नवसाचा_लेख
न.मा.न २ बद्दल थोडंसं. तर मंडळी न.मा.न १ हा तुमचा आवडता सिनेमा होता म्हणून जर तुम्ही सिनेमाला जाणार असाल तर जरा
द.मा.न च घ्या
न.मा.न १ ची जशी प्रत्येक फ्रेम खिळवून ठेवते तसं २ मधे वाटत नाही.
१ बघताना मुंबई -गणपतीपुळे एशीयाडचे आपण प्रवासी आहोत इतकं वास्तव चित्रण होतं, तसा भास होण्यास २ थोडा अपयशी ठरतो.
दादर हून रत्नागिरी कडे जाणारी कोणती रेल्वे इतकी मोकळी असते ओ 🤷♂️, डब्यात आत सहज फिरता येतं?
एरवी प्रवाश्यांपेक्षा दुप्पट संख्येने फेरीवाले असतात, इकडे फक्त चहा-कॉफी सूपवाला?
क्राॅसिंग हा या प्रवासाचा अविभाज्य घटक असताना ही अशी कोणती गाडी होती जी सुसाट धावते? कोकणी माणसाला हे पचणे शक्यच नाही.
कोकण रेल्वेच्या डब्यात 'तिकीट चेकर' असतो?
बसण्याच्या सिट्स सोडून तिथेच खाली बसलेले ,दरवाजात बसलेले प्रवासीच नाहीत?
दादर- पनवेल-खेड- रत्नागिरी या स्थानकावर गाडी थांबली असताना एक ही वडा-पाव विक्रेता नाही?
कसं शक्य आहे हे?
नाही म्हणलं तरी 'पनवेल' स्टेशन वर डब्याचे दार उघडले जात नसल्याने वैतागलेला प्रवासी, शौचालयातून दोन वेळा एकदम ३-३ प्रवासी एकत्र बाहेर येणे हे चित्रण त्यातल्या त्यात 'कोकण रेल्वे' प्रवासास धरून आहे असं म्हणता येईल.
बस मधून प्रवास करताना कोकणाचा जो निसर्ग अनुभवता येतो त्याच्यापेक्षा किती तरी पटीने जास्त चांगले निसर्ग सौंदर्य हे प्रत्यक्ष कोकण रेल्वे रुट वर आहे असं मला वाटतं. पण फक्त अधून मधून ड्रोन मधून काही सेकंद धावणारी रेल्वे दाखवून 'उकडीच्या मोदकाची' भूक, तळलेल्या मोदकावर भागवली आहे असे म्हणता येईल. समांतर धावणारा मुंबई - गोवा महामार्ग हा ही या प्रवासाचा एक घटक असतोच असतो. ती फ्रेम ही मिस झालीय.
( ५० खोक्यांचा ओझरता उल्लेख आला, आता आणखी गोवा हायवेची खपली कशाला काढायची असा सूज्ञ विचार झाला असण्याची शक्यता 😊)
तर मंडळी महागुरु सचिन आणि मराठी सिनेसृष्टीचा 'अनिल कपूर' म्हणजेच 'स्वप्नील जोशी ' ही प्रत्यक्षात भावा-भावांची वाटणारी जोडी , सासरेबुवा - जावई म्हणून कशी वाटते हे मात्र आम्हाला बिलकुल सांगता येणार नाही, त्यामानाने आई-मुलगी-सासू त्रिकूट फ्रेश वाटलं
अशोक मामा मात्र सुपर डुपर हिट ✌🏻
( यांच्या फॅन्सनी सिनेमा चुकवू नये)
नवसाचं ही एक क्राॅस कनेक्शन दाखवलयं म्हणजे पुळ्याच्या गणपतीचा नवस फेडला जावा म्हणून इकडे सिध्दिविनायकाला साकडे घातले जाते आणि त्याचाही कौल मिळतो. हा प्रकार जाम आवडला
'आणि म्हणून' याच धर्तीवर. 'मंथ एन्ड' ची गडबड संपल्यावर आम्ही 'इच्छापूर्ती वरदविनायका' कडे जाऊन नवस बोलणार आहोत की
आम्हाला ही आयुष्यात एकदा तरी आमच्या कुलदैवताला दर्शनाला कोकण रेल्वेने जाताना ' न.मा.न.२' मधे दाखविल्याप्रमाणे निवांत रेल्वे प्रवास होऊ दे. मग महड ला येऊन
' गणेश यज्ञ' करु
अवांतर: ज्यांचा विश्वास आहे त्यांनी अवश्य नवस करावेत, इच्छा पूर्ण झाल्यावर फेडावेत. पण नवस फेडण्याची प्रक्रिया पूर्ण कपडे घालून ही करता येते हे एक ज्योतिष अभ्यासक म्हणून आवर्जून सांगेन.
चला ना, चला ना, चला ( आला) वेन्सडे....
#नवसाचा_लेख_टवाळखोरीही_नवसाची 📝
२५/०९/२४
No comments:
Post a Comment