नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, September 18, 2019

राश्यांतर


🎭 जिवनातील रंगमंचावरील 'राश्यांतर' 🎭
⚡✨🌟⭐💫🌞🌝

मंडळी ,सध्याच्या या पक्षांतराच्या वावटळीने अनेक खास विषय सुचू लागलेत. काल आपण 'वर्गांतर' पाहिलं आज असाच एक आमच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ग्रहांचा राशीप्रवेश अर्थातच "राश्यांतर "

नेते मंडळींचे निवडणूकीच्या मागे - पुढे स्वत:च्या स्वार्थासाठी होणारे ' पक्षांतर ' आणि ग्रहांचे  'राश्यांतर ' यात खुप फरक आहे बरं का !
सध्या या पक्ष बदलू नेत्यांसाठी 'निसटावंत' हा शब्दप्रयोग रुढ झालेला तुम्ही वाचला असेलच

पण हे ग्रह मात्र ख-या अर्थाने 'निष्ठावंत'. कालचक्राने नेमुन दिलेल्या वेळेनुसारच राशी बदल करणारे. यातही रवि आणि चंद्र 'सुपर निष्ठावंत ' कधीच वक्री नाहीत.( याऊलट राहू, केतू कधीच सरळ नाहीत कायम वक्री. *पण मैत्री इतकी दांडगी की राशी बदल ही समोरासमोर अगदी एकाच वेळेला करतील*✔)  चंद्र २-१/२ दिवसात राश्यांतर करणार म्हणजे करणार. रवि दर महिन्याच्या १५-१६ तारखेला राशी बदल करणार म्हणजे करणार.
त्याखालोखाल बुध, शुक्र. कधी वक्री होतील पण रवि पासून मैत्री तोडून फार लांब जाणार नाहीत ( काही मुद्यांवर वैचारिक मतभेद फक्त ☺) राश्यांतर ही साधारण महिन्याभरात. काही जणांना चांगली बातमी देणारे.

पण मंगळाचे बुध, शुक्रासारखे नाही. रविच्या कितीही पुढे जाणार. राहू, केतू , हर्षल च्या सानिध्यात आला आणि त्याचवेळी स्वत: जरी वक्री झाला की एकदम स्फोटच 🙂. एक घाव दोन तुकडे, मुद्यावर ठाम.  राशीबदल सदा सर्वदा कल्याण करणारा असेलच असं नाही. पण हा ही राशीबदल कालचक्राने ठरवून दिलेल्या शिस्तीत.

"गुरु" बदल मात्र अनेक दृष्टीने 'पर्व काल' घेऊन येणारा. धार्मिक महत्वाचा तसेच विवाह/ मुंज इतर कार्यासाठी आवश्यक ठरणारा. गुरुबल 💪🏻दाखवणारा.
'गुरु विन कोण दाखविल वाट' असा हा गुरु नियमीत वर्षाने राशीबदल करणारा.

शेवटचे 'शनी महाराज' 🙏🏻.
 अडीच वर्ष एका राशीत राहून राश्यांतर करणारे. "साडेसाती" नामक अस्त्राद्वारे भल्याभल्यांना सरळ करणारे, त्यांची मस्ती उतरवणारे.

अशी ही वेगवेगळ्या ग्रहांची राश्यांतरे. प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार, दशेनुसार  *नियती मग "रावाचा रंक आणि रंकाचाही राव " करण्यास मागे पुढे बघत नाही. आणि हे कुणालाच चुकत नाही बरं का*

*" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा " हे ही नकळत ही नियती या ग्रहांच्या राश्यांतरातून शिकवून जाते*.

*तरीपण* तुमच्या पत्रिकेतील १२ ग्रह - १२ राशीतून - २७ नक्षत्रातून - त्यातील १०८ चरणातून भ्रमण करताना तुमचे  "कल्याण" करुन कुणाच्याही आयुष्यात  "खड्डा " पडू देऊ नयेत या शुभेच्छा 💐

श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌺

📝१९/०९/१९
poetrymazi.blogspot.in

*रात्रंदिन आम्हा, लेखनाचा आनंद*
*नकोच उपाधी, लेखक कविची ती*

वर्गांतर


वर्गांतर 🚶🏻👬

आमच्या सिटी हायस्कूल,  सांगली या  शाळेत अ, ब,क,ड अशा मुख्यत्वे तुकड्या हुशारी नुसार होत्या. यात अधिक सविस्तर जायला नको. सगळ्यांच्या लक्षात आले असेल. आपापल्या तुकड्या पण डोळ्यासमोरुन गेल्या असतील

नवीन वर्षे सुरू झालं की साधारण ८-१५ दिवसात 'वर्गांतर' नावाचा 'वर्ग प्रवेशाचा'  जंगी कार्यक्रम आमच्या शाळेत व्हायचा. त्यावर्षीच्या मार्कानुसारच वर्गांतर व्हायचे.
जरा हुशार असणारा 'ब ' तून 'अ' मधे जायचा. तिकडे हुशारीत कमी पडलेला इकडे यायचा. असे याचे मोघम स्वरुप असायचे आणि हे प्रत्येक पक्षात आपलं प्रत्येक वर्गात व्हायचे.

अशा या 'वर्गांतरीत' विद्यार्थ्याचे ऋणानुबंध मात्र जुन्या - नव्या ठिकाणी सगळीकडे रहायचे.

 मागच्या वर्षी आपल्या बरोबर 'बसणारा' मित्र  यावर्षी आपल्या बरोबर नसला तरी मधल्यासुट्टीत किंवा बाहेर इतरत्र कुठे भेटला की बरे वाटायचे.'
केला तो दंगा राहिली ती शांती ( गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असे होऊन जायचे)

अशीच काही परीस्थिती/ मनस्थिती  सध्याच्या 'पक्षांतरीत' उमेदवाराची असण्याची शक्यता मला वाटते.
इथे मात्र 'स्व:खुशाली' ही हुशारी पेक्षा थोडी महत्वाची ठरु लागलीय.

शाळेत असताना मनात नसले तरी 'वर्गांतर' करावे लागायचे.
'पक्षांतराबाबत'  सर्वच शक्यता गृहीत धरता येतील.

*जे वर्षानुवर्षे एकाच वर्गात/ पक्षात राहिले त्यांना यातील मजा अजिबात कळणार नाही*. 😆

चला यानिमित्ताने आठवा ५वी  ते १० की कोण कोण बसायचे आपल्याजवळ. ( कारण सांगा म्हणल की इथे कुणी सांगणार नाही. निदान आठवा तरी)

अनुभवी "वर्गांतरीत" विद्यार्थी 📝
सिटी हायस्कूल,  सांगली
१८/९/१९

Tuesday, September 17, 2019

आजि मोदकाचा दिनु




" नैवेद्यम समर्पयामि 🙏🏻
( अंगारकी निमित्य श्री बुध्दी देवतेस सादर 🙏🏻)

आजि मोदकाचा दिनु
हर्षे उकडीचा बनु  !१!

तोचि पाहिला रे, तोचि पाहिला रे
नेवैद्यदाखवुनी, अवघी भरा रे शिदोरी! २!

तोचि पाहिला रे, तोचि पाहिला रे
आजि मोदकाचा दिनु

विघ्न नसे तिथे मुळी
ओतू या तुपाची पळी !३!

तोचि पाहिला रे, तोचि पाहिला रे

भरवा घास गौरी-गणु
संतोषला आत्मारामु !४!

तोचि पाहिला रे, तोचि पाहिला रे

कृपासिंधु 'मोरया'स्मरु ' 🙏🏻
रिध्दी सिध्दीदेवी वरु 🙏🏻 !५!

