नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, March 29, 2022

कचरा फाईली


 कचरा फाईली


मंडळी, अगदी काही दिवसापूर्वी आमच्या कार्यालयाच्या नुतनीकरणासाठी म्हणून काही कालावधीसाठी आम्हाला दुसरीकडे बसायला सांगितले. आजकाल बरीच कामे संगणकावर जरी होत असली तरी त्याच्या कित्येक आधीपासूनच्या अनेक फाइली या ठेवलेल्या होत्या. शिफ्टींग होताना एवढ्या प्रचंड प्रमाणात असणाऱ्या फाईलींचे काय करायचे हा मोठ्ठा प्रश्ण होता. ज्या अतिशय आवश्यक फाईली आहेत त्या घेऊन नवीन जागी जायचे, ज्या फाईली कदाचित पुढच्या काळात संदर्भासाठी लागतील त्यांना कार्यालयीन वास्तूचे नूतनीकरण होईपर्यंत 'काँमन स्टोरेज' मधे ठेवायचे असा निर्णय झाला. हे सोडून उरलेल्या जवळजवळ ८०% फाईली या तिथेच सोडण्याशिवाय गत्यंतर नव्हते. थोडक्यात त्या सगळ्या फाईली कचरा ठरवल्या जाऊन आता रद्दीच्या भावात जाणार हे पक्के झाले होते.


नुतनीकरणानंतर जेंव्हा आम्ही मुळ जागी परत येऊ तेंव्हा येताना ज्या अती आवश्यक / दैनंदिन लागणाऱ्या फाईली ज्या सोबत घेऊन गेलेलो त्या परत आणू.  पण इथे संदर्भासाठी लागतील म्हणून काँमन स्टोरेज मधे ठेवलेल्या किती फाईलीं वरची धुळ परत झटकली जाईल याबाबत मला तरी शंका वाटतीय. कारण जेंव्हा सगळं सुस्थितीत होतं तेंव्हाही फारशा त्या फाईलींना कुणी हात लावला नव्हता. 

घर आवरताना हा नेहमीचा अनुभव.  आज आवश्यक म्हणून ठेवलेली वस्तू पुढल्यावेळी घर आवरताना मात्र हमखास कच-यात जाते. पण पहिल्यांदाच त्या कच-यात घालायला मन तयार होत नाही 


वरती जो संगणकाचा उल्लेख केला त्यातील कच-या कडे ही आपले फारसे लक्ष जात नाही. नकळत पणे अगणित फाईल्स तयार होत असतात. अनेक फोल्डर+ फाईल्स आपण तयार करत असतो. यातील असंख्य फोल्डर्स/ फाईल्स , इमेल्स काम झाल्यावर सहज उडवले जाऊ शकतात आणि अनावश्यक कच-याची विल्हेवाट लावली जाऊ शकते. पण जेंव्हा हार्ड डिस्क भरून डेटा वहायला लागतो, नवीन इमेल येणे बंद व्हायला लागतात तेंव्हा जाग येते.

आजकाल हीच गोष्ट 'मोबाईल 'उपकरणा बाबतीतही  आढळते


थोडक्यात वेळोवेळी कचरा साफ होणे आवश्यक. वर उल्लेख केलेल्या ठिकाणचा तर आवश्यकच पण अशी एक जागा आहे प्रत्येकाची वय्यक्तिक, जिथे अशा नको असलेल्या भरमसाठ फाईली अगदी कळायला लागल्यापासून विनाकारण पडून आहेत, ती जागा म्हणजे आपला 'मेंदू'.

तिथेही एकदा साफ-सफाई करायची का?


निसर्ग सुद्धा स्वतःत बदल दरवर्षी करतो. तो निसर्गचक्राला अनुसरून असला तरी आपल्याला दरवेळेला वेगळी अनुभूती देऊन जातो. झाडांची पानगळी होऊन नवनिर्मिती होत असताना आपण आपल्या मनाला हीच गोष्ट सांगितली तर? 


