नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, August 28, 2019

मंद- मंदी


# 'मंद'मंदी 😬

मुळ नाटक : मत्स्यगंधा
( चाल : तू तर चाफेकळी )

दर्द सभोती आज काळजी, ही तर 'मंदी'आली
काय हरवले सांग शोधिशी,या 'निफ्टीच्या' जळी ?

ती 'मंद'माला म्हणे नृपाळा,  हे तर माझे घर
राहून बघते मी तर इथे  'अच्छेदिन' हे सुदंर

रात्रीचे चौकीदार पाहुनी, हाकलतील मंदे तुला
तू चेटकीण, दिसे भुवनी ना तुझिया रूपा तुला

रागमुखी अन नाकाsश्रू , पसरे गालांवरी
विसरू तुजला घेऊ तेजीला, जा चल इथून त्वरी

दर्द सभोती आज काळजी, ही तर 'मंदी'आली
काय हरवले सांग शोधिशी 'या निफ्टीच्या जळी ?

📝 २८/८/१९
poetrymazi.blogspot.in

Friday, August 23, 2019

वडा- पाव डे


आज काय तर "वडा-पाव" डे म्हणे ( २३/८ ??).

 क्षणभर 'मंदीचा' विचार बाजूस ठेऊन मस्त वडापाव घेतला ऐरोली स्टेशनला आणि हे सुचले...😋
कळवा ते कल्याण आणि बोरिवली ते बेलापूर कुठेही अगदी सहज मिळणाऱ्या लाडक्या
वडा-पाव ला समर्पित
( चाल: उष:काल होता होता)

वडा पाव खाता खाता, ब्रह्मानंदी टाळी
अरे पुन्हा नवा 'घाणा' लगेच झाला खाली

आम्ही चार मिरच्यांची ती आस ही धरावी
जे तयार नव्हते त्याची, वाट का पहावी
का ही  'मंदी' अंधारातून, होते वरखाली
अरे पुन्हा चहाची ती पेटवा किटली

धुमसतात अजूनी गरम, वड्यांचे निखारे
तरीही एक खात थांबती पावासंगे सारे
आसवेच डोळ्यातून हलके निघाली
अरे तरी वड्याची ती तल्लफ निराळी

वडा पाव खाता खाता, ब्रह्मानंदी टाळी
अरे नवा 'घाणा' ही लगेच झाला खाली

📝 वडा -पाव डे ( २३/८)
poetrymazi.blogspot.inव.     
पय

Wednesday, August 21, 2019

वेगवेगळी फुले उमलली


या ' *फुलांच्या*' गंधकोषी सांग तू आहेस ना  ?  : -
🌸     🌹   🌺   🌷

निसर्गाने ज्या अनेक विविध गोष्टी  'मुक्त हस्ताने'  या  सृष्टीला दिल्या आहेत  त्यातील  एक नाजूक आणि सर्वांनाच आवडणारी गोष्ट म्हणजे 'फुल' .  मानवी स्वभावानुसार  अनेकांना अनेक वेगवेगळी फुले  भुरळ घालतात . आपल्याला अशी वेगवेगळी  फुले आवडतात मग देवांनाही आवडत असावीत म्हणून  एखादे विशिष्ट 'फुल' विशिष्ट देवाचे लाडके असे सुसंगीत वर्गीकरण  या मानवानेच केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तर  या फुलांचे प्रकार , वगैरे  या शास्त्रीय प्रकारात न पडता  वेगवेगळ्या गाण्यातून , कवितेतून ही  फुले ओंजळीत घेण्याचा हा एक छोटा प्रयत्न

 या फुलांची 'धुंदी'  गीतकार / संगीतकारांना आली  की मग मुक्या भावना ही किती छान शब्द  रूप घेऊन येतात बघा :👉🏼

*तुझ्या जीवनी नीतीची जाग आली*
*माळरानी या प्रीतीची बाग झाली*
*सुखी आज माझ्या सुखाचा उखाणा*

*धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना*,  शब्दरूप आले मुक्या भावनांना

एक चिरंतन धडा आपल्या शामला देताना त्याची आई त्याला म्हणते
" शाम , पायाला घाण लागू नये म्हणून इतका जपतोस, तसे मनाला ही घाण लागू नये म्हणून जप हो .

या घटनेला  साक्षीही *फुलेच* होती कारण हे सर्व संभाषण 'देवाची फुले' काढण्यावरूनच झालं होतं.

चला थोडं पुराणात ही डोकावू . पारिजातक फुलाविषयी

पारिजातका विषयी ब-याच आख्याईका आपल्या संस्कृतीत ऐकीवात आहेत..जसे की एकदा देवर्षी नारदाने, श्री कृष्णाला पारिजातकाची फुले भेट म्हणुन दिलीत. श्री कृष्णाला ती खुप आवडलीत.. त्यांनी ती रुक्मिणीला दिलीत. रुक्मिणी पारिजातकाची फुले पाहुन हरखुन गेली आणि तीने लगेच ती आपल्या केसात माळलीत. ही वार्ता सत्यभामे पर्यंत पोहचताच तीला खुप राग आला आणि तीने श्री कृष्णाजवळ हट्टच धरला की मला हा वृक्ष आपल्या वाटीकेत लावायचे आहे. श्री कृष्णाचे सत्यभामेच्या हट्टा पुढे काही एक चालले नाही.त्याने इंद्राशी युद्ध करुन
हे वृक्ष मिळवले आणि सत्यभामेने ते मोठ्या आनंदाने आपल्या वाटिकेत लावले. पण झाले असे के वृक्ष सत्यभामेच्या वाटिकेत आणि फुलांचा सडा मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असे. त्यामुळे देखिल सत्यभामेचा, रुक्मिणी बद्दल चा मत्सर वाढतच गेला.. ( *माहिती संग्रहित*) .
यावरचे मराठी नाट्यगीत
' *बहरला पारिजात दारी, फुले कां पडती शेजारी* '

पारिजातकावरचे आणखी एक गाणे:-
*परसात पारिजातकाच्या सडा  पडे*
*कधी फुल वेचायला  नेशील तू गडे*
*कपिलेच्या दुधावर मऊ  दाट  साय*
*माया माझ्यावर दाट जशी तुझी माय*

पाडगावकर आपल्या एका बाल कवितेत बघा काय म्हणतात -

*टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिर भिर भिर भिर त्या तालावर गाणे आमुचे जुळे*

कवितेचा विषय निघाला म्हणून ना. धो महानोर याची एक कविता

*फुलात न्हाली पहाट ओली , क्षितिजावर चंद्र झुले*
*नभात भुकल्या केशरियाचे रंग फुलावर ओघळले*

जे न देखे रवी , ते देखे कवी , बघा या गाण्यात चक्क पावसाचे फुल केलंय
" *माळते माळते  माळते  मी माळते*
*केसात पावसाची फुले मी माळते*

काही मराठी गाण्यात फुल कशी डोकावलीत बघा

*समईच्या शुभ्र कळ्या ...*
*गंध फुलांचा गेला सांगून ...*
*मोगरा फुलला ...*
*स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा ...*
*बगळ्यांची माळ  ' फुले ' अजुनी अंबरात*..
*या बाई या बकुळीच्या झाडाखाली  ...*
*चाफा बोलेना..*
रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा ( तुझे गीत गाण्यासाठी)

