहिले  की तुला पाहिजे असलेली सर्व माहिती माझ्याकडे प्रिंट आउट स्वरुपात आहे  मात्र याची देवाण घेवाण करण्याआधी  आचार्यांची परवानगी घेणे योग्य ठरेल.  अर्जूनाने हा निरोप परत पाठवताना  ( अती ) शहाणपणाकरुन गुरुवर्य द्रोणाचार्यांना  बीसीसी ( bcc  बाँबे क्रिकेट असोसीएशन  नव्हे)  मधे ठेवले.  अर्जून एकदम खुशीत होता . त्याला खात्री होती  आचार्य त्याच्या हुशारीबद्दल बक्षीस म्हणून तिरंदाजीतील ४ थी स्टेप सगळ्यात आधी त्याला शिकवणार.  पण झाले भलतेच. आचार्यांच्या एका मेलने   धनुर्विद्या डॉट कॉम  संकेतस्थळ  अर्जूनासाठी कायमचे बंद झाले. अर्जूनाने अनेल निरोप आचार्यांना पाठवले पण सर्व निरोप जसेच्या तसे परत आले. अर्जून हताश होऊन निघून गेला.

आज अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर  अर्जून बनवत असलेला द्रोणाचा-यांचा पुतळा अंतीम टप्प्यात आला आहे.  अर्जूनाने तिरंदाजीचा सरावही सुरु केला आहे पण डाव्या हाताने. काय सांगावे उद्या आचार्यांनी उजव्या हाताचा अंगठा मागितला तर ????

शुभं भवतु !!! शुभं भवतु !!! शुभं भवतु !!!

Sunday, July 9, 2017

गटारी स्पेशल


गटारी स्पेशल : -📝
( चाल: रिमझिम पाऊस पडे सारखा )

इकडून तिकडे मेसेज पाठवा
जुलैला ही ऊन पडे
दारुच दारु चहूकडे गं बाई
गेला बोकड कुणीकडे
( रिमझिम पाऊस पडे सारखा)

हाक मारिता वेटर म्हणुनी
पाहती नजरा दाही दिशांनी
खुणाविता मज ग्लास घेऊनि
लेबल मजला रेड दिसे,  गं बाई
गेला बोकड कुणी कडे
( रिमझीम पाऊस पडे सारखा)

पित्ताशयाच्या लक्ष आठवणी
तरीही उरते पेय पिऊनी
उठता चालू घरी लागता
गटारातही पाय पडे, गं बाई
गेला बोकड कुणीकडे
( रिमझिम पाऊस पडे सारखा)

Saturday, July 8, 2017

गुरु पोर्णीमा



मंडळी नमस्कार 🙏🏼🌺
उद्या गुरु पोर्णीमा . आजपर्यतचा प्रवास ज्याच्यामुळे सुखकर झाला त्यांच्याबद्दल कृतज्ञता  व्यक्त करायचा हा दिवस. आई - वडील , शाळेतील गुरुजी  , कॉलेजमधील सर  ते आपण ज्या क्षेत्रात आहोत ( खेळ , संगीत , व्यवसाय , नोकरी , अभिनय इ इ )  तेथील आपले मार्गदर्शक / गाईड  यांची आठवण ठेवून  त्याचे आभार मानायचे  
आजच्या  मॅनेजमेंट  युगात ऍटीट्युड (Attitude)   सगळेच दाखवतात पण एखादी चांगली गोष्ट घडली असता त्या घटनेला कारणीभूत गोष्टीबद्दल ग्रँटीट्युड  राहणे हे ही महत्वाचे असते ( पाश्च्यात्य लोक अनेक प्रकारे असा  Gratitude  व्यक्त करतच असतात )
माझ्यामते  गुरु पोर्णीमा आपण या ही एका उद्दीष्टाने  साजरी करायला हवी 
वरील उल्लेखलेले गुरु  हे सर्व पारंपारिक गुरु म्हणून परिचित आहेत असे म्हणता येईल. आता या काही  गोष्टी ज्यांना आपण 'गुरु ' चे स्थान देऊ शकतो:-

एखाद वाचलेले छान पुस्तक
मनाला स्पर्शून गेलेलं गाणं
एखाद्या गोष्टीत आलेलं अपयश
गरजेच्या वेळी मित्र / नातेवाईक यांनी केलेली मदत
आपल्या कडून झालेली चूक