तोचि पाहिला रे, तोचि पाहिला रे

आजि मोदकाचा दिनु
हर्षे उकडीचा बनु  😋

📝 अंगारकी संकष्टी
kelkaramol.blogspot.in
१७/०९/१९

Sunday, September 15, 2019

अभियंता दिन


आमचे केमिकल इंजिनियरींग  💐

H2 पासून O पर्यंत
सगळ्यावरच पडलं पाणी
'केमीकल इंजीनिअर' बनून
आज सहज लिहितोय गाणी

'वारणेचा वाघ' बनलो
बुधगावचा ही झालो 'राजा'
केमीकल प्रोसेस ठरली
केवळ आमच्यासाठी मजा

किर्लोस्कर वाडीचा "कोरोकोट"
प्रोजेक्ट गाईड म्हणून ' कोलते '
आठवतही नाही चार वर्षे
आपल्याबरोबर कोण कोण होते?

स्कोप आहे खूप म्हणून
नोकरीला लागलो 'पेट्रो केसर'
लवकरच सोडली कंपनी जेंव्हा
पुढचा मार्ग दिसला धुसर 😁

बडबडणारा 'हर्षा भोगले'
आमचा आदर्श नेहमीच ठरला
केमीकल अभियंता नावाला
इतर गोष्टीतच जीव रमला.

तरीपण  "अभियंता दिनाच्या  सर्व केमीकल इंजिनियरना शुभेच्छा " 💐

📝१५/९/१९

Saturday, September 14, 2019

जीवलगा कधी रे येशील तू



सुवासिनी सिनेमातलील, केदार रागातील हे मुळ गाणे

हेच गाणे  कमळाबाई 🌷 आपल्या लाडक्या बाणाला 🏹कशी म्हणेल बघा..
( निव्वळ काल्पनिक, साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा)
---------------------------------------------
आचारसंहिता येऊ लागली,
 चल लवकर भेटू
'जिवलगा' कधी रे येशील तू...🌷🏹

'शरद' शोभा आता गेली
'वंचित'गंधा फुलली सुकली
'चंद्रकांते'सह वाढवून ठेविले अंतरिचे हेतू

'जिवलगा' कधी रे येशील तू 🌷🏹

'घड्याळी' या नुरली हिरवळ
फकीर 'हात' हा अवघा दुर्बळ
पुन्हा 'युतीचा' दिसू लागला 'सत्तांकित' सेतू

'जिवलगा' कधी रे येधील तू 🌷🏹

पुनरपि 'इले -क्षण' आलेली
'विधान-सभा' पुनरपि आली
पुनश्च 'वर्षा' लावी आकडे 'मातोश्रीवर' ओतू (२८८)

'भांडखोरा' कधी रे येशील तू 😛

📝१५/९/१९
poetrymazi.blogspot.in

# तुझं माझं जमेना परि तुझ्याशिवाय करमेना  🤪

Thursday, September 12, 2019

बाप्पा पोहोचले घरी


🔴 महत्वाची बातमी( ब्रेकिंग न्यूज)  🔴

नमस्कार भक्त परिवार 🙏🏻 याक्षणाची सगळ्यात मोठी बातमी  तुम्ही 'देवा तुझ्या द्वारी आलो' या वृत्तवाहिनी वर पहात आहात. 'दोन पाऊल पुढे' ठेऊनच मी 'तपस्वीनी' सगळ्यात आधी  तुम्हाला सांगत आहे. कृपया "उघडा डोळे , बघा निट "
 इथे कोपऱ्यात तुम्ही याक्षणाची सर्व चलचित्रे पाहू शकाल.सर्वप्रथम आपल्याच वाहिनीवर.

जे उशीराने इथे आले आहेत त्यांच्यासाठी,  या क्षणाची मोठी बातमी  सर्वप्रथम 'देवा तुझ्या द्वारी आलो ' वाहिनीवर

पृथ्वीवरुन आपल्या लाडक्या श्री गणेशाचे 
स्वर्ग - लोकी आगमन झाले आहे.
अत्यंत महत्वाची बातमी.  तब्बल १२ तास उशीराने गणेशाचे  स्वर्ग लोकी आगमन

आमचे प्रतिनिधी श्री नारद आत्ता तिथे आहेत. आपण सरळ त्यांच्याशी बोलू
नारद, कसं वातावरण आहे? आणि श्री गणेश आणि त्यांचा ताफा सध्या कुठे पोहोचलाय?

तपस्विनी, अतीशय आनंदाचे वातावरण आहे. तू इथे पाहू शकतेस की तब्बल १० दिवसांनी श्री गणेश परत आले आहेत. प्रथेप्रमाणे त्यांचा ताफा स्वर्गातील 'गणेश-लोकात ' आला आहे. रिध्दी-सिध्दी आणि इतरांनी त्यांचे औक्षण करुन त्यांचे स्वागत केले आहे. थोडी विश्रांती घेऊन ते तडक कैलासावर माता पार्वती , पिता महादेव यांच्या दर्शनास जातील.
तपस्विनी

धन्यवाद नारद या माहितीबद्दल. तू आमच्या भक्तांना काय अधिक माहिती सांगू शकशील. म्हणजे त्यांना यायला का उशीर झाला, येतानाचे त्यांचे सर्व नियोजीत कार्यक्रम पार पडले का?

तपस्वीनी, या ठिकाणी श्री गणेशाच्या ताफ्यातले मूषक मामा इथे आहेत. आपण त्यांच्याशी बोलू
मामा, नमस्कार 🙏🏻

नमस्कार. 🙏🏻

कसा झाला दौरा ? काही विशेष आठवण?

दौरा नेहमीप्रमाणे उत्त्तम.  विशेष म्हणजे भक्त जेंव्हा जयघोष करायचे, ' उंदीर मामा की जय, खाण्या-पिण्याची सोय ' तेंव्हा छान वाटायचं

मामा, दरवर्षी प्रमाणे परतीचे प्रयोजन तुमचे चुकते असं नाही वाटत?
मान्य आहे १२-१४ तास उशीर होतोय. खरं म्हणजे यावेळेसही पार्वती मातेने बजावलेले उशीर झाला तर सरळ 'महादेव समिती ' समोर उभे करीन. म्हणून आम्ही एक उपाय केला होता. पण अपयश आले.

कुठला उपाय, मामा?

वरुण ला आम्ही सांगितलेले की चतुर्दशीला येऊन ऐनवेळी जोरदार पड. तो आला पण भक्तांच्या उत्साहात तो ही इतका सामील झाला की लवकर जायचे आहे विसरून गेला आणि नेहमीप्रमाणे उशीर झाला.

आता मग चौकशी?

हा १-२ दिवसात आम्ही इंद्रदेवाना   अभ्यासासाठी अहवाल पाठवू त्यावरुन ते नवरात्रातील आचारसंहिता सांगतील.

मामा, येताना तुम्ही चंद्रावर  जाऊन 'विक्रम'ला ठिक करुन येणार होता अशी एक बातमी..

नारद, थोडं थांबवतेय मी तूला, आपण मामांशी नंतर बोलू.  आत्ताच कैलासावरुन एक बातमी येतीय. आपण थेट आपले प्रतिनिधी ' नंदी '  कडे जाऊ.

नंदी काय बातमी आहे?

तपस्वीनी ,आत्ताच कैलासावरुन एक निवेदन प्रसिद्ध झाले आहे आणि त्यात असं म्हणलं आहे की श्री गणेशाच्या ताफ्यातील सर्व मुषकांना 'गणेश' रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.  त्या निवेदनात कवी असलेल्या पार्वती मातेने चार ओळी लिहिल्यात, त्यातील चौथ्या ओळीतील शेवटचा शब्द त्यांनी सोडलाय. तो शब्द अचूक ओळखणाऱ्यास खास बक्षीस देण्यात येणार आहे
तपस्विनी.

नंदी हे कोडे काय आहे हे तू सांगशीलच पण या सोहळ्याचे कुणाकुणाला निमंत्रण आहे.

या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे श्रीविष्णू हेच असणार आहेत सोबत इंद्रदेव आणि इतर देवगण ही असणार आहेत.
तर माता पार्वतीने मूषकांचे कौतुक करताना म्हणले आहे
छान झालं .

