नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, March 9, 2020

खेळताना रंग बाई होळीचा


#होळी_स्पेशल_विडंबन 🔥
-------------------------------------------
खेळताना रंग बाई होळीचा, होळीचा
विषाणू क-रोना नको चाय्नाचा

जरा घशात खवखवलं आणि काळीज धडधडलं
काय सांगु मी पुढलं ,क्षणातच सारं घडलं
दर झाला वाढीव  'मास्कचा', 'मास्कचा'
विषाणू क-रोना नको चाय्नाचा

मला काहि समजंना, मला काही उमजंना
त्याला कोणी सांगंना, कुणाला तो ऐकंना
डाव साधला ऐन वेळीचा, वेळीचा
विषाणू क-रोना नको चाय्नाचा

खेळताना रंग बाई होळीचा, होळीचा
विषाणू क-रोना आला चाय्नाचा

📝अमोल
०९/०३/२०२०
poetrymazi.blogspot.in

#होळी_स्पेशल🔥

Saturday, March 7, 2020

आमची काही पाळणा घरे " ( महिला दिन विशेष )


" आमची  काही पाळणा  घरे " (  महिला दिन विशेष )

मंडळी  आयुष्याच्या निम्म्या टप्प्यावर आलो असताना वय जरी पुढे जात राहिले तरी माणसाने आपला प्रवास मनाने का होईना  वक्री ग्रहासारखा वक्र गतीने परत उलटा करावा  आणि बालपणा कडे जावे. परत बालपणीचा काळ सुखाचा अनुभवण्याचा  प्रयत्न करावा कारण आयुष्यातला हाच कालावधी आनंदी होता  हे एव्हानं सगळ्यांना समजलेले असते. कुणाला हे भूतकाळात रमणे  म्हणजे मूर्खपणाचे वाटू शकते पण मला  'भविष्याचा अंतरंगात' डोकावताना भूतकाळाच्या स्मृतीत ही रमायला आवडते . किंबहुना अनेकजण न कळत असा  प्रवास करतच असतात. ( म्हणूनच वयाने आलेले म्हातारपण हे मनाने  दुसरे बालपणच अशी म्हण तयार झाली असावी )

असंच भूतकाळात रमताना, आज 'महिला दिना निमित्याने' काही खास महिलांची आठवण आली म्हणून हे लेखन.😌

लहानपणी  ज्याच्या घरी आमचे विशेष
 ' पालन ' झाले. त्या  नरवणे बाई ( इंन्नी ),  दिवाण काकू ( आमचा मित्र दिपक दिवाणची  आई ) आणि कुलकर्णी आजी ( या आजी मात्र आमचं पालन करायला आमच्या घरी यायच्या )

तर अगदी लहानपणी ( आता वय विचारू नका,आठवतंय त्या वयाचा असताना ) आम्ही माधवनगरला  ( सांगली ) 'शनिवार पेठेत' रहायचो. आई बहुतेक त्यावेळेला नोकरी ला नव्हती पण शिकायला सांगलीला जायची किंवा नोकरी ही करत असेल नक्की लक्षात नाही.  आमचा मुक्काम ब-याच वेळेला असायचा  तिथेच राहणा-या ' नरवणे कुटूंबीयांकडे '. सर्वजण या नरवणे काकू यांना इंन्नी या नावाने संबोधायचे . त्या केवळ आम्हाला घरातच सांभाळायच्या नाहीत तर कामाला बाहेर पडल्या की  बरोबर घेऊन जायच्या . माधवनगरातील  विठोबाच्या देवळातील जत्रा असू दे, एखादा उत्सव , कीर्तन , जयंत्या  ते अगदी सिनेमा बघण्या पर्यतच 'बाळकडू'  या इंन्नीने आम्हाला दिले. शब्दश बारसे ते माणसाच्या आयुष्यातील शेवटचा प्रसंग या सगळ्या ठिकाणी इंन्नी आम्हाला घेऊन गेली.

इथे आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छितो की  जरी आम्ही शनिवार पेठेत रहात असलो तरी आमचे  मुख्य घर 'गुरुवार पेठेत' होते .  आमची आजी  आणि काकू तिथे असायच्या . इथेही आमचा  मुक्काम असायचा.

इंन्नी बरोबर आम्ही माधवनगर फिरलो पण आमचा काकू बरोबर आम्ही  माधवनगर च्या बाहेरचे जग पाहिले.

आता वाटतंय की ' समाज '  या शब्दाची ओळख आम्हाला आमची काकू /  इंन्नी मुळे झाली (अर्थात ते वय समाज वगैरे समजण्या पलीकडचे होते  पण आता तसे वाटत आहे )

थोडं मोठं झाल्यावर आम्ही सांगली या शहरात रहायला आलो.  शिशू मंदिर मध्ये  ज्याला बहुतेक आपण आता ज्यूनिअर / सिनिअर केजी का काय म्हणतो तिथे दिवाण काकू  शिकवायला होत्या . त्यांच्या सासूबाई आणि माझी आई कॉलेजला एकत्र शिकवायला होत्या त्यामुळे त्यांची विशेष ओळख होती. आमची शाळा सकाळची, आईची दुपारची . मग दिवसभर कुठे रहायचे ?  हा प्रश्न दिवाण काकूंनीच सोडवला. आमची शाळा सुटली की त्या मला त्यांच्याबरोबर घरी घेऊन जायला लागल्या. मग संध्याकाळी आई आली की आम्ही घरी जायला लागलो. यांचे घर तसे लांब होते. सिटी पोस्ट पासून जिल्हा परिषदेपर्यत सिटी बसने जायला मिळायचे हे ही अप्रूप होते. त्यांच्या घराजवळ  'त्रिकोणी बाग' असायची तिथे खेळायला जायचो. थोडक्यात यांच्याकडे कधी अभ्यास वगैरे केल्याचं आठवलं नाही ( ते वयही नव्हतं म्हणा अभ्यासाचे पण आजकाल नर्सरीतील मुलांचा अभ्यास पाहिला की वाटते आम्ही काहीच करायचो नाही). त्यांच्या घराच्या  इथेच रहाणारा 'शाळेतील मित्र ' दिसला  की मात्र जरा शाळेची आठवण यायची बस ! ☺
 पण या पालन ' घरात ' आम्ही जेवढी मजा केली ती आमच्या घरी पण केलेली नसेल. मुख्य म्हणजे काकूंना मी कधी रागावलेले पाहिलंच नाही. कदाचित त्यांचा मुलगा आमचा मित्र दीपक शांत असल्याने बहुतेक त्या माझा दंगा खपवून घेत असतील

पुढे आणखी  जरा मोठा झाल्यावर  एक 'कुलकर्णी आजी'  मला सांभाळायला आमच्या 'राम मंदिर' इथल्या घरी यायच्या. काय  कुणास ठाऊक पण यांच्याशी सूत जमायला मला जरा कठीणच गेले . एकतर पूर्वीची  'पालन - घरे ' ही घराच्या बाहेर होती. बाहेर फिरायाला मिळणे हे आवडीचे काम यात होत असल्याने कंटाळण्याचा प्रश्न नव्हता . पण इथे मात्र स्वतःच्याच घरी बंद झाल्यासारखे वाटले  असेल म्हणून या आजींशी  म्हणावी तेवढी जवळीक झाली नाही. बर त्या काही  ओरडायच्या , मारायच्या, अभ्यास कर म्हणायच्या असं ही नाही . पण आजकालची  मुले पहिल्यांदा जेंव्हा पाळणाघरात गेल्यावर जो रडून गोंधळ घालतात ( पहिल्यादा )  तसा गोंधळ आम्ही आमच्याच घरात नित्य घालत असायचो