ही काही गाणी ( साभार: *सुमेधा दातार*)

*गुलाबाची* कली बघा हल्दीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली

लपविलास तू हिरवा चाफा

चंपा चमेली की जाई अबोली , पहा माझी वहिनी अशी

कळले काही तुला कळले काही मला
लाल आला तुरा गुलमोहरा , हाच प्रीतीचा पहिला इशारा

घाई नको बाई अशी
आले रे बकुळफुला

आणि हे एक माझ्या आवडीचे

*दावा कोकणची निळी निळी खाडी*
*दोन्ही तीराला हिरवी हरवी झाडी*
*भगवा अबोली फुलांचा ताटवा*
*तिच्या घोवाला कोकण दाखवा*

छोट्या छोट्या कीटकांना  ही फुले आवडतात. मग तो कमळीच्या(🌷) मागे लागलेला ' *नादान भवरा* असो   किंवा ' *फुल' पाखरू* असो ' *छान किती दिसते'*   ना ?

हिंदी मध्ये एक दोन संदर्भ सांगतो. दुरदर्शनवरचा एक प्रसिद्ध कार्यक्रम ' *फुल खिले है गुलशन गुलशन*' आणि सादरकरणा-या ' तबस्सूम ' यांचा  चेहरा एका टवटवीत फुलाला लाजवेल असा , मन प्रसन्न करणारा  आणि एक गाणे
 ' *फुलों ' का तारोका सबका कहना है , एक हजारो मे मेरी बहना है* - बघा म्हणजे आपल्या बहिणीची महती सांगायला ता-यांबरोबर साक्षात फुलांची साक्ष.

' फुल और  काटे'  नावाचा एक हिंदी सिनेमा येऊन गेला .  नाही हा संदर्भ एवढ्याच साठी की  'फुल आणि काटे' या शब्दांचाच उल्लेख  असलेले एक मराठी नाट्यगीत . जीवनाचा दृष्टिकोन  सांगणारे , आशावादी  राहण्यास शिकवणारे
' *काटा रुते कुणाला, मज फुल ही रुतावे, हा हा हा हा दैव योग आ ss s हे*


मंडळी  हा फुलांचा संगीतरूपी ताटवा  तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो. काही फुले माळायची राहून ही गेली असतील . हा लेख वाचून यातील एक तरी गाणे तुम्ही आज दिवसभरात गुणगुणलेत किंवा इथे उल्लेख न केलेली फुलांची गाणी तुम्हाला आठवली तरी या लेखाचे सार्थक झाले असे म्हणेन.

लेखनमालेच्या शेवट या ओळींनी

*वेगवेगळी  फुले उमलली रचूनी त्याचे झेले*
*एकमेकांवरी उधळले गेले .... गेले ते दिन गेले*

🙏🏻🌺

( फुलंकित ) अमोल केळकर 📝
poetrymazi.blogspot.in

Thursday, August 15, 2019

यंदाचा स्वातंत्र्य दिन


यंदाचा स्वातंत्र्य दिन

यंदाचा स्वातंत्र्य दिन
कुणासाठी वेगळा खूप
काही ठिकाणी नव- चैतन्य
काही भाग चिडी- चूप

यंदा स्वातंत्र्य दिनी
नव्हती जिलबीची गाडी
अजूनी स्वच्छ व्हायचीय
माझ्या गावाकडची वाडी

उत्साह नव्हता चौकात
नव्हती देशभक्तीची गाणी
पात्रात जरी गेलं तरी
डोळ्यात अजून पाणी

कोण चुकलं, बरोबर कोण
आरोपीच्या पिंजऱ्यात निसर्ग
कळलं नाही, कळणारही नाही
धरणातून करावयाचा विसर्ग

झालं गेलं  'कृष्णार्पण'
सोपा सगळ्यात द्यायला धीर
'ज्याचं जातं त्यालाच कळतं' भले
' पगडी पचास जरी सलामत शीर '

मना मधली  राष्ट्रभक्ती
हातावरचे 'रक्षा' बंधन
संकटात धावलेल्या त्या
'माणूसकीला त्रिवार  वंदन'
🙏🏻🙏🏻🙏🏻

📝१५/८/१९

Saturday, August 3, 2019

तुषार ४/८/१९ ( मेगा ब्लाॅक)


तुषार ४/८/१९

कृष्णा माई


सांगलीकरांच्या लाडक्या 'माईस' समर्पित
🙏🏻🌺

( चाल: रम्य ती स्वर्गाहून लंका)

धन्य ती पूरातील कृष्णा
हिच्या पाण्याच्या जीवन लहरी भागविती तृष्णा

सुजलाम् सांगली अशी ही नगरी
आनंद होत असे कृष्णा तिरी
त्या नगरीवर 'कृष्णा' नियमित, करिते अभिषेका

'कृष्णा-कोयना' दोघी भगिनी
उभय उपजल्या या जलधितुनी
या कृष्णेचा 'आशीर्वाद' तरी 'टुकारा' घेशील का?
 🏊🏻🚣🏼
📝३/८/१९
poetrymazi.blogspot.in

Monday, July 29, 2019


स्विगी , झोमॅटो वरून आॅर्डर करणा-या
 ' खाद्यप्रेमींना ' समर्पित
🍱🍣🥘🥗🌯🥫🥪🥙🌮

( चाल : देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा उघड दार देवा आता, उघड दार देवा)

स्विगीची भाकरी , झोमॅटोचा मेवा
उघड अॅप भावा आता उघड अॅप भावा

इथे खाणे घरी बसुनी  रीत  माणसाची
'मनी' खात्यामध्ये असता भीती ना कशाची
सरावल्या बोटांना मग कंप का  सुटावा

उघड अॅप भावा आता उघड अॅप भावा

( *मृगजळ* )
झटक्यात दिसते 'सूट' उघडताच अॅप
ज्याचे त्याचे हाती आहे 'कूपनचे' माप
'प्रिय बायकोची' ऐसी, घडे नित्यसेवा ☺

उघड अॅप भावा आता उघड अॅप भावा

( *प्रत्यक्षात* )
'दर' जणू उजवीकडचा भासतो बिलोरी
आपुलीच ' ऑर्डर' होते  आपुलीच वैरी
घरोघरी 'पार्सलाचा ' मेळ जमवावा

उघड अॅप भावा आता उघड अॅप भावा

तुझ्या हाती पांडुरंगा ऑर्डर पडावी .
मुक्तपणे भूक माझी अशी चाळवावी.
मार्ग तुझा ' गुगल'वरचा मला आकळावा.

उघड अॅप भावा आता उघड अॅप भावा

पिझ्झा-बर्गर साठी आता बुजरेपणा गेला .
बंधनात बसुनी वेडा ' जंक ' युक्त झाला
पोटाच्या या घेरीचा करील तोच हेवा

उघड अॅप भावा आता उघड अॅप भावा

 📝: विसंगती सदा मिळो
poetrymazi.blogspot.in

अमोल

Wednesday, July 24, 2019

अंधाराची' खंत तू कशाला करशी रे....


