नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, May 13, 2020

या भवनातील गीत .


*१३/५/२०२०*
(या भवनातील गीत ....🏡 )


मंडळी, प्रत्येक वर्षी येणा-या काही तारखा या आपल्यासाठी विशेष असतातच जसे आपला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, मुलांचे वाढदिवस आणि अशाच काही  इतर तारखा . यंदाच्या २०२० वर्षातील  १३ मे या तारखेची मात्र मी अगदी आतुरतेने वाट पाहत होतो जी अर्थातच आज आहे.

नाही नाही ' दिन विशेष ' वगैरे पाहू नका त्यात काही मिळणार नाही
पण १३/५/२०२० शी आमचे ( केळकर परिवार , माधवनगर ) इतके ऋणानुबंध होते की ही आमच्या सर्वाचीच ' मर्मबंधातील ठेव आहे'

साधारण १९३०/१९४० - ते १९९०  अशी किमान ५० - ६०  वर्ष आमच्या केळकर कुटूबियांचा पत्ता असा होता

*१३५ गुरुवार पेठ , माधवनगर ( जिल्हा सांगली ),फोन नंबर २०२०* सांगली जिल्ह्याची जी काही फोन डिरेक्टरी निघायची त्यात काकांच्या नावासमोर असे लिहिलेले असायचे ☎

माधवनगर कॉटन मिलचे मॅनेजर श्री गंगाधर नारायण केळकर म्हणजे माझे सख्खे काका अर्थात आम्ही सगळे त्यांना दादा म्हणायचो.



त्यांना  काॅटन मिल मध्ये लागल्यावर  रहायला मिळालेली जागा म्हणजे १३५ गुरुवार पेठ .
आजच्या भाषेत कंपनी काॅर्टर्स.

या घराबद्दल तर जेवढं लिहावं तेवढं थोडंच आहे.  ही जागा  म्हणजे प्रशस्त कौलारू बंगला प्रशस्त खोल्या, मुंबईतील साधारण १का मोठ्या खोलीएवढे फक्त देवघर, प्रशस्त माडी. अंगण, माजघर,पडवी, मागच्या बाजूला विहीर, पुढच्या बाजूला हौद, तुळशी कट्टा, पेरु, सिताफळ यांची भोवताली झाडी, घराच्या वरती लिहिलेले ॐ आणि प्रवेशद्वारा जवळ असलेले
पांढ-या चाफ्याचे झाड.🌱

असे हे घर माझ्यासाठी 'नंदनवन' ठरले नसते तर नवल. ' घर असावे घरा सारखे नकोत नुसत्या भिंती' हे काव्य इथे अनुभवले. केळकरांचा मोठ्ठा परिवार, एकत्र कुटुंब, वेगवेगळ्या कामानिमित्त सतत येणारे नातेवाईक - परिचीत, यामुळे  अर्थातच केळकर परिवारासाठी हे गोकुळच होते.  सर्वांचे आदरातिथ्य करणारी काकू,काका आणि वयाने मोठे असणारे माझे चुलत बहिण भाऊ
यांच्यासह 'बालपणीचा काळ सुखाचा' हे शब्दश: अनुभवलं कारण घरातील शेंडेफळ मीच होतो.
संध्याकाळी दिवे लागणीला काका सर्व स्तोत्रे म्हणून घ्यायचे. स्वतः ते अनेक वर्ष आसनं करायचे. आम्हाला करायला लावायचे. दर महिन्याला पोर्णीमेच्या आदल्या दिवशी पंपंम गाडीतून 🚗 न चुकता नरसोबावाडीला जायला मिळायचे. वयाच्या १-२ वर्षापासून ते काका निवृत्त होईपर्यंत / मी सांगलीत असे पर्यत न चुकता वाडीला गेलो आहे.
 त्यावेळी गाडीतून जायची जी मजा होती ती आता स्वतः ची गाडी असताना ही नाही. त्यावेळी फिरायला जाणे एवढच ध्येय होते तरी धार्मिक तेचे बीज माझ्यात नकळत काका- काकूं मुळे रुजले गेले यात शंकाच नाही.
उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहणे, दिवाळीत किल्ला बनवायला मोठ्या भावाने शिकवले. संघ शाखेचा जो काही अनुभव मिळाला तो ही याच घरा जवळ असणाऱ्या आरोग्य केंद्रातून.

थोडक्यात अनेक संस्कारांचे 'बाळकडू' या वास्तूत मिळाले. देव दिवाळी ( देवांचे विमान यायची वाट बघणे हा मजेशीर कार्यक्रम) , ललिता पंचमी, बोडण, सत्यनारायण, हदगा, मंगळागौर, हळदी-कुंकू, डोहाळजेवण, बारसं, केळवणं, लग्न- कार्यानिमित्यचे ग्रहमक, पूजा असे सर्व सोहळे एन्जॉय केले. लहानपणी हे बायकांचे कार्यक्रम हे पुरुषांचे असा भेदभाव कधीच मानला नाही.

आमचा चुलत भाऊ ( माधव भाऊ) याच्या लग्नाला पुण्याला जाण्यासाठी केलेली 'प्रासंगिक करार' लालपरी जेंव्हा १३५ गुरुवार पेठ माधवनगर समोर उभी राहिली होती तेंव्हा काय आनंद झालेला सांगू
अमर्याद आठवणी आहेत. थोडक्यात लिहायचा प्रयत्न केलाय.

  १३५ बद्दल झालं आता थोडं २०२० बद्दल

 काका कंपनीचे मॅनेजर असल्याने त्यावेळची सहजासहजी न आढळणारी गोष्ट म्हणजे  लँडलाईन फोन घरी होता.जुन्या  लँडलाईन ची मजा / अनुभव अनेकानी  घेतला असेलच यात शंका नाही . ७/८/९/० नंबर फोन लावताना आले तर लागणारा वेळ, फोनची टिपिकल रिंग, शेजा-यांना फोन आला तर बोलवायला जाणे, ट्रंक काॅल बुक करणे, फोन डेड झाल्यावर करावे लागणारे उपद्व्याप अनेक गोष्टी आहेत.

या वास्तूत घडलेल्या अनेक चांगल्या गोष्टी/ नियतीने समोर ठेवलेल्या ब-या वाईट घटनांना हा फोन साक्षी होता.

अशी ही १३/५/२०२० ची छोटी गोष्ट

केळकर परिवारासाठी अभिमानास्पद. या देव घरातील 'देव' माणूस म्हणजे आमचे काका आॅक्टो १९ मधे वार्धक्याने 'देवा'घरी गेले ते आम्हाला समृद्ध करुन

हा लेख त्यांना समर्पित 🙏🏻

त्यांचे संस्कार,आठवणी आणि नातू शेठनी दिलेली आणि अनेक वर्ष या घरात विराजमान असलेली श्री गुरुदेव दत्ताची मूर्ती कायम सोबत राहील.

अमोल केळकर 📝

#मर्म_बंधातली_ठेव_ही
#१३५ गुरुवार पेठ माधवनगर
#फोन नं २०२०
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...