हायस्कुलला गेल्यावर पूर्ण वेळ सकाळी ११ ते ५ वगैरे  शाळा आणि आईच्या ही काॅलेजची वेळ  सारखी असल्याने "पालन - घराचा" प्रश्न सुटला होता पण बहुतेक सातवी / आठवी असेन, शाळेच्या बांधकामानिमित्य १-२ वर्ष आमची शाळा सकाळी ठेवली गेली . मग परत दुपारी कुठे रहायचचे हा प्रश्न होताच . तो प्रश्न माझ्या चुलत बहिणीने सोडवला . शाळा सुटल्यावर आम्ही आमच्या माधुरी ताईकडे  टिंबर एरियात जायला लागलो.
त्यावेळेला ती क्लासेस ही घ्यायची .  हा अभ्यासाच्या दृष्टीने उमेदीचा काळ ठरला. जो काही थोडाबहुत अभ्यास केला किंबहुना अभ्यासाची गोडी लागली ती इथेच. तिच्याकडे ही आमच्या शाळेतील एक दुसरा मित्र क्लासला यायचा .  शाळेतील मित्राचा सहवास हा मात्र प्रत्येकवेळी  कुठेना कुठे मिळतच गेला / अजूनही मिळत आहे

अशारितीने त्यावेळला जेव्हा आमचे पालन - व्हावे  अशी गरज आमच्या पालकांना झाली होती त्या त्या प्रत्येक वेळी वरील उल्लेख केलेल्या व्यक्तींची मदत झाली.
काकू आणि बहिण या तर घरच्याच होत्या पण बाकीच्यांशी रक्ताचे नाते नव्हते.  आता माझ्या मते त्या कुलकर्णी आजी सांभाळायला म्हणून यायच्या त्यांना त्याच कामासाठी घेतलेले असल्यामुळे  त्यांना कदाचित  मोबदला दिला जात असेल पण बाकिच्यांनी केवळ कुठलीही अपेक्षा न ठेवता आमचे लाड केले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही

म्हणूनच आज महिला दिना निमित्याने आमच्या आयुष्यात आलेल्या , मदत झालेल्या या खास  स्त्रियांचे स्मरण

*ओ पालन हारे , निर्गुण  और न्यारे, तुम्हरे  बिन हमरा कौन नही* 🙏🏻

📝 अमोल
०८/०३/२०२०
#आंतरराष्ट्रीय_महिला_दिन

Thursday, March 5, 2020

नको खेळूस 'शेठजी' होळी रे


#बुरा_न_ मानो_पर_होली_मत_ खेलो

खास बातमी सांगतो, आम्ही  शेठजींना  असा गुप्त संदेश पाठवला आणि त्यांनी निर्णय घेतला होळी न खेळण्याचा

मूळ गाणे / चाल:  नको वाजवू श्रीहरी मुरली रे

नको खेळूस 'शेठजी' होळी रे
नको खेळूस 'शेठजी' होळी रे
यंदा ' करोना ' ने वाट लावली रे

खुंटला 'वायूचा वेग , वर्षती 'मेसेज'
मंदी स्थिरावली.

नको खेळूस 'शेठजी' होळी रे

रुमाल बांधून बाहेरची जाता
जनता बाजूला सरकली
एका 'ड्रँगर्दनी' अव कृपेने
'वसुधा' सारी घाबरली .

नको खेळूस 'शेठजी' होळी रे
-----------------------------------
मूळ गवळण :-

नको वाजवू श्री हरी मुरली
नको वाजवू श्री हरी मुरली
तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे ||धृ||.

खुंटला वायूचा वेग , वर्षती मेघ
जल स्थिरावली

नको वाजवू श्री हरी मुरली

घागर घेवूनी पानियाशी जाता
 दोही वर घागर पाजरली .
 एका जनार्दनी पूर्ण कृपेने
राधा गवळण घाबरली ...

नको वाजवू श्री हरी मुरली

📝अमोल
५/०३/२०२०
माझे टुकार ई -चार
poetrymazi.blogspot.in

Wednesday, March 4, 2020

हत्ती आणि ससा


हत्ती आणि ससा ( आधुनिक पंचतंत्र कथा ) 🐘🐇

मूळ कथा : - एका दाट जंगलात हत्तींचा कळप राहत असे. हत्ती एका तलावाजवळ एका ठराविक ठिकाणी राहत असत आणि त्यांना बाहेर जाण्याची गरज नव्हती. काही काळसाठी पाऊस नसल्यामुळे तलाव कोरडा होऊ लागला.
काही हत्तीं हत्तीराजाला भेटले आणि म्हणाले, महाराज, आमच्याकडे पुरेसे पाणी नाही. आमची लहान मुलं मृत्यूच्या मार्गावर आहेत.आपल्याला आणखी एक जागा शोधायला पाहिजे जिथे मुबलक पाणी असेल तेथे . ”

थोड्या वेळाने विचार केल्यावर हत्ती राजा म्हणाला, “मला माहित आहे एक जागा जेथे खूप मोठ सरोवर आहे, ती जागा अजूनही पाण्याने भरलेली आहे.” चला तिथे जाऊ ”.

सगळे तिथे पोहोचले . सरोवराच्या सभोवतालच्या जागेवर असंख्य छिद्र होते, ज्यात सशांचा समूह जिवंत होता. जेव्हा हत्तींनी तलावामध्ये इतके पाणी पाहिले तेव्हा ते आनंदी झाले आणि जगाची पर्वा न करता पाण्यात उडी मारण्यास सुरवात केली.

अचानक, सर्व हत्तींनी उडया मारल्यामुळे बर्‍याच छिद्रांचा नाश झाला, अनेक ससे हत्तीखाली पायदळी तुडवले गेले, तर अनेकांचा मृत्यू झाला, तर बरेच जण गंभीर जखमी झाले.  संध्याकाळी हत्ती निघून गेले तेव्हा पळून गेलेले ससे परत आले. ते दुःखाने एकत्र जमले आणि एकमेकांशी बोलू लागले, “प्रिय! सर्वत्र पाण्याअभावी येथे हत्ती रोज येतील. आपण काहीतरी विचार केला पाहिजे, अन्यथा उद्या आपल्यातील बरेच जण चिरडले जातील. आपण शक्तिशाली हत्तींविरुद्ध काय करू शकतो? जगण्यासाठी आपण हे ठिकाण सोडले पाहिजे. ”

त्यातील एक ससा सहमत नव्हता, तो म्हणाला- “मित्रहो! हे आमचे वडिलोपार्जित घर आहे, जर आपण हत्तींना घाबरवू  शकलो तर, ते परत येणार नाहीत. मी त्यांना घाबरविण्याच्या एका मार्गाचा विचार करू शकतो. ठरल्याप्रमाणे एक योजना बनवली, एक ससा हत्तींच्या वाटेवर असलेल्या डोंगरावर बसला. थोड्या वेळाने हत्तींचा राजा आपला संपूर्ण कळप घेऊन आला. ससा ओरडला, “ए दुष्ट हत्ती! मी तुला तलावात प्रवेश करण्यापासून रोखत आहे. हा तलाव चंद्र-देवाचा आहे.

हत्तीच्या राजा स्तब्ध झाला पण तो कुठल्याही देवावर राग करण्याचे धाडस करु शकला नाही. हत्तीराजाने त्या सशाला विचारले की त्याच्यासाठी काय संदेश आहे?