*'अंधाराची'  खंत  तू कशाला करशी  रे*...🌌

मंडळी  नमस्कार 🙏🏻

आज परत एक  वेगळा विषय मांडतोय.  दिवसातल्या २४ तासात सरासरी  किमान १२ तास  तरी या  गोष्टीशी आपला संबंध  येतोच. किंबहुना आपल्या जन्माआधी ९ महिन्यापासूनच याची आपल्याला ओळख व्हायला सुरवात झालेली असते त्यामुळे प्रत्यक्ष भूतलावर जेव्हा आपला अवतार होतो तेव्हा काही अपवाद ( बालपण )  वगळता आपण नकळत याच्याशी जुळवून घ्यायला लागतो. हाच तो
' *अंधार* ' . अगदी जीवनात प्रत्येक टप्प्यावर भेटणारा, नवीन गोष्टी शिकवणारा पण तरीही सहजा सहजी ' हवा हवासा ' न वाटणारा.

दिवस म्हणजे  प्रकाश आणि रात्र म्हणजे अंधार आणि  रात्रीचा / अंधाराचा  रंग काळा म्हणून  अंधाराचे प्रतीक असणा-या 'काळ्या' रंगाला ही नकळत नाकारले जाणे हा मानवी स्वभावच म्हणायला पाहिजे ना ? उदा. मंगल प्रसंगी ( काही अपवाद वगळता ) काळे कपडे न घालणे, शक्यतो काळ्या रंगाची गाडी न घेणे, बुद्धीबळ खेळात काळ्या सोंगटीने खेळणारा
पांढरी सोंगटी घेऊन खेळणा-याच्या नंतरच खेळणार,कॅरम मधे ही काळ्या सोंगटीला कमी गुण ते  अगदी काळे- गोरे  वंशवादा पर्यंत लिहिता येईल. पण तो विषय नको.

कुठल्याही घरात जास्त दंगा केल्यावर  तो बघ हं तिथे अंधारात ' बागुलबुवा ' आहे अशी भीती घातला गेलेला  चिंटू, बंडू , मोनू  नसेल असे शक्य वाटत  नाही. वयाने मोठे झाल्यावर 'जा रे  त्या खोलीतून अमुक गोष्ट घेऊन ये 'असे सांगितल्यावर  कुठल्याही घरात , ' नाही बाबा मला भीती वाटतीय, अंधार आहे , कुणी तरी लाईट लावून द्या '  असे बोल ऐकायला मिळाले नसतील असेही  वाटत नाही.

 ' *अरे जा काही होत नाही आम्ही आहोत इथे* ' हे पाठींब्याचे बोल आणि संध्याकाळी अंधार पडला की
  ' *शत्रूबुध्दी विनाशाय , दीपज्योती नमोस्तुते  ही प्रार्थना* ' या गोष्टींनी  मात्र लहानपणी
' अंधाराशी ' दोन हात करायाला बळ दिले  हे खरं.

आणि मग अंधाराशी हळूहळू  मैत्री व्हायला सुरुवात झाली . नाट्यगृहात/ सिनेमात खेळ चालू होण्यापूर्वीचा अंधार, अचानक रात्री जेवताना किंवा दूरदर्शनवर कार्यक्रम बघताना दिवे जाऊन झालेला अंधार ,  रातराणी बस मधे तिकीट काढून झाल्यावर डबल बेल वाजवून वाहकाने चालकाला दिवे बंद करण्याची सूचना दिल्यानंतर काही वेळात झालेला अंधार, आषाढात भर दुपारी  आकाश भरून झाल्यानंतर चा अंधार ते खास बायकोसाठी ( इथे आवश्यकतेनुसार मैत्रीण ही घ्यायला हरकत नाही ) कँडल नाईट डिनर साठी मुद्दाम जुळवून आणलेला अंधार ? किती विविध रूपे ना अंधाराची?

 मंडळी ,यात शाळेतीळ निकालाची प्रत आई - बाबा / नातेवाईकांच्या हाती लागल्यानंतर दिवसाही चमकलेले 'अंधारातील तारे'  फक्त विचारात घेतलेले नाहीत 🤩

पण खरं सांगू मला  या सगळ्या अंधारात एक अंधार खूप आवडायच्या जो मी अजूनही  एन्जॉय करतो तो म्हणजे
 ' बोगद्यात ' गेल्यावर होणारा अंधार. अगदी आजही मुंबई - पुणे  मेगा हायवेवर कामशेत असू दे, भागतन असू दे किंवा खंडाळ्याचा बोगदा असू दे  अगदी स्वतः गाडी चालवत असलो तरी  वाटत मस्त लहानपणी  जेव्हा  ' पेशवे पार्कात 'फुलराणीत' बसून गाडी बोगद्यात गेल्यावर  किंवा शाळेच्या सहलीतून  सज्जनगडला जाताना 'अजिंक्य तारा ' किल्याच्या  बोगद्यातून सगळ्या मित्रांसकट  जोरजोरात ओरडायचो तसे ओरडावे.  घेतलीय तुम्ही  अशी मजा ओरडण्याची.????

लहानपणी सांगलीत राजवाड्याच्या तटबंदीतून जाताना लागाणारा बुरुज/ प्रवेशद्वार म्हणजे एक लहान बोगदाच वाटायचा , पुण्याला लहानपणी मामा कडे जाताना लागणारा कात्रजचा बोगदा, पुढे  लोणावळा- खंडाळा  रेल्वे रस्ता मार्गावरचे , कोकण रेल्वे वरचा रत्नागिरी जवळचा  सगळ्यात लांब बोगदा आणि इतर बोगदे , कल्याण ठाणे मधील पारसिक हिल बोगदा , अगदी बेलापूर मधील हार्बर लाईनवर असलेला बोगदा , माथेरानला टाॅय ट्रेन मधून लागणारा बोगदा ,कामानिमित्य कसारा- नाशिक , जबलपूर पर्यत लागलेले बोगदे  ते अगदी आजकाल तयार झालेला कर्जत - पनवेल नवीन मार्गावरचा बोगदा  ते ईस्टर्न फ्री वे वरचा चेंबूरचा बोगदा

 यासगळ्यांनी एकच शिकवलं   आयुष्यात अनेक टप्प्यावर  , वेगवेगळ्या वेळी , वेगवेगळ्या कालावधीचे बोगदे (प्रती) अंधार  येईल पण  त्यानंतर असेल फक्त प्रकाश ...

तेव्हा
 ' *अंधाराची'  खंत  तू कशाला करशी  रे ....... गा प्रकाश गीत*

आता गाण्याचा विषय निघालाच आहे तर ' अंधारावरची काही गाणी/ कविता पाहू

तिन्ही सांजा झाल्यावर  जेव्हा अंधाराची चाहूल लागते तेव्हा
 " चिमणी आई" ही आपल्या पिल्लाना साद घालताना म्हणते

" दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर
अशा अ वेळी असू नका रे आईपासून दूर
चूक चूक करिते पाल उगाच चिंता मज लागल्या
या चिमण्यांनो  परत परत फिरा रे घरा कडे आपुल्या ,
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या.