प्रत्येकाची यादी कदाचित वेगळी असेल . पण ज्या गोष्टीतून आपण शिकतो ते आपले गुरु  किंवा ज्या गोष्टी  जीवन सुसह्य करायला मदत करतात ते आपले गुरु  ( गुरुचे अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत्र म्हणा ना हवंतर *  )

* टीप - स्तोत्र आणि स्त्रोत्र  या शब्दात एकदा मी घोळ  घातला होता तेंव्हा शाळेतल्या माझ्या एका मित्राने  मला  योग्य मार्ग / शब्द दाखवला होता .तो  सध्या माझ्यासाठी महागुरूच  आहे  हा भाग वेगळा 😉)
या टूकारगिरीच्या शेवटी आणि एका गुरुचे मला आभार मानायचे आहेत ते म्हणजे  *G for  - गुगल*  . " व्यासोच्छिष्टं जगत सर्वम " असे म्हणतात , आता हे गुगल व्यासांचे  आधुनिक रूप मानावयास हरकत नसावी 
 आमच्या साठी कठीण परिस्थीतीत सर्व मार्ग अगदी चुटकीसरशी ( टिचकीसरशी) गुगल गुरु  सोडवतात . त्याचे ही  आभार 🙏🏼
जी एस टी प्रणाली लागू व्हायच्या आधी जे काही विनोदी मेसेज यायचे त्यात
' गुरूवर श्रध्दा ठेवा '  असा एक विस्तार यायचा  हेच आता ' *गुगल वर श्रध्दा ठेवा* ' असं म्हणलं तरी  चालेल

सर्वाना गुरुपौर्णीमेच्या शुभेच्छा 🙏🏼🌺



गुरु समान कुणी नाही सोयरा
गुरुविण नाही थारा
गुरु निधान गुरु मोक्ष आसरा
देव दैव लाभे सदैव
गुरुचरण लाभ होता
गुरु एक जगी त्राता
🙏🏼🌺

आपल्या प्रतिक्रिया  अवश्य पाठवा इथे किंवा
a.kelkar9@gmail.com

Sunday, July 2, 2017

रविवारची टुकारगिरी



मंडळी नमस्कार 🙏🏼🌺
आपण वेळोवेळी माझ्या 'टु-कार - ईचार या अनुदिलीला भेट देऊन माझा उत्साह वाढवत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे  अनेक आभार.🙏🏼
गेली अनेक वर्षे या अनुदिनीत फक्त टुकार पद्य लेखनच केले. मात्र आता मनातील सरळ - सोपे
( पण टुकार) विचार गद्य स्वरूपात दर रविवारी
' रविवारची टुकारगिरी' या सदरात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे
अर्थात लेखन आवडल्यास कौतुक करायला तुम्ही समर्थ आहातच.😊
आता रविवारच का? तर आमच्या सारख्या चाकरमान्यांसाठी हाच काय तो एक हक्काचा मचमच करण्याचा दिवस
असो😁
आज आपण व्हाट्स अप, फेसबुक, ब्लाँग यावर अनेक उत्तमोत्तम माहिती, लेख, विचार वाचतो.
( ट्विटर बदल माहिती नाही कारण मी तेवढा मोठा नाही☺)
या माध्यमांमुळे लेखकाला/ कवीला  आपले साहित्य कोण प्रकाशित करेल याची चिंता आज तरी  नाही. ज्याक्षणी मनात एखादी संकल्पना रुजते त्याक्षणी ती मोबाईलवर उतरवायची , no proof reading,  तसंही -हस्व, दीर्घ कुणाला कळतयं म्हणा आज काल. ज्याक्षणी लेखन पूर्ण होईल त्याचक्षणी मोबाईल संपुर्ण जगाशी जोडून ते लेखन ( कविता, लेख, चारोळी, वैचारिक, ललित लेखन इ.इ) करुन टाकायचे प्रसिद्ध. सृजनशील लेखन forward होतेच.
( टुकार - लेखनाला मात्र फारच जहीरात करावी लागते - स्वानुभव 😜)
पूर्वी सारखे लेखन कच्चे लिहा मग पक्के करा मग दोन प्रती लिहा,  संपादक महाशयांना पत्राने पाठवा, पोच मिळेल की नाही खात्री नाही,  वृत्तपत्र गावचेच असेल तर कार्यालयात नेऊन द्या ( आईचे अनेक लेख सांगली तरुण भारत,  केसरीत नेऊन दिल्याच आठवतयं अजून)
मात्र आता एका इमेल वर काम सोप झालंय, काय चाललय अप्पानी दोन निळ्या खुणा दाखवल्या की काम झालंय समजायचं
आणि मानधन, त्याचं काय? ते तर पूर्वी ही मिळत नव्हतं, आत्ताही मिळत नाही😉
*पण स्वानंद,  लेखनातुन मिळणारा तो कदाचित आमची पिढी जास्त अनुभवते आहे*
चला रविवारची पहिली मचमच पुरे. परत भेटू पुढची मचमच तयार झाली की परत एखाद्या रविवारी
नेहमी सारखे आपले अभिप्राय नक्की पाठवत रहा
a.kelkar9@gmail.com वर किंवा इथे 