ससा म्हणाला, “मी चंद्राचा देवदूत आहे. त्याने तुम्हाला त्याच्या तलावामध्ये जाण्यापासून प्रतिबंधित करीत आहे हे सांगण्यासाठी मला पाठविले आहे. काल, तुमच्या उडया मारण्याच्या प्रकारामुळे बरेच ससे मरण पावले , देव, तुमच्यावर खूप रागावले आहेत. जर आपल्याला जगण्याची इच्छा असेल तर आपण तलावामध्ये पुन्हा प्रवेश करू नये. ”

हत्ती राजा काही काळ गप्प राहिला, आणि मग म्हणाला, हे जर खरं असेल तर, तुझा चंद्र कुठे आहे ते सांग, मी माझ्या कळपाला घेऊन दूर जाईन  आणि आम्ही माफी मागू.

चतुर ससा हत्तीराजाला सरोवराच्या काठावर घेऊन गेला, जेथून चंद्राचे प्रतिबिंब पाण्यात दिसू शकत होते. तो म्हणाला, “आज तो खूप अस्वस्थ आहे, कृपया शांतपणे आपले डोके खाली घ्या आणि निघून जा. तुम्ही त्यांचे लक्ष विचलित करू नका अन्यथा ते रागावतील.. हत्ती राजा पाण्यात चंद्र पाहून आश्चर्यचकित झाला. त्याने सशावर विश्वास केला आणि ते तेथून निघून गेले.

आधुनिक फ्युजन कथा -

  आजच्या जमान्यातही  " ससा - हत्तीचे " कळप मनुष्यरूपात   'वसाहत वादासाठी ' झगडत आहेत.  यासाठी अनेक युध्द् झाली, अनेक संस्थानं आपापसात लढली , राज्य खालसा झाली. लढाया/ प्रती-लढाया , जागतिक युध्द, झाली पण लढा संपलेला नाही चालूच राहील .

शक्तिमान हत्ती बळजबरी करेल , शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ  असा विचार करणारे ससे दरवेळी  चंद्राची प्रतीकात्मक रूपे म्हणजे कायदे मग ते सरकारने बनवलेले असतील किंवा विशिष्ठ गटाने , एका प्रदेशाने दुस-या प्रदेशातील लोकांसाठी बनवलेली व्यवस्था जी ' व्हिसा ' यास्वरुपात उपलब्ध आहे  किंवा  शाकाहार - मांसाहार , भाषा ,धर्म , रूपात असतील  सोयीस्कर वापरतील

*पण जगाच्या अंतापर्यत  ससा - आणि हत्ती  यांच्यातील  वाद  नव्या नव्या रूपात पुनः पुनः  अस्तित्वात राहील*


📝अमोल
माझे टुकार ई - चार

Monday, March 2, 2020

नका सोडून जाऊ


शेठजी, *

तुम्हावर केली आम्ही 'मर्जी ' बहाल
नका सोडून जाऊ 'सोशल महाल '

फेसबुकची तोरणं लावून ट्विटरवरती
हे 'लाईक्स' दाखवते काळजातली प्रिती
'मित्रो' म्हणावंमे, भले नसावे 'अच्छे  दिन खुशाल'

नका सोडून जाऊ 'सोशल महाल '

व्यसन म्हणू की, ओढ म्हणू ही गोड
या सोशल-मंचकी सुटेल अवघड कोडं
विरह तुमचा होता, 'भक्त' ही  आवरे 'अमृतजाल'

नका सोडून जाऊ 'सोशल महाल '

निर्णय परत घ्या, परत घ्या, परत घ्या 🙏🏻

📝०३/०३/२०२०
( * निख्खळ मनोरंजन हाच हेतू )

Friday, February 28, 2020

चंद्र ( २रा) आहे पृथ्वीला


🌜चंद्र (२रा) आहे पृथ्वीला 🌛*

काल अमेरिकेतील एका संस्थेने पृथ्वीच्या आणखी एका चंद्राचे फोटो पाठवले आणि ज्योतिष अभ्यासकांच्यात एकच खळबळ उडाली.  चंद्र पत्रिकेतील महत्वाचा ग्रह. सगळ्यात चंचल ही. आज इथं आहे म्हणे पर्यत दोन -तीन दिवसात पार पुढे गेलेला असेल.

 जन्माच्या वेळी तो ज्या राशीत ती त्या व्यक्तीची रास.  आता दोन चंद्र पत्रिकेत एकाच राशीत असेल तर ठिक आहे .पण दोघे वेगवेळ्या राशीत असतील तर प्रत्येकाला दोन राशी मिळतील.

मग एक ताई जिच्या पत्रिकेत एक चंद्र 'मिथून' राशीत तर एक चंद्र 'मीन' राशीत, सकाळी पेपरातले एका दिवसाचे भविष्य दोन्हीकडे बघून कुठल्या राशीच भविष्य बरं आहे ते ठरवून आज माझी हीच रास अशी समजूत घालणार.

बर साडेसाती,  ग्रहण यात होणा-या त्रासाना घाबरुन सिंहाची शेळी झालेल्यांचे 'कुत्र' हाल खाणार नाही अशी परिस्थिती होईल. कारण चंद्र जर दोन वेगळ्या राशीत असतील तर एक साडेसाती संपली म्हणता म्हणता दुसरी काही वर्षात परत सुरु होण्याचा धोका. ग्रहण तर विचारु नका इतकी होणार. तीच गोष्ट अमावस्या/ पोर्णीमे बाबत.

एकाच ग्रहाच्या दोन राशीत चंद्र असेल तर त्यांचे जीवन / हाल त्यातल्या त्यात समतोल म्हणू. उदा. शनिच्या मकर/ कुंभ राशीत एक एक चंद्र असेल तर ठिक पण एक मेषेत आणि एक कर्केत असेल आणि घरी घ्यायची भूमिका कार्यालयात घेतली आणि तिकडं घ्यायची भूमिका घरी घेतली गेली तर विचारायलाच नको. त्यातही जोडिदाराचे दोन्ही चंद्र षडा्-ष्टकात असतील तर दुष्काळात तेरावाच.

तेंव्हा   चार वर्षातून एकदा जसा फेब्रुवारी चा एक दिवस जास्त येतो (जसा आज आलाय) तसा एकच दिवस पत्रिकेत ' दोन ' चंद्र घ्यायचा असा काहीसा नियम ज्योतिष संघटनेने घ्यावा अशी विनंती यानिमित्ताने करतो.

आणि हो सरकारला एक विनंती 'चंद्र व्हा' 🌝 या गाण्यावर ताबडतोब बंदी घालावी. उगाच आणखी वाढ नको, काय 😐


📝 ( ग्रहांकीत)  अमोल
२९/०२/२०२०
(*) - कल्पना विस्तार

स्पायडर मॅन


स्पायडर मॅन , स्पायडर मॅन
🕸  🕷🕷  🕸

एकमेव दूरदर्शन ही वाहिनी असण्याच्या जमान्यात म्हणजे अर्थातच २४ तास कार्टून नेटवर्क, पोगो , आणि कुठली कुठली असंख्य  कार्टून चॅनेल्स नसताना दर रविवारी साधारण ३:३०- ४ वाजण्याच्या सुमारास बहुतेक १५-२० मिनिटे  " स्पायडर मॅन " मालिका लागायची
त्याच्या मागे किंवा पुढे "एक-दोन-तीन-चार" ( १-२-३-४ )ही चार मित्रांची मालिका आणि या सर्व कार्यक्रमांच्या सुरवातीला/ शेवटी ( म्हणजे दोन कार्यक्रमांच्या मधे) लागणारी  "आय लव्ह यू रसना" ही जहिरात , यात आमचा मे महिना कसा जायचा कळायचे नाही.

यातील 'स्पायडर मॅन' च्या करामती खूप आवडायच्या. सरळ साधा माणूस  काही संकट आलं की तो विशेष ड्रेस चढवून कुणालाही पत्ता न लागता  गावावर / शहरावर / देशावर आलेल संकट अगदी सहज परतवून टाकतो हे पाहताना मजा यायची.उंच उंच इमारतीवर हातातून दोर सोडून इकडून तिकडे झेपावणारा स्पायडरमॅन  बघायला भारी वाटायचे.

