📝 "जन्म पत्रिका "
मंडळी नमस्कार 🙏🏻
एक वेगळा विषय मांडतोय. म्हणजे ज्यांचा ज्योतिष विषयात अभ्यास आहे त्यांना तर कळेलच पण ज्यांना आपली फक्त 'जन्म पत्रिका' असते आणि त्यात शनी, मंगळ वगैरे ग्रह असतात या शिवाय फारशी माहिती नाही त्यांनाही समजेल, वाचताना मजा येईल
एक गोष्ट , सदर लेखनात भविष्य पत्रिकेवरुन सांगता येते का? कितपत खरं असते? भविष्य बरोबर यायची वारंवारता काय असते? ही श्रध्दा का अंधश्रध्दा ? यावर काहीही वाच्यता केलेली नाही. त्या कडे कसे बघायचे हा प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन असू शकतो. इथे फक्त 'जन्म पत्रिका ' बघून सुचलेले विचार मांडले आहेत
तर पत्रिका म्हणजे चौकोन / आयताचे केलेले १२ भाग, प्रत्येक भागात क्रमाने लिहिलेले नंबर ( घड्याळ्याच्या काट्याचा फिरण्याच्या उलट्या मार्गाने / Anti clockwise लिहिलेले ) आणि त्यात मांडलेले १२ ग्रह इतपत आपणास माहित आहेच. आता नुसती समोर पत्रिका आली की काही साधी गणित ( आकडेमोड) करुन आपण जन्म वेळ, महिना, दिनांक, साधारण तिथी आणि हाती पंचांग असेल तर अचूक वर्ष ( हे थोडं अवघड आहे मनात करायला) काढू शकतो.
उदा. यासाठी पत्रिकेत रवि कुठल्या स्थानात / भावात आहे हे बघायचे. पत्रिकेत रवि प्रथम स्थानात ( इथे दिलेल्या पत्रिकेत सगळ्यात वरच्या भागात जिथे 'दिगंबरा,दिगंबरा लिहिले आहे) असेल तर जन्म सुर्योदयाचा. दशम स्थानात ( मंत्र 'श्री गजानन जय गजानन जय जय गणेश मोरया जिथे आहे ते स्थान) रवि असेल तर दुपारी १२ च्या सुमारास जन्म. चतुर्थ स्थानात ( मंत्र ॐ गं गणपतये नम: लिहिलय ते स्थान) रवि असेल तर रात्री १२ च्या सुमारास जन्म.
यानुसार प्रत्येक भावातील 'रवि' ग्रह आपल्याला 'जन्म वेळेचा' अंदाज देतो.
आता रवि ग्रहावरुनच आपला जन्म महिना कसा काढायचा ते बघू
उदा. पत्रिकेत तुमचा रवि ग्रह दशम भागात ( दुपारी १२ चा जन्म) असेल आणि तिथे ' ७ ' अंक ( तुळ रास त्या भागात किंवा तुळेचा रवि असेल) लिहिला असेल तर ७ मधे ३ मिळवायचे म्हणजे उत्तर येते १० म्हणजे आॅक्टोबर महिना. थोडक्यात तुळ राशीत रवि १५ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंबर असतो. तर या कालावधीतच तुमचा जन्म झाला आहे. आणखी एक उदाहरण
प्रथम स्थानात ( सुर्योदयाचा जन्म) १० आकडा असेल ( मकरेचा रवी) तर १०+३=१३ महिने १२ असतात त्यामुळे १२+१ म्हणजे जानेवारी महिना. तर इथे जन्म १५ जाने ते १५ फेब्रुवारी मधला असणार
आता चंद्र जिथे आहे पत्रिकेत आहे ती तुमची रास
११ लिहिलय ती कुंभ
६ लिहलय ती कन्या
आपण काढलेल्या महिन्यात चंद्राची ही परिस्थिती एकदाच( २-३ दिवस) असते. म्हणजेच आपल्या अचूक जन्मतारखेच्या २-३ दिवस मागे पुढे आपण पोहोचलो ते ही हातात फक्त पत्रिका घेऊन.
आता चंद्र- रवि यांच्यातील अंतर तिथीची जाणीव करुन देते.
दोघे एकत्र - अमावस्या
चंद्र रवि पासून anticlockwise जस जसा पुढे जाईल तसतस शुक्ल पक्षाच्या तिथी. दोन ग्रह समोरा समोर आले की पोर्णीमा आणि चंद्र परत रवि कडे जायला लागला की कृष्ण पक्ष. एकत्र अाले की परत अमावस्या
पत्रिकेत शनी एका राशीत २.५ वर्षे असतो. त्यावरुन तसेच मग मंगळ, गुरु, बुध, शुक्र ग्रहांच्या स्थिती नुसार ( जुनी पंचांग किंवा संगणक प्रणालीच्या मदतीने ) तुम्ही अचुक जन्म वर्षे ओळखू शकता.