जुने जाऊ द्या मरणालागुनी

जाळुनी किंवा पुरुनी टाका

सडत न एक्या ठायी ठाका

सावध!ऐका पुढल्या हाका

खांद्यास चला खांदा भिडवूनी


विक्रम संवत २०७८-२९७९ 🚩

शालिवाहन शक १९४४ 🚩

शुभकृत् नाम संवत्सर 🚩


तसेच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 💐💐


अमोल 📝

poetrymazi.blogspot.com

Monday, March 28, 2022

मानाच पान


 मानाचं पान 


जागतिक अमुक तमुक दिवसाच्या शृंखलेतील आजचा दिवस मानाचा आपलं पानाचा

होय ! आज ( २८ मार्च)' जागतिक पान दिवस'



खरं म्हणजे पाश्चिमात्य पद्धतीने खाण्याची पध्दत अवलंबून आपल्याला अनेक दशकं उलटली. अनेक समारंभ, पार्ट्या,कार्यक्रमातील जेवणातील खायचा क्रम म्हणजे स्टार्टर- मेन कोर्स - डेझर्ट . हे सोपस्कार झाल्यानंतर मात्र खरा खवय्यी मित्र ( बिल वगैरे देण्याच्या भानगडीत न पडता)  कुणाकुणाला कसले पान हवे हे विचारून बाहेर पानपट्टी गाठतो आणि रंगलेल्या खाद्य मैफिलीचा शेवट टिपिकल देशी पद्धतीने होतो ( परदेशात अशा पद्धतीने शेवट होतो की नाही याची कल्पना नाही )


'खाईके पान बनारस वाला' किंवा 'पान खाये सय्या हमारो' अशा हिंदी गाण्यातून भेटणारे पान, मराठी गाण्यात एकदम आठवणीत येत नाही.  अर्थात ' मेंदीच्या पानावर' हा संदर्भ इथे उचित नाही. 

राजा बढे यांनी लिहिलेली, श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केलेली आणि सुलोचना चव्हाण यांनी गायलेली

 ' कळीदार कपूरी पान ' ही एक लावणी यानिमित्त्याने देत आहे


कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना

रंगला काथ केवडा, वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा


बारीक सुपारी निमचिकनी घालून

जायपत्री वेलची लवंग वरी दाबून

बांधले तसे या कुडीत पंचप्राण

घ्या रंगत करि मर्दुनी, चतुर्दशगुणी, सख्या सजणा


कमरेचा झुलता झोक नूर बिनधोक उरी मावेना

काजळी नजर छिनमिनी चांदणी रैना

छेडिता लालडी मुलाम तुमची गुलाम झाले सजणा

पायी पैंजण छ्न्नक छैना


अरे आजचे काय 'डिस्पॅच स्टेटस' ? २८ मार्च तारीख आहे माहित आहे ना? आजचा दिवस धरून फक्त ४ दिवस वर्ष संपायला.  का यंदा पण नेहमीसारख माझ्या *तोंडाला पाने पुसण्याचा* विचार आहे तुमचा?....


मंडळी इथंच थांबतो...


. ४ दिवस हेच वेगवेगळ्या शब्दात सायबाचे हे बोल ऐकायची तयारी करायचीय.


कामे पडली अनंत, वेळ मात्र मर्यादित

( पाने पुसली अनंत....           )


अमोल

२८ मार्च २२

Friday, March 25, 2022

घर दोघांचे, घरकुल आमदारांचे


 "चोराच्या मनात चांदणं" या चित्रपटासाठी श्री सुधीर मोघे यांनी लिहिलेले एक गाणे, आजच्या घटनेला कसे मस्त लागू पडतय बघा. (फक्त काही शब्द बदललेत)