देऊळ सिनेमा त ही एक असंच गाणं आहे.  जीवनात एका टप्प्यावर  खूप निराश झालेला एक भक्त स्वामी समर्थांची याचना करता ना म्हणतोय ,

" अंधार  दाटला  दाही  दिशाना , सांगावे कसे मी सा-या जगाला..... रे स्वामी राया  "

मनाची एकदा समजूत झाली  की "भिऊ नकोस , स्वामी तुझ्या पाठीशी आहे" की
मग हे " अंधाराचे जाळे फिटून , वाटतं ( आता)  झाले मोकळे आकाश "

एकंदर उत्साह  वाटायला  लागतो  अशावेळी  ही प्रकाशाची पणती जपून ठेवायची.

थोडा उजेड ठेवा , अंधार फार झाला
पणती जपून ठेवा, अंधार फार झाला

आले चहू दिशांनी तुफान विस्मृतींचे
 नाती जपून ठेवा, अंधार फार झाला

मराठी विज्ञान परिषद ( मुंबई ) यांनी एक 'विज्ञान गीत'  त्यांच्या संकेतस्थळावर दिलय. त्याचे धृपद किती छान आहे बघा

संपला अंधार आता , सूर्य ज्ञानाचा उदेला
लागल्या वाटा दिसायला, शक्ती लाभे चालण्याला !!

मंडळी लेख आवरता घ्यायची वेळ आली. तुम्हाला खोटं वाटेल पण काल आषाढ  कृष्ण पक्षाच्या सप्तमीला ' *अंधेरीच्या* ' लोखंडवाला गेटच्या बाहेर बसून हा लेख मला सुचला आहे.😬
 तुम्हाला नक्की आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो

प्रकाशाच्या  एका किरणाने
" श्रावण "  फुलू दे जीवनात
माफ करा मंडळी  जर
काही चुकलं असेल लिहिण्यात.

📝 अमोल केळकर

Sunday, July 21, 2019

सुंदर ते यान


चंद्रयान २ ला - काव्यमय शुभेच्छा
( चाल : सुदर ते ध्यान , उभे विटेवरी ) 🚀🌝

सुंदर ते यान, उभे जाण्यावरी
जीएसएलव्हीएमके लावुनिया !! १ !!

वायरी सर्व जोडा, दिसते  झुंबर
चालले निरंतर चंद्र यान !! २ !!

'उत्तरा भाद्रपदा ' तळपती गगनी
राशी 'मींन' शशी  विराजित !! ३ !!

' इस्रो ' म्हणे माझें  हेचि सर्व सुख
दावीन चंद्रपृष्ठ  आवडीने !! ४ !!

📝अमोल केळकर २२/७/१९


Monday, July 15, 2019

माॅर्गन खुलला, माॅर्गन खुलला


काल एवढा रोहमर्षक सामना झाला. मग कुणीही विजेता कप्तान  खुलणारच ना 🏆🏏💂🏻

( चाल: मोगरा फुलला, मोगरा फुलला)

माॅर्गन खुलला, माॅर्गन खुलला
झेल टाकीता खेळाडू ,कप यांचा झाला 🏆

दुसरी ती धाव , धाऊनिया भारी
तोच चेंडू गेला,  बाँन्डरीवरी

माॅर्गन खुलला, माॅर्गन खुलला

नियमांचीये गुंती, घोळघातला गेला
दोन चौकारापरी 'साहेबा' अर्पिला

माॅर्गन खुलला, माॅर्गन खुलला
झेल टाकीता खेळाडू ,कप यांचा झाला 🏆

📝१५/७/१९
poetrymazi.blogspot.in

मुळ गाणे :-

मोगरा फुलला मोगरा
फुलला.
फुलें वेंचितां बहरू
कळियांसी आला ..

इवलेंसे रोप लावियलें
द्वारी.
त्याचा वेलु
गगनावेरी ...

मनाचिये गुंती
गुंफियेला शेला.
बाप रखुमादेविवरी
विठ्ठलें अर्पिला

चंद्रयान चंद्रग्रहण आणि व्हाट्सप




मंडळी तांत्रिक अडचण वगैरे  आली हे एका दृष्टीने बरंच झालं म्हणा. तसही ' मूळ' नक्षत्रावर यान सोडले जाणे  हे उचित झालेच नसते. ' मूळपदावर ' येणे हाच ' मूळ नक्षत्राचा मूलमंत्र असतो. काय योगायोग बघा ना ५६ मिनिटे बाकी असतानाच  हे लक्षात आले. आता गेल्या काही वर्षात  ५६ या अंकाला  भारत भूमीत आलेले  महत्व पाहता   ही विष्णू कृपाच  नव्हे काय ? .

काय उपयोग मग त्या  अध्यक्षांचा जे  कुठल्याही मोठ्या कार्यक्रमा आधी तिरुपतीला जाऊन बालाजीचा आशीर्वाद घेतात, नारळ फोडतात . एक साधी गोष्ट लक्षात येऊ नये की  ' 'चंद्र ग्रहण' लागतंय. बिचारा चंद्र त्या धनु राशीतुन ' केतू ' पासून कसं  वाचायचं या विचारात असताना , आडाखे बांधत असताना  अगदी  त्याचवेळेला ते यान  सोडायचे का?  चाललं असत की जरा मागे  पुढे. ' दे दान सुटे गि-हाण ' असा जयघोष झाल्यानंतर होता की बक्कळ वेळ.

तरी नशीब ते  लंडन वाले 'साहेब' तरी  थोडक्यात बचावले आणि कप हाती लागला त्यांच्या. अहो चंद्राची कृपा होती त्याच्यांवर म्हणून वाचले.  असं कसं म्हणून काय विचारता ?  मारलेले
 " चौकार " मोजून त्यांना विजयी घोषित केलं गेलं ना ? मग ?
४ या अंकावर चंद्राचाच प्रभाव आहे, राशी चक्रातील 'कर्क रास' ( ४ नंबरची ) ही चंद्राची  त्यामुळेच  काळ पुरुषाच्या कुंडलीतील चतुर्थ स्थान ही  चंद्राचे मग  ' चौकारावर ' चंद्राचा प्रभाव नाही का मंडळी ? काही चुकत असले तर सांगा बर लगेच.

नाही म्हणले तरी या गुरु पौर्णिमेला आलेल्या ग्रहणाने
' गुरु ' महाराज ही तसे नाराजच आहेत म्हणा. जेव्हा कळलं त्यांना तेव्हापासून  ते वक्री होऊन
 ' मंगळाच्या वृश्चिक राशीत ' बसलेत. तेव्हा  आता एखादे मस्त ऊर्ध्वगामी नक्षत्र पाहून, गुरु मार्गी झाल्यानंतर  द्या पेटवून  चंद्रयान

मंडळी या  ग्रहण  काळात
 ' सांगेन मी गोष्टी युक्तीच्या चार '

ग्रहण पर्व हा आपला ' नियमित मंत्र ' सिध्द करण्यासाठीचा उत्तम कालावधी  आणि काहीही झाले तर सध्याचा आपला मंत्र एकच
' जाऊ आहारी,व्हाटसप वाटे भारी'

काही उपयुक्त गोष्टी सांगत आहे. नियम म्हणा हवं तर.  खाली दिलेले हे नियम   युवक , आजारी, वृध्द्व , गर्भवती , नोकरदार , व्यावसायिक सगळ्यां साठी समान आहेत.
ग्रहणाचा स्पर्श , मध्य , मोक्ष
 " वेळ"  अनेक ग्रुपवरून  तुमच्या पर्यत आली असेलच

हे ग्रहण रात्रीच्या तीस-या प्रहरात असल्याने  ३ प्रहर आधी म्हणजे दुपारी ४ वाजता आपला भ्रमणध्वनी , ऊर्जादेयक यंत्रे  इत्यादी काही मिनिटासाठी बंद करून सर्व उपकरणे स्वच्छ करावीत. ग्रहण स्पर्श होईपर्यत ती उपकरणे तशीच ठेवावीत व इतर कामे आपण करू शकतो का याचा अंदाज घ्यावा. हाताच्या बोटांना जरा त्रास होईल पण त्याकडे दुर्लक्ष करावे.