त्याला सरळ आणलतं
गणेश लोकातील कक्षात
नाहीतर त्याला ही नेले असते
त्यांनी त्यांच्या  x x x 🌷

नंदी,  नंदी,  तूला माझा आवाज येतोय का?
बहुतेक आपला 'मंदी' शी संपर्क तुटलाय.

मालक , झोप झाली असेल तर उठा, कामाला लागा. मंदी, मंदी करुन मंदी जायची नाही.
बाकी #देवाक काळजी

मोरया 🙏🏻🌺

📝 अमोल
www.kelkaramol.blogspot.in

Sunday, September 8, 2019

मिठी


आज जर कुसुमाग्रज असते तर त्यांनी ' कणा' लिहिला तसं ' मिठी'ला ही अजरामर केले असते.

          :-   मिठी - : 📝

( संदर्भ : कुसुमाग्रजांची 'कणा' कविता)

पाहिलंत का सर आत्ता,तिथेच बोलला कोणी
कपडे होते अगदी साधे, डोळ्यामधे पाणी

क्षणभर बसला,नंतर रुसला बोलला वरती पाहून
चांद्रयानाचा संपर्क शेवटी थोडक्यात गेला राहून

 कार्यालयात 'इस्रो'च्या सर्वानी कष्ट केले
२२ जूलैला मग चंद्रयान आकाशात गेले

आॅर्बीट पकडले,फे-या मारल्या ठरल्याप्रमाणे जमले
'चंद्राच्या' ओढीने 'विक्रम' हळू हळू गेले.

शास्रज्ञांना बरोबर घेऊन, सर आता लढतो आहे.
संपर्क, चित्र  घेण्याचा प्रयत्न खूप करतो आहे.

मिठी मारुन सरांना, नव्या जाणीवेने उठला.
पाठिंबा दिलात तुम्ही,तरी एकटेपणा वाटला

तुटला जरी संपर्क तरी , मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा.

🙏🏻🚀🌝

📝८/९/१९
अमोल
poetrymazi.blogspot.in

#चांद्रयान २
#के.सिवन
#इस्रो

Tuesday, September 3, 2019

कुर्यात सदा मंगलम्


कुर्यात सदा मंगलम् 🚀

( टिप: माझ्या लेखनात interest नसलेल्यानी कृपया आपापल्या जबाबदारी वर पुढे वाचावे. काही वेगळे विचार मिळाल्यास/ नाही मिळाल्यास  लेखक जबाबदार नाही)

हुश: खुप दिवसांपासू आपण ही भाऊंसारखे खणखणीत लिहावे असा विचार मनात आला. तुर्त वरची टिप जरा जमलीय असं वाटतयं,  हळूहळू जमेल ही लेखन 😬

म्हणतात ना "अपयश ही यशाची पहिली पायरी असते" . पण पुढे यशाच्या दुस-या, नाही तिस-या नाही पण निदान दहावी पायरी ते शिखर पर्यतचा मार्ग सहसा बघायला मिळत नाही.
असा एक मार्ग मी नुकताच बघितलाय सांगतो. थांबा.

त्याआधी आणखी एक

शाळेतील एका मैत्रिणीचा काल रात्री वय्यक्तिक निरोप आला तो गौरी आणायच्या मुहूर्ता संबंधी. तिला मी योग्य ते उत्तर पाठवेनच पण त्याक्षणी मला आठवली शास्त्रज्ञ 'तारा' ( हो विद्या बालनच). आणि अर्थातच सिनेमा " मिशन मंगळ "

तदेव लग्नं सुदिनं तदेव *तारा* बलं चंद्रबलं तदेव ।
*विद्या* बलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि।।

कुर्यात सदा मंगलम् !!

सिनेमाची नाईका  'विद्या बालन' आणि सिनेमातील नाव 'तारा' कसं एकत्र छान गुंफल गेलय ना वरील श्लोकात?  इतर ही अनेक तारका समुहांनी ( अगदी मंगळाच्या मेष राशीतील कृत्तिका नक्षत्राचे नाव असलेली एक सदस्य)  'मिशन मंगळ'  आधीच्या अपयशाचा संदर्भ असताना कसा यशस्वी केला याचे नयनरम्य चित्रण म्हणजेच 'मिशन मंगळ'

तर या शास्त्रज्ञ ताराबाई  धार्मिक. म्हणजे घरातील पुजा अर्चा ते क्षेपणास्त्र उड्डाणाच्या वेळेला भटजी बोलवून ' प्रार्थना करण्या पर्यंतचा प्रवास ' हा श्रध्दे पासून श्रध्देपर्यंतच्या प्रवासातही मधे शास्त्र ( सायन्स) लागतं हे सांगणारा, पहाण्यासारखा. इथेच आम्हाला आमची वरील मैत्रीण ही आठवली.

या ताराबाईं सिनेमाच्या शेवटी एका प्रसंगात त्यांच्या मुलाला सांगतात.
Pray for power,  not for picture.

याठिकाणी माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले ते क्षेपणास्त्र. 

"करकटावरी ठेऊनिया, सुंदर ते ध्यान " जणू साक्षात माऊली 🙏🏻
( पाॅवर पण आणि पिक्चर पण)

मग हीच माऊली क्षेपणास्त्राशी पूर्ण संपर्क सुटल्यावर योग्य वेळी 'स्विच आॅन आॅफ'  करायची प्रेरणा देते ( अनुभव कामास येतो) . अगदी क्लायमॅक्स मधे हीच ' माऊली ' आता हाती केवळ अपयश येणार असं वाटत असतानाच त्या यानाला मंगळाच्या भ्रमणमार्गात ' दत्त ' म्हणून हजर करते.  कोटी किमी दूर असणा-या शास्त्रज्ञांना ' कोटी कोटी रुपे ' या माऊलीच्या रुपात दिसतात आणी शेवटी गोंडस लाल मंगळ , जणू सांगतोय

अमंगलाचा खेळ चालला या धरतीवरती !
 होऊनी मंगल  यावे प्रभू हो या अवनीवरती !

अशुभची सारे जावो देवा , इतुकी  आस मना !
गजानना श्री गजानाना तुम्ही पावा  भक्त जना !!

🙏🏻🌺

पुढचे लेखन अती अवांतर,  फारच वेळ असेल तर वाचा

वय्यक्तिक मरगळ, सामुहिक मरगळ ( किंवा Whatsapp समुहातही मरगळ) आली असेल तर मोटिव्हेशन मिळण्यासाठी हा सिनेमा बघाच.
प्रामुख्याने महिला सदस्य असलेला ग्रुप एकदा active झाला की काय होऊ शकतं हे पहायला मिळतं
अगदी या आपल्या समूहासाठी ही हे लागू पडेल 👆🏻🙃

मोहिम यशस्वी झाल्यावर राकेश ( अक्षय कुमार) कायम त्याला विरोध करणा-या मोठ्या साहेबांचे आभार मानतो. समजलं काही. हेच मी म्हणतो ते उत्प्रेरक ( catalyst)  म्हणून टिकाकार हे चांगलेच,  आपल्याला फायदाच होतो.

आता अगदी शेवटच टुकार.
या सिनेमात मला 'अय्यंगार' नावाचं पात्र खुप आवडलं. त्याना पाहिल्याक्षणी मला वाटते गदिमा किंवा पु.ल तसे दिसत असावेत.
शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न तुम्ही कधी पाहिले हे आठवा असं जेंव्हा ताराबाई सगळ्या सदस्यांना म्हणतात तेंव्हा हे बालपणीचे अय्यंगार, आपल्या खेळण्याची गाडी घेऊन एका वेळी ५-६ राॅकेट कसे उडवतात हे दाखविले आहे. अप्रतिम
यापासून स्फूर्ती घेऊन हेच लिखाण मी ५-१० ग्रुप, फेसबुक, अनुदिनी,  रविवारची पुरवणी ( ट्विटर वाचलं,  एवढं लिहिता येत नाही त्यावर)
यावर असं च फेकणार आहे. लेखन न आवडणा-यांनी हेल्मेट घाला. चुकून लागायचे 😜

चला गौरी आणायचा मुहूर्त काढायचा आहे. दोन मंगळाच्या पत्रिकेचे गुण मिलन करायचे आहे

भेटू परत


📝 अमोल केळकर
४/९/१९
poetrymazi.blogspot.in

Wednesday, August 28, 2019

मंद- मंदी


# 'मंद'मंदी 😬

मुळ नाटक : मत्स्यगंधा
( चाल : तू तर चाफेकळी )

दर्द सभोती आज काळजी, ही तर 'मंदी'आली
काय हरवले सांग शोधिशी,या 'निफ्टीच्या' जळी ?