लकलक असती व्हाटसपची न्यारी दुनिया
पाठवती पुढे मेसेज हा हा हा

📝

Thursday, June 29, 2017

आज कळता GST कळेना



*आज कळता GST कळेना*🤒 📈

 मी शिकावे, तू शिकावे
कारणे ही काही कळेना

वसुलीचा गणिते ही किती केली तरी सुटेना
हाच टँक्स,  हाच वँट
वीण दोघातली ही जुळेना

हेच डोके रोज वेडे
दुखायचे आता थांबेना

आस आता एक जुलैची, आज कळता जिएसटी कळेना
वाट लागली अकांटंची, आज कळता जिएसटी कळेना

📈🤒📉✂

माझे टुकार- ईचार
📝२९/७/१७

Wednesday, June 28, 2017

खेळ मांडियेला व्हाट्सप वरती बाई


v2🤰za👶👶👶👶
👌👆d✈🕴v🖥ri
🌳🌲🌴🌱a🤰🤝🐯🦁🐵🦉🐘
⛹🏻‍♀🏓🤼‍♀👨d🚶la-wall 1 ☕👦

खेळ मांडियेला व्हाट्सप वरती बाई
ओळखती अभंग भारी रे
शोध अभियान गेले ग्रुपवरी
एकामागोमाग गाणी सुचती रे

इमोजीउलटी ओळीत लावा
ओळ शोधुनी ठेवा
टाळ्या वाजवून होई प्रेमळ वर्षाव
अनुपम्य कोडी सोडवा रे!

होतो जयजयकार गर्जत सुंदर
चुकले न व्हाट्सप मेंबर हे
अम्या म्हणे सोपी केली वहिवाट
सोडवायला चित्रगाणी रे


( व्हाटसप वार - करी) 🚩📝
२९/६/१७











Friday, June 23, 2017

तरुण आहे टँक्स अजूनही


तरूण आहे टँक्स अजूनही,  माणसा रुसलास का रे?
एवढ्याश्या त्या तुटीवर तू असा गळलास का रे?

अजूनही दिसल्या न नगरी, कन्सल्टिंगच्या तेजशाला
अजून मी झिजलो कुठे ते? हाय तू झिंगलास का रे?

सांग या कोपऱ्यातल्या लिपीकाला काय सांगू?
कोलमडे बजेट माझे.तरी तू  बसलास का रे

बघ तुला लुटतोच आहे टपरीवरचा पानवाला
लाँस अन प्राँफीटचा मेळ तू लावलास का रे?

दिसतती पैशांना माझ्या खरचाच्या खुप वाटा.
तू आँडीटरसारखा पण कोरडा उरलास का रे?

संकल्पना : अमोल 📝
मुळ गाणे:-

तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?

अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला;
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?

सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?

बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा..
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे ?

उसळती हुदयांत माझ्या अमृताच्या धुंद लाटा..
तू किनार्‍यासारखा पण कोरडा उरलास का रे ?