ग्रहण स्पर्श  सुरु होताच भ्रमणध्वनी हातात घेऊन डोक्याला दोन -तीनदा लावून चालू करावा  गरज असल्यास ऊर्जा देण्याची व्यवस्था करावी.

 चंद्र हा मनाचा कारक ग्रह असल्याने  सर्वच समूहातील
' मनाला लागलेले संभाषण ' हुडकण्यास सुरवात करावी . या प्रसंगी तारांकित केलेले संभाषण ही शोधावे आणि ग्रहण मध्य असतानाच ते सर्व जपून ठेवलेले संभाषण  उडवावे. त्यानंतर जास्त श्रम झाले असतील तर परत भ्रमणध्वनी बंद करून ठेवावा.

आता शेवटाचा टप्पा. मोक्ष काल. ग्रहण संपायचा काळ .

आधीचे  भ्रमणध्वनीतील संभाषण जे आपण उडवले ते मनात मात्र अजूनही असण्याची शक्यता असेल  तेव्हा या कालावधीत तुम्हाला हे संभाषण आपल्या मनातूनच कायम उडवायचे आहे. हे सर्व झाले की  तुम्ही निद्रा- देवीच्या अधीन व्हायला हरकत नाही

वि सु : - मेष , मिथुन , सिह , वृश्चिक यांना या ग्रहणाचे
' मिश्र फळ '  असल्याने यांनी शक्यतो खास समूहातील  सगळेच मेसेज ' डिलीट ऑल ' करावेत

वृषभ, कन्या, धनु , मकर  राशीच्या लोकांना ग्रहणाचे
' अनिष्ट फळ '  असल्याने त्यांनी शक्यतो सध्याचे पहिले  व्हाटसप घालवून  परत नवीन व्हाटसप उतरवून घ्यावे

पहाटे जेव्हा
 ' दे दान - सुटे गी-हाण  ' चा गजर होईल तेव्हा  तुमचा भ्रमणध्वनी आणि तुमचे स्वच्छ मन  परत तयार होतील सगळीकडे आनंदाचे गुच्छ पाठवायला  🌺💐🙂

📝अमोल केळकर
poetrymazi.blogspot.in
१५/७/१९

Thursday, July 11, 2019


*सेल्फीशी होऊ दंग. . .    सेल्फीत्सोव*

( सेल्फीची गोडी, करी जास वेडी, तोचि पुण्य जोडी पंढरीचे )

देहू आळंदी हून पंढरपूरकडे  पालख्या निघाल्या की  याच सुमारास  पुण्य नगरीत  एक अनोखा  उत्सव भरताना दिसतो.  अर्थात पुणेकर हे मुळातच उत्सव प्रिय . सवाई महोत्सव असू दे ,   गणेशोत्सव असू दे  , दिवाळी पहाट किंवा अगदी कार्तिक पोर्णीमा  असू दे या सगळ्यात पुणेकरांचा उत्साह अगदी  ओसंडून वहात असतो.

 देहू ,आळंदीहून पुणे मार्गे पंढरपूरला जाणा-या पालख्या हा ही पुणेकरांसाठी असाच  कौतुकाचा विषय.  पाऊस, हेल्मेट सक्ती, रस्त्यांची कामे , मेट्रोची कामे  आणि त्यात वारीमुळे होणारी वाहतूक कोंडी  याची चिंता न करता अस्सल पुणेकर या पालख्या  "एन्जॉय"  करतो. इथे अस्सल पुणेकर हा शब्द  अशासाठी वापरलाय की  या सगळ्यामुळे त्रास होतो असे मानणारा वर्ग ही पुण्यात आहे पण तो मुळचा पुणेकर नसून बाहेरून पुण्यात स्थायिक झालेला पुणेकर आहे.

या पालख्या जर पुणे मुक्कामी विकेंड ला येत असतील तर या उत्साहाला अधिक उधाण येते.  आपापला व्याप सांभाळून पुणेकर वारीचा आनंद लुटतात , वारी बरोबर एक दिवस चालत जातात , ताल मृदूंग , अभंग , जयघोष , पताका , तुळशी- वृंदावन , कपाळावर गंध, पालखी  सोबत जाणे  इ अनेक प्रकार करुन आपला सहभाग नोंदवतात.

साधारण उत्सव असो , यात्रा/ जत्रा असो साधारण आपण तीन प्रकारची जनता यात सामील होते असे म्हणतो  हौसे, गवसे, नौसे .
सोशल मीडियाचा,  सेल्फी या प्रकारचा उदय झाल्यानंतर आजकाल  ' हौसे, गवसे, नौसे बरोबरच आता "सेल्फे"  ही नवी जमात बघता बघता फोपावली आहे असा आमचा अभ्यास सांगतो.  प्रोफेशनल कॅमेरामन , चित्रकार , आर्टिस्ट यांच एक ठीक असतं. पूर्वीपासून ही लोकही वारीचे चित्रीकरण,काही खास फोटो  काढण्यात मग्न असतात . मात्र यांचा त्रास फारसा कुणाला होत नाही. एकतर हे लांब कुठं तरी  बसून  आपले काम करत असतात . ना ते कुणाच्या अध्यात ना मध्यात .  हरिनामाचा जयघोष करत चाललेल्या  या माऊलीच्या भक्तांच्या तर हे गावीही नसते  की दूर  कुठूनतरी  कुणीतरी आपली छबी , आपले भाव (  आजच्या शब्दात  नॅचरल एक्सप्रेशन्स )  टिपत आहेत.  यात कुठेही देखावा नसतो , कृत्रिमता नसते  त्यामुळे ते चित्र ही अगदी सहज जमून जाते.

आता या वारीतल्या सेल्फी टेक्नॉलॉजीचा ( इथे पारंपारिक तंत्रज्ञानाचा विचार आहे , यातही आता अनेक आधुनिक तंत्रज्ञान आले आहे )  विचार करू.
एकंदर यांचे वर्णन अभंगातून व्यक्त करायचे झाल्यास असे 👇🏻 करता येईल.