ती 'मंद'माला म्हणे नृपाळा,  हे तर माझे घर
राहून बघते मी तर इथे  'अच्छेदिन' हे सुदंर

रात्रीचे चौकीदार पाहुनी, हाकलतील मंदे तुला
तू चेटकीण, दिसे भुवनी ना तुझिया रूपा तुला

रागमुखी अन नाकाsश्रू , पसरे गालांवरी
विसरू तुजला घेऊ तेजीला, जा चल इथून त्वरी

दर्द सभोती आज काळजी, ही तर 'मंदी'आली
काय हरवले सांग शोधिशी 'या निफ्टीच्या जळी ?

📝 २८/८/१९
poetrymazi.blogspot.in

Friday, August 23, 2019

वडा- पाव डे


आज काय तर "वडा-पाव" डे म्हणे ( २३/८ ??).

 क्षणभर 'मंदीचा' विचार बाजूस ठेऊन मस्त वडापाव घेतला ऐरोली स्टेशनला आणि हे सुचले...😋
कळवा ते कल्याण आणि बोरिवली ते बेलापूर कुठेही अगदी सहज मिळणाऱ्या लाडक्या
वडा-पाव ला समर्पित
( चाल: उष:काल होता होता)

वडा पाव खाता खाता, ब्रह्मानंदी टाळी
अरे पुन्हा नवा 'घाणा' लगेच झाला खाली

आम्ही चार मिरच्यांची ती आस ही धरावी
जे तयार नव्हते त्याची, वाट का पहावी
का ही  'मंदी' अंधारातून, होते वरखाली
अरे पुन्हा चहाची ती पेटवा किटली

धुमसतात अजूनी गरम, वड्यांचे निखारे
तरीही एक खात थांबती पावासंगे सारे
आसवेच डोळ्यातून हलके निघाली
अरे तरी वड्याची ती तल्लफ निराळी

वडा पाव खाता खाता, ब्रह्मानंदी टाळी
अरे नवा 'घाणा' ही लगेच झाला खाली

📝 वडा -पाव डे ( २३/८)
poetrymazi.blogspot.inव.     
पय

Wednesday, August 21, 2019

वेगवेगळी फुले उमलली


या ' *फुलांच्या*' गंधकोषी सांग तू आहेस ना  ?  : -
🌸     🌹   🌺   🌷

निसर्गाने ज्या अनेक विविध गोष्टी  'मुक्त हस्ताने'  या  सृष्टीला दिल्या आहेत  त्यातील  एक नाजूक आणि सर्वांनाच आवडणारी गोष्ट म्हणजे 'फुल' .  मानवी स्वभावानुसार  अनेकांना अनेक वेगवेगळी फुले  भुरळ घालतात . आपल्याला अशी वेगवेगळी  फुले आवडतात मग देवांनाही आवडत असावीत म्हणून  एखादे विशिष्ट 'फुल' विशिष्ट देवाचे लाडके असे सुसंगीत वर्गीकरण  या मानवानेच केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तर  या फुलांचे प्रकार , वगैरे  या शास्त्रीय प्रकारात न पडता  वेगवेगळ्या गाण्यातून , कवितेतून ही  फुले ओंजळीत घेण्याचा हा एक छोटा प्रयत्न

 या फुलांची 'धुंदी'  गीतकार / संगीतकारांना आली  की मग मुक्या भावना ही किती छान शब्द  रूप घेऊन येतात बघा :👉🏼

*तुझ्या जीवनी नीतीची जाग आली*
*माळरानी या प्रीतीची बाग झाली*
*सुखी आज माझ्या सुखाचा उखाणा*

*धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना*,  शब्दरूप आले मुक्या भावनांना

एक चिरंतन धडा आपल्या शामला देताना त्याची आई त्याला म्हणते
" शाम , पायाला घाण लागू नये म्हणून इतका जपतोस, तसे मनाला ही घाण लागू नये म्हणून जप हो .

या घटनेला  साक्षीही *फुलेच* होती कारण हे सर्व संभाषण 'देवाची फुले' काढण्यावरूनच झालं होतं.

चला थोडं पुराणात ही डोकावू . पारिजातक फुलाविषयी

पारिजातका विषयी ब-याच आख्याईका आपल्या संस्कृतीत ऐकीवात आहेत..जसे की एकदा देवर्षी नारदाने, श्री कृष्णाला पारिजातकाची फुले भेट म्हणुन दिलीत. श्री कृष्णाला ती खुप आवडलीत.. त्यांनी ती रुक्मिणीला दिलीत. रुक्मिणी पारिजातकाची फुले पाहुन हरखुन गेली आणि तीने लगेच ती आपल्या केसात माळलीत. ही वार्ता सत्यभामे पर्यंत पोहचताच तीला खुप राग आला आणि तीने श्री कृष्णाजवळ हट्टच धरला की मला हा वृक्ष आपल्या वाटीकेत लावायचे आहे. श्री कृष्णाचे सत्यभामेच्या हट्टा पुढे काही एक चालले नाही.त्याने इंद्राशी युद्ध करुन
हे वृक्ष मिळवले आणि सत्यभामेने ते मोठ्या आनंदाने आपल्या वाटिकेत लावले. पण झाले असे के वृक्ष सत्यभामेच्या वाटिकेत आणि फुलांचा सडा मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असे. त्यामुळे देखिल सत्यभामेचा, रुक्मिणी बद्दल चा मत्सर वाढतच गेला.. ( *माहिती संग्रहित*) .
यावरचे मराठी नाट्यगीत
' *बहरला पारिजात दारी, फुले कां पडती शेजारी* '

पारिजातकावरचे आणखी एक गाणे:-
*परसात पारिजातकाच्या सडा  पडे*
*कधी फुल वेचायला  नेशील तू गडे*
*कपिलेच्या दुधावर मऊ  दाट  साय*
*माया माझ्यावर दाट जशी तुझी माय*

पाडगावकर आपल्या एका बाल कवितेत बघा काय म्हणतात -

*टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिर भिर भिर भिर त्या तालावर गाणे आमुचे जुळे*

कवितेचा विषय निघाला म्हणून ना. धो महानोर याची एक कविता

*फुलात न्हाली पहाट ओली , क्षितिजावर चंद्र झुले*
*नभात भुकल्या केशरियाचे रंग फुलावर ओघळले*

जे न देखे रवी , ते देखे कवी , बघा या गाण्यात चक्क पावसाचे फुल केलंय
" *माळते माळते  माळते  मी माळते*
*केसात पावसाची फुले मी माळते*

काही मराठी गाण्यात फुल कशी डोकावलीत बघा

*समईच्या शुभ्र कळ्या ...*
*गंध फुलांचा गेला सांगून ...*
*मोगरा फुलला ...*
*स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा ...*
*बगळ्यांची माळ  ' फुले ' अजुनी अंबरात*..
*या बाई या बकुळीच्या झाडाखाली  ...*
*चाफा बोलेना..*
रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा ( तुझे गीत गाण्यासाठी)

ही काही गाणी ( साभार: *सुमेधा दातार*)

*गुलाबाची* कली बघा हल्दीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली

लपविलास तू हिरवा चाफा

चंपा चमेली की जाई अबोली , पहा माझी वहिनी अशी

कळले काही तुला कळले काही मला
लाल आला तुरा गुलमोहरा , हाच प्रीतीचा पहिला इशारा

घाई नको बाई अशी
आले रे बकुळफुला

आणि हे एक माझ्या आवडीचे

*दावा कोकणची निळी निळी खाडी*
*दोन्ही तीराला हिरवी हरवी झाडी*
*भगवा अबोली फुलांचा ताटवा*
*तिच्या घोवाला कोकण दाखवा*

छोट्या छोट्या कीटकांना  ही फुले आवडतात. मग तो कमळीच्या(🌷) मागे लागलेला ' *नादान भवरा* असो   किंवा ' *फुल' पाखरू* असो ' *छान किती दिसते'*   ना ?