Tuesday, June 20, 2017

कायम चुळबुळ कायप्पासन


तर आजच्या तीस-या आंतरराष्ट्रीय  योग दिनाच्या शुभ मुहूर्तावर  मी आज आपणास एका वेगळ्या योगासनाची माहिती देणार आहे.  गेल्या काही वर्षांपासून हे आसन  लोकप्रिय होत गेलं आहे.  दिवसाच्या कुठल्याही प्रहरी करता येण्यासारखे हे अतिशय सोपे आसन आहे. या आसनात शरीरातील बोटांचा  आपणास खुबीने वापर करावयाचा असतो  ( इथे डोक्याचे काहीही काम नसले तरी या आसनातील  काही अस्त्राने  हृद्यायचे ठोके अनियंत्रित होऊ शकतात , तेव्हा काळजी घ्यावी )
तर या आसना चे नाव आहे   " कायम चुळबुळ कायप्पासन "

या आसनासाठी तुम्हाला खालील गोष्टी पाहिजेत 
१) काय अप्पा युक्त भ्रमणध्वनी २)  ऊर्जा देयक यंत्र  ३) हाताची बोटे  ४ )  दिवसाचे किमान १६ तास 

तर या आसनाची तयारी तुम्हाला रात्रीच  करून ठेवायची आहे.  निद्रा अवस्थेत जाण्यापूर्वी  आपला भ्रमणध्वनी  उजव्या बाजूला ( शक्यतो उशी खाली )  ठेवावा. सकाळच्या कुठल्याही प्रहरी डोळे उघडले की सर्वप्रथम आपला उजवा हात थोडा वर करून कुणाला कळायच्या आधी भ्रमणध्वनी हातात घेऊन त्याची विशिष्ठ कळ  मधल्या बोटाने दाबावी . सभोवती प्रकाश दिसताच  खुबीने आपला  भ्रमणध्वनी जगाशी माहिती जोडणीद्वारे जोडावा आणि काय अप्पा सुरु करावे. धडाधड येणार-या निरोपां कडे दुर्लक्ष करून सर्वप्रथम संग्रहित फुलांचे गालिचे वेगवेगळ्या संघटनेत अंथरावे. त्यावर मग दिवसाचा कुठलाही प्रहर  असला तरी  दोन्ही  हातानी नमस्कार करून  कायम चुळबुळ कायप्पासनास सुरवात करावी 
आता याठिकाणी आपण निजलेल्या ठिकाणची जागा सोडली तरी  चालेल. आवश्यक नित्य कर्म आवरून ' आसन ' पुढे चालू करावे . सर्वप्रथम   एखादा सुविचार ( शक्यतो इंग्रजीतून )  वाढदिवस , लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,  काही दिनविशेष  यावरचे  मिळालेले  निरोप / माहिती पुढे पाठवण्यासाठी आता आपल्याला अंगठ्याचा वापर करायचा आहे  . सवयीने हे आपोआप जमून जाईल 
त्या दिवशी काही विशेष दिन नसेल तर एखादा देवाचा फोटो किंवा राष्ट्रगीताला मिळालेले पारितोषिक  किंवा राजकारणातील विषय ( याला कधीच तोटा नसतो )  याचा वापर करावा. यासाठी डाव्या  - उजव्या हाताची कुठलीही बोटे वापरली तरी  चालेल . पावसाळी  छत्री प्रमाने उगवणारी टुकार कविता, ग्रहबदल संबधीत लेख, पाककृती  किंवा  अगदीच काही नाही मिळाला तर गुरुजी - गण्याच्या  विनोदाची अदलाबदल करत हे आसन सतत चालू राहील याची दक्षता घ्यावी 
कामाच्या ठिकाणी पोचल्यावर सर्वप्रथम भ्रमणध्वनी चे तापमान नियंत्रणात आहे ना हे बघावे आणि नसेल तर  भ्रमणध्वनीला ऊर्जा देयक यंत्र लावावे . थोडा वेळ आपल्या बोटांनाही विश्राती द्यावी . आणि परत  हे आसन कंटाळा येई पर्यत चालू ठेवावे . 

टीप : " कायम चुळबुळ कायप्पासन  किती ही केले तरी    कामाच्या ठिकाणी कामे  करण्यास,  कुटूंबातील सदस्यांना वेळ देण्यात , मित्राना प्रत्यक्ष जाऊन भेटणे/ शुभेच्छा देणे/ , पुस्तक वाचासन, आणि शेवटी शांत  निद्रासन  - हे सर्व  करण्यास विसरू नये  

योग दिनाच्या  शुभेच्छा



 

योग विचार


उद्याच्या ( २१ जून ) योग डे  वरचे - आमचे योग्य विचार
 ( संदीप खरेंची  माफी मागून )


        
जरा चुकीचे... जरा बरोबर.
जरा चुकीचे, जरा बरोबर , करू काही.
चला दोस्त हो ;  योग्य - डे  वर बोलू काही....