*पुण्यनगरी गाऊ आम्ही  पुण्यनगरी नाचू*
*मोबाईलच्या कँमेराने  सेल्फी फोटो काढू*
*विठ्ठलचे नाम घेऊ  लावूनी ' टायमर '*

 तर  या  लोकांना आपण वारीत जाऊन आलो ( फोटो काढण्यापुरते का होईना )  हे अख्या जगाला ( ठणकावून) सांगायचे असते. हेच प्रयोजन ठेऊन ते घरातून निघतात . यात काही जण स्वतःच्या कुटूंबासह (  हे कमीच ) , ऑफीस ग्रुप,  सोसायटी ग्रुप  किंवा शाळा - कॉलेजच्या मित्र - मैत्रिणींचा ग्रुप ( हे जास्त )निघतात. थोडक्यात घोळक्याने जातात .  यात एखाद्या शहाण्याला यापूर्वीच्या
' *सेल्फी-वारीचा* ' अनुभव असतो. पालखीचा मुक्काम  कुठे आहे , मार्ग काय आहे  याची माहिती ही करून घेतलेली असते. मग ठरलेल्या ठिकाणी मंडळी पोचतात. मग कुणा माऊलीच्या डोक्यावरचे तुळशी वृंदावन स्वतःच्या डोक्यावर घेऊन  फोटो काढायला लावणे ( इथे बहुतेक सेल्फी घेता येणे शक्य नसते ) , उगाच ताल , मृदूंग अडकवून

*निघालो घेऊन कॅमेरा हा हाती , आम्ही भाग्यवान*

अशा अॅटीट्युड ( ऐटीत - IT मधील असेही म्हणा हवंतर ) मधे हे सेल्फीकरी विठ्ठलाला लावतात तसा गंध कपाळावर ' गुगल ' तानाचा फोटो /  घोडे , पालखी  बरोबरचा सेल्फी  आणि पुढे काय काय प्रकारे सेल्फी निघू शकतात इतपत कल्पना करण्यात तुम्ही समर्थ आहात . आजकाल ते
'फेसबुक  लाईव्ह ' प्रकार पण दाखवायचे असते.

यानं  काय होत की एकंदर या वारीचा वेग पुण्याच्या आजूबाजूला कमी होतो. जो तो  सेल्फी ( स्व चित्र) घेण्यासाठी इतरांना थांबवतो. ते वारकरीही मग थांबतात  , त्यांचा नामात व्यत्यय येतो.
या सर्व प्रकाराने  आपण भक्तीचे अनोखे प्रदर्शन नुसते करत आहोत  असे काही वेळा वाटते.

अर्थात याला अपवाद आहेत हे नक्कीच . काही खरोखरच सेवाभावाने कुठलीही अपेक्षा  न करता मदत करतात, अन्नदानाचे आयोजन होते , कचरा व्यवस्थापनाचे , सांडपाणी व्यवस्थापनाचे नव नवीन आदर्श  पुढे येतात.अशा काही समाधानाच्या गोष्टीही दिसून येतात

*पंढरपूरची वारी  ही  ख-या अर्थाने  महाराष्ट्राचा सांस्कृतिक / वैचारिक  आणि / भक्तीमय  ठेवा  आहे. त्या सोहळ्याला आपण सगळे मिळून असेच ठेवू या* 🚩🚩

दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्त  *फोटोत  रंगला* ,

असं  फक्त व्हायला नको हीच पांडूरंगा चरणी  प्रार्थना 🙏🏻🌺

देवा तुझ्या द्वारी आलो
www.kelkaramol.blogspot.in

Monday, July 1, 2019

बिग बाॅस - मराठी


मराठी  ( किंवा अगदी कुठल्याही भाषेतील )  ' बिग बॉस  '  कार्यक्रमाची  एखादी झलक जरी पाहिली तरी  मला  मराठी गझलकार  भाऊसाहेब पाटणकरांचे  हे काव्य आठवते  👇🏻

क्षणाक्षणाचे पडती फासे
जीव पहा हे रमलेले
पुर्वजन्मीचे संचित त्यांच्या
भाळावरती सजलेले

जीवनातल्या या खेळात
कुणी असते जिंकलेले
सगळं असत ठरलेले,
 सगळं असतं ठरलेले

:- भाऊसाहेब पाटणकर

( आता  हे आमच्या शब्दात:- 📝 )

क्षणाक्षणाला भांड़ती सारे
'सेलिब्रेटी' हे जमलेले
'टीआरपी' चे गणित त्यांच्या 
'स्क्रिफ्ट' वरती लिहिलेले
'बिगबॉस'च्या या खेळात
कुणी असते जिकंलेले

सगळं असतं ठरलेले,
सगळं असतं ठरलेले

या टुकार कार्यक्रमापेक्षा माझे लेखन वाचा , ते जरा तरी सुकार  आहे 😬

poetrymazi.blogspot.in

Tuesday, June 25, 2019

सांगा पाऊस कुणि हा पाहिला


हवामान खात्याचे सर्व अंदाज,  जोतिष शास्त्राप्रमाणे लागलेले 'हत्ती ' वाहन या कुणालाही न जुमानता 'पाऊस'अजूनही  गायब आहे

त्यामुळे हा जालीम 'टुकार' उपाय योजला आहे.  ऐ वाचून तरी पाऊस पडेल ही एकमेव आशा

( चाल: सांगा मुकुंद कुणी हा पाहिला)

सांगा पाऊस कुणि हा पाहिला
 सांगा पाऊस कुणि हा पाहिला

जलक्रिडा करिता लोणावळी हो
आज झालो होतो गहनविचारी
फसवुनी गेला तो जलधारी
कुठे गुंतून बाई हा राहिला

सांगा पाऊस कुणि हा पाहिला

सारे आळविती रे, जलदुताला हे
वियोग आम्हालाही तुझा ना साहे
वेधशाळे चौकशी करिता हो
मार्ग सुकरझाला कमी दाबाचा
सप्तपदी लावूनी बेडकी-बेडकाचा
म्हणे 'टुकार',  ढग हा गडगडला

सांगा पाऊस कुणि हा पाहिला

📝 २६/६/१९ ⛈

Thursday, June 20, 2019

योगा योगा अखंड करु या


विडंबन करणे म्हणजे काही  *खायचं* काम नाही बरं. त्याला ही *योग* लागतो.

*योगायोगाने* आज तो जमला.

( चाल: धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणू या)

योगा योगा अखंड करु या
"रोज उद्याला" असेच म्हणू या

हातापायांच्या आकृतींचे
उभे आडवे गुंतून अंगे
विविध ढंगी शरिराचे
योगा करण्या 'योगी'रंगे
नारायण तो भास्कर पहिला 🌞
नमस्कारुनी त्याला स्मरुया 🙏🏻

योगा योगा अखंड करु या
"रोज उद्याला" असेच म्हणू या

करचरणांच्या मागावरती
गुढगा उंचवून नाक टाका
घेऊन हात उंचावरती
कमरेमधून निट वाका
योगीत्वाचा घेऊन चरखा
सुदृढतेचे सूत्र धरूया

योगा योगा अखंड करु या
"रोज उद्याला" असेच म्हणू या

📝 २१/६/१९

Saturday, June 15, 2019

मेगा डे


रविवारचा दिन
क्रिकेटचा खेळ
सत्यवान (फादर) आरामात
नाही सावित्रीला  वेळ

फराळाची लगबग
पूजेची कहाणी
सात जन्माचे फेरे
स्वयं-पाकाची पहाणी

अयोध्येचा दौरा
त्यात शपथ-विधी
'फादर्स डे' उसना घेऊन
संपणार दिवस कधी ?