एका सामान्य माणसाला , 'स्पायडर मॅन' बनवण्यात मोलाची भूमिका बजावतो तो एक साधा 'कोळी '. तुच्छ असा किटक म्हणता येईल त्याला. घरभर जळमटं करून घराची वाट लावणारा असा, ज्याला क्षुद्र समजतो आपण, तो प्रत्यक्षात स्पायडर मॅनच्या मनगटाला दंश करून त्याला ते जाळं तयार करायची शक्ती देऊन  मोठी भूमिका बजावतो असतो.

थोडंस अवांतर
 संस्कृत मध्ये एक कथा होती. थोडक्यात सांगतो.  एकदा एक राजा दरबारात विचारतो  की सगळ्यात क्षुद्र या  जगात कोण आहेत ? खूप विचार करून दरबारातील विद्वान त्याला  सांगतात  ' डास  ' आणि 'कोळी ' हे सगळ्यात क्षुद्र आहेत .
काही दिवसांनी  त्या  राज्यावर शत्रूचा हल्ला होतो आणि राजाला जीव वाचवण्यासाठी पळावं लागतं , तो एके ठिकाणी रात्री थांबतो. पण तिथं असणारे डास त्याला झोपू देत नाहीत. तो जागा राहतो आणि त्याला शत्रूच्या सैन्याची चाहूल लागते आणि ते येण्याआधीच राजा पळून जाण्यात यशस्वी होतो. नंतर तो एका गुहेत लपतो. दमल्याने त्याला झोप लागते.  तिथे असणारे कोळी आपलं जाळी बांधायचं काम गुहेच्या प्रवेशद्वारावरच करतात. इकडे शत्रू सैन्य राजाचा शोध घेत तिथे येतात. पण गुहेच्या तोंडाशी असणारी जळमट पाहून विचार करतात इथे कुणी नसणार आणि तिथून निघून जातात.

तर डास आणि कोळी ज्यांना राजा क्षुद्र समजत होता खरं म्हणजे त्यांच्यामुळेच त्याचे प्राण वाचतात.

कुठून कुठे गेलो ना?

अगदी तसं, जसा स्पायडर मॅन क्षणात स्टॅच्यू आॅफ लिबर्टी ला फेरी मारुन, क्षणात या इमारतीवरुन त्या इमारती वर पोचतो तसं ना?

आता या 'स्पाइडर मॅन ' मालिकेतील आणखी एक मजा. आजतागायत मला मालिका गीत जे इंग्रजीत आहे त्याचे शब्द काय आहेत ते अजिबात कळलेले नाही. भाऊ कदम जसं पाढे म्हणताना विनोदाने फक्त रिदम् म्हणत जातो पाढ्यांचा अगदी तसं मला फक्त चाल पाठ आहे.

इथे यू ट्यूबची लिंक दिलीय. बघा तुम्हाला ते शब्द कळले तर सांगा मला पण समजावून 😄

📝🕸🕷 अमोल
२८/०२/२०२०
poetrymazi.blogspot.in


https://youtu.be/SUtziaZlDeE

Thursday, February 27, 2020

मराठी भाषा दिन


मी काय म्हणतो
मराठीच्या प्रेमाची
नको एकच दिवस भरती..

रोजच येऊ देत अशा
लहान लहान लाटा..

आणि उचलूया आपण सारे
आपला खारिचा वाटा..

📝 अमोल २७/०२/२०२०
मराठी भाषा दिन ✌🏻

Wednesday, February 26, 2020

आम्ही सारे फेरिवाले


आला रे आला, आला फेरीवाला

गेली अनेक वर्ष आम्ही वितरण ( मार्केटिंग )क्षेत्रात आहोत. अनेक ठिकाणी वस्तू विकायला गेलो आहोत.  त्यावेळी एखाद्या ग्राहका कडे गेल्यावर त्याचे वारेमाप कौतुक करतो, धंदा-पाण्याच्या चौकशी कराव्या लागतात( MIS). अगदी घरातले कसे आहेत याबाबत ही खुशाली विचारली जाते.

सगळं झाल्यावर  ग्राहक ही हळूच चाणाक्षपणे  विचारतो मग आता कुठे जाणार आहात ? त्याचा रोख असतो आता आमच्या स्पर्धेका कडे माल विकायला जाणार का?

आता त्याला कशाला नाराज करा. नाही हो आता सरळ परत गावाला. त्याला कशाला सांगायचे भाऊ आमचा पण धंदा आहे, सगळ्यांना माल द्यावा लागतो. तर आमचा देश आपलं पोट भरेल ना?

पंधरा दिवसापूर्वी तर त्याला माल पोचता केला किंवा परत गेल्यावर आठवड्याभरात तो स्वत: मुंबईत भेटायला येणार आहे हे गुपीत त्याच्या पासून कितीही लपवले तरी त्याला कळणार असतेच

असे लाखो विक्रेते ( सेल्स मॅन)  आपले काम इमाने इतबारे करत होते/ आहेत/ राहतील.

त्यातील काहीजण सर्वात सशक्त राष्ट्राचे राष्ट्रप्रमुख ही असतात.

 पण शेवटी सगळे हाडाचे विक्रेतेच

#आम्ही_सारे _फेरिवाले ✌🏻
#अमुक_अब्ज_करार 💰

📝२६/०२/२०२०
poetrymazi.blogspot.in

#हे_सूरांनो_चंद्र_व्हा

महेशजी 'बे-सूर' तुम्ही एकदाच गायलात पण किती तो दंगा सगळ्यांचा. (आमच काय!  आम्ही नेहमीच बे-सूर लिहित असतो )
तरीपण,  महेशजी तुमची परत एकदा ( *बहुतेक शेवटची* ) माफी मागून

 ( चाल: सूर तेची छेडीता, गीत उमटले नव्हे)

" *सूर* " तेची छेडीता, " *चंद्र*" भासले नवे
आज लाभले जगी, 'महेशा'स जे हवे

"फ्यूजन" गीत वठवले, "काळे" हळूच कोमेजले
लय-ताल दुखावले, रुसले तुझ्यासवे

जमल्या सा-या स्मृती, तुझ्याच गाण्या भोवती
गायला कसे "नाकी", शब्द शब्द आठवे

" *सूर" तेची छेडीता*....🎼🎼

📝poetrymazi.blogspot.in

मुंबई बघायला आलेल्यांना यजमान मुंबई दाखवायला घेऊन निघतात. आज मंगळवार, प्रभादेवीच्या सिध्दीविनायकाला आधी जाऊ मग, सेना भवन जवळील मिसळीचा "आस्वाद' घेऊन   मग पुढे काय करायचे ते ठरवू असे यजमान ठरवतात
आता पाहूणे एकदम 'नास्तिक',  खरं म्हणजे सरळ ' मिसाईल' आपलं मिसळ खायलाच जायला पाहिजे असं त्यांना वाटत असतं पण यजमानांचा मान राखण्यासाठी मंगळवारच्या गर्दीत १-२ तास रांगेत उभारुन पाहुणे सिध्दिविनायकाचे दर्शन घेतात. यजमान उंदीर मामांच्या कानात काही तरी कान-गोष्ट करत आहेत म्हणल्यावर पाहुणे ही उगाच कानात तोंड खुपसतात. नास्तिक असून ही ते सगळं एन्जॉय करतात.

