*लोकल माझी लाडाची लाडाची हो*🚆
प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे.
१) ८:२१ ची ठाणे लोकल आज रद्द करण्यात आली आहे.
२) बदलापूरला जाणारी जलद लोकल आज फलाट नं ५ एवजी फलाट नं २ वर येत आहे
३) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ला जाणारी ही लोकल आज १२ डब्यां एवजी ९ डब्यांची चालवण्यात येत आहे.
४) काही अभियांत्रिकी कामानिमित्य रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी सकाळी १० ते संध्याकाळी ४ मेगा ब्लाॅक घेण्यात येत आहे
प्रवाशांना होणाऱ्या गैरसोईबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
यात्रीगण को हो ने वाले असुविधाके लिये हमे खेद है
👆🏻 मुंबइतील लोकल प्रवास माहित नसणाऱ्याला हे सगळं कदाचित नवीन वाटेल पण रोज लोकने प्रवास करणाऱ्यांना हे काही नवीन नाही. पश्चिम, मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर यानुसार फक्त संदर्भ काही ठिकाणी बदलतील पण प्रत्येकाच्या वाट्याला येणा-या अडचणी अगदी सारख्या
स्टेशन बाहेरची गर्दी, तिकीट/ पास काढायची गर्दी. बंद पडलेल्या मशीन मधून कार्डावर तिकीट कसे मिळवायचे हा पडलेला प्रश्ण. आपली नेहमीची लोकल आज किती मिनीटे लेट याची धाकधूक, फेरीवाले, बुट पाॅलिश वाले, खाद्य पदार्थाचे स्टाॅल. चलो भाई दादर उतरना है क्या म्हणून पुढच्याशी केलेली चौकशी. आणि असाच परतीचा प्रवास. वर्षातील ५२ रविवार ( नशिबवान लोकांना तेवढेच शनिवार किंवा निम्मे शनिवार), ५-६ सुट्ट्या, रजा वजा करता इतर सर्व दिवशी या नखरेल लोकलचा प्रताप सर्व मुंबईकर अनुभवतोच.
रोज मरे ( मध्य रेल्वे ) त्याला कोण रडे? अशी परिस्थिती
एखादा/ एखादी गोष्ट मुद्दाम करत असेल तर आपण २-४ वेळेला प्रेमाने सांगू. ऐकतच नाही म्हणल्यावर? सोडून देऊ
हो ना? अशांबद्दल द्वेश अजिबात नाही. किंबहुना अगदी सगळं विसरुन एक दिवस प्रेमाने त्याच्याशी / तिच्याशी बोललं तर?
नाही सुधारणार हे माहित आहे तरीही.
असा एक दिवस दरवर्षी मुंबईकर साजरा करतात. तो दिवस उद्या येतोय. खंडेनवमीचा
एरवी या आपल्या राणीवर ( मग ती बेलापूर, बदलापूर, कर्जत, खोपोलीची असू दे किंवा टिटवाळा, बोरिवली, अंधेरीची असू दे) मुंबईकर कितीही रागावू दे. उद्या एक दिवस मात्र हक्काने तिचे लाड करणार.
खंडेनवमीच्या आदल्या रात्री मुक्कामाला कार्ड शेडला गाडी आली ( शक्यतो ही गाडीही क्वचित बदललेली असते) की रात्रीतच सजावटीला सुरूवात होते. प्रत्येक डब्यात पताका, मोटरमन केबीन, गार्ड केबीन ला झेंडूची फुले, आंब्याची पाने, केळीचे/ उसाचे, खांब, पुढे मोठ्ठा फलक. डब्याच्या प्रवेशद्वारावर शुभेच्छांचे प्रिंट आऊट, वर्गणी, पूजा, आणि लोकल इतकाच सर्वांच्या आवडीचा प्रसाद
'वडा-पाव ' याने कार्यक्रमाची सांगता.
*ही तर निर्जीव गाडी. तिच्यावर आपण एकदिवस का होईना मनापासून प्रेम करतो मग हेच कुणी कितीही वाईट वागलेला सजीव असू दे. आपल्याला असे वागता येणार नाही का?*
बरं का मंडळी, हे ही मुंबई स्पिरीटच.👆🏻✔
केवळ पावसाळ्यात, वाईट गोष्टीत नाही तर उत्सवात एकत्र रहायचे मुंबई स्पिरीट. जणू नाण्याची दुसरी बाजू.
तेंव्हा उद्या ४ ही लाईन्स वरच्या ७०-८० स्टेशनवरील किमान प्रत्येकी २ फलाटावर सकाळी उभ्या राहिलेल्या चाकरमनींच्या तोंडी एकच गाणे असेल
येशील येशील येशील राणी 🚆
वेळेत लवकर येशील
अडचणी संपवून, वेगात पळून
खिडकीची जागा तू देशील? 🚆
📝अमोल केळकर
६/१०/१९
poetrymazi.blogspot.in
#लोकल माझी लाडाची लाडाची गं