📝 अमोल

१६/६/१९

Thursday, June 6, 2019

वेध लागला....




नमस्कार. 🙏🏻☔

८ जून म्हणजे  'रवीचा मृग नक्षत्र' प्रवेश आणि त्यानिमित्याने पावसाळी ऋतूची सुरवात होते. यावर आम्ही इतके ठाम आहोत की भले  आजकाल ' पाऊस' स्वतः ही  यावर एवढा ठाम रहात नसेल.

पण या पावसाळी ऋतुचकातील जून महिन्याचा सुरवातीचा कालावधी हा

"रिमझिम घाम येई  सारखा,
चरबीला ही ज्वर चढे,
पाणीच पाणी कुठे गेले  ग बाई,
गेला  पाऊस कुणी कडे ।। "

असा असतो.

साधारण याच सुमारास  स्कायमेट, वेध शाळेने  आपल्या आपल्या धनुष्यातून 🏹सोडलेले तीर निघू लागतात. पावसाच्या बातम्या लक्ष वेधून घेऊ लागतात , मग एखादी बातमी अशीही असते अगदी आज सकाळी आली तशी

'नभं उतरू आलं, ढग केरळ पोचलं । 🌨
झाड आडवं  झालं, हिरव्या कोकणात  ।। '🌴

केरळ, गोवा, सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण,  पेण करत करत एकदाचा "मान्सून" पनवेल च्या वेशीवर येतो हे तेंव्हाच समजायचे जेंव्हा सकाळच्या एसटी बसेस उशीरा यायला सुरु होते.पण त्यात ही हर्ष असतो.

'थांबून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी ।
जिथे तिथे 'एसटी'ही, घेई छान भरारी ।
छतावरच्या  पाण्याने  ओला झाला सदरा  ।।💧
'पावसात घन निळा बरसला  🌧

आता तुम्हाला पावसात सगळ्यात जास्त काळजी घ्यायची आहे  अशा वस्तूची :-

'आजवरी यांना किती जपलं जपलं ।
रिचार्जचे पैसे किती खपलं खपलं । चार्जिग करून यांना, दिला ग उभारा ।'

"आला आला वारा संगे पावसाच्या धारा । सांभाळून तुम्ही मोबाईल धरा !मोबाईल धरा"!!📲

गेले काही वर्षे पावसाचा जोर हा शनिवार-रविवार जास्त असतो असं दिसून येतंय. चाकरमान्यांना जास्त त्रास नको अशी एक भावना यात पावसाची असावी. मग घरात सुरक्षित बसून चहा,  भजीसह

पाऊस आला, वारा आला, पाणी  लागले साचू ।
हिंद-माता सायन सर्कल, भर भर बातम्या  वाचू ।। 💧💧 

यातली मजा काही औरच.

एरवी सकाळी घरातून निघताना  बातम्या बघा, बाहेर साधारण आकाशात कितपत काळोख झालाय याचा अंदाज घ्या त्यावरून अनुमान काढा नाहीतर :-

"टाकुनिया घरदार अडकणार, अडकणार ।नको नको म्हणताना, राहू नको ऑफिस विना ।।"🤦🏼‍♂

ये रे घना ।। ⛈

आणि मग पाऊस चांगला मुरला की  जुलै मध्ये  अशी घटना  म्हणजे नित्याचीच बाब होते

जसा ' सेंट्रलचा ' जीव घुटमळं ।
तसा 'हार्बरला' मिळतयं बळं ।
तुझ्या सिग्नल ला सिग्नल  माझं मिळं ।
ह्ये , बघून 'वेस्टर्न'  जळं ।

वर ढगाला लागली कळ ।
मुंबई तशीच पळं ।।"
 🏃🏃🏃🏻‍♀

नंतरच ' मुबंई  स्पिरिटच'  वगैरे  आम्ही बघून घेऊ , काळजी नसावी. 🙋🏻‍♂

पण लवकर ये, यावर्षीचा पावसाळी मुंबईचा आस्वाद घ्यायला आम्ही तयार आहोत

# ऋतू हिरवा ...🌨☔⛈💧🌊
👍🏻

📝 (मुरलेला मुंबईकर ) अमोल
विनायकी चतुर्थी ६/६/१९

Monday, June 3, 2019

काय टाकले ' व्हाट्सअप'वरती


सध्या गदिमांची एक कविता ( 'काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती ) स्पृहा जोशी यांनी सादर केलेली सगळीकडे फिरते आहे.  त्यांनी ती ठसक्यात सादर केली आहे यात काहीच शंका नाही पण मुळ कवितेचे श्रेय हे गदिमांचेच ( जाची कुठेही चर्चा होत नाही आहे किंवा ब-याच जणांना ते माहीतही नाही आहे),

 निदान इथून पुढे forward करणा-यांनी गदिमांची  ही कविता स्पृहा जोशींनी खुप छान सादर केली आहे असा बदल करुन पुढे पाठवावे.

या कविता लिहिण्यामागचा इतिहास , जो पुण्याच्या शनिवारवाडा/ पेशवे यांच्या संबंधित आहे तो इच्छुकांना इथे वाचता येईल

https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.gadima.com/marathi-articles-lekh/27/536/Kai-Wadhale-Panawarti.php&ved=2ahUKEwiW4vXD-criAhXL7XMBHRrrAe4QFjAAegQIAhAB&usg=AOvVaw0sf3JejKdZVst12im0i6Yz&cshid=1559484806991

आता एवढ्या 'चविष्ठ' काव्याचा कच्चा माल मिळाला असताना त्याचे वेगळे रुप येणारच. मुळ कविता खाद्यसंस्कृतीवर तर बदललेली कविता Whatsapp आणि फेसबुक ही ज्यांची (खाद्य) संस्कृती झालीय अशांना समर्पित

*काय टाकले ' व्हाट्सअप'वरती*

काय टाकले व्हाट्सअपवरती,वाचून काही नाही कळती
सरळ लेखन हे पुढे टाकले , वाचलेल्यांचे निळे दिसले
'आले' आमचे बहु मुरलेले,मित्र मैत्रिणी हिरमुसलेले

कुठुन पुढारी मधूनच आले,राजकारणाचे वांदे आणले
खमंग त्याचे विवाद केले,निरनिराळे नखरे नटले
चमच्यांचे बहु नवे मासले,संमेलनची त्यांचे भरले

तिरपे उत्तर त्यासह आले,क्लेश  भाजूनी त्यात वाटले
तामस गुणांचे मिलन झाले, पंचप्राण हे जवळी आले
द्वेष त्यांचे हवेत भरले , व्हाट्सअप 'अण्णा' बधीर जाहले

प्रभात काळी 'टिप्स' आल्या, काही वाचल्या काही सोडल्या
काही पाहून सुरेख पाळल्या , चारोळीच्या ओळी जमल्या
अर्थ त्यातही देती चिमुकल्या, मुळात विसंगती धरतो 'अमल्या'

'केक' धाडून शुभेच्छा दिल्या, फिरून त्याच्याही 'पेस्टी' सजल्या
एकरूप त्या सहज झाल्या, मेंबर आले जणू अवकाळी
जानभरली आज सकाळी, सुरस बोलणे आणि मखमली

फेसबुकातही मैत्री जमली,शहर शाळा कॉलेज जवळी
'ऑन लाईनची हिरवी खेळी, स्टेट्सचीही गोडी निराळी
दुःखी हसरी तेथे स्माईली,किती  प्रकारे वेगवेगळी

सार गोड हे सोशिकतेचे,शोभत पोस्टी मधुर लाइकचे
भरदार होई भिंत सुगंधी,पुढचे लिहिण्या काही अवधी ........