हिंदी मध्ये एक दोन संदर्भ सांगतो. दुरदर्शनवरचा एक प्रसिद्ध कार्यक्रम ' *फुल खिले है गुलशन गुलशन*' आणि सादरकरणा-या ' तबस्सूम ' यांचा  चेहरा एका टवटवीत फुलाला लाजवेल असा , मन प्रसन्न करणारा  आणि एक गाणे
 ' *फुलों ' का तारोका सबका कहना है , एक हजारो मे मेरी बहना है* - बघा म्हणजे आपल्या बहिणीची महती सांगायला ता-यांबरोबर साक्षात फुलांची साक्ष.

' फुल और  काटे'  नावाचा एक हिंदी सिनेमा येऊन गेला .  नाही हा संदर्भ एवढ्याच साठी की  'फुल आणि काटे' या शब्दांचाच उल्लेख  असलेले एक मराठी नाट्यगीत . जीवनाचा दृष्टिकोन  सांगणारे , आशावादी  राहण्यास शिकवणारे
' *काटा रुते कुणाला, मज फुल ही रुतावे, हा हा हा हा दैव योग आ ss s हे*


मंडळी  हा फुलांचा संगीतरूपी ताटवा  तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो. काही फुले माळायची राहून ही गेली असतील . हा लेख वाचून यातील एक तरी गाणे तुम्ही आज दिवसभरात गुणगुणलेत किंवा इथे उल्लेख न केलेली फुलांची गाणी तुम्हाला आठवली तरी या लेखाचे सार्थक झाले असे म्हणेन.

लेखनमालेच्या शेवट या ओळींनी

*वेगवेगळी  फुले उमलली रचूनी त्याचे झेले*
*एकमेकांवरी उधळले गेले .... गेले ते दिन गेले*

🙏🏻🌺

( फुलंकित ) अमोल केळकर 📝
poetrymazi.blogspot.in

Thursday, August 15, 2019

यंदाचा स्वातंत्र्य दिन


यंदाचा स्वातंत्र्य दिन

यंदाचा स्वातंत्र्य दिन
कुणासाठी वेगळा खूप
काही ठिकाणी नव- चैतन्य
काही भाग चिडी- चूप

यंदा स्वातंत्र्य दिनी
नव्हती जिलबीची गाडी
अजूनी स्वच्छ व्हायचीय
माझ्या गावाकडची वाडी

उत्साह नव्हता चौकात
नव्हती देशभक्तीची गाणी
पात्रात जरी गेलं तरी
डोळ्यात अजून पाणी

कोण चुकलं, बरोबर कोण
आरोपीच्या पिंजऱ्यात निसर्ग
कळलं नाही, कळणारही नाही
धरणातून करावयाचा विसर्ग

झालं गेलं  'कृष्णार्पण'
सोपा सगळ्यात द्यायला धीर
'ज्याचं जातं त्यालाच कळतं' भले
' पगडी पचास जरी सलामत शीर '

मना मधली  राष्ट्रभक्ती
हातावरचे 'रक्षा' बंधन
संकटात धावलेल्या त्या
'माणूसकीला त्रिवार  वंदन'
🙏🏻🙏🏻🙏🏻

📝१५/८/१९

Saturday, August 3, 2019

तुषार ४/८/१९ ( मेगा ब्लाॅक)


तुषार ४/८/१९

कृष्णा माई


सांगलीकरांच्या लाडक्या 'माईस' समर्पित
🙏🏻🌺

( चाल: रम्य ती स्वर्गाहून लंका)

धन्य ती पूरातील कृष्णा
हिच्या पाण्याच्या जीवन लहरी भागविती तृष्णा

सुजलाम् सांगली अशी ही नगरी
आनंद होत असे कृष्णा तिरी
त्या नगरीवर 'कृष्णा' नियमित, करिते अभिषेका

'कृष्णा-कोयना' दोघी भगिनी
उभय उपजल्या या जलधितुनी
या कृष्णेचा 'आशीर्वाद' तरी 'टुकारा' घेशील का?
 🏊🏻🚣🏼
📝३/८/१९
poetrymazi.blogspot.in

Monday, July 29, 2019


स्विगी , झोमॅटो वरून आॅर्डर करणा-या
 ' खाद्यप्रेमींना ' समर्पित
🍱🍣🥘🥗🌯🥫🥪🥙🌮

( चाल : देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा उघड दार देवा आता, उघड दार देवा)

स्विगीची भाकरी , झोमॅटोचा मेवा
उघड अॅप भावा आता उघड अॅप भावा

इथे खाणे घरी बसुनी  रीत  माणसाची
'मनी' खात्यामध्ये असता भीती ना कशाची
सरावल्या बोटांना मग कंप का  सुटावा

उघड अॅप भावा आता उघड अॅप भावा

( *मृगजळ* )
झटक्यात दिसते 'सूट' उघडताच अॅप
ज्याचे त्याचे हाती आहे 'कूपनचे' माप
'प्रिय बायकोची' ऐसी, घडे नित्यसेवा ☺

उघड अॅप भावा आता उघड अॅप भावा

( *प्रत्यक्षात* )
'दर' जणू उजवीकडचा भासतो बिलोरी
आपुलीच ' ऑर्डर' होते  आपुलीच वैरी
घरोघरी 'पार्सलाचा ' मेळ जमवावा

उघड अॅप भावा आता उघड अॅप भावा

तुझ्या हाती पांडुरंगा ऑर्डर पडावी .
मुक्तपणे भूक माझी अशी चाळवावी.
मार्ग तुझा ' गुगल'वरचा मला आकळावा.

उघड अॅप भावा आता उघड अॅप भावा

पिझ्झा-बर्गर साठी आता बुजरेपणा गेला .
बंधनात बसुनी वेडा ' जंक ' युक्त झाला
पोटाच्या या घेरीचा करील तोच हेवा

उघड अॅप भावा आता उघड अॅप भावा

 📝: विसंगती सदा मिळो
poetrymazi.blogspot.in

अमोल

Wednesday, July 24, 2019

अंधाराची' खंत तू कशाला करशी रे....


*'अंधाराची'  खंत  तू कशाला करशी  रे*...🌌

मंडळी  नमस्कार 🙏🏻

आज परत एक  वेगळा विषय मांडतोय.  दिवसातल्या २४ तासात सरासरी  किमान १२ तास  तरी या  गोष्टीशी आपला संबंध  येतोच. किंबहुना आपल्या जन्माआधी ९ महिन्यापासूनच याची आपल्याला ओळख व्हायला सुरवात झालेली असते त्यामुळे प्रत्यक्ष भूतलावर जेव्हा आपला अवतार होतो तेव्हा काही अपवाद ( बालपण )  वगळता आपण नकळत याच्याशी जुळवून घ्यायला लागतो. हाच तो
' *अंधार* ' . अगदी जीवनात प्रत्येक टप्प्यावर भेटणारा, नवीन गोष्टी शिकवणारा पण तरीही सहजा सहजी ' हवा हवासा ' न वाटणारा.