आता एक 'फ्यूजनस्टिक' उदाहरण 🤗

" काळी ४" हेच स्वगृह मानलेल्या आणी कायम इथेच आनंदात राहणा-या 'सप्त' सूरांना "काळे'(४)  एक दिवस 'तप्त' होऊन म्हणतात 'चंद्र' व्हा '
आता त्यांचाही मान राखण्यासाठी सप्त सूर तसा एकदा - दोनदा प्रयत्न करतात पण नंतर आपल्या मुळ कामाला परत लागतात.

आता आमचे तात्या.  हो अमरिका वाले. जावं लागलं त्यांना 'साबरमती' ला किंवा आता आज 'राजघाटावर'. बिघडलं कुठं? त्यांनी असं करायला नको होतं असं वाटणाऱ्यांनी परत एकदा वरचा लेख वाचा 😬

#पाहुणे_येती_घरा_

📝२५/०२/२०२०
poetrymazi.blogspot.in

Saturday, February 15, 2020

विधान_परिषद_पाहिलेला_असा_मी


#विधान_परिषद_पाहिलेला_असा_मी

*खबरदार!  त्या खुर्चीत बसलास तर*

आणि महाराष्ट्र आज एका मोठ्या विधानपरिषदेच्या सभापतीला मुकला.

मंडळी, पहिली जी ओळ आहे ती खुद्द आमच्या पिताश्रींनी आम्हाला उद्देशून वापरली आहे.

हे काय आता नवीन ?

काय आहे मंडळी, आमच्या शाळेच्या समुहात अनेक विषय रंगतात, राजकारण हा विषय तर असतोच असतो पण त्याचबरोबर लहानपणीच्या सुखद आठवणी वगैरे वगैरे विषय ही असतात. आमचा हा समुह मला वेगवेगळे लेखन करायला प्रवृत्त करतो.   त्यामुळे की काय  प्रत्यक्ष राजकारणा संबंधीत लहानपणीची आठवण लिहायचा मोह टाळू शकलेलो नाही

तर चला आमच्या 'बालपणीचा काळ सुखाचा' कालावधीत डोकावूया

मे महिन्याच्या सुट्टीत मुंबईला जायचे आणि नवी नवी ठिकाणे बघायची हे साधारण ठरलेले असायचे. एका सुट्टीत चक्क बाबा मला मंत्रालय,  विधानपरिषद दाखवायला घेऊन गेले. त्यावेळी विधानपरिषदेचे सभापती होते "श्री जयंतराव टिळक" आणि त्यांचे सेक्रेटरी श्री लेले आमचे नातेवाईक. बांद्र्याला त्यांच्या घरी गेलो असता त्यांनी सांगितले चल उद्या तूला विधानपरिषद दाखवतो. त्यावेळेला अर्थातच विधानसभा, परिषद या वास्तूचे महत्त्व कळण्या अलिकडचे वय होते. लेले काका जिथे काम करतात ती जागा बघायला जायची आणि नंतर आवडीचे 'गेट वे आॅफ इंडिया ' बघायला  मिळणार हाच काय तो आनंद होता

दुस-या दिवशी सकाळी काकांच्या कार्यालयात पोहोचलो. त्यांनी स्वतः मग सगळी माहिती दिली. समोरची मंत्रालयाची बिल्डींग दाखवली. विधान परिषदेतील वेगवेळ्या नेत्यांची दालने,  इतर कार्यालये दाखवत ते आम्हाला विधानपरिषदेच्या मुख्य सभागृहात घेऊन आले. शिपायाने कुलूप काढले आणि त्या सभागृहात फक्त काका, बाबा आणि मी. इतर माहिती ते बाबांना देत होते काही राजकीय संदर्भ ते बाबांना सांगत होते. पण माझे लक्ष कुठे होते ते काकांनी बरोबर ओळखले.
मला म्हणाले, जा,  बसून बघायचे आहे ना तूला त्या अध्यक्षांच्या खुर्चीवर बस. मी उत्सूकतेने जाणार तेवढ्यात बाबा ओरडले

त्यावेळेला ते काय म्हणाले हे शब्दश: आठवत नाही पण त्या वेळेला त्या सभागृहात झालेल्या बाबांच्या बोलण्याचा मतितार्थ इतकाच होता :-

खबरदार!  त्या खुर्चीत बसलास तर

*तेंव्हा पासून आजतागायत आम्ही पण आमच्या बाबांना दिलेले वचन निभावतोय*

एकवेळ राजकारणावर ' टुकार लेखन लिहू ' पण त्या राजकीय खुर्चीत बसायचा हट्ट कधीच करणार नाही ✌🏻

#विधान_परिषद_पाहिलेला_असा_मी
#आमचीही_वचनपुर्ती

📝अमोल
१६/०२/२०२०
poetrymazi.blogspot.in

Thursday, February 13, 2020

केम छो प्रेसिडेंट ?


कसं काय तात्या बरं आहे का?
अहमदाबाद ला येताय हे खरं आहे का?

*केम छो प्रेसिडंट?*🙋🏻‍♂( * )
मजामा?
तात्या, स्वागताची तयारी जवळजवळ झालीय.  वाटेतील झोपडपट्टी अजून थोडी झाकायची राहिलीय. एक दोन दिवसात होईल काम. विरोधकांना बोलायला काय जातय? त्यांच्या घरी कुणी अचानक पाहुणे आले तर घरातील पसारा आवरण्यासाठी काय काय युक्तया करतात आठवा म्हणावं
बाकी तात्या तुमच्यासाठी कायपणं!
अख्या जगाला 'हिंसेच्या' मुठीत ठेवणाऱ्या राष्ट्रप्रमुखाची  अहमदाबाद दौ-याची सुरवात 'अहिंसेच्या' कुटीतून

मान गये उस्ताद.

 काही काळजी करू नका, आमचे शेठजी समर्थ आहेत सगळ्यासाठी . निवडणूकीचं ही अजिबात टेन्शन नका घेऊ, आता आमचं पण लक्ष B - हार कडे लागलयं. तसंच तुमच्याकडे ही आहे म्हणा.

तात्या, बघा त्या स्टेडिअमच उद्घाटन झाल्यावर मुंबईत एखादी चक्कर मारताय का?

काय? बुलेट झाल्यावर?

झालं, आलात मग, वाट बघा. आपलं वाट बघतो.

पण तात्यानू मुंबईत पण तुम्ही याल म्हणून काही घोषवाक्य केलेलीना आम्ही मनसे,  वाया गेली ना भाऊ

सांगू?  आता तुम्ही म्हणताच आहात म्हणून सांगतो

"आवाज कुणाचा? ट्रम्प तात्यांचा"

ओ,काय हे? आं?
 पश्चिम महाराष्ट्राचे असलो म्हणून काय झालं? आमी बी आमच्या आबा-आज्जा पासून 'अमेरिकेलाच' जातो
असं म्हणता? मग हून जाऊ द्या.