आता ' आरोप प्रत्यारोपांसाठी '  दर्दी जमणार  म्हणून इथेच थांबणे  योग्य 🙂

 📝 अमोल केळकर ३/६/१९


( मूळ गदिमांचे  काव्य वरील दिलेल्या लिंक वर वाचता येईल )


Sunday, June 2, 2019

वडा, इडली रहस्य मोठे


मुंबईतील रस्त्यावरच्या खाद्यसंस्कृतीची काही रूपे सध्या व्हायरल झाली आहेत. यावरूनच  गदिमा/ बाबूजी यांचं
 'लळा जिव्हाळा शब्दच खोटे ' हे गाणे असे  लिहावेसे वाटले

वडा, इडली रहस्य मोठे
माशा , त्याही येई
घाब - रायचे नाही राजा, घाब रायचे नाही

'चटणी' कुठे रुप साधते या नगरीची माया ?
कोण जातो कुर्ला येथे, कुणी बोरिवलीत खाया
करताच मागणी नुसती,  जो तो आपुले पाही

'घाम'- टायचे नाही राजा, घाब रायचे नाही.

इथे रस्त्यावर गाड्या जमवी, जीलबी काढी कोठे?
पाणीपुरी खाऊन जगती, चाकरमानी छोटे
अतिक्रमणाची येता फेरी, भय्या पळून जाई
कुणी कुणाचे नाही, वेड्या कुणी कुणाचे नाही

📝अमोल
# मुळ गाणे- लळा, जिव्हाळा शब्दच खोटे

Wednesday, May 29, 2019

नारद जयंती


नारायण नारायण 🙏🏻🌺

आज देवर्षी नारदमुनी यांचा वाढदिवस. आपल्या परम भक्ताच्या जन्म दिवसा प्रित्यर्थ  विष्णूलोकात आज जंगी कार्यमाचा बेत श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी ठरवला आहे.
वेगवेगळ्या लोकातील देव, ऋषीमुनी,  नवग्रह, गंधर्व,  अप्सरा यांना निमंत्रणे गेली आहेत. कमळाच्या 'कळीचे ' चित्र असलेला केक बनवला जात आहे..
  जे विष्णू लोकात *बाहेरुन* येत आहेत त्यांना 'विष्णू आय टी' सेल प्रमुख चित्रगुप्त " *विष्णू लोक्यं, परम सौख्यं*' या व्हाटस अप ग्रुपवर तातडीने सामील करुन घेत आहेत जेणेकरुन त्यांना कार्यक्रमा संबंधित सर्व अपडेटस देता येतील.

तिकडे कैलासावर मात्र वेगळीच गोष्ट घडलीय. ऐनवेळी महादेवांनी आपण येणार नाही आहोत तू मुलांना घेऊन जा असे 'पार्वती' ला सांगितले आहे. कारण विचारता महादेव सांगत आहेत, तिकडे " *केदारनाथला* माझा एक भक्त तपश्चर्येला कालपासून बसला आहे. मी असं त्याला सोडून वाढदिवसाला येणं बरोबर दिसणार नाही. तेंव्हा तुम्ही जावा आणि माझ्या शुभेच्छा नारदमुनींना द्या.

इकडे बाल गणेश आईला विचारतोय, माते वाढदिवसाला २१ मोदक असतील ना? यावर पार्वती माता गणेशाला रागावून सांगतीय, बास झाली हा तुझी नाटकं.  लक्ष्मी मावशी जे देईल ते गप्पगुमानं खायचं,  तिथे हट्ट चालणार नाही. नाहीतर मी फक्त कार्तिकेय ला घेऊन जाईन.  आणि काय रे तीन दिवसांनीतर संकष्टी आहे ना. यावेळेला थोडे जास्त मोदक करीन हा माझ्या सोन्याला.


बरं ऐक संकष्टी वरून आठवलं.  संकष्टीच्या दुस-यादिवशी हिंदुस्थानातील लोकशाही निवडणूकीची मतमोजणी आहे. एकाच मतदार संघातील उमेदवार तुझ्या दर्शनाला येतील. ते सगळे भक्त तुला अनोळखी आहेत म्हणून मुद्दाम सांगतेय, उगाच सगळ्यांना विजयी भव!  असा आशीर्वाद देऊन  जास्त 'माया', 'ममता' दाखवून त्रिशंकू परिस्थिती होऊ देऊ नकोस.


 बर आज संध्याकाळी  "इंद्र प्रस्थ कल्चरल फोरम " तर्फे काही अप्सरा खास कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमात 'ब्रह्मदेवांना' लाईफ टाईम अॅचिव्हमेंट अॅवार्ड देणार आहेत. तर कार्यक्रमाच्या सुरवातीला 'सूर निरागस हो' हे गाणं तू म्हणणार का? असं ' माता सरस्वतीने'  विचारले आहे. तीच या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पण करणार आहे.

मग काय सांगू ? हो म्हणून सांगू?

' हो '

अं?

हो हो, म्हणून सांग. मी तयार आहे

अहो.

काय हो, हो करताय ? कशाला तयार आहात?

उठा लवकर.  आज रविवार असला तरी. मेलं रविवार काय अन कुठला वार काय,  सकाळी उठून चालू लागायचं,  वार्तांकन काय एक्झिट पोल काय,  रिपोर्ट काय.

पण आज संध्याकाळी जरा लवकर या
*नारद फाॅंडेशनचा 'यशस्वी पत्रकार' पुरस्कार घ्यायला जायचंय आपल्याला. लक्षात राहू दे*.

हो हो. आहे लक्षात,  चल आवरतो
----------------------------
*२४ x ७ पत्रकारितेला वाहून घेतलेल्या आणि त्यासंबंधीत क्षेत्रात काम करणा-या तमाम बंधू/ भगिनींना*

तसेच
क्षणात फेसबुक,  व्हाटस अप वर ब्रेगिंग न्यूज पाठवणा-या

तसेच

आपल्याला विचारलं नसताना , त्या विषयाशी आपला संबंध नसताना, गरज नसताना, काहीही  प्रतिक्रिया देऊन मूळ विशष भलतीकडेच वळवणा-या सर्व
  व्हाटस अप ग्रुप मधील *सर्वच बुध्दीमान 'नारद' बंधूंना*
     🌷  *नारद जयंतीच्या* 🌷
               *शुभेच्छा*
                   🙏🏻

नारायण, नारायण 🙏🏻🌺
नमो 'केदार'नाथ 🙏🏻🌺
जय श्रीराम 🙏🏻🌺
मोरया 🙏🏻🌺

📝अमोल
१९/५/१९
poetrymazi.blogspot.in
Related Posts Plugin for WordPress, Blogger...