नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Sunday, January 5, 2025

नववर्षाची_सुगंधीसंध्या


#नववर्षाची_सुगंधीसंध्या 🎼🎤

( आमची नववर्षातील पहिली फुसकुंडी)



काल पनवेलला वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महेश काळेंच्या या कार्यक्रमाला जायचा योग आला. जुने पनवेल इथे हे नाट्यगृह आहे. या नाट्यगृहात पोहोचल्यावर,विष्णुदास भावे नाट्यगृह आणि सांगली आठवली. जुने पनवेलचे वातावरण, परिसर ,रसिक प्रेक्षक अशा अनेक गोष्टीत साम्य वाटलं.

वर्षातील पहिल्याच विकेंडला शास्त्रीय +उपशास्त्रीय मैफिली साठी भरलेले नाट्यगृह पाहून काळे बुवा ही खुष झाले आणि उपस्थितांचे अभिनंदन करुन 'बंदिश' सुरु केली.

गाणे सादर करता करता बुवा प्रेक्षकांशी संवाद साधत होते. असंच बोलताना ते म्हणाले की हा जो मागे तंबो-यावर मला साथ देत आहे तो तुमच्या पनवेलचा आहे बरं! दहावी पासून सुरु केलाय रियाज आणि आज तो केमिकल इंजिनिअरींगच्या दुस-या वर्षाला आहे. हे ऐकून क्षणभर अंगावर रोमांच आले.

हर्षा भोगले पासून अमोल केळकर पर्यंत वाया गेलेल्या केमिकल इंजिनिअर्स मधे दोन वर्षांनी अजून एकाची भर पडणार असा विचार मनात आला. कदाचित हा विचार बरोबर नसेल माझा पण काळे बुवांना साथ देणारा गायक नंतर लोटे-परशुराम मधील एका केमिकल कंपनीत कन्ट्रोल रुम मधे बसून कुलींग टाॅवरचा व्हाॅल चालू-बंद करतोय, प्रेशर व्हेसल मधील तापमान सेट करतोय वगैरे विचार त्याक्षणी तरी मला एकदम चुकीचे वाटले.

मनातली ही रिअँक्शन इतकी पुढे गेली की बुवांच्या मागे जो मोठ्ठा फलक लावला होता ( वरच्या चित्रात बघू शकाल) त्यातील. 'पांढरे ढग' हे केमिकल कंपनीतून बाहेर पडणारे विषारी वायू वाटू लागले आणि तंबोऱ्याची सावली ही चेंबूरच्या RCF कंपनीतील युरिया टाँवर वाटू लागला ( बघा परत एकदा चित्र)

अर्थात सुदैवाने काळे बुवांमुळे वेळीच ही रिअँक्शन थांबली जेंव्हा त्यांनी तंबो-याला " नादब्रह्म " हा शब्द सांगितला.  ( इतके दिवस नादब्रह्न म्हणजे इडली हेच आम्ही समजत होतो) आणि पुढच्या इतर बंदिशींची, नाट्यसंगीत,सुगम,भावगीतांच्या कँटेलिस्टने आम्ही वेळीच 'नाद'ब्रह्माच्या केमिस्ट्रीत तल्लीन झालो.

दोन - अडीच तासाची मैफिल संपली आणि पडदा पडत असताना प्रेक्षकां मधून आवाज आला ' कानडा राजा पंढरीचा '

प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रम संपल्या नंतर परत ७ मिनीटे जे काळे बुवा गायले तिथेच आमचे पैसे वसूल झाले.

काळेंनी मैफिलीत जे एक गाणे ऐकवले तेच जरा वेगळ्या शब्दात


'जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले

गोड गाणे ऐकले, महेशाचे


( संगीत प्रेमी)  अमोल

६/०१/२५


ता.क : ज्यांची आयुष्यात गाणं शिकायची इच्छा अपूर्ण राहिली असेल त्यांनी महेश काळेंच्या कार्यक्रमाला जावे, निम्मा वेळ ते प्रेक्षकांना गाणे शिकवण्यात घालवतात. आयोजकांनाही विनंती की त्यांनीही बुकिंग साईट वर उल्लेख करावा की एवढे जास्त तिकीट हे गाणे ऐकणे+ शिकणे याचे आहे.


म्हणजे आमच्या सारख्या फक्त गाणे ऐकायला इच्छुक असणाऱ्या रसिकांचा भ्रमनिरास होणार नाही 😉

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...