नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Thursday, December 8, 2022

इच्छापूर्ती


 'इच्छापूर्ती दत्त मंदीर'  नेरुळ 


 आज दर्शनाची प्रचंड रांग असल्याने केवळ मुख दर्शन घ्यावे म्हणून पुढे पुढे जात राहिलो. दरवर्षी प्रमाणे, सांस्कृतिक कार्यक्रम चाललेला होता.   दिग्दर्शकाने छान दिग्दर्शन  केलंय वगैरे शब्द कानावर येऊ लागले.चित्रपटाला रिलीज व्हायच्या आधीच ( ????) राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे असे ऐकताच उत्सुकता म्हणून जरा थांबलो. शंतनू, सायली वगैरे नाव ऐकू यायला लागली आणि लक्षात आलं की 'गोष्ट एका पैठणीची'  टीम उपस्थित आहे. 

सायली संजीवला एक प्रश्ण विचारला तिने टिपिकल उत्तर दिल्यावर कार्यक्रम संपला. ( कदाचित कार्यक्रम संपता संपता आम्ही गेलो असल्याने लवकर संपला असे वाटले)

आनंदाच्या भरात संयोजकांनी हा सिनेमा 'आँस्कर' मिळवू दे अशा शुभेच्छा दिल्या आणि मी परत एकदा इच्छापूर्ती दत्तमंदीराच्या कळसाकडे बघून ( कळस दिसत नसताना)  एक नमस्कार केला.

किमान देवाकडे इच्छा व्यक्त करताना कंजुषी करु नये ही मोठी शिकवण मला मिळाली.


 परतीच्या वाटेवर त्या अरुंद गल्लीत टिम पैठणी, आम्ही कुटुंब , काही कार्यकर्ते आणि २-३ मराठी मालिका बघणाऱ्या बायका इतकेच राहिलो.

जरा जवळून जाताना ही झिम्मा सिनेमातली बर का ! असं बायकोने मुलीला सांगताच , ओह! ओळखूनच येत  नाही आहे ही ! वगैरे भावना मुलीच्या चेह-यावर दिसू लागल्या.त्या भावनांचे शब्दात रुपांतर होण्याआधीच मी मुलीला  म्हणलं जा, आणि सायलीशी बोलून तिला सांग तुमचा 'झिम्मा' पिक्चर आवडला. 

हो नाही हो नाही करत शेवटी एकदा मुलगी जाऊन तिच्याशी बोलली. इतर २-३ बायका फोटो, सेल्फीसाठी आग्रह करुन तिच्याभोवती जमल्या.


 फक्त एवढ्याच बायका मागे आल्याने एकंदर मराठी मालिकांवर आलेले 

हे ग्रहण आहे?  की सायलीला नेरुळ सारख्या ठिकाणी कुणी फारसं ओळखलं नाही , का खरोखरच दत्तगुरुंच्या दर्शनापुढे एका हिरोईनच्या मागे लागू नये एवढ्या तात्विक विचारांची जागृती इतरांच्यात आली आहे? असे  काही प्रश्ण माझ्या मनात आले.


 बाजूला एकटाच उभ्या ( बिचा-या) दिग्दर्शकाकडे जाऊन सिनेमा संबंधीत थोडी विचारपूस केली. खूष झाले ते. दर्शन घेतलंत का त्यांनी विचारलं.म्हणलं नाही हो, यंदा यायला उशीर झाला आणि ती दर्शन रांग बघताय ना?

दिग्दर्शक म्हणाले , अहो हरकत नाही आमच्या सिनेमाची पहिली फ्रेम दत्तगुरुंचीच आहे. सिवूड,वाशीला सिनेमा लागलाय अवश्य बघा

हो हो असं म्हणत

(' आँस्कर वगैरे मिळो'  या शुभेच्छा त्यांना आधीच मिळाल्याने केवळ) "तुमचा सिनेमा यशस्वी ठरो" अशा पारंपारिक  शुभेच्छा देऊन मुख्य रस्त्यापर्यंत आलो.

मुख्य रस्त्यावर उभ्या एका ओला/ उबेर टाईप खाजगी वाहनात सायली बसताना ( बघा मराठी नट्यांवर काय वेळ आलीय ) ही , त्या बायकांनी अजून एक,  फक्त एक फोटो वगैरे करत परत हौस पुरवून घेतली.


मी परत एकदा गल्लीकडे तोंड करुन दत्तगुरुंना मनोभावे नमस्कार केला

आज दर्शन झाले नाही, २-३ दिवसात परत येऊन  दर्शन घ्यावे की मराठी सिनेमाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सिनेमातच तुमचे दर्शन घ्यावे ,याबाबत तुमची इच्छा प्रमाण🙏अशी प्रार्थना करुन घर गाठले


अमोल 📝

०७/१२/२२


#दत्तजयंती

#गोष्ट_एका_पैठणीची

#इच्छापूर्ती_दत्त_मंदीर

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...