उगाच वळसे हाताने  हे देत रहा तू ..
उगाच वळसेे  हाताने हे देत रहा तू ...
फुटले  नाहीत घोटे  तोवर , बोलू काही......
चला दोस्त हो ; योग्य  डे  वर बोलू काही..........

पद्मासन घालुनी तो वर , गड्बडल्या मांड्या .
पद्मासन घालुनी तो  वर , गड्बडल्या मांड्या .
श्वास रोखुनी पाहू , नंतर बोलू काही........
चला दोस्त हो ; योग्य  डे  वर बोलू काही.........

हवे-हवे से  शवासन तुला  हवेच आहे ..
हवे-हवे से  शवासन तुला  हवेच आहे .
नको-नको से  शीर्षासन मग, नकोच   काही.......
चला दोस्त हो ; योग्य  डे  वर बोलू काही..........

योग  नसू  दे हातां मध्ये, साठी म्हनुनी..
योग  नसू  दे हातां मध्ये, साठी म्हनुनी..
वाट आंधळी, प्र्वास खडतर ,बोलू काही ......
चला दोस्त हो ; योग्य  डे  वर बोलू काही.......

( योगी ) अमोल 

Monday, June 19, 2017

टॉस आला, रे सामना दिला


लहानपणी पावसाळा आला की नेहमी तालात म्हणाले जाणारे हे गाणे   काल   जरा वेगळ्या स्वरूपात म्हणावे लागले .

चट चट चट चट झेल टाकती, वाढत जातो पारा 
विसरा आता चेंडू - फळी,  हॉकी स्टिक हाती धरा 
टॉस आला, रे सामना दिला 

घरा घरातुन , न्यूजचॅनेलवर , बोलत होती शहाणी 
त्यावर मग कळले नाही कसे पडले पाणी 
इकडून तिकडे पळता पळता, संघच हरला सारा 
विसरा आता चेंडू - फळी, हाती हॉकी स्टिक धरा 
टॉस आला, रे सामना दिला 

हॉकी प्लेयर्सना  होती जिकंण्याची घाई
इवली इवेळी स्टिक घेउनी गोल करतो भाई 
आनंदे  कौतुकतीसारे  सात - एक ने मारा 
विसरा आता चेंडू - फळी, हाती हॉकी स्टिक धरा 
चेंडू आला , न  गोल केला 

भारतीय खेळाडूचे अभिनंदन 
संकल्पना : अमोल 

Thursday, June 15, 2017

आजचा अभंग


आजचा अभंग 

 सेमी फायनलला खेळायचं खेळायचं 
रोहित शिखर काही दमेना 

केली परदेशवारी थेट
 घेतली साहेबाची भेट 
या या खेळाची हौस पुरी होईना होईना  !! १!!

रंग हिरवे  सुदंर  
लाजीरवाणी त्याची हार 
या या नजरेस दुसरा रंग दिसेना  !! २ !!

अनुमानाचा हा खेळ , 
खेळे  जोतिषी टुकार
खेळ खेळिता , भाष्य आज चुकेना  !! ३ !!

अमोल  


Thursday, June 8, 2017

धन्य ही भारताहून लंका


लंकेबरोबरचा कालचा पराभव  आमच्या टुकार विडंबनेत  आणखी एकाची भर टाकून गेला  

( चाल : रम्य ही स्वर्गाहून लंका )

धन्य ही भारताहून लंका 
तिच्या खेळीच्या  विराट लहरी उठविती शंका 

धन्य ही भारताहून लंका 

विजयमल्ल्या जरी या नगरी 
हरून दाखविले निळ्या सागरी 
या सामन्यावर पाऊस विसरला , करण्या अभिषेका 

धन्य ही भारताहून लंका 

पैसा लक्ष्मी बंधू भगिनी 
उखळ पांढरे या सामन्यातुनी 
या स्पर्धेचे चॅम्पियन पद तरी  भारता घेशील का ?

धन्य ही भारताहून लंका 

( टुकार )  संकल्पना : अमोल 
०९/०६/१७

Wednesday, June 7, 2017

माझी टूकारगिरी



ती सध्या काय म्हणते




ती म्हणते वटपोर्णीमेला
पूजा करायची कायको?
सात फेरे मारेल की
माझ्या नव-याची बायको



७/६/१७
अमोल

Related Posts Plugin for WordPress, Blogger...