(स्व)विकासासाठी घेतली आम्ही
महा- आघाडीत जंप
साखरेचे पोते देतो
स्वागत तुमचे 'तात्या ट्रंप " 💐

अय्या, तात्या येऊन राहिला का?
" येऊन राहिला तात्या
 द्या त्याला संत्र
घेऊ लगेच त्यांच्याकडून
अमेरिकेला जायचे पत्र"

कोकणचो होणार "कॅलिफोर्नियो"
तात्याची चुकली "अंगणेवाडी यात्रा"
भले प्रेसिडेंट असाल वा पंतप्रधान
"कोकण कन्येचे" तिकट मिळतय, पत्रा

तात्या, तात्या, बघा किती मराठी जनतेचे तुमच्यावर प्रेम आहे
पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का?
पुणेकर लै नाराज तुमच्यावर

सगळ्यात जास्त अमेरिकेत पुणेकर आहेत आणि तुम्ही पुण्याला जाणार नाही?  रागावलेत. कुठल्याही प्रहरातील १-४ या वेळेत बालेवाडीला ही जायची त्यांची तयारी होती. पण त्यांच्या उत्साहावर पाणी फिरवलत तुम्ही. आता काय म्हणतायत बघा

सुन चंपा,  सुन तारा
तात्या पुना, नही आना
बडा दुःख हुअा, सुनलो मेरी बात
अमेरिका जायेंगे आज की रात

तात्यांनू, प्रवासास शुभेच्छा,. येताना ५ 'वेल' दोडा असलेली पुडी विमानात ठेवा म्हणजे चुकुन जरी विमान चिनवरुन आलं तरी काळजी नको आम्हाला

( *) - मनोरंजन हा हेतू

📝१४/२/२०२०
poetrymazi.blogspot.in

Wednesday, February 12, 2020

आमचे मिठी पुराण


"वचन दिन" ( प्राॅमिस डे)  बद्दल काल एके ठिकाणी वाचले की

"आधी लग्न कोंढाण्याचे,  मग रायबाचे "

हे वचन, आणि हे वचन पुर्ण करण्यासाठी जिवाचे रान करणारे स्वराज्याचे रक्षक , यांची यानिमित्ताने आठवण🙏🏻

 तर आज आहे "अलिंगन दिवस"
यानिमित्ताने
स्वराज्यासाठी मोठा धोका पत्करुन "अफजल खानाच्या मिठीचा " स्विकार करुन दगा- फटका होणार हे गृहीत धरुन पूर्ण तयारीनिशी उतरलेल्या महाराजांनी अफजलखानचा कोथळा बाहेर काढला

आणि हिंदवी स्वराज्याला अलिंगन देण्याचा मार्ग सुकर झाला.

भक्ती मार्गातील कृष्ण- सुदामा यांची मैत्रीपूर्ण 'मिठी' म्हणजे उत्कटतेचे प्रतिकच

पहिल्यांदा शाळेत जाणाऱ्या पाल्याची शाळेत सोडायला आलेल्या आई- किंवा बाबांना मारलेली मिठी, सासरी निघालेल्या कन्येची किंवा परदेशी चाललेल्या मुला/ मुलीची  पालकांना मारलेली मिठी,  सांघिक खेळात प्रतिस्पर्धी विरूद्ध विजय मिळवल्या नंतर संघातील खेळाडूंची एकमेकांना मारलेली मिठी, खूप दिवसानंतर भेटलेल्या मित्र/ मैत्रिणीला मारलेली मिठी, एखादे उद्दिष्ट साध्य झाल्यावर एकत्र एका संस्थेत काम करणाऱ्यांनी एकमेकांना मारलेली मिठी  ते एखाद्याचे सांत्वन करण्यासाठी मारलेली मिठी.

कृती एकच पण भावना वेगळ्या

अशीच एक मिठी,  प्रिती संगम कराडला असणारी. कृष्णा- कोयना भगिनींची,  निसर्गाचा अनोखा आविष्कार

हे सर्व सोडून इतर "मिठ्या" या "मुठीत" ठेवण्या संबंधीतच जास्त असण्याची शक्यता

📝अमोल १२/०२/२०२०
#आमचे_मिठी_पुराण

Sunday, January 26, 2020

पुरस्कार शास्त्र


पुरस्कार शास्त्र. 🌷
( *काल्पनिक राजकीय लेख* : निव्वळ मनोरंजन हा हेतू , कुणाच्या ही श्रद्धास्थानांना ठेच पोहोचवण्याचा हेतू नाही. टोचला गेल्यास मंडळ जबाबदार नाही 📝 )

विरोधकांचे डोके ठिकाणावर आहे का ?

का हो काय झालं ?

काय झालं म्हणून मलाच विचारता ? अरे ज्या कुणाला पुरस्कार मिळाला आहे त्यांचे कार्य तरी बघा.

प्रश्नच नाही , कौतुक करावं तेवढं थोडं आहे सगळ्याचं . पण त्या एका ...

गप्प बसा. तो एक मास्टर स्ट्रोक आहे. तुमच्यासारख्या गल्लीतल्या कार्यकर्त्यांना  नाही कळणार ते

होय काय , मग तुम्ही सांगा

हो हो सांगतो की थांबा की जरा

का हो , भाऊंची वाट बघाताय का ? त्यांनी अजून लेख नाही केला प्रकाशित.   .

भाऊंची कशाला वाट बघायची , काही काही पुरस्कार  "ऑड मॅन  आउट " म्हणून द्यायचे असतात . गनिमी कावा असतो तो. असा उघड  करायचा नसतो .

नाही पण त्यांच्या वडिलांनी ६५ च्या युद्धात आपल्यावर बॉम्ब टाकले .

हेच म्हणतो मी तुम्हाला कळत नाही आहे. म्हणूनच आम्ही त्यांना पुरस्कार देऊन शत्रू राष्ट्रावर दबाब वाढवत आहोत. आता हे शत्रू राष्ट्रातील सगळे पायलट एका वेळी राजीनामा देतील आणि आपल्या मुलांना इकडच्या देशात पाठवतील. मग लढणार कोण आपल्याशी ?

पण त्याने बेकायदा वास्तव्य केले

पण आता तो भारताचा नागरिक आहे ना , गेली कित्येक वर्षे अनेक बेकायदा नागरिक इथे आहेत, तेव्हा कुणी त्यांना नागरिकत्व देऊन पद्मश्री दिलीय ? ही सुरवात आहे .

पण त्यांचे महान  कार्य ???

घ्या , आता हे ही आम्हीच तुम्हाला सांगायचे ? पाहिलं गाणं आलं तेव्हा केवढाsढा  होता तो , आता बघा बिचारा केवढांसा झालाय. सध्याच्या महागाईच्या काळात अचूक डायट कसे करावे याचा वस्तुनिष्ठ पाठ या महाशयांनी दिलाय आणि शाळेच्या अभ्यासक्रमात
"पद्मश्रींचा पँटर्न " म्हणून आम्ही लवकरच समाविष्ट करू .मध्यतंरी त्यांचा नवीन अलब्म आलेला
 " मेरा चेहरा क्यू नजर ना आये " आमच्या साहेबाच्या हस्तेच तो प्रकाशित झाला होता. तेव्हाच जवळजवळ ठरले होते 'कोअर कमिटीत 'आमच्या की या महान  व्यक्तीला पुरस्कार द्यायचाच

आणखी काही विशेष ?

त्यांचा जन्म दिवस माहीत आहे ? १५ ऑगष्ट , ते पण लंडन मध्ये . ज्या इंग्रजानी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्यांचा  गावात आपल्या स्वातंत्र्य दिना दिवशी जन्म घायाचा आणि मग शत्रू राष्ट्राची गुपिते काढून आपल्या देशात स्थायिक व्हायचे. येरा गबाळ्याचे काम नाही हो

हो हो खरं म्हणताय तुम्ही , पण त्या तालुक्याने अनेक जणांचे अभिनंदनाचे फलक लावले , यांचे दिसले नाहीत कुठे ?

असं का म्हणता ? आमच्या पक्षाच्या कार्यालयात लावलाय की अभिनंदनाचा फलक . आणि ते ज्या शहरात सध्या राहतायत ना  तिथे सध्या विरोधी पक्षाचे सरकार आहे ना ? आम्ही परत आलो की लावू अभिनंदनाचे फलक

बर ते " भारत रत्न ?"