विश्वास ठेवीला मी, विश्वास तू दिलास

जपलेस तू मला अन मीही तुझ्या मनास

एका क्षणात आपुल्या सुख साधले युगाचे

*घर दोघांचे, घरकुल आमदारांचे*🏠


वाटा कशा निराळ्या जणू एकरूप झाल्या

एका खुळ्या जगात त्याही खुळावलेल्या

जुळते अतूट नाते सत्ता- विरोधकांचे

*घर दोघांचे, घरकुल आमदारांचे*🏠


कधी भांडलोही थोडे ,थोडे दुरावलोही 

पण खूण त्या क्षणाची जपली मनात नाही

रुच(ज)ले कधी(च) बील,दोन्ही सभागृहांचे

*घर दोघांचे, घरकुल आमदारांचे*🏠


अमोल 📝

poetrymazi.blogspot.com

Saturday, March 19, 2022

८३


 खरं म्हणजे ही घटना प्रत्यक्ष घडली तेंव्हा आम्ही ३ रीत होतो. ( आमच्या बँचचं एक बरंय. शाळेत कितवीत केंव्हा होतो हे लक्षात ठेवायला सोपं आहे. ८३ ला ३ री, ८५ ला ५ वी, ८९ ला ९ वी. सुदैवानं बेसिक पदवी शिक्षण होई  पर्यंत  हा क्रम ठेवण्यात आम्ही यशस्वी ठरलो 😷)


८३ साली म्हणजे आम्ही  ३ री त असताना भारताने क्रिकेटचा विश्व चषक जिंकला . त्यावेळी आम्हाला हे कितपत माहीत होते हे सांगता नाही येणार. अर्थात ही जाणीव व्हायला काही कालावधी जावा लागला.


 माध्यमिक शाळेत असताना मधल्या सुट्टीत साने या आमच्या शाळेजवळच राहणाऱ्या  मित्राच्या घरी जाऊन अनेक सामने बघितलेत ( कधी कधी तर पुढचे काही तास बंक करून तिथेच थांबायचो ) . ८३ च्या विश्वविजेत्या संघातील गावसकर,वेंगसरकर,अमरनाथ, वगैरे खेळाडूंची ओळख वाढायला लागली.खेळाची आवड निर्माण झाली. आमच्या शाळेच्या मैदानात मधल्या सुट्टीत तर हक्काने खेळ रंगला. सायकलचे चाक,  एखाद्या भिंतीवर विट घेऊन तीन स्टंप काढून,  किंवा काहीच नाही तर तीन दगडं ( अभासी स्टंप गृहीत धरून)  ठेऊन अनेक विक्रम अनेकांनी रचले. मोठ्या स्टेडिअम वर जाऊन सीझन चेंडू ने वगैरे खेळण्याइतपत मात्र माझी लेवल गेली नाही.


अर्थात पहिला क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकला त्यावरचा " ८३" हा सिनेमा बघायची इच्छा होती. ती आज पूर्ण होणार आहे.


अवांतर :-

अगदी मनापासून सांगायचं तर हिंदी सिनेमा थेटरात जाऊन बघायला मला फारसं आवडत नाही. टिव्ही वर असंख्य जहिरातीच्या भडिमारात अधून मधून सिनेमा बघायाला मिळाला तरी मला हे जास्त सोईचे वाटते ( खिशाला न लागणारी कात्री हे खरे कारण) आणि आजकाल काही महिन्यातच असे सिनेमे टीव्हीवर लागतात 


टीव्हीवर लागल्यावर बघू की

या विचारसरणीचा आणखी एक विजय होणार आज  ✌🏻


#८३_🏏


अमोल 📝

२०/३/२२

Thursday, March 17, 2022

रंगोत्सव


 रंगोत्सव - आठवणीतील गाणी 🌈🎨


आज सोसायटीत रंग खेळते राधी

गोपाळा, जरा जपून जा तुझ्या घरी

किंवा 

कृष्णे , उडवू नको रंग थांब, थांब ,थांब


अगदी बरोबर वाचताय. असे प्रसंग आजच्या काळात धुळवड/ रंगपंचमीला गावोगावी दिसून येतायत समस्त गोपाळां समवेत समस्त राधीका रंगांचा उत्सव साजरा करण्यात बरोबरीने पुढे आहेत. 


निसर्ग तर सर्वच ऋतूत कायमच 'रंगोत्सवात' दंग असतो. यातला खरा जादुगार  'आकाश'. 'नभाला बरोबर घेऊन वेगवेगळे प्रयोग नित्य चालू असतात.

बदलती नभाचे 'रंग' कसे?

क्षणात निळसर,क्षणात लालस,क्षण सोनेरी दिसे !

