नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Sunday, May 24, 2020

माझे अंगण


माझे आंगण...

काही दिवसापूर्वी एका राजकीय पक्षाने ' माझे आंगण, माझे, xxxx असा काहीतरी सोहळा केला.

अहं ! लेखनाचा हा विषय नाही. तुम्हाला माहितच आहे राजकीय गोष्टी, मुद्दे, प्रतिक्रिया यापांसून मी किती लांब असतो ते. परत परत मला सांगायला लावू नका☺.

आपण फक्त चांगल घ्यायचं

तर 'माझं अंगण ' हे  शब्द मला लेखनासाठी विषय सुचवून गेले. ज्योतिषा ने 'भविष्यकाळात' रमावे, लेखकाने मात्र वारंवार 'भूतकाळाच्या' अंगणात डोकावून 'वर्तमानातील' रसिकांना छान छान गोष्टींची आठवण करुन द्यावी या मताचा मी आहे त्यामुळे भूतकाळातील अंगणात माझ्या जरा जास्तच फे-या होतात. असो.
तर 'माझे अंगण' ऐकून

'अंगणी माझ्या मनाचे,मोर नाचू लागले' असं म्हणलं तर वावग ठरणार नाही.

साधारणपणे गावाकडे कुठले ही घर म्हणले की 'अंगण' हा त्याचा अविभाज्य घटक असतोच. अर्थात पुणे-मुंबई किंवा इतर महानगरात ही ज्यांचे स्वतंत्र बंगले आहेत त्यांच्याकडे 'अंगण' असतेच म्हणा. पण अपार्टमेंट मधे राहणाऱ्या आमच्यासारख्यांना सोसायटी समोरच्या ( असलीच तर )ओपन स्पेसला 'अंगण ' म्हणणे माझ्यातरी जिवावर येतं

म्हणून गावाकडचे घर , सभोवतालचे 'आंगण' हे मला विशेष वाटते. आता आंगण म्हणले की तिथे खेळलेले खेळ वगैरे ओघाने आलेच.

माहेरवाशीणींच्या अनेक गाण्यातून 'अंगण' दिसून येते
उदाहरण बघा ना
' ऐलमा पैलमा गणेश देवा' या हदग्याच्या  गाण्यातील अनेक कडव्यात 'अंगणात रंगली ग माहेरची गाणी' असा उल्लेख येतो.

तुळशीचे लग्न, घरातील मंगल कार्यानिमित्य घातलेला मांडव याने वेगळे वाटणारे आंगण अशी अंगणाची विविध रुपे आपण बघतो तरी दिवाळीत ते जरा जास्त खुलते ना? मुलांनी बनवलेले किल्ले, रांगोळ्या, रात्री लावलेल्या पणत्या आणि नातेवाईंकाच्या गप्पागोष्टीत रंगलेले अंगण

दिवाळी येणार,अंगण सजणार
आनंद फुलणार घरोघरी
आमच्या घरी अन तुमच्याघरी

हे ही एक गाणे

निळेसावळे ओले अंगण
तुझ्या नी माझ्या मनात श्रावण
रानोरानी, पानोपानी
भिरभिरती भिजलेली गाणी

अनेक कवितांधूनही 'अंगण' डोकावते:-

माझ्या ग अंगणात, थवे फुलपाखरांचे
गोल गोल रिंगणात,गाणे फिरते रंगाचे

फुलपाखरावरुन आठवलं मंडळी, अंगण म्हणले की त्याचा अविभाज्य भाग म्हणजे सभोवतालची बाग. त्या बागेत हौसेने लावलेली वृक्षवल्ली आणि त्यावर बागणारी छान छान फुलपाखरे.

'व्यक्ती तितक्या प्रकृती' असतार त्याचप्रमाणे प्रत्येक घराची एक खास बाग असते. इतर अनेक कलांसारखीच 'बागकाम' ही पण एक कला आहे आणि ती सहजासहजी कुणाला जमणारी नाही. त्याची ही आवड पाहिजे. पत्रिकेत चतुर्थ स्थानावरुन 'घराचा' योग पाहतात पण त्या चतुर्थ स्थानात शुक्र, चंद्र वगैरे असले की त्याच्या घरा भोवतीची बाग ही अतिशय सुरेख असणारच.

आता अपार्टमेंट मधे राहणारे आणि बागकामाची आवड असणारे नाइलाजाने आपल्या गॅलरीत, बाल्कनीत झाडे लावून आपली हौस भागवतात. मग तळ मजल्यावर राहणाऱ्या आमच्या सारख्याना वरुन टपक टपक गळणाऱ्या पाण्याने सकाळ /संध्याकाळ अभिषक होतो ही गोष्ट वेगळी 😃

आमच्या साखर कारखान्याच्या घरच्या अंगणात आम्ही बागकाम केले. आपुलकीने जी झाडे तरली ती तरली. हेच पलिकडे आमच्या निलेश च्या ( डोर्ले ग्रुप, अरिहंत फार्मा) घरची बाग मात्र अतीशय दृष्ट लागावी एवढी सुंदर. घराचे नाव पण किती समर्पक 'सावली' 🏡

अशी अनेक घरे ( यात तुमचे सध्याचे/ पुर्वीचे/ किंवा तुम्ही बागकाम केलेली)  तुम्हाला हा लेख वाचून आठवतील आणि तुमच्या अंगणात पडणा-या तुमच्या बागेतील अनेक टपो-या फुलांप्रमाणे तुमचे मन या आठवणीत परत तरतरीत व्हावे ही माफक इच्छा

आमच्या 'गायत्री ' बंगल्यावर
 दरवर्षी मे महिन्यात न चुकता फुलणारा ' मे फ्लाॅवर,

घराच्या गच्चीवर हौसे खातर बेळगाव जवळील खानापूर हून आणलेल्या ४०-५० वेगवेळ्या गुलाबाच्या ठेवलेल्या कुंड्या

गणपती च्या आधी 'गौरीच्या फुलांनी' सजणारी बाग

सदा फुलणारा 'मदनबाण'

आणि  साखर कारखाना चालू झाला की अंगण-घर- गॅल-या- गच्चीत पसरणारी 'काळी राख'

या आठवणी कायमच्या

लेखनाचा शेवट आवडत्या गाण्यातील या ओळीने

"हे विश्वाचे अंगण
आम्हा दिले आहे आंदण"

( अंगणातच जास्त रमणारा) अमोल 📝
२४/०५/२०२०
poetrymazi.blogspot.in

ता.क :- ब-याच ठिकाणी अंगण/ आंगण असे  दोन्ही उल्लेख आलेत. योग्य शब्द तुम्हीच समजून घ्या. भावना त्याच आहेत ☺
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...