दिवस म्हणजे  प्रकाश आणि रात्र म्हणजे अंधार आणि  रात्रीचा / अंधाराचा  रंग काळा म्हणून  अंधाराचे प्रतीक असणा-या 'काळ्या' रंगाला ही नकळत नाकारले जाणे हा मानवी स्वभावच म्हणायला पाहिजे ना ? उदा. मंगल प्रसंगी ( काही अपवाद वगळता ) काळे कपडे न घालणे, शक्यतो काळ्या रंगाची गाडी न घेणे, बुद्धीबळ खेळात काळ्या सोंगटीने खेळणारा
पांढरी सोंगटी घेऊन खेळणा-याच्या नंतरच खेळणार,कॅरम मधे ही काळ्या सोंगटीला कमी गुण ते  अगदी काळे- गोरे  वंशवादा पर्यंत लिहिता येईल. पण तो विषय नको.

कुठल्याही घरात जास्त दंगा केल्यावर  तो बघ हं तिथे अंधारात ' बागुलबुवा ' आहे अशी भीती घातला गेलेला  चिंटू, बंडू , मोनू  नसेल असे शक्य वाटत  नाही. वयाने मोठे झाल्यावर 'जा रे  त्या खोलीतून अमुक गोष्ट घेऊन ये 'असे सांगितल्यावर  कुठल्याही घरात , ' नाही बाबा मला भीती वाटतीय, अंधार आहे , कुणी तरी लाईट लावून द्या '  असे बोल ऐकायला मिळाले नसतील असेही  वाटत नाही.

 ' *अरे जा काही होत नाही आम्ही आहोत इथे* ' हे पाठींब्याचे बोल आणि संध्याकाळी अंधार पडला की
  ' *शत्रूबुध्दी विनाशाय , दीपज्योती नमोस्तुते  ही प्रार्थना* ' या गोष्टींनी  मात्र लहानपणी
' अंधाराशी ' दोन हात करायाला बळ दिले  हे खरं.

आणि मग अंधाराशी हळूहळू  मैत्री व्हायला सुरुवात झाली . नाट्यगृहात/ सिनेमात खेळ चालू होण्यापूर्वीचा अंधार, अचानक रात्री जेवताना किंवा दूरदर्शनवर कार्यक्रम बघताना दिवे जाऊन झालेला अंधार ,  रातराणी बस मधे तिकीट काढून झाल्यावर डबल बेल वाजवून वाहकाने चालकाला दिवे बंद करण्याची सूचना दिल्यानंतर काही वेळात झालेला अंधार, आषाढात भर दुपारी  आकाश भरून झाल्यानंतर चा अंधार ते खास बायकोसाठी ( इथे आवश्यकतेनुसार मैत्रीण ही घ्यायला हरकत नाही ) कँडल नाईट डिनर साठी मुद्दाम जुळवून आणलेला अंधार ? किती विविध रूपे ना अंधाराची?

 मंडळी ,यात शाळेतीळ निकालाची प्रत आई - बाबा / नातेवाईकांच्या हाती लागल्यानंतर दिवसाही चमकलेले 'अंधारातील तारे'  फक्त विचारात घेतलेले नाहीत 🤩

पण खरं सांगू मला  या सगळ्या अंधारात एक अंधार खूप आवडायच्या जो मी अजूनही  एन्जॉय करतो तो म्हणजे
 ' बोगद्यात ' गेल्यावर होणारा अंधार. अगदी आजही मुंबई - पुणे  मेगा हायवेवर कामशेत असू दे, भागतन असू दे किंवा खंडाळ्याचा बोगदा असू दे  अगदी स्वतः गाडी चालवत असलो तरी  वाटत मस्त लहानपणी  जेव्हा  ' पेशवे पार्कात 'फुलराणीत' बसून गाडी बोगद्यात गेल्यावर  किंवा शाळेच्या सहलीतून  सज्जनगडला जाताना 'अजिंक्य तारा ' किल्याच्या  बोगद्यातून सगळ्या मित्रांसकट  जोरजोरात ओरडायचो तसे ओरडावे.  घेतलीय तुम्ही  अशी मजा ओरडण्याची.????

लहानपणी सांगलीत राजवाड्याच्या तटबंदीतून जाताना लागाणारा बुरुज/ प्रवेशद्वार म्हणजे एक लहान बोगदाच वाटायचा , पुण्याला लहानपणी मामा कडे जाताना लागणारा कात्रजचा बोगदा, पुढे  लोणावळा- खंडाळा  रेल्वे रस्ता मार्गावरचे , कोकण रेल्वे वरचा रत्नागिरी जवळचा  सगळ्यात लांब बोगदा आणि इतर बोगदे , कल्याण ठाणे मधील पारसिक हिल बोगदा , अगदी बेलापूर मधील हार्बर लाईनवर असलेला बोगदा , माथेरानला टाॅय ट्रेन मधून लागणारा बोगदा ,कामानिमित्य कसारा- नाशिक , जबलपूर पर्यत लागलेले बोगदे  ते अगदी आजकाल तयार झालेला कर्जत - पनवेल नवीन मार्गावरचा बोगदा  ते ईस्टर्न फ्री वे वरचा चेंबूरचा बोगदा

 यासगळ्यांनी एकच शिकवलं   आयुष्यात अनेक टप्प्यावर  , वेगवेगळ्या वेळी , वेगवेगळ्या कालावधीचे बोगदे (प्रती) अंधार  येईल पण  त्यानंतर असेल फक्त प्रकाश ...

तेव्हा
 ' *अंधाराची'  खंत  तू कशाला करशी  रे ....... गा प्रकाश गीत*

आता गाण्याचा विषय निघालाच आहे तर ' अंधारावरची काही गाणी/ कविता पाहू

तिन्ही सांजा झाल्यावर  जेव्हा अंधाराची चाहूल लागते तेव्हा
 " चिमणी आई" ही आपल्या पिल्लाना साद घालताना म्हणते

" दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर
अशा अ वेळी असू नका रे आईपासून दूर
चूक चूक करिते पाल उगाच चिंता मज लागल्या
या चिमण्यांनो  परत परत फिरा रे घरा कडे आपुल्या ,
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या.

देऊळ सिनेमा त ही एक असंच गाणं आहे.  जीवनात एका टप्प्यावर  खूप निराश झालेला एक भक्त स्वामी समर्थांची याचना करता ना म्हणतोय ,

" अंधार  दाटला  दाही  दिशाना , सांगावे कसे मी सा-या जगाला..... रे स्वामी राया  "

मनाची एकदा समजूत झाली  की "भिऊ नकोस , स्वामी तुझ्या पाठीशी आहे" की
मग हे " अंधाराचे जाळे फिटून , वाटतं ( आता)  झाले मोकळे आकाश "

एकंदर उत्साह  वाटायला  लागतो  अशावेळी  ही प्रकाशाची पणती जपून ठेवायची.

थोडा उजेड ठेवा , अंधार फार झाला
पणती जपून ठेवा, अंधार फार झाला

आले चहू दिशांनी तुफान विस्मृतींचे
 नाती जपून ठेवा, अंधार फार झाला

मराठी विज्ञान परिषद ( मुंबई ) यांनी एक 'विज्ञान गीत'  त्यांच्या संकेतस्थळावर दिलय. त्याचे धृपद किती छान आहे बघा

संपला अंधार आता , सूर्य ज्ञानाचा उदेला
लागल्या वाटा दिसायला, शक्ती लाभे चालण्याला !!

मंडळी लेख आवरता घ्यायची वेळ आली. तुम्हाला खोटं वाटेल पण काल आषाढ  कृष्ण पक्षाच्या सप्तमीला ' *अंधेरीच्या* ' लोखंडवाला गेटच्या बाहेर बसून हा लेख मला सुचला आहे.😬
 तुम्हाला नक्की आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो

प्रकाशाच्या  एका किरणाने
" श्रावण "  फुलू दे जीवनात
माफ करा मंडळी  जर
काही चुकलं असेल लिहिण्यात.

