नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Sunday, May 17, 2020

माझा पहिला राजधानी प्रवास


आज १७ मे. मुंबई - दिल्ली राजधानीचा वाढदिवस. आज ती ४८ वर्षाची झाली. या संबंधित एक छान लेख आमचे जेष्ठ मित्र रामभाऊ यांनी फेसबुकवर लिहिलाय त्याची ही लिंक 👇🏻
इच्छूकानी अवश्य वाचावा

https://www.facebook.com/625832933/posts/10157432594367934/

यानिमित्याने आमचा पहिला राजधानीचा प्रवास आठवला. खरं म्हणजे सांगलीत राहणाऱ्या आमच्यासाठी 'महालक्ष्मी एक्सप्रेस' हीच राजधानी असायची. पण मुंबईत सुट्टीला गेलो की प्रत्यक्षातली राजधानी अधूनमधून दिसायची. मालाडला माझी आत्या होती त्यामुळे तिच्याकडे ब-याचदा रहायला जायचो. प्रत्येक सिझनला एकदा तरी ही दर्शन द्यायचीच. सर्व डबे वातानुकूलित,  इंजीनाची रंगसंगती ही डब्यासारखीच आणी इतर गाड्यांपेक्षा-( जणू खळ खट्याक) वेगाने जाणारी म्हणून हीचे कौतुक वाटायचे. आपल्या नशिबात या गाडीत बसणे आहे की नाही असे मनात येऊन जायचे.
सुदैवाने मुंबईतच नोकरीला लागल्यावर ही संधी मिळाली. साधारण २००३ साली. मात्र हा प्रवास संपूर्ण नव्हता म्हणजे मुंबई -दिल्ली किंवा दिल्ली - मुंबई ही नव्हता. तर 'कोटा' ते मुंबई असा उलटा प्रवास केला. कोट्याला दिल्लीहून निघालेली राजधानी रात्री ९:३० च्या सुमारास यायची नंतर फक्त पहाटे बडोदा स्टाॅप आणि नंतर थेट ८-८:३० पर्यत मुंबई सेंट्रल. आता सध्या राजधानीला अनेक थांबे दिलेत मात्र त्यावेळी फक्त एवढेच असायचे.
तर कोटा शहरापासून ५-६ तास लांब असणाऱ्या श्री  गंगानगर जिल्ह्यातील एका पाॅवर प्लॅनट्चे टेंडर सबमीट करण्यासाठी सकाळी लवकर हाॅटेल सोडले. आज आयुष्यातील पहिला राजधानीचा प्रवास करायला मिळणार त्यासाठी वेळेवर परत यायचे हेच डोक्यात होते. कोटा हे मधले स्टेशन होते आणि राजधानी साठी आरक्षण  'कोटा' ही फक्त ३-४ माणसांचा होता. त्यात माझे तिकीट वेटींग १ का २ होते.  तिकीट कन्फर्म होणार की नाही याची धाकधूक होतीच. आधी येऊन गेलेल्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ने दिलेल्या सल्ल्यानुसार तिकीट + काही पैसे हाॅटेल मालकाला दिले. त्याने तिकीट 'कन्फर्म हो गा, चिंता मत करो ' असे शाश्वत केले.

ठरल्याप्रमाणे प्रवास, मिटींग, कामे , आणि टेंडर सब्मीशन करुन परतीच्या प्रवासास लागलो. तिकीट कन्फर्म झाले की नाही हे हाॅटेल मधे पोहोचल्यावरच कळणार होते. मोबाईल नसण्याचे रम्य दिवस होते ते. परतीची बस पॅसेंजर बसच होती. मजल दलमजल करत अंतर कापत होती.  रात्री साधारण ८ च्या सुमारास ' कोटा ' पासून ३०-४० किमी अंतरावर एका घाटात बसला अचानक अपघात झाला. सुदैवाने ड्रायव्हर ने बस घाटातील डोंगरावर धडकवली ( म्हणून आज तुम्ही हा लेख वाचत तरी आहात). समोरच्या सिटवर दण्णदिशी आदळलो.हनवटीला लागलेलं कळलं. बसमधले लाईट गेले .पुढेच असल्याने बसमधून उतरणाऱ्या पहिल्या चार पाच प्रवाश्यांच्यात मी होतो.

दैव बलवत्तर म्हणायला पाहिजे की अपघात फार मोठा नव्हता. ड्रायव्हरचा दिवसभर उपवास झाल्याने त्याला चक्कर वगैरे आली म्हणून अपघात झाला असे ऐकले. सुदैवाने मागून आलेल्या एका कारवाल्याने माझ्यासकट आणखी एक दोघांना कोटा शहरापर्यंत लिफ्ट दिली.

हाॅटेल मालकाने तिकीट कन्फर्म झाल्याचे सांगितले , कोच बर्थ फलाटावर जाऊन तिथे आरक्षण चार्टवर बघायला सांगितले आणि आमचा राजधानीच्या पहिल्या प्रवासाचा मार्ग सुकर झाला.

फलाटावर गेल्यावर कोच, सिट नंबर कळला. साईड अप्पर माझ्यासाठी पुरेसा होता. १५-२० मिनिटे गाडी उशीरा आली. जागेवर म्हणजे साईड अप्पर वर जाऊन बसलो  कारण खालची व्यक्ती झोपल्याने थोडावेळ बसून प्रवासाची मजा घ्यायची इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही.
कोच असिस्टंट ने जेवण, फ्रुटी का काय दिले. याक्षणी भूकेची जाणीव झाली. मस्त पॅकिंग असलेले ते जेवण ब-यापैकी धांदरटपणा करुन उघडले. पहिला घास घ्यायला तोंड उघणार तोच...

तोच काय. आत्ता कुठं ध्यानात आलं ,जबडा त्या अपघाताने सुजला होता आणि 'आ' करायचे नाव घेत नव्हता. परोठा चावून खायचा असल्याने ते शक्य झाले नाही. भाताची  चार शिते कशीबशी डाळीत भिजवून खाल्ली. स्टाॅचा जबड्याशी संबंध न आणता फ्रुटी पिऊन निद्रादेवीच्या आधीन झालो.

मात्र यानंतरच्या अनेक राजधानी चे प्रवास प्रत्येकवेळी या पहिल्या प्रवासाची आठवण काढत अगदी मस्तच संपन्न् झाले.

( 🚊प्रेमी ) अमोल
१७/०५/२०२०
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...