अशा बदलत्या नभाखालती

वसते अवनी सदा बदलती

कळी कालची आज टपोरे फूल होऊनिया हसे!

बदलती नभाचे 'रंग' कसे?


रोज सूर्योदयाला ;-

नवकिरणांचे दूत निघाले पूर्व दिशेहून नाचत नाचत

नवीन गाणी ओठावरती किलबिलते पक्षांची पंगत

सोनेरी स्वप्नांची झालर पहाटवा-यावरती विहरत

नवीन चेतना भरुन घ्यावी ज्याने त्याने हृदयागारी

उल्हासाचे 'रंग' भरले नभांतरी दशदिशांतरी


तर मंडळी तब्बल २ वर्षाच्या खंडानंतर आज हा रंगोत्सव * साजरा करायला मिळतोय. तेंव्हा

घुमवा लेझीम ढोल नगारा

आज नाचवू गावच सारा

सनई - पावा घुमवा सूर

संगीताला आणा पूर

टाळ्या झडवा द्या ठेका

रंग फेका रंग रे, रंग फेका 🎨


आणि मग

  "अवघा रंग एक " होऊ दे

आणि रंगी रंगू दे  श्रीरंग ( श्रीवल्ली)


शेवटी प्रत्येक सण ( क्षण) आपल्याला काय सांगतो  


नाही भेदाचे ते काम

पळोनी गेले क्रोध काम!


अवघा रंग एक झाला 


रंगोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा 🙏💐☺️


अमोल

poetrymazi.blogspot.com

धुळवड/ रंगपंचमी * २०२२ 📝

Monday, March 7, 2022

महिला दिन. कृत्तिका नक्षत्र


 फुलांचा सुंदर गुच्छ, कर्रेबाज पण कर्तृत्ववान

                     " कृत्तिका " 💐

            ( महिला दिन विशेष) 


आज ८ मार्च २०२२. आज कृत्तिका नक्षत्र आहे.  श्री प्र सु आंबेकर यांनी त्यांच्या 'नक्षत्र ज्योतिष' पुस्तकात कृत्तिका नक्षत्राची माहिती देताना हे वरचे वाक्य लिहिले आहे.

 या नक्षत्राच्या उत्पत्ती बद्दलची कथा ही त्यांनी दिली आहे.


थंडीचे दिवस,उत्तर ध्रुवाजवळील काळोख्या रात्रीचा प्रदेश. सप्तऋषी आपल्या प्रियपत्नींसह प्रवासास निघाले होते. मुक्कामाला पोहोचण्याची सर्वानाच घाई होती.पण कडाक्याच्या थंडी मुळे पाय मात्र उचलत नव्हते.प्रवास करता करता मंडळी 'अग्नी' या प्रखर ता-याजवळ आली. अग्नीची उष्णता गारठलेल्या मंडळीना फारच सुखावह वाटली. जरावेळाने सप्तऋषी इच्छित स्थळी जाण्यास निघाले पण वसिष्ठांची पत्नी 'अरुंधती' फक्त त्यांच्याबरोबर निघाली. इतर सहा ऋषीपत्नी मात्र अग्नीजवळच शेकत बसल्या. अग्नी पासून मिळणारी उब त्यांना सोडवेना.


या मागे राहिलेल्या ऋषीपत्नी म्हणजेच "कृत्तिका" होत.


कृत्तिका नक्षत्रावर जन्म असणाऱ्या स्त्रियांचे वर्णन पुढे असं केलंय: - स्वभाव मानी, रागीट,करारी जरा गर्विष्ठ असतो. कृत्तिकेचे सौंदर्य हे लवंगी मिरचीप्रमाणे तिखट सौंदर्य आहे.बोलणे फटकळ असते.तरीही या स्त्रीया महत्वाकांक्षी, पराक्रमी व कर्तृत्ववान असतात. 


आज आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करताना अनेक महिल्यांच्या कर्तृत्वाच्या गोष्टी ऐकताना/ वाचताना असे वाटते की यांच्या पत्रिकेत एखादा ग्रह नक्कीच कृत्तिका नक्षत्रात असेल.  


