नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Saturday, December 31, 2022

नववर्ष स्वागत


 ऋणानुबंधात सामावू

वर्ष आता हे सरणारे...

सुख,दु:खाच्या गोष्टींना

योग्य कप्प्यात ठेवणारे...


आयुष्याच्या पुढील टप्प्यात

या आठवणी येतील कामाला

सध्या तरी तयारीत राहू

नव वर्षाच्या स्वागताला


अमोल 📝

३१/१२/२२

poetrymazi.blogspot.com

Sunday, December 18, 2022

अरे 'अर्जें-टिना' झाला सी पावन


 FIFA वारीतील अंतिम सामना पाहिल्यानंतर सुचलेला अभंग


अरे  'अर्जें-टिना' झाला सी पावन ⚽

'मेस्सी' तुझे ध्यान कळों आले


तुझा तोची 'गोल' तुझा ,काय भाव

मिटला संदेह गोलक्षेत्री


दिपीका हसत मैदानात आली

'वल्ड कप ट्राॅफी' धन्य झाली


'एम्बापेची' वृत्ती आपले वर्चस्व

अवघे बरोबर चतुरस्त्र


अडवूनिया गोल 'एमिलिनो' चित्ते

'फ्रान्स' मग दिसे रिते राया


प्रेक्षकी परम अनुभव घेवा

'पेनल्टी' अंतीम, निर्णय देवा


अरे  'अर्जें-टिना' झाला सी पावन ⚽

'मेस्सी' तुझे ध्यान कळों आले


( गीत  किपर.)  अमोल 📝

१९/१२/२२

#माझी_टवाळखोरी 

#मेस्सी_जैसा_कोई_नही

Saturday, December 17, 2022

रंग बदमाश हो


 रविवारची_टवाळखोरी 📝


सध्या रंग लैच बेशरम झालेत. 

[

अशा घटना घडल्या की आमची लेखणी पण मग... 


आले रे आले रंगवाले

रंग फेका रंग फेका रंग फेका रे

 ]


खरं म्हणजे या 'रंगा'वलीने किती छान गाणी दिली आहेत

मी, तू पण गेले वाया,पाहता पंढरीचा राया

अवघा 'रंग' एक झाला

रंगी रंगला श्रीरंग !


अगदी असंच एक गाणं


अबीर गुलाल उधळीत 'रंग'

नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग 


भक्ती रंगात रंगलेली अशी अनेक गाणी आहेत. त्यातही गोकुळात रंगलेला रंगोत्सव तर विशेषच.


सांग श्यामसुंदरास काय जाहले

'रंग' टाकल्याविना कुणा न सोडले

ज्यास त्यास रंग रंग, रंग लागले

एकटीच वाचशील काय तू तरी?

राधिके जरा जपून जा तुझ्या घरी


रंगांचा चमत्कार दाखवायला निसर्ग तर जादूगारच असतो 

बदलती नभाचे रंग कसे ?

क्षणात निळसर,क्षणात लालस,क्षण सोनेरी दिसे !


काल वाटले स्पर्श नच करु

त्या कीटाचे होय पाखरू

वेगवेगळे रंग तयाचे, इंद्रधनू उडतसे 

!


असे हे "सात्विक रंग " अचानक बेशरम का व्हायला लागलेत?

याचा धुरंधर विचार करतीलच

पण आपल्याला तर हे एक कारण असेल असे वाटते👇🏻


नवानवापठान माझी शिनेमात जान

वाढवितो TRP याचा, "रंग बदमाश" हो


अमोल 📝

१८/१२/२२

poetrymazi.blogspot.com

Wednesday, December 14, 2022

बेशरमीचे रंग


 'बेशरमीचे उधळूनी रंग

'फ्रिडमच झालंय फ्रँक्चर '

गरज आहे अभ्यासाची

मूळ बेसिक ' स्ट्रक्चर '


#प्रासंगिक_रंग 📝

#बेशरम_रंग

#फ्रँक्चर_कँरेक्टर

१५/१२/२२

poetrymazi.blogspot.com

Saturday, December 10, 2022

रविवारची संकष्टी


 #रविवारची_संकष्टी 


महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना असे वाटत असते की त्यांचे बोलणे हे जनतेने

'शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलिकडले' असे घ्यावे


 पण होतं काय की

'अर्थ नवा ' वाक्यास येतो आणि 'घडू नये ते घडते '


यासाठीच मंगेश पाडगावकरांनी लिहिलेल्या एका गाण्याच्या पहिल्या ओळीचा अभ्यास वाचाळवीरांनी अवश्य करावा


*शब्द, शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी*🌼

 (नाहीतर

काय बोलले न कळे, तू समजून घे

फेकलीच शाई समज, मग तुझ्या अंगावरी)


श्री मघुसुदन कालेकर यांचे एक छान गाणे आहे

'सूर तेची छेडीता, गीत उमटले नव्हे ' तसेच या नेत्यांबद्दल सांगायचे झाले तर


'शब्द' एक काढता

'अर्थ ' उमटले नव्हे

मग लागले पक्षी , 'वाद' जे हवे हवे


विनाकारण ओढवून घेतलेले वाद, त्यानंतरच्या वादावादी, वातावरण बिघडणे, मागची उणी-दुणी काढणे याचा खरंच सर्वसामान्यांना कंटाळा आलाय


