नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Thursday, November 21, 2019

मी परत लिहीन, मी परत लिहीन


' मी परत येईन ' ( एक अराजकीय स्फुटक) 📝

मंडळी नमस्कार 🙏🏻

गेले काही दिवस महाराष्ट्रातील एकंदर सामाजिक स्वास्थ्य ज्या एका वाक्याभोवती फिरत आहे ते वाक्य म्हणजे

मी परत येईन, मी परत येईन, मी परत येईन

हे राजकीय घडामोडी संबंधित वाक्य आहे. पण या वाक्याचा संदर्भ घेऊन काही नेहमीच्या जिवनात नकळत आपण हे वाक्य ( अगदी असंच नव्हे)  कसे वापरतो ते पाहू

मला वाटते याचे बाळकडू आपल्याला अगदी घरातच मिळालेले असते. काही कामानिमित्त आपण बाहेर,दुस-या गावी निघालो आणि 'निघतोय मी', 'जातोय मी ' असं म्हणलं गेलं तर वडिलधा-यांकडून लगेच आदेश येतो  ' मी येतो ' असे म्हणं ( मी परत येतोय)

दुसरे एक वक्री उदाहरण द्यायचे झाल्यास शाळेत मास्तरांकडून दिला जाणारा 'घरचा अभ्यास'/ सुट्टीतील अभ्यास.
 इथे महत्वाचे म्हणजे तुम्हाला जरी  इच्छा नसली तरी तमाम मास्तरांना ( गुरुजी शब्द मला घरचा अभ्यास देणाऱ्यांसाठी वापरायला आवडत नाही , ते मास्तरच 😏) तुम्ही परत येणार आहात याची खात्री असते आणि म्हणूनच ते तुम्हाला घरचा अभ्यास देतात.

टेलिव्हिजनच्या दररोजच्या रटाळ मालिका ही नकळत 'मी परत येईन' असंच सुचवत नाहीत का?
पूर्वी काही खास कार्यक्रम उदा. रंगोली, सुरभी, साप्ताहिकी इ.इ. 'केंव्हा परत येतील' असे वाटायचे.

सिनेमाचा एक भाग पुर्ण करुन ( सिनेमा चाललाच तर) पुढील अनेक भागांची  जुळणी करुन ठेवणे हा ही मला ' मी परत येईन ' चाच भाग वाटतो.

२४ * ७ मनोरंजनात कुठेही कमी न पडणा-या वृत्तवाहिन्या, भेटूया एका विश्रांती नंतर असं जेंव्हा म्हणतात तेंव्हा पुढचे 'मी परत येईन' हे शब्द मला सायलेंट ( अनुच्चारित)  वाटतात.

कबड्डीत आऊट झालेला खेळाडू,  कसोटी सामन्यात पहिला डाव झाल्यानंतर दुस-या डाव खेळण्यासाठी आतूर असणारा खेळाडू,  काही कारणाने संघाच्या बाहेर राहिलेला खेळाडू यांच्या मनात 'मी परत येईन ' असा सुप्त विचार नक्कीच असेल ना?

भांडण झाल्यावर वडीलधारी मंडळी भांडण तात्पुरते सोडवतात त्यावेळी भांडलेल्या व्यक्तींच्या मनातील भाव, आत्ता सोडतोय पण थांब बघतोच तूला😠 ( मी परत येईन)  असाच दिसतो ना?
( Whatsapp वरील वैचारिक कुस्तीत ही हे दिसून येते.  आत्ता उत्तर द्यायला वेळ नाही मला,  मी परत येईन, परत भांडेन )

काही थोडक्यात उदाहरणे,  घरात लग्न कार्य असते काही १-२ गाड्याच असतात त्यावेळी वाहन चालक सांगतो, थांबा तुम्ही इथे, यांना सोडून तुम्हाला घ्यायला 'मी परत येईन ' .

शाळेतील ब-याच दिवसांनी भेटलेली मित्र -मंडळी परत नक्की भेटायचं हा ..! यंदा लोणावळा बरं का !असे ठरवतात तेंव्हा एका प्रकारे ' मी परत येईन ' असेच ना?🤗

अशा अनेक गोष्टी घडत असतात. अगदी दर ३० वर्षांनी शनी महाराज ही न चुकता तुमच्या राशीला १२ वे येतात. जणू ३० वर्षापूर्वी साडेसाती संपल्याच्या आनंदात ' मी परत येईन ' हे त्यांचे वाक्य आपणास ऐकू गेलेले नसते.

अडचणीत सापडल्यावर देव आठवतो. नवस केले जातात आणि ते करताना माझे अमुक तमुक काम झाले तर मी येऊन नवस फेडेन ( म्हणजेच मी परत येईन)  अशी लाच ही दिली जाते.

मंडळी , लेख आवरता घेतो. तुम्हाला आवडला, नाही आवडला,अवश्य प्रतिक्रिया द्या.टिका सुचनांचे स्वागतच.

तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनावर
मी पुन्हा लिहीन, मी पुन्हा लिहीन, मी पुन्हा लिहीन 🙏🏻😌

अवांतर:-
मी परत येईन - असे न म्हणणाऱ्यांसाठी

लहान मुले ( अगदी पक्षांचीही) एकदा बाहेर गेली खेळायला, की परत यायचे नाव काढत नाहीत. मग त्यांची अशी समजुत काढावी लागते

या चिमण्यांनो परत फिरा रे. ..

📝 अमोल
poetrymazi.blogspot.com
२२/११/१९
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...