म्हणूनच म्हणतो  " विरोधकांचे डोके ठिकाणावर आहे का ?" उगाच काही तरी?
 विषय वेगळा आहे, मधेच
' भारत रत्न '  कुठे आले ? आणि आमच्या आधीच्या सरकारने ७० वर्षात काहीही केलेलं नाही , आम्ही निदान ७ वर्षात तरी करून दाखवूच .
२६ फेब्रुवारी आधी बघाच तुम्हाला चांगली बातमी मिळेल

ते ठीक व साहेब पण असं खाली मान घालून मिळमिळीत का बोलताय.

" कभी तो नजर मिलाओ "

 📝२७/१/२०२०

जिलबी


नक्की केंव्हा सुरुवात झाली माहित नाही पण गेले अनेक वर्षांपासून २६ जानेवारी  ( आणि १५ आॅगस्ट) निमित्य केल्या जाणाऱ्या  गोड पदार्थात   'जिलबी'  ने अगदी मानाचे स्थान पटकावले आहे यात शंका नाही.
जात, पात, धर्म , गरिबी, श्रीमंती याचे कुठलेच बंधन न ठेवणारी ही जिलबी.

  आमच्या इकडे बेलापूरला तिला आणताना तिचा मोठ्ठा भाऊ पंजाबच्या सामोसाला ही घरी आणायची पध्दत आहे. पण जिलबी खायची खरी मजा आम्ही घेतली ती सांगली मधील ( त्यातही मिरजेतील) अनेक मंगल कार्यालयात. अगदी
 गो-यांपासून, ख-यांपर्यत कुठल्याही कार्यालयात  पंगतीत वाढली जाणारी गरमागरम , स्वर्गीय चविची जिलबी आणि सोबतीला तिचा थंडगार पण जरा मठ्ठ मित्र म्हणजेच मठ्ठा. ( इथे मठ्ठ्याला ताक म्हणणे म्हणजे भयंकर अघटीत गोष्ट समजावी) ह्या जोडी शिवाय अनेक वर्षे सांगली/ मिरज ( आणि इतर शहरातलीही) येथील अनेक मंगल कार्य झालीच नाहीत. एकंदर लग्नाची व्यवस्था, जेवण आणि स्पेशली या जोडी साठी मुलगा/ मुलगी दुस-या गावचे पण लग्न सांगली/मिरजेत झालेली उदाहरणे प्रत्यक्ष पाहिली आहेत.

जेवायला जेंव्हा आम्हाला वेगळं बसवायला लागले ( आई/ बाबा, काका/ काकू, मोठा भाऊ/ बहिण यांच्या पाना शिवाय )तेंव्हा आम्ही ख-या अर्थाने ' खायच्या वयात ' आलो. हळूहळू पंगत कशी अंगीकारायची हे ही जमू लागले
एखाद्या मंगल कार्यात जेवायला बसल्यावर सवयीने सुरवातीचा पांढरा भात, नंतरचा मसाला भात किती घायचा हे  समजायला लागले. मग मसाला भाताच्या मागून जिलबीचे ताट घेऊन येणारे काका/ दादा दिसले की पटकन मसाला भाताचा राहिलेला घास कसाबसा गिळून , बाजूच्या कोशिंबीरीचा ओघळ बाजूस करुन ,येणाऱ्या जिलबीला खास जागा जरुन देणे हा जेवणाच्या कार्यक्रमातील एक महत्वाचा घटक असायचा. आपल्या ताटात १-२ जिलब्या वाढून पुढे गेलेल्या काकांना, ओ अजून एक वाढा न असं सांगून १-२ अधिक जिलब्या ताटात पाडून घेतल्यावर एखादं युध्द जिंकल्याच फिलींग यायचे.

अर्थात पंगतीत एकावेळी १-२ ताटं जिलब्यांचा लिलया पडशा पाडणा-या जून्या सांगलीकर/ मिरजकरांशी मात्र बरोबरी करणे कधीच शक्य नव्हते

काळ बदलला. मंगल कार्यालयात जिलबीला अनेक पर्यायी गोड पदार्थ आलेत. आता तर अशी वेळ आली आहे की ' जिलबी ' पक्वान्न ठेवणे म्हणजे काहीतरी वेगळी ( स्पेशल) गोष्ट केलीय. पंगत जाऊन स्वत: स्वतःसाठी वाढून घेणे आणि त्यापेक्षाही भयंकर म्हणजे ते शूगर फ्री जिलबी, डायट जिलबी इत्यादी इत्यादी

तरीपण या जिलबी बद्दलचा लळा, जिव्हाळा कायम राहिलच 😋

📝(जिलबी प्रेमी) अमोल
poetrymazi.blogspot.in
२६/०१/२०२०

Thursday, January 23, 2020

जागतिक हस्ताक्षर दिवस


*सुंदर अक्षर हाच खरा दागिना आहे*.

मंडळी, नु. म.वि पुणे शाळेतले काही मित्र महिन्यातील एका रविवारी एकत्र भेटतात आणि शाळेतील आपल्या जून्या आठवणींना उजाळा देतात असा एक व्हिडिओ ( मित्रांच्या गेट टू गेदर बद्दल) काल पहाण्यात आला. त्यात सुरवातीलाच विजय कदम फळ्यावर लिहिलेला *~सुंदर~* हा शब्द खोडून *अक्षर हाच खरा दागिना आहे* असे करुन आपल्या वाईट अक्षराबद्दलचे अनुभव सांगतात. मग कुणाचे अक्षर चांगले होते आणि इतर आठवणी,  चर्चा रंगतात.

 शाळेच्या अनेक समुहात एकदा तरी कुणाचे अक्षर चांगले होते वगैरे आठवणी काढल्या जातातच. त्यावरुन कुणाला कसे एखादा, अर्धा मार्क जास्त मिळाला ही आठवण ही येते ( आमचा शाळेचा समुह ही याला अपवाद नाही)

मंडळी, हे आठवायचे कारण म्हणजे आज काय '
*जागतिक हस्ताक्षर दिन वगैरे आहे* .

काही काही जणांची अक्षरे दृष्ट लागण्यासारखी चांगली असतात यात शंका नाही. पण कितीही प्रयत्न केला तरी चांगले अक्षर लिहिणे मला स्वत:ला कधीच जमले नाही. अगदी लहानपणी आईने अक्षरांना वळण लागावे म्हणून एक प्लॅस्टीक ची पाटी आणून दिली होती ज्यावर संपूर्ण बाराखडी,  इंग्रजीतील अल्फाबेट्स होते, जे पेन्सिल घेऊन गिरवायचे आणि आपल्या अक्षरांना वळण लावायचे असा उद्देश होता. मात्र माझ्याबाबतीत तो अजीबात सफल झाला नाही.

शाळेतील सर्व विषयांच्या वह्या ते अगदी २०२० ची डायरीतील फक्त पहिल्या पानावरील 'श्री ' आणि काही ओळी सोडल्या तर छान अक्षर काढायला जमलेले नाही.

जे या क्षेत्रात म्हणजे 'सुंदर अक्षर लिहिण्याच्या' क्षेत्रात अजून ही आहेत त्यांचे अभिनंदन आणि पुढील सुंदर लेखनास शुभेच्छा 💐

सध्याचे संगणक,  मोबाईल आणि विविध अॅप यांचे ,यानिमित्ताने विशेष आभार की प्रत्यक्षात आमचे हस्ताक्षर कसे आहे याचा थांग पत्ता ते लागू देत नाहीत, पत्र लेखन तर आता इतिहासजमाच आहे.