तेंव्हा आज संकष्टी निमित्य बुध्दीच्या देवतेचरणी प्रार्थना अशी की ,सर्वांनाच


शुद्धि दे, बुद्धि दे, हे दयाघना

शक्ति दे, मुक्ति दे, आमुचे मना


तरतम ते उमजेना, उमजेना सत्य

फसविते आम्हाला विश्व हे आणि

दिग्दर्शन मज व्हावे, हीच कामना


सत्वाला जर भ्रमले हे चित्त

ऋजुतेवर मात करी द्रोह जागा हा प्रमत्त

निर्भयता यावी  हीच प्रार्थना 


🙏🌺


#रविवारची_संकष्टी 📝

११/१२/२२

Thursday, December 8, 2022

इच्छापूर्ती


 'इच्छापूर्ती दत्त मंदीर'  नेरुळ 


 आज दर्शनाची प्रचंड रांग असल्याने केवळ मुख दर्शन घ्यावे म्हणून पुढे पुढे जात राहिलो. दरवर्षी प्रमाणे, सांस्कृतिक कार्यक्रम चाललेला होता.   दिग्दर्शकाने छान दिग्दर्शन  केलंय वगैरे शब्द कानावर येऊ लागले.चित्रपटाला रिलीज व्हायच्या आधीच ( ????) राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे असे ऐकताच उत्सुकता म्हणून जरा थांबलो. शंतनू, सायली वगैरे नाव ऐकू यायला लागली आणि लक्षात आलं की 'गोष्ट एका पैठणीची'  टीम उपस्थित आहे. 

सायली संजीवला एक प्रश्ण विचारला तिने टिपिकल उत्तर दिल्यावर कार्यक्रम संपला. ( कदाचित कार्यक्रम संपता संपता आम्ही गेलो असल्याने लवकर संपला असे वाटले)

आनंदाच्या भरात संयोजकांनी हा सिनेमा 'आँस्कर' मिळवू दे अशा शुभेच्छा दिल्या आणि मी परत एकदा इच्छापूर्ती दत्तमंदीराच्या कळसाकडे बघून ( कळस दिसत नसताना)  एक नमस्कार केला.

किमान देवाकडे इच्छा व्यक्त करताना कंजुषी करु नये ही मोठी शिकवण मला मिळाली.


 परतीच्या वाटेवर त्या अरुंद गल्लीत टिम पैठणी, आम्ही कुटुंब , काही कार्यकर्ते आणि २-३ मराठी मालिका बघणाऱ्या बायका इतकेच राहिलो.

जरा जवळून जाताना ही झिम्मा सिनेमातली बर का ! असं बायकोने मुलीला सांगताच , ओह! ओळखूनच येत  नाही आहे ही ! वगैरे भावना मुलीच्या चेह-यावर दिसू लागल्या.त्या भावनांचे शब्दात रुपांतर होण्याआधीच मी मुलीला  म्हणलं जा, आणि सायलीशी बोलून तिला सांग तुमचा 'झिम्मा' पिक्चर आवडला. 

हो नाही हो नाही करत शेवटी एकदा मुलगी जाऊन तिच्याशी बोलली. इतर २-३ बायका फोटो, सेल्फीसाठी आग्रह करुन तिच्याभोवती जमल्या.


 फक्त एवढ्याच बायका मागे आल्याने एकंदर मराठी मालिकांवर आलेले 

हे ग्रहण आहे?  की सायलीला नेरुळ सारख्या ठिकाणी कुणी फारसं ओळखलं नाही , का खरोखरच दत्तगुरुंच्या दर्शनापुढे एका हिरोईनच्या मागे लागू नये एवढ्या तात्विक विचारांची जागृती इतरांच्यात आली आहे? असे  काही प्रश्ण माझ्या मनात आले.


 बाजूला एकटाच उभ्या ( बिचा-या) दिग्दर्शकाकडे जाऊन सिनेमा संबंधीत थोडी विचारपूस केली. खूष झाले ते. दर्शन घेतलंत का त्यांनी विचारलं.म्हणलं नाही हो, यंदा यायला उशीर झाला आणि ती दर्शन रांग बघताय ना?

दिग्दर्शक म्हणाले , अहो हरकत नाही आमच्या सिनेमाची पहिली फ्रेम दत्तगुरुंचीच आहे. सिवूड,वाशीला सिनेमा लागलाय अवश्य बघा

हो हो असं म्हणत

(' आँस्कर वगैरे मिळो'  या शुभेच्छा त्यांना आधीच मिळाल्याने केवळ) "तुमचा सिनेमा यशस्वी ठरो" अशा पारंपारिक  शुभेच्छा देऊन मुख्य रस्त्यापर्यंत आलो.

मुख्य रस्त्यावर उभ्या एका ओला/ उबेर टाईप खाजगी वाहनात सायली बसताना ( बघा मराठी नट्यांवर काय वेळ आलीय ) ही , त्या बायकांनी अजून एक,  फक्त एक फोटो वगैरे करत परत हौस पुरवून घेतली.


मी परत एकदा गल्लीकडे तोंड करुन दत्तगुरुंना मनोभावे नमस्कार केला

आज दर्शन झाले नाही, २-३ दिवसात परत येऊन  दर्शन घ्यावे की मराठी सिनेमाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सिनेमातच तुमचे दर्शन घ्यावे ,याबाबत तुमची इच्छा प्रमाण🙏अशी प्रार्थना करुन घर गाठले


अमोल 📝

०७/१२/२२


#दत्तजयंती

#गोष्ट_एका_पैठणीची

#इच्छापूर्ती_दत्त_मंदीर

Related Posts Plugin for WordPress, Blogger...