📝 अमोल केळकर

Sunday, July 21, 2019

सुंदर ते यान


चंद्रयान २ ला - काव्यमय शुभेच्छा
( चाल : सुदर ते ध्यान , उभे विटेवरी ) 🚀🌝

सुंदर ते यान, उभे जाण्यावरी
जीएसएलव्हीएमके लावुनिया !! १ !!

वायरी सर्व जोडा, दिसते  झुंबर
चालले निरंतर चंद्र यान !! २ !!

'उत्तरा भाद्रपदा ' तळपती गगनी
राशी 'मींन' शशी  विराजित !! ३ !!

' इस्रो ' म्हणे माझें  हेचि सर्व सुख
दावीन चंद्रपृष्ठ  आवडीने !! ४ !!

📝अमोल केळकर २२/७/१९


Monday, July 15, 2019

माॅर्गन खुलला, माॅर्गन खुलला


काल एवढा रोहमर्षक सामना झाला. मग कुणीही विजेता कप्तान  खुलणारच ना 🏆🏏💂🏻

( चाल: मोगरा फुलला, मोगरा फुलला)

माॅर्गन खुलला, माॅर्गन खुलला
झेल टाकीता खेळाडू ,कप यांचा झाला 🏆

दुसरी ती धाव , धाऊनिया भारी
तोच चेंडू गेला,  बाँन्डरीवरी

माॅर्गन खुलला, माॅर्गन खुलला

नियमांचीये गुंती, घोळघातला गेला
दोन चौकारापरी 'साहेबा' अर्पिला

माॅर्गन खुलला, माॅर्गन खुलला
झेल टाकीता खेळाडू ,कप यांचा झाला 🏆

📝१५/७/१९
poetrymazi.blogspot.in

मुळ गाणे :-

मोगरा फुलला मोगरा
फुलला.
फुलें वेंचितां बहरू
कळियांसी आला ..

इवलेंसे रोप लावियलें
द्वारी.
त्याचा वेलु
गगनावेरी ...

मनाचिये गुंती
गुंफियेला शेला.
बाप रखुमादेविवरी
विठ्ठलें अर्पिला

चंद्रयान चंद्रग्रहण आणि व्हाट्सप




मंडळी तांत्रिक अडचण वगैरे  आली हे एका दृष्टीने बरंच झालं म्हणा. तसही ' मूळ' नक्षत्रावर यान सोडले जाणे  हे उचित झालेच नसते. ' मूळपदावर ' येणे हाच ' मूळ नक्षत्राचा मूलमंत्र असतो. काय योगायोग बघा ना ५६ मिनिटे बाकी असतानाच  हे लक्षात आले. आता गेल्या काही वर्षात  ५६ या अंकाला  भारत भूमीत आलेले  महत्व पाहता   ही विष्णू कृपाच  नव्हे काय ? .

काय उपयोग मग त्या  अध्यक्षांचा जे  कुठल्याही मोठ्या कार्यक्रमा आधी तिरुपतीला जाऊन बालाजीचा आशीर्वाद घेतात, नारळ फोडतात . एक साधी गोष्ट लक्षात येऊ नये की  ' 'चंद्र ग्रहण' लागतंय. बिचारा चंद्र त्या धनु राशीतुन ' केतू ' पासून कसं  वाचायचं या विचारात असताना , आडाखे बांधत असताना  अगदी  त्याचवेळेला ते यान  सोडायचे का?  चाललं असत की जरा मागे  पुढे. ' दे दान सुटे गि-हाण ' असा जयघोष झाल्यानंतर होता की बक्कळ वेळ.

तरी नशीब ते  लंडन वाले 'साहेब' तरी  थोडक्यात बचावले आणि कप हाती लागला त्यांच्या. अहो चंद्राची कृपा होती त्याच्यांवर म्हणून वाचले.  असं कसं म्हणून काय विचारता ?  मारलेले
 " चौकार " मोजून त्यांना विजयी घोषित केलं गेलं ना ? मग ?
४ या अंकावर चंद्राचाच प्रभाव आहे, राशी चक्रातील 'कर्क रास' ( ४ नंबरची ) ही चंद्राची  त्यामुळेच  काळ पुरुषाच्या कुंडलीतील चतुर्थ स्थान ही  चंद्राचे मग  ' चौकारावर ' चंद्राचा प्रभाव नाही का मंडळी ? काही चुकत असले तर सांगा बर लगेच.

नाही म्हणले तरी या गुरु पौर्णिमेला आलेल्या ग्रहणाने
' गुरु ' महाराज ही तसे नाराजच आहेत म्हणा. जेव्हा कळलं त्यांना तेव्हापासून  ते वक्री होऊन
 ' मंगळाच्या वृश्चिक राशीत ' बसलेत. तेव्हा  आता एखादे मस्त ऊर्ध्वगामी नक्षत्र पाहून, गुरु मार्गी झाल्यानंतर  द्या पेटवून  चंद्रयान

मंडळी या  ग्रहण  काळात
 ' सांगेन मी गोष्टी युक्तीच्या चार '

ग्रहण पर्व हा आपला ' नियमित मंत्र ' सिध्द करण्यासाठीचा उत्तम कालावधी  आणि काहीही झाले तर सध्याचा आपला मंत्र एकच
' जाऊ आहारी,व्हाटसप वाटे भारी'

काही उपयुक्त गोष्टी सांगत आहे. नियम म्हणा हवं तर.  खाली दिलेले हे नियम   युवक , आजारी, वृध्द्व , गर्भवती , नोकरदार , व्यावसायिक सगळ्यां साठी समान आहेत.
ग्रहणाचा स्पर्श , मध्य , मोक्ष
 " वेळ"  अनेक ग्रुपवरून  तुमच्या पर्यत आली असेलच

हे ग्रहण रात्रीच्या तीस-या प्रहरात असल्याने  ३ प्रहर आधी म्हणजे दुपारी ४ वाजता आपला भ्रमणध्वनी , ऊर्जादेयक यंत्रे  इत्यादी काही मिनिटासाठी बंद करून सर्व उपकरणे स्वच्छ करावीत. ग्रहण स्पर्श होईपर्यत ती उपकरणे तशीच ठेवावीत व इतर कामे आपण करू शकतो का याचा अंदाज घ्यावा. हाताच्या बोटांना जरा त्रास होईल पण त्याकडे दुर्लक्ष करावे.

ग्रहण स्पर्श  सुरु होताच भ्रमणध्वनी हातात घेऊन डोक्याला दोन -तीनदा लावून चालू करावा  गरज असल्यास ऊर्जा देण्याची व्यवस्था करावी.

 चंद्र हा मनाचा कारक ग्रह असल्याने  सर्वच समूहातील
' मनाला लागलेले संभाषण ' हुडकण्यास सुरवात करावी . या प्रसंगी तारांकित केलेले संभाषण ही शोधावे आणि ग्रहण मध्य असतानाच ते सर्व जपून ठेवलेले संभाषण  उडवावे. त्यानंतर जास्त श्रम झाले असतील तर परत भ्रमणध्वनी बंद करून ठेवावा.

आता शेवटाचा टप्पा. मोक्ष काल. ग्रहण संपायचा काळ .