आहे ना सोप? 😉
( उद्या कुणी पत्रिका देऊन सांगितले ओळख कुणाची पत्रिका आहे तर अचूक तारीख काढायची आणि गुगल मधून त्या दिवशी जन्मलेली प्रसिद्ध व्यक्ती हुडकायची. आपली परीक्षा बघणारा तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाची पत्रिका ओळखायला थोडीच देणार आहे 😜)
चला अभ्यास संपला. आता थोडी गंमत जंमत करु या. लहानपणी किंवा सध्या लाॅकडाऊन मुळे पुन्हा परतलेल्या लहानपणात आपण अनेक खेळ खेळले आहोत/ खेळले आहोत . बुध्दीबळ, सापशिडी, कॅरम, पत्याचे विविध डाव, ल्यूडो, क्रिकेट इ इ इ.
साधारणपणे एप्रिल/मे महिन्यात खेळण्यात येणारा आयपील खेळ यंदा होऊ शकलेला नाही. पण हा कन्सेप्ट लक्षात घ्या. वेवगेगळ्या टीमचे मालक १०-१२ खेळाडू घेऊन खेळतात. कधी एखादा सामना जिंकतात कधी हरतात. खेळ चालूच राहतो.
पत्रिका ही खेळाची जागा, पत्रिकेतील ग्रह म्हणजे खेळाडू आणि तुम्ही मालक. या पत्रिकेतील सर्व ग्रह तुमच्यासाठी वर उल्लेख केलेले विविध खेळ, विविध प्रकारे, विविध वेळेला खेळत असतात आणि मग तुम्हाला विविध अनुभव येत असतात. तुम्ही एखाद्या वेळेला जिंकता, कधी हरता.
प्रत्येकाचा पट वेगळा, पडलेले फासे वेगळे. अगदी एकाच दिवशी आयपीएल चे दोन खेळवलेले सामने जसा वेगळा अनुभव/ निकाल देतात तस जुळ्यांचे आयुष्य ही वेगळे घडते.
पत्रिकेतील ग्रहांमधील युती, प्रतियोग, नवमंचम, लाभ हे योग म्हणजे पत्रिकेच्या कप्तान ( महादशा स्वामी), उपकप्तान ( राशी स्वामी) यांनी लावलेली फिल्डींग. अनेकदा जाळ्यात अडकवतात, कधी मिस फिल्ड होऊन चौकार देतात. कधी सर्व क्षेत्ररक्षकांना विकेट कीपर पासून पुढे सरळ स्लिप मधे लावून तुमचा काल-सर्प योग करतात.
तर कधीकधी अंतर्दशा स्वामी, विदशा स्वामी दोन ओपनर बॅटस्मन अनुकूल परिस्थितीत चौकार षटकारांची आतषबाजी करतात.
सुनील गावसकर यांनी एका गाण्यात जे म्हणले आहे ' हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला' हे यासंदर्भात ही पटते.
मंडळी, असे हे ' पत्रिका महात्म्य ' आपणास आवडले असेल अशी आशा करतो.
आता जोतिषाचा अभ्यास करणा-यांसाठी थोडे:- समोर येणारी पत्रिका म्हणजे एक देऊळच आहे. आपण देवळात जातो, देवाला नमस्कार करतो आणि प्रदक्षिणा मारतो तसेच समोर आलेल्या पत्रिकेच्या प्रत्येक भावातून जेवढ्या प्रदक्षिणा कराल तेवढी पत्रिका सुटायला मदत होते. इथे कधीकधी यातील ग्रहच तुम्हाला संकेत देतात, लक्ष वेधतात आणि उत्तर सुचवतात.
आणखी एक :- १२ भागात तुमचे १२ इष्ट देवतेला ठेवायचे, त्यांचा मंत्र लिहायचा ( जे मी इथे दिलेल्या पत्रिकेत केलं आहे) बघा पत्रिका सोडवताना काही मदत होते का. आणि हो महत्वाचे म्हणजे आपापल्या क्षेत्रात सचिन तेंडूलकर बनण्याची इच्छा असतेच प्रत्येकाची पण नाही जमलं तर निदान रमाकांत आचरेकर बनायला काय हरकत आहे?
मंडळी वयाच्या जवळजवळ ३० वर्षापर्यंत माझा पत्रिका/ ज्योतिष याच्याशी संबंध आला नाही. लहानपणी कधीतरी आई-बाबांनी पत्रिका काढलेली होती. पण समजा त्यावेळी कुणा गुरुजींनी तू या विषयाचा अभ्यास करशील किंवा लेखन वगैरे करशील असे सांगितले असते तर मी यावर अजिबात विश्वास ठेवला नसता
म्हणूनच मराठी गझलकार भाऊसाहेब पाटणकरांच्या या ओळी मला पटतात. या ओळींनीच हा लेख आवरता घेतो. धन्यवाद 🙏🏻
क्षणाक्षणाचे पडती फासे 🎲
जीव पहा हे रमलेले
पुर्वजन्मीचे संचित त्यांच्या 📝
भाळावरती सजलेले
जीवनातल्या या खेळात ♟
कुणी असते जिंकलेले 🏆
सगळं असत ठरलेले,
सगळं असतं ठरलेले 🎯
(ज्योतिषी अभ्यासक)अमोल केळकर
०३/०५/२०२० 📝
a.kelkar9@gmail.com