शिल्पा शेट्टी,वैजयंतीमाला, विजयालक्ष्मी पंडीत,नलिनी जयवंत या काही प्रसिद्ध स्त्रियांचे जन्म नक्षत्र ' कृत्तिका ' हे आहे



आता थोडं वरच्या ऋषींच्या कथेकडे .  नव-याच्या आज्ञेत राहणारी ऋषीपत्नी आणि नव-याला बोलू न शकणारी  'आई कुठे काय करते ' मधील पण स्त्री ' अरुंधतीच? नावातील असा ही एक योगायोग 😬


 तर, सध्याच्या जीवनशैलीला अनुसरून 'कृत्तिकेचा' एखादा गुण तुमच्याकडे असू दे, याच समस्त स्त्री वर्गास आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्य शुभेच्छा 💐


अमोल केळकर 📝

poetrymazi.blogspot.com

०८/०३/२२

Friday, March 4, 2022

प्रासंगिक


 प्रासंगिक 📝


'झुंड' असो वा 'झोंबी'(वली)

एकाच नाण्याच्या बाजू दोन

बुध्दी दिलीय ना देवाने

मग स्वतंत्र विचार करणार कोण?


दोन्ही गोष्टी मिळून जेंव्हा

जाती/पातीला मिळतो सहारा

आपणच आपल्यावर मग

द्यायचा असतो पहारा


#

झुंडीत_पाहू_झोंबीत_राहू_करीत_जाऊ_द्वेष_साजरा


फाल्गुन शु तृतीया

५/३/२२

Wednesday, March 2, 2022

रात्रं दिन आम्हा


 अनेक वर्षे मार्केटिंग मधे काम करणाऱ्या आम्हाला ही परिस्थिती नवीन नाही


'कस्टमर' ( रशिया ) - timely shipments,  shipment quantity, गुणवत्ता,  ,पेमेंट क्रेडीट, ट्रान्सपोर्टर इ इ मिसाईल्स 🚀


मॅनेजमेंट ( NATO) - घ्या रे आँर्डर आम्ही आहोत. करु व्यवस्थित सगळं,   


सेल्स मॅन ( युक्रेन)  - नाही साहेब बघताय ना परिस्थिती,  लाॅकडाऊन,  सुट्या,  पेट्रोल-डिझेलचे वाढलेले भाव, युध्द, पुढल्यावेळेला आधीच देतो साहेब, बस का साहेब !आत्तापर्यंत असं झालं का? , लागून सुट्ट्या आल्या ना, सर्व्हर डाऊन होता ना, दोन दिवस SAP प्राँब्लेम होता, अहो शनिवारीच मी डिओ ( DO) देऊन ठेवलेला तुमच्या माणसानं घेतला नाही तर आम्ही काय करणार ?, थोडं तरी पेमेंट करा ना मग मॅनेजमेंट ला सांगता येईल,  नक्की साहेब, होय साहेब, राॅ मटेरियल किती वाढलय बघताय ना? आम्ही मार्जीन काहीच ठेवले नाही आहे यावेळेला सर,  ट्रान्सपोर्ट चा स्ट्राईक नव्हता का? डाॅलर चा रेट बघा की साहेब, तुम्ही काळजी करु नका आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्हीच तर आमचे टाॅप कस्टमर आहात की


साहेब, मार्च महिना आलाय शेवटचा महिना, नवीन 'परचेस आँर्डर ' ( PO) उद्या पर्यंत पाठवाल ना? मी प्रोसेस चालू करतोय, याच महिन्यात शिप करतो.

टार्गेटच्या जरा जवळ तरी जाऊ 


काय पण होऊ दे 'झुकेगा नही' अँडीट्युड असणाऱ्या आणि ' इयर एन्ड टार्गेट' साठी रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग या परिस्थितीतून जाणाऱ्या सर्व लेवल वरच्या सेल्समॅन/ सेल्स गर्ल्सना समर्पित  👩🏼‍💼👨🏻‍💼🙏💐


( साधा विक्रेता )  अमोल 📝🏃🏻‍♂️


poetrymazi.blogspot.com

Related Posts Plugin for WordPress, Blogger...