आधीचे  भ्रमणध्वनीतील संभाषण जे आपण उडवले ते मनात मात्र अजूनही असण्याची शक्यता असेल  तेव्हा या कालावधीत तुम्हाला हे संभाषण आपल्या मनातूनच कायम उडवायचे आहे. हे सर्व झाले की  तुम्ही निद्रा- देवीच्या अधीन व्हायला हरकत नाही

वि सु : - मेष , मिथुन , सिह , वृश्चिक यांना या ग्रहणाचे
' मिश्र फळ '  असल्याने यांनी शक्यतो खास समूहातील  सगळेच मेसेज ' डिलीट ऑल ' करावेत

वृषभ, कन्या, धनु , मकर  राशीच्या लोकांना ग्रहणाचे
' अनिष्ट फळ '  असल्याने त्यांनी शक्यतो सध्याचे पहिले  व्हाटसप घालवून  परत नवीन व्हाटसप उतरवून घ्यावे

पहाटे जेव्हा
 ' दे दान - सुटे गी-हाण  ' चा गजर होईल तेव्हा  तुमचा भ्रमणध्वनी आणि तुमचे स्वच्छ मन  परत तयार होतील सगळीकडे आनंदाचे गुच्छ पाठवायला  🌺💐🙂

📝अमोल केळकर
poetrymazi.blogspot.in
१५/७/१९

Thursday, July 11, 2019


*सेल्फीशी होऊ दंग. . .    सेल्फीत्सोव*

( सेल्फीची गोडी, करी जास वेडी, तोचि पुण्य जोडी पंढरीचे )

देहू आळंदी हून पंढरपूरकडे  पालख्या निघाल्या की  याच सुमारास  पुण्य नगरीत  एक अनोखा  उत्सव भरताना दिसतो.  अर्थात पुणेकर हे मुळातच उत्सव प्रिय . सवाई महोत्सव असू दे ,   गणेशोत्सव असू दे  , दिवाळी पहाट किंवा अगदी कार्तिक पोर्णीमा  असू दे या सगळ्यात पुणेकरांचा उत्साह अगदी  ओसंडून वहात असतो.

 देहू ,आळंदीहून पुणे मार्गे पंढरपूरला जाणा-या पालख्या हा ही पुणेकरांसाठी असाच  कौतुकाचा विषय.  पाऊस, हेल्मेट सक्ती, रस्त्यांची कामे , मेट्रोची कामे  आणि त्यात वारीमुळे होणारी वाहतूक कोंडी  याची चिंता न करता अस्सल पुणेकर या पालख्या  "एन्जॉय"  करतो. इथे अस्सल पुणेकर हा शब्द  अशासाठी वापरलाय की  या सगळ्यामुळे त्रास होतो असे मानणारा वर्ग ही पुण्यात आहे पण तो मुळचा पुणेकर नसून बाहेरून पुण्यात स्थायिक झालेला पुणेकर आहे.

या पालख्या जर पुणे मुक्कामी विकेंड ला येत असतील तर या उत्साहाला अधिक उधाण येते.  आपापला व्याप सांभाळून पुणेकर वारीचा आनंद लुटतात , वारी बरोबर एक दिवस चालत जातात , ताल मृदूंग , अभंग , जयघोष , पताका , तुळशी- वृंदावन , कपाळावर गंध, पालखी  सोबत जाणे  इ अनेक प्रकार करुन आपला सहभाग नोंदवतात.

साधारण उत्सव असो , यात्रा/ जत्रा असो साधारण आपण तीन प्रकारची जनता यात सामील होते असे म्हणतो  हौसे, गवसे, नौसे .
सोशल मीडियाचा,  सेल्फी या प्रकारचा उदय झाल्यानंतर आजकाल  ' हौसे, गवसे, नौसे बरोबरच आता "सेल्फे"  ही नवी जमात बघता बघता फोपावली आहे असा आमचा अभ्यास सांगतो.  प्रोफेशनल कॅमेरामन , चित्रकार , आर्टिस्ट यांच एक ठीक असतं. पूर्वीपासून ही लोकही वारीचे चित्रीकरण,काही खास फोटो  काढण्यात मग्न असतात . मात्र यांचा त्रास फारसा कुणाला होत नाही. एकतर हे लांब कुठं तरी  बसून  आपले काम करत असतात . ना ते कुणाच्या अध्यात ना मध्यात .  हरिनामाचा जयघोष करत चाललेल्या  या माऊलीच्या भक्तांच्या तर हे गावीही नसते  की दूर  कुठूनतरी  कुणीतरी आपली छबी , आपले भाव (  आजच्या शब्दात  नॅचरल एक्सप्रेशन्स )  टिपत आहेत.  यात कुठेही देखावा नसतो , कृत्रिमता नसते  त्यामुळे ते चित्र ही अगदी सहज जमून जाते.

आता या वारीतल्या सेल्फी टेक्नॉलॉजीचा ( इथे पारंपारिक तंत्रज्ञानाचा विचार आहे , यातही आता अनेक आधुनिक तंत्रज्ञान आले आहे )  विचार करू.
एकंदर यांचे वर्णन अभंगातून व्यक्त करायचे झाल्यास असे 👇🏻 करता येईल.

*पुण्यनगरी गाऊ आम्ही  पुण्यनगरी नाचू*
*मोबाईलच्या कँमेराने  सेल्फी फोटो काढू*
*विठ्ठलचे नाम घेऊ  लावूनी ' टायमर '*

 तर  या  लोकांना आपण वारीत जाऊन आलो ( फोटो काढण्यापुरते का होईना )  हे अख्या जगाला ( ठणकावून) सांगायचे असते. हेच प्रयोजन ठेऊन ते घरातून निघतात . यात काही जण स्वतःच्या कुटूंबासह (  हे कमीच ) , ऑफीस ग्रुप,  सोसायटी ग्रुप  किंवा शाळा - कॉलेजच्या मित्र - मैत्रिणींचा ग्रुप ( हे जास्त )निघतात. थोडक्यात घोळक्याने जातात .  यात एखाद्या शहाण्याला यापूर्वीच्या
' *सेल्फी-वारीचा* ' अनुभव असतो. पालखीचा मुक्काम  कुठे आहे , मार्ग काय आहे  याची माहिती ही करून घेतलेली असते. मग ठरलेल्या ठिकाणी मंडळी पोचतात. मग कुणा माऊलीच्या डोक्यावरचे तुळशी वृंदावन स्वतःच्या डोक्यावर घेऊन  फोटो काढायला लावणे ( इथे बहुतेक सेल्फी घेता येणे शक्य नसते ) , उगाच ताल , मृदूंग अडकवून

*निघालो घेऊन कॅमेरा हा हाती , आम्ही भाग्यवान*

अशा अॅटीट्युड ( ऐटीत - IT मधील असेही म्हणा हवंतर ) मधे हे सेल्फीकरी विठ्ठलाला लावतात तसा गंध कपाळावर ' गुगल ' तानाचा फोटो /  घोडे , पालखी  बरोबरचा सेल्फी  आणि पुढे काय काय प्रकारे सेल्फी निघू शकतात इतपत कल्पना करण्यात तुम्ही समर्थ आहात . आजकाल ते
'फेसबुक  लाईव्ह ' प्रकार पण दाखवायचे असते.

यानं  काय होत की एकंदर या वारीचा वेग पुण्याच्या आजूबाजूला कमी होतो. जो तो  सेल्फी ( स्व चित्र) घेण्यासाठी इतरांना थांबवतो. ते वारकरीही मग थांबतात  , त्यांचा नामात व्यत्यय येतो.
या सर्व प्रकाराने  आपण भक्तीचे अनोखे प्रदर्शन नुसते करत आहोत  असे काही वेळा वाटते.

अर्थात याला अपवाद आहेत हे नक्कीच . काही खरोखरच सेवाभावाने कुठलीही अपेक्षा  न करता मदत करतात, अन्नदानाचे आयोजन होते , कचरा व्यवस्थापनाचे , सांडपाणी व्यवस्थापनाचे नव नवीन आदर्श  पुढे येतात.अशा काही समाधानाच्या गोष्टीही दिसून येतात

*पंढरपूरची वारी  ही  ख-या अर्थाने  महाराष्ट्राचा सांस्कृतिक / वैचारिक  आणि / भक्तीमय  ठेवा  आहे. त्या सोहळ्याला आपण सगळे मिळून असेच ठेवू या* 🚩🚩

दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्त  *फोटोत  रंगला* ,

असं  फक्त व्हायला नको हीच पांडूरंगा चरणी  प्रार्थना 🙏🏻🌺

देवा तुझ्या द्वारी आलो
www.kelkaramol.blogspot.in
Related Posts Plugin for WordPress, Blogger...