तरी यदाकदाचित आमचे हस्ताक्षर पहाण्याचा कुणाला योग आलाच तर मंडळी एक गोष्ट आधीच सांगतो

मोठ्या लोकांचे हस्ताक्षर हे वाईटच असते बरं ! 🤗

📝२३/०१/२०२०
अमोल
poetrymazi.blogspot.in

Saturday, January 11, 2020


दत्ता डावजेकर यांनी संगीत दिलेले आणि जयवंत कुलकर्णी यांनी स्वरबध्द केलेले एक गाणे आज उगाचच आठवत आहे

मुळ गाणे: वाट संपता संपेना, कुणी वाटेत भेटेना, इथे आलो असा कसा, कुणी काहीच सांगेना

आम्हाला ऐकू आलेले गाणे 🙉

'खातं' मिळता मिळेना
कुणी 'खायला' देईना
इथे आलो तरी कसा
महा- विकास होईना.

खातं' मिळता मिळेना...

लांब आता पाच वर्षे
वाट वाकडीतोकडी
दूर दूर बांद-यात
एक दिसते 'मातोश्री'
तिघे येती जुळवती
कुणी 'पद' ही देईना

खातं' मिळता मिळेना...

दिसे प्रकाश अंधुक
मंत्रा लयाचा कंदिल
अंतर काही मैलाचे
आता गाठीन मंझील
जवळचा 'बंगला' नसे
काय करावे कळेना

खातं' मिळता मिळेना
कुणी 'खायला' देईना
इथे आलो तरी कसा
महा- विकास होईना.

📝अमोल
०४/०१/२०२०
poetrymazi.blogspot.in

Wednesday, January 8, 2020

पाऊले चालती


देशातील काही मूर्ख अप्सरांसाठी

पाऊले चालती JNU ची वाट
'देश एकतेची' तोडूनिया गाठ

पाहूनिया भारी, नाट्य अप्सरेचे
राहिली रिकामी थेटरची सिट
पाऊले चालती.  ..

आप्त इष्ट सारे,  बाॅलीवूड तारे
पाहुनिया सारे जाती पाठोपाठ
पाऊले चालती.  ..

येता शिणेमा मूर्ख अप्सरांचा
"छपाक" विचारांचा व्हावा नायनाट

पाऊले चालती JNU ची वाट

📝९/१/२०२०
अमोल
poetrymazi.blogspot.in

Sunday, January 5, 2020

खेळ मांडला


📝 खेळ मांडला
🏇🏻🤺🤾‍♀/ 🎲♟🐍

मंडळी नमस्कार 🙏🏻

नवीन २०२० वर्षातला हा पहिला रविवार. तर आजच्या या पहिल्या रविवारी मुलांबरोबर सकाळी सकाळी जाऊन लहान मुलांचाच एक सिनेमा पाहिला

  ' जुमानजी द नेक्स्ट लेवल '

सिनेमा हिंदीत होता पण मुळ कल्पना (सिनेमा )अर्थातच बाहेरची( परदेशातली)

काय म्हणजे कुठल्या लेवल पर्यत हे कल्पना करु  शकतात हे पाहून अचंबीत व्हायला झाले. नाही म्हणजे लहान मुलांचा सिनेमा म्हणजे आपल्याकडे एक तर पौराणिक काळातील राम - कृष्ण- गणेश फार तर ज्ञानेश्वर- तुकाराम ,  इतिहासातील बाल शिवाजी, संभाजी किंवा फारच कल्पना  करायची झाल्यास  राजा-राणी,  जादुगार, राक्षस/ चेटकीण.  या पलिकडे आपण ( म्हणजे आपली सध्याची वय वर्षे  ४० आणि त्या पुढची पिढी) तरी कधी गेलो नाही.

पण सध्याचा जमानाच वेगळा आहे. लहान पणा पासूनच मुलांच्या हातात संगणक/ मोबाईल आलेत. आजकाल मुलांचा 'घरचा अभ्यास ' ही पालकांच्या मोबाईलवर येतो, वर्गातील मुलांच्या पालकांचे व्हाटसप ग्रुप आहेत. मोबाईल/ संगणकातील खेळ ( गेम)  हे ही अगदी सवयीचे झाले आहे. किंबहुना तो जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत. त्याच्या  अती आहारी जाणे, अनेक खेळातील लेवल्स पार करता करता  अपघात होणे, आत्महत्त्या करण्यापर्यत मजल गेल्याच्या बातम्या आपण ऐकल्या आहेत वाचल्या आहेत.

या मोबाईल / संगणकातील गेम्सच्या वेडापाई काही मित्र मैत्रिणी त्या गेम मध्येच त्यातील एक कॅरेक्टर बनून जातात, वेगवेगळ्या लेवल्स, प्रत्येकाला मिळालेल्या ३ लाईफ लाईन्स , या प्रकारात घरातील एक अजोबा व त्यांचे मित्र ही या मुलांबरोबर गेम मधे एक कॅरॅक्टर बनून ओढले जाणे, यात मदतीला येणारे  हेल्पर्स , ड्रामा, कोडी सोडवणे ( सुता वरुन स्वर्ग गाठणे)  वृध्द मित्रांची पुर्वीची भांडणे , गेम खेळताना एकमेकांना मदत करताना  त्यांना होणारा पश्चात्ताप, आणि परत गेम जिंकून सगळ्यांचे मुळ रुपात परत येणे असा फूल टाईम पास सिनेमा आहे.

आपल्या ही सिनेमाची थीमच भन्नाट वाटली.

म्हणजे असं की तुम्हाला रोड रॅश खेळ खेळायचा आहे तर तो संगणकावर किंवा मोबाईल वर न खेळता आपण स्वत: त्या दुनियेत जायचे, मॅप निवडायचा, बाईक, इंजीन, हेल्मेट सगळं आपण ठरवायच आणि प्रत्यक्षात रेसला उतरायचे,  हिरवा दिवा लागला की
 धू ssम ..🏍
(आता "रोड रॅश" च का तर या गेमच्या पुढे आम्ही कधी पोहचलोच नाही😬)

भारीच ना?  आता तुम्हाला कुणाचा गेम आपलं कुठला गेम खेळायला आवडेल हे तुम्हीच ठरवा. 🙂

 पण एक विचार मनात आला
आज आपल्या पालकांना जर विचारले ही थीम घेऊन तुम्हाला कुठला खेळ स्वत: खेळायला आवडेल तर ते म्हणतील एक तर ते मोबाईल संगणकावर  कधी खेळले नाहीत. विरंगुळा म्हणून त्यांनी सह कुटुंब साप-शिडी वगैरे मर्यादित  खेळ खेळले असण्याचीच शक्यता जास्त. आता त्यांना सांगितलं जर त्यातली एका रंगाची सोंगटी बनून तुम्ही स्वत : तिथे जायचे,  जसे फासे पडतील तसं शिडी चढत जायचं,  सापाने गिळलं तर परत खाली यायचं तर त्यांनी जरा आवाज चढवूनच  सांगितलं असतं की मग इतकेदिवस या आयुष्याच्या पटावर काय करत आलोय? सापशिडी, व्यापार डाव,  बुध्दीबळ, अगदी बदाम सात यातल्या युक्त्या आयुष्याचा खेळ खेळताना मदतीला आल्याच की. मग कशाला हे अभासी जगात रमून स्वतःचे समाधान करणे?

मंडळी, किती वास्तवादी होते ते खेळ आजच्या व्हर्चयूअल खेळां पेक्षा.मोबाईल वरचा एखादा खेळ खेळतोय आपण अशी कल्पना करुन आपण सिनेमा काढू शकतो फार तर तास- दोन तासाचा
पण इथं आपल्या मागच्या पिढीचं आयुष्य गेलं हे सगळे खेळ प्रत्यक्ष खेळून ' आपला खेळ रंगवण्यात '

#खेळ मांडला ♟🎲🐍🏍🤺🤾‍♀🏇🏻

📝५/१/२०२०
poetrymazi.blogspot.in📝 खेळ मांडला
🏇🏻🤺🤾‍♀/ 🎲♟🐍


Related Posts Plugin